पांढरा रस्सा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 November, 2014 - 05:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ किलो चिकन (तुकडे करून व स्वच्छ धुवून)
४ चमचे आल, लसुण पेस्ट
२ छोटे कांदे चिरून
१ चमचा तेल

सुके वाटण
२ चमचे तिळ
दिड चमचा खसखस
अर्धा चमचा जीर
अर्धा चमचा शहाजीर
१ चमचा धणे
८-१० मिरी
१०-१५ काजू

फोडणी
२ मोठे चमचे तूप
५-६ मिरी
३-४ लवंगा
३-४ तमाल पत्र
१ डालचीनी काडी मोडून

१ ओल्या नारळाचे दूध
मिठ

क्रमवार पाककृती: 

खर तर पांढरा रस्सा म्हटल की कोल्हापूर डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. कोल्हापूरी स्पेशल मेनू मध्ये गणला जाणारा हा पांढरा रस्सा आणि सोबत असणारा तांबडा रस्साही नाव काढल्याबरोबर अगदी तोपासु होत. कोल्हापूरात ह्यासाठी लागणारे मसाले खास गिरणीत दळून आणतात असे ऐकले आहे. कोल्हापूरकर ह्यावर अजून माहीती देतीलच. माझ्या वाचनात ही रेसिपी आली आणि ती करून मी करून पाहीली. फारच झ्याक (टेस्टी) लागला हो. पारंपारीक पद्धत अजून वेगळी असू शकते ती जाणून घ्यायची इच्छा आहे कोल्हापूरवासियांकडून. तर मी केलेला पांढरा रस्सा खालील प्रमाणे:

१)पहिला धुतलेल्या चिकनला आल्-लसुण पेस्ट लावून साधारण १ तास मुरवत ठेवा.
२) वरील सुक्या वाटणातील जिन्नस थोडे भाजून थंड करून त्याची मिक्सरमध्ये पूड करून घ्या.
३) एका भांड्यात तेल गरम करून त्यावर कांदा गुलाबी रंग येई पर्यंत तळून त्यावर चिकन परतवा. थोडे मिठ घाला. हे चिकन वाफेवर शिजवून घ्या. शिजताना चिकनला पाणी सुटते. जर शिजण्यासाठी आवश्यक वाटले तरच थोडेसे पाणी घाला.
४) दुसर्‍या भांड्यात तुप गरम करून त्यावर मिरी, लवंग, तमालपत्र, दालचीनीची फोडणी द्या. मिक्सरमध्ये वाटलेले सुके वाटण घाला. त्यात शिजलेले चिकन घालून नारळाचे दूध घाला. थोडेसे मिठ घालून थोडावेळ गॅसवर ठेवा. (मिठ कमी घाला कारण आधी चिकन मध्ये घातलेले आहे.)

झाला पांढरा रस्सा तयार.

आता आपल्या जेवणाच्या ताटात ह्या वाटीला मानाने बसवून जेवणाचा आस्वाद घ्या.

अधिक टिपा: 

हा रस्सा पांढरा रहावा म्हणून ह्यात मिरची वा लाल मसाला टाकात नाहीत.
खरे तर पांढरी मिरी वापरतात. पण माझ्याकडे ती नसल्याने मी काळीच वापरली.

बर्‍याच रेसिपी वाचल्या त्यात सुक्या वाटणामधल्या घटकांमध्ये तफावत होती. काहींमध्ये काजू पण वापर्लेला नव्हता.

जाणकारांनी अजून प्रकाश टाकावा.

माहितीचा स्रोत: 
वाचनात आलेली पाककृती
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेसिपी इंटरेस्टींग आहे .. Happy

पानात ती भाजी कसली आहे आणि चटणी कुठली आहे त्याचं उत्तर दिलं का जागूने?

जुन्या मायबोलीत कोणीतरी पांढर्‍या रश्शाची कृती लिहीली होती .. नीट आठवत नाही पण त्यात हे वाचलं होतं की पांढर्‍या रश्शात मिराचीच्या आत ज्या पांढर्‍या बिया आणि व्हेन्स् असतात (ज्यात सर्व हीट असते असं म्हणतात) ते घालून हा तिखटजाळ रस्सा करतात .. जागूच्या कृतीने एकदम च माइल्ड होईल असं वाटतंय .. खरंखोटं कोल्हापूरकरच जाणे ..

लालूनेही केला होता बहुतेक तिच्याकडच्या ग्रँड ऑल अमेरिका जीटीजी ला .. मी थोडासाच चाखून बघितलेला आठवतोय .. त्यात काय काय होतं ते आठवत नाही पण अगदी तिखट नव्हता हे मात्र आठवतंय ..

पानात ती भाजी कसली आहे आणि चटणी कुठली आहे त्याचं उत्तर दिलं का जागूने?>>>>>

मला वाटते पानात भाजी नसुन ते चिकन आहे, त्याच्या शेजारी कोशिंबीर, जे सफेद दिसतेयं तो आहे भात:P Proud :फिदी:.
फक्त भात आणि पांढर्‍या रश्श्याची वाटी यामध्ये जे काही आहे ते ओळखता येत नाही आहे. तरीही ते चिकन लिव्हर फ्राय असु शकते.

जागुला काही उद्योग नाहीये, शाकाहार्‍यान्च्या पण तोन्डाला पाणी सुटेल अशा रेशेप्या टाकत असते.:फिदी::दिवा:

जागु छान आहे कृती. नवर्‍याला दाखवली पाहीजे, मग त्याची तो करेल.

मस्त रेसिपी . पांढरा रस्सा अजुन कधी खाल्ला नाय, नेहमी तांबडाच खाल्लाय आमच्या घरात कोल्हापुरवालीच चटणी (घाटावरचा मसाला)असते स्वयंपाकात . हा पण बनवायला हवा रस्सा.फोटो पण मस्त.

चिकनपेक्षा मटणाची चव कधीही उजवी असते.>>>> एकदम बरोबर ,पण मटणापेक्षा चिकन मधे कोलेस्ट्रॉल कमी असतं जे हृदयाच्या तब्बेतीला चांगलं.

फक्त भात आणि पांढर्‍या रश्श्याची वाटी यामध्ये जे काही आहे. >>>> यावरचा सस्पेंन्स सांगा जागु तुम्ही. Happy

अरे मी ह्या इथे उत्तरे द्यायची राहिले होते. सॉरी.

ते ताटात भाजी नसून सुके चिकन आहे.

भात आणि पांढर्‍या रश्श्याची वाटी यामध्ये जे काही आहे ते ओळखता येत नाही आहे. तरीही ते चिकन लिव्हर फ्राय असु शकते.

ओपल बद्दल ऐकून आवर्जून तिथे जेवायला गेलो तर फार मजा नाही आली. याउलट गगनबावडया कड़े जायच्या रस्त्यावर राहुल नावाचं एक हॉटेल आहे. तिथला पांढरा रस्सा मी अक्षरशः ७-८ वाटया ओरपतो.

आहा, जिव्हाळ्याचा विषय. कोल्हापुरात प्रत्येक हॉटेलची आपापली खास चव आहे या रश्श्याची. बाकी सुक्के किंवा तांबडा रस्सा चांगल्या करणार्‍या काही हॉटेलातही पांढरा रस्सा तितका खास नसतो. महादेव प्रसाद आणि रॉयल ही मंगळवार पेठेत असलेली दोन हॉटेल्स मात्र अप्रतिम पांढरा रस्सा करतात. मटण स्टॉक-नारळाचे दूध यांचे प्रमाण, शिजवताना रस्सा न फुटू देणे वगैरे बाबी सांभाळाव्या लागतात काटेकोर.

एक (मला सोपी वाटणारी कृती अशी आहे)

पाव किलो मटण धुऊन त्याला कांदा, आलं-लसूण पेस्ट, किंचित तिखट, गरम मसाला, धणेजिरे पावडर, दही, किंचित तेल आणि कोथींबीर लावून अर्धा तास ठेवावे.
आता हे मटण त्यातील सर्व घटकांसह एक-दीड लीटर पाणी घालून चार पाच शिट्या होइस्तोवर शिजवून घ्यावे. गार करून स्टॉक गाळून घ्यावा.
खसखस आणि काजूची थोड्या पाण्याबरोबर पेस्ट करून घ्यावी.
पाव कांदा एकदम बारीक चिरून घ्यावा.

तेलावर कांदा हलका परतून त्यात काजूपेस्ट टाकावी, मिनिटभर अजिबात जळू न देता परतून त्यात स्टॉक आणि चवीनुसार मीठ - पांढरी मिरपूड टाकावी, उकळी आली की आच बारीक करून नारळाचे दूध टाकावे. थोडे नारळाचे दूध जादा असावे, रस्सा फुटला तर परत घालून नीट करता येतो.
उकळी न आणता थोडे गरम करून लगेच वेगळ्या भांड्यात केलेली तुपाची लवंग दालचीनी आणि मसाला वेलदोडे यांची फोडणी घालावी.

विस्तवावरून उतरवून आणि लवंग दालचीनी वेलदोडे काढून खायला घ्यावे.
यात शक्यतो पीसेस नसतातच पण स्टॉक काढलेल्या मटणातील थोडे प्यायला घेताना घालता येतील.
खालच्या फोटोत मी आवडते म्हणून कोथिंबीर घातलीय पण हॉटेलमध्ये देतात त्यात नसते.

pandhra rassa.jpg

Pages