आयटेम साँग्ज

Submitted by बेफ़िकीर on 2 December, 2014 - 23:53

आयटेम साँगद्वारे स्त्रीचे भडक चित्रण करणे, द्वयर्थी किंवा उघड अश्लीलता दर्शवणे आणि चार सहा महिने ठेका धरायला पुरे होईल अशी ट्यून देणे ह्या गोष्टी आता सर्वच चित्रपट निर्माते हटकून करताना दिसत आहेत. अश्या आयटेम साँग्जचा जनमानसावर काय प्रभाव पडेल वगैरेचे कोणाला काही पडलेले नाही. करिना, कत्रिना, मल्लिका, मलाइका अश्या आघाडी-पिछाडीच्या नट्या उत्तान कपडे घालून स्वतःलाच तंदुरी मुर्गी वगैरे म्हणत नाचत आहेत. फोटोको सीनेसे, शीलाकी जवानी, जलेबीबाई, हलकट जवानी वगैरे गीते आता गणेशोत्सव व इतर नाचण्याच्या निमित्तांसाठीची मस्ट प्ले गीते झालेली आहेत.

आजमितीला आपल्याकडे वेगवेगळ्या व्यासपीठावर वेगवेगळे वाद रंगात येत आहेत. कालच हिंदू महासभेचे नितीन त्यागी म्हणाले की मुलींना स्कर्ट आणि जीन्स घालू दिले नाही पाहिजेत. ते असेही म्हणाले की आयटेम साँग करणार्‍या नट्यांना वेश्या म्हणायला हवे. संकेतस्थळे, सोशल मीडिया ह्यावर स्त्रीच्या बाजूने जनमानस तयार करण्याची प्रक्रिया वेगवान झालेली आहे. कायद्यांबाबतची जागरूकता वाढत आहे. एकीकडे खाप पंचायती मोबाईल फोनच्या वापरावर बंदी आणत आहेत आणि दुसरीकडे कोणत्याही क्षेत्रातील सर्वोच्च पद स्त्रिया भूषवत आहेत.

ही एक नेहमी असते तशीच ट्रान्झिशन फेज आहे. समाज हरघडीला थोडाथोडा व सर्वांगाने बदलत असतो तसेच आत्ताही बदलत आहे. ह्यावेळी होणारा बदल थोडा अधिक वेगवान व थोड्या अधिक चांगल्या गोष्टीसाठी होत आहे असे सेफली म्हणता येईल. म्हणजे स्त्री सक्षमीकरणासाठी सध्या थोडी अधिक पोषक वातावरण निर्मीती करण्याचा निदान हेतू असल्याचे दिसत आहे. गुन्हे उजेडात येण्याचे प्रमाण वाढणे हेही एक प्रकारे वाईटातून चांगले काढणे असले तरी बरेच आहे.

पण नितीन त्यागींचे आयटेम साँग करणार्‍या नट्यांबाबतचे दै. सकाळमधील मत वाचले आणि अनेक दिवस डोक्यात असलेला विषय पुन्हा प्रखरपणे जाणवला. उत्तम संवादकौशल्य लाभलेल्या, जनमानसात एक करिष्माई प्रतिमा असलेल्या, भारतीय कलाकारीचे जगासमोर प्रतिनिधित्व करणार्‍या, अभिनयनिपूण, प्रगत व स्त्रीसाठी अधिक चांगले दिवस आणणार्‍या जगात वाढलेल्या नट्या आयटेम साँग करताना जबाबदारीने का वागत नसतील? आपल्या गीताद्वारे आपण नकळत्या, उमलत्या पिढीसमोर स्त्रीचे चित्रण अयोग्य रीतीने करत आहोत हे भान त्यांना नसेल असे नक्कीच वाटत नाही. एक गाणे केले की अमाप पैसेही मिळतात आणि बाकी काही कमिटमेंटही नाही हे सोयीचे वाटत असेल का? ह्या प्रकारावर नियंत्रण यावे असे आपल्यापैकी काहींना वाटते का? की ह्यालाही स्त्रीचे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणता येईल? अश्या आयटेम साँगमध्ये सहसा प्रमुख अभिनेत्रीच्या आजूबाजूला अनेक मद्यपी हावभाव करत नाचत असतात त्यांचे अनुकरण सडकछापांनी केले तर सगळा दोष त्या सडकछापांचा म्हणता येईल का? हेलनच्या जमान्यात असलेले उत्तान डान्सेस हे चित्रपटातील केवळ एक किरकोळ आकर्षण असायचे. त्याचसोबतीला प्रमुख कलाकारांचा उत्तम अभिनय, वास्तव चित्रण, सशक्त कथानक, अर्थपूर्ण व कथेला पुढे नेणारी सुश्राव्य गीते हेही सगळे असायचे. आताच्या मारामार्‍या, सीन्स, विनोदांचे प्रकार, संवाद, अद्भुत कथानके हे सगळे मुळातच मन खिळवू शकत नाहीत, त्यात आणखीन ती निव्वळ घालायची म्हणून घातलेली आयटेम साँग्ज! आयटेम साँग नसेल तर चित्रपटात आपण काहीतरी मिस केले अशी भावना निर्माण होईल का? एखादे उत्तान दृष्य दाखवणे हे कदाचित कथानकाचा भाग म्हणता येईलही, पण आयटेम साँग हे कथानकाचा भाग असल्याची उदाहरणे अलीकडच्या चित्रपटात तरी दिसलेली नाहीत. शोलेमधील मेहबूबा आणि मै झंडू बाम हुई ह्यात हाच थेट फरक आहे.

काही कलावंतांनी खासगीत 'अशी गाणी निर्माण होऊ नयेत व निदान त्यावर लहान मुलांना स्पर्धेत नाचायला लावू नये' अशी खंत व्यक्त केली.

अशी आयटेम साँग्ज निर्माण होणे हे थेट पोर्नोग्राफीपेक्षा भयंकर असावे असे वाटते,

त्या त्या नट्या अडीच ते पाच लाखपर्यंत 'मान'धन स्वीकारून तेच आयटेम साँग एखाद्या समारंभातही सादर करताना दिसतात. म्हणजे जे आजवर चित्रपटात असल्याने अप्राप्य व काल्पनिक वाटण्याची एक किमान शक्यता होती तीही मावळू लागेल.

कृपया खालील काही मुद्यांवर चर्चा व्हावी:

१. मराठी चित्रपटातील लावणी / तमाशा ह्यांची तुलना आयटेम साँगशी करता काय साम्य / फरक वाटतात?
२. आयटेम साँगचे दुष्परिणाम होत असल्याचे तुमचे काही अनुभव आहेत काय? (सोसायटी / मित्रपरिवारात)
३. आपल्या पाल्यांना नृत्य शिकवताना किंवा स्पर्धांमध्ये धाडताना तुम्ही अश्या गीतांवर त्यांनी नृत्य करावे की नाही ह्याबाबत काय भूमिका बाळगता?
४. तुम्हाला स्वतःला एखाद्या पार्टीत नृत्य करण्याची वेळ आली तर एक पुरुष म्हणून / एक स्त्री म्हणून अश्या गीतांवर तुम्ही थिरकता का? तो आनंद मिळवणे वेगळे व अशी गीते बनू नयेत असे वाटणे वेगळे अशी द्विधा मनस्थिती काहींची होऊ शकते का?

वगैरे!

इतरही काही संबंधीत विषय मनात असतील तर अवश्य लिहावेत.

धन्यवाद!

=============

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. मराठी चित्रपटातील लावणी / तमाशा ह्यांची तुलना आयटेम साँगशी करता काय साम्य / फरक वाटतात?>>>>>>>>>>>>>सर .....आजकाल मराठी चित्रपटातील लावणी हि इतकि भय॑कर असते. शिवाय नव्वारीच्या नावावर जे redymade साड्यांचे प्रकार दाखवले जातात ते बघून मूळ नव्वारी कशी होती हे आजकाल विसरायला झाले आहे.

लहान मुलांना स्पर्धेत नाचायला लावू नये' अश्या गाण्यावर मुळीच नाचू देवू नये शब्दांचे अर्थावर त्यांना नाचताना पाहून कीव येते.

आयटेम साँग्जबाबत स्त्रियांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केलेय हे बेसिकच पटले नाही.
निर्माते, दिग्दर्शक, वितरक, सहकलाकार सारेच बहुतांश पुरुष असतातच ना. हल्ली बॉडी शॉडी दाखवणारे कित्येक सलमान, जॉन सुद्धा काय काय दाखवतात हे सांगायला नको..
तरीही स्त्री कलाकारांना का संस्कृती रक्षणाचा ठेका त्यांनीच घेतल्यासारखा जाब विचारला जातोय.
खरे तर जो बिकता है वही दिखता है. आणि या बिकता है ला जबाबदार प्रेक्षकवर्ग नाही का? अर्थात, हा आंबटशौकीन प्रेक्षकवर्ग बहुतांश करून स्त्री आहे की पुरुष हे सांगायाला नकोच..

अश्या आयटेम साँगमध्ये सहसा प्रमुख अभिनेत्रीच्या आजूबाजूला अनेक मद्यपी हावभाव करत नाचत असतात त्यांचे अनुकरण सडकछापांनी केले तर सगळा दोष त्या सडकछापांचा म्हणता येईल का?
>>>>>
नक्कीच नाही,
त्या सडकछापांच्या आईवडीलांचाही दोष आहेच, वेळीच दोन कानाखाली आवाज काढले असते तर ते सडकछाप बनलेच नसते.

>>>आयटेम साँग्जबाबत स्त्रियांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केलेय हे बेसिकच पटले नाही.
निर्माते, दिग्दर्शक, वितरक, सहकलाकार सारेच बहुतांश पुरुष असतातच ना. हल्ली बॉडी शॉडी दाखवणारे कित्येक सलमान, जॉन सुद्धा काय काय दाखवतात हे सांगायला नको..
तरीही स्त्री कलाकारांना का संस्कृती रक्षणाचा ठेका त्यांनीच घेतल्यासारखा जाब विचारला जातोय.
खरे तर जो बिकता है वही दिखता है. आणि या बिकता है ला जबाबदार प्रेक्षकवर्ग नाही का? अर्थात, हा आंबटशौकीन प्रेक्षकवर्ग बहुतांश करून स्त्री आहे की पुरुष हे सांगायाला नकोच..<<<

अर्थातच संपूर्ण यंत्रणा जबाबदार आहे. लेखातून असे म्हणायचे नाही की फक्त स्त्रिया जबाबदार आहेत. तसे वाटत असल्यास क्षमस्व!

मात्र प्रेक्षकांना जे दाखवू ते ते बघतात. आजही आयटेम साँग किंवा तत्सम प्रकार नसलेले चित्रपट व्यवस्थित चालू शकतात. कहानी हा विद्या बालनचा एक असाच चित्रपट म्हणता येईल. त्यामुळे अभिरुची घडवणे हे काम कलाकार व त्यांच्यामागील यंत्रणाच करत असतात. स्त्री कलाकारांचा उल्लेख फक्त इतक्याच हेतूने केला की स्त्रीला स्वतःलाही वाटावे की आपण स्त्रीची प्रतिमा अशी होऊ देऊ नये. बाकी कथालेखक, गीतकार, निर्माते, दिग्दर्शक व इतर सर्व संबंधीत तितकेच जबाबदार आहेत ह्यात वाद नाहीच.

>>>त्या सडकछापांच्या आईवडीलांचाही दोष आहेच, वेळीच दोन कानाखाली आवाज काढले असते तर ते सडकछाप बनलेच नसते.<<< ह्याच्याशी सहमत आहेच. हे सडकछाप अशी आयटेम साँग्ज व त्यातील मद्यपी पाहून अधिकच बहकू शकतात असे म्हणायचे होते.

प्रतिसादांसाठी सर्वांचे आभार!

लेखातून असे म्हणायचे नाही की फक्त स्त्रिया जबाबदार आहेत. तसे वाटत असल्यास क्षमस्व!

>>>>>>
उत्तम संवादकौशल्य लाभलेल्या, जनमानसात एक करिष्माई प्रतिमा असलेल्या, भारतीय कलाकारीचे जगासमोर प्रतिनिधित्व करणार्‍या, अभिनयनिपूण, प्रगत व स्त्रीसाठी अधिक चांगले दिवस आणणार्‍या जगात वाढलेल्या नट्या आयटेम साँग करताना जबाबदारीने का वागत नसतील? आपल्या गीताद्वारे आपण नकळत्या, उमलत्या पिढीसमोर स्त्रीचे चित्रण अयोग्य रीतीने करत आहोत हे भान त्यांना नसेल असे नक्कीच वाटत नाही. एक गाणे केले की अमाप पैसेही मिळतात आणि बाकी काही कमिटमेंटही नाही हे सोयीचे वाटत असेल का? ह्या प्रकारावर नियंत्रण यावे असे आपल्यापैकी काहींना वाटते का? की ह्यालाही स्त्रीचे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणता येईल? अश्या आयटेम साँगमध्ये सहसा प्रमुख अभिनेत्रीच्या आजूबाजूला अनेक मद्यपी हावभाव करत नाचत असतात त्यांचे अनुकरण सडकछापांनी केले तर सगळा दोष त्या सडकछापांचा म्हणता येईल का?
>>>>>>>>>>

या संपुर्ण परीच्छेदात तसेच वाटले, आणि हाच परिच्छेद लेखात हाईलाईट होतोय. बाकी धागा स्त्री-पुरुष वादावर नेण्याचा हेतू नाही.

असो,
आयटम साँग म्हणजे एण्ड ऑफ द डे त्यातील संगीताच्या दर्जावर टिका करायची नसून त्यातील अश्लीलतेवरच आपल्याला टिका करायची आहे (असावे). मग त्यासाठी खास आयटम साँगनाच टारगेट करण्यात अर्थ नाही. चित्रपटांमधीलच अश्लीलतेचा बेंचमार्क हाय झाला आहे, मग आयटम साँग आपसूकच त्याला मॅच होणारच.

त्याच धर्तीवर आजच्या तारकांना दोष देताना मग हेलनला क्लीन चीट देणेही पटले नाही. त्या काळाच्या मानाने ते अतिच असावे.
तसेच ते हेलन व ईतर कोणाचे कॅब्रे हे कथानकाची गरज म्हणून यायचे हे ही नाही पटले. यापेक्षा कथानकात तशी गरज निर्माण केली जायची असे म्हणने योग्य राहील.

चित्रपटांमधीलच अश्लीलतेचा बेंचमार्क हाय झाला आहे<<< सहमत आहे. पण एखादा बेड सीन गणेशोत्सवात किंवा समारंभात कोणीही आयाराम गयाराम करू शकत नाही. आयटेम साँगवर सर्व कुटुंबच्या कुटुंब थिरकताना मात्र पाहायला मिळते.

हेलनला क्लीन चीट देणेही पटले नाही<<< हेलनला क्लीन चीट दिलेली नाही. मागे एक (बहुधा मंदार जोशींचा) हेलनवरील धागा होता त्यावरील माझी मते वेळ मिळेल तेव्हा वाचावीत. हेलनच्या काळात आयटेम साँगशिवाय इतरही अनेक गोष्टी चित्रपटात असत ज्यांच्या तुलनेत आयटेम साँगला क्षुल्लकही महत्व नसे, असे म्हणायचे आहे व असे म्हंटलेले आहे.

बेफि, अगदी छान विषय निवडलात.

समाज फार वेगाने एका भयाण मोठ्या उतरंडीवरून धावत खाली खाली चालला आहे. Sad
ज्यांची जायची इच्छा नाही त्यांची पण दुर्दैवी फरफट होते आहे. Sad

दोष पुर्णपणे असले मनोरंजक (?) प्रकार बनविणारांचा आहे.
दृकश्राव्य माध्यमे ही समाजावर बरा वाईट परिणाम करण्याची फार मोठी प्रभावी साधने आहेत,
पण मुळात लोकांना हे मान्यच करायचे नाहीये त्याएवढी शोकांतिका दुसरी नाही.
लोक वाईट तेवढे चटकन घेतात कारण ते त्यांना चटकदार वाटते, आणि म्हणुनच ते खपविणारी दुकाने पण वेगाने वाढत जातात.

चांगल्याला शाळा आवश्यक असते, वाईटाला नाही, इति माझी स्व. आजी.

हेलनला अगदी शब्दशा क्लीनचिट नाही दिली पण तुलना करताना त्याचे समर्थन आहेच. आणि ते देखील चुकीच्या निकषावर.
म्हणजे चित्रपटात बघण्यासारख्या ईतरही गोष्टी आहेत म्हणून आयटम साँगचे महत्व कमी होते आणि मग त्यात थोडेफार उघडेनागडे दाखवलेले चालून जावे. हा तर्कच जरा अजीब वाटतो.

बाकी आयटम साँगवर कुटुंब थिरकताना दिसते ते त्याच्या उडत्या चालीच्या कॅची म्युजिकमुळे.
आणि माझ्यामते अश्या गाण्यात नटीच्या चेहर्‍यावर उत्तान हावभाव (संदर्भ - भीगे होठ तेरे) नसून ती डान्स एंजॉय करत असते.

भीगे होठ तेरे हे आयटेम साँग नाही.

हेलनचे समर्थन केलेले नाही. ते उत्तान डान्सेस हे चित्रपटातील केवळ एक किरकोळ आकर्षण असायचे असे लिहिलेले आहे.

फक्त म्युझिकमुळे लोक थिरकत असते तर फक्त ट्यून्स जन्माला आल्या असत्या.

भीगे होठ तेरे हे आयटेम साँग नाही. >>> एक्झॅक्टली, मी देखील हेच म्हणतोय, आयटम साँग्जमध्ये या अश्लील गाण्यांसारखे उत्तान हावभाव नसतात तर डान्सस्टेपवर जास्त कॉन्सट्रेशन असते. तुलनेसाठी उदाहरण दिलेय ते.

@ हेलनचा मुद्दा >> जर आताच्या एखाद्या चित्रपटाला सशक्त कथा आणि ईतर गोष्टी असतील तर त्यातील आयटम साँग्जवर आपल्याला आक्षेप नाहीये असा मग याचा अर्थ घ्यायचा का?

फक्त म्युझिकमुळे लोक थिरकत असते तर फक्त ट्यून्स जन्माला आल्या असत्या. >> फक्त ट्यून नाही तर शब्दही जोडा, ते ही बरेचदा ईम्पॅक्ट करतात.. नाचणार्‍या लोकांना ते गाणे पाय थिरकवणारे आहे की नाही हे मॅटर करते, त्याचे चित्रीकरण कसे झाले आहे नाही.. चित्रीकरण फक्त चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी कामाला येते. Happy

माझ्या मते हेलनच्या गाण्यांमध्ये आणि हल्लीच्या आयटम साँग्जमध्ये एक मुख्य फरक आहे -- काही अपवाद वगळता हेलनच्या गाण्यांमधील शब्द अश्लिल नव्हते. हल्लीच्या आयटम साँग्जमध्ये इतकी घाणेरडी भाषा वापरलेली असते की ते शब्द लिहायची सुद्धा लाज वाटते.

आजकाल व्यक्तिस्वातंत्र्य आणि स्त्रीसक्षमीकरणाच्या नावाखाली काय वाट्टेल ते खपवून घेतले जात आहे असे वाटते. स्त्रीसक्षमीकरणाचे उदहरण बघायचे झाले तर मंगळयान प्रोजेक्ट वर काम करणार्या स्त्री-शास्त्रज्ञांचे फोटो पहावे. त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायची की आयटम गर्ल्स कडून??? ह्यामधील कोणती स्त्री अधिक सक्षम आहे हे सांगायलाच नको!!! आयटम साँग्जमुळे स्त्री सक्षम होत नाही तर ती एक भोगवस्तू आहे हे अधोरेखित केले जात आहे. हे समाजाला आणि संस्कृतीला अतिशय घातक आहे.

फक्त ट्यून नाही तर शब्दही जोडा, ते ही बरेचदा ईम्पॅक्ट करतात.<<< ते मीही म्हणत आहे. हलकट जवानी, तंदुरी मूर्गी हूं यार ह्या शब्दरचना अश्लील आहेत.

जर आताच्या एखाद्या चित्रपटाला सशक्त कथा आणि ईतर गोष्टी असतील तर त्यातील आयटम साँग्जवर आपल्याला आक्षेप नाहीये असा मग याचा अर्थ घ्यायचा का?<<< हा कीस पाडणे झाले. चित्रपटात काहीच धड नसणे पण एक गाजणारे आयटेम साँग असणे हे केविलवाणे आहे असे म्हणणे आहे. इतर गोष्टी चांगल्या असल्या तर आयटेम साँग चालेल का हा प्रश्न कोर्टात उभ्या केलेल्या आरोपीला विचारलेल्या प्रश्नासारखा आहे. त्यामुळे तो मूळ मुद्याला बगल देत आहे. आयटेम साँगमधून चित्रीत होणारे स्त्रीचे रूप हा मूळ मुद्दा आहे.

मूळ मुद्द्याला बगल नाही तर मी आपल्या लेखातीलच एक मुद्दा उचलला आहे, आता तो मूळ होता की नव्हता हे आपणच ठरवा.. असो

हलकट जवानी आणि तंदूरी मुर्गी हू यार या शब्दरचनेसाठी आपण गीतकारांना लेखात कुठेही जबाबदार धरले नाही हे निरीक्षणही नमूद करू इच्छितो.

आयटम साँग व्यतिरीक्त सुद्धा चित्रपटात शिव्यांचा आणि द्व्यर्थी विनोदांचा भडीमार असतो त्यांनाही या मुद्द्या अंतर्गत या धाग्यात घेता येईल का?

सुमुक्ता यांच्या स्त्रीसक्षमीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य करायचे झाल्यास आयटम साँगच्या माध्यमातून ते होतेय हा दावा कोणत्या नटीने केला आहे का? तो एक व्यवसाय आहे तसेच घ्या त्याला.. मागणी थांबली की पुरवठा आपसूक थांबेल..

प्रेक्षकांची अभिरुची बदलणे, सुधारणे अश्याही काही गोष्टी कलाकारांकडून (कलाकार म्हणजे कलानिर्मीतीशी संबंधीत सर्वजण) कळत व नकळतपणे होत असतात, व्हाव्यात! त्यामुळे मागणी तसा पुरवठा हे येथे पूर्णपणे लागू होत नाही.

अंशता सहमत
कलाकारांचे कामच आहे वेगवेगळे प्रयोग करणे, त्यामुळे मार्केटमध्ये एखादी नवीन गोष्ट आणायचे श्रेय त्यांनाच जाणार. पुढे ते लोकांना किती आवडते यावरच ते मार्केटमध्ये किती टिकते हे ठरणार. ईथे हे व्यावसायिक कलाकार आहेत, ते व्यवसायच बघणार. जर दोष द्यायचा असेल तर तो सेन्सॉर बोर्डाच्या कायद्यांना देणे उत्तम. ते कायद्याच्या चौकटीत राहून करताहेत तर गैर ते काय?

हेलनला क्लिन्चिट दिली तरी चालेल एक वेळ. कारण तिने आयटम साँग्ज एका डिग्निटी ने केली. ती करताना कोणतेही अश्लिल अंगविक्षेप केले नाहीत. क्लिव्हेज्/मांड्या दाखवल्या नाहीत. (स्किन कलरचे स्टॉकिंग्स वापरायची ती ते पण अंगभर) आणि गरजेपुरते दिसले असेल तिथे ही ते अश्लिल वाटत नाही.

सध्या तर अंगप्रदर्शन झाले नाही तर त्याला हिट लिस्ट मधुन वगळण्यात येईल की काय अशी भिती वाटत असेल ते करणार्‍यांना. शिवाय आपली चलती टिकावी म्हणून चढाओढीत मी जास्त प्रदर्शन करते की तू यातच अनेक अनेक अश्लिल गाणी येत आहेत. गुलजार नी लिहिलेली २ आयटम साँग्स आहेत बीडी जलैले आणि जबाँ पे लागा.... शब्द सुंदर आहेत पण चित्रिकरणात मार खाल्ला. उत्तम शब्द आणि उत्तम नृत्य असलं तर गाणं हिट होत नाही असा समज झाला आहे. शिवाय आजकालच्या सिनेमात तर आयटम साँग कितीही अस्थानी आणि निरूपयोगी असले तरी घुसडले जातेच. हेलनचे एकही आयटम साँग उगिच घातलेय असं कधीच वाटलं नाही. तिसरी मंझिल पहा.

हेलनचे एकही आयटम साँग उगिच घातलेय असं कधीच वाटलं नाही. तिसरी मंझिल पहा.
>>>>
कधीच वाटले नाही तर तिसरी मंझिलच का पहा Happy

असो, एखादे रेस्टॉरंट वा स्मगलरचा अड्डा, आणि तिथे चालणारा कॅब्रे वा तोकड्या कपड्यातील नृत्य हे दर दुसर्‍या अ‍ॅक्शनपटात.. आणि आपण म्हणतो उगाच नाही.

..

अश्लीलता मुळातच वाढलीय. कबूल. पण आयटम साँगमुळे नाही. तर वाढलेली अश्लीलता आयटम साँगमध्येही रिफ्लेक्ट होतेय इतकेच.

याउपर आयटम साँगच्या माध्यमातून लोकांना नाचायला गाणी मिळतात या एकाच कारणासाठी ती त्यांना आवडतात, न की त्यातील अंगप्रदर्शनासाठी.. ते तर चित्रपटभर असतेच.

आणि व्यावसायिक गणित मांडता एखादे आयटम साँग गाजले की वर्षभर त्या पुण्याईवर स्टेजशो च्या सुपार्‍या मिळतात. यावरून हे देखील लक्षात येते की आयटम साँगसाठी अंदप्रदर्शापेक्षाही अभिनेत्रीच्या अंगी नृत्यकला असणे जास्त गरजेचे.

आयटम साँगसाठी अंदप्रदर्शापेक्षाही अभिनेत्रीच्या अंगी नृत्यकला असणे जास्त गरजेचे >>>>

@ऋन्मेऽऽष: तुम्ही खरच भोळे भाबडे आहात की सोंग करताय.

२५ वर्षापूर्वीचा एक दुर्दैवी प्रसंग आठवला.

पुण्यातल्या सदाशिव पेठेमधल्या एका मंदीरात उत्सवा निमीत्त एका प्रसिद्ध मराठी कत्थक नृत्यांगनेच्या मुलीचे नृत्य आणि नंतर आप्पा जळगावकरांची पेटी असा कार्यक्रम होता.
ते मंदीर आणि रस्ता सुद्धा रात्री नऊ-दहा वाजता कत्थक बघायला तुडुंब भरला होता. लोक मंदीराच्या खिडक्यांमधुन पण बघत होते.
आम्हाला आप्पांची पेटी ऐकायची होती पण प्रचंड गर्दी मुळे मी आणी मित्र बाहेरच थांबलो होतो. इथे थांबुन काही उपयोग नाही अश्या विचारानी घरी जायला निघणार होतो, पण तेव्हड्यात साडे दहाला कत्थक संपले आणि सर्व मंदीर रीकामे झाले. हे निघुन जाणारे बघे असे होते की त्यांना कत्थक्च्या कार्यक्रमाला बघुन आश्चर्य वाटावे. जाताना दोन तिन कॉमेंट ऐकल्या की "बाई" सॉलिड होती. त्यावरुन ही लोक इथे कशी ह्याचे उत्तर मिळाले.

नंतर आप्पाच्या प्रोग्रॅमला २०-२५ लोक होते. तेंव्हा त्यांनी वाजवलेला मधुवंती अजुन विसरलो नाही.

मला दिपीका आणि शाहरुख चे "लुंन्गी डान्स " हे गाणे अतिशय आवडते. हे सुद्धा आयटम सॉन्ग्च आहे.(असावे) तर हेही आ़क्षेपार्ह व अश्लिल कॅटेगरी मधे येते का? यावर तुमचे मत सांगावे. आणि हा प्रतीसादही आक्षेपार्ह असेल तर याला उडवण्यात येईल. Happy

हेलनला क्लिन्चिट दिली तरी चालेल एक वेळ. कारण तिने आयटम साँग्ज एका डिग्निटी ने केली. ती करताना कोणतेही अश्लिल अंगविक्षेप केले नाहीत. क्लिव्हेज्/मांड्या दाखवल्या नाहीत.>>>>>

@दक्षीणा - तुमची माहीती चुक आहे. हेलन नी प्रचंड अंगप्रदर्शन केले. शक्य आहे ते सर्व दाखवले हेलन नी.

डीग्नीटीने केले म्हणजे काय ते पूर्ण डोक्यावरुन गेले.

आणि तुम्ही काळ पण लक्षात घ्यायला हवा. आत्ताचे कपड्यांचे मापदंड ४० वर्षापूर्वीच्या हेलनला लावुन कसे चालेल?

हेलननी काय माधुरीने पण तिच्या काळाच्या पुढचे अंगप्रदर्शन करुनच प्रसिद्धी मिळवली.

टोचा : तुम्हाला पेटी ऐकायची होती याचा अर्थ सगळ्यांनीच ऐकावी असे काही म्हणने आहे का ?
बर्याच जणांना कथ्थक बघायचे असेल. त्यात वेगळे काय आहे ? राहिले दोन तीन कॉमेंट्स अश्या प्रकारची लोक सगळीकडे असतात म्हणुन काय तुम्ही कथ्थकची तुलना आयटम साँग बरोबर करत आहेत ? काय बोलत आहात कळते तरी का ? हेमामालिनीच्या स्टेज शोंना देखील बर्यापैकी गर्दी असते त्यातले बरेच जण हेमामालिनी आवडते म्हणुन बघायला जातात. मग काय अश्या लोकांची नजर देखील वाईटच आहे असे म्हणायचे का ?

कैच्याकै चालु असते टोचा तुमचे

@ दिवाकर - तुम्ही मी काय लिहीले आहे ते नीट वाचले का? जे लोक आले होते त्यांना काय कॉमेट मारल्या त्यापण लिहील्या होत्या.
आणि मला कत्थक बघायला येणारे कोण आंणि बाई बघायला आलेले कोण हे नक्की समजते.

पुढे मला तुमच्याशी संभाषण वाढवायचे नाही. माझ्या पोस्ट ना तुम्ही इग्नोर मारा. तुमच्या सारख्या महान माणसानी माझ्या पोष्ट वाचाव्यात अशी माझी लायकी नाही. आणि जर चुकुन वाचल्यात तर कृपाकरुन कॉमेंट देवु नका.

टोचा, बीभत्स नृत्य आणी मादक हावभाव असलेले नृत्य यात काहीच फरक नाही का? हेलन बीभत्स वाटत नाही, पण मलाईका वाटते. हेलनचे सगळे डान्स बघा. तिला ते स्किन कलरचे स्टॉकिंग्स पण घातले नसते तरी चालले असते कारण तिच्या चेहेर्‍यावर हावभाव अतीशय सुचक असायचे. कमालीची अभिनेत्री होती ती.

तुम्ही काय बोलतात तुम्हालाच कळत नाही आहे
वरती मी हेमामालिनीचे उदा. दिले. आता काही जण तिला बघुन तिच्या कार्यक्रमाला जात असतील तर त्यात वाईट काय?

आणि राहिले काँमेंट्स चे अशी लोक सगळी कडे आहे. शास्त्रीय गायनात पण गायिकांवर कमेंट्स करणारे ऐकले आहे म्हणुन काय सगळा कार्यक्रम विशिष्ट नजरेतुन बघणार आहात का ?

टोचा उत्तर देता येत नसेल तर देउ नका तुम्ही किती महान आहात हे तुमच्या सगळ्याच प्रतिक्रियेतुन दिसुन येत आहे. कैच्याकै बोलत बसायचे. आणि राहिले प्रतिक्रिया द्यायच्या त्या मला हव्या तर मी देणार तुम्हाला सांगायची गरज नाही .

टोचा, बीभत्स नृत्य आणी मादक हावभाव असलेले नृत्य यात काहीच फरक नाही का>>> ४० वर्षापूर्वी जे बिभत्स होते ते आता मादक वाटतय.

मला तर कतरीना, करीना, अनुष्का, दीपिका कोणीच बिभत्स वाटत नाहीत अगदी आयटम साँग मधे सुद्धा.

Pages