सदाशिव अमरापूरकर यांच्या विषयीचे अनुभव

Submitted by कोकणस्थ on 7 November, 2014 - 03:53

नुकतेच प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापुरकर यांचे निधन झाले. ते अभिनेते असण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्वही होते. त्यांच्याविषयीचे विविध अनुभव लिहीण्याकरता हा धागा.

दु:खद घटना धाग्यावर काहींनी लिहीलेले अनुभव संपादित करुन इथे डकवत आहे.

बेफ़िकीर | 4 November, 2014 - 00:16
उमेश कोठीकरांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी त्यांना पहिल्यांदा व शेवटचे पाहण्याची संधी लाभली. कवीवर्य निफाडकर व मलाही संधी मिळाल्यामुळे मी त्यांच्यासोबत एका खोलीत बसलो होतो.
अमरापूरकर काहीही बोलत नव्हते. पण त्यांचे तेथे असणे हेच अस्वस्थ करण्यास पुरेसे होते.

दक्षिणा | 7 November, 2014 - 13:57
मी ऑफिसच्या पिकनिकला पाचगणिला गेले होते. रात्री कुठेतरी पार्टी होती तिथं जाण्या अगोदर मी रूममध्ये चेंज करायला गेले. बाकी सगळं ऑफिस ऑलरेडी खाली गेलं होतं. तर त्याच हॉटेलात अजय देवगण, अमरापूरकर आणि अमिषा पटेल यांचं चित्रिकरण सुरू होतं. मी जिन्यावरून वर जात होते की खाली आठवत नाही पण हे अमरापूर कर समोरून आले आणि मी फार गडबडीत असून अचानक त्यांना पाहिल्यावर तोंडातून घाबरल्यावर वासतो तसा मी आ वासला आणि बाप रे म्हणाले. ते जोरात हसून म्हणाले अहो मी प्रत्यक्षात इतका वाईट नाही. (माझ्या मनात त्यांची सिनेमातली इमेज आली असेल ते झटकन त्यां नी ओळखलं असेल)

त्यानंतर त्या हॉटेल मध्ये मला ते पुन्हा दिसले नाहीत. सही घ्यावी फोटो घ्यावा हे नंतर सुचून काही उपयोग झाला नाही. जो तो क्षण असतो अनुभवायचा..

----------------------------------------------------------------------

आता बाकीच्यांनी त्यांचे अनुभव प्रतिसादात लिहावेत ही विनंती.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सदाशिव अमरापुरकर नगरचे असल्यामुळ मी त्यांना बर्‍याच वेळेस पाहीलेल आहे. त्यांचे लंगोटीयार खेर सर आम्हाला ईग्रजी विषय शिकवायचे शाळेत असताना. अमरापुरकर त्यांच्या घरी बर्‍याच वेळेस यायचे. नगरला नाट्यसंमेलन आयोजित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. काहीतरी कारणामुळ ते संम्मेलनाध्यक्ष होउ शकले नव्हते अस पुसटस आठवतय.

माझ्या ओळखीची एक व्यक्ती नाट्यचित्रपट सृष्टीशी संबंधित आहे.
त्यांनी नुकताच एक अनुभव सांगितला अमरापूरकरांचा.

वास्तुपुरूष चित्रपटाचे चित्रिकरण (outdoor shooting) नगरच्या जवळपास चालू होते.
तेव्हा मोबाईल फोन जास्त नव्हते, त्यांच्या युनिटमधे फक्त ३ जणांकडे फोन होते त्यात १ अमरापूरकरांकडे होता.

या आमच्या मित्राच्या आईची तब्ब्येत बरी नसल्याने त्या दरम्यान पुण्यात एके ठिकाणी रूग्णालयात ठेवले होते.
तिकडे शुटिन्ग साठी या लोकांची जिथे रहायची सोय केलेली होती, तिथे एक लॅन्डलाईन फोन होता.
त्यामुळे रोज सकाळी निघताना एक फोन करायचा त्या रूग्णालयात चौकशीसाठी. पुन्हा दिवसभर काही कळत नसे.

अमरापूरकर यांना हे कळाले होते, ते सेटवर आले की पहिल्यांदा यांना शोधून विचारायचे कशी आहे आईची तब्ब्येत,
एवढेच नव्हे तर अनेकवेळा स्वतःचा मोबाईल फोन देऊन रूग्णालयात फोन करायला लावायचे.
त्यावेळेस त्यांनी आवर्जुन केलेल्या मदतीबद्दल आणि दाखवलेल्या सहानुभुतीबद्दल आजही ती व्यक्ती ऋणी आहे.

अतिशय सुसंस्कृत, सज्जन आणि सुस्वभावी व्यक्तिमत्व होते अमरापूरकरांचे.

साधारण ९२-९३ चा काळ. 'अष्टांग एकांकिका स्पर्धा' नावाची भरवली होती. फायनलसाठी रंगभुमीशी संबधित कलाकाराच्या शोधात होतो. अशावेळी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्यासोबत सदाशिव अमरापूरकर यांचही नाव पुढे आलं होतं.
लक्ष्मीकांत बेर्डेंच्या घरी कुणी भेटलच नाही. त्याच इमारतीत राहणार्‍या अशोक सराफांच्या घरी मोर्चा वळवला. तर निवेदिता सराफ यांनी दाराबाहेरच वाटाण्याच्या अक्षता दिल्या. त्यात त्यांचा दोष नाही म्हणा. आमच्यासारख्या सटरफटर एकांकिका कलाकारांना कशाला कोण घरात घेऊन पाणी विचारेल ? पण त्यानंतर अमरापूरकर यांच्याकडे जाण्याबाबत दडपण निर्माण झालं. बरेच तर्क वितर्क करून झाले. शेवटी "बी पॉजिटीव्ह" या मंत्राच्या आधारे त्यांच्या घरी पोहोचलो. बाहेर बर्‍याच चपला आणि शुज दिसले. वेळ चुकली हे जाणवलं, तरी मनाचा हिय्या करून बेल वाजवली. दार उघडलं गेलं. समोरचं दाराच्या दिशेने अमरापूरकर बसलेले दिसले. त्यांच्या समोर असलेली मंडळी पण आमच्याकडे पहायला लागली. साहजिकच होतं म्हणा. नस्ता अडथळा निर्माण केला होता आम्ही.
थोडं पुढे आल्यावर लक्षात आलं की त्यांच्या उजव्या हाताला (डावा ?) बँडेज होतं. रामा शेट्टीने हसत विचारलं की काय काम काढलतं. आम्ही एकांकिका स्पर्धेच्या अध्यक्षपदाबद्दल बोललो. त्यांनी बँडेजमधला हात वर केला.
"शुटींगमधे हे प्रताप झालेत. बेड रेस्ट सांगितली आहे. मला यायला आवडल असतं. पण सध्या तरी कुठे जाणे येणे नाही." समोर बसलेली मंडळी तेव्हा त्यांच्या तारखांसाठी बसली आहेत हेही कळलं. त्यांनी त्यातल्या त्यात इतर चौकशा करून चहापाणी विचारलं. पण ते आमच्याशी इतक्या आपुलकीने बोलल्यावर इतर कशाचीच गरज भासली नाही.
निघालो तेव्हा हे मनात पक्क होतं की आभाळात भरारी घेतल्यावरही जमीनीवर पाय ठेवणारी माणसं आभाळापेक्षा मोठी असतात.

पहिला पॅरा नसता लिहिला किंवा नाव न घेता लिहिला असता तरी चालल असत.
नाही आवडले. असे कम्येरिझनच साफ चुकीचे आहे. आणि अश्या अनुभवावरुन अमुक एक कलाकार कसा मनाने मोठा नाही असे मानने आणि ते चार चॉघात सांगणे नाही आवडले.

ज्यांच्याबद्दल लिहिणे अपेक्षीत आहे तेवढेच लिहा.

अभिजीत यांच्याशी सहमत, पहिल्या पॅरातील नावे टाळून तो संपादीत करणे योग्य राहील.
सदाशिव अमरापूरकर सरांचा अनुभव मात्र छान. सर्वांचेच. इतरांचेही वाचण्यास उत्सुक.

पहिला पॅरा नसता लिहिला किंवा नाव न घेता लिहिला असता तरी चालल असत>>>>

@कौतुक - त्यात असे कोणाच्याही घरी न बोलवता जायचा प्रयत्न करणे हेच मुळात चुकीचे आहे. वर त्यांनी दारातुनच बोळावण केली असे लिहीणे म्हणजे तर कृतघ्नपणाच आहे.
तुम्हाला का म्हणुन कोणी घरात घेउन पाणी द्यायचे?

कौतुक शिरोडकरांचा वैयक्तिक अनुभव म्हणून त्या प्रतिसादाकडे पहायला हवे. शेवटी माणूस स्वतःला आलेल्या अनुभवांवरूनच जगाविषयी स्वतःचे मत बनवतो.

मात्र अभिजीत नवले ह्यांचा 'ज्यांच्याबद्दल अपेक्षित आहे त्यांच्याबद्दल लिहा' हा सल्ला मात्र पटला.

कोकणस्थांनी अमरापूरकरांच्याच आठवणी संकलित करावयाचा प्रस्ताव का मांडला ह्याही प्रश्नाचे उत्तर वैयक्तिक आवडनावड हेच मिळत आहे.

उद्या आम्ही सुर्यकांत मांढरेंच्या आठवणी संकलित करायला धागा उघडला तर त्यावर बंदी येणार थोडीच!

असो!

एकदम शिरोडकरांवर का भडकता, त्यांनी एक उदाहरण दिले. फार काही मोठी टीका वगैरे केलेली नाही इतरांवर!

इतके तर्क मांडण्यापुर्वी जर वाक्य नीट वाचलीत तर आशय कळेल मित्रांनो. यात मी सरळ म्हटलं आहे की त्यांचा दोष नाहीच. माझ्याही दारात कुणी अनोळखी सटरफटर माणसं येऊन चौकशी करायला लागली तर मी त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. एखाद्याला पाणी विचारणे हा वाक्यप्रचार आहे. शब्दशः अर्थ घेण्याची गरज नाही.
दुसरं म्हणजे त्यात कसलीच तुलना केलेली नाही. त्यांच्याकडे नकार मिळाल्यामुळे दडपण आलं होतं. जे साहजिकचं होतं. कुणा सेलेब्रिटीकडे जाण्याचा तो आमचा पहिलाच प्रसंग होता. अशा परिस्थितीत जो अनुभव आला तो शेअर केला आहे. माझ्या शेवटच्या वाक्याचा निवेदिता सराफ ह्यांच्याशी काहीच संबंध नाही.

चांगला उपक्रम आहे.
दक्षिणा आणि कौतुक शिरोडकर यांच्या अनुभवावरून अमरापूरकर सर सामान्यांशी कसे आत्मीयतेने वागत होते हे लक्षात आलं. पाय खूप जमिनीवर असल्याशिवाय एका अनोळखी मुलीने बाप्रे म्हटल्यावर तिला हसून प्रतिसाद देऊन विनोदबुद्धीचे दर्शन हे खूपच भावले. इतरांचेही अनुभव छानच आहेत.

कै. सदाशिव अमरापूरकर सरांना भावपूर्ण आदरांजली.

अश्विनी भावे यांनी एक चित्रपट निर्मिती केली होती "कदाचित" या नावाचा. त्यामधे त्यांची प्रमुख भुमिका, सचिन खेडेकर पतीच्या भुमिकेत आणि वडिल होते सदाशिव अमरापूरकर.
मध्यंतरी स.अ. यांच्या निधनानंतर आलेल्या बातम्यांमधे या चित्रपटाचा उल्लेख कुठे दिसून आला नाही.
खरेतर स.अ. यांचे या चित्रपटातील काम फारच वेगळे आणि चांगले आहे.