कायदेशीर, बेकायदेशीर आणि नैतिकता!

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 November, 2014 - 13:48

"
कायदे हे नेहमीच नैतिकतेला अनुसरून बनतात, असे माझे मत आहे, नव्हे असा माझा विश्वास आहे!..
"

आता धागा सुरू करूया,

१) त्या दिवशी सचिन फॅन क्लब या धाग्यावर सचिनच्या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी फिरतेय अशी बातमी पाहून मी म्हणालो, "पायरसी हे नक्कीच बेकायदेशीर कृत्य आहे, पण तरीही सचिनच्या काही गरीब चाहत्यांकडे (ज्यात तुटपुंजे पॉकेटमनी असलेले कॉलेजस्टुडंट सुद्धा आले), ज्यांना हे पुस्तक विकत घेणे परवडणार नाही, अश्यांपर्यंत हे पुस्तक पोहोचले तर मला मनापासून आनंदच होईल." ..अर्थात, अगदी मनापासून केलेले हे विधान होते.

मी स्वत: त्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो ज्या पिढीला क्रिकेटची जाण येणे आणि सचिन नावाचा तारा भारतीय क्रिकेट क्षितिजावर उगवणे हे एकाच वेळी घडले. तेव्हापासून द्रविड-सेहवाग-दादा यांचा उदय होण्याआधी, झाल्यानंतरही, किंबहुना अगदी हल्लीचे कोहली-धोनी-शर्मा यांच्या झंजावातातही, भारतीय क्रिकेटमधील आमचा ईंटरेस्ट सचिन या नावापासूनच सुरू व्हायचा आणि त्याच्या बाद होण्याला संपायचा. अगदी त्याच्या शेवटच्या सामन्यापर्यंत, "सचिनने किती केले?" हा प्रश्न स्कोअर विचारण्याचाच एक भाग होता. असा हा खेळाडू आपल्या स्वत:च्या कर्तुत्वावर मोठा झाला हे न नाकारताही त्याच्या यशातील त्याच्या निस्सीम चाहत्यांचा वाटा देखील कबूल केलाच पाहिजे. आणि अश्यांसाठीच ते केलेले विधान होते. भले मग पुस्तक छापणे आणि विकणे हा व्यवसाय मानला तरी पैसाच कमवायचा म्हटले तर सचिनने स्वाक्षरी केलेल्या बॅट दहापट किंमतीत विकायला काढल्या तरी तो तेवढे पैसे सहज कमावू शकतो. म्हणूनच ज्यांनी सचिनला बघण्यात वीस वर्षे खर्ची घातली त्या प्रत्येकाला सचिन वाचायलाही मिळाला पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

असो, तर त्या दिवशी ‘सचिन फॅन क्लब’ या धाग्यावर, माझ्या या विधानावर तिथे थोडासा गदारोळ उडाला. मी शब्दाला शब्द टाकत बसलो असतो तर वाढलाही असता. पण मी सुद्धा सचिन फॅन क्लबचा सदस्य असल्याने तिथे त्या धाग्याला वेगळे वळण लावायचे टाळलेच. आणि इथे आज हा धागा उघडला.

कोणाला यावर इथे चर्चा करायची असल्यास वेलकम पण,
हा धागाही इथेच संपत नाही..

२) त्यानंतर एका धाग्यावर लेटेस्ट भोंदू बाबा रामपालवर चर्चा चालू होती. चर्चेच्या दरम्यान त्या बाबाची काही लैंगिक शोषणाची स्कॅंडल्स सामोरी आली. त्या संतापजनक बातम्या पाहता कोणीतरी त्या बाबाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, लोकांच्या हवाली करत दगडाने ठेचून मारले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. अर्थातच हि इच्छा देखील मनापासून आणि प्रामाणिकच होती. काही जणांनी त्याला अनुमोदन देखील दिले. (मनोमन मी सुद्धा दिले).

पण ईथेही पुन्हा, हि इच्छा कायद्याच्या चौकटीत बसवू पाहता कोणत्याही गुन्हेगाराला शिक्षा करायला कायदा आपल्या हातात घेणे हा देखील एक गुन्हाच झाला. मग त्या आरोपीचा गुन्हा कितीही भयंकर का असेना आणि त्याच्या गुन्ह्याची शिकार खुद्द आपण का असेना, तरीही त्याला आपण स्वत: शिक्षा करणे हे बेकायदेशीर कृत्यातच मोडते. मग जसे वरच्या क्रमांक १ मधील भावनेचे समर्थन होऊ शकत नसेल तर या भावनेचेही नाही झाले पाहिजे.

पहिल्या उदाहरणात कायद्याचे उल्लंघन करायचा विचार एखाद्या गरजूला मदत व्हावी भावनेतून आलेला आहे तर दुसर्‍यामध्ये कोणालातरी धडा शिकवण्याच्या भावनेतून आला आहे.

३) आता तिसरे आणि जरा वेगळे उदाहरण बघूया. ज्यात कायद्याच्या चौकटीत एखादी गोष्ट बसत असूनही कित्येकांना ती मंजूर नसते. यासाठी विषय गेले दोनेक महिने फॉर्मात असलेल्या राजकारणाचा घेऊया.

यंदाच्या विधानसभा निवडणूकीत भाजपाला बहुमत मिळाले नाही हे आपण सारे जाणतोच. अश्यावेळी ते कायद्यानुसार किंवा संविधानानुसार ईतर पक्षांची मदत घेऊन सरकार बनवू शकतात. पण तेच त्यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा (तो देखील न मागता) घेतल्यावर अचानक एकच गदारोळ उठला. जणू काही त्यांना बरोबर न घेणे हे त्यांच्यासाठी बंधनकारकच होते. खुद्द भाजपाला मत दिलेल्या लोकांनी हा आमचा विश्वासघात आहे, आम्ही फसवलो गेलो असा ओरडा सुरू केला. परिणामी भाजपाला ठामपणे राष्ट्रवादीचा पाठिंबा स्विकारताही येत नव्हता. पण जर संविधानानुसार ते गैर नसेल तर तुम्ही आम्ही मतदार याबाबत कोणत्या अधिकाराने त्यांनी तसे करू नये हा हट्ट धरू शकतो??

म्हणजे इथे आपण फिरून पुन्हा नैतिकतेकडे आलो तर!..

यातून मॉरल ऑफ द स्टोरी काय काढायची हे आपल्यावरच सोडतो.
आपलाच,

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पत्नी ही पतीच्या मालकीची वस्तू आहे या बेसिसवर.>> Lol आणि पती हा पत्नीची मालकी वस्तू आहे .जर तेवढीही किंमत पत्नीने दिली तर. Proud

पत्नी ही पतीच्या मालकीची वस्तू आहे या बेसिसवर.>>> एक्झॅक्टली.. ऐकायला हार्श वाटले तरी याचा अर्थ तोच निघतो. अर्थात हा कायदा खरा असेल तर.

@ सिनी, - पत्नीला पती घाबरून राहतो आणि घरात तिचीच चालते हे विनोदातच शोभते. सत्य परीस्थितीत वेगळे चित्र दर्शवते. पण कायद्यात हा भेद नसावा अशी अपेक्षा.

सिनि,
कागदावरला मध्ययुगीन कायदा तोच आहे.

मी कुणा क्ष स्त्रीच्या प्रेमात पडलो. हे फीलिंग म्युच्वल असले, व आम्ही जे काय करायचे ते केले, व याविरुद्ध तिच्या पतीने पोलीसात तक्रार केली, तर, प्रचलित भारतीय कायद्यानुसार, मी खडी फोडायला जाणार हे नक्की.

पण,

जर मी हे सिद्ध केले, की तिच्या पतीला आमचे प्रकरण 'मान्य' होते, तर त्या भ.... ला आय मीन भ..ल्या गृहस्थाला तर काहीच होणार नाही, मलाही शिक्षा होणार नाही.

समझे कुछ?

ओके समझ गयी.
थोडी कल्पना होतीच.वरचा जोकच आहे म्हणुनच पुढची फिदी .या विषयावरचे अनेक चित्रपट पाहिले आहेत.

मला फक्त "विवाहित स्त्रीशी तिच्या पतीच्या संमतीशिवाय शरीरसंबंध ठेवणे बेकायदा आहे>> तर तो दंडनीय अपराध आहे का.? याचा गोंधळ होता. जर का त्या पत्नीने सिद्ध केले की ,त्याच्या पत्नीला हे प्रकरन 'मान्य' होते...तर त्या भल्या स्त्रीला व त्या पत्नीला शिक्षा होते का? हे पण तुम्ही दिलेले उदा सारखेच उत्तर असेल का ? शिक्षा होणार नाही.

(विबासं ठेवणार्‍या) पत्नीला कायद्याने शिक्षा नाही. तिला शिक्षा करायला तिचा नवरा समर्थ आहे आणि त्यासाठी कायद्यात वेगळ्या तरतुदीची गरज नाही अशी कायद्याची समजूत असावी आणि ती चूक नाही.

भाऊ Proud

पण लग्नासंबंधित कायदे खरेच पुरुषप्रधानसंस्कृतीला अनुसरूनच बनवलेत आणि अजूनही तसेच मध्ययुगीनच आहेत.

लग्नासंबंधित कायदे खरेच पुरुषप्रधानसंस्कृतीला अनुसरूनच बनवलेत आणि अजूनही तसेच मध्ययुगीनच आहेत.>> या बाबतीत तरी तुमचा कायद्याचा विरोध (बदल) आवश्यक वाटतोय.तुमच्यासारखी लोकच अशी संस्कृती बदलु शकतात पुढे जाउन.

लोकांना माहीत असतं काय अयोग्य काय योग्य,वरच्या या कायद्याचा काय नक्की अर्थ आहे तो भरत मयेकर यांनी नीट सांगितलाच आहे .चुकीच्या गोष्टींना समर्थन देणे म्हणजे कायदा मोडणे असा अर्थ होउ शकतो का! माझ्यामते रुल्स पाळले की अर्धी कामं सोपी होतात मग ती कोणतीही असोत.

आणि कायदा नेहमीच गाढव नसतो. Happy

ऋन्मेऽऽष | 27 November, 2014 - 00:09

<< कुठल्याही परिस्थितीत समर्थनीय नाही असा जगात कुठलाही गुन्हा नाही ! >>

असामी | 27 November, 2014 - 00:56

<< पण कुठल्याही परिस्थितीत समर्थनीय नाही असा जगात कुठलाही गुन्हा नाही !>> Really ? चाइल्ड अब्युज, बलात्कार ? >>

  1. जोशीला चित्रपटात देव आनंद तुरूंगातला एक कैदी असतो. हेमा मालिनी तुरुंगातील कैद्यांना भेटण्याकरिता येते तेव्हा तिची पर्स विसरते. देव आनंद ती पर्स तिला परत देतो, तेव्हा ती घाईघाईने खेचून घेते. देव आनंद हसून म्हणतो, "घबराईए नही मै चोर नही एक खुनी हूं।" यात असे दाखविले आहे की महिलेची अब्रू वाचविण्याकरिता देव आनंदने बलात्कारी व्यक्तिचा खून केलेला असतो व त्याच्या मते तो खुनाचा गुन्हा समर्थनीय असतो.
  2. कुर्बानी चित्रपटात अरुणा ईराणी तिची मालमत्ता हडप करणार्‍या खलनायकाच्या घरी चोरी करण्याची योजना बनविते. तिच्या मते हा चोरीचा गुन्हा समर्थनीय असतो.
  3. भ्रम या चित्रपटात मिलिंद सोमणने केलेला बलात्कार समर्थनीय दाखविला आहे. कसा ते इथे लिहीत नाही, ज्यांना उत्सुकता असेल ते हा चित्रपट पाहून कारणमीमांसा जाणून घेऊ शकतात.

http://en.wikipedia.org/wiki/Bhram

https://www.youtube.com/watch?v=lkWzcFiMwKg

सहमत आहेच

कायद्याच्या द्रुष्टीने खून हा फार मोठा गुन्हा आहे ज्याची शिक्षा जन्मठेपेपर्यंत आहे. तो जर एखाद्या परिस्थितीत समर्थनीय दाखवला तर चोरी-दरोडेखोरी सारखे गुन्हे समर्थनीय दाखवणे फारसे जड जाऊ नये. बलात्कार म्हटले की मात्र तो नाजूक विषय झाला. कायद्याच्या नजरेत त्याची शिक्षा खरे तर खूनाच्या गुन्ह्यापेक्षा कमी आहे. पण तरीही बलात्कार म्हटले की आपल्याला तो प्रचंड तिरस्करणीय अपराध वाटतो, पण हाच समाज दुसरीकडे स्त्रीदेहाला उपभोगाची आणि खरेदीविक्रीची वस्तू समजतो, अगदी आजही.. कायद्याने नाही पण विचारांनी नक्कीच..

कायद्याच्या चर्चेसाठी चित्रपटांमधली उदाहरणे का दिली जात आहेत? मुळात चित्रपट हे काल्पनिक माध्यम आहे ना? त्य्तात काय घडतं आणि काय नाहीयावरून भारतीय संविधान कायद्याची चर्चा??????

>>>कायद्याच्या चर्चेसाठी चित्रपटांमधली उदाहरणे का दिली जात आहेत? मुळात चित्रपट हे काल्पनिक माध्यम आहे ना? त्य्तात काय घडतं आणि काय नाहीयावरून भारतीय संविधान कायद्याची चर्चा??????<<<

+१

@ ऋन्मेऽऽष,

आजच्या काळातील निकष आणि आजच्या काळातली परिस्थिती बाजूला ठेवून जरा महाभारत काळाचा विचार करुयात.

  • स्वयंवरात जो "पण" जिंकू शकेल त्याला राजकन्या वरणार असा एक नियम होता. अर्थात "पण" जिंकू शकला असता की नाही ते माहीत नाही परंतु कर्णाला सूतपुत्र म्हणून संधीच नाकारण्यात आली द्रौपदीकडून. जर कधी कर्णाने द्रौपदीवर बलात्कार केला असता तर तो समर्थनीय ठरला असता काय?
  • भीष्मांनी स्वयंवरातून राजकन्या अंबा, अंबिका आणि अंबालिका यांचे हरण केले आणि त्यातील अंबिका व अंबालिका यांचा विवाह स्वतःच्या चुलतभावांसोबत लावून दिला. अंबा तयार नव्हती तिला भीष्मांसोबतच विवाह करायचा होता. तिने भीष्मांना कधीच माफ केले नाही. कदाचित अंबिका व अंबालिका यांनी भीष्माला माफ केले असावे तरीही भीष्मांनी त्या तिघींसोबत जे केले ते समर्थनीय ठरते काय? पुढे अंबेने बदला घेण्याकरिता शिखंडीरुपाने युद्धात भाग घेतला. याच शिखंडी च्या आडून अर्जुनाने भीष्मांना बाण मारला ज्यात ते घायाळ झाले आणि पुढे त्यांनी शरपंजरी इच्छा मरण पत्करले. अर्जूनाचे कृत्य समर्थनीय ठरते काय?
  • युधिष्ठिराने द्युतात आधी पांडवांना आणि नंतर पांडवपत्नी द्रौपदीला पणात लावले आणि गमावले. जिंकलेल्या कौरवांपैकी दु:शासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण केले, तेही भरदरबारात सर्वांसमक्ष. त्याचे ते कृत्य समर्थनीय ठरते काय?

आजच्या काळातला एक प्रश्न -

माझे रुपी बँकेत पंचवीस हजार रुपये आहेत. रुपीच्या संचालकांनी काही घोळ घालून ठेवल्याने रुपीवर रिझर्व बँकेने बंधने टाकली आहेत त्यामुळे मी रुपी बँकेतून माझे पंचवीस हजार रुपये काढू शकत नाही. एखाद्या व्यक्तिला रुपी बँकेवर घातलेल्या निर्बंधाविषयी काहीच ठाऊक नाही. त्या व्यक्तिकडून मी पंचवीस हजार रुपये घेतले आणि बदल्यात त्याला माझ्या रुपी बँकेतील खात्याचा पंचवीस हजार रुपयांचा धनादेश दिला. अर्थातच त्या व्यक्तिने हा धनादेश वटला नसल्याचे माझ्या निदर्शनास आणून दिले. मी मात्र माझ्या खात्यात इतकी रक्कम असल्याचा पुरावा त्याला सादर केला (ताजे एटीएम मिनी स्टेटमेंट). इतरत्र माझ्याकडे कुठेही एवढी रक्कम नसल्याने मी त्याला या धनादेशाखेरीज इतर मार्गांनी रक्कम परत देण्यास असमर्थता दर्शविली. माझे हे कृत्य समर्थनीय ठरते काय?

मी याबाबत वकिलांचा कायदेशीर सल्ला घेतला असता त्यांनी मला सांगितले की कायद्याने माझे हे कृत्य अपराधच ठरते. परंतु नैतिकदृष्ट्या हा माझा अपराध आहे काय?

काही प्रश्न कायमच अनुत्तरित राहणार.

पगारे आणि ऋन्मेष ह्यांच्या धाग्यावर सुमारे वीस प्रतिसादांनंतर मूळ धागा कशावर आहे हेच समजेनासे होऊ लागते.

Light 1

नंदिनी, माध्यम काल्पनिक असलं तरी विचारप्रक्रिया सुरू होणं अधिक महत्त्वाचं. त्यामुळे कायदा परिपूर्ण व्हायला मदत होते. वादे वादे जायते तत्त्वबोध:.
आ.न.,
-गा.पै.

बेफिकीर

आणि चेतन यांचा प्रतिसाद वाचल्यावर त्यांचा प्रतिसाद हाच मूळ लेख असून आपण ज्याला मूळ लेख समजत होतो तो प्रतिसाद आहे असे वाटू लागते.

चेतन, डोन्ट माइंड Light 1

@ नंदिनी

<< कायद्याच्या चर्चेसाठी चित्रपटांमधली उदाहरणे का दिली जात आहेत? मुळात चित्रपट हे काल्पनिक माध्यम आहे ना? त्य्तात काय घडतं आणि काय नाहीयावरून भारतीय संविधान कायद्याची चर्चा?????? >>

धाग्याचं शीर्षक आहे -

कायदेशीर, बेकायदेशीर आणि नैतिकता!

अर्थातच एखाद्या गुन्ह्याला कायद्याने ठरवून दिल्याप्रमाणे शिक्षा होते, परंतु नैतिकतेच्या दृष्टीने त्यात योग्य / अयोग्य काय, कसे? याची इथे चर्चा चालु आहे. चित्रपटात देखील कायद्याप्रमाणे शिक्षा हे दाखवतातच. फक्त नैतिकदृष्ट्या आपण गुन्हेगाराकडे कसे बघावे ह्याचा एक त्यांना वाटणारा दृष्टिकोन प्रेक्षकांना दाखवतात इतकेच.

असे नसेल तर मग कानून (बी आर चोप्रांचा), तौहीन, धरम और कानुन, ईन्साफ का तराजू, नो वन किल्ड जेसिका हे न्यायव्यवस्थेवर भाष्य करणारे चित्रपट इतके चर्चिले गेले नसते. संविधानातील कायद्यासोबत एखाद्या धर्माच्या कायद्यातील तरतूदींविषयीदेखील चित्रपटामूळे चर्चा घडून येते. सुंदर उदाहरण म्हणजे बी. आर. चोप्रांचा - निकाह हा चित्रपट.

मागे एका धाग्यावर मी हॅरी पॉटरला परीकथा म्हणालो तेव्हा गहजब उडाला होता. आणि आता समाजाचाच आरसा दाखवणार्‍या चित्रपटांमधील एखादे उदाहरण दिल्यास हे माध्यम काल्पनिक कसे झाले?
त्यातील उदाहरण समाजात घडतेय की नाही हे लक्षात घेऊन त्यानुसार भाष्य करणे योग्य ना.
चित्रपटात खून-बलात्कार-लूटमार-खंडणी हे प्रकार दाखवतात ते चित्रपटात आहेत म्हणून काल्पनिक का? त्यांनी चित्रपटातील दिलेले उदाहरण समाजात घडतच नसेल तर त्यानुसार त्यावर आक्षेप घ्या.

...

चेतनजी,
इथे महाभारत आणि पुराणकाळातील उदाहरणे देताना सावधान. अन्यथा महाभारत खरे की खोटे आणि तेव्हाचे नैतिकतेचे निकषच वेगळे होते यावरच चर्चा सुरू होईल Happy

बाकी आपल्या रुपी बॅंकेबाबतच्या उदाहरणात कायदा गंडलाय. Happy

कायद्याच्या चर्चेसाठी चित्रपटांमधली उदाहरणे का दिली जात आहेत? मुळात चित्रपट हे काल्पनिक माध्यम आहे ना? त्य्तात काय घडतं आणि काय नाहीयावरून भारतीय संविधान कायद्याची चर्चा?????? >> +१

चेतन, भ्रम चित्रपटाचे उदाहरण देणे बरोबर वाटत नाही. ह्यात मिलिंद सोमणने बलात्कारही केलेला नसतो आणि खूनही केलेला नसतो. अतिशय बेकार शेवट आहे चित्रपटाचा.

मागे एका धाग्यावर मी हॅरी पॉटरला परीकथा म्हणालो तेव्हा गहजब उडाला होता. आणि आता समाजाचाच आरसा दाखवणार्‍या चित्रपटांमधील एखादे उदाहरण दिल्यास हे माध्यम काल्पनिक कसे झाले?ष>> कारण हॅरी पॉटर परीकथा नाहीच आहे, आणि हॅरी पॉटरचे दाखले देऊन कुणी ब्रिटीश कायद्यांची चर्चा करत नाहीये.

चित्रपट समाजाचे आरसा असले तरी ते काल्पनिकच असतात. चित्रपटांमध्ये सुरूवातीलाच याचा सत्याशी काहीही संबंध नाही ही पाटी वाचलीच असेल ना?

सत्याशी काहीही संबंध नाही अशी पाटी हॅरी पॉटरमध्ये नव्हती का? भले त्याचा संदर्भ घेऊन ब्रिटीश कायद्याची चर्चा होत नसेल तरीही त्यातील जादूचे प्रकार पाश्चात्य देशांमध्ये सर्रास घडतात हे काल्पनिक नसून खरे समजायचे आहे का? असो, मी ते पुस्तक वाचले नसल्याने आणि चित्रपटाचाही एकच भाग पाहिले असल्याने लेखनसीमा!
पण मुळात चित्रपटाच्या सुरुवातीला "सत्याशी संबंध नाही" हे का लिहितात यामागचा कायदा उलगडायची गरज भासू नये. इथेही कोणी चित्रपटाचा संबंध घेऊन कायदा मांडत नाहीये किंवा काय कसा असावा हे ठरवत नाहीये. ते फक्त सर्वांना पटकन ध्यानात येईल असे एक सोयीचे उदाहरण म्हणून दिले आहे. जर ती अतार्किक गोष्ट असेल, वा प्रत्यक्ष आयुष्यात असे घडतच नाही असे असेल, तर तसे तिथेच मुद्दा खोडता येऊ शकतो.

या ध्याग्यावर नैतिकतेविषयी वाचताना एके ठिकाणी वाचलेल्या "ट्रोली प्रोब्लेम" ची आठवण झाली. त्याविषयीची चर्चा या धाग्याच्या कक्षेत बसत नाही पण यावर वाचन करण्याची इच्छा असलेल्यांसाठी या लिंक देत आहे. अवांतर किंवा अनिगडीत वाटल्यास आगाऊ क्षमस्व.

http://en.wikipedia.org/wiki/Trolley_problem
http://www.philosophersbeard.org/2010/10/morality-vs-ethics.html
http://www.philosophyexperiments.com/

एक शंका आहे. जाणकारांनी खुलासा करावा.
रस्त्यावर बरेच अपघात होतात. समजा, एखाद्या अपघातात एक स्त्री व एक पुरुष यांची टक्कर झाली.चूक बहुधा बाईची अस्सावी.दोघे सावरतात व लगेच भांडण जुंपते. प्रथम पुरुष तिला बोलतो. ती एकदम त्याच्या कानाखाली काढते.त्याच्या मते चूक त्याची नसून तिची आहे. तरीही त्याने ती थप्पड सहन केली.प्र्त्युत्तर म्हणून तो फक्त तिला शाब्दिक मार देतो व निघून जातो. आता असे प्रश्न मनात येतात :
१. स्त्रीने पुरुषास मारणे हे नैतिक नक्कीच नाही. पण कायद्याच्या दृष्टीने हा गुन्हा होतो का? की स्त्रीच्या या कृत्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते?
२. पुरुषाने प्रत्युत्तर म्हणून( व त्याची चूक नसतानाही ) जर तिला मारले तर तर तो लगेच गंभीर गुन्हा होतो का ?

कायद्याच्या दृष्टीने कोणीही कोणाला मारणे गुन्हाच ठरत असावा.
मात्र पब्लिकची सहानुभुती अश्या केसेस मध्ये बाईला मिळणे साहजिकच आहे.

बाकी एखादी बाई आपली चूक असूनही किंवा समोरच्याची चूक नाही हे तिला माहीत असूनही उगाच एखाद्या पुरुषाच्या थोबाडीत मारेल याची शक्यता (प्रोबॅबिलिटी) (भारतीय समाजाचा विचार करता) किती असावी?

असो, मी जाणकार नाही तर आपल्या शंकेवर एक मत व्यक्त केलेय.

Pages