स्वयंभू

Submitted by बोबो निलेश on 7 October, 2014 - 12:46

स्वयंभू
------------------------------------------------------------------------------------

"माधवा, किती वेळ झोपून राहणार? चल उठ पाहू",विठाबाई- माधवाची आई त्याला उठवत म्हणाली.
"आई झोपू दे ना. कशाला झोपमोड करतेस", माधव कंटाळून बोलला.
"अरे बाळा, देवाची पालखी यायची वेळ झाली आहे. तुझे बाबा पहाटेच उठून भक्तांच्या स्वागताची तयारी करताहेत. जा जरा तूसुद्धा जाऊन दर्शन घेऊन ये. तेवढंच पुण्य पदरात पडेल. "
"अगं आई, कमाल आहे तुझ्या आणि बाबांच्या देवभोळेपणाची. तुम्ही आणि तुमचा देव. गेले वर्षभर मी नोकरी शोधतोय पण तुमचा देव वर्षभरात मला साधी एक नोकरी मिळवून देऊ शकला नाही. तो आता असा काय मोठा चमत्कार घडवणार आहे."
नेमके त्याचवेळी माधवाचे वडील यशवंतराव घरात शिरत होते. माधवाची मुक्ताफळे नेमकी त्यांच्या कानावर पडली. ती ऐकून ते अतिशय व्यथित झाले.
"अरे नास्तिका, कुठे फेडशील ही पापं? देवा, क्षमा कर या पामराला बालबुद्धी समजून.",यशवंतराव कळवळून म्हणाले,"माधवा, आम्ही निरक्षर अडाणी माणसं. पण तू चार बुकं शिकलास म्हणून असा माजू नकोस. देवाच्या शक्तीला असा कमी लेखू नकोस. अरे, त्याच्या मनात आलं तर तो असा चमत्कार करेल की भल्या-भल्यांची मती गुंग होऊन जाईल."
यशवंतराव सहज म्हणून बोलून गेले खरे, पण लोकांना थक्क करून सोडणारा प्रसंग लवकरच खरोखरच घडणार याची त्यावेळी कुणालाच कल्पना नव्हती.
माधव नेहमीप्रमाणे याही वेळी वडिलांशी वाद घालायच्या फंदात पडला नाही. निमुटपणे खाली मान घालून तो उठला. अंथरुणाची घडी घातली आणि आंघोळीला निघून गेला.
पालखी यायला अजून थोडा वेळ होता, म्हणून यशवंतराव त्यांच्या दुकानावर जाऊन बसले. दुकानावरयेणाऱ्या गिऱ्हाइकांना हार,फुलं बांधून देऊ लागले. यशवंतरावांची परिस्थिती तशी बेताचीच होती. फुलाच्या दुकानातून घराचा खर्च जेमतेम भागत असे. पण त्याही परिस्थितीत ते सुखी होते. देवावर त्यांची प्रचंड श्रद्धा होती.
पण अलीकडे त्यांच्या मुलाची काळजी त्यांना सतावत होती. माधव तसा साधा भोळा पणकष्टाळू होता. इतर मुलांप्रमाणे क्लासेस वगैरे लावण्याची ऐपत नव्हती तरी तो स्वतःच अभ्यास करून बी.एस्सी. झाला होता. पण गेले वर्षभर तो नोकरी साठी प्रयत्न करत होता. त्याला यश काही येत नव्हते. माधवाला एखादी चांगली नोकरी लागावी, म्हणजे मग त्याच्या लग्नाचं ते बघणार होते. त्याचं एकदा लग्न करून दिलं की मग ते पूर्ण वेळ परमार्थात वेळ घालवणार होते. माधवाच्या लग्नासाठी त्यांना काही त्रास पडणार नव्हता, कारण माधवासाठी मुलगी त्यांनी आधीच बघून ठेवली होती. त्यांच्या शेजारचीच रामरावांची मुलगी रमा आपली सून व्हावी असे त्यांच्या मनात होतं. माधव आणि रमा लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. आणि त्याचं सुद्धा एकमेकांवर प्रेम आहे याची त्यांना जाणीव होती.या साऱ्यात फक्त अडचण होती ती माधवाच्या नोकरीची. कारण माधवाला नोकरी लागत नाही तो पर्यंत ते रामरावांकडे माधवासाठी रमाचा हात मागणार तरी कोणत्या तोंडाने. पण देव लवकरच यावर काही तरी मार्ग काढेल असा त्यांना विश्वास होता.
"माधवा, जरा गायीला नेऊन झाडाला बांध. " विठाबाई म्हणाल्या.पण काही उत्तर आले नाही. माधव तयारी आटपून पालखीच्या स्वागताला निघून गेला होता. आज चतुर्थी होती. चतुर्थी,संकष्टीच्या दिवशी गायीला चारा घातल्याने पुण्य मिळतं, असं मानलं जातं. विठाबाई किंवा माधव त्या दिवशी गायीला त्यांच्या दुकानाच्या बाजूला असलेल्या झाडाच्या बुंध्याला बांधत. येणारे जाणारे भाविक मग त्यांच्या दुकानातून चारा खरेदी करून गायीला खाऊ घालत असत. आज पालखीच्या धांदलीत माधव आज संकष्टी आहे हे विसरून तसाच पालखीकडे निघून गेला होता. विठाबाईंनी गायीला नेऊन झाडाच्या बुंध्याला बांधलं. विठाबाईंची गाय काहीशी नाठाळ होती. त्यामुळे स्वतःला सोडवून घेण्यासाठी नेहमी अधून-मधून दोरीला हिसके देत असे. मग शेवटी कंटाळून थकून जाऊन झाडाच्या बुंध्यापाशी गप्प पडून राहत असे.
रमाने माधवला घरातून निघताना पाहीले तशी तीसुद्धा लगबगीने घरातून बाहेर पडली. नाक्यावर तिने त्याला गाठले आणि दोघे जोडीने पालखी बघायला निघाले.
वाटेत पारावर बसलेल्या टिपरेआजोबांनी त्यांना हाक मारली."काय रे पोरांनो, जोडीने कुठे निघालात? "
"आजोबा,जरा पालखीचं दर्शन घेऊन येतो."
"हं..बरं आहे. आणि काय मग तुमच्या लग्नाचं कुठवर आलं ",टिपरे आजोबांनी हक्काने खोडकर प्रश्न विचारला.
रमाने हळूच माधवाकडे पाहिलं.
"म्हणजे,हा माधव टाळाटाळ करतोय की काय?काय रे माधवा, हे मी काय ऐकतोय? अरे,अशी गुणी पोर लाखात शोधून तुला मिळणार नाही. "
"तसं नाही आजोबा.त्याचं एकदा नोकरीचं सध्या कुठे होत नाहीय. ते झाल्यानंतरच लग्नाचा विचार करता येईल."रमाने घाईघाईने स्पष्टीकरण दिलं.
"हं.. असा घोळ आहे होय. होईल. होईल, लवकरच त्याचा प्रश्न सुटेल. तो परमेश्वर नक्कीच काही तरी सोय करेल. "
रमा आणि माधव यावर काही बोलले नाही.
"येतो आजोबा."म्हणून ते पुढे निघाले.
"काय म्हणे तर परमेश्वर नक्कीच काही तरी सोय करेल माझ्या नोकरीची. माझी तर पूर्ण खात्री आहे की देव या जगात अस्तित्वात नाहीच. ही केवळ आपल्यासारख्या लोकांना मूर्ख बनवण्यासाठी कुणीतरी रचलेली भाकड कल्पना आहे."
"माधव, अरे असा धीर सोडून कसं चालेल. काळजी करू नकोस. सारं काही व्यवस्थित होईल."
दोघे पालखीच्या ठिकाणी पोचले. पालखीचं दर्शन घेतलं. आपल्या आयुष्यात काही चांगलं होईल याची माधवाने आशाच सोडून दिली होती. तो पालखीच्या ठिकाणी केवळ यांत्रिकपणे वावरत होता.
रमा मात्र भक्तिभावाने देवाच्या पाया पडली. माधवला लवकरच चांगली नोकरी लागू दे आणि दोघांचं लवकरच लग्न होऊ दे यासाठी तिने देवाकडे मनापासून साकडं घतलं. देवाला कौल लावला. चमत्कार म्हणजे देवाच्या उजवीकडचं फुल खाली पडलं. कौल आपल्या मनासारखा लागला हे पाहून तिचा आनंदाला पारावार उरला नाही. पण तरी हे एवढ्यात माधवला सांगायचं नाही असं तिने ठरवलं. देव आता लवकरच आपली शक्ती दाखवणार याबद्दल तिच्या मनात तिळमात्र शंका उरली नाही.
आणि काही दिवसांतच तो प्रसंग घडला. माधव नेहमीप्रमाणे सकाळ झाली तरी झोपला होता.विठाबाई धावतच घरात आली आणि माधवला गदागदा हलवून जागं करू लागली.
"माधवा, अरे लवकर उठ."
"आई झोपू दे ना. चांगली झोप येते आहे. कशाला झोप मोड करतेस ",माधव कंटाळून बोलला.
"अरे बाबा, झोपतोस कसला.बाहेर बघ काय चमत्कार घडलाय."
"कसला चमत्कार आई. सकाळी सकाळी कसल्या भाकड कथा सांगतेस.अगं झोपू दे मला.",माधव कंटाळून बोलला.
"अरे बाबा, बाहेर देव प्रकट झालाय."विठाबाईंनी बळेबळेच माधवला उठवलं.
"आई, काय थट्टा चालली आहे?"
"अरे बाबा, थट्टा नाही. खरच सांगते. आपण गाय बांधतो त्या झाडाच्या बुंध्यात चक्क गणपती प्रकट झाला आहे."
"कसं शक्य आहे, आई? काल मी गाय सोडून घेऊन आलो तेव्हा मला कसं काही जाणवलं नाही. तू आणि रमासुद्धा आल्या होतात मला बोलवायला."
"तू तर पडलास मुलखाचा नास्तिक. तुला तर मूर्तीच्या जागी दगड दिसतो, तिथे झाडाच्या बुंध्यातला गणपती कुठून दिसणार."
"अगं पण तुला आणि रमाला तरी दिसायला हवं होतं."
"अरे तेव्हा संध्याकाळ झाली होती. काळोख व्हायला सुरुवात झाली होती. अंधारात एवढं कुठे लक्षात येतं होय. आणि कुणास ठाऊक, कदाचित गणपती रात्री प्रकट झाला असेल."
"माझा नाही विश्वास बसत तुझ्या बोलण्यावर. हे विज्ञानाचं युग आहे. चमत्कार घडेलच कसा? मागे सुद्धा तुम्ही लोकांनी गणपती दुध पितो म्हणून किती गोंधळ घातला होता. चल बघू या काय झालाय ते.", माधव नाखुशीनेच उठला.
तोंडावर पाणी मारून आणि चूळ भरून तो विठाबाईबरोबर बाहेर पडला. झाडाजवळ आला तर तिथे कोण गर्दी जमली होती. लोकांना बाजूला सारत माधव आत शिरला.झाडाच्या बुंध्या वर त्याने नजर टाकली. तो जिथे रोज गायीला दोर खंडाने बांधायचा तिथे एक उंचवटा होता. त्या उंचवटयाच्या खाली काही खुणा होत्या. तिथे नीट पाहिलं असता काहीसा गणपतीच्या सोंडेचा भास होत होता. लोकांनी त्या बुंध्याला हार घालून,उदबत्त्या लावून पूजा करायला सुरुवात केली होती.
"स्वयंभू गणपती प्रकटला",लोक एकमेकांना सांगत होते आणि ही बातमी वाऱ्याच्या वेगाने सगळीकडे पसरत चालली होती.
माधव गर्दीतून बाहेर पडला.
"माधवा, बघितलास का देवाचा चमत्कार? आता तरी पटली तुझी खात्री."विठाबाईंनी विचारलं.
"अगं आई, आपण गायीला त्या बुंध्याला बांधतो तेव्हा ती बुंध्याला हिसके देते ते आठवतं? अगं बुन्ध्यावरच्या त्या खुणा त्यामुळेच झाल्या असणार." माधव म्हणाला.
"अरे देवा. आता मात्र हद्द झाली तुझ्या नास्तीकपणाची. बरं ते सोड. लवकरात लवकर आधी दुकानात जा. आज दुकानात कोण गर्दी आहे. फुलं,हार,नारळ संपत आले आहेत या गर्दीमुळे. सगळे भाविक दुकानातून पूजेचं सामान घेऊन जात आहेत."
"या एका बाबतीत मात्र तुमच्या देवाला मानलं. भक्तांची किती काळजी त्याला. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून नेमका फुलांच्या दुकानाशेजारी प्रकट झाला." माधव खोचकपणे म्हणाला.
विठाबाईंनी चिडून जोरदार धपाटा माधवाच्या पाठीत घातला आणि त्याला दुकानाकडे पिटाळलं.
आणि त्या दिवसापासून स्वयंभू गणपतीची बातमी साऱ्या पंचक्रोशीत पसरली. दुरदुरच्या गावांतून लोक स्वयंभू गणपती पाहायला येऊ लागले. यशवंतरावांचं दुकान आता तुफान चालू लागलं.
त्यांना एकट्याला सारा पसारा आवरेना. म्हणून त्यांनी माधवाची मदत घ्यायला सुरुवात केली. दुकान जोरात चालू लागल्याने माधवाला आता नोकरीची गरज उरली नाही. त्यामुळे त्यानेसुद्धा नोकरीचा नाद सोडून दिला. यशवंतरावांनी रीतसर रामरावांकडे रमाचा हात माधवासाठी मागितला. दोघांचा साखरपुडा झाला. एव्हाना स्वयंभू गणपती बराच प्रसिद्ध झाला होता. काही दानशूर व्यक्तींनी देणगी दिली आणि एक मंदिर उभारण्यात आलं होतं. साखरपुड्यानंतर माधव आणि रमा जोड्याने देवळात देवाच्या पाया पडायला आले. पाया पडून झाल्यावर माधव रमेसोबत देवळाच्या कट्ट्यावर बसला होता.
हा सारा घटनाक्रम नुकताच घडल्यासारखा त्याच्या डोळ्यापुढून सरकत होता. अचानक त्याला गणपती प्रकट होण्याच्या आधीची संध्याकाळ आठवली. गायीचं दावं हातात धरून खिन्नपणे माधव बुंध्यापाशी बसला होता. नोकरीचा पत्ता नव्हता. आणि लवकर नोकरी लागली नाही तर रमाचे वडील रमाचं लग्न दुसरीकडे लावून देतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. माधव अतिशय निराश झाला होता. झाड्याच्या बुन्ध्याकडे एकटक पहात तो विचारात पडला होता आणि त्या क्षणी त्याच्या डोक्यात एक विलक्षण कल्पना आली. आपल्या आजूबाजूला कुणी नाही याची त्याने खात्री करून घेतली. खाली पडलेला एक अणकुचीदार दगड त्याने उचलला आणि बुंध्या वरच्या उंचवट्याच्या आजूबाजूला घासायला सुरुवात केली. काही मिनिटांत तिथे नीट पाहिलं तर गणपतीसारखा वाटेल असा आकार दिसू लागला होता. माधव स्वतःशीच हसला. तो त्या आकाराला 'फिनिशिंग टच' देणार एवढ्यात त्याला आईची हाक ऐकू आली. पटकन माधवने हातातला दगड लांब फेकला आणि तो मागे वळला. विठाबाई आणि रमा त्याच्या दिशेने येत होते. ते जवळ यायच्या आत माधव उठला आणि "आलो" म्हणून गायीला घेऊन त्यांच्या दिशेने चालू लागला. नुकत्याच केलेल्या कृत्याने त्याची छाती अजूनही धडधडत होती.
पण पुढचं सारं काही व्यवस्थित पार पडलं होतं. माधवला आपल्या हुशारीची कमाल वाटली आणि तो ते सारं आठवून स्वतःशीच मंद हसला. बाजूला बसलेल्या रमेने विचारलं,"काय झालं हसायला?"
"बाकी माझ्यासारख्या नास्तीकावर देवाने बरीच कृपा केली." माधव रमाला म्हणाला.
रमा माधवकडे खोडकरपणे रोखून पाहत म्हणाली,"देवाची काय बिशाद तुमच्यावर कृपा न करण्याची. बाकी तुमचा प्लान होताच तसा फुल-प्रुफ."
"म्हणजे तुझ्या सारं लक्षात आलं होतं?"
माधव थक्क होऊन रमाकडे पहात राहीला.

********************************* समाप्त *********************************
(पूर्वप्रकाशित )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud

गोष्ट वाचुन देउळ सिनेमातला एक प्रसंग आठवला. एक सुतार फोनवरुन मिळणार्‍या रस्त्याच्या डायरेक्शनच्या खाणाखुणा झाडावर करतो आणि तिथे दत्ताच्या मूर्तीचा आकार तयार होतो

ताईसाहेब तुडतुडकर, मुग्धटली,preetiiii
अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद Happy