माननीय श्री शरदराव पवारसाहेब यांस

Submitted by बेफ़िकीर on 19 October, 2014 - 14:03

माननीय श्री शरदराव पवारसाहेब यांस,

आदरपूर्वक नमस्कार!

आम्ही यंदाच्या राजकीय मोसमात पाच पत्रे लिहिण्याचे काम हाती घेतले आहे. पहिले पत्र आपल्याला लिहीत आहोत.

पत्र हे 'वन वे कम्युनिकेशन' असते. म्हणजे आमचे पत्र वाचत असताना तुम्ही प्रतिवाद करू शकणार नाही. हा मार्ग आम्हाला सर्वाधिक सोयीचा वाटला.

साहेब, आपला उल्लेख जेव्हा 'शरद पवार' असा एकेरी व्हायचा त्या युगात आमचे वय 'जोरात लागली की दिसेल त्या जागी मुतण्याचे' होते. तेव्हा पुण्यात धरणेही दोनच होती. तेव्हा आम्ही जे खेळ खेळत असू त्यात मुलांची एकमेकांशी खूप भांडणे होत. मग अबोले होत. सहा सहा महिने 'मी त्याच्याशी बोलत नाही' असे सांगून मिरवण्यात जात असत. 'तत्व ते तत्व' ह्या घोषणेबरहुकूम आम्ही मन फत्तर करून ग्राऊंडमध्ये वावरत असू. पुढे कधीतरी चालू मित्राशीही भांडण झाले की पुन्हा जुन्या मित्राशी बोलणे सुरू होत असे. त्यावेळी आम्हाला 'आता कसा आलास बोलायला' असे कोणी विचारत नसे. आम्हीही कोणाला असे विचारत नसू. गरज ही समीकरणांची जननी आहे हा विचार आमच्यात भिनलेला होता. समीकरणांची गरज आम्हाला आत्मोन्नतींसाठी पडत असे. फक्त आत्मोन्नतीच्या आमच्या आणि तुमच्या व्याख्यांमध्ये तफावत असायची. आमचे एक असो!

तर साहेब, त्या काळी चार थोर वयाची माणसे चकाट्या पिटायला एकत्र आली की कोणीतरी राष्ट्रपतीच्या आवेषात उद्गारायचा.

"पवारनी पुलोद काढलंय! सत्ता हवी म्हणून सांगा सरळ म्हणाव!"

मग तुमच्या पुलोद काढण्यावर जंगी चर्चा केली जायची. सरतेशेवटी आम्हाला इतकेच समजायचे की तुम्ही कोणत्यातरी मोठ्या पक्षातून फुटून बाहेर पडलात आणि त्यामार्गाने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केलात. फार राग यायचा तुमचा! असे वाटायचे की असेच असतात की काय राजकारणी?

आणीबाणीत धरपकड सुरू झाली आणि संघिष्ट लोक सैरावैरा पळालेले आम्ही पाहिले. ज्यांच्या घराच्या भिंतींवर गुरुजी विलसत असायचे तेथे एका रात्रीत बापूजी येऊन बसले. बाईंनी अख्खा देश तालावर नाचवला आणि मग बहुधा तुम्हालाही जाणवले की जुने समीकरण आवश्यक झालेले आहे.

तुमचे ते जुने समीकरण पुन्हा नूतनीकरण होऊन नेमके केव्हा व कसे अस्तित्वात आले हे आम्हाला स्मरत नाही कारण बहुधा तेव्हा आम्ही दहावीच्या जवळपास पोचलेलो असू!

पण साहेब, तिकडे तुमचा दबदबा दिल्लीचे राजकारण हादरवू लागला. यशवंतरावांनंतर बहुधा इतक्या धडाडीचा पहिलाच मराठी नेता दिल्लीत पोचला असावा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद लीलया सांभाळून राष्ट्रीय राजकारणात झेप घेऊन तेथेही दिग्गज बनणे म्हणजे सामान्य काम नव्हे! तेही पुलोदचा इतिहास पाठीशी घेऊन!

एकीकडे गांधी घराण्यातील एकसे एक व्यक्तीमत्त्वे दुर्दैवी प्रकारे हरपत चालली होती आणि दुसरीकडे तुम्ही पी एम पदाकडे झेपावू लागला होतात.

तुम्हाला पराभव ठाऊक नव्हता. बारामती हे तुमच्यामुळे भारताच्या राजकारणावर सर्वज्ञात झालेले उपनगर! खैरनारांचे ट्रक कधी आलेच नाहीत. भूखंड आणि श्रीखंड ह्यावर अनंत चारोळ्या रचल्या गेल्या.

एकदा आम्ही असेच विनावाहक विनाथांबा एस टी मधून बारामतीला निघालो. इसवीसन २००१ ची बात असावी. शेजारी एक अतिशय म्हातारा माणूस बसला होता. अशीच आपली काहीबाही चर्चा सुरू झाली तर म्हणाला कसा? पुण्यात एक तरुण म्हणे होस्टेलवर चार मुलांसोबत राहायचा आणि शिकायचा. चार आण्याची मिसळ खायला त्या मुलाकडे पैसे नसायचे. आता त्याच्या हजार पिढ्या बसून खातील. आणि मग तुमचे नांव घेतले त्या म्हातार्‍याने! तो जन्मापासून म्हणे बारामतीतच होता.

खरे सांगू का साहेब? असली फुटकळ, बिनबुडाची विधाने आणि माहिती ऐकून आम्हाला काहीच वाटायचे नाही. राजकारणी नेते ही अशी व्यक्तीमत्वे असतात ज्यांच्याबद्दल कोणीही जीभ उचलून टाळ्याला लावू शकतो अशी आपल्याकडे परिस्थिती आहे. त्या म्हातार्‍याकडे दुर्लक्ष करून आम्ही पुढचा प्रवास केला.

तुम्ही आणलेल्या ग्रीव्ह्जची वाहने सिक्स सीटर म्हणून कायदेशीररीत्या वापरण्यास सुरुवात झाल्यानंतर अचानक प्रदुषणाच्या नावाखाली कोणा नतद्रष्ट सरकारी संस्थेने त्यांचे परवाने रद्द केले तेव्हा एका रिक्षेवाल्याने त्याची सहा आसनी रिक्षा संगम पूलावरून फेकून दिली व रस्त्यावर रडत बसला. पेपरात फोटोसकट बातमी आली होती. पण ग्रीव्ह्जमुळे बारामतीचा नक्शाच बदलला. आता तर काय तुमच्या बालेकिल्ल्यात पाय टाकायचा तर टोल भरावा लागतो, त्यातून सहीसलामत बाहेर पडायचे तर टोल भरावा लागतो. छप्पन रिक्षेवाले बेकार झाले तरी बेहत्तर, पण कंपनी चालली पाहिजे.

दादा आणि ताईंचा राजकारणात झालेला उदय म्हणजे काही घराणेशाही नाही म्हणता येणार! तुमचे सर्वाधिक मार्गदर्शन त्यांनाच मिळालेले असणार! मग त्यांच्याइतके सुयोग्य दुसरे कोण असणार?

एकदा बारामतीच्या एका शेतात एक मजूर म्हातारा उघडाबंब उकिडवा बसून बिडी फुंकत असताना त्याला विचारले की काय, पाऊसपाणी आणि पवारसाहेब काय म्हणतायत?

तर म्हणतो कसा? पाऊस यायचा तेव्हा येईल. पण पवारांचं नांव काढू नका! ते ९६ कुळी आहेत, आम्ही साडे शहाण्णव आहोत. इतका मुरलेला जातीयवाद असलेल्या ठिकाणी इतके घट्ट बस्तान बसवणे म्हणजे गंमत नाही.

माळेगावपासून रस्त्याच्या दुतर्फा लागणार्‍या रग्गड शैक्षणिक संस्था तुमचे शिक्षणक्षेत्राबाबतचे औदार्य प्रकट करतात.

पण आम्हाला सर्वात जास्त आदर वाटतो तो आपला नेता देशाचा संरक्षण आणि कृषी मंत्री झाल्याचा! अहो काय पद का काय ते? सगळी सेना ज्याच्या सहीच्या प्रतीक्षेत असते तो देशाचा सेनापती केवढा मोठा असेल?

'हम देखते है बारिश कैसे नही आती' असा शाब्दिक धीर भाषणांमधून देणार्‍या राजीवजींची आपण सोबत केलीत. त्यांच्या चिरंजिवांनी 'उमदे व्यक्तिमत्व' हा एक घटक सोडून दुसरे त्यांच्याकडून काय उचलले असेल तर हे असे तर्कसुसंगत, व्यवस्थित बोलणे! पूर्वी तानसेन दीपराग गाऊ लागला की दिवे लागत असत म्हणे! हे दोघे बोलले की पाऊस पडत असावा काही ठिकाणी!

मात्र साहेब, पंतप्रधानपद एक राहूदेत, पण उपपंतप्रधानपदीतरी नेमणूक होणार असे आम्हाला फार वाटत होते. पण दिल्लीचे सगळे निराळेच! त्यातच अधेमधे रथयात्रा, राममंदिर, गोध्रा, व्ही पी सिंग, वाजपेयी, अडवानी असल्या सूक्ष्म लहरी येऊन जात असत. माणसाने सहन तरी किती करायचे?

शेवटी तुमचा संयम सुटला.

सोनिया गांधींचे इटालीत्व काही तुमच्यातील सच्च्या भारतीयाला मंजूर होऊ शकले नाही. आता कोणी उगाच म्हणेल की पुलोदचीच पुनरावृत्ती झाली. पण ह्यावेळचा मुद्दाच निराळा होता. एकशे वीस कोटींच्या देशाचे नेतृत्व एका युरोपिअन बाईच्या हातात? का तर फक्त ती त्या घराण्याची स्नुषा आहे म्हणून? असह्य झाले हे तुम्हाला!

आणि तुमच्यातील धडाडीचा नेता, कुशल संघटक, आजवर भेटलेल्या प्रत्येक माणसाला नावानिशी ओळखणारा महान राजा, सर्व पक्षांना प्रिय असलेला म्होरक्या संतापला.

ही दुसरी वेळ होती फुटण्याची! पण तत्व ते तत्व! तुम्हाला प्रखर राष्ट्रवाद अभिप्रेत होता. जाज्वल्य परंपरा लाभलेली ही भारतभूमी कोणा फिरंग्याच्या हातात सोपवायची तुमची तयारीच नव्हती. तारीक अन्वर आणि संगमांना तुमचे विचार पटले आणि तुम्ही तिघे फुटलात. नवीन निर्माण झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्ही सर्वेसर्वा बनलात. सोनिया गांधी आणि तुम्ही हे जणू विरुद्धार्थी शब्द भासू लागले.

महाराष्ट्रापासून सुरुवात करून हा राष्ट्रवाद भारतभर पसरवण्याच्या तुमच्या दिग्विजयी योजनांना दैवी शुभ संकेत मिळाले. निव्वळ आणि निव्वळ तुमच्यासाठी आयुष्य पणाला लावलेल्या लाखो अनुयायांनी हा नवा पक्ष उचलून धरला. काहीतरी वेगळे घडत होते. आजवर फक्त काँग्रेस आणि भाजप (व शिवसेना) असे दोनच प्रमुख पर्याय होते, पण राष्ट्रवादीच्या रुपाने काँग्रेसमध्ये नाराज असलेले पण वृत्ती काँग्रेसचीच असलेले अगणित कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते झाले.

जुनी खोडे म्हणू लागली. पवार म्हणजे असेच करणार! पण तुमच्या सूर्यासारख्या तेजात आता काँग्रेस भाजून निघत होती. महाराष्ट्र अचंबीत झाला होता.

आणि निवडणूका झाल्या. निकाल लागले. आणि 'जातीयवादी' शक्तींना सत्तेपासून दूर ठेवणे वगैरे प्रकारच्या समान धोरणांवर तुम्ही सोनिया गांधींच्या काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी केलीत. नुसता बाहेरून पाठिंबा नव्हे तर सत्तेत सहभाग!

साहेब, एवढे होईस्तोवर थोडेफार राजकारण आम्हालाही समजू लागले होते हो! खरे सांगतो, लाज वाटली लाज! तुमच्या त्या निर्णयाची लाज वाटली.

तुमचे फुटणे काय, नवा पक्ष काढणे काय, पुन्हा जुळणे काय, कोठूनही सत्तेत असणे काय! सारेच न्यारे!

मध्यंतरी एका माथेफिरूने तुमच्यावर हाताने वार केल्याचा व्हिडिओ सगळीकडे फिरला तेव्हा आमचे रक्त उसळले होते. असे वाटले होते की सुरक्षा व्यवस्था नीट नसल्याबद्दल सरकारने तुमची माफी मागावी.

पण साहेब, जनतेला फसवून आपल्यावर विश्वास ठेवणार्‍या जनतेची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागायची वेळ आली तर तुम्हाला दुसरे कामच उरणार नाही हो?

तुमच्या आर आर पाटील साहेबांनी डान्स बार बंद करून सुसंस्कृत महाराष्ट्राची घोषणा अंमलात आणण्याचा नारळ फोडला. फार परखड व्यक्तिमत्व आहे बरे ते? जे आहे ते बोलणार! पोलिसांना पगार कमी आहे म्हणून पोलिस पैसे खातात हे त्यांच्यामुळे आम्हाला कळले. आम्हाला वाटायचे की पोलिस पैसे खातात हे अजून राष्ट्रवादी काँग्रेसला समजलेलेच नसेल. तर ह्या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी परवा एक धोरणी सल्ला दिला कोणालातरी! काय बलात्कार वगैरे करायचे ते निवडणूकीनंतर करा म्हणाले. उगाच विरोधी मतदान व्हायला नको! हे बोलल्यानंतर त्यांनी जनतेची उगाचच माफीबिफीही मागीतली. आम्ही कुठे काय म्हणालो होतो त्यांना? पण साहेब, एक सांगू का? महाराष्ट्राच्या मायबहिणींची आबा पाटलांच्या वतीने तुम्ही समक्ष माफी मागायला हवी होतीत. नाही काय आहे, सगळ्यांच्याच घरी लेकी सुना असतात. आपली माणसे बाहेर जगासमोर असे बोलतात हे आपल्याच लेकीसुनांना कळल्यानंतर त्यांच्यासमोर आपली मान खाली जाईल ना? निदान नैतिक जबाबदारी म्हणून तरी? पण नाही! तुम्ही म्हणालात की आबा पाटील ह्यांच्या त्या विधानाबद्दल त्यांनी माफी मागीतलेली आहे, तेव्हा हा वाद आता संपवा! छत्रपतींच्या प्रशासनात असे बोलणार्‍या गृहमंत्र्याचे काय झाले असते नाही साहेब? पण आपल्याला कशाला नाही त्या काळज्या? छत्रपतींचे नांव मते मागण्यापुरते घेतले की झाले, नाही का?

परकीय नेतृत्वाच्या हाती देश दिला जाऊ नये म्हणून बाहेर पडणारे तुम्ही पंधरा वर्षे त्या नेतृत्वाशी हातमिळवणी करून महाराष्ट्रात सत्तेत सहभागी राहिलात. तुमचे अन्य साथीदार एक तर निष्प्रभ तरी झाले किंवा सोनियांना तरी मिळाले. कुठे ऐकू येते हल्ली संगमा आणि अन्वरांचे नांव विशेष? तर ह्या पंधरा वर्षांत तुम्ही काँग्रेसच्या प्रशासनावर नेहमीच भडकलेले असायचात. पण भाजपमुक्त महाराष्ट्र ह्या धोरणाने टिकून राहिलात.

मध्यंतरी दादांनी 'सुप्रियाताईला निवडून दिले नाही तर पाणी बंद करेन' असा हळूवार सल्ला दिला काही नागरिकांना! त्यावर तुमचे स्टेटमेंट नाही. त्याआधी दादा म्हणाले की पाऊस पडत नसेल तर काय आम्ही धरणांत मुतू की काय? त्यावर तुमचे स्टेटमेंट नाही. माफी तर लांबचीच गोष्ट!

हे सगळे करत असताना प्रकृतीची हेळसांड झाली आणि शस्त्रक्रियाही झाली. तुमचा सक्रीय राजकारणापेक्षा मार्गदर्शकाची भूमिका घेण्यावर भर सुरू झाला. प्रेरनास्थान बनलात तुम्ही! तुम्ही इतके ज्येष्ठ व वरिष्ठ होऊन बसलात की दिग्गज, ज्येष्ठ, राष्ट्रीत नेते अश्या उपाध्या तुमच्यासमोर फिक्या पडू लागल्या. आता राजकारणातील तुमचे स्थान वाजपेयींसारखे झाले. ऋषीतूल्य!

अगदी आत्ताआत्तापर्यंत तुमही आणि काँग्रेसची युती होती. भाजप आणि सेनेची युती तुटल्यावर तासाभरात तुमचीही युती तुटली. राज्यातील अवघी जनता अवाक झाली. आपण स्वबळावर निवडून येणार नाही हे ह्या निवडणूकीत उतरलेल्या भाजप सोडून प्रत्येक पक्षाला नीट माहीत होते. तुम्हाला तर वर्षभर पुढचे राजकारण आत्ताच समजते इतके तुम्ही मुरलेले नेते आहात.

वजाबाकीचे राजकारण करू नका, बेरजेचे करा असा सल्ला कधीकाळी देणारे ज्येष्ठ नेते शरद पवार हे आता राजकारणाचे पितामह भीष्म झालेले आहेत. कृषीक्षेत्रावर त्यांचे अनंत उपकार आहेत. त्यांचे संघटन कौशल्य, दुसरी फळी उभी करणे, सर्वांना बरोबर घेऊन चलणे ह्या तमाम वैशिष्ट्यांबरोबरच आजवर ते ओळखले गेले आहेत आणखीन एका अत्यंत महत्वाच्या बाबीसाठी!

ती बाब म्हणजे, राजकारणात ऐनवेळी धूर्त खेळी खेळणे! ऐनवेळी!

ह्यात तुमचा हात कोणी धरूच शकत नाही साहेब!

आजही तुम्ही एक धूर्त खेळी खेळलात.

कोणीही विचारले नसताना भाजपाला केवळ स्थिर सरकार यावे ह्यासाठी बाहेरून पाठिंबा देणार असा बार दिलात उडवून!

ह्यातून काय काय साधले ते आता अनुभवाने आम्हालाही समजते बरे साहेब?

भाजपला शिवसेनेशिवायही पर्याय आहे अशी परिस्थिती निर्माण केल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी होणे!

भाजप आणि शिवसेनेमध्ये घासाघीस होईलच अशी परिस्थिती निर्माण करणे!

काँग्रेसपासून प्रदीर्घ कालावधीसाठी काडीमोड घेतल्याचे जाहीर न करूनही तो घेणे!

काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणे!

शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा एक अटेंप्ट करून बघणे!

आपली गुपीते भाजपने बाहेर काढू नयेत ह्याची तजवीज करणे!

गोंधळ उडवून देणे किंवा संभ्रम निर्माण होईल अशी परिस्थिती बनवणे!

येनकेनप्रकारेण सत्तेच्या जवळपास राहणे!

वर्षभराने नवीन राजकारण करून नवीन समीकरण जुळवण्याचा वाव निर्माण करून ठेवणे!

बरं! हे सगळे करताना तुम्ही काँग्रेस सोडून वाईटपना कोणाचाच घेतला नाहीत. सेना तुम्हाला काहीच म्हणू शकत नाही. भाजपला तर काय सपोर्ट हवाच आहे. येऊन जाऊन बिचारी जनता आगपाखड करेल ती करूदेत! पाच वर्षांनी तेव्हाचे तेव्हा पाहू!

पण साहेब, एक शेवटचे सांगू का?

हे सगळे पाहिले ना? की असे वाटते की तुमच्या विचारसरणीला, कारकीर्दीला, पक्षनिर्मीती किंवा पक्षबांधणीला, राजकारणाला कधीच कोणतेही तात्विक अधिष्ठान नव्हतेच!

एक शेवटचे सांगू का? लाज वाटते साहेब, की तुमच्यासारखे नेते महाराष्ट्रात झाले, त्यामुळे कोठे अभिमानाने काही सांगण्यासारखेच नसते आम्हा गरीबांकडे!

=====================================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही तासांमध्येच राष्ट्रवादीने 'नॅचरली करप्टेड पार्टी' हुद्द्यावरून 'नो कल्चर पार्टी' अशी भरारी मारलेलीच आहे.
काँग्रेस प्रणित सत्तेमध्येही तिची 'नॉक्शिअस क्रिमिनल्स पार्टी', 'नॉशिआ कॉजिंग पार्टी', 'नोटोरिअस क्रोनीज पार्टी' , 'न्युमेरो-ऊनो कोल्युजन पार्टी' आणि 'नॉन-अग्रीकल्चरल कनवर्जन पार्टी' अशी दीन दुगणी रात चौगुणी प्रगती झालीच होती तर आता भाजपा प्रणित सरकारमध्ये त्यांना 'नोबली क्रश्ड पार्टी' आणि शेवटी 'नॉन-एग्झिस्टंट काँग्रेस पार्टी' अशी सदगती मिळो ही देवेंद्रचरणी प्रार्थना.

अजून वाचायचय, सुरुवात तर उत्तम केलीत.

पण कालपर्यन्त हाफ चड्डीवाल्याना सत्ता देणार का असे विचारणार्‍या पवारानाच हाफ चड्डीकडे जावे लागले यातच काय ते आले.:फिदी: म्हणून दुसर्‍याला कधी नावे ठेवुन कमी लेखु नये. आपल्यावर कधी काय वेळ येईल ते सान्गता येत नाही.

आणीबाणीत धरपकड सुरू झाली आणि संघिष्ट लोक सैरावैरा पळालेले आम्ही पाहिले. ज्यांच्या घराच्या भिंतींवर गुरुजी विलसत असायचे तेथे एका रात्रीत बापूजी येऊन बसले.

मुळ लेखाशी काय वरील विधानाचा काय संबंध ?

तरी बर मिसा खाली सर्वात जास्त लोक संघाचे होते. सत्याग्रह करुन आत जाणार्‍यात जवळ जवळ समाजवादी नव्हतेच. जनता पक्ष स्थापन झाल्यावर ते आले आणि नंतर जनता पक्ष फोडुन गेले.

पत्र आवडलं म्हणणार नाही कारण ह्यात जे लिहिलंय ते अत्यंत दु:खद आहे, भारतात असे नेते निर्माण झाले आणि आजही होताहेत हे भारताचे सर्वात मोठे दुर्दैव.

मलाही कोणे एके काळी शरद पवार ह्या नावाबद्दल आदर होता, पण तो हळूहळू कमी होत त्याची जागा आत्यंतिक तिरस्काराने घेतली. मायावती, मुलायम, लालु या मंडळींचा अजेंडा खुलेआम होता, ते काय आहेत हे जगाला पहिल्यापासुन माहित होते पण या माणसाने मोठेपणाचा आव आणत जे काही केले ते केवळ लज्जास्पद.. असा माणुस भारताचा संरक्षणमंत्री आणि कृषीमंत्री होता याची लाज वाटते.

Sad Sad Angry

छान .असेच एक पत्र देवेंद्र फडणवीस यांना लिहा ,भाजपात काँग्रेस राकाँच्या साठ भ्रष्ट दलबदलुंना त्यांनी प्रवेश दिला, ह्या भ्रष्ट नेत्यांवर आरोप देवेंद्र यांनीच केले होते. आज सत्ता दृष्टीपथात येताच या भ्रष्ट लोकांना सुष्ट करुन सत्तासुंदरीचे प्रणयराधन करायला चाल चरित्र वाले तयार झाले आहेत, शाश्वत धर्म आणि आपद् धर्म अशी संस्कृतप्रचुर शाब्दीक धूळफेक करुन लोकांना येडे बनवण्याचे काम त्यांनी केले आहे, 'पळाला' या कृतीचे समर्थन 'त्यांनी यशस्वी माघार घेत पलायन केले' असे करण्यात भाजपचे संघिष्ट लोक नेहमीच तरबेज असतात. रावणाच्या पराभवासाठी बिभीषणची मदत घेता घेता थेट रावणाच्याच मांडीला मांडी लावून जनतेची' वानरसेना' करायला निघालेल्या या सत्तातुरांना एक खरमरीत पत्र बेफीकिर तुमच्याकडून अपेक्षित आहे.

-आपला अतिशय उर्मट (आअउ)
धिरज काटकर

तरी बर मिसा खाली सर्वात जास्त लोक संघाचे होते. >>>>
आणि इंदिराबाईंना माफीनामा लिहून देऊन सुटका करवून घेणार्यांतपण हेच लोक आघाडीवर होते म्हणे!

सत्तातुरांना एक खरमरीत पत्र बेफीकिर तुमच्याकडून अपेक्षित आहे. शरद पवार साहेबांना महाराष्ट्राची वाट लावायला जित्की वर्ष दिलीत तितके महिने भाजपला देऊ नका.

आणि इंदिराबाईंना माफीनामा लिहून देऊन सुटका करवून घेणार्यांतपण हेच लोक आघाडीवर होते म्हणे! तीन वेळा संघावर बंदी आली आणि राष्ट्र सेवा दलावर किती वेळा ?

बंदी येण्यासाठी तसे काही काम करायला लागत असेल ना?

राष्ट्र सेवा दलावरही एका सरकारची करडी नजर होती : ब्रिटिश सरकारची.

राष्ट्र सेवा दल हा फुकटचा मॅरेज ब्युरो होता, त्याच्यावर कशाला बंदी घालायची?

राष्ट्रवादीचे १५ आमदार सहज फुटुन भाजपला पाठींबा देऊ शकतात, मग पवारांना कोणीच विचारणार नाही म्हणुन ते आधीच मागे लागले आहेत पाठींबा घ्या म्हणुन.

भाजपने सुद्धा राष्ट्रवादीचे १५ आमदार फोडुन, शिवसेने पासुन कायमची सुटका करुन घ्यावी.

पवारांना विरोध करायला जनसंघ भारतीय जनता पार्टी होतेच कि!
पवार जर इतके कमी प्रतीचे होते तर हे तथाकथित जनसंघी व नंतर BJPचे लोक काय करत होते?
आणि हेच जनसंघी पुलोद मध्ये पवारांच्या साथिला होते हे बेफिकिरांना ठाऊक नसावे. अगदी ८५च्या इलेक्शनमध्ये पवारांची समतावादी काँग्रेस +भाजप +जनता पार्टी (जॉर्ज फर्नांडीस) महाराष्ट्रात एकत्र विधानसभा लढत होते. राजकिय शुचितेचा मोठा आव भाजपच्या लोकांनी आणु नये.

मस्त !

भाजपने सुद्धा राष्ट्रवादीचे १५ आमदार फोडुन, >>> शत-प्रतिशत ते हेच का?? .

राजकिय शुचितेचा मोठा आव भाजपच्या लोकांनी आणु नये. >> भाजपाची शुचिता फक्त भाषणापुरती असते. येड्डी आठवतांत का??? अगदी अलिकडचं उदा, म्हणजे अनिल गोटेंना पावन करुन घेतलं की त्यांनी.

खरच हे पत्र पोस्टाच्या पेटित टाकण्याच्या लायकीचे नक्कीच आहे..ह्या माणसाबद्दल मला कधीच आदर नव्हता त्याच्याकडे पाहुनच बेरकीपणा डोकावतो...असो पण जनतेने आता सांगीतले आहे कोणीही आम्हाला फसवु शकत नाहि आणी तसे केले तर जास्त दिवस नक्कीच नाही...

उत्तम आणि समयोचित.
पत्रं आवडले.
>>>>>>>>>
प्लस वन वन

फक्त आता भाजपाला विनाशकाले विपरीत बुद्धी सुचून यांचा पाठिंबा घेऊ नये.
अर्थात याची शक्यता फार कमी जसे भाजपाचे सत्ताकारण चालू आहे ते पाहता त्यांचा लाँग टर्म गोल देश भाजपमय करायचा आहे आणि त्या द्रुष्टीने एकेक पाऊल टाकत आहेत. पण असा काही अविचारी निर्णय त्यांना दहा पावले मागे आणू शकतो.

एक शेवटचे सांगू का? लाज वाटते साहेब, की तुमच्यासारखे नेते महाराष्ट्रात झाले, त्यामुळे कोठे अभिमानाने काही सांगण्यासारखेच नसते आम्हा गरीबांकडे! +१
आमच्या मतदार संघाचे खासदार होते गेल्या टर्मला. लहानपणापासून खूप नाव/कीर्ती ऐकले आहे. यांचे राजकारण पाहिले आहे पण खरच लाज वाटावी असे उद्योग्यांच्या पक्षाने गेल्या काही वर्षात केले आहेत. आणि हे बाहेरून पाठींबा म्हणजे मास्टरस्ट्रोक वगैरे काही नाही तर लाचारी आहे.

Pages