गरमागरम मटार

Submitted by योकु on 18 December, 2014 - 08:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- कोवळ्या मटार शेंगा
- तेल
- मीठ
- हवी असेल तर १ हिरवी मिरची

क्रमवार पाककृती: 

- कोवळ्या मटार शेंगा पाहून आणाव्यात.
- कढईत जरा तेल तापत टाकावं.
- तेल तापलं की या शेंगा आख्याच टाकाव्यात. जरा परताव्यात, सगळ्या शेंगाना तेल लागलं जरासं की झाकण घालावं; एक वाफ आणावी.
- मग चवीपुरतं मीठ घालावं. पुन्हा परतावं.

- ताटलीत सगळ्या शेंगा घ्याव्यात अन मग ओरपाव्यात. हातानी दाणे नाही काढायचे. शेंगच दातात धरून साल बाहेर ओढून काढायच. दाणे तोंडात राहातात Happy

तिखट हवं असेल तर एखादी मिरची शेंगांसोबतच घालायची मग ती वेगळी काढून तोंडी लावण्याकरता घ्यायची. शेंगांत राहीली तर दातात मिरचीच घेण्यात येते शेंगा ओरपायच्या नादात!

वाढणी/प्रमाण: 
एकटा माणूसही किलोभर शेंगा खाऊन जातो असल्या गरम शेंगा!
माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सोपा प्रकार आहे.. मस्त लागत असेल.
इथे अंगोलात आल्यापासून शेंगा बघितल्याही नाहीत.. केवळ फ्रोझन दाणेच !

मोठ्या मटार शेंगांत हमखास किडी असतात.न उलगडता दातात ठेवणे जरा रिस्कीच.
गावरान शेंगा छोटुकल्या आणि बहुतांशवेळा कीडमुक्त असतात.
त्या निशंकपणे खाता येतात अश्या.
तेलाऐवजी तूप वापरलं तर अप्रतिम लागतात.
खरेच एकेकजण एक किलो शेंगा खाऊ शकतात हे पाहिले आहे.

मस्त... इथे एकदम कोवळा मटार मिळतो तो सालासकट मस्त लागतो. ह्या रेस्पीने मस्तच लागेल, यात थोडी जळलेली साखरपण (कॅरामलाइज्)) छान लागेल.

इथे अनेकदा मटार शेंगांमध्ये कीड, अळ्या निघतात. म्हणून काळजीपूर्वक शेंगा निवडूनच करावी लागेल ही पाकृ. पण मस्त लागेल.

पाकृ भारी आहे. इथे सोयाबीनच्या फ्रोजन शेंगा मिळतात त्या खाल्ल्या आहेत अशा पद्धतीने. त्या मावेमध्ये थोड्या वाफवलेल्या होत्या.

मटार आणि दसर्‍याच्या वेळी येणारे झेंडू दोन्हींत अगदी हिरव्यागच्च अळया असतात.

कदाचित इथल्या स्नॅप पी'ज वर करता येईल ही कृती << इथे दाणे असलेले दिसत नाहीत जास्त. Sad कधी तरी सिझन मधे इं. ग्रो मधे बघितल्या आहेत फक्त.

वॉव!! मस्त मस्त... तोंपासु.

आम्ही हे तुरीच्या शेंगाचं करतो. पण त्या शेंगा पाण्याचा हबका मारत मारतच शिजवाव्या लागतात, नुसत्या वाफेवर होत नाहीत.
बाकी मटारातल्या अळ्यांबद्दल सर्वांना अनुमोदन!

असेच चटपट चणेही मस्त लागतात. फक्त सोललेले मटार दाणे घ्यायचे. थोड्या तेलात मोहोरी हिंगाची फोडणी करायची.
त्यात धुतलेले मटारदाणे टाकायचे. झाकण ठेऊन किंचित वाफ काढायची. बाहेर काढून लिंबू मिरची कोथिंबीर वारीक शेव घालायची. गरम गरम गट्टम!

अरे वा मस्तच. हरभर्‍यासारख्याच का?

मटार कृती मस्तय! पण त्या बघुन ( सोलुन ) घेतल्याखेरीज खाऊ शकणार नाही.:अरेरे: कारण कुठलीही अळी पाहिली माझा भांगडा सुरु होतो.

रश्मी, जरा कोवळ्या लहान लहान आणि अगदी ताज्या शेंगात शक्यतो अळया नसतात. आणि घरी आणल्यावर आपण तश्याही त्या शेंगा एकदा पाहातोच बहुधा, सो बेझिझक खायच्या!

योकु, तशा कोवळ्या शेंगा आता हिवाळ्याच्या सुरुवातीला मिळतील. काल बाजारात बघीतल्या तेव्हा त्या मोठ्या आणी निब्बर होत्या, मटार अजीबात गोड नव्हते. कोवळ्या शेंगा मिळाल्या की आणतेच मग.