विपायें जरी आठवला चित्ता | तरी दे आपुली योग्यता - श्री ज्ञानेश्वरी अभ्यास भाग - १२

Submitted by पुरंदरे शशांक on 19 November, 2014 - 23:02

विपायें जरी आठवला चित्ता | तरी दे आपुली योग्यता ...
(ज्ञानेश्वरी अभ्यास - भाग १२ )

विपायें जरी आठवला चित्ता | तरी दे आपुली योग्यता | हें असो तयातें प्रशंसितां | लाभु आथि ||अ. ६-१०४||
(जयाचे स्मरण | स्वभावेचि होता | आपुली योग्यता | देई जो का ||
बहु बोलु काय | तयाचे स्तवन | होय ते पावन | लाभदायी || अभंग ज्ञा.)

माऊलींची ज्ञानेश्वरी अतिशय थोर ग्रंथ का आहे तर त्यात या अशा बहारदार, अनुभूतिपूर्ण ओव्या आहेत म्हणून.

सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु | साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ||९|| सहाव्या अध्यायातील या श्लोकावरील विवरणातील ही एक ओवी - योगीराजाचे एक लक्षण सांगणारी.

विपायें जरी आठवला चित्ता | तरी दे आपुली योग्यता | हें असो तयातें प्रशंसितां | लाभु आथि ||
या ओवीचा साधा सरळ शब्दार्थ असा की - विपाये म्हणजे अगदी सहज/ अचानक/ अपघाताने जरी या महापुरुषाची आठवण आपल्या मनात झाली तरी मनाला प्रसन्नता लाभते, शांति लाभते कारण हा महापुरुष स्वतः परमशांत झालेला आहे - अखंड समाधानात आहे. अशा महात्म्याचे स्तवन जरी केले तरी ते आपल्याला परम लाभदायीच होते.

या ओवीच्या आधीच्या दोन ओव्याही खूप जबरदस्त आहेत -
जयाचें नांव तीर्थरावो | दर्शनें प्रशस्तीसि ठावो | जयाचेनि संगें ब्रह्मभावो | भ्रांतासही ||१०२||
(जयाचे दर्शन | समाधान ठाव | जयालागी नाव | तीर्थराज ||
जयाचे संगती | भ्रांतमतीतेही | अनायासे होई | ब्रह्मप्राप्ती || )

जयाचेनि बोलें धर्मु जिये | दिठी महासिद्धितें विये | देखैं स्वर्गसुखादि इयें | खेळु जयाचा ||१०३||
(जयाचिये बोले | धर्म जगे देख | स्वर्गसुखादिक | खेळ ज्याचा ||
आणि कृपादृष्टी | जयाची होताच | महासिद्धी साच |प्राप्त होती || )

हा महात्मा खरा तीर्थरुप. तीर्थराव हा माऊलींचा खास स्वत:चा शब्द. याच्या नुसत्या दर्शनानेही परम समाधान मिळते. याच्या संगतीत अगदी भ्रांत(मूढ, अज्ञानी) व्यक्तिलाही ब्रह्मभाव प्राप्त होतो. (१०२)

हा योगीराज जे बोलेल ते धर्मवचन. याच्या साध्या पहाण्यातूनही महासिद्धी निर्माण होतात. ज्या स्वर्गसुखालागी सामान्य लोक अगदी आटापिटा (यज्ञयाग, तपःसाधना, दान, तीर्थयात्रादी पुण्ण्यकर्मे) करीत असतात तो या महापुरुषाच्याबाबतीत किरकोळ गोष्ट आहे. (असे स्वर्गसुख कोणालाही प्रदान करणे हे या महापुरुषाच्या बाबतीत फारच साधी-सोपी गोष्ट )

अशा योग्याचे वा ज्ञानी पुरुषाचे वा भक्ताचे वा स्थितप्रज्ञाचे वर्णन करताना ज्या काही ओव्या माऊलींनी लिहिल्या आहेत हे खरे तर माऊलींचेच वर्णन. माऊली हे ज्ञानाचे महासागर, योग्यांचे योगी, संतसम्राट आणि या सगळ्यावर कडी म्हणजे सर्वसामान्यालाही माऊली म्हणून अतिशय आपुलकी असणारे असे.

भागवत धर्माचा पाया श्री ज्ञानदेवांनी रचला असे जे श्री तुकोबाराय म्हणून गेलेत ते अतिशय सार्थ असे वर्णन आहे.

या जन्मी मराठी ही मातृभाषा लाभली खरी, पण असे वाटते की जन्मोजन्मी ही भाषा माझ्या परिचयाची आहे. नेवासे क्षेत्रात या ज्ञानेश्वरीची रचना झाली असे म्हणतात. त्यावेळेस तिथेच आसपास कुठेतरी भटकत असताना भाग्यवशात या अमृतमय ओव्या कानावर पडल्या असतील. मग त्याची थोडीफार गोडी लागल्याने बहुतेक किंवा माऊलींची कृपा म्हणा - वारंवार या महाराष्ट्रदेशी जन्म झाले असतील आणि पुढेही होतील.

ज्ञानेश्वरीच्या रुपाने मराठी भाषेला जे वैभव प्राप्त झाले आहे ते पाहिले की ऊर अभिमानाने कसा भरुन येतो. कशी भाषा आहे, कसे दृष्टांत दिलेत माऊलींनी! किती हळुवार शब्दांनी हे गीतातत्व उलगडलंय! माऊलींनी जणू त्या अर्जुनाच्या, संजयाच्या इतकेच काय प्रत्यक्ष भगवंताच्या मनातले भाव ओळखून ते अतिशय रसिकतेने शब्दबद्ध केलेत - याला खरोखर तोड नाहीये. या ज्ञानेश्वरीची गोडीच अवीट आहे. इतकी शतके झाली तरी ही गोडी कमी झाली नाहीच; उलट अजून नवनवीन मंडळी या माऊलींच्या, त्यांच्या भाषेच्या प्रेमात पडत आहेत, ही ज्ञानेश्वरी समजावून घ्यायचा प्रयत्न करताहेत.

माऊलींचे यथार्थ वर्णन करणारी ही ओवी - विपायें जरी आठवला चित्ता | तरी दे आपुली योग्यता | हें असो तयातें प्रशंसितां | लाभु आथि || - अगदी चुकूनही जरी माऊलींचे स्मरण आपल्याला झाले तरी अष्टसात्विक भावाला भरती येते. ते परमात्म तत्व अस्तित्वात आहे का नाही या वादाचा संपूर्ण विसर पडतो आणि केवळ एक प्रसन्नताच चित्ताला व्यापून टाकते. याचे कारण म्हणजे "माऊली". ते अशा काही उच्चतम ब्रह्मभावात होते की केवळ त्यांच्या स्मरणाने ते समाधान, ती शांति याची एक झलक आपल्या चित्ताला लाभते.

अशा या अति कृपाळू माऊलींच्या प्रेमात चिंब भिजलेले एक महात्मा - ज्यांचा काही सहवास मला लाभला त्यांच्या संदर्भातील ही एक सत्यकथा. पांवसचे पूजनीय स्वामी स्वरुपानंदांचे उत्तराधिकारी असलेले हे महापुरुष ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी. पुण्यातील सदाशिव पेठेत एका चाळीत ते रहात असत. तिथेच दररोज रात्री पाऊण तास त्यांचे ज्ञानेश्वरीवर अतिशय रसाळ प्रवचन चालायचे. त्यांची प्रवचने ऐकण्याचे भाग्य मला लाभले होते. तसे हे सत्पुरुष प्रापंचिक, एक कापड दुकानदार. पण नाथसंप्रदायाचे अध्वर्यू असल्यामुळे ते ध्यानाविषयीही मार्गदर्शन करीत असत. ही त्यांची ख्याती ऐकून एक तरुण त्यांच्याकडे ध्यानाविषयी विचारणा करु लागला. हा तरुण माणूस चांगले इंजिनिअरिंगचे शिक्षण सोडून रिक्षा चालवत होता. पुढे त्याला अनेक व्यसने जडली होती - त्या तरुणाच्याच शब्दात सांगायचे तर खून सोडता -बाकी सारे गुन्हे केलेले. थोडक्यात तो पुरता बिघडलेला होता. कोणा हितचिंतकाने त्याला या सत्पुरुषाच्या पायी आणले. या महापुरुषाच्या सान्निध्यामुळे पुढे हा तरुण इतका सुधारला की त्याने इंजिनिअरिंग तर पूर्ण केलेच व पुढे चांगली नोकरी व संसार करुन परमार्थातही त्याने मोठी प्रगती केली. आठ-दहा वर्षांपूर्वी अचानक हार्टअ‍ॅटॅकने त्याचे निधन झाले. हा तरुण माझा चांगला मित्र होता. एकेकाळी अतिशय अधोगतीला लागलेला हा तरुण केवळ या महापुरुषाच्या सान्निध्याने एक उत्तम जीवन जगू लागला. या सत्पुरुषाने अशी अनेक तरुणांची जीवनदृष्टी बदलून टाकली, त्यांना सुयोग्य पथावर आणून सोडले.
अशा कारणाकरता या महापुरुषाची कोणी स्तुती करु लागले तर ते म्हणत - ही सारी माऊलींची आणि माझ्या सद्गुरुंची कृपा - तेच सारे माझ्याकडून हे करवतात - मी कोणीही नाही - ते यंत्री मी यंत्र.

( संत महात्म्यांचा सगळ्यात मोठा चमत्कार हाच असतो की जी व्यक्ति पशुवत जीवन जगत असते तिला संतसंगतीचा परिसस्पर्श झाला की त्याच व्यक्तिचे जीवन सोन्यासारखे झळाळून उठते. हे असे चमत्कार लक्षात न घेता बाकीच्या चमत्कारांना आपण का महत्व देतो हे एक मोठे कोडेच आहे !!)

माऊलींचे विलक्षण प्रेम ज्या कोणाला लाभेल त्याच्या वागण्या-बोलण्यातून मग ते ईश्वरीय प्रेम आविर्भूत होऊ लागते. त्याच्या केवळ सान्निध्यानेही कोणा भाविकाला -साधकाला या लौकिकातल्या गोष्टींविषयी सहजच निरिच्छता प्राप्त होते. अशी विरक्ति प्राप्त होउनही हा साधक चारचौघांसारखाच हा संसारही करील - पण तो केवळ कर्तव्यबुद्धीने, त्यात आसक्ति न राखता. त्याला ईश्वरीय प्रेमाचीच आंतरिक तळमळ लागेल. माऊलींची ही रसाळ ज्ञानेश्वरीच त्याची ही तळमळ शांत करेल. कारण ज्ञानेश्वरीतच ही ओवी आली आहे - तेणें कारणें मी बोलेन| बोलीं अरूपाचें रूप दावीन| अतींद्रिय परी भोगवीन| इंद्रियांकरवीं ||६-३६|| संपूर्ण ज्ञानेश्वरीच अतिशय अद्भुत, सामर्थ्यशाली आहे. यातील ओवी-ओवीत ते गीतातत्व - ते ब्रम्हतत्व प्रगट करण्याचे सामर्थ्य आहे. जो कोणी अतिशय प्रेमाने सद्भावाने याचे वाचन आणि त्यानुसार आचरण करील त्याला हे अखंड समाधान, अखंड शांति याचा लाभ होईलच होईल - जेवढी तळमळ आणि प्रेम अधिक तेवढी माऊलींची कृपा अनुभवता येईल.

हें असो तयातें प्रशंसितां | लाभु आथि || - माऊलींचे स्तवन करण्यामागे हेच प्रयोजन - त्यांची अखंड कृपा प्राप्त व्हावी - अजून काहीही नाही .....

ॐ तत् सत् ||
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

http://www.maayboli.com/node/46338 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग १

http://www.maayboli.com/node/46384 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग २

http://www.maayboli.com/node/46475 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ३

http://www.maayboli.com/node/46591 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ४

http://www.maayboli.com/node/46666 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ५

http://www.maayboli.com/node/46874 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ६

http://www.maayboli.com/node/46911 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ७

http://www.maayboli.com/node/46959 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ८

http://www.maayboli.com/node/48725 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ९

http://www.maayboli.com/node/49241 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग १०

http://www.maayboli.com/node/50171 श्री ज्ञानेश्वरी अभ्यास -भाग ११

--------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ -

१] http://abhangdnyaneshwari.org/

२] http://sanskritdocuments.org/marathi/

३] http://www.gharogharidnyaneshwari.com/

-------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर... हे असं वाचलं कि एक भारलेली अवस्था येते मनाला. प्रत्येकवेळी हाच अनुभव घेतलात मी, शशांक.

संत महात्म्यांचा सगळ्यात मोठा चमत्कार हाच असतो की जी व्यक्ति पशुवत जीवन जगत असते तिला संतसंगतीचा परिसस्पर्श झाला की त्याच व्यक्तिचे जीवन सोन्यासारखे झळाळून उठते. हे असे चमत्कार लक्षात न घेता बाकीच्या चमत्कारांना आपण का महत्व देतो हे एक मोठे कोडेच आहे !! >>> अगदी मार्मिक!

लेख नेहमी सारखाच सुंदर.