“ पुणे ते पानिपत ” भाग १५ : भेडाघाट - तुळजापूर - पंढरपूर आणि परत पुणे ( समाप्त )

Submitted by सारन्ग on 7 October, 2014 - 17:09

“ पुणे ते पानिपत ” भाग १ - http://www.maayboli.com/node/35449

“ पुणे ते पानिपत ” भाग २ - http://www.maayboli.com/node/35521

“ पुणे ते पानिपत ” भाग ३ - http://www.maayboli.com/node/35727

“ पुणे ते पानिपत ” भाग ४ - http://www.maayboli.com/node/35805

“ पुणे ते पानिपत ” भाग ५ - http://www.maayboli.com/node/35884

“ पुणे ते पानिपत ” भाग ६ - http://www.maayboli.com/node/35939

“ पुणे ते पानिपत ” भाग ७ - http://www.maayboli.com/node/36194

“ पुणे ते पानिपत ” भाग ८ - http://www.maayboli.com/node/36408

“ पुणे ते पानिपत ” भाग ९ : http://www.maayboli.com/node/36732

“ पुणे ते पानिपत ” भाग १० : http://www.maayboli.com/node/38586

“ पुणे ते पानिपत ” भाग ११ : http://www.maayboli.com/node/38694

“ पुणे ते पानिपत ” भाग १२ : http://www.maayboli.com/node/38842

“ पुणे ते पानिपत ” भाग १३: http://www.maayboli.com/node/46062

“ पुणे ते पानिपत ” भाग १४: http://www.maayboli.com/node/51134

२१ जानेवारी २०१२

आजचा प्रवास : मैहर – कटनी – भेडाघाट - जबलपूर

आज सकाळी लवकरच जाग आली. उठल्या उठल्या काळे काकांना फोने केला, फोन अजून बंदच येत होता.
कितीतरी जण अजून साखरझोपेतचं होते, आज अगदी नीट आवरलं, तोपर्यंत बाकीचे लोक देखील उठले होते. आज शारदा देवीच दर्शन घेऊन, भेडाघाटचा धबधबा बघून, जबलपूर गाठायचं होतं. शारदा देवीचं मंदिर शाळेपासून काही हाताच्या अंतरावर होतं.
सकाळी आम्ही सात वाजता चढायला सुरवात केली. अगदी रमतगमत पावणे आठ पर्यंत मंदिरात पोहचलो. मंदिरामध्ये काळ मागे राहिलेले मोहिमेमधील काही अतिउत्साही कार्यकर्ते अगोदरच पोहचले होते. काळे काकांबद्दल त्यांच्याकडे पण चौकशी केली. पण त्यांना देखील काही माहित नव्हते. सकाळ असूनदेखील बऱ्यापैकी गर्दी होती. पण चांगलं दर्शन झालं. मंदिराचा इथून आजूबाजूचा परिसर मस्तंच दिसतं होता. मैहर तस छोट गाव आहे.

मैहरविषयी थोडेसे :

या शहराचा इतिहास Paleolithic युगापर्यंत मागे जातो.
Paleolithic युग : पुराणपाषण कालखंड किंवा प्रौगेतिहासिक कालखंड. या युगानंतर मध्यपाषण युगाला सुरवात झाली आणि मानव शेती करू लागला.

हे शारदा देवीचं मंदिर त्रिकुटा नावाच्या टेकडीवर बांधलं आहे. वरती पोहचायला १०६३ पायऱ्या चढाव्या लागतात.
या मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगितले जाते कि, जेव्हा शंकर दक्षयानीचे प्रेत घेऊन निघाला होता, तेव्हा तिच्या गळ्यातील हार या ठिकाणी पडला. म्हणून हे ठिकाण माई(आई) + हार = मैहर या नावाने ओळखले जाऊ लागले.

आज जवळपास २०० किमी अंतर कापायचे होते. मध्य प्रदेश मधील रस्ते लक्षात घेता, कमीत कमी ६ तास लागणार हे गृहीत होते. बरं अजून वाटेत काय वाढून ठेवले आहे हे माहित नव्हते. स्वागतला पण फोन झाला. ते लोकं अजून तासाभरानंतर निघणार होते ( आळशी लेकाचे ). देवीचं दर्शन झालं कि मी आणि संग्राम-रोहन एकत्रच निघालो. रस्ता नेहमीप्रमाणे खाचखळग्यांनी भरलेला होता. तिथल्या एका गाववाल्याला कटनीकडे जाणारा रस्ता विचारला. विचारतानाच भैया, थोडा दूर का रास्ता होगा, तब भी चलेगा पर रोड अच्छा होना चाहिये. असे सांगितले. त्या सदगृहस्थाने एकदम चांगला असणारा रस्ता सांगितला. हा रस्ता बहुतेक बहरी या गावावरून येतो. आत्ता मला नक्की आठवत नाही पण रस्ता चांगला आहे. त्या रोड वर आमच्याच दोन बाईक होत्या रस्ता बऱ्यापैकी मोकळा आणि कितीतरी चांगला होता. आजूबाजूला दुरवर पसरलेली हिरवीगार शेते होती. कानात कधी रिकी मार्टीन तर कधी अजय-अतुल वाजत होते. आणि एक मस्त झकास रिकामा रस्ता होता. अजून काय पाहिजे होत या आयुष्यात. वाटेत एका ठिकाणी रेल्वे सिग्नल लागला. सिग्नल लागला कि कमीत कमी १५-२० मि. थांबावं लागणार हे गृहीतच होतं. मग आम्ही आमच्या बाईक बाजूला घेऊन मस्तपैकी चहाचे दोन दोन कप रिचवले. वाटेत मार्बलचे कारखाने होते. मग तिथल्या एका कारखान्यात जाऊन मार्बलचे दर, प्रकार अशा अनेक विषयावर बोलबच्चनगिरी करून आम्ही परत एकदा रस्त्याला लागलो.

मैहर ते कटनी ८३ किमी चे अंतर आहे. कटनी मध्ये पोचायला दुपारचे १ वाजले. आता कुठेतरी क्षुधाशांती करनं गरजेचं होतं. वाटेतल्या एका ढाब्यावर बाईक थांबवल्या. हनुमान भक्त रोहनचा शनिवार असल्याने, तुम्ही जेवण करून घ्या मी जरा गावात बाईक दाखवून घेतो म्हणत रोहन पुढे निघून गेला. मी आणि संग्रामनी मात्र जेवणावर आडवा हात मारला. रोहनला फोन केल्यावर तो जवळच एका डाव्या हाताच्या गॅरेज मध्ये असल्याचं कळलं. तिथं गेल्यावर संग्रामनी त्याच्या बाईक मधून काढलेलं जळलेल ऑइल दाखवलं. या कार्ट्यांनी पुणे सोडल्यानंतर ऑइलच बदललं नव्हतं. गाडीत जेमतेम २०० मिली ऑइल राहिलं होतं. आज खरच हनुमानाने आम्हाला वाचवलं होतं. नशीब याचा उपवास असल्याने याने गाडी गॅरेज मध्ये दाखवली.

साधारण लांबच्या प्रवासात दर २००० किमी नंतर ऑइल बदली करावं.

भेडाघाट अजून १०० किमी होतं. सूर्यास्तापर्यंत कुठल्याही परिस्थितीत तिथे पोहचण आवश्यक होते. नाहीतर परत उद्याची वाट पहावी लागणार होती.
आता मात्र राष्ट्रीय महामार्ग ७ सोडून चालणार नव्हतं. भेडाघाटला जाताना राष्ट्रीय महामार्ग ७ पकडायचा आणि हा मार्ग जिथे राष्ट्रीय महामार्ग १२ ला मिळतो, (१२ राष्ट्रीय महामार्ग १२ अ नव्हे. ) तिथून उजवीकडे काही मिनिटांवर भेडाघाट आहे. गाड्या वरती लावून ५-१० मि. खाली थोडं चालतं जाव लागतं.

धुवांधार धबधबा
15Bhedaghat1.jpg15Dhuandhar_falls3.JPG15DSCN3818.JPG15DSCN3811.JPG

भेडाघाट येथे बघण्यासारखी ३ प्रमुख ठिकाण आहेत
१. धुवांधार धबधबा
२. मार्बलच्या टेकड्यांच्या मधून नौकाविहार
३. चौसष्ट योगिनी मंदिर.

बरोबर ५ वाजता आम्ही धुवांधार धबधबा गाठला. मग निवांत फोटोसेशन झालं. डोळ्याचं पारण भेटणारा धबधबा आहे. प्रत्येकानी आयुष्यात एकदा तरी भेट द्यावा असा.
आता आम्हाला नौका विहार करायचा होता. पण आता प्रॉब्लेम असा झाला कि संध्याकाळ झाली होती. नौका विहार करायचा तर कमीत कमी १० माणसं हवीत. बर तिथे आलेल्या ३-४ महाराष्ट्रीय जोडप्यांच म्हणनं अस होतं कि नावेमध्ये फक्त तेच लोकं असतील बाकी कुणीच असता कामा नये. आता तर पंचाईत होती, बर ते लोकं त्यासाठी पैसे द्यायला पण तयार होते. आणि आमची गोची अशी झाली कि त्या दिवसाची शेवटची नाव होती. आता मी शेवटचं हत्यार वापरायचं ठरवलं. नावाडी नाव काढायच्या तयारीत होता.
जाऊ दे रे संग्राम, लोकं कितीही वरच्या पदावर पोहचली, तरी त्यांचे विचार नेहमी खालच्या पातळीचेच राहणार, वैचारिक प्रगल्भता त्यांच्याकडे कमीच असते.
हे वाक्य मी संग्रामला उद्देशून पण नावेमध्ये चढणाऱ्या दीदीला ऐकू जाईल एवढ्या आवाजात म्हणालो.
घाव वर्मावर लागला होता. ती दीदी नावेत बसताच,
भैया, आने दो वो लोग को भी. नावाड्याला उद्देशून म्हणाली.
तिच्या ग्रुपमध्ये अनेक जणांनी तिच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघितले.
आम्ही मात्र नावाद्याला न विचारताच लगेच नावेत उद्या टाकल्या आणि दीदीच आभार मानून मोकळे झालो.
नावाडी त्या ठिकाणी चित्रित झालेल्या सिनेमांची माहिती देण्यात गुंग होता.
तिथे चित्रित झालेलं सिनेमे
१. अशोका – रात का नशा अभी गाणं
२. जिस देश मै गंगा बहती है – राज कपूर आणि पद्मिनी
३. प्राण जाये वचन न जाये
अस बरंच तो काहीतरी सांगत होता आणि जोडीला पीजे मारत होता.
पण वेगवेगळ्या रंगाचे संगमरवरी खडक बघताना खूप मजा आली. साधारण साडे सहा वाजता आमचा नौका विहार संपला. तिथे संगमरवरावर कारागिरी केलेल्या अनेक मस्त मस्त वस्तू मिळतात. तुम्ही चांगल्यातले घासाघीस करणारे असाल तर खुपच स्वस्त मिळतात. मोठ्या वस्तू न्यायला अडचण येणार होती. म्हणून मग आम्ही, आपापल्या आयांसाठी हेअर क्लिप्स घेतल्या. एक क्लिप आम्हाला ५ रु ला पडली.
तो पर्यंत रुपेशचा फोन आला होता. मोहीम जबलपूर मध्ये मुक्कामी दाखल झाली होती.
आम्ही पण जास्त वेळ न दडवता लगेच जबलपूर गाठलं. भेडाघाट ते जबलपूर अंतर २० किमी आहे.

जबलपूरमध्ये आमचा मुक्काम गुरुद्वारा दसवी पातशाह, मढाताल येथे होता. जबलपूरला गाडी लावत असतानाच अचानक काळे काका गाडी लावताना दिसले.
मला एकदम हायसे वाटले.
काळे काकांनी सांगितलेली हकीकत अशी.
काकांना रात्री ११ वाजले तरी कुठले गाव दिसेना, शेवटी कसातरी त्यांना एक माणूस दिसला. त्यांनी त्याला आता पुढे राहण्यायोग्य गाव किती किमी वर अआहे असे विचारले असता कमीत कमी ५० किमी जावे लागेल असे उत्तर मिळाले. माझ्या तर्कानुसार काका चित्रकूट –सतना रस्त्यावर असावेत. म्हणजे काका त्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत एकटे गाडी चालवत होते. शेवटी त्या माणसालाच काकांची दया आली आणि त्याने काकांना त्याच्या झोपडीत नेले. रात्री जेऊ घातले आणि काका-काकू रात्रीचा मुक्काम करून, आज त्यांनी जबलपूर गाठलं होतं. काकांना सुखरूप परत आणल्याबद्दल मी देवाला धन्यवाद दिले. तो देवमाणूस काकांना भेटला म्हणून काकांचं निभावलं. अशा काही प्रसंगानंतर तुमची देवावरील श्रद्धा अजूनच दृढ होते.
आज जेवणाचा मेनू एकदम फक्कड होता. गुलाबजाम Happy

मस्तपैकी जेवून झाल्यावर आज परत सगळेजण एकत्र भेटलो होतो. आज पोरांच्या गप्पांना अगदी उत आला होता. उद्या आम्ही महाराष्ट्रात प्रवेश करणार होतो.
आज आई-बाबा सगळ्यांना फोन केले. बाबांनी लगेच उद्या अमावस्या आहे, गाडी नीट चालवं, असं सांगून अमावस्येची आठवण करून दिली. मी देखील हो ला हो करत, काळजी करू नका वगैरे गोष्टी सांगितल्या.
सागरला फोन केला. प्रिन्सिपलच लेक्चर सोडलं तर माझी हजेरी लावायचं काम सागर व्यवस्थित करत होता. आता काही टेन्शन नव्हतं.
आज गप्पांमुळे झोपायला बरीच रात्र झाली, सगळेजण आता एकत्र होतो.
उद्या नागपूरकडे प्रस्थान करायचं होतं.

आजचा प्रवास :२२१.५ किमी
उद्याचा प्रवास : जबलपूर – सिवनी - देवलापार – नागपूर

२२ जानेवारी २०१२
आजचा प्रवास : जबलपूर – सिवनी - देवलापार – नागपूर

आज मोहीम सकाळीच भेडाघाटकडे रवाना झाली. त्यामुळे आम्हाला झोपायला अजून वेळ मिळाला. जबलपूर ते नागपूर हे अंतर २७७ किमीचे आहे. हि दोन शहरे राष्ट्रीय महामार्ग ७ ने जोडलेली आहेत.

जबलपूर – सिवनी : १४७ किमी
सिवनी - देवलापार: ६४ किमी
देवलापार – नागपूर: ६६ किमी

सिवनी ते देवलापार मध्ये पेंच राष्ट्रीय उद्यान लागते. हा रस्ता याच उद्यानामधून जातो.

जमल्यास पेंच राष्ट्रीय उद्यान बघायचं असं माझ्या मनात होतं.
निवांत उठल्यामुळे निघायला ८ वाजले. आज बघण्यासारखं असं काहीच नव्हत. वाटेत फोटोशूट साठी सगळे थांबलेले असताना एका ठिकाणी गिधाडाचं घरटी बांधायचं काम चालू होतं. मी पहिल्यांदाच गिधाडाला निलगिरीच्या झाडावर घरटं करताना बघत होतो. नाश्ता वगैरे करून सिवनी गाठायलाच १ वाजला. आज फारच रमत गमत आणि निवांत चालू होतं. दुपारी बरोबर २ च्या सुमारास आम्ही पेंच अभयारण्यातून जाणाऱ्या रस्त्यात होतो.

रुडयार्ड किपलिंग यांनी पेंच अभयारण्य डोळ्यासमोर ठेऊनच “मोगली” लिहील होतं. जंगल बऱ्यापैकी दाट आहे. एका वळणावर आम्हाला झाडीत खसखस ऐकू आली. स्वागतला मी बाईक थांबवायला सांगितली. बाकीच्या बाईक बऱ्याच पुढे होत्या. परत एकदा खसखस ऐकू आली. स्वागतला बाईक बंद कर म्हटलं. बहुतेक गवे रस्ता ओलांडणार असावेत अस वाटतंय, काहीही झालं तरी बाईक सुरु करू नको. सहसा गवे हल्ला करणार नाहीत. आम्ही बाईक बंद करून वाट बघू लागलो.
आणि अचानक ५-६ कोल्हे झाडीतून बाहेर आले आणि रस्ता ओलांडून गेले.
हात तिच्या मायला, मला वाटल गवे असतील.
स्वागत बाईक सुरु करणार तोच त्याला सांगितलं इतक्यात नाही. गवे, कोल्हे साधारण झुंडीने राहतात, पहिल्यांदा म्होरक्या रस्ता ओलाडतो मग बाकीचे. बहुधा शेवटी माद्या आणि पिल्ले असतात. आणि कोल्हे असल्याने आता घाबरायची जास्त गरज नव्हती.
३-४ मि. मधेच ६-७ कोल्ह्यांच्या दुसऱ्या झुंडीने रस्ता ओलांडला. पण यामध्ये माद्या आणि पिल्ले दिसली नाहीत. म्हणून अजून ५ मि. थांबायचं ठरलं. ५ मि. झाली तरी काहीच हालचाल दिसली नाही, म्हणून गाडी चालू करणार इतक्यात तिसऱ्या झुंडीने रस्ता ओलांडला. १-२ पिल्ले होती, बहुतेक बाकीच्या माद्या असाव्यात.
मी मनातल्या मनात मारुती चितमपल्लींचे आभार मानले. त्यांच्यामुळे आम्हाला जंगलातील प्राणीसंपदा बघायला मिळाली होती.

आम्ही पुढे निघालो. उशीर बराच झाला असल्याने पेंच अभयारण्याचा बेत बारगळला.
आज आदित्यच्या घरी सर्वाना चहापाण्याचे निमंत्रण असल्याने मोहीम नागपूर बाहेर थोड्यावेळ थांबली होती. सगळे एकत्र आले आणि आम्ही आदित्यच्या घरी जमलो.
साई बाबा मंदिरामध्ये सगळ्यांनी दर्शन घेतले आणि चहा पाणी करून मुक्कामाच्या ठिकाणी परतलो.
आज फारसं काही बघायला मिळालं नसलं तरी कोल्हांच्या दर्शनामुळे मी समाधानी होतो. आयुष्यात प्रत्येक दिवस वेगळा असतो हेच खरं.

संध्याकाळी स्नेहलपण आला. मैत्रिणीला भेटल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. आम्ही पण याचाच फायदा घेतला आणि स्नेहलला गाडीबद्दल सांगितलं. आणि वरून अरे, तू तिच्याबरोबर होतास, मग तुला उगाच तुझ्या बाईकची काळजी लागली असती वगैरे लोणकढी दिली. स्नेहलनी पण बाईक बघितल्यानंतर आम्हाला मोठ्या मनाने माफ केलं. आणि या नाट्यावर पडदा पडला.
आज रात्रीच्या सभेमध्ये उद्याच्या कार्यक्रमाची चर्चा झाली. उद्याचा मार्ग नागपूर- अमरावती – यवतमाळ – माहूर – नांदेड असा होता. पण मग उद्याही माहूरच्या देवीव्यातिरिक्त काहीही पदरात पडणार नव्हते. शिवाय सगळा पल्ला ४५० किमी चा होता. त्यामुळे हा मार्ग सोडून नागपूर- वर्धा – यवतमाळ – माहूर – नांदेड असा मार्ग घ्यायचे नक्की झाले. त्यामुळे प्रवास पण तब्बल १०० किमीने कमी होणार होता आणि वर्ध्यामधला परमधाम आश्रमाला पण भेट देता येणार होती.
आज सगळे लगेचच “खुडुक” झाले. उद्याचा पल्ला देखील लांबचा होता.

आजचा प्रवास : २८० किमी
उद्याचा प्रवास : नागपूर- वर्धा – यवतमाळ – माहूर – नांदेड

२३ जानेवारी २०१२
आजचा प्रवास : नागपूर- वर्धा – यवतमाळ – माहूर – नांदेड

नागपूर – पवनार आश्रम : ७० किमी
पवनार आश्रम – यवतमाळ : ८० किमी
यवतमाळ - माहूर : ७८ किमी
माहूर – नांदेड : १२७ किमी

आज मात्र सकाळी साडेसहावाजताच गाडीला किक मारली. नागपूर मध्ये असल्याने आता थंडीचा काही प्रश्न नव्हता. सकाळीच ६ वाजता उठून फ्रेश होऊन, आम्ही परमधाम आश्रमाची वाट धरली.
नागपूर सोडून आम्ही वर्धा रस्त्याला लागतो न लागतो तोच रस्त्याच्या उजव्या बाजूला एक माणूस पडलेला दिसला. स्वागतने लगेच बाईक थांबवली. जाऊन पल्स बघितली. काही हाती लागलं नाही. शरीर थंड पडलं होतं. बहुतेक रात्रीच्या वेळीच कुठल्यातरी अज्ञात वाहनाने ठोकरले असणार. आजूबाजूला दुचाकी वगैरे पण काही दिसलं नाही. प्रेताच्या बाजूला दगड ठेवले आणि १०० ला फोन करून माहिती दिली आणि पुढे निघालो. नागपूर ते परमधाम आश्रम हे अंतर साधारण ७० किमी आहे. सकाळीच निघालो असल्याने ९ च्या आतच आम्ही आश्रमामध्ये पोहचलो.

परमधाम आश्रमाविषयी थोडेसे :
या आश्रमाला परमधाम आश्रम / पवनार आश्रम / विनोबा भावे आश्रम या नावांनी ओळखतात.

15DSCN3877.JPG

पवनार हे महाराष्ट्रामधील वर्धा जिल्ह्यातील एक गावं. हे गावं धाम नदीच्या तीरावर वसले आहे. हा आश्रम विनोबांनी ज्या स्त्रिया आपलं आयुष्य साध्वी म्हणून व्यतीत करू इच्छितात अशा स्त्रियांसाठी हा आश्रम १९३४ साली सुरु केला. विनोबांनी भूदान चळवळीची सुरवात येथपासून केली. आश्रमातील महिला या आश्रमाला ब्रह्म विद्या मंदिर म्हणतात. सुमारे १५ एकर वरती हा आश्रम पसरलेला आहे. सध्या या आश्रमाचे व्यवस्थापक गौतम बजाज आहेत. या आश्रमामध्ये भारतातील एकमेव भरत-रामाचे मंदिर आहे. आश्रम हा सकाळी ४ ते १२ आणि दुपारी २ ते रात्री ८ या वेळातच उघडा असतो. आश्रमामध्ये, आश्रमाचे काम चालू असताना सापडलेली अनेक शिल्पे ठेवली आहेत.

वेळ असेल तर तुम्ही इथून जवळच असणारी सेवाग्राम आश्रमाला देखील भेट देऊ शकता.

साडेनऊ वाजता आम्ही आश्रम सोडला. आता पुढचा मुक्काम होता माहूर. १६० किमी अंतर अजून कापायचं होतं. पण रस्त्याने आणि गाडीने आम्हाला साथ दिली. जेवायला पण आम्ही अधेमधे थांबलो नाही. मे २०११ मधे पण याच रस्त्याने मी चंद्रपूरला गेलो होतो. माहूरच्या पायथ्याशी येऊन पण मला दर्शन घेणं जमलं नव्हतं. त्याची पूर्ती यावेळेस होणार होती.
माहूर गाठायला दुपारचा दीड वाजला. दुपार असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती. पटकन दर्शन झाले.

माहूर विषयी थोडेसे :
माहूर हे रेणुका देवीचं जन्मस्थान असल्याचं सांगितलं जातं. महाराष्ट्रात असणाऱ्या साडेतीन शक्तीपीठांपैकी हे एक. बाकीची खालीलप्रमाणे :
तुळजापूरची भवानी माता
कोल्हापूरची महालक्ष्मी
सप्तश्रुंगीची जगदंबा माता
येथे मंदिरासमोरच एक किल्ला आहे. श्रीरेणुकादेवीमंदिर, अनुसयामाता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर इ. धार्मिकस्थळे माहूरला आहेत. पण त्याचबरोबर ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी रामगड उर्फ माहूरचा किल्ला, माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, पांडवलेणी आणि राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुख यांचा वाडा अश्या अनेक ऐतिहासिक वास्तुसुद्धा माहूरमध्ये आहेत.

माहूरगड
15DSCN3930.JPGरेणुका माता मंदिर :
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. आख्यायिका-
एका कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले. जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती. राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली. ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही . तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही , हे साधून सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली. नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला . घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला. तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व “इथेच पित्यावर अग्निसंस्कार कर” असे सांगितले. परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले . या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले .
त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली. तो दु:खी होऊन शोक करत होता, तोच आकाशवाणी झाली. ' तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस.' परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते . तेवढेच परशुरामाला दिसले . या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते . परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ' मातापूर ' म्हणू लागले . शेजारच्या आंध्रप्रदेशात ' ऊर ' म्हणजे गाव ते ' माऊर ' आणि पुढे ' माहूर ' झाले.

दत्त मंदिर :
पुराणात हे दत्ताचें शयनस्थान असल्याचे सांगण्यात आले आहे. बाराव्या शतकांतील दत्तभक्त चांगदेव राऊळ यांना येथेंच दत्त साक्षात्कार झाला चांगदेव राऊळांच्याही पूर्वी या स्थानाची विशेष प्रसिद्धी होती. हे एक शक्तिपीठही आहे. परशुरामाची आई रेणुका येथे सती गेली, असे पुराणात म्हटले आहे. गुरुचरित्रात या स्थानाचे ओझरते उल्लेख आहेत.
माहूरच्या एका स्त्रीचा पती श्रीगुरूंनी संजीवित केला, अशी कथा गुरुचरित्रात (अध्याय ३०) आहे. महानुभाव संप्रदायांत माहूराचा महिमा विशेष आहे. 'स्थानपेथी'च्या काही प्रतीत तेराव्या शतकांतील माहूरविषयी विस्तृत वर्णन आले आहे. अलीकडच्या काळात विष्णुदासांचा निवास माहूर येथे होता. दासोपंतांनी बारा वर्षे या ठिकाणी तप करून दत्तप्रभूला प्रसन्न करून घेतले होते.
माहूरच्या तीर्थमहिम्यात देवदेवेश्वर (महानुभावीय दत्तस्थान), रेणुकादेवी, अनसूया, दत्तात्रेय या देवांची मंदिरे आणि अमृतकुंड, सर्वतीर्थ, कमलतीर्थ, शिखर ही स्थानें महत्त्वाची गणली जातात. दत्तात्रेयाचे मंदिर माहूरपासून सहा मैलांवर एका शिखरावर आहे. महंत मुकुंदभारती या नावाच्या महंतांनी सध्याचे मंदिर सन १२९७मध्ये बांधले. मूळ मंदिर फक्त १०' X१२' या आकाराचे आहे. त्यानंतर भोवतींच्या ओवऱ्या व प्राकार यांची बांधणी झालेली आहे.
या देवस्थानाला औरंगजेबाकडून अनेक जहागिऱ्या मिळालेल्या आहेत. देवस्थानाचे वार्षिक उत्पन्न पन्नास हजारांवर आहे. 'माळवातीर्थ' म्हणून ओळखले जाणारे तीर्थ म्हणजे महानुभावी साहित्यात व ज्ञानेश्वरांच्या अभंगांत उल्लेखिलेला मेरुवाळा तलाव होय.

वस्तुसंग्रहालय:
गावात एक छोटेखानी पुराणवस्तुसंग्रहालय आहे.त्यात कलाकुसरीच्या अनेक वस्तू व पुरातन शिल्पे ठेवली आहेत. त्यातील अंगठ्याएवढी बालाजीची मूर्ती पाहण्यासारखी आहे.
( विकिपीडियावरून साभार )

दुपारी २ वाजता आम्ही माहूरगड सोडला. आता थेट नांदेड गाठायचे होते. जवळपास १३० किमीचा पल्ला पार करायचा होता. आता पोटात देखील कावळे ओरडू लागले होते.
माहूर वरून राष्ट्रीय महामार्ग २०४ पकडायचा. हा मार्ग महागाव-उमरखेड मार्गे नांदेडला मिळतो.
महागावच्या आसपास पोटात भर टाकली आणि नांदेडकडे प्रस्थान केले. नांदेडमधे पोहचायला सव्वा सहा वाजले. पण नांदेडवासीयांनी मोहिमेच ज्या प्रकारे स्वागत नांदेड मधे केलं, त्याला तोड नव्हती. फटाके, हार-तुरे (अर्थात मी याच्या विरोधात आहे ) इत्यादी येनकेनप्रकारेण नांदेडवासीयांनी मोहिमेच स्वागत केलं. त्यांनी मोहिमेसाठी एक छोटेखानी सत्कार सभारंभ आयोजित केला होता. त्यात मोहिमेमाढल्या काही सदस्यांना तलवारी देण्यात आल्या. मग मोहिमेतल्या काही सदस्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
आणि आजपर्यंत मोहिमेमधलं सगळ्यात भारी जेवण. Happy
गाजराचा हलवा, पुरी , पापड, कोशिंबीर, मसाले भात, साधा भात वरण त्यावर साजूक तूप आणि अजून बरच काही. सगळ्यांनीच आज जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेतला.
आजचा मुक्काम श्री हजुरसाहीब गुरुद्वारा नांदेड येथे होता. नांदेड मधले गुरुद्वारा, त्यांची रोषणाई, स्वच्छता बघून खरंच डोळ्याचं पारण फिटत.
आज काही रात्रीची सभा वगैरे घ्यायच्या भानगडीत कुणी पडलं नाही, फक्त उद्याचा प्रवास नांदेड-परळी वैजनाथ-तुळजापूर-सोलापूर- पंढरपूर – पुणे असा अशक्यप्राय होता.
कारण वाटेत ३ मंदिरांना भेट होती आणि हे सगळं अंतर जवळपास ५६० किमी आहे. तेव्हा सर्वानुमते सोलापूरला मुक्काम करायचं नक्की झालं.

आजचा प्रवास : ३७० किमी
उद्याचा प्रवास : नांदेड-परळी वैजनाथ-तुळजापूर-सोलापूर

२४ जानेवारी २०१२
आजचा प्रवास : नांदेड-परळी वैजनाथ-तुळजापूर-सोलापूर

आजची सकाळ मात्र नेहमीसारखी नव्हती. गुरुजींचा राग आज शिगेला होता. कालच्या गाजराच्या हलव्याची धुंदी अजून सगळ्यांच्या डोळ्यात होती. आज गुरुजींनी मात्र आम्हाला अक्षरशः ढकलून खोली बाहेर काढलं. 
आम्ही पटापट सामान घेतलं आणि परळी वैजनाथच्या दिशेने गाडी सोडली.
नांदेड ते परळी वैजनाथ हा टप्पा १०५ किमीचा आहे. साधारण ९ च्या सुमारास आम्ही परळी वैजनाथ गाठलं, अर्थात हा चमत्कार गुरुजींनी पहाटे पहाटे बाहेर ढकल्यामुळेच शक्य झाला होता.
सकाळ असल्यामुळे मस्त दर्शन झालं.

परळी वैजनाथविषयी थोडसं :

परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामधील आंबेजोगाई तालुक्यात आहे. वैजनाथाचे मंदिर देवगिरीच्या यादवांचा श्रीकारणाधिप हेमाद्री याने बांधले असावे. त्या मंदिराच्या अवशेषांपैकी फक्त नंदीच सुस्थितीत राहिलेला दिसतो. पुढे अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्वार केला (१७८३), असा उल्लेख तेथील एका संस्कृत शिलालेखात आढळतो. हरिहर, मार्कंडेय, नारायण ही तीर्थे आणि शनैश्वर, झुरळ्या गोपीनाथ यांची मंदिरे तसेच संत जगमित्र नागा यांची समाधी या गोष्टी प्रेक्षणीय आहेत. वैजनाथ मंदिरास पश्चिम सोडून इतर तीनही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. मंदिराचा सभामंडप १९०४ मध्ये रामराव देशपांडे या दानशूर गृहस्थाने बांधला. सभामंडपात एक पितळी व दोन पाषाणी अशा नंदीच्या तीन मूर्ती आहेत. येथे वीरभद्राची एक भव्य पितळी प्रतिमा आहे. मंदिरात मंडपाशिवाय दोन गाभारे असून त्यांचे दरवाजे कलात्मक नक्षीने सजविलेले आहेत. मुख्य ज्योतिर्लिंगाच्या सभोवताली असलेल्या बारा लिंगांमुळे बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडते. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैजनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.

आम्ही दर्शन घेऊन बाहेर येउपर्यंत संग्रामने गोड बातमी दिली. तुळजापूरकडे जाताना वाटेतच धारूर नावाचं एक गावं लागतं. ते संग्रामच आणि रोहनच गावं. त्यामुळे दुपारचं जेवण त्याच्याकडे करायचं ठरलं. आता आम्ही आमचा मोर्चा धारूर कडे वळवला. वाटेत चुकामुक होऊ नये म्हणून स्वागत-संग्राम आणि रोहन आणि मी असं जायचं ठरलं.
खरंतर रोहन बरोबर जायचं हि माझी खूप मोठी घोडचूक. कारण रोहन्या बाईक चालवणार म्हणजे तो शूमाकरला पण ओवरटेक करू देणार नाही. मी हनुमान चालीसा म्हणतच रोहण्याच्या मागे बसलो.
तेवढ्यात संग्रामने मटण चालेल ना ? असा निरर्थक प्रश्न केला.
पण आता तुळजापूरला जायचं ना ? मी उत्तरलो.
संग्राम फोनवरच होता. आई, तुळजापूरला चालत का मटण खाऊन गेलेलं?
आता संग्रामच्या आईनेच हो उत्तर दिल्यामुळे आमचा काही प्रश्नच नव्हता.
(हा भाग शुद्ध शाकाहारी लोकांनी वाचू नये, फक्त शुद्ध मासांहारी लोकांनी वाचावा. Happy )

धारूरला जायला अंबेजोगाईनंतर कैज गावामधून उजवीकडे वळायचे.
वाटेत आम्हाला शाळेला निघालेल्या चिमुरड्या भेटल्या. जानेवारी महिना असल्यामुळे गॅदरिंगचे दिवस चालू होते. त्यामुळे सगळ्याजणी साड्या घालून नटूनथटून निघाल्या होत्या. मग त्यांचे थोडे फोटो काढले. आता साधारण ८ फुटी रस्ता होता आणि रोहन्याला नको नको म्हणतं असताना, हा पठ्ठ्या ९०-१०० ने बाईक मारत होता.
आणि अचानक समोर रस्ता काटकोनातून उजवीकडे वळताना दिसला.
मला गाडीवरून उडी मारावी असं वाटू लागलं, पण त्यामुळे गाडीचा तोल अजूनच बिघडणार होता. डाव्या बाजूला १०-१५ फुट खाली शेत होते. मी Arm Guard आणि Knee Guard अनुक्रमे कोपरातून आणि गुडघ्यातून थोड वाकवल, जेणेकरून पडलो तरी त्याच्यावर पडावं. गाडी वेगात असल्यामुळे ब्रेक पण नीट मारता येईना.
देवाच्या कृपेने गाडीचे ब्रेक लागले, गाडी वाकडी तिकडी होत का होईना रस्त्याच्या खाली जाऊन थांबली. पण बाईक इतकी टोकावर जाऊन थांबली होती कि आमचा डावा पाय खाली टेकत नव्हता, आम्ही कसाबसा उजवा पाय खाली टेकवला, गाडी हळूहळू खाली झोपवली आणि रस्त्याकडेला आलो. दोघांच्या हृदयाचे ठोके, एकमेकांना ऐकू येत होते.
खाली उतरून नॉर्मल झाल्यावर आम्ही बाईक सुरु केली. हनुमान चालीसा पावला होता. अजून एक अपघात होता होता वाचला होता.
थोड्याच वेळात धारूरला पोहचलो. साडे अकरा वाजले होते, अमृतसर वरून आणलेल्या तलवारी संग्रामच्या घरी दिल्या.
धारूर गावात एक किल्ला आहे. हा धारूरचा किल्ला म्हणूनच प्रसिद्ध आहे.

धारूरविषयी थोडेसे :
धारूर हे नाव, गावाच्या भौगोलिक स्थानामुळे देण्यात आले आहे. डोंगर धारेवरील स्थान म्हणून धारूर असे नाव पडले आहे. गावाचे ग्रामदैवत धारेश्वर असून, गावात त्याचे मोठे हेमांडपंथी मंदिर आहे. येथे असणाऱ्या मजबूत किल्ल्यामुळे मोघलकाळात गावाला मोठे महत्व होते. काही लोकं राजा धारसिंहामुळे गावचे नाव धारूर पडले असेही सांगतात, पण याला पुरावा नाही. उत्तर मध्ययुगीन काळात चंदीप्रसाद मिश्रा, स्वरुपसिंह जहारी, रामचंद्र शेटे, प्रमोद शेटे, सद्दिवाले यांचे पूर्वज इथे आले आणि त्यांनी वस्त्या वसवल्या. पूर्वी गावात पाणी पुरवठ्यासाठी हरिणपीर विहीर व रंगारोनी विहीर यांचा वापर केला जात असे. यापैकी काही विहीरीवर शिलालेख कोरलेले आहेत. उत्तर मध्ययुगामध्ये बांधण्यात आलेला एक महाल कलावंतिणीचा महाल म्हणून ओळखला जातो. गावाच्या बाहेर एक स्वतंत्र वास्तू चेकपोस्ट स्वरूपात उभारण्यात आली होती. आज गावात उभे असलेले प्रमुख प्रवेशद्वार आणि मशीद तत्कालिन कला वैभवाची साक्ष देतात. संपूर्ण गाव दगडी तटबंदीने बंदिस्त होते.
मुर्तजा निजामाने धारूरचे नाव बदलून फतेहबाद ठेवले होते, स्वातंत्र्यानंतर येथील जनतेच्या प्रयत्नामुळे ५ मे १९७२ रोजी पुन्हा ते धारूर करण्यात आले.

धारूरच्या किल्ल्याचा थोडासा इतिहास :
किश्वरखानने धरुरचा किल्ला बांधला अशी नोंद आढळते. अब्दुल हमीद लाहरी याने हा किल्ला सहजा सहजी जिंकणे अशक्य असल्याची नोंद केली आहे. किल्ला बांधत असताना अंकुश खान याने किश्वर खानला अनभिज्ञ ठेऊन किल्ल्याचा काही भाग जाणीवपूर्वक पोकळ ठेवला व याच मार्गाने निजामशाही सैन्याने किल्ल्यात प्रवेश करून किश्वर खानचा वध केला.
मुर्तजा निजामशहाला धारूर किल्ल्यात अलोट संपत्ती मिळाली होती.
शहाजहान बादशहाचा सेनापति अजिमखान यानें अहमदनगरपासून धारूरचा किल्ला घेतला तेव्हां महमद आदिलशहा यानें आपला सेनापति रणदुल्लाखान यास पाठवून, मोंगल व विजापूरकर यांच्यामध्यें मलिकंबराच्या वेळीं झालेल्या एका गुप्त तहानुसार तो किल्ला आपल्या स्वाधीन करण्यांत यावा अशी अजिमखानास विनंती केली. यावर विजापूरकरांनी कराराप्रमाणें अहमदनगराचें राज्य घेण्याच्या कामीं मोंगल बादशहास मदत केली नसल्यामुलें या किल्ल्यावर त्यांचा हक्का पोहोंचत नाहीं असें अजिमखानानें उत्तर दिलें. याच वेळीं निजामशहानें आदिलशहास सोलापूरचा किल्ला परत करुन मोंगलापासून संरक्षण करण्याकरितां त्याची दोस्ती संपादन केली. परंतु त्यांचें कारस्थान परिवक्कदशेस येण्यापूर्वींच रणदुल्लाखान व मोंगल सैन्य यांमध्यें लढाई होऊन तींत विजापूरच्या सैन्याचा पराभव झाला (१६३१).

शिवकालात विठोजी राजे भोसले तसेच नेताजी पालकर या किल्ल्यात राहिल्याच्या नोंदी सापडतात.

अमृतसरचा मेवा Happy
15DSCN4043.JPG

येथेच्छ मटणाचा आस्वाद घेतला आणि तुळजापूरला कूच केली.
धारूर ते तुळजापूर अंतर ११३ किमी आहे. तुळजापूरला पोहचायला दुपारचे ३ वाजले होते. मोहीमपण नुकतीच पोहचली होती. आम्ही गाभाऱ्यात जाण्याच्या फंदात पडलो नाही. खूप गर्दी होती.

तुळजापूरविषयी थोडेसे :

साडेतीन शक्तीपीठांपैकी हे आद्य शक्तीपीठ मानले जाते. हे मंदिर बालाघाट डोंगराच्या पठारावर बांधले गेले आहे. या डोंगराचे पूर्वीचे नाव यामुनागिरी असे होते. नंतर येथे खूप मोठ्या प्रमाणात चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचगिरी असे झाले. नंतर तुळजाभवानीच्या नावामुळे तुळापूर / तुळजापूर या नावाने ओळखले जाऊ लागले.
देवीबाबत सांगण्यात येणारी आख्यायिका अशी : कृतयुगात कर्दभ नावाचे एक ऋषी होते. त्यांची पत्नी अनुभूती, सुंदर आणि पतिव्रता होती. कर्दभ ऋषी मरण पावल्यानंतर सती जायला निघालेल्या अनुभूतीला, इतर ऋषींनी अल्पवयीन मुलाला मागे सोडून सती जाणे हे शास्त्राला धरून नसल्याचे पटवून दिले आणि तिला सती जाण्यापासून परावृत्त केले. त्यानंतर अनुभूतीने तिच्या मुलाला गुरुग्रही सोडून, मेरुपर्वताजवळ असलेल्या मंदाकिनी नदीजवळ तपश्चर्या सुरु केली. तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिला त्रास देऊ लागला. दैत्याच्या तावडीतून सुटका व्हावी म्हणून तिने आदिशक्तीचा धावा सुरु केला, कुकर दैत्य हा महिषेचे रूप घेऊन आला होता, तर आदिशक्ती हि भवानी मातेच्या रुपात आली. देवीने त्रिशूळाने त्याचे शीर धडावेगळे केले. देवी तिच्या मदतीला त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नावं पडले. नंतर त्याचा अपभ्रंश तुरजा, तुळजा असा झाल्याचे सांगतात.

मंदिरात जाताना पायऱ्या उतरल्यानंतर महाद्वार लागते. हे महाद्वार हेमांडपंथी असून त्यावर नारद मुनींचे शिल्प आहे. आतमध्ये कल्लोळ तीर्थ आणि गोमुख तीर्थ आहे.
कल्लोळ तीर्थ : देवी इथे आल्यानंतर, जेव्हा तिने इथे तीर्थाची निर्मिती केली, तेव्हा पृथ्वीवरील सर्व तीर्थे येथे धावून आली. म्हणून हे तीर्थ कल्लोळ तीर्थ म्हणून ओळखले जाते.
पुढे गेल्यावर अमृतकुंड आहे. त्याच्या शेजारीच सिद्धिविनायक मंदिर आहे. नंतर निंबाळकर दरवाजा आहे. दरवाजा ओलांडून गेले असता कळस दिसतो.हा कळस पंचधातूपासून बनविला आहे.मंदिराच्या पुढील बाजुस होमकुंड आहे व त्यावर शिखर बांधले आहे. सभामंडप सोळाखांबी असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे.ऐतिहासिक व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.

गाभा-याचे मधे भवानी मातेची मूर्ती असून ती गंडकी शिळेचा वापर करून बनवण्यात आलेली आहे. ती चांदीच्या सिंहासनावर आरूढ असून तिने डाव्या हातात महिषासुराची शेंडी धरली आहेत. तर उजव्या हाताने त्याच्या छातीत त्रिशूळ खुपसला आहे. तिच्या उजव्या पायाखाली महिषासूर व डाव्या बाजुला सिंह आणि पूराण सांगणारी मांर्केडेय ऋषीची मुर्ती आहे. देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला आहे.देवीला स्पर्श करता येत नाही.देवीची पूर्वी 3 वेळा पूजा केली जात असे. आता मात्र सकाळ-संध्याकाळ अशी 2 वेळा पूजा केली जाते.‍ गाभा-याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग आहे.तसेच दक्षिण दिशेला देवीचे न्हाणीघर आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी व भाद्रपद वद्य अष्ट्मी ते अमावस्या अशी देवीची तीन शयन वर्षे ठरली असून इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते.(असे इतरत्र आढ्ळत नाही)
सभामंडप ओलांडल्यावर पूर्वेला भवानी शंकराची वरदमूर्ती ,शंकराचे स्वयंभू पिंड ,पाठीमागे नंदी, नंदीवर भवानीशंकराचा मुखवटा व त्यावर पंचनागाचा उभारलेला फणा आणि सतत तेवत असणारा नंदादीप दिसतो. मंदीराचे परिसरात श्रीनृसिंह ,खंडोबा ,चिंतामणी या देवतांच्या मूर्ती आहेत.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस मान आहे. शिवाजीमहाराज यांच्या घराण्याची ही कुलदेवता. एका आख्यायिकेनुसार देवीने महाराजांना स्वप्नात दृष्टांत देऊन भवानी तलवार दिली होती. जुनी मूर्ती अफजलखानाने फोडली. त्यामुळे नंतर ही नवीन मूर्ती महाराजांनी घडविल्याचे सांगतात.

मंदिरात प्रवेशासाठी राजा शहाजी व राजमाता जिजाऊ यांच्या नावे दोन द्वारे आहेत. मुख्य दाराच्या पहिल्या मजल्यावर श्री संत ज्ञानेश्वर धार्मिक ग्रंथालय व श्री संत तुकाराम धार्मिक ग्रंथालय आहे. ग्रंथालयांना लागूनच श्री समर्थ विशेष हे विश्रामगृहही आहे. महाद्वारातून प्रवेश करताना तुळजा भवानी मंदिर न्यासाचे कार्यालय व राजा शाहू प्रशासकीय सदनाच्या कार्यालयांसोबतच भारतीय स्टेट बँक व उपडाकघर आहे. मंदिरात नारळ फोडण्यास मनाई आहे. मंदिराच्या आवारात छायाचित्रणाची परवानगी नाही.

तुळजापूरच्या आसपासची काही प्रेक्षणीय ठिकाणे :
काळभैरव: हे स्थान काशी प्रमाणेच डोंगराच्या कड्यावर आहे.भोवताली झाडी असून पावसाळ्यात उंचावरून पाणी पडते.
आदिमाया व आदिशक्ति: देवळाच्या मुख्य व्दाराजवळ उजव्या हाताकडे आदिमाया व आदिशक्ति ही देवता आहे.
पापनाश तीर्थ:येथे स्नान केल्याने लोकांचे पापातून सुटका होते. अशी लोकांची धारणा आहे.
रामवरदायिणी : येथे रामवरदायनी नावाची देवी असून जेव्हा श्री रामचंद्र वनवासात गेले होते. तेव्हा सितेला शोधण्यासाठी रामचंद्र येथे आले असते या देविने त्यांना वर दिला व योग्य मार्ग दाखवीला.याच्या मागच्या बाजूस चंद्रकुंड व सूर्यकुंड नावाची पाण्याची ठिकाणे आहेत.
भारतीबूवाचा मठ: देवळाच्या मागील बाजूस म्हणजे शिवाजी दरवाजा उतरून खाली गेल्यावर हा मठ लागतो.याचे मुळ पूरूष रणछोड भारती. यांच्यासोबत श्रीदेवी सरिपाट खेळत असे. मठ जुना,मजबूत व प्रेक्षणीय आहे.
गरीबनाथाचा मठ: हया मठात गोरगरीबांना सदावर्त दिले जात होते. हा मठ सध्या खड्काळ गल्लीत आहे.
नारायणगिरीचा मठ: हा मठ दशनामगिरी गोसाव्याचा होता. सध्या हा क्रांती चौकात आहे.
मंकावती तीर्थ: मंकावती कुंड हे तुळजापूरातील एक मोठे पवित्र कुंड आहे.असे म्हणतात की या कुंडात स्नान केल्याने अंग पवित्र होते. याला विष्णू कुंड असेहि म्हणतात.यावर महादेवाची पिंड आहे.तसेच मोठे मारुती मंदीर आहे.त्याचबरोबर याज्ञवाल्यक्य ऋषींचा आश्रम आहे
धाकटे तुळजापूर: येथून जवळच धाकटे तुळजापूर हे गाव आहे. या ठिकाणी तुळजा मातेची बहीण वास्तव्य करते.

आता आजच्या दिवसाचा शेवटचा टप्पा होता. तुळजापूर ते सोलापूर हे अंतर ५० किमी आहे. साधारण ४ वाजता आम्ही तुळजापूर सोडले आणि तासाभरात सोलापूरला पोहचलो.
आजचा मुक्काम खरंतर पुण्यात होता, पण अंतर जास्त असल्याने सोलापुरात मुक्काम करायचं ठरलं होतं.
त्यामुळे सोलापुरात मुक्काम आणि जेवणं याची काहीच सोय नव्हती. पण सुदैवाने काही सोलापूरकर मोहिमेमध्ये होते. त्यात एका सोलापूरच्या शाळेतील मुख्याध्यापकही होते. त्यांनी एक नामी शक्कल लढवली. मतदान करण्याबाबत जागृती करण्यासाठी त्यांनी त्यांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना बोलावले होते व त्याचबरोबर आम्ही देखील या कार्यक्रमात सहभागी असल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे कोल्हापूर मधेही मोहिमेचे जंगी स्वागत झाले. स्वागताला जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक सारख्या मोठ्या व्यक्ती उपस्थित होत्या. मग आम्ही देखील हुतात्मा चौकात झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालो.

त्यांच्यामुळे झोपायचा प्रश्न मिटला. त्यांच्याच शाळेत आम्ही आमच्या बॅगा टाकल्या.
आणि जेवणासाठी सिद्धेश्वर धावून आला. त्या दिवशी काही कार्यक्रमाच्या निमित्ताने सिद्धेश्वर मंदिरात महाप्रसाद होता. मग सगळी मोहीम मंदिरातच जेवून परतली.
आज जवळपास मोहिमेचा शेवटचा दिवस असल्यातच जमा होता. बरेचसे लोकं, ज्यांची गावं वाटेत होती, ते आपापल्या घरी परतले होते. काळे काका- काकू पण तुळजापूरवरून घरी गेले होते.
गेले २२ दिवस सुरु असलेल्या प्रवासाची उद्या अखेर होणार होती. खरतरं घरी जाऊच नये असं वाटत होतं. आयुष्यातला एक अविस्मरणीय प्रवास संपत आला होता.
आज रात्रीच्या सभेमध्ये उद्या पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधिनीमधे कार्यक्रम असल्याचे समजले. आज मात्र झोप लागता लागतं नव्हती. मोहिमेमध्ये अनुभवलेले सगळे क्षण डोळ्यासमोर येत होते. रात्री कधीतरी डोळा लागला.

आजचा प्रवास : ३७२ किमी
उद्याचा प्रवास : सोलापूर – पंढरपूर – पुणे

२५ जानेवारी २०१२
आजचा प्रवास : सोलापूर – पंढरपूर – पुणे

आज चक्क गुरुजींनी कोणालाच उठवलं नाही, पण प्रत्येकजण स्वतःहून उठला होता. आज एकदम नीट आवरलं. सोलापूरकरांना निरोप दिला आणि पंढरपूरकडे प्रस्थान केलं. सोलापूर ते पंढरपूर अंतर ६८ किमी आहे. पण सोलापूर म्हटलं कि स्वागत तिथला लांबोटीचा चिवडा खाण्यासाठी थांबणारच, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, त्यामुळे आमचा पहिला थांबा “लांबोटीचा चिवडा” इथेच झाला. आणि मग नेहमीप्रमाणे स्वागतने तो कित्ती वर्षापासून हा चिवडा खातोय आणि तो किती भारी आहे हे मला परत ऐकवलं. घड्याळात बघितलं तर साडे सहाच वाजले होते. आम्ही आज जरा लवकरच निघालो होतो. मग आम्ही मनसोक्तपणे लांबोटीचा मक्याचा चिवडा खाल्ला, चहा पिला आणि पुढे निघालो. सोलापूर ते लांबोटी हे अंतर २५ किमी आहे.
मक्याचा चिवडा खरंच भारी आहे, शिवाय तिथे अनेक प्रकारच्या चटण्या पण मिळतात. आता उड्डाण पूल झाल्यामुळे ते हॉटेल खाली राहिले आहे. त्यामुळे थोडे फिरून जावे लागते.
मोहोळला अमोल राहत असल्याने मग परत त्याच्या घरी गेलो. लांबोटी – मोहोळ हे अंतर १० किमी आहे. तिथे परत चहा-पोहे झाले. अमोलला निरोप दिला. त्याच्या आईला अगदी न चुकता, तुमच्या मुलाने रोज न चुकता अंघोळ केली हे सांगितलं. खरंच या प्राण्याने रोज न चुकता गेले २३ दिवस, कडाक्याची थंडी असू अथवा गार पाणी असू , अंघोळ केली होती. माझ्यामते हाच एकमेव प्राणी आमच्यात असावा कि ज्याने रोज अंघोळ केली.
अमोलला निरोप देता देता १० वाजले आणि आम्ही विठुरायाच्या दर्शनाला निघालो. पंढरपूर अजून ६० किमी होतं.
वाटेत टेंबुर्णी फाट्यावर स्वागतने बाईक थांबवली.
का रे ?
अरे भाऊ येतोय, कपडे घेऊन.
स्वागतचा भाऊ अकलूजवरून स्वागतचे कपडे घेऊन येतं होता.
नशीब तो लगेचचं आला. मग स्वागतने त्याचे नवे कपडे देऊन जुने घेतले का जुने देऊन नवे असा काहीतरी प्रकार केला. तसं पाहिलं तर अकलूज काही लांब नव्हतं, पण स्वागतच लॉजिकच वेगळे असते.
साधारण साडे अकरा वाजता आम्ही पंढरपुरात दाखल झालो. मोहीम कधीचं पुढे निघून गेली होती. आज काही जास्त गर्दी नव्हती. सगळ्यांना पटापट दर्शन मिळालं.

विठ्ठल मंदिराविषयी थोडसे :
पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपुरातील विठ्ठलमंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणतात
पंढरपूरमध्ये वर्षातून चार एकादश्यांना चार यात्रा भरतात - चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत १०-१५ लाख भाविक सहभागी होतात. मराठी संस्कृती घडविणाऱ्या थोर भागवतधर्मीय संतांनी नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र. येथील विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे.
पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे. शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इ.स. ८३मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपटांवरून इ.स. ५१६ मध्ये राष्ट्रकूटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इ.स. १२३९ च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे. पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. १२९६ मध्ये चालू झाली; तर इ.स. १६५० मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणाऱ्या पालखीची प्रथा पाडली.
देऊळ व मूर्ती यांवर अनेकदा मुसलमानी आक्रमणे झाली व प्रत्येक वेळी मंदिर परत बांधण्यात आले. काहींच्या मत हे स्थान मूलतः शिवाचे होते तर वैष्णव पंथीय हे विष्णूचे स्थान मानतात. जैन धर्मीय यास नेमीनाथ समजतात तर बौद्धांच्या मते हा अवलोकितेश्वर आहे. सूर्याचा अंशही या दैवतास मानतात.
दगडी तटबंदीमागे हे देवालय एका टेकडावर आहे. सुमारे ५२ मीटर रुंद व १०६ मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पूर्वेकडे तीन, उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक द्वार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून, ज्या अकरा पायऱ्या चढून गेल्यावर ते लागते त्यांतील एका पायरीला `नामदेव पायरी' म्हणतात. कोपऱ्यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे. महाद्वारावर सिंह, कमानी, वेकपत्ती वगैरे चुनेगच्ची नक्षीकाम आहे. मंडप १८ मीटर रुंद व ३७ मीटर लांब असून बाजूस ओवऱ्या व सुंदर लाकडी कोरीवकाम दिसून येते. सुमारे १० मीटर उंचीच्या दोन दीपमाळा व जवळच विष्णुवाहन गरुड व हनुमान यांची मंदिरे आहेत. पुढील सोळा-खांबीत एका लहान सभामंडपातून जाता येते. येथील दाराचे बाजूस सुरेख जय-विजय व तीन पायऱ्या असून त्यापैकी एक पितळी पत्र्याने मढवली आहे. डाव्या बाजूस खजिन्याची खोली आहे. सोळा-खांबीचे दगडी खांब कोरीव असून भाविकांच्या आशयाचा गरुडस्तंभ चांदीच्या पत्र्याने मढविला आहे. आत प्रवेश करतना उजव्या हातास संत एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराजांची समाधी आहे. सभामंडपाच्या उत्तरेकडे एक ओवरी असून त्यात काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, रामेश्वर, दत्तात्रेय आणि नरसोबा यांच्या देवळ्या आहेत.
चांदीचे नक्षीदार पत्रे चौखांबीच्या दरवाजास लावले आहेत. पूर्वेकडे शेजघर असून एका लहान अंतराळानंतर दोन मीटर चौरस गाभारा लागतो. रुक्मिणी मंदिरासारखी इतर लहान मंदिरे परिसरात आहेत. विठ्ठलाचेच परमभक्त पुंडलीक याची समाधी महाद्वार घाटावर आहे. त्रैलोक्यनाम भवन, तनपुरे मंडप वगैरे इतर महत्त्वाच्या वास्तू पंढरपुरात आहेत.
देवळास समांतर पूर्वेकडे जाणाऱ्या गल्ल्या घाटाकडे जातात. सर्व बाराही घाटांचा वापर वारकरी करतात. त्यातील उद्धव, चंद्रभागा, दत्ता व अमळनेरकर घाटांचा वापर प्रामुख्याने होतो. महाद्वार घाट हा उत्सवासाठी महत्त्वाचा आहे. नदीला पाणी कमी असताना नदीच्या पात्राजवळची जागा वारकरी उतरण्यास तसेच भजनकीर्तनास वापरतात. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फड वगैरेमधून अनेक भक्त व वारकऱ्यांची सोय होते व सर्व पंढरपुरात भाविकांची वर्दळ असते.
विठोबावे व रुक्मिणीचे अनेक मौल्यवान अलंकार असून ते विशिष्ट वेळी देवास घालतात. देवाच्या काकडआरतीपासून शेजारतीपर्यंत नित्य व नैमित्तिक असे अनेक पूजोपचार असतात. यात्रेच्या वेळी गर्दीमुळे पांडुरंगाचे दर्शन झाले नाही, तर देवालयाच्या शिखराच्या दर्शनाने भाविक लोक समाधान मानतात.
चंद्रभागेचे वाळवंट, पंढरपूर व तेथील विठोबा यांचा इतिहास व त्यांच्या नावांची व्युत्पत्ती यांबद्दल अनेक मते आणि वाद आहेत. पंढरपूरला पांडरंगपल्ली, पंडरंगे, पौंडरीकक्षेत्र, फागनिपूर, पंडरीपूर, पांडुरंगपूर, पंढरी अशी नावे निरनिराळ्या वेळी दिलेली आढळतात. पंढरपूरचा पांडरंगपल्ली या नावाने सर्वांत जुना उल्लेख राष्ट्रकूट राजा अविधेय याने नोव्हेंबर ५१६ मध्ये जयद्विट्ठ नावाच्या ब्राह्मणास दिलेल्या ताम्रपटात आढळतो. सोळखांबी मंडपाच्या पूर्वद्वारासमोरील दगडी तुळईच्या तिन्ही बाजूंवर देवनागरी लिपीत आणि संस्कृत व कानडी भाषांतील शिलालेखांत पंढरपूरला पंडरंगे म्हटले असून, होयसळ वीर सोमेश्वर याने विठ्ठलदेवाचे अंगभोग आणि रंगभोग यांसाठी आसंदी नाडामघील हिरिय गरंज (कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यातील कडूर तुलाक्यातील हिरे गरंजी गाव) हे गाव दान केल्याचे म्हटले आहे.बेळगावजवळच्या बेंडेगिरी गावाच्या संस्कृत ताम्रपटात पंढरपुरास पौंडरीकक्षेत्र आणि विठोबास विष्णू म्हटले आहे. इतिहासकार रा. ज. पुरोहित व डॉ. रा. गो. भांडारकर अनुक्रमे पुंडरीकपूर वा पांडुरंगपूर यांपासून पंढरपूर हा शब्द व्युत्पादितात. चौऱ्याऐंशीच्या शिलालेखात (१२७३) पंढरपुरास फागनिपूर व विठेबास विठ्ठल किंवा विठल म्हटले आहे. १२६० ते १२७० च्या दरम्यानच्या हेमाद्रीच्या चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथात पंढरपूरला पौंडरीक व विठोबाला पांडुरंग संबोधिले आहे. १२५८ च्या सुमारास चौंडरस या कानडी कवीने आपल्या अभिनव दशकुमारचरिते ग्रंथात पंढरपूर, विठ्ठल मंदिर व तेथील गरुड, गणपती, क्षेत्रपाल, विठ्ठल, रुक्मिणी यांचे वर्णन केले आहे. चोखामेळ्याच्या समाधीजवळच्या १३११ च्या मराठी शिलालेखात पंडरिपूर व विठल आणि विठ्ठल असे उल्लेख आढळतात.
विठोबाच्या मूर्तीचे अनेकवेळा स्थानांतर झाल्याचे उल्लेख सापडतात. कधी आक्रमकांपासून बचावण्यासाठी ती बडव्यांनी लपवून ठेवली होती, तर कधी कोणी ती पळवून नेऊन मग पैसे घेऊन परत केली होती. सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती; पण ती एकनाथांचे पणजोबा भानुदास यांनी परत आणली, अशी कथा आहे. विठोबाची मूर्ती भिलसाजवळील उदयगिरी लेण्यातील तिसऱ्या शतकातील मूर्तीसारखी दिसते असे म्हणतात. तथापि निरनिराळ्या काळी निरनिराळ्या लोकांनी केलेल्या विठ्ठलमूर्तीच्या वर्णनाशी सध्याच्या मूर्तीचे वर्णन जुळत नाही. विठोबाचे हल्लीचे देऊळ फार जुने नाही. महाद्वार व बाकीचे देऊळ यांच्या रचनेत विसंगती आहे. मराठेशाहीत विठ्ठलमंदिरासाठी अनेक दाने दिल्याचे उल्लेख आढळतात. तथापि हे मात्र खरे, कीसंत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा इ. मराठी संतांनी पंढरपूरचा महिमा वाढविला व गाजविला. महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने येतात. त्यामुळे प्रादेशिक संस्कृतींचा समन्वय आणि मराठी-कानडी सामांजस्याचा दुवा सांधला जातो
वारकऱ्यांची टाळमृदंगाच्या गजरात व विठ्ठलाच्या नामघोषात वारकऱ्यांच्या दिंड्या एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात. झेंडे, तुताऱ्या. सजवलेला स्वारीचा घोडा, अब्दागीर, पालख्या, इतर घोडे, बैलगाड्या यांचे ताफे व डोक्यावर तुळशीवृंदावन किंवा सामानाची गाठोडी घेतलेल्या मराठमोळ्या स्त्रिया या सर्वांच्या गर्दीने पंढरपुरात उत्सवी वातावरण निर्माण होते.
चैत्री वारीच्या वेळी पंढरपुरात म्हशी-गाईंचा मोठा बाजार भरतो. यात्रेच्या वेळी उदबत्ती, हळद, कुंकू, खेळणी, फुले, माळा, बांगड्या, देवाच्या मूर्ती, तांब्या-पितळेची भांडी वगैरे अनेक वस्तूंची दुकाने सर्व ठिकाणी मांडली जातात व मोठा व्यापार होतो.
इ.स. १८१० मध्ये सांगलीच्या पटवर्धनांच्या प्रोत्साहनाने रथयात्रा व राजपूजा होऊ लागली. आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला दुपारी खाजगीवाले वाड्याजवळ ग्रामप्रदक्षिणेला सुरवात होते. समोर हत्ती व घोडे असलेला हा रथ भाविक ओढतात. आंत विठ्ठल, राही व रुक्मिणीच्या मूर्ती असतात.
या ‘भक्तिसंप्रदायाच्या आद्यपीठा’त आणि ‘भीमातटीय महायोगपीठा’त महाराष्ट्राच्या सर्व भागांतून आणि कर्नाटकादी इतर राज्यांतूनही प्रतिवर्षी आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशांस हजारो वारकरी आणि यात्रेकरू लोटतात. चैत्रातील व माघातील यात्रा त्या मानाने लहान असतात.
विठ्ठलमंदिर हे अर्थातच गावातील सर्वप्रमुख मंदिर आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. पंढरपुरास भीमा (भीवरा) नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे; म्हणून तिला ‘चंद्रभागा’ म्हणतात. तिच्या वाळवंटात पुंडलिकाचे देवालय (समाधी) आहे. येथून विठ्ठलमंदीर सु. २०० मी. आहे. मध्यवस्तीतील हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची पूर्व-पश्चिम लांबी सु. १०७ मी. व दक्षिणोत्तर रूंदी सु. ५२ मी. आहे. देवळास तटबंदी असून त्याला पूर्वेस तीन, दक्षिणेस एक, पश्चिमेस एक व उत्तरेस तीन असे एकूण आठ दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरून पोहोचण्यास बारा पायऱ्या आहेत. त्यांतील पहिली पायरी ही नामदेव पायरी होय. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात. या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोपऱ्यात संत चोखामेळा याची समाधी आहे. नामदेव दरवाजाने आत जाताच छोटा मुक्तिमंडप आहे. तेथे डाव्या हातास गणपती व महाद्वाराच्या माडीवर नगारखाना आहे. नंतरच्या चौकात तीन दीपमाळा व प्रल्हादबुवा बडवे आणि कान्हया हरिदास यांच्या समाध्या आहेत. तसेच येथे गरुडाचे व समर्थ रामदासांनी स्थापिलेल्या हनुमंताचे मंदिर आहे. यानंतरच्या अरूंद दगडी मंडपाच्या (सोप्याच्या) भिंतीत तीन दरवाजे आहेत. मधल्या दरवाज्याच्या दोन बांजूंस जयविजय हे द्वारपाल व गणेश आणि सरस्वतीआहेत. मघल्या दारातून आपण सोळखांबी मंडपात जातो. तेथे छतावर दशावताराची व कृष्णलीलेची चित्रे आहेत. बाजूच्या खोलीवजा दालनांत काशी विश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, दत्तात्रेय, नरसोबा यांच्या मूर्ती आहेत. दूसरा खांब सोन्याचांदीने मढविलेला असून त्यावर छोटी विष्णुमूर्ती आहे. येथे पूर्वी गरुडस्तंभ होता असे सांगतात. या खांबाला मिठी घालून मग पुढे जातात. यानंतर चौखांबी मंडप आहे. तेथे उत्तरेस देवाचे शेजघर आहे. नंतरची चौरस जागा ‘कमान’ नावाची असून त्यानंतर गर्भागार आहे. तेथे सिंहासनावरील विटेवर पांडुरंगाची दगडी मूर्ती असून तिची उंची एक मी. पेक्षा किंचित जास्त आहे. १८७३ मध्ये काही शैव बैराग्यांनी धोंडा मारल्यामुळे मूर्तीचा पाय दुखावला होता; तेव्हापासून पायांस न कवटाळता त्यांवर फक्त डोके ठेवू देतात. सोळखांबी मंडपाच्या दक्षिण दरवाजाबहिर एका ओसरीत चार मूर्ती, एक तरटीचे झाड व त्याच्या पायाशी कान्होपात्रेची मूर्ती, नंतर व्यंकटेशमंदिर, त्यासमोर नागोबा, बाजीराव पेशव्याने बांधलेली ओवरी तसेच लक्ष्मिमंदिर आहे. ओवरीत नारद व कोपऱ्यात रामेश्वर यांच्या मूर्ती असून पश्चिमेच्या भिंतीत सूर्य, गणेश, खंडोबा व नागोबा यांच्या मूर्ती आहेत. विठ्ठलमंदिरामागे वायव्येस रुक्मिणीमंदिर आहे. जवळच सत्यभामा व राही यांच्या खोल्या आहेत. सभामंडपाच्या पायऱ्या चढून आल्यावर समोर सुवर्णपिंपळ आहे. येथून पुन्हा सोळखांबी मंडपात आले म्हणजे एका भिंतीत ‘चौऱ्याऐंशीचा शिलालेख’ असून त्यावर देवी आहे. जन्ममरणांच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी लाखो भाविकांनी या शिलालेखाला पाठ घासल्यामुळे तो गुळगुळीत झाला आहे. आता त्यावर लोखंडी जाळी बसविली आहे. देवळात रंगशिला, गारेच्या पादुका इ. विशिष्ट महत्त्वाच्या जागा आहेत.
११ नोव्हेंबर १९४७ रोजी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी मुक्त झाले. महात्मा गांधींचा विरोध असूनही साने गुरुजींनी सत्याग्रह करून हे शक्य करून दाखविले.
( विकिपीडिया वरून साभार)

डॉक्टर आणि त्यांचे भाऊ पण भेटले. ते लोकं पंढरपूरवरून कोल्हापूरला निघणार होते. डॉक्टरांना निरोप दिला आणि आम्ही मोहिमेच्या शोधार्थ निघालो.

अजून २१० किमी अंतर जायचं होतं. त्यात हडपसर ते पुणे असा रहदारीचा रस्ता होता. शिवाय मोहिमेचं पुण्यात जंगी स्वागत होणार, याची आम्हाला खात्री होतीच. तो क्षण आम्हाला मिसायचा नव्हता.
आम्ही बाईक सुसाट सोडली. मोहिमेचा काहीच पत्ता नव्हता. रोहनला फोन केल्यावर मोहीम निरा नदीच्या काठावर जेवणासाठी थांबल्याचं कळलं. निरेचा पूल ओलांडताना मोहीम आम्हाला दिसली. परत एकदा आम्ही मोहिमेत जाऊन मिळालो. हडपसर वगैरे सगळ्याचं भागात मोहिमेचं सहर्ष स्वागत झालं.
बरोबर सव्वा पाच वाजता आम्ही शनिवार वाडा गाठला. शनिवार वाड्यावर “इतिहास प्रेमी मंडळाने” मोहिमेचे स्वागत केले. तिथून आम्ही आमचा मोर्चा लाल महालाकडे वळवला.

पुन्हा शनिवारवाडा

15DSCN4096.JPGलाल महालाचा इतिहास :
पहिली गोष्ट म्हणजे हा महाल खरा लाल महाल नाही.
खऱ्या लाल महालाची जागा झांबरे- पाटील यांच्याकडून विकत घेतली होती. लाल महाल बांधून होईपर्यंत शिवाजी व जिजाबाई यांचा मुक्काम खेड शिवापूरला होता.
सन १६४९ ला जिजाऊ यांनी खेड शिवापूर सोडले व लाल महालामधे राहायला आले. पुढे शिवाजी महाराज राजगडावर राहायला जाईपर्यंत, म्हणजे साधारण सन १६४७ पर्यंत त्यांचा मुक्काम लाल महालातच असे.
लाल महालाचा पाया ५२ ½' x ८२ ½' व्यासाचा होता आणि उंची ३०½' होती. त्यास १३ ½' खोलीची तळघरे होती. १६४६-४७ मध्ये शिवाजी महाराजांनी त्यांचा मुक्काम राजगडला हलवली आणि लालमहालाचा उपयोग प्रशासकीय कामासाठी होऊ लागला. इ.स.१६८९ ते इ.स.१७०७ या कालखंडात लाल महाल पूर्णपणे दुर्लक्षित होता. १७३४-३५ मध्ये डागडूजी करून थोरल्या बाजीरावांनी तो राणोजी शिंदेंना आणि रामचंद्रपंतांना रहायला दिला. राणोजी शिंदे गेल्यानंतर लाल महालाचा उपयोग गोदाम म्हणुन झाला. त्याला लोकांनी अंबरखाना या नावाने पुकारण्यास सुरुवात केली होती. इ.स.१८१८ मध्ये इंग्रजांनी तो पूर्ण उध्वस्त केला. लाल महालामध्ये विहीर व कारंजे असल्याचे सांगितलं जाते. या वाड्याच्या जागीच १९२५ मध्ये जिजामाता उद्यान उभारण्यात आले असावे. लाल महालची रचना, त्यातील शिल्पकाम, चोरवाटा इत्यादी बद्दल जास्त माहिती उपलब्द नाही. सध्याचा लाल महाल १९८४ ते १९८८ या कालावधीत बांधण्यात आला. या लाल महालामध्ये बाळशिवबाची ब्राँझची प्रतिमा आहे.

लाल महालामधे शिवाजी महाराज आणि आई जिजाऊ यांना अभिवादन करून आम्ही मुक्कामाला ज्ञान प्रबोधिनीच्या स्पर्धा परीक्षा केद्रात आलो. तिथे इतिहास प्रेमी मंडळातर्फे एक छोटासा स्वागतपर कार्यक्रम आयोजित केला होता. वक्त्यांच भाषण झाल्यावर काहीजणांनी त्यांचे मोहिमेमधले अनुभव कथन केले. माझा दादा आणि वहिनी मला न्यायला आले होते. पण मोहिमेतल्या सदस्यांच्या आग्रहावरून आजची रात्र त्यांच्या बरोबरच राहायचे ठरले. दादाला उद्या सकाळी सकाळी तुझ्याकडे येतो असे सांगून त्याचा निरोप घेतला. रात्री मोहिमेची शेवटची सभा झाली. त्यात सगळा जमा-खर्चाचा हिशेब झाला. गुना,मध्य प्रदेशमधे असताना मला केलेला दंड गुरुजी विसरले नव्हते. मी देखील २०० रु. लगेच (?) जमा केले. रात्री आम्हाला सगळ्यांना मोहिमेची आठवण म्हणून टी-शर्ट देण्यात आले.
जाताना आम्ही जवळपास २५० जण होतो. आज शेवटच्या रात्री त्यातले ३९ जण बरोबर होतो. उद्यापासून परत सगळ्यांची तीच घिसीपिटी जिंदगानी सुरु होणार होती.
उद्या मी घरी जाणार होतो. आज आईला फोन करून उद्या सकाळीच घरी येणार असल्याचं कळवलं. स्वागत आज रात्रीच एका मित्राकडे राहायला निघून गेला.

आजचा प्रवास : २७० किमी
उद्याचा प्रवास : पुणे ते वाई

२६ जानेवारी २०१२
आजचा प्रवास : पुणे ते वाई

सकाळी ६ वाजताच दादाचा फोन आला. पटकन उठ आणि निघ.
आता पर्याय नव्हता. अजून बरेचं जण झोपेतच होते. साडे सहा पर्यंत सगळे उठले. आज प्रजासत्ताक दिन होता. सगळ्यांचा निरोप घ्यायला जीवावर आलं होत.
दादाच्या घरी पोहचलो. वहिनी कॉलेजला निघाल्या होत्या. वहिनीला बस थांब्याजवळ सोडलं आणि वरती आलो.
दादाने आल्या आल्याचं पहिला प्रश्न केला?
अंघोळ कितीवेळा केलीस ?
कितीवेळा म्हणजे? दिवसाआड.
खरं सांग.
दोन-तीन दिवसातून करायचो रे एकदा.
आता खर खर सांग
मग मी मनातल्या मनात मोजायला सुरवात केली.
पाच वेळा.
हरामखोर, पहिला आंघोळीला जा.
मग मी मस्तपैकी अंघोळ केली. चहा घेतला.
आणि आम्ही दोघे बाईकवरून घरी निघालो.
वाईला जायचं म्हटलं कि बाईकचा वेग आपोआपच वाढतो.
वाटेत दादाला, घरी गेलं कि बाबांना बोलण्यात गुंतवून ठेवं म्हणजे हेल्मेटवर पडलेले scratches त्यांना न दाखवता मी घरात जातो इत्यादी गोष्टी सांगितल्या.
आणि बाईकने तासाभरातच पारगाव-खंडाळा गाठला. आता माझा सगळ्यात आवडता रस्ता सुरु झाला होता. खंबाटकी घाटात बाईक झोपवायला जी मजा येते, ती काही औरच. आणि नंतर सुरूर ते वाई हा दोन्ही बाजूंनी झाडीने झाकलेला रस्ता.
माझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर असणाऱ्या काही क्षणांपैकी हे काही क्षण.
भद्रेश्वरचा कृष्णानदीवरील पूल लागला. कृष्णामाईचे आणि भद्रेश्वरचे सुखरूप परत घेऊन आणल्याबद्दल मनोमन आभार मानले.
दहाच्या सुमारास घरी पोहचलो.
बाबा नुकतेच ध्वजवंदन करून परत आले होते.
दादानी त्याचं काम चोख निभावलं. मी पटकन हेल्मेट माझ्या कपाटात ठेवलं.
बाबांनी आल्या आल्या, बाईक भोवती फिरून बघितलं. बाईक पडल्याचं त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. मी पण मित्राच्या हातून पडली अशी थाप ठोकून दिली. बाबा जे समजायचं ते समजले.

२७, २८ दोन दिवस घरी राहिल्यावर २९ तारखेला रविवारी परत बाईकवर मुंबई गाठलं. रविवारी रात्री स्वागतने आणि आम्ही संपूर्ण मोहिमेचा खर्च काढला.
खर्च बघितल्यावर दोघांच्या पण चेहऱ्यावर एक मिश्कील हसू तरळलं.
पेट्रोल चा खर्च = ९००० रु. (प्रत्येकी ४५०० )
बाईकची दुरुस्ती आणि सर्विसिंग = ( ५०० रु.)
स्लिपिंग बॅगा = ८०० रु. प्रत्येकी
इतर खर्च = २००० रु.

म्हणजे आमची सगळी मोहीम एकंदरीत ८,००० रु मधे झाली होती.

३० जानेवारी २०१२
वेळ : सकाळी ०९३०
स्थळ : मुंबईची लोकल

लोकलनी कुर्ला स्थानक सोडलं आणि मला बसायला जागा मिळाली. तेवढ्यात फोन वाजला.
Hello
Hello, Good morning, May I speak to Mr. Sarang Bhosale please
Yes, speaking
Good Morning Sarang, LBS College, Principle speaking
(हे वाक्य ऐकल्यानंतर माझा चेहरा बघण्यासारखा झाला होता.)
Good morning Sir,
Sarang, I checked attendance register of your class, since last month you are absent. So we won’t be issuing you attendance certificate.
But sir, I was suffering from jaundice, I had already informed my Course in charge.
Sorry, we haven’t received any such kind of information. If any query please come and meet me personally.

मी पूर्णपणे घामाने भिजलो. मला पुढंच चित्र साफ दिसायला लागलं होतं,
धावत पळत कॉलेज गाठलं. पहिला वर्गात धावत गेलो. लेक्चर अजून सुरु नव्हतं झालं, सागर पण गायब होता.
तेवढ्यात माड्या दिसला. माड्याला झाला प्रकार सांगितला.
अंगदने मजा केली असेल रे, साल्या आमच्यापेक्षा जास्त तुझी attendance आहे.
तेवढ्यात सागर attendance register घेऊन येताना दिसला.
खरंच माड्याच खरं झालं होतं, माझी फक्त दोनदाच absenty लागली होती.
सागरच्या मागोमाग अंगद पण हसत आला.
आणि मी एक दीर्घ श्वास घेतला.

!! इति सारंगकृतं पानिपत स्तोत्रं संपूर्णम !!

तळटीप : मी रोज बाईक वर बसल्यावर हनुमान चालीसा म्हणायचो, पण ज्या ज्या दिवशी मी तो म्हणायला विसरलो, त्या त्या दिवशी आमच्यावर बाका प्रसंग गुदरला. योगायोग म्हणा अथवा अंधश्रद्धा Happy

Happy HAPPY BIKING Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह, सगळे प्रवासवर्णन एकदम जमलंय - फारच भारी अनुभव असणार हा तुम्हा सर्वांचाच ... Happy

या आगळ्या-वेगळ्या मोहिमेत सामील झालेल्या तुम्हा सर्वांना मुजरा, सलाम ...

काल पहिले १४ भाग एका दमात वाचुन काढले....
आणि आज सकाळपासुन पुढच्या भागाची वाट पहात होते...
साष्टांग ___/\__ तुम्हाला.....
अप्रतिम लेखमालिका......

संपूर्ण लेख मालिका वाचली. भारी आवडली.
नुसते प्रवासवर्णन न करता प्रत्येक ठिकाणाची माहिती देखील दिली आहे, हे फार आवडले.
जवळपास संपूर्ण भारत या मोहिमेत पालथा घातलात. याचे खरंच खुप कौतुक वाटतेय.

वा छानच वर्णन...मुळात तुला हि पानपतचा चांगला अभ्यास आहे....भाउ हा शुरच होता पण त्याचि गाठ अफगाण शिवाजी शी पडल्या मुळे तो हरला पण त्याचे अपयश हे यशाइतकेच उज्जवल होते......भाउ ला त्यच्यापेक्षा चांगला सेनापति भेटल्या मुळे तो हरला....एका वाटर्लु मुळे नेपोलियन चे यश हिणकस ठरत नाहि....शेवटि त्याने शिपाइ गीरी चि कमाल केलि.....तीकडुन पळुन आलेल्यानी स्वताचि कातडि बचावण्या साठि त्याला अवीचारी ठरवला.... पानपत हि मराठी र्हुदयातिल सल आहे.... पण या एका युध्दा मुळे भाउ व बाकि वीर ईतिहासात अजरामर झाले....

कमाल लिहिलंय.....सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. आज इतक्या वर्षांनी हे वाचायला मिळालं हे माझं भाग्यचं म्हणतो मी.
तुमचं हे मार्गदर्शन मिळाले तर खरंच खूप फायदा होईल मला माझ्या बाईक राईडिंग मध्ये.
मस्त...कीप इट अप