माझी आई (मंदारमाला वृत्त)

Submitted by संतोष वाटपाडे on 26 November, 2014 - 23:37

देवाघरी बाप गेला दम्याने तरी माय शेतामधे राबली
कंठातुनी हाक बाहेर आली तिने मात्र ओठावरी दाबली
मातीत रेघा उभ्या मारताना तिची बांगडी ना कधी वाजली
पान्हा उन्हाने कमी होत गेला मला पेज पाण्यासवे पाजली...

कष्टांमुळे चामडी जीर्ण झाली शिरी केस झाले जरा पांढरे
बैलापरी ओढले नांगराला भरे कैक वेळा उरी कापरे
नेसायला वेदना घ्यायची ती घरी पातळे चांगली साचली
फ़ाटून गेल्या जुन्या सर्व चोळ्या नवी मात्र नाही कधी टाचली...

पायात काटे खडे टोचलेले मुके होउनी सोबती राहिले
झोळीमधे झोपलो मी सुखाने मी तिला राबताना स्वतः पाहिले
दुष्काळ आला तरी रोज पाणी सभोवार डोळ्यातले शेंदले
शेतातली ढेकळे फोडताना तिने फोड टाचेवरी गोंदले...

तापायच्या सावल्याही उन्हाने कपाळावरी घाम गोठायचा
वारा तिच्या नांगराला त्वरेने स्वतः हात लावून लोटायला
शाळेत टाकायचे लेकराला असे रोज वाडीत सांगायची
भिंतीवरी लावल्या देवतांना फ़ुलांची नवी माळ टांगायची....

डोक्यावरी हात ठेवून आई मला रोज खांद्यावरी घ्यायची
तिची सर्व दुःखे मला पाहताना पुन्हा खोल श्वासांमध्ये जायची
अंधारल्या झोपडीतून आई नभातील बाबास शोधायची
डोळ्यात ओल्या सुखाच्या क्षणांचे खुळे स्वप्न घेऊन झोपायची....

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईचे एक अस्सल शब्दचित्र म्हणुन यथार्थ आहे पण तुमच्याच बाबा ,
या कविते इतकी अस्वस्थ करत नाही.अशी तुलना केल्याबद्दल क्षमस्व ...

सुंदर कविता! आवडली!

शब्दचित्र छान रेखाटले आहे!

वृत्त सांभाळले आहे!

अभिनंदन!! Happy