माननीय श्री शरदराव पवारसाहेब यांस

Submitted by बेफ़िकीर on 19 October, 2014 - 14:03

माननीय श्री शरदराव पवारसाहेब यांस,

आदरपूर्वक नमस्कार!

आम्ही यंदाच्या राजकीय मोसमात पाच पत्रे लिहिण्याचे काम हाती घेतले आहे. पहिले पत्र आपल्याला लिहीत आहोत.

पत्र हे 'वन वे कम्युनिकेशन' असते. म्हणजे आमचे पत्र वाचत असताना तुम्ही प्रतिवाद करू शकणार नाही. हा मार्ग आम्हाला सर्वाधिक सोयीचा वाटला.

साहेब, आपला उल्लेख जेव्हा 'शरद पवार' असा एकेरी व्हायचा त्या युगात आमचे वय 'जोरात लागली की दिसेल त्या जागी मुतण्याचे' होते. तेव्हा पुण्यात धरणेही दोनच होती. तेव्हा आम्ही जे खेळ खेळत असू त्यात मुलांची एकमेकांशी खूप भांडणे होत. मग अबोले होत. सहा सहा महिने 'मी त्याच्याशी बोलत नाही' असे सांगून मिरवण्यात जात असत. 'तत्व ते तत्व' ह्या घोषणेबरहुकूम आम्ही मन फत्तर करून ग्राऊंडमध्ये वावरत असू. पुढे कधीतरी चालू मित्राशीही भांडण झाले की पुन्हा जुन्या मित्राशी बोलणे सुरू होत असे. त्यावेळी आम्हाला 'आता कसा आलास बोलायला' असे कोणी विचारत नसे. आम्हीही कोणाला असे विचारत नसू. गरज ही समीकरणांची जननी आहे हा विचार आमच्यात भिनलेला होता. समीकरणांची गरज आम्हाला आत्मोन्नतींसाठी पडत असे. फक्त आत्मोन्नतीच्या आमच्या आणि तुमच्या व्याख्यांमध्ये तफावत असायची. आमचे एक असो!

तर साहेब, त्या काळी चार थोर वयाची माणसे चकाट्या पिटायला एकत्र आली की कोणीतरी राष्ट्रपतीच्या आवेषात उद्गारायचा.

"पवारनी पुलोद काढलंय! सत्ता हवी म्हणून सांगा सरळ म्हणाव!"

मग तुमच्या पुलोद काढण्यावर जंगी चर्चा केली जायची. सरतेशेवटी आम्हाला इतकेच समजायचे की तुम्ही कोणत्यातरी मोठ्या पक्षातून फुटून बाहेर पडलात आणि त्यामार्गाने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केलात. फार राग यायचा तुमचा! असे वाटायचे की असेच असतात की काय राजकारणी?

आणीबाणीत धरपकड सुरू झाली आणि संघिष्ट लोक सैरावैरा पळालेले आम्ही पाहिले. ज्यांच्या घराच्या भिंतींवर गुरुजी विलसत असायचे तेथे एका रात्रीत बापूजी येऊन बसले. बाईंनी अख्खा देश तालावर नाचवला आणि मग बहुधा तुम्हालाही जाणवले की जुने समीकरण आवश्यक झालेले आहे.

तुमचे ते जुने समीकरण पुन्हा नूतनीकरण होऊन नेमके केव्हा व कसे अस्तित्वात आले हे आम्हाला स्मरत नाही कारण बहुधा तेव्हा आम्ही दहावीच्या जवळपास पोचलेलो असू!

पण साहेब, तिकडे तुमचा दबदबा दिल्लीचे राजकारण हादरवू लागला. यशवंतरावांनंतर बहुधा इतक्या धडाडीचा पहिलाच मराठी नेता दिल्लीत पोचला असावा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद लीलया सांभाळून राष्ट्रीय राजकारणात झेप घेऊन तेथेही दिग्गज बनणे म्हणजे सामान्य काम नव्हे! तेही पुलोदचा इतिहास पाठीशी घेऊन!

एकीकडे गांधी घराण्यातील एकसे एक व्यक्तीमत्त्वे दुर्दैवी प्रकारे हरपत चालली होती आणि दुसरीकडे तुम्ही पी एम पदाकडे झेपावू लागला होतात.

तुम्हाला पराभव ठाऊक नव्हता. बारामती हे तुमच्यामुळे भारताच्या राजकारणावर सर्वज्ञात झालेले उपनगर! खैरनारांचे ट्रक कधी आलेच नाहीत. भूखंड आणि श्रीखंड ह्यावर अनंत चारोळ्या रचल्या गेल्या.

एकदा आम्ही असेच विनावाहक विनाथांबा एस टी मधून बारामतीला निघालो. इसवीसन २००१ ची बात असावी. शेजारी एक अतिशय म्हातारा माणूस बसला होता. अशीच आपली काहीबाही चर्चा सुरू झाली तर म्हणाला कसा? पुण्यात एक तरुण म्हणे होस्टेलवर चार मुलांसोबत राहायचा आणि शिकायचा. चार आण्याची मिसळ खायला त्या मुलाकडे पैसे नसायचे. आता त्याच्या हजार पिढ्या बसून खातील. आणि मग तुमचे नांव घेतले त्या म्हातार्‍याने! तो जन्मापासून म्हणे बारामतीतच होता.

खरे सांगू का साहेब? असली फुटकळ, बिनबुडाची विधाने आणि माहिती ऐकून आम्हाला काहीच वाटायचे नाही. राजकारणी नेते ही अशी व्यक्तीमत्वे असतात ज्यांच्याबद्दल कोणीही जीभ उचलून टाळ्याला लावू शकतो अशी आपल्याकडे परिस्थिती आहे. त्या म्हातार्‍याकडे दुर्लक्ष करून आम्ही पुढचा प्रवास केला.

तुम्ही आणलेल्या ग्रीव्ह्जची वाहने सिक्स सीटर म्हणून कायदेशीररीत्या वापरण्यास सुरुवात झाल्यानंतर अचानक प्रदुषणाच्या नावाखाली कोणा नतद्रष्ट सरकारी संस्थेने त्यांचे परवाने रद्द केले तेव्हा एका रिक्षेवाल्याने त्याची सहा आसनी रिक्षा संगम पूलावरून फेकून दिली व रस्त्यावर रडत बसला. पेपरात फोटोसकट बातमी आली होती. पण ग्रीव्ह्जमुळे बारामतीचा नक्शाच बदलला. आता तर काय तुमच्या बालेकिल्ल्यात पाय टाकायचा तर टोल भरावा लागतो, त्यातून सहीसलामत बाहेर पडायचे तर टोल भरावा लागतो. छप्पन रिक्षेवाले बेकार झाले तरी बेहत्तर, पण कंपनी चालली पाहिजे.

दादा आणि ताईंचा राजकारणात झालेला उदय म्हणजे काही घराणेशाही नाही म्हणता येणार! तुमचे सर्वाधिक मार्गदर्शन त्यांनाच मिळालेले असणार! मग त्यांच्याइतके सुयोग्य दुसरे कोण असणार?

एकदा बारामतीच्या एका शेतात एक मजूर म्हातारा उघडाबंब उकिडवा बसून बिडी फुंकत असताना त्याला विचारले की काय, पाऊसपाणी आणि पवारसाहेब काय म्हणतायत?

तर म्हणतो कसा? पाऊस यायचा तेव्हा येईल. पण पवारांचं नांव काढू नका! ते ९६ कुळी आहेत, आम्ही साडे शहाण्णव आहोत. इतका मुरलेला जातीयवाद असलेल्या ठिकाणी इतके घट्ट बस्तान बसवणे म्हणजे गंमत नाही.

माळेगावपासून रस्त्याच्या दुतर्फा लागणार्‍या रग्गड शैक्षणिक संस्था तुमचे शिक्षणक्षेत्राबाबतचे औदार्य प्रकट करतात.

पण आम्हाला सर्वात जास्त आदर वाटतो तो आपला नेता देशाचा संरक्षण आणि कृषी मंत्री झाल्याचा! अहो काय पद का काय ते? सगळी सेना ज्याच्या सहीच्या प्रतीक्षेत असते तो देशाचा सेनापती केवढा मोठा असेल?

'हम देखते है बारिश कैसे नही आती' असा शाब्दिक धीर भाषणांमधून देणार्‍या राजीवजींची आपण सोबत केलीत. त्यांच्या चिरंजिवांनी 'उमदे व्यक्तिमत्व' हा एक घटक सोडून दुसरे त्यांच्याकडून काय उचलले असेल तर हे असे तर्कसुसंगत, व्यवस्थित बोलणे! पूर्वी तानसेन दीपराग गाऊ लागला की दिवे लागत असत म्हणे! हे दोघे बोलले की पाऊस पडत असावा काही ठिकाणी!

मात्र साहेब, पंतप्रधानपद एक राहूदेत, पण उपपंतप्रधानपदीतरी नेमणूक होणार असे आम्हाला फार वाटत होते. पण दिल्लीचे सगळे निराळेच! त्यातच अधेमधे रथयात्रा, राममंदिर, गोध्रा, व्ही पी सिंग, वाजपेयी, अडवानी असल्या सूक्ष्म लहरी येऊन जात असत. माणसाने सहन तरी किती करायचे?

शेवटी तुमचा संयम सुटला.

सोनिया गांधींचे इटालीत्व काही तुमच्यातील सच्च्या भारतीयाला मंजूर होऊ शकले नाही. आता कोणी उगाच म्हणेल की पुलोदचीच पुनरावृत्ती झाली. पण ह्यावेळचा मुद्दाच निराळा होता. एकशे वीस कोटींच्या देशाचे नेतृत्व एका युरोपिअन बाईच्या हातात? का तर फक्त ती त्या घराण्याची स्नुषा आहे म्हणून? असह्य झाले हे तुम्हाला!

आणि तुमच्यातील धडाडीचा नेता, कुशल संघटक, आजवर भेटलेल्या प्रत्येक माणसाला नावानिशी ओळखणारा महान राजा, सर्व पक्षांना प्रिय असलेला म्होरक्या संतापला.

ही दुसरी वेळ होती फुटण्याची! पण तत्व ते तत्व! तुम्हाला प्रखर राष्ट्रवाद अभिप्रेत होता. जाज्वल्य परंपरा लाभलेली ही भारतभूमी कोणा फिरंग्याच्या हातात सोपवायची तुमची तयारीच नव्हती. तारीक अन्वर आणि संगमांना तुमचे विचार पटले आणि तुम्ही तिघे फुटलात. नवीन निर्माण झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्ही सर्वेसर्वा बनलात. सोनिया गांधी आणि तुम्ही हे जणू विरुद्धार्थी शब्द भासू लागले.

महाराष्ट्रापासून सुरुवात करून हा राष्ट्रवाद भारतभर पसरवण्याच्या तुमच्या दिग्विजयी योजनांना दैवी शुभ संकेत मिळाले. निव्वळ आणि निव्वळ तुमच्यासाठी आयुष्य पणाला लावलेल्या लाखो अनुयायांनी हा नवा पक्ष उचलून धरला. काहीतरी वेगळे घडत होते. आजवर फक्त काँग्रेस आणि भाजप (व शिवसेना) असे दोनच प्रमुख पर्याय होते, पण राष्ट्रवादीच्या रुपाने काँग्रेसमध्ये नाराज असलेले पण वृत्ती काँग्रेसचीच असलेले अगणित कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते झाले.

जुनी खोडे म्हणू लागली. पवार म्हणजे असेच करणार! पण तुमच्या सूर्यासारख्या तेजात आता काँग्रेस भाजून निघत होती. महाराष्ट्र अचंबीत झाला होता.

आणि निवडणूका झाल्या. निकाल लागले. आणि 'जातीयवादी' शक्तींना सत्तेपासून दूर ठेवणे वगैरे प्रकारच्या समान धोरणांवर तुम्ही सोनिया गांधींच्या काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी केलीत. नुसता बाहेरून पाठिंबा नव्हे तर सत्तेत सहभाग!

साहेब, एवढे होईस्तोवर थोडेफार राजकारण आम्हालाही समजू लागले होते हो! खरे सांगतो, लाज वाटली लाज! तुमच्या त्या निर्णयाची लाज वाटली.

तुमचे फुटणे काय, नवा पक्ष काढणे काय, पुन्हा जुळणे काय, कोठूनही सत्तेत असणे काय! सारेच न्यारे!

मध्यंतरी एका माथेफिरूने तुमच्यावर हाताने वार केल्याचा व्हिडिओ सगळीकडे फिरला तेव्हा आमचे रक्त उसळले होते. असे वाटले होते की सुरक्षा व्यवस्था नीट नसल्याबद्दल सरकारने तुमची माफी मागावी.

पण साहेब, जनतेला फसवून आपल्यावर विश्वास ठेवणार्‍या जनतेची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागायची वेळ आली तर तुम्हाला दुसरे कामच उरणार नाही हो?

तुमच्या आर आर पाटील साहेबांनी डान्स बार बंद करून सुसंस्कृत महाराष्ट्राची घोषणा अंमलात आणण्याचा नारळ फोडला. फार परखड व्यक्तिमत्व आहे बरे ते? जे आहे ते बोलणार! पोलिसांना पगार कमी आहे म्हणून पोलिस पैसे खातात हे त्यांच्यामुळे आम्हाला कळले. आम्हाला वाटायचे की पोलिस पैसे खातात हे अजून राष्ट्रवादी काँग्रेसला समजलेलेच नसेल. तर ह्या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी परवा एक धोरणी सल्ला दिला कोणालातरी! काय बलात्कार वगैरे करायचे ते निवडणूकीनंतर करा म्हणाले. उगाच विरोधी मतदान व्हायला नको! हे बोलल्यानंतर त्यांनी जनतेची उगाचच माफीबिफीही मागीतली. आम्ही कुठे काय म्हणालो होतो त्यांना? पण साहेब, एक सांगू का? महाराष्ट्राच्या मायबहिणींची आबा पाटलांच्या वतीने तुम्ही समक्ष माफी मागायला हवी होतीत. नाही काय आहे, सगळ्यांच्याच घरी लेकी सुना असतात. आपली माणसे बाहेर जगासमोर असे बोलतात हे आपल्याच लेकीसुनांना कळल्यानंतर त्यांच्यासमोर आपली मान खाली जाईल ना? निदान नैतिक जबाबदारी म्हणून तरी? पण नाही! तुम्ही म्हणालात की आबा पाटील ह्यांच्या त्या विधानाबद्दल त्यांनी माफी मागीतलेली आहे, तेव्हा हा वाद आता संपवा! छत्रपतींच्या प्रशासनात असे बोलणार्‍या गृहमंत्र्याचे काय झाले असते नाही साहेब? पण आपल्याला कशाला नाही त्या काळज्या? छत्रपतींचे नांव मते मागण्यापुरते घेतले की झाले, नाही का?

परकीय नेतृत्वाच्या हाती देश दिला जाऊ नये म्हणून बाहेर पडणारे तुम्ही पंधरा वर्षे त्या नेतृत्वाशी हातमिळवणी करून महाराष्ट्रात सत्तेत सहभागी राहिलात. तुमचे अन्य साथीदार एक तर निष्प्रभ तरी झाले किंवा सोनियांना तरी मिळाले. कुठे ऐकू येते हल्ली संगमा आणि अन्वरांचे नांव विशेष? तर ह्या पंधरा वर्षांत तुम्ही काँग्रेसच्या प्रशासनावर नेहमीच भडकलेले असायचात. पण भाजपमुक्त महाराष्ट्र ह्या धोरणाने टिकून राहिलात.

मध्यंतरी दादांनी 'सुप्रियाताईला निवडून दिले नाही तर पाणी बंद करेन' असा हळूवार सल्ला दिला काही नागरिकांना! त्यावर तुमचे स्टेटमेंट नाही. त्याआधी दादा म्हणाले की पाऊस पडत नसेल तर काय आम्ही धरणांत मुतू की काय? त्यावर तुमचे स्टेटमेंट नाही. माफी तर लांबचीच गोष्ट!

हे सगळे करत असताना प्रकृतीची हेळसांड झाली आणि शस्त्रक्रियाही झाली. तुमचा सक्रीय राजकारणापेक्षा मार्गदर्शकाची भूमिका घेण्यावर भर सुरू झाला. प्रेरनास्थान बनलात तुम्ही! तुम्ही इतके ज्येष्ठ व वरिष्ठ होऊन बसलात की दिग्गज, ज्येष्ठ, राष्ट्रीत नेते अश्या उपाध्या तुमच्यासमोर फिक्या पडू लागल्या. आता राजकारणातील तुमचे स्थान वाजपेयींसारखे झाले. ऋषीतूल्य!

अगदी आत्ताआत्तापर्यंत तुमही आणि काँग्रेसची युती होती. भाजप आणि सेनेची युती तुटल्यावर तासाभरात तुमचीही युती तुटली. राज्यातील अवघी जनता अवाक झाली. आपण स्वबळावर निवडून येणार नाही हे ह्या निवडणूकीत उतरलेल्या भाजप सोडून प्रत्येक पक्षाला नीट माहीत होते. तुम्हाला तर वर्षभर पुढचे राजकारण आत्ताच समजते इतके तुम्ही मुरलेले नेते आहात.

वजाबाकीचे राजकारण करू नका, बेरजेचे करा असा सल्ला कधीकाळी देणारे ज्येष्ठ नेते शरद पवार हे आता राजकारणाचे पितामह भीष्म झालेले आहेत. कृषीक्षेत्रावर त्यांचे अनंत उपकार आहेत. त्यांचे संघटन कौशल्य, दुसरी फळी उभी करणे, सर्वांना बरोबर घेऊन चलणे ह्या तमाम वैशिष्ट्यांबरोबरच आजवर ते ओळखले गेले आहेत आणखीन एका अत्यंत महत्वाच्या बाबीसाठी!

ती बाब म्हणजे, राजकारणात ऐनवेळी धूर्त खेळी खेळणे! ऐनवेळी!

ह्यात तुमचा हात कोणी धरूच शकत नाही साहेब!

आजही तुम्ही एक धूर्त खेळी खेळलात.

कोणीही विचारले नसताना भाजपाला केवळ स्थिर सरकार यावे ह्यासाठी बाहेरून पाठिंबा देणार असा बार दिलात उडवून!

ह्यातून काय काय साधले ते आता अनुभवाने आम्हालाही समजते बरे साहेब?

भाजपला शिवसेनेशिवायही पर्याय आहे अशी परिस्थिती निर्माण केल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी होणे!

भाजप आणि शिवसेनेमध्ये घासाघीस होईलच अशी परिस्थिती निर्माण करणे!

काँग्रेसपासून प्रदीर्घ कालावधीसाठी काडीमोड घेतल्याचे जाहीर न करूनही तो घेणे!

काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणे!

शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा एक अटेंप्ट करून बघणे!

आपली गुपीते भाजपने बाहेर काढू नयेत ह्याची तजवीज करणे!

गोंधळ उडवून देणे किंवा संभ्रम निर्माण होईल अशी परिस्थिती बनवणे!

येनकेनप्रकारेण सत्तेच्या जवळपास राहणे!

वर्षभराने नवीन राजकारण करून नवीन समीकरण जुळवण्याचा वाव निर्माण करून ठेवणे!

बरं! हे सगळे करताना तुम्ही काँग्रेस सोडून वाईटपना कोणाचाच घेतला नाहीत. सेना तुम्हाला काहीच म्हणू शकत नाही. भाजपला तर काय सपोर्ट हवाच आहे. येऊन जाऊन बिचारी जनता आगपाखड करेल ती करूदेत! पाच वर्षांनी तेव्हाचे तेव्हा पाहू!

पण साहेब, एक शेवटचे सांगू का?

हे सगळे पाहिले ना? की असे वाटते की तुमच्या विचारसरणीला, कारकीर्दीला, पक्षनिर्मीती किंवा पक्षबांधणीला, राजकारणाला कधीच कोणतेही तात्विक अधिष्ठान नव्हतेच!

एक शेवटचे सांगू का? लाज वाटते साहेब, की तुमच्यासारखे नेते महाराष्ट्रात झाले, त्यामुळे कोठे अभिमानाने काही सांगण्यासारखेच नसते आम्हा गरीबांकडे!

=====================================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याची जरुरी नाही. वद्रा स्वत:ची दुकानं स्वत:च बंद करणार आहेत
<<
हे म्हणजे कसाब स्वतःच आत्महत्या करणार आहे, अशा प्रकारचं भाबडं स्टेटमेंट आहे. त्याचं दुकान आहे, त्याला हवं ते तो करतोय. दुकानात चोरीचा माल विकला जातोय तर कायद्याने कारवाई करायला नको??

गामा, तुम्हारेमे वो पैलेवाली बात नै रही भौ.

शरद पवार हे एक चाणक्ष राजकारणी आहेत, त्यांना महाराष्ट्राच्या प्रत्येक गावाचे राजकारण तळहाताच्या रेषाप्रामाणे माहित आहे, एखाद्या कसलेल्या बुद्धीबळपटू प्रमाणे ते आपल्या चाली चालतात ई सर्व मिथ्स चे पोकळपण लोकसभा आणी विधानसभा निवडणूकांनी अधोरेखित केले आहे. आतापर्यंत एकदाही त्यांनी आपल्या जोरावर महाराष्ट्रात बहुमत मिळवलेले नाही. त्यांनी आपल्या पक्षाचे कॉंग्रेस मध्ये विलिनिकरण करावे. नाहीतरी ज्या मुद्द्यावर हा पक्ष बाहेर पडला तो आल गैरलागू झाला आहेच. कादचित त्यांचे राजकारण चावीची घड्याळे, टाईपरयटर्स, पॉयशाचे पंप, ई प्रमाणे कालबाह्य झाले असावे.

लोकसभेत त्यांच्या पक्षाला चार जागा (काँग्रेसपेक्षा दोन जास्त) मिळाल्या असल्या तरी त्यातल्या दोनच खर्‍या अर्थाने रा कॉ च्या आहेत. पण तरीही आम्हाला चार जागा मिळाल्या या दर्पोक्तीने त्यांनी आघाडी तोडली.

संघवाल्यांना चड्डीवाले म्हणणे शाळकरी पोरांना शोभून दिसते पण एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाला नव्हे. त्यातही जेव्हा देशातल्या अनेक राज्याचे मुख्यमंत्री आणी पंप्र पदाचे प्रबळ दावेदार संघवाले असताना. तरीही लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर त्यांनी उगिचच हा शब्द वापरला. ठाण्याचे त्यांचे उमेदवार पूर्वाश्रमीचे संघवाले होते. त्यांना व्यक्तीगत आदरापोटी मत द्यायला किमान काही संघवाले तयर होते. तेही गेले.

विधानसभा निवडणूकीत काही मतदारसंघात त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी आपला उमेदवार पाडला. पुण्यासरख्या बालेकिल्यातही पडझद झाली. त्यावरून त्यांच्या शब्दाला त्यांच्याच पक्षात वजन नाही हे सिद्ध झाले. निकाल लागताच न मागताच भाजपाला पाठिंबा दिला. "लग्नाला येऊ नको म्हणलं तर कोणत्या बसमध्ये बसू' हा एका कॉंगी नेत्याने वापरलेला वाक्प्रचार चपखल होता.त्या पाठिंब्याचा भाजपाला फायदा झाला. विधानसभा निवडणूकीच्या आधी अनेक लोक भाजपात गेले. आताही काही लोक बॅगा भरून तयार आहेत. आपल्या पक्षाचे reason de atre काय आहे याचा त्यंनी विचार करावा.

शपथ ग्रहण समारंभात पहिल्या रांगेत जागा न दिल्याने नाराज झालेल्या व राष्ट्रपती भवनातून आलेल्या स्पष्टीकरणानंतर येथेच्छ मानहानी झेललेल्या जाणत्या राजांनी आता या गोष्टीवर पडदा टाकावा अशी विनंती प्रसारमाध्यमांकडे केली आहे.

शरद पवारांना लोक काहीही म्हणत असले तरी मजूरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड सारखी योजना त्यांनीच राबवली. लाखो हेक्टर फळबागा उभ्या राहिल्या. ते केंद्रीय कृषिमंत्री असताना राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या अनेक योजना महाराष्ट्रात आणल्या ज्या कधीच इकडे नव्हत्या. त्यांना भ्रष्ट म्हणताना भाजपचे स्वर्गवासी नेत्यांनी केलेला भ्रष्टाचार डोळेझाक करता येणार नाही. भाजपला कॉंग्रेस भ्रष्ट असल्याने यश आले नाही तर जाणूनबुजून मुसलमान आतंकवादी, पाकिस्तान यांची भिती दाखवून प्रपोगंडा केला. हिंदुत्व मुद्दा करून राममंदिर बाजूला केले. राज ठाकरे, शिवसेना यांच्या खळखट्याक, व राडा संस्कृतीला घाबरून त्यांच्या विरोधात आपण लिहीणार नाही किंवा समाजाची बाजू घ्याल. देशाला उजव्या विचारसरणीकडे नेण्यात भाजप यशस्वी झाली आहे. बघुया ते देशाला कुठे नेतात.

अवांतर-
/ मेषेचा रवि बुध प्रथमात
पण
पण
कन्येचा शनि षष्ठात. इथेच घोळ झाला. दुय्यम फळी तयार होत नाही.

>>> संघ आवडू लागला का साहेब? >>>

भाजपत प्रवेश करण्याची पूर्वतयारी सुरू झाली आहे. स्वत:ला केंद्रात मंत्रीपद (कृषी मंत्री) किंवा एखाद्या राज्याचे राज्यपालपद, सुप्रियाला केंद्रात मंत्रीपद, रोहीत व पार्थला आमदारकी आणि अजित पवारला उपमुख्यमंत्रीपद यावर तडजोड होईल. शिवसेनेला नेहमीप्रमाणेच ठेंगा मिळणार.

भाजपत प्रवेश करण्याची पूर्वतयारी सुरू झाली आहे. स्वत:ला केंद्रात मंत्रीपद (कृषी मंत्री) किंवा एखाद्या राज्याचे राज्यपालपद, सुप्रियाला केंद्रात मंत्रीपद, रोहीत व पार्थला आमदारकी आणि अजित पवारला उपमुख्यमंत्रीपद यावर तडजोड होईल. शिवसेनेला नेहमीप्रमाणेच ठेंगा मिळणार.>> >

भाजपाने त्यांना एवढे मोठे पंचपक्वान्नी ताट वाढण्यासारखे भाजपाला काय मिळणारे त्यांच्याकडून? भाजपाही उगवत्या सूर्याला नमस्कार करणार, मावळत्या नाही.

>>> भाजपाने त्यांना एवढे मोठे पंचपक्वान्नी ताट वाढण्यासारखे भाजपाला काय मिळणारे त्यांच्याकडून? भाजपाही उगवत्या सूर्याला नमस्कार करणार, मावळत्या नाही. >>>

शिवसेना आपल्या स्वभावाला अनुसरून आयत्यावेळी दगाफटका करेल हे गृहीत धरून भाजप पर्याय तयार ठेवत आहे. दुसरा पर्याय तयार असेल तर शिवसेनेला हवे तसे वाकवता येईल.

>>भाजपाही उगवत्या सूर्याला नमस्कार करणार, मावळत्या नाही.<<

मलाहि सुरुवातीला हेच वाटलं होतं, पण एलजी यांच्या मतांत तथ्य आहे. लोकसभा नाहि परंतु विधानसभेच्या निवडणुकांमधे नक्किच फरक पडेल. शिवाय बोगो ऑफर नुसार मनसेचा हि प्रश्न निकालात निघेल... Happy

बोगो ऑफर - Buy One Get One free. असे असावे.

अमित शहांनी स्वत: मातोश्री वर जाऊन सेनेसोबर लोकसभा निवडणूकी आधी करार केला आहे. त्यामुळे सेना- भाजपात बनाव नसणार आहे. ५०-५० असे वाटप असेल आणि ते राज्यातल्या भाजप नेत्यांना आवडणारे नसले तरी शहा यांचा शव्द आहे. एक अगदी छोटा हिस्सा रि पच्या आठवलेंचा आहेच. अर्थात संख्येच्या गणिता नुसार विधानसभेत फायदा सेनेलाच होणार आहे....

>>बोगो ऑफर - Buy One Get One free. असे असावे.<<
हो बरोबर.

नाहि म्हटलं तरी, सेना हि भाजपाचं नको त्या जागेवरचं दुखणं आहे. सहन होत नाहि, आणि सांगताहि येत नाहि. विधानसभेच्या निवडणुकांमधे सेनेवर अंकुश ठेवायला राष्ट्रवादी+मनसे दुसर्‍या खिशात असलेली बरी; हा त्यामागचा विचार असावा. शिवाय, बीजेपी हॅज डीप पॉकेट्स नाव... Happy

Pages