स्त्रीभृणहत्या - जबाबदार कोण? (पुन्हा इथे टाइप केलेले. लिंक नव्हे.)

Submitted by स्वीटर टॉकर on 7 November, 2014 - 12:43

स्त्रीभृणहत्या - जबाबदार कोण?

अय्या, हा कसला बावळट प्रश्न? उत्तर सरळ आहे. पति, कधी कधी पत्नी, त्यांच्यावर दबाव आणणारे सासू सासरे आणि याचा फायदा उठवणारे डॉक्टर !

मात्र ‘उत्तर’ आणि ‘समाधान’ यात फरक असतो. राजकीय पुढार्‍यांकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. समाधान मात्र नसतं. कारण समाधान होण्यासाठी खोलात जावं लागतं. वरवरचा विचार पुरत नाही. या हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होणार्‍यांवर घणाचे घाव घातले पाहिजेत यात शंकाच नाही. त्याचबरोबर अशी परिस्थिती येणारच नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत.

नाही. नाही. वाक्यरचना चुकलीच. यापुढे, अमुक केलं पाहिजे, घाव घातले पाहिजेत, पावलं उचलली पाहिजेत वगैरे बोलायचंच नाही. दिवाणखान्यात बसून लेक्चर देणार्‍यांना समाज बदलता येत नाही. आपल्याला जे योग्य वाटतं ते आपणच करायचं. आपलं बघून आणखी चौघींना बळ येईल.

साधारण पंधरा वर्षापूर्वी बी.बी.सी. वर तामिळनाडूमधील स्त्रीहत्येवर डॉक्युमेंटरी दाखवली गेली होती. स्त्रीभृणहत्या नव्हे हं! स्त्रीहत्या! एका आजीनी कॅमेर्‍याला सांगितलं होतं, “हो. मी माझ्या तान्ह्या नातीला मारलं. पाण्यांत बुडवून! ती आम्हाला नकोशी झाली होती म्हणून नाही. पण तिचं आयुष्य माझ्यासारखंच जाणार! असं असह्य जीवन वाट्याला येण्याआधीच मी तिची सुटका करून टाकली. द्या फाशी नाहीतर टाका तुरुंगात. नवरा दारुडा, पोरगा पण तसाच. रोजची उपासमार, वर मारहाण. त्याच्यापासूनही सुटका होईल माझी. तुरुंगात दोन वेळची भाकरी देखील नशिबी येईल.”

माझ्या डोक्यात विचार आला, आजीबाई इतकी जिवावर उदार झाली होती तर त्या दारुड्या नवर्‍याच्या डोक्यात झोपेत का होई ना, दगड घालायची हिम्मत का झाली नाही? त्या भीतीनी एखादेवेळेस मुलाची दारू देखील सुटली असती. नातीचं ही भाग्य उजळलं असतं! मर्दुमकी दाखवायची ती त्या असहाय्य जिवावर? आणखी एक नात झाली तर? आणि आणखी एक?

नवर्‍याला धडा शिकवण्याची तिची छाती का झाली नाही याच्या कारणातच स्त्रीभृणहत्येच मूळ दडलेलं आहे. दडलेलं नाही म्हणा, उजळ माथ्यानं वावरतंय.

बळी तो कान पिळी हा निसर्गाचा नियमच आहे. जंगलात, समुद्रात, वाळवंटात, डिस्कवरीत आणि नॅशनल जॉग्रफिकमध्ये या वास्तवाचं भयाण दर्शन घडतं. हे खरेखुरे रिऍलिटी शोज् . इथे अभिनय नाही, रीटेक नाहीत, मॅच फिक्सिंग नाही, खोटे अश्रू नाहीत की आधी टेप केलेलं हास्य नाही. त्या अवस्थेत मानवजात होती तेव्हांपासून पुरुष जातीचा स्त्रीवर वरचष्मा आहे.

आता शारिरिक शक्तीची जरूर तर राहिली नाहीच, उपयोगही फारसा राहिला नाही. कालबाह्य झाला तरीही हा वरचष्मा काही नाहिसा झाला नाही. का बरं नाहिसा होईल? आजपर्यंत कोणी आपणहून राजसिंहासन सोडलंय्?

पूर्वी मुलींना शिक्षण नव्हतं, कमाई नव्हती, हक्क नव्हते. त्यामुळे लग्नाच्या वेळी मुलीच्या आईबापांची धुलाई करण्याची प्रथा सुरू झाली. आता मुली बरोबरीनी शिकल्या, कमवायला लागल्या. सरकारनी त्यांना बरोबरीने हक्क दिले (निदान हिंदू मुलींच्या बाबतीत तरी. बाकीच्यांना कितपत आहेत याचा माझा अभ्यास नाही. दिले असतील अशी इच्छा). धुलाई कमी झाली पण थांबली नाही. आज कित्येक लग्नात खर्च अर्धा अर्धा केल्याचं ऐकू येतं पण नेहमीच त्याचं कारण ‘मुलाकडच्यांनीच ती ऑफर दिली’ असं असतं. मुलीकडच्यांनी नेटानी हे करवून घेतलं अशा केसेस् असतील नक्कीच, पण माझ्या बघण्यात तरी नाहीत.

“पोरीचं लग्न एकदाच तर करायचय्. पैसे कमावले आहेत ते तिच्यासाठीच ना”, असं प्रत्येक जण आपल्या निर्णयाचं पुष्टीकरण देतो. पण तेव्हां त्यांच्या हे लक्षांत येत नाही की आपल्या आधी कोट्यवधी वधुपित्यांनी असाच विचार केला. त्याच बीजाचा विषवृक्ष झाला आहे. त्याच्याच फांद्या म्हणजे हुंडा, एकतर्फी मानपान, आणि शेंडेफळ आहे स्त्रीभृणहत्या!

किती तर्कशून्य आहे बघा! आपल्याला माहीतच आहे की ज्या वस्तूचा सुळसुळाट असतो तिची किंमत पडते. जिचा तुटवडा असतो तिची वाढते. आज हजार मुलांमागे साडेआठशे ते साडेनऊशे मुली आहेत. (वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे आकडे). आकड्यांचा रेटा फार जबरदस्त असतो. त्यानुसार आपला भाव चांगलाच वधारायला हवा होता. नाही का? तसं का झालं नाही? आपलाच आत्मविश्वास कमी पडला. वरमाई असताना आपल्या आवाजातली फेक आणि वधुमाई असताना यात आपणच फरक पडू दिला. “निष्कारण दुय्यम भूमिका आम्हाला मान्यच नाही” असं आम्ही खडसावून सांगू शकलो नाही.

१९६०च्या दशकात अमेरिकेत ‘विमेन्स लिबरेशन’ या चळवळीनी चांगलंच मूळ धरलं. १९८५ साली त्यांतल्या एका अग्रगण्य महिलेने (तिचं नाव आता मला आठवत नाही) असं विधान केलं की “आमच्या चळवळीची दिशा पुढे पूर्णपणे चुकलीच. आम्ही स्त्रीच्या स्त्रीत्वाचा, अस्मितेचा आदर समाजाकडून व्हावा म्हणून ही चळवळ उभी केली. मात्र पुढे आम्ही पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागलो. आमचं यशापयश त्यांच्याच फूटपट्टीनी मोजायला लागलो. नकळत एका प्रकारे आम्ही अशी पावतीच दिली की पुरुषाचं काम आमच्या कामापेक्षा जास्त challenging and fulfilling आहे. आता मात्र हे बदलायला हवं.”

पण आता हे बदलणं शक्य नव्हतं. त्या कामातलं आव्हान, मिळणारं समाधान, आर्थिक बळ आणि त्यामुळे येणारं स्वातंत्र्य यांचा चसका लागला होता. चिमणीची आता घार झाली होती. पंखात शक्ती आली होती, नजर तीक्ष्ण झाली होती, चोच धारदार झाली होती. घरट्यातली जागा आता पुरेशी वाटत नव्हती.

मात्र एक उणीव राहिली. अजूनही आहे. तिचं मन चिमणीचंच राहिलं. तिला अजूनही असंच वाटतं की कावळा आपल्याहून बलवान आहे. तिला कुणी आरसा दाखवला नाही अन् तिनी देखील तो शोधण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या दिवशी तिला तो सापडेल त्याच दिवशी जोडाक्षरांचा बाप असलेला हा शब्द ‘स्त्रीभृणहत्या’ इतिहासजमा होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आवडला. ह्याच धाग्याच्या 'संपादन' मध्ये जाऊन हा लेख इथे टाईप करता आला तर जास्त सदस्य वाचतील.

लेखातून वाक्यं कॉपी पेस्ट करता येत नाहीयेत. यशापयश पुरुषप्रधान संस्कृतीच्या फुटपट्ट्यांत मोजायला लागलो हे बरोबर असलं तरी स्त्रीसाठी आर्थिक स्वातंत्र्य हा महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त स्त्रीने आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होताना १ + १ असा सुपरवुमन रोल ओढवून घेतला किंवा लादला गेला. म्हणजे ती घराबाहेर जाऊन काम करणार असेल तरी घरकामाची बेसिक जबाबदारी तिच्यावरच ! स्त्री-पुरुष असा भेदभाव न मानता अर्थार्जन आणि घरकाम ह्याची जबाबदारी कुणा एकावर अन्याय न होता वाटून घ्यावी हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लिंगसमानता येणं कठीण आहे.

अर्थात तुम्हीच म्हटल्याप्रमाणे आपणहून सिंहासन कोण सोडेल ? Happy

अगो + १ परंतु स्त्रीभ्रुण हत्या टाळण्यासाठी किमान शिकलेल्या स्त्रियांनी घरात थोडातरी संघर्ष करावा अशी अपेक्षा धरली तर वावगे ठरु नये. हे काही परस्पर पुरुषाने ठरवले आणि केले असे काम नाही.

अगो,

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. लिंगसमानता 'येणार' नाहिये. ती 'आणायला लागणार' आहे. या कामात जखमा भरपूर होणार आहेत. पर्याय नाहिये.

लवकरच टाइप करेन इथेच.

लेख इथे छापला तर बरे होईल. स्वतःच्या लेखाची लिंक देता येते तर कॉपी पेस्टला का नको?

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. लिंगसमानता 'येणार' नाहिये. ती 'आणायला लागणार' आहे. या कामात जखमा भरपूर होणार आहेत. पर्याय नाहिये

आणायला लागणार आहे पण आणणा-याही स्त्रियाच असणार हे स्त्रियांनी लक्षात ठेवले पाहिजे. कोणीतरी येऊन ही समानता आणणार ही अपेक्षा ठेवल्याने काहीही साध्य होणार नाही.

कालच धोंडेमासात मनासारखा मानपान केला नाही म्हणुन सुनेला जाळले ही बातमी वाचली. सुन उच्चशिक्षित, नोकरी करणारी होती. तिने सुरवातीलाच माहेरच्यांना झेपेल/आवडेल तेवढाच मानपान केला जाईल हा संदेश सासरी दिला असता तर कदाचित हे टोक गाठताना सासरच्यांनी जरातरी विचार केला असता. पण शिकल्या सवरल्या मुलीही मान खाली घालुन कसायाघरची गाय हीच आपली भुमिका कायम ठेवत असल्या तर मग कसलीच समानता येणार नाही. मग भृणहत्या, नाहीतर सुनहत्या ह्या बातम्या कानावर आदळत राहणार.

>>>> मुंबई पुण्याचा अपवाद वगळता स्त्रियांना समाजात कमी ले़खणे ही अगदी सामान्य बाब आहे. स्त्रीभृणहत्या हे त्याचंच शेंडेफळ <<<<<
असहमत.
स्त्रीयांना कमी लेखले जाणे, निव्वळ हेच कारण स्त्रीभृणहत्येमागे नाही. व स्त्रीयांना फक्त पुरुषच हीन लेखतात असेही नाही. बरे तर बरे, हा फरक शहरी व ग्रामिण वा सुशिक्षित्(?)/अशिक्षित असा अजिबात नाही. स्त्रीयांना जे काही हीणकस अनुभवावे लागते ते सर्वदूर सारख्याच प्रमाणात असते.
पण, त्याचबरोबर, मूळात घर व वंशविस्ताराचे काम स्त्रीकडे सोपवले जाणे म्हणजे तिला "कमी" लेखणे असा काही दृष्टीकोन असेल, तर तोच अमान्य.
धाग्याच्या विषयात खूप पोटेन्शियल आहे.
दिलेली लिंक वाचू शकलेलो नाही.
पण नंतर कधीतरी खास स्वानुभवावरूनची मते इथे मांडेन.

>>> पण आणणा-याही स्त्रियाच असणार हे स्त्रियांनी लक्षात ठेवले पाहिजे. कोणीतरी येऊन ही समानता आणणार ही अपेक्षा ठेवल्याने काहीही साध्य होणार नाही. <<<<
साधना, अचूक वर्मावर बोट ठेवले आहे तुम्ही.
फार स्पष्ट बोलता येत नाहि, पण आजवरचे अनुभव असे आहेत की स्त्रीयाच स्त्रीच्या कर्दनकाळ ठरतात व पुरुष हत्यारासारखे वापरले जातात. "सासुरवास" शब्दातच सासु आहे ती स्त्री आहे, सासरावास असे कोणी म्हणत नाही. मग या सासू सोबत सुनेस सासुरवास करण्यात नणंदा/भावजया/शेजारणी, होय अगदी मोलकरणीदेखिल सामिल असतात.
त्या किती किती प्रकारे मानसिक व शारिरीक छळवणूक करु शकतात हे लिहू पाहिले तर रामायण/महाभारतापेक्षाही मोठा ग्रंथ होईल, व कोण ते नेमाडे की कोण ते, त्यांना खरच कळकळ असती, तर "हिंदू धर्म एक अडगळ" वगैरे लिहावे न वाटता त्यांनी यावर लिहीले अस्ते. असो.

स्वीटर टॉकर,

>> लिंगसमानता 'येणार' नाहिये. ती 'आणायला लागणार' आहे.

लिंगसमानता आणून नक्की काय साध्य होणारे? पुरुष पुरुषांचे खून पाडतातच की.

पुरूष आणि स्त्री हे सारखे कधीच नव्हते. त्यामुळे लिंगसमानता अशा संदिग्ध कल्पनेऐवजी 'महिलांचा आदर ठेवणे' अशा ठोस दृष्टीकोनाची मशागत व्हायला हवी.

आ.न.,
-गा.पै.

चांगला लेख आहे, तरी अ‍ॅनालिसिस अपुरा वाटला. म्हणजे केवळ हुंडा द्यायला नको म्हणून मुलगी नको हे (एव्हढेच असेल असे) पटले नाही.

पुरुषप्रधान संस्कृती जगभर सर्वत्र आहे. पण मुलगा हवा हा धोशा, स्त्रीभ्रूणहत्या मुख्यत्वे भारतीय / आशियायी समाजात आढळतात. भारत आणि चीन मुख्यत्वे. साम्यस्थळे = प्राचीन संस्कृती Wink
मुलगा म्हातारपणी सांभाळणार, वंश पुढे वाढवणार, स्वर्गात जायला मदत करणार, मुलीचा काय उपयोग तसा?
शिवाय सामाजिक प्रतिष्ठेच्या कल्पना कुटुंबातील स्त्रियांच्या 'इज्जती'शी जोडलेल्या. जळता निखारा प्रकार. म्हणजे मुलगी नसली तर कौटुंबिक प्रतिष्ठेला असलेली रिस्क कमी.
ह्या उलट स्त्रीला समाजात प्रतिष्ठा मिळते ती तिच्या (हयात असलेल्या) नवर्‍यामुळे आणि मुलग्यांमुळे.
आणि शेवटी महत्त्वाचे म्हणजे कुटुंबनियोजन. मुलगा होईपर्यंत मुली होऊ देणे आता प्रतिष्ठेचे राहिले नाही. त्यामुळे मुलगी होऊच न देणे हा एकच उपाय राहतो.

आर्थिक स्वातंत्र्याची संधी आणि प्रतिष्ठेच्या कल्पना बाद करणे ह्यातून थोडाफार बदल घडेल असे मला वाटते.

लेख छान आहे.

ढोर गंवार क्षुद्र पशु नारी ये सब ताड़न के अधिकारी, अशी शिकवण असल्यावर स्त्रीयांचे अजुन काय होनार..

मृदुला, पोस्ट आवडली. सहमत!

लिंबूटिंबू,
सासूरवास हे एक अ‍ॅब्युझचे दुष्टचक्र आहे. एकीकडे व्यक्तीचा छळ होत असतो आणि दुसरीकडे ती व्यक्ती दुसर्‍या कुणाचातरी छळ करत असते. पितृसत्तांक एकत्र कुटुंब पद्धती अशा प्रकारच्या छळाला खतपाणी द्यायला अगदी पुरक. प्रत्येकाने उतरंडीच्या खालच्या पायरीवर असलेल्याला ठेचून समाधान मिळवायचे. मुलगा दुरावेल या भीतीने येणार्‍या सुनेचे तिच्या जोडीदाराशी हेल्दी रिलेशनशिप होऊ नये यासाठी प्रयत्न. ही भीती का तर आधीच्या पिढीतही स्वतःच्या जोडीदाराशी हेल्दी रिलेशन होउ नयेत म्हणून झालेले प्रयत्न. नवरा आपला नाही तेव्हा मुलगा, भाऊ ही रक्ताची नाती मुठीत पकडायची धडपड. छळ सोसत छळ करणारी एकमेकांत गुंतलेली अशी अनेक दुष्ट चक्र!

>>> पितृसत्तांक एकत्र कुटुंब पद्धती अशा प्रकारच्या छळाला खतपाणी द्यायला अगदी पुरक. <<<<
माफ करा, पण मी मातृसत्ताक घरात अधिक भयाण छळवाद पाहिला आहे. स्त्रीचाही, अन घरातील पुरुषांचाही.
तेव्हा पितृसत्ताक की मातृसत्ताक हा प्रश्नच नसुन, मूळ गृहितक जे स्त्री पुरुष "समान"(?) तिथेच गहन विचारमंथन आवश्यक आहे.
बाकी गामा म्हणतात तसे समान आदराने वागविले जाण्याचि अपेक्षा करणे हेच सर्वथैव योग्य. ना की पुरुष वजन उचलतात म्हणून स्त्रीयांनीही वेटलिफ्टर बनणे....! असो.

मला माहित नाही हा मुद्दा इथे कितपत बरोबर आहे, नसल्यास नक्की सांगा मी ताबडतोब डिलीट करेन.

मृदुलाताईंच्या प्रतिसादात एक प्राचीन मुद्दा आला आहे मुलगाच हवा यामागचा आग्रह करण्यामागे असलेल्या दृष्टीकोनामागचा तो म्हणजे मुलगा वंश वाढवतो.. थोडक्यात काय तर घराण्यात मुलगा जन्माला आला तर वंशावळ चालु राहील वगैरे वगैरे... अगदी बरोबर आहे मुद्दा... आता मला सांगा मुलगा वंश वाढवणार म्हणजे नक्की कसा हो? मुलगा जन्माला घालणार का पुढच्या पिढीला? नाही ना कारण निसर्गतः ते शक्यच नाही... म्हणुन तो काय करणार योग्य वयात लग्न करणार... आता वंशवृद्धीसाठी लग्न करायच म्हटल्यावर पुन्हा मुलाशीच करुन नाही चालणार त्यासाठी मुलगी हवी... म्हणजेच काय की कोणाला तरी मुलगी झाली तर हा दिवा तिच्याशी लग्न करुन आपल्या वंशाचा दिवा लावणार... आता अस इमॅजिन करुन बघा की अख्ख्या जगात आत्ता अस्तित्त्वात असलेल्या सगळ्या जोडप्यांना फक्त मुलगेच झाले तर ते सगळे सगळ्यांच्याच वंशातले शेवटचे दिवे असणार ना... कारण पुढचा दिवा लावण्यासाठी पणती, मेणबत्ती, ज्योत (बघा सगळी स्त्रीलिंगि रुप) लागते जी अस्तित्त्वातच नाही...

लिंबू, गापै, "समान" शब्दाबद्दल जे कोणी मुळात म्हणतच नाहीये ते गृहीत धरून ते कसे चुकीचे आहे ते पटवायला तुम्ही निघाला आहात. यालाच स्ट्रॉ मॅन आर्ग्युमेण्ट म्हणतात :). 'समान' म्हणजे समान स्वातंत्र्य, समान आदर, समान हक्क, समान जबाबदारी याच अर्थाने आहे ते.

मी वाचलेला इतिहास थोडक्यात असा आहे.जेंव्हा आर्य भारतात घुसले तेंव्हा ते टोळ्या -टोळ्या नी घोड्यावरुन भारतात आले होते त्यावेळी त्यांच्या टोळ्यात स्त्रीयांची संख्या खुप कमी होती. हा देश द्र्विड लोकांचा होता जे रंगारुपात
आर्यांपेक्षा भिन्न होते.आर्य उंच, धिप्पाड गोरे होते.या देशातिल नैसर्गिक साधन संपत्ती व भोळे बाबडे लोक पाहुन त्यांनी इथेच स्थिरावण्याचा निर्णय घेतला तेंव्हा त्यांची लोकसंख्या वाढवण्यासाठी वंशवृद्धीसाठी त्यांच्या स्त्रीया कमी पडायला लागल्या व नाईलाजाने त्यांना द्र्विड स्त्रीयाशी विवाह करणे भाग पडले त्यांना त्यांची वंश शुध्दता टीकवायची होती स्त्री फक्त गर्भ धारण करण्या इत पत गरजेची होती स्त्रीयांचा त्यांच्या समाजाशी पुन्हा संबध येऊन वंश दुशित होउ नये म्हणुन स्त्रीयावर त्यांनी अनगिनित बंधने लादली. थोडक्यात आर्य जरी विदेशी होते तरी बायका देशी म्हणुनच मनुस्मृतीत म्हटले आहे ढोर गंवार क्षुद्र पशु नारी ये सब ताड़न के अधिकारी.

आपण नशिबवान आहोत इथल्या राज्यघटने ने आपल्याला समान अधिकार दिले आहेत.

मनुस्मृतीत म्हटले आहे ढोर गंवार क्षुद्र पशु नारी ये सब ताड़न के अधिकारी...

.....

Proud

मनुस्मृती हिंदीत आहे का ?

ते वाक्य संत कवी तुलसीदास यांचे आहे.

स्वीटर टॉकर, तुमचा लेख वाचला आणि स्त्री-पुरूष समानतेमधील असणार्‍या उणीवा सुध्दा समजल्या. पण स्त्री-पुरूष समानता आली तरी स्त्रीभृणहत्या होणारच नाही असे मला वाटत नाही. कारण आहे मुलगा हा वंशाचा दिवा ही मानसिकता झुगारून देण्यात भारतीय समाज त्यातही विशेषतः स्त्रीया आज कुठेतरी कमी पडत आहेत. शिकल्या सवरलेल्या आणि पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या स्त्रीयासुध्दा पहिला मुलगा व्हावा म्हणून धडपडत असतात. मी हे सर्वांबाबत म्हणत नाही आहे याला अपवादसुध्दा आहेत. ही परिस्थिती शहरात आहे खेड्यांमधली परिस्थिती याहून भयानक असावी. स्त्रीभृणहत्या थांबवण्यासाठी सर्वात प्रथम समाजाची मुलगा आणि मुलीत भेदभाव करण्याची मानसिकताच नष्ट व्हायला पाहिजे.

वरील पैकी मृदुला आणि मुग्धटली यांचे प्रतिसाद आवडले.

मनुस्मृतीत ऐवजि श्रीतुलसी दास चे रामचरित मानस असे वाचावे.

अग्गोबै ! हे सगळे मुसलमान करायचे असे आजचे आर्य सांगतात !>>आजचे आर्य कोण ? आहेत का ते अजुन?

मृदुला, नरेश माने.. प्रतिसादाशी सहमत.
आजही भारतात,पुरुषांच्या बरोबरीने ,प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया काम करीत असल्या तरीही,पहिलाि मुलगा च झाला तर बरे किंवा एक तरी मुलगा हवाच, ही मानसिकता आहे. शिवाय कित्येक सा. बा. आणि आयांची पण अशीच इच्छा असते. म्हणजे स्वतः स्त्री असुनही यांनाच मुलगा हवा(च) असतो. आणि मुलगा च व्हायला हवा म्हणून इच्छुक माता काही ही करायला तयार असतात. (माझ्या च माहितीतील अशा बऱ्याच जणी आहेत.) कुठे तरी स्त्रियांनी च बदलायला हवे नाही का? (अर्थात अपवाद असतील च.)
दुसरा मुद्दा मुद्दाम नमूद करावा असे वाटते.. लग्न ठरवताना किती मुली आणि मुलींचे वडील, मुलाकडच्यांना लग्नाचा निम्मा खर्च करण्याबाबत विचारतात? भाग पाडणे तर दुरची गोष्ट! अर्थात इथेही अपवाद असतीलच पण खूप कमी! लग्न दोघांचे असताना, मुलाकडच्यांनी सगळा खर्च का करावा?

लिंबू,
मी पितृसत्ताक पद्धतीचा उल्लेख केला गेला कारण भारतात ही पद्धत जास्त प्रचलित आहे. मुलीचे सासरी रहायला जाणे , वडिलांचे घर परके आणि नवर्‍याचे घरही तिचे नाही अशी अवस्था. असुरक्षितत वाटणे आणि घरात, कुटुंबात स्थान बळकट करण्यासाठी धडपडणे स्वाभाविकच. कर्ता पुरुष आपल्याबाजूने असावा म्हणून प्रयत्न हेही त्याच मानसिकतेतून. सासुरवासाचा उल्लेख झाला म्हणून स्त्रीयांच्या अ‍ॅब्युझ सायकल बद्दल बोलले. तसे तर पितृसत्ताक पद्धतीत पुरुषांनाही बरेचदा इमोशन ब्लॅकमेलिंग ला तोंड द्यावे लागतेच.

फारएण्ड,

>> 'समान' म्हणजे समान स्वातंत्र्य, समान आदर, समान हक्क, समान जबाबदारी याच अर्थाने आहे ते.

तुम्ही समान या विशेषणाने जे सांगू पहाताहात ते मी असमान या विशेषणाने सांगू पाहतोय! Happy

'असमान' म्हणजे असमान पण परस्परपूरक स्वातंत्र्ये, असमान पण परस्परपूरक आदर, असमान पण परस्परपूरक हक्क, असमान पण परस्परपूरक जबाबदारी या अर्थाने आहे ते.

बहुसंख्य प्रसंगी परस्परपूरक गोष्टी समान नसतात. असल्या तर चांगलंच आहे, पण नसल्या तरी बिघडत नाही.

आ.न.,
-गा.पै.

समोर बसून संवाद साधल्यासारखे लिहिले आहेत. आवडले हे लेखन! विचार खूप नवीन आहेत असे वाटले नाही, पण ह्या विषयावर इतकी चर्चा झाली आहे की नवीन निघणार तरी काय!

त्यामुळे मांडणीच आवडली.

पण अजून काही मुद्दे स्पर्शता आले असते असे वाटत राहिले.

अनेक महिलांच्या बाबतीत स्वतः स्त्री असूनही मुलगाच हवा असतो ही भावना समजता येण्याजोगी आहे. परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य (शिक्षण किंवा पुरेसा पैसा) नाही. स्वतः इतके भोगलेले असते की त्याच परिस्थितीत एक मुलगी जन्माला घालणे नकोच वाटते. नाकातोंडात पाणी जाते म्हणून पिल्लू पायाखाली घेणार्‍या माकडीणीची त्यांची अवस्था असते. त्यांना "तुमच मन चिमणीचे आहे" म्हणायला माझी जीभ धजवणार नाही.

फार थोड्या स्त्रिया अशा आहेत की केवळ वैयक्तिक आवड किंवा खोट्या समजुती (वंशाचा दिवा इ) पायी मुलगा हवा म्हणतात.

"तुम्हाला मुलगी झाली आहे, ही बघा किती गोड आहे"

हे वाक्य ऐकल्यावर पाच पावले मागे जाऊन मग पुढे येऊन मग ते अर्भक हातात स्वीकारणारे उच्चभ्रू लोक अजूनही आहेत.

(एका अचंबीत गायनॅकॉलॉजिस्ट स्त्रीने दिलेली ऑथेंटिक माहिती)

फार थोड्या स्त्रिया अशा आहेत की केवळ वैयक्तिक आवड किंवा खोट्या समजुती (वंशाचा दिवा इ) पायी मुलगा हवा म्हणतात. >>> खरंच ? ह्याची आकडेवारी उपलब्ध आहे का ? ( उपहासाने नाही तर खरंच असा अभ्यास झालाय का ह्या दृष्टीने विचारतेय ) कारण पुरुषप्रधान संस्कृतीत ओघाने येणारे दुय्यमत्व स्वीकारावे लागले असले तरी वाईट प्रकारे भोगणे-सोसणे ह्याला सामोरं जावं न लागलेल्या घरांमध्येही 'मुलगा हवा' ( निदान एक तरी हवाच ! ) असा पगडा अगदी सर्रास पाहिला आहे. ती खोटी समजूत नाही तर दुसरे काय असते ?

तू म्हणतेस तशाही केसेस असतात त्याबद्दल दुमत नाहीच.

Pages