पांढरा रस्सा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 November, 2014 - 05:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ किलो चिकन (तुकडे करून व स्वच्छ धुवून)
४ चमचे आल, लसुण पेस्ट
२ छोटे कांदे चिरून
१ चमचा तेल

सुके वाटण
२ चमचे तिळ
दिड चमचा खसखस
अर्धा चमचा जीर
अर्धा चमचा शहाजीर
१ चमचा धणे
८-१० मिरी
१०-१५ काजू

फोडणी
२ मोठे चमचे तूप
५-६ मिरी
३-४ लवंगा
३-४ तमाल पत्र
१ डालचीनी काडी मोडून

१ ओल्या नारळाचे दूध
मिठ

क्रमवार पाककृती: 

खर तर पांढरा रस्सा म्हटल की कोल्हापूर डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. कोल्हापूरी स्पेशल मेनू मध्ये गणला जाणारा हा पांढरा रस्सा आणि सोबत असणारा तांबडा रस्साही नाव काढल्याबरोबर अगदी तोपासु होत. कोल्हापूरात ह्यासाठी लागणारे मसाले खास गिरणीत दळून आणतात असे ऐकले आहे. कोल्हापूरकर ह्यावर अजून माहीती देतीलच. माझ्या वाचनात ही रेसिपी आली आणि ती करून मी करून पाहीली. फारच झ्याक (टेस्टी) लागला हो. पारंपारीक पद्धत अजून वेगळी असू शकते ती जाणून घ्यायची इच्छा आहे कोल्हापूरवासियांकडून. तर मी केलेला पांढरा रस्सा खालील प्रमाणे:

१)पहिला धुतलेल्या चिकनला आल्-लसुण पेस्ट लावून साधारण १ तास मुरवत ठेवा.
२) वरील सुक्या वाटणातील जिन्नस थोडे भाजून थंड करून त्याची मिक्सरमध्ये पूड करून घ्या.
३) एका भांड्यात तेल गरम करून त्यावर कांदा गुलाबी रंग येई पर्यंत तळून त्यावर चिकन परतवा. थोडे मिठ घाला. हे चिकन वाफेवर शिजवून घ्या. शिजताना चिकनला पाणी सुटते. जर शिजण्यासाठी आवश्यक वाटले तरच थोडेसे पाणी घाला.
४) दुसर्‍या भांड्यात तुप गरम करून त्यावर मिरी, लवंग, तमालपत्र, दालचीनीची फोडणी द्या. मिक्सरमध्ये वाटलेले सुके वाटण घाला. त्यात शिजलेले चिकन घालून नारळाचे दूध घाला. थोडेसे मिठ घालून थोडावेळ गॅसवर ठेवा. (मिठ कमी घाला कारण आधी चिकन मध्ये घातलेले आहे.)

झाला पांढरा रस्सा तयार.

आता आपल्या जेवणाच्या ताटात ह्या वाटीला मानाने बसवून जेवणाचा आस्वाद घ्या.

अधिक टिपा: 

हा रस्सा पांढरा रहावा म्हणून ह्यात मिरची वा लाल मसाला टाकात नाहीत.
खरे तर पांढरी मिरी वापरतात. पण माझ्याकडे ती नसल्याने मी काळीच वापरली.

बर्‍याच रेसिपी वाचल्या त्यात सुक्या वाटणामधल्या घटकांमध्ये तफावत होती. काहींमध्ये काजू पण वापर्लेला नव्हता.

जाणकारांनी अजून प्रकाश टाकावा.

माहितीचा स्रोत: 
वाचनात आलेली पाककृती
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असाच असतो कोल्हापूरात. तिथे याचा तयार मसालाही मिळतो पण ताज्या मसाल्यालाच जास्त चांगली चव येते.
प्रत्येक घरचा वेगवेगळा असतो. काजू असतातच असे नाही. चारोळी पण वापरतात. कोल्हापुरी म्हणून एक खास नाकेश्वर ( नागकेशर नाही )
नावाचा मसाला असतो. लवंगेसारखाच दिसतो पण चवीला वेगळा असतो. तो पण वापरतात.

( शाकाहारी पांढरा रस्सा पण असतो Happy )

छान आहे रेसिपी. पण चिकन ऐवजी काय बरं घालता येईल यात? Proud

रच्याकने, रेस्टॉरंटमध्ये पांढरा रस्सा, तांबडा रस्सा असे नुसते रस्सेच देतात. आतला ऐवज नसतोच.

जागू, ताटात आणखी काय काय पदार्थ आहेत ते पण सांग की गं.

मामे, सिरियसली विचारते आहेस ना ? ( नाहीतर शाकाहारी मंडळींचा निषेध मोर्चा आणू तूझ्या घरी Happy )
वांगे, बटाटे, सुरण... असे काहिही चालते. वरीलिया रंगालाच लोक भुलतात. हाटिलात चिकन शिजवलेल्या पाण्याचेच हे रस्से बनतात ! ऐवज कशाला लागतोय ?

एरवीही त्या भागात रस्साच भाकरीबरोबर आवडीने खातात.

मामे, सिरियसली विचारते आहेस ना ? >>> दिनेशदा, चिकन ऐवजी काय हा प्रश्न दरवेळी कोणीतरी विचारतंच. म्हणून विचारून टाकला. आणि आमच्या घरी शाकाहारींचा मोर्चा आणून काय फायदा नाय. आम्हीही मोर्चात सामिल होऊ इतकंच. Proud

वरील सुक्या वाटणातील जिन्नस थोडे भाजून थंड करून त्याची मिक्सरमध्ये पूड करून घ्या.>>> ही पूड कधी वापरायची जागूताई?

Dhiraj, jaee, Kiran, Srushti, Teena Thanks.

Dineshda hotelcya babtit barobar boltay.

Mame shakahari kadhi jhalis????????????????

Aashita thanks lakshat aanun dilyabaddal.

मी नॉनव्हेज खात नाही.
पण घरी एका कार्यक्रमानिमित्त मोठ्या प्रमाणावर खाटखुट जेवण होत.
आचारी स्वंयपाक बनवताना मी डिट्टेल सर्व काही बघायला टेरेस वरच सोबत थांबलेलो.
पण काही लिहिले नाही आणि आता माझ्या तितकेसे नीट लक्षात नाही राहिलं.

पण मगज बी, काजु, पांढरे तीळ ह्यांची पेस्ट वापरलेली.
मटणचा स्टॉ़क त्यात वापरलेला. (मटण शिजवताना निघालेल पाणी)
त्यात अगदी नावाला १०-१२ पिस टाकलेले चव मुरण्यासाठी.

जागुताई माझ्यासारख्या शाकाहार्‍याच्या तोन्डाला पाणी सुटेल अशा पद्धतीने रेसिपी टाकते आणि फोटो देखील. Happy

चिकन ऐवजी मटण बस्स्स्स्स और कुछ नही. इकडे चिकनचा पांढरा रस्सा कधी आढळला नाही. Happy
पण इकडचा मटणाचा असतो अगदी तोंपासु Wink . मटण शिजल्यावर त्यातले पाणी काढुन पांढरा करतात त्या पाण्याची युनिक टेस्ट तांबड्या आणि पांढर्‍याला येते. Happy

कोल्हापुरात ओपलमधे दुधीचा रस बेस असलेला पांढरा रस्सा मिळतो. अस्सल प्यायला नसेल तर आवडू शकतो.
(हो मी एरवी शाकाहारी असले तरी मटण वा चिकन ब्रॉथमधला बिना पिसेसचा पांढरा रस्सा ओरपते)

नीधप मी घरी दूधीचा सुपही करते तोही ह्या चविच्या साधारण जवळच असतो.
सामी, निवांत पाटील धन्स.

झकासराव मगज बी पण एका रेसिपीत वाचली होती. पण मगज बी म्हणजे काय? कांद्याचे बी म्हणजे कलौंजी का? की वेगळे काही?

मस्त दिसतोय पांढरा रस्सा.
पांढर्‍या रश्श्याचं रेडी टू कूक पाकिट मला लालूने दिलं होतं. कोल्हापूरचंच प्रॉडक्ट आहे ते. ब्रँड विसरले. चिकनऐवजी मसूर घालून रस्स कर प्रेमळ सूचना मिळाली होती भेटीबरोबर Wink खूप मस्त झाली होती मसुराची उसळ. तेच पाकिट मी मेथी मटर मलई करण्यासाठीही वापरलं. तीही भाजी खूप मस्त झाली होती.

मगज बी म्हणजे माझ्या माहितीनुसार तरी लाल भोपळ्याच्या बिया. त्याची सालं काढुन आतल्या गर.
गुगल वर इम्जेस मध्ये तेच दाखवतय. ह्याच्या पावडरची रेडीमेड पॅकेट्स मिळत असतील.
पण मला ह्या माहितीची १०० टक्के खात्री नाहिये.

https://www.google.co.in/search?q=magaj&biw=1549&bih=333&tbm=isch&imgil=...

नीने लिहिलंय तेच लिहायला आलो होतो. ओपल मधे तांबडा-पांढरा मिळतोच. तिथे मिळणारा 'शाकाहारी' पांढरा 'कोहाळ्याचा' अस्तो असं तिथलाच वेटर म्हणाला होता.

काकडी, खरबूज वगैरेंच्या सोललेल्या बियांनाही मगजच म्हणतात. या बिया पौष्टीक असतात. एरवीही भोपळ्याच्या बिया खाणे आरोग्यासाठी चांगले असते.
नायजेरियात आणि अंगोलातही भोपळ्याच्या सोललेल्या बिया बाजारात मिळतात ( हा भोपळा थोडा वेगळा असतो. त्याला ५ धारा असतात. गर फारसा नसतो, बियाच जास्त असतात. ) त्या बिया व सुके मासे वाटून गेव्हीसाठी वापरतात. आहारदृष्ट्या हे फार आरोग्यदायी वाटण आहे.

ओपल मधे आता सुधारणा झाली असेल, पुर्वी तिथला ( शाकाहारी ) रस्सा अत्यंत पाणचट लागायचा. वाटणाची काही चवच लागायची नाही.

अश्विनी धन्स.
मंजूडी मलई मटर ची आयडीया चांगली आहे.

भ्रमर धन्स.
झकासराव, दिनेशदा आत्ता कळल मगज म्हणजे काय? मला वाटत कलिंगड्याच्याही सोललेल्या बिया मिळतात.

घरच्या घरी काकडीच्या / खरबूज ( कलिंगड नव्हे ) सोलता येतात. अनेक गुजराथी महिला तो उद्योग करत असतात.
मुंबईला कुठल्याही मोठ्या दुकानात सहज मिळेल. पण त्यापेक्षा काजूची पेस्ट वापरणे सोयीचे होते.

पांढरा रस्सा माझ्या आणि ऐशुच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. मागे सरसमधुन पांध-या रस्श्याचा मसाला घेतलेला पण अजुन वापरला नाही. रविवारी करुन पाहतेच. Happy

जबरी फोटो, तोंपासु........

पण, चिकनपेक्षा मटणाचा रस्साच बेस्ट, हेमावैम.

चिकनपेक्षा मटणाची चव कधीही उजवी असते, सोलापुरी भाजलेलं मटण व तोंडी लावायला हा पांढरा रस्सा व जमलेच तर फ्राय कोलंबी (आता होऊ दे वेगळा विदर्भ, टेंशन नॉट )

तेवढा कोकण ठेवा हा म्हारास्ट्रात! आपल्याला मच्छी लै आवडते!! ख्याख्याख्या Proud

पांढरा रस्सा सही दिसतोय.
व्हेज स्टॉक आणि चार बटाटे घालून ओरपावासा वाटला. Proud

Pages