स्त्रीभृणहत्या - जबाबदार कोण? (पुन्हा इथे टाइप केलेले. लिंक नव्हे.)

Submitted by स्वीटर टॉकर on 7 November, 2014 - 12:43

स्त्रीभृणहत्या - जबाबदार कोण?

अय्या, हा कसला बावळट प्रश्न? उत्तर सरळ आहे. पति, कधी कधी पत्नी, त्यांच्यावर दबाव आणणारे सासू सासरे आणि याचा फायदा उठवणारे डॉक्टर !

मात्र ‘उत्तर’ आणि ‘समाधान’ यात फरक असतो. राजकीय पुढार्‍यांकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. समाधान मात्र नसतं. कारण समाधान होण्यासाठी खोलात जावं लागतं. वरवरचा विचार पुरत नाही. या हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होणार्‍यांवर घणाचे घाव घातले पाहिजेत यात शंकाच नाही. त्याचबरोबर अशी परिस्थिती येणारच नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत.

नाही. नाही. वाक्यरचना चुकलीच. यापुढे, अमुक केलं पाहिजे, घाव घातले पाहिजेत, पावलं उचलली पाहिजेत वगैरे बोलायचंच नाही. दिवाणखान्यात बसून लेक्चर देणार्‍यांना समाज बदलता येत नाही. आपल्याला जे योग्य वाटतं ते आपणच करायचं. आपलं बघून आणखी चौघींना बळ येईल.

साधारण पंधरा वर्षापूर्वी बी.बी.सी. वर तामिळनाडूमधील स्त्रीहत्येवर डॉक्युमेंटरी दाखवली गेली होती. स्त्रीभृणहत्या नव्हे हं! स्त्रीहत्या! एका आजीनी कॅमेर्‍याला सांगितलं होतं, “हो. मी माझ्या तान्ह्या नातीला मारलं. पाण्यांत बुडवून! ती आम्हाला नकोशी झाली होती म्हणून नाही. पण तिचं आयुष्य माझ्यासारखंच जाणार! असं असह्य जीवन वाट्याला येण्याआधीच मी तिची सुटका करून टाकली. द्या फाशी नाहीतर टाका तुरुंगात. नवरा दारुडा, पोरगा पण तसाच. रोजची उपासमार, वर मारहाण. त्याच्यापासूनही सुटका होईल माझी. तुरुंगात दोन वेळची भाकरी देखील नशिबी येईल.”

माझ्या डोक्यात विचार आला, आजीबाई इतकी जिवावर उदार झाली होती तर त्या दारुड्या नवर्‍याच्या डोक्यात झोपेत का होई ना, दगड घालायची हिम्मत का झाली नाही? त्या भीतीनी एखादेवेळेस मुलाची दारू देखील सुटली असती. नातीचं ही भाग्य उजळलं असतं! मर्दुमकी दाखवायची ती त्या असहाय्य जिवावर? आणखी एक नात झाली तर? आणि आणखी एक?

नवर्‍याला धडा शिकवण्याची तिची छाती का झाली नाही याच्या कारणातच स्त्रीभृणहत्येच मूळ दडलेलं आहे. दडलेलं नाही म्हणा, उजळ माथ्यानं वावरतंय.

बळी तो कान पिळी हा निसर्गाचा नियमच आहे. जंगलात, समुद्रात, वाळवंटात, डिस्कवरीत आणि नॅशनल जॉग्रफिकमध्ये या वास्तवाचं भयाण दर्शन घडतं. हे खरेखुरे रिऍलिटी शोज् . इथे अभिनय नाही, रीटेक नाहीत, मॅच फिक्सिंग नाही, खोटे अश्रू नाहीत की आधी टेप केलेलं हास्य नाही. त्या अवस्थेत मानवजात होती तेव्हांपासून पुरुष जातीचा स्त्रीवर वरचष्मा आहे.

आता शारिरिक शक्तीची जरूर तर राहिली नाहीच, उपयोगही फारसा राहिला नाही. कालबाह्य झाला तरीही हा वरचष्मा काही नाहिसा झाला नाही. का बरं नाहिसा होईल? आजपर्यंत कोणी आपणहून राजसिंहासन सोडलंय्?

पूर्वी मुलींना शिक्षण नव्हतं, कमाई नव्हती, हक्क नव्हते. त्यामुळे लग्नाच्या वेळी मुलीच्या आईबापांची धुलाई करण्याची प्रथा सुरू झाली. आता मुली बरोबरीनी शिकल्या, कमवायला लागल्या. सरकारनी त्यांना बरोबरीने हक्क दिले (निदान हिंदू मुलींच्या बाबतीत तरी. बाकीच्यांना कितपत आहेत याचा माझा अभ्यास नाही. दिले असतील अशी इच्छा). धुलाई कमी झाली पण थांबली नाही. आज कित्येक लग्नात खर्च अर्धा अर्धा केल्याचं ऐकू येतं पण नेहमीच त्याचं कारण ‘मुलाकडच्यांनीच ती ऑफर दिली’ असं असतं. मुलीकडच्यांनी नेटानी हे करवून घेतलं अशा केसेस् असतील नक्कीच, पण माझ्या बघण्यात तरी नाहीत.

“पोरीचं लग्न एकदाच तर करायचय्. पैसे कमावले आहेत ते तिच्यासाठीच ना”, असं प्रत्येक जण आपल्या निर्णयाचं पुष्टीकरण देतो. पण तेव्हां त्यांच्या हे लक्षांत येत नाही की आपल्या आधी कोट्यवधी वधुपित्यांनी असाच विचार केला. त्याच बीजाचा विषवृक्ष झाला आहे. त्याच्याच फांद्या म्हणजे हुंडा, एकतर्फी मानपान, आणि शेंडेफळ आहे स्त्रीभृणहत्या!

किती तर्कशून्य आहे बघा! आपल्याला माहीतच आहे की ज्या वस्तूचा सुळसुळाट असतो तिची किंमत पडते. जिचा तुटवडा असतो तिची वाढते. आज हजार मुलांमागे साडेआठशे ते साडेनऊशे मुली आहेत. (वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे आकडे). आकड्यांचा रेटा फार जबरदस्त असतो. त्यानुसार आपला भाव चांगलाच वधारायला हवा होता. नाही का? तसं का झालं नाही? आपलाच आत्मविश्वास कमी पडला. वरमाई असताना आपल्या आवाजातली फेक आणि वधुमाई असताना यात आपणच फरक पडू दिला. “निष्कारण दुय्यम भूमिका आम्हाला मान्यच नाही” असं आम्ही खडसावून सांगू शकलो नाही.

१९६०च्या दशकात अमेरिकेत ‘विमेन्स लिबरेशन’ या चळवळीनी चांगलंच मूळ धरलं. १९८५ साली त्यांतल्या एका अग्रगण्य महिलेने (तिचं नाव आता मला आठवत नाही) असं विधान केलं की “आमच्या चळवळीची दिशा पुढे पूर्णपणे चुकलीच. आम्ही स्त्रीच्या स्त्रीत्वाचा, अस्मितेचा आदर समाजाकडून व्हावा म्हणून ही चळवळ उभी केली. मात्र पुढे आम्ही पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागलो. आमचं यशापयश त्यांच्याच फूटपट्टीनी मोजायला लागलो. नकळत एका प्रकारे आम्ही अशी पावतीच दिली की पुरुषाचं काम आमच्या कामापेक्षा जास्त challenging and fulfilling आहे. आता मात्र हे बदलायला हवं.”

पण आता हे बदलणं शक्य नव्हतं. त्या कामातलं आव्हान, मिळणारं समाधान, आर्थिक बळ आणि त्यामुळे येणारं स्वातंत्र्य यांचा चसका लागला होता. चिमणीची आता घार झाली होती. पंखात शक्ती आली होती, नजर तीक्ष्ण झाली होती, चोच धारदार झाली होती. घरट्यातली जागा आता पुरेशी वाटत नव्हती.

मात्र एक उणीव राहिली. अजूनही आहे. तिचं मन चिमणीचंच राहिलं. तिला अजूनही असंच वाटतं की कावळा आपल्याहून बलवान आहे. तिला कुणी आरसा दाखवला नाही अन् तिनी देखील तो शोधण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या दिवशी तिला तो सापडेल त्याच दिवशी जोडाक्षरांचा बाप असलेला हा शब्द ‘स्त्रीभृणहत्या’ इतिहासजमा होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वजण,

हा विषय खूपच वाचकांना महत्वाचा वाटतो हे उत्तमच आहे. मात्र माझं टायपिंग अति हळू असल्यामुळे वैयक्तिक प्रतिसाद देण्याऐवजी एक जनरल दृष्टिकोन टाकते.

हा लेख अनॅलिटिकल अजिबात नाही. तसा असावा असा प्रयत्न ही नव्हता.
या विषयाला इतके कंगोरे आहेत की सगळ्यांना स्पर्श करायचं ठरवलं तर मोठाथोरला आणि कंटाळवाणा धडा तयार झाला असता.
मी 'तुमचं मन चिमणीचं आहे' असं त्यांनाच म्हणते आहे ज्या already घार झालेल्या आहेत. अपुरे शिक्षण किंवा अपुरा पैसा असलेल्यांना नव्हे. त्या बिचार्यांना choice नाहीये.
लग्नाचा खर्च मुलीकडच्यांनी केला की त्या घरात स्त्रीभृणहत्या होते असा simplistic निष्कर्ष अजिबात काढायचा माझी इच्छा नाही.

बळी तो कान पिळी या नियमानुसार अन्याय हा होणारच हा निसर्गाचा नियम असल्यामुळे तो सासू करते का नवरा का तिसरं कोणी हा प्रश्न गौण आहे.

प्रश्न मानसिकतेचा आहे. जेव्हां मुलीचे आईवडील लग्नाचा खर्च करण्याचं मान्य करतात तेव्हां ते एक प्रकारे आपल्या मुलीला सांगत असतात, "बाळ, त्या घरात तुला दुय्यम स्थान मिळण्याची आम्ही व्यवस्था केली आहे. हे लक्षात घेऊन संसार कर."

जेव्हां मी पेपरात बातमी वाचते 'विवाहितेने स्वतःला जाळून घेतले', तेव्हां माझी चिडचिड होते. ज्या मुलीचा इतका अतोनात छळ झाला आहे की ती आपल्या सर्वस्वाचा त्याग करायला उद्युक्त होते, तिच्या मनात असं का येत नाही की ज्यानी/जिनी माझा इतका छळ केला आहे, जाताजाता त्यांच्यावरही रॉकेल टाकावं? मृत्युपलिकडे तर कसलीच भीती नसते.

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मुलींना तिच्या आईवडीलांकडून मिळणारा सपोर्ट. सासरी जर वाईट वागणूक मिळत असेल तरी आईचं घर तिला कायम उघडं आहे असा तिला विश्वास असेल तर तिला कधीही अशी extreme step घेण्याची इच्छा होणार नाही.

स्वीटर टॉकर, तुझी चिडचिड होते, तशी माझीही चिडचिड होते पण जाळून घेण्याच्या निर्णयापर्यंत विवाहिता जाते तेव्हा अपेक्षाभंगाचे मोठे दु:ख पदरात असते. ह्या अपेक्षाभंगाने 'अन्याय झाला' याची संवेदना बोथट झालेली असते. हा अपेक्षाभंग केवळ नवर्‍याकडून नसतो तर शेजार-पाजार, (तिच्या किंकाळ्या ऐकल्या तरी आपण का त्या भानगडीत पडा असा विचार करतात.) माहेरचे ( सोशल प्रेशर आणि 'नवरा निर्व्यसनी बरा आहे, सासू-सासरे काय आज आहेत, उद्या नाहीत. कर जरा दिवस सहन.' असले फालतूचे विचार बाळगतात) आणि सगळ्यात मुख्य स्वतः कडून झालेला असतो. चार वेळा बेदम मार खाल्ल्यावर आपण स्वतःचे रक्षण करू शकत नाही ही भावना फार भयंकर डिप्रेसिव्ह असते आणि मी मेल्याने कुणाचे काही अडणार नाही ह्याची खात्री असते.

शेजार-पाजार, मित्र-मैत्रिण, माहेरच्यांनी विचारले नाही तरी चालेल पण ज्या पर्पजसाठी जन्माला आले तो पुरा करायचा प्रयत्न मरेपर्यंत करेन हे सेल्फ-एस्टीम जिच्याकडे असते ती तगते. (आता ह्याबद्दल कुणी डेटा मागू नका. हे माझे जनरल ऑब्झर्वेशन आहे.)

Pages