“ पुणे ते पानिपत ” भाग १४: अयोध्या - काशी - प्रयाग

Submitted by सारन्ग on 6 October, 2014 - 16:15

“ पुणे ते पानिपत ” भाग १ - http://www.maayboli.com/node/35449

“ पुणे ते पानिपत ” भाग २ - http://www.maayboli.com/node/35521

“ पुणे ते पानिपत ” भाग ३ - http://www.maayboli.com/node/35727

“ पुणे ते पानिपत ” भाग ४ - http://www.maayboli.com/node/35805

“ पुणे ते पानिपत ” भाग ५ - http://www.maayboli.com/node/35884

“ पुणे ते पानिपत ” भाग ६ - http://www.maayboli.com/node/35939

“ पुणे ते पानिपत ” भाग ७ - http://www.maayboli.com/node/36194

“ पुणे ते पानिपत ” भाग ८ - http://www.maayboli.com/node/36408

“ पुणे ते पानिपत ” भाग ९ : http://www.maayboli.com/node/36732

“ पुणे ते पानिपत ” भाग १० : http://www.maayboli.com/node/38586

“ पुणे ते पानिपत ” भाग ११ : http://www.maayboli.com/node/38694

“ पुणे ते पानिपत ” भाग १२ : http://www.maayboli.com/node/38842

“ पुणे ते पानिपत ” भाग १३: http://www.maayboli.com/node/46062

१९ जानेवारी २०१२
आजचा प्रवास :
लखनौ – अयोध्या – सुलतानपूर – काशी

आणि परत एकदा गुरुजींच्या आरडाओरड्याने आमची साखरझोप मोडली.
एकदा सांगून कळत नाही का ? सांगितलं होतं न जे लवकर उठणार नाहीत त्यांनी आपापल्या पथाऱ्या बाहेर पसरा. गुरुजींचा नेहमीप्रमाणे सकाळचा आरडओरडा सुरु झाला. आम्हीपण नेहमीच्या सवयीने जोपर्यंत आपल्याला ते काही बोलत नाहीत तोपर्यंत तिकडे लक्ष द्यायचं नाही, या न्यायाने झोपून राहिलो.
उठ रे साऱ्या, मोहीम निघालीये. आज चक्क स्वागत लवकर उठला होता.
हो रे, जाऊ कि...........
सकाळी ५ वाजताच मोहीम मार्गस्थ झाली आणि आम्ही परत एकदा निद्रिस्त झालो.
६ वाजता जाग आली, मग शांतपणे ब्रश व इतर सोपस्कार आटोपले. इतक्यात जयदादा आला,
आवरलं का रे ?....... मी
हो रे, पण अरे मी पुण्याला निघालोय, गाडी रेल्वेत टाकतोय.
का रे ?
अरे, थोडं काम आला आहे. तेवढं पेट्रोल घेशील का ?
अरे, हे काय विचारनं झालं का दादा?, फुकट ते पौष्टिक. मी हसत हसत म्हणालो.
मग आम्ही दोघं रिकाम्या बाटल्या घेऊन खाली गेलो. गाडीमध्ये अगदी गरजेपुरतच पेट्रोल ठेवलं. पेट्रोल माझ्या गाडीत टाकलं, दादाला न विसरता पैसे दिले. Wink
सगळ्यांचा निरोप घेण्यासाठी वरती येत असतानाच स्नेहल भेटला.
त्याचं फोनवर हा शोना, हा जानू असलं काहीतरी चाललं होतं.
वरती जात असतानाच तो खुणेने काहीतरी सांगू लागला.
पहिला तो फोन ठेवं, ही सांकेतिक भाषा मला नाही कळतं. मी वैतागून म्हणालो.
चक्क, साहेब फोन ठेवून वरती आले.
जयदादाने सगळ्यांचा निरोप घेतला व तो निघाला.
तो जाताच, स्नेहल आम्हाला म्हणाला.
अरे मी “तिला” भेटायला जातोय.
कुठे ?....................... हे अर्थातच त्याने आमच्या चेहऱ्यावरून ताडलं.
अरे, तिला सुट्टी आहे. आपणं नागपूरला भेटू.
मी घडाळ्यात बघितलं. आज १९, आपण नागपूरला पोहचणार २२ ला .
ठीक आहे.
इतक्यात स्वागतच्या लक्षात जयदादा पण जाणार असल्याचं आलं. मग आम्ही स्नेहलला त्याच्या ताब्यात दिलं. पोहचलं कि फोन करा इत्यादी हवे नको सल्ले दिले आणि आमच्या गाड्या पेट्रोल पंपाच्या दिशेने वळवल्या. गाड्यांच्या टाक्या फुल केल्या. आज रामजन्मभूमी. बरेचं वर्ष चर्चेत असलेलं नाव. अनेकवर्षापासून जिथं जायची मनातं इच्छा होती ती आज पूर्ण होणार होती.
अयोध्या म्हटलं कि डोळ्यासमोर बाबरी मशिद, हिंदू मुस्लिम दंगल, कारसेवक वगैरे अनेक बाबी येऊ लागल्या. आणि आज प्रत्यक्ष तिकडं जायचं. मी कुणास ठाऊक का आज जरा एक्साईट होतो.
अयोध्येविषयी लहानपणासून खूप काही ऐकल होतं. आज सकाळपासून गाडी माझ्याकडेच होती.

मोहीम बरीच पुढे गेली असल्याने आम्ही पण आमचा नाश्ता लगेचचं आटपला.
एकतर मोहिमेबरोबर राहिलं तर जास्त शोधाशोध करावी लागत नाही हा आजवरचा अनुभव होता.
आजपण तसा लांबचा पल्ला गाठायचा होता. त्यामुळे आम्ही पण जास्त वेळ न दवडता लगेच निघालो. रस्त्यावर रहदारी देखील जास्त नव्हती. आम्ही साधारण शहराच्या बाहेर आलो होतो.
बाईकने पण आता बऱ्यापैकी वेग घेतला होता.
आणि अचानक साऱ्या..........................................
बाईकचा एकदम ब्रेक मारत, बाईक कशीतरी नियंत्रणाखाली ठेवतं मी बाईक थांबवली.
झालं अस होतं रस्त्याच्या कडेने एक सायकलवाला निवांतपणे निघाला होता. रस्ता सरळसोट असल्याने आणि रस्त्यावर रहदारी नसल्याने बाईक पण साधारण ६०-७० च्या वेगाने होती. या जगातं बऱ्याच घटना का होतात याला काही उत्तर नसतं, त्याचं प्रकारे त्या निवांत निघालेल्या सायकलवाल्याने त्याची सायकल एकदम काटकोनात का वळवली याला उत्तर नव्हतं. बर रस्त्याच्या त्या बाजूला काही वस्ती, घरं वगैरे काहीच नव्हतं. आम्ही अगदी धडपडता धडपडता वाचलो. स्वागतने उतरून त्याला शिव्या घालायला सुरवात पण केली होती.
जाऊ दे रे, आता झाल्यावर काय बोलणारं, म्हणून विषय सोडून दिला. एकवेळ आम्ही धडपडलो असतो तरी चाललं असतं, पण ते एखाद्याला जाऊन धडकन नको आणि त्यानंतरच रामायण नको. त्याची एक छोटीशी झलक आम्ही दिल्लीमध्ये अनुभवली होती.
यावेळेस चक्क स्वागत मला एका शब्दाने देखील बोलला नाही. अर्थात चूक माझी नव्हतीच.
पण या घटनेनंतर मात्र आमच्या हृदयाचे ठोके चांगलेच वाढले होते. सकाळ सकाळी नसता उपद्व्याप.
परत एकदा गाडी सुरु केली आणि आमचा पुढचा प्रवास सुरु झाला.
लखनौवरून राष्ट्रीय महामार्ग २८ पकडायचा, हा थेट फैजाबादला जातो, ह्याला फैजाबाद रोड म्हणून पण ओळखले जाते. फैजाबाद वरून साधारण ०७ किमी वर अयोध्या वसलं आहे.
लखनौ ते अयोध्या अंतर साधारणतः १३५ किमी आहे.

अयोध्या :

खरंतर आपण सगळ्यांनी अयोध्येविषयी लहानपणापासून इतकं ऐकलंय, वाचलंय कि या गावाबद्दल काही सांगूच नये कि काय असं क्षणभर वाटलं, पण त्याचं काय आहे आपण जे काही ऐकलं, वाचलं ते अगदी रामाच्या काळातलं. पण आपण आता २१ व्या शतकामध्ये राहतो, त्यामुळे आता सर्व काही बदललंय. कुरुक्षेत्र म्हणा, पानिपत म्हणा वा अयोध्या म्हणा, हि आता तुमच्या आमच्या गावांसारखीच गावं आहेत. तिथे देखील आता तुमच्या-आमच्या सारखेच लोक राहतात. त्यामुळे प्रभू रामचंद्राच गावं वगैरे खुळचट कल्पना डोक्यात ठेऊन जालं, तर फक्त आणि फक्त भ्रमनिरासच वाट्याला येईल. तर ............

हिंदू धर्मानुसार शरयू(घाग्रा) नदीच्या काठावर वसलेलं, रामाचं हे जन्मस्थळ.कोसला साम्राज्याची हि राजधानी. राम हा विष्णूचा सातवा अवतार समजला जातो.
अथर्व वेदामध्ये, अयोध्येच वर्णन “ईश्वराची नगरी” असे केलं आहे. हिंदू धर्मियाप्रमाणेच हे जैन आणि बौद्ध धर्मियांचे देखील तीर्थस्थळ आहे. शाकेत, साकेत, कोशल, नंदिनी, अयोज्झा, विनीता, कोशल (सुकोशल), रामपुरी, इक्ष्वाकुभूमि, सोगेद, विशाखा, पुण्यालक्षणा ( महाभारतामध्ये ) अशा वेगवेगळया नावांनी हे शहर, वेगवेगळ्या कालखंडामध्ये ओळखले जात असे. सूर्यवंशीय/ ईश्वाकुवंशीय अनेक राजे या भूमीमध्ये होऊन गेले. मनुने सुमारे ९००० वर्षापूर्वी या शहराची स्थापना केली असे मानले जाते, तर काहीच्या म्हणण्यानुसार अयुध राजाने या शहराची स्थापना केली.

अयोध्येवर राज्य करणारा ईश्वाकु हा पहिला राजा होय.

ईश्वाकुवंशीय राजे :
१. ईश्वाकु
२. वैवस्वत मनु
६. प्रीथु
७. मांधातु
३१. हरिश्चंद्र
३२. सूर्य वमसा
३३. सगर – याने अश्वमेध यज्ञ केला.
३४. भगीरथ – याने याच्या पित्याने केलेल्या अश्वमेध यज्ञावेळी गंगेला पृथ्वीतलावर आणले.
३५ दिलीप
३६. खट्वांग
३७. रघु – याच्या नावानुसार राघुवंशाला सुरवात झाली.
३८. दशरथ
३९. रामचंद्र
४०. लव-कुश

सूर्यवंशीय राजा ऋषभ याने या शहराचे पुनर्वसन केले.
शरयू नदीमुळे अयोध्येचे उत्तर-दक्षिण असे भाग पडतात. रामाने हे दोन भाग लव व कुश यांना वाटून दिले. लवाने उत्तर कोसलची राजधानी श्रावस्ती तेथे नेली, तर कुशाने दक्षिण कोसलची राजधानी कुशावती येथे हलविली.
प्रभू रामचंद्रानंतर लव-कुश यांनी आपापल्या राजधान्या अनुक्रमे श्रावस्ती व कुशावती येथे हलवल्याने अयोध्येचा नंतर म्हणावा तसा विस्तार झाला नाही. बौद्ध साहित्यामध्ये अयोज्झा या गावी गौतम बुद्ध २ वेळा गेला असल्याचा उल्लेख आढळतो. बौद्ध काळामध्ये अयोध्येजवळ असलेले साकेत गाव समृद्धावस्थेत होते.सातव्या शतकामध्ये ( इ.स.६३६) आलेल्या चिनी प्रवासी ह्यूएनत्संगाच्या प्रवासवर्णनामध्ये अयोध्येचा आणि येथील स्तूप, मठ, मंदिरे अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आढळतो. त्याच्या माहितीनुसार येथे २० बौद्ध मंदिरे होती आणि ३००० भिक्षु या ठिकाणी वास्तव्यास होते.

जैनांच्या ऋषभदेव, अजितनाथ, अभिनंदन, सुमतिनाथ व अनंतनाथ या तीर्थंकरांचा जन्म अयोध्या येथे झाला.

तीर्थंकर :
१. ऋषभदेव म्हणजेच आदिनाथ
२. अजितनाथ
४ अभिनंदननाथ
५ सुमतिनाथ
१४ अनंतनाथ

जैनधर्मीय राजे भरत, मधवा, सनतकुमार आणि सुभौम यांची अयोध्या हिच राजधानी होती. हेमचंद्रसुरी यांच्यानुसार पुरुषांना ७२ आणि स्त्रियांना ६४ कला शिकवण्याचे जैन विद्यापीठ इ.स.पू. ६०० मध्ये अयोध्येत अस्तित्वात होते. बाबर काळामध्ये येथील राम मंदिर पाडून येथे बाबरी मशीद उभारण्यात आली होती.

हिंदुधर्मीय प्रेक्षणीय स्थळे :
हनुमानगढी,
कनकभवन,
रामजन्मस्थान,
नागेश्वर नाथ मंदिर – हे मंदिर कुश, रामाचा मुलगा याने बांधल्याचे सांगतात. असे सांगतात कि जेव्हा कुश शरयू नदीमध्ये स्नान करत होता, तेव्हा त्याचा बाजुबंद हरवला. तो कोण्या नागकन्येला मिळाला, तिचे कुशवर प्रेम बसले. ती शिवभक्त असल्याने कुशने तिच्यासाठी हे मंदिर बांधले.

बौध्दधर्मीय प्रेक्षणीय स्थळे :
मणिपर्वत,
सुग्रीवपर्वत,
कुबेरपर्वत,
दतूनकुंड

जैनधर्मीय प्रेक्षणीय स्थळे :
तीर्थंकरांची मंदिरे: जैन धर्मीय मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. अयोध्येला ५ जैन तीर्थंकरांची जन्मभूमी म्हटले जाते. ज्या ठिकाणी तीर्थंकरांचा जन्म झाला त्याचं ठिकाणी मंदिरे आहेत.

अयोध्या गाठायला आम्हाला ११ वाजले. अयोध्येमध्ये घुसल्यावर राम मंदिर शोधायला काही जास्त वेळं लागला नाही. आता गाडी कुठं लावायची ही समस्या भेडसावत असतानाच पोलीस स्टेशन दिसलं आणि आमचा गाड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मिटला. Happy

गाड्या बहुतेकदा बऱ्यापैकी बाहेर लावाव्या लागतात. आतमध्ये चालत जावं लागतं. जर तुमच्या कडे चार चाकी वाहन असेल तर मोबाईल, शूज इत्यादी गोष्टी गाडीमध्येच काढून ठेवा, वेळ वाचतो. जमलचं तर पाकीट, पर्स इत्यादी वस्तू देखील जवळं बाळगू नका. अयोध्येमध्ये माकडांनी उच्छाद मांडला आहे. काहीतरी खाण्याच्या वस्तू मिळतील या आशेने ही माकडं पर्स पळवतात आणि पर्स पाठोपाठ तुम्हालादेखील पळवतात. आता ही माकडं पाकीट का पळवत असावीत याचा मला अजून अंदाज आलेला नाही, कदाचित पैसे देऊन दुकानातून विकत आणून देखील खात असावीत. खोटं नाही सांगत, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय पाकीट पळवताना. बरं, अयोध्येमध्ये सगळीकडे कडेकोट बंदोबस्त असतो. सगळीकडे जाळ्या लावल्या आहेत. त्यामुळे जाळीमधून हात घालून एकदा का एखाद्या माकडाने तुमचं काही सामानं पळवलं कि खुद्द हनुमान काय प्रभू रामचंद्र आले तरी ते परत मिळणार नाही. तेव्हा माकडांपासून अतीव सावधान! (स्वानुभावरून)

माझ्या त्या अंगावर चढवलेल्या साधनांकडे पोलिसांचं लक्ष गेलं आणि मग मला रितसर बाजूला घेऊन काय ? कुठला ? कुणीकडे? इत्यादी चौकशी करण्यात आली. पोलिसी खाक्याचा मला पूर्वानुभव जरी नसला तरी मी पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना एखाद्या निर्ढावलेल्या गुन्हेगारासारखी उत्तरे दिली आणि माझा पुढचा मार्ग मोकळा झाला. आतमध्ये फोटो काढण्यास देखील सक्त मनाई आहे.

शेवटी एकदाचं सगळं साहित्य तिथे असलेल्या counter वर जमा करून, कुपन घेऊन आम्ही रांगेमध्ये उभे राहिलो. रांगेमध्ये उभ्या असलेल्या निम्म्यापेक्षा भाविकांची (???) त्यांच्याकडे असलेल्या पर्स, फुले नारळ इत्यादी माकडांच्या तावडीतून वाचवण्याची कसरत चालू होती. उरलेले भाविक (??) बोलो राम लला कि ,,,,,,,,,,, बोलो श्री प्रभू रामचंद्र कि ..... जय इत्यादी आरोळ्या देण्यात गुंतले होते आणि माझ्यासारखा एखादा अयोध्या,राम मंदिर, बाबरी मशिद हा प्रकार म्हणजे आहे तरी काय या उत्सुकतेपोटी रांगेत उभा होता आणि माकड दाखवत असलेल्या त्याच्या करामतींचा मनमुरादपणे आनंद घेतं होता.

रांगेमध्ये उभे असतानाचं सिंधुताई सपकाळयांचे शब्द माझ्या कानात घुमतं होते. का करावा आम्ही रामाला नमस्कार ? का जपावं रामनाम ? ज्याने स्वतःच्या पत्नीला अग्निपरीक्षेतून जायला लावलं, त्याच्यावर का ठेवावा विश्वास ?
रांग हळूहळू पुढे सरकत होती. थोड्याच वेळात आम्ही रामाच्या मूर्तीसमोर आलो. मंदिर इत्यादी नाहीच ये. फक्त तंबू ठोकून रामाला आडोसा निर्माण केला आहे. मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र एकदम प्रसन्न करणारे होते. मी देखील नकळत हात जोडले.
पोलीस सगळ्यांना पटापट पुढे ढकलत होते. आम्ही बाहेर आलो. counter वर जमा केलेलं साहित्य परत घेतलं आणि बाहेर आलो. Arm guard इत्यादी चढवायला बऱ्यापैकी वेळ लागत असल्याने बाकीचे पुढे गेले, मी सगळी आयुधं परत एकदा अंगावर चढवली आणि बाहेर आलो. आता बाहेर फोटो काढायला बंदी नव्हती. मोहिमेचा छायाचित्रकार रघू देखील माझ्या पुढेच फोटो काढत निघाला होता. चला, आपण देखील फोटो काढावेत म्हणून मी पण लगेच माझा कॅमेरा सरसावला आणि फोटो काढू लागलो. इतक्यात एक हात पाठीमागून खांद्यावर पडला. मागे वळून बघतो तर पोलिसकाका.
किधर से आये हो ? किसके साथ हो ?
महाराष्ट्रसे ............. हम लगबग २०० के करीब लोग आये है !
किधर है बाकीके लोग?
आता आजूबाजूला कुणीतरी दिसेल, म्हणून मी इकडतिकड पाहू लागलो, तर कोणीच दिसेना. एकदम कुणीतरी जादूटोणा केल्यासारखे सगळे गायब.
इधर हि थे ? किधर गये ? मी असं काहीतरी पुटपुटत बाकीच्यांना शोधायला लागलो. पोलिसवाला मात्र मी इंडिअन मुजाहिद्दीनचा म्होरक्या आहे असं मानूनच किधर है ? इधर-किधर ? असे प्रश्न आवाज चढवून विचारू लागला. इतक्यात मला इनामदार दिदी दिसल्या आणी माझा जीव भांड्यात पडल्या. दिदी दुकांदाराबरोबर घासाघीस करण्यात व्यस्त होत्या. ( ह्यांना कुठेही घेऊन जावा, ह्या शॉपिंग करणारच )
इनके साथ ! असं म्हणत मी माझ बोट दिदींकडे दाखवलं. मग तो मला घेऊन दिदींकडे गेला.
ये आपके साथ है ?
हा ! दिदीने माझ्याकडे (नेहमीप्रमाणे काही गोंधळ तर नाही ना घातलास रे बाबा ) अशा अविर्भावात बघत उत्तर दिले.
क्या करते है ये ?
आता आली का पंचाईत, मी काय करतो ?
कॉलेज मे है ! दिदींनी त्यांना माहित असलेले उत्तर दिले.
ठीक है ! म्हणत पोलीसकाकांनी मला परत बाजूला नेले.
कॉलेज मे ? आप तो कुछ और ही बता रहे है ! चलो मेरे साथ !
इतक्यात मला आमचा स्वाग्या दिसला आणि त्याहीपेक्षा महत्वाची आमची सॅक दिसली.
१ मि. पटकन जाऊन सॅक घेतली. पटकन ओळखपत्र बाहेर काढलं. पोलीसकाकांना शांत भाषेत समजावलं, काहीही न बोलता त्यांनी मला सोडलं आणि मी परत आमच्या ग्रुपला जाऊन मिळालो.
जवळच्याच एका ठिकाणी सगळ्यांची जेवायची सोय केली होती. अंगात ताप असल्याचं आता चांगलचं जाणवू लागलं होतं. कसबसं पोटात काहीतरी ढकललं, तरीपण अंग चांगलच गरम झाल्याचं जाणवायला लागलं.
असं काही झालं कि मग लगेच घराची आठवण येते. आईला फोन केला, आवाजावरूनच आईला ताप आल्याचं कळलं, मग मी कसं आईस्क्रिम खाल्लं असेल, थंड पाणी प्यायलो असेल, कोल्ड्रिंक पीत असेन, कानाला कसं बांधत नाही .कधी तीच ऐकत कसं नाही, अशा मी तिच्या न कळत केलेल्या आणि न केलेल्या बऱ्याच गोष्टी ऐकाव्या लागल्या.
बरं, आता औषध सांगतेस का ? मी अगदी काकुळतीला येऊन विनवणी केली.
काय काय आहे सध्या तुझ्याकडे ?
मग मी सॅक मधून गोळ्यांच जंजाळ काढून त्यातलं एकेक नावं तिला वाचून दाखवायला लागलो.
शेवटी एकदाच्या गोळ्या मिळाल्या आणि तू काही काळजी करू नकोस म्हणत मी फोन ठेवला.
स्वाग्या, जरा ताप वाटतोय, थोडासा झोपतो आणि येतो. ठीक आहे, आम्ही पण पुढे जाऊन थांबणारच आहोत. ये सावकाश म्हणत स्वागत, रुपेश, अमर वगैरे पुढे गेले आणि मी, दीपक, संग्राम आणि रोहन मागेच थांबलो.
शाळेच्या बाहेर मस्तपैकी लॅान होतं. मग आम्ही चौघांनीपण मस्तपैकी ताणून दिली. जाग आली तेव्हा ०३४५ वाजत होते, रोहननी जवळचाच एक हातपंप शोधून काढला होता, साहेब, नुकतीच अंघोळ करून येत होते, तर संग्रामची अंघोळ चालू होती. गोळ्यांमुळे आणि झोप चांगली झाल्यामुळे एकदम फ्रेश वाटतं होतं, मग मी देखील अंघोळ आटोपली आणि आम्ही सगळेजण काशी करायला निघालो. 
बाहेर निघताना वाटेत “श्री चक्रवर्ती महाराज दशरथ जी का राजमहाल” असा बोर्ड दिसला, पाहूया तरी काय आहे, म्हणून आम्ही आतमध्ये गेलो. आतमधले लोक,हा त्यांचा महाल होता, इथे राम खेळला वगैरे सांगत होते. अर्थात आमचा काही त्यावर विश्वास बसला नाही. त्या ठिकाणी राजमहाल असावा नाही असे नाही पण सध्याची जी वास्तू होती, तिला बघून आणि तिथल्या लोकांच्या तोंडून कथा ऐकून, माझ्या तोंडून “बुलशीट” येवढा एकच शब्द बाहेर पडला. आमच्या मोहिमेमधल्या लोकांनी हाच प्रकार गोकुळामध्ये देखील अनुभवला होता. आतमध्ये राजमहाल म्हणण्यासारखे काहीही नाहीये.

श्री चक्रवर्ती महाराज दशरथ जी का राजमहाल
14DSCN3737.JPG14DSCN3740.JPG

तिथून निघून आम्ही वाराणसीचा रस्ता पकडला.

अयोध्या ते वाराणसी अंतर साधारण २२० किमी आहे. अकबरपूर वरून वाराणसी मध्ये जाण्यापेक्षा सुलतानपूरवरून डावीकडे वळावे. राष्ट्रीय महामार्ग ५६ असल्याने प्रवास लवकर होतो. अयोध्या सोडायलाच ४ वाजले होते. वाराणसीमध्ये पोहचायला रात्र होणार हे नक्की होतं. साधारणतः ९ वाजतील अस आम्ही डोक्यात ठेऊन चाललो होतो. रस्ता उत्तर प्रदेशच्या मानाने चांगलाच होता. उत्तर प्रदेश मध्ये रात्रीचा प्रवास जीवघेणा ठरू शकतो ह्याची देखील जाणीव होतीच पण आमच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता, मोहीम कधीच पुढे निघून गेली होती. जौनपुरच्या अलीकडे एका छोट्याशा गावामध्ये आम्ही चहा घेतला. अमर आणि मी एका गाडीवर तर रुपेश आणि स्वागत दुसऱ्या बाईकवर होते. वाराणसी अजून ७० किमी वर होते. मी आलोकला फोन केला, आम्ही दोघं एकत्र जहाजावर कामाला होतो.
सर, बस एक घंटे मे आपके घर पे पहोंच जाऊंगा म्हणत मी फोन ठेवला.
१०-१५ मि. होतात न होतात तोच एका टोलनाक्यावर साऱ्या, अमरया थांब थांब असा आवाज आला.
मी दचकून बघितलं, अमरने पण लगेच गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. स्वागत-रुपेश काहीतरी शोधत होते.
काय झालं? विचारायच्या आत मला स्नेहलची बाईक दिसली आणि पोटात गोळा आला. बाईकचा पुढचा भाग पूर्णपणे मोडला होता.
स्वाग्या – रुप्या तुम्ही ठीक तर आहात ना?
स्वागतने काही न बोलता त्याचं हेल्मेट दाखवलं, हेल्मेटला चीर पडली होती.
रुपेशाचा हात कोपरातून निखळला होता.
टोलनाक्यावर उजवीकडून येणाऱ्या ट्रकमुळे रुपेशला दुभाजक दिसला नव्हता आणि गाडी थेट दुभाजकावर जाऊन आदळली होती.
अमर, तू आणि स्वाग्या गाडी नीट आहे का बघा, मी रुपेशला घेऊन दवाखान्यात जातोय.
आमच्या सुदैवाने काही मीटर अंतरावरच दवाखाना होता. नर्सनी लगेच डॉक्टरांना बोलावून आणलं. नशीबाने जास्त लागलं नव्हतं, डॉक्टरांनी हाताला Tourniquet लावलं, एक्स- रे ची गरज नाही, गोळ्या आणि इंजेक्शन खालच्या मेडिकलमधून आणायला सांगितलं.
इंजेक्शन वगैरे देऊन होईपर्यंत मी बाहेर बसून होतो, तिथल्या नर्स आमची खूप आस्थेने चौकशी करत होत्या, मुंबईवरून आहे समजल्यावर तर त्या आमची पण लोक आहेत तिकडं खूप, पण आता राज ठाकरेमुळं लोक थोडी घाबरलीत वगैरे सांगत होत्या.
डॉक्टरांनी गोळ्या कधी घ्यायच्या, घाबरायची गरज नाही, २-३ दिवसात नीट होईल सांगितल्यावर माझा जीव भांड्यात पडला. त्या देवमाणसाने पैसे घ्यायला नम्रपणे नकार दिला. भारतामधल्या मागास समजल्या जाणाऱ्या भागामध्ये आज आम्हाला माणुसकीचं दर्शन झालं.
खाली आलो, तोपर्यंत गाडीदेखील चालवण्यालायक झाली होती, सगळा कार्यक्रम उरकून निघायला ११ वाजले. तोपर्यंत आलोकला देखील फोन करून झाला प्रकार सांगितला होता. तो तर लगेच कार घेऊन आम्हाला आणायला निघाला होता, पण मीच एवढं काही झालं नाही, आम्ही सावकाश येऊ म्हणतं त्याला थांबवलं.
आजचा मुक्काम श्री धर्मसंघ शिक्षा मंडळ, वाराणसी येथे होता. तिथे पोहचायला रात्रीचे १२ वाजून गेले होते. आज सगळेच खूप थकले होते, आलोक वाट बघत बसला होता.
भारत माता मंदिरासमोर ये, आलोकचा फोन आला.
बाकी कोणी आता येण्याच्या मूड मध्ये नव्हते. भारत माता मंदिर शोधता शोधता १ वाजला, आलोक तिथे येऊनच थांबला होता.
आलोकच्या घरी जाऊन, थोडा फ्रेश झालो. वैनी, त्याचा मुलगा सगळेच आमची वाट बघत थांबले होते.
वैनीने मस्तपैकी गरमागरम पराठे खायला दिले आणि सगळ्या दिवसाचा शिणवटा निघून गेला. निघताना काही पराठे उद्यासाठी पण बांधून दिले. या गडबडीत आलोकच्या बच्चासाठी काहीच घेऊन जाता आलं नाही याची चुटपुट लागून राहिली.
परत येऊन बघतो, तर सगळ्यांना मेल्यासारख्या झोपा लागल्या होत्या, माझी स्लिपिंग bag पण गायब होती. कसाबसा मी सतरंजीवर अंगाच मुटकुळं करून पडून राहिलो आणि झोपेची वाट बघू लागलो. पण भयानक थंडी आणि पांघरायला देखील काहीच नसल्याने झोप काही येत नव्हती. थोड्या वेळात डोळा लागतो न लागतो तोच डॉक्टरांचा आवाज आला.
सारंग, अरे काही न घेता कशाला झोपलाय, इकड ये.
डॉक्टरांनी त्यांच्या जवळ असलेली सतरंजी मला पांघरायला दिली आणि सतरंजीच्या मस्त उबेमध्ये मी ताणून दिली.

आजचा प्रवास : ३७० किमी

२० जानेवारी २०१२
आजचा प्रवास :
काशी – अलाहाबाद – चित्रकूट – सतना – मैहर

आज मात्र सकाळी थोड उशिरा म्हणजे साडे सहा वाजता उठलो, कसाबसा ब्रश केला. मोहीम अगोदरचं मार्गस्थ झाली होती. सकाळी सकाळी काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यायचे होते.

वाराणसी घाट :
14DSCN3753.JPGकाशी विश्वेश्वराविषयी थोडेसे :
विश्वेश्वर हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते. पूर्वी वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर होते. हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुल्बउद्दीन ऐबक याने पाडले. या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली. अनेक वर्षे दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर परत पाडून टाकले. अनेक शतके तशीच गेल्या नंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. राजा रणजितसिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता. परंतु तो मुसलमानांनी लूटमार करून नेला. १६ व्या शतकात येथेच संत एकनाथानी " श्रीएकनाथी भागवत" हा वारकरी संप्रदायाचा महान ग्रंथ लिहीला. येथे याची हत्तीवरुन मिरवणूक निघाली.

एक आख्यायिका अशी देखील सांगितली जाते कि, कैलासावर भस्म फासून रहाणाऱ्या शंकराची सर्व टिंगल करावयाचे म्हणून पार्वतीने “मला कुणी चिडविणार नाही” अश्या ठिकाणी घेऊन चला अशी विनंती शंकराला केली.त्यामुळे शंकर येथे येउन राहू लागला.तेथे दिवोदास राजाने मंदिर बांधल्यावर ते त्यात रहावयास गेले

या शहरात सुमारे १६५४ मंदिरे आहेत.त्यामुळे यास मंदिराचे शहर असेही म्हणतात.त्यात प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचे आहे.विश्वनाथाचे दर्शनाअगोदर धुंडीराज किंवा ढुंढीराज विनायकाचे दर्शन घेण्याचा येथे प्रघात आहे.या मंदिराचे सभोवताल अष्ट दिशांचे अष्टविनायक आहेत.साक्षी विनायक,पश्चिमेला देहली विनायक,उत्तरेला पापशार्थी विनायक,दक्षिणेला दुर्गा विनायक,नैऋत्येला भीमचंद विनायक,वायव्येला उदंड विनायक आणि ईशान्येला सर्व विनायक.

मुख्य मंदिर :
काशी विश्वनाथाचे मंदिरात मुख्य पिंडी गाभाऱ्याचे एका टोकाला आहे.त्यावर गंगाजल व बिल्वपत्रे वाहण्यात येतात.ते काळ्या पाषाणाचे व सोन्या-चांदीने मढविले आहे.तेथे दर्शन घ्यावयाचे तर,तीन हार न्यायची पद्धत आहे.एक हार शंकराला,दुसरा पार्वतीला तर तिसरा हार तेथील पूजारी त्या भक्ताचे गळ्यात घालतो.

इतर मंदिरे :
अविमुक्तेश्वर मंदिर
श्री बिंदूमाधव मंदिर
काळभैरव मंदिर
कौदेवी मंदिर
मनकर्णिका मंदिर
पिशाच्च मोचनी मंदिर

वाराणसीविषयी थोडेसे :
काशी, असी व वरुणा या नद्यांच्या संगमावर वसल्याने त्याला 'वाराणसी' हे नाव पडले.
हे शहर वाराणसी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. जगातील सर्वांत जुने सलग वस्ती असलेले शहर अशी ख्याती असलेले गंगा नदीच्या तीरावर वसलेले हे शहर आहे. या शहराला काशी, बनारस आदी अनेक नावे आहेत. त्यांतील काही अशी :
अविमुक्त(शंकराच्या वास्तव्यामुळे),
आनंदकानन/आनंदवन(शंकराला आनंद देणारे वन),
काशिका,
तपःस्थली,
महास्मशान,
मुक्तिक्षेत्र,
रुद्रावास(रुद्राचे राहण्याचे ठिकाण),
श्रीशिवपुरी
हे शहर,महाभारत युद्धात पांडवांकडून लढणाऱ्या काशी राजाने वसविल्यामुळे यास 'काशी'/'काशिका' हे नाव पडले.

स्कंद पुराण या इ स पूर्व ५०० ते ९०० वर्षे जुन्या पुराणात काशीचे महात्म्य आढळते. त्या काशीखंडात वाराणसीच्या आसमंतातील शैव मंदिरांचे वर्णन आहे. सवाई जयसिंग या वैज्ञानिक राजाने इ.स. १७३७ मध्ये बनारसला मानमंदिर येथे वेधशाळा उभारली होती. इ.स. १७८३ च्या आधी पासून काशीवर इंग्रजांचे राज्य होते. येथील विद्वान आणि अभ्यासू लोकांच्या वास्तव्यामुळे भारतातले पहिले गव्हर्नमेंट संस्कृत कॉलेज इ.स. १७९१ साली स्थापन झाले. येथे पारंपरिक व आधुनिक खगोलशास्त्रांतील अभ्यास होत असे. आज येथे बनारस हिंदू विद्यापीठ आहे.
'काश्यां तु मरणमुक्ती': काशीत मरण आल्यास त्या जीवाला मुक्ती मिळते असा समज आहे. प्रयाग, काशी आणि गया अशी त्रिस्थळी यात्रा करण्याची पद्धत आहे.
रामायण, महाभारत, स्कंद, लिंग मत्स्य, पद्म, अग्नि इत्यादी पुराणांमध्ये, बृहत्संहिता, मआसीर-आलम-इ-गिरी या ग्रंथांमध्ये तसेच ह्युयनत्संग, इत्सिंग या चीनी प्रवाशांच्या प्रवासवर्णणांमध्ये वाराणसी विषयी लिहून ठेवले आहे.
( वरील माहिती विकिपीडिया आणि मराठी विश्वकोशवरून साभार )

काशी विश्वेश्वराचे दर्शन छान झालं. इतर ठिकाणांप्रमाणेच इथेही अभिषेक करा , यावं करा त्याव करा सांगणारे अनेक ठक भेटले. आम्ही देखील नेहमीच्या सवयीने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत दर्शन घेतलं. मंदिराबाहेर मरणासन्न स्थितीमध्ये बसून राहिलेल्या आजोबा आजींना बघून 'काश्यां तु मरणमुक्ती' या वाक्याचीच किळस आली.
अनेक मुलं आपल्या आई-वडिलांना येथे काशीला दर्शन करून आणतो म्हणून आणतात आणि सोडून निघून जातात असे तिथल्या काही लोकांनी सांगितले.
विदेशी पर्यटक मात्र खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी पहावयास मिळतात.
घाटावर जाऊन एक चक्कर मारून आलो. बहुतांश विदेशी पर्यटक तिथे चाललेल्या विविध घटनांचे छायाचित्र टिपण्यात मश्गुल होते.

काशी हिंदू विश्वविद्यालय आणि भारत माता मंदिर बघितल्याशिवाय वाराणसी सोडू नको असे आलोकने सांगितल्याने, मी मोर्चा काशी हिंदू विश्वविद्यालयाकडे वळवला. सुमारे १३५० एकर परिसरामध्ये हे विश्वविद्यालय पसरलेले आहे.

काशी हिंदू विश्वविद्यालय बघून झाल्यावर बाईकच्या शोरूम मध्ये गेलो. शोरूम उघडलं होतं, बाईक दुरुस्त व्हायला कमीत कमी २-३ तास लागणार होते, तेवढ्या वेळामध्ये तिथे बसून राहण्यापेक्षा भारत माता मंदिर बघून येऊ असं ठरलं.
वाटेत काळे काका-काकू भेटले. त्यांना पण भारतात एकमेव असलेल्या भारत माता मंदिराविषयी सांगितलं, काका पण यायला लगेच तयार झाले, नेहमीप्रमाणे मोहीम मार्गस्थ झाली होती आणि आम्ही भटकत होतो.
भारत माता मंदिर बघताना मात्र खूप मस्त वाटलं, अजिबात गर्दी नव्हती. मी, दीपक आणि अजून एकदोन विदेशी पर्यटक आले होते.

भारत माता मंदिर
14DSCN3763.JPG

इथे कुठल्या देव-देवीची मूर्ती नाहीये, इथे संपूर्ण भारताचा नकाशा संगमरवरावर त्रिमिती मध्ये काढण्यात आलेला आहे. काळे काका-काकूना पण मंदिर आवडलं, बाहेर येऊन गाडी काढतो न काढतो तोच, विदेशी पर्यटक सारनाथ विषयी काहीतरी बोलत असल्याचं जाणवलं, चौकशी केली असता ते सारनाथ येथे चालले असल्याचं समजलं.
सारनाथ वाराणसी पासून फक्त १० किमी वर आहे. आता इथपर्यंत आलोच आहोत तर भारताची राजमुद्रा ज्या अशोक स्तंभावरून घेतलेली आहे तो बघूनच जाऊया म्हणत मी आणि काळे काकांनी मोर्चा सारनाथ कडे वळवला. एव्हाना १० वाजून गेले होते, रहदारी खूपच वाढली होती. सारनाथला पोचायला आम्हाला १०३० वाजले.
त्या दिवशी नेमका शुक्रवार होता. शुक्रवारी सारनाथच संग्रहालय बंद असल्याचं कळलं.
मग आम्ही दुधाची तहान ताकावर भागवत तिथले स्तूप बघत बसलो.

सारनाथ विषयी थोडेसे :

सारनाथ हे प्रमुख अस बुद्धांच तीर्थस्थळ आहे. मोहम्मद घौरीने हे स्थळ नष्ट केलं होतं, १९०५ साली भारतीय पुरातत्त्व विभागाने याठिकाणी उत्खननास प्रारंभ केला.
येथील प्रेक्षणीय वस्तू :
सारनाथ संग्रहालय
चौखंडी स्तूप
धर्मराजिका स्तूप
धमेख स्तूप
मूलगंध कुटी
वाराणसीला भेट देणाऱ्यांनी मात्र आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण.

सारनाथ संग्रहालय
14 SARNATH.JPG14. SARNATH.JPGचौखंडी स्तूप
14. CHAUKHANDI STUPA.JPG

( सारनाथ छायाचित्र : नीरज जाट )

सारनाथवरून निघेपर्यंत स्वागतचा फोन आला होता, बाईक दुरुस्त झाली होती आता थेट अलाहाबादला भेटायचं होतं, आजचा पल्ला पण मोठा होता. काळे काका आणि आम्ही एकत्रच निघालो.
सारनाथवरून अलाहाबाद १३२ किमी आहे. ठीक ११ वाजता आम्ही सारनाथ सोडलं.
सारनाथ वरून अलाहाबादला जाताना संपूर्ण वाराणसी क्रॉस करावं लागतं, आम्ही पुणेरी पद्धतीने कशीतरी बाईक वाराणसीच्या बाहेर काढली, काळे काकांना मात्र निश्चितच ते जमणार नव्हतं. आम्ही साधारण दुपारी २ च्या दरम्यान प्रयाग गाठलं, कुंभमेळा भरण्याची जागा, त्यामुळे आम्ही जास्त कुणाला शोधायच्या भानगडीमध्ये पडलो नाही. मी आणि दीपक त्रिवेणी संगमाजवळ जाऊन आलो. गंगा आणि यमुना या नद्यांचा संगम मात्र अतिशय सुंदर दिसतो.

प्रयागविषयी थोडेसे :

गंगा, यमुना या नद्यांचा अलाहाबाद शहरानजीक संगम होतो. या नद्यांना लुप्त सरस्वती नदीही येऊन मिळते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे या स्थानास हिंदू तीर्थक्षेत्र मानतात.कुंभमेळ्याच्या चार क्षेत्रांपैकी प्रयाग एक असून, हरिद्वार, उज्जैन व नाशिक ही अन्य क्षेत्रे आहेत.
हे भारतातील दुसरे सर्वात पुरातन शहर असल्याचे मानले जाते. हरवलेले चारही वेद परत मिळाल्यावर प्रजापतीने येथे यज्ञ केला. म्हणून यास प्रयाग असे नावं ज्या वेळेस चंद्र सूर्य मकर राशीत असतात, आणि गुरु वृषभ राशी मध्ये असतो त्यावेळेस येथे कुंभमेळा भरतो. या क्षेत्राच्या परिसरातील काही तीर्थक्षेत्रे :
१. त्रिवेणी माधव
२. सोमेश्वर
३. वासुकीश्वर
४. प्रयागवेणी माधव

भारतातील सगळ्यात मोठा Cable Stayed Bridge - New Yamuna Bridge
14DSCN3784.JPG

दुचाकी असल्यामुळे आम्ही पटकन संगमापर्यंत जाऊन परत येऊ शकलो. चारचाकी आतपर्यंत जात नाही.
साधारण साडेतीन वाजता प्रयाग सोडलं आणि चित्रकुटच्या मार्गाला लागलो.
प्रयाग ते चित्रकुट : १३१ किमी
चित्रकुट ते सतना : ७८ किमी
सतना ते मैहर : ४० किमी
खरं पाहता आमचा आजचा मुक्काम सतनाच्या नानक दरबार गुरुद्वारा मध्ये होता, पण काही कारणाने तो मैहरला करावा लागला.
त्यामुळे अजून साधारण २१० किमी अंतर आहे आणि सतनाला पोहचायला आपल्याला साधारण रात्रीचे नऊ वाजतील अशा बेतात होतो.
चित्रकूट हे बरोबर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर आहे.
साडेतीन वाजले होते, दुपारचं जेवण पण झालं नव्हतं, आता पोटात कावळे ओरडायला लागले होते, वाटेत एका धाब्यावर थांबलो, मनसोक्त जेवणावर आडवा हात मारला. थोड्यावेळ वामकुक्षी घेतली आणि पुढे निघालो.

चित्रकुट मध्ये पोहचायला सात वाजले होते, अंधार पडला होता, अनेक जणांना फोन केला, प्रत्येकजण वेगवेगळ्या जागी होते, मोहीम पूर्णपणे विस्कळीत झाली होती आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे मी आणि दीपक एकटे पडलो होतो. पुढे जाण्यावाचून पर्याय नव्हता.

चित्रकूट विषयी थोडेसे :

राम आणि सीतेने त्यांच्या १४ वर्ष वनवासामधील ११ वर्षे या प्रदेशामध्ये काढली होती.
या ठिकाणी ऋषी अत्री आणि सती अनसुइयाने ध्यान धारणा केली होती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी सती अनसुइयाच्या घरी जन्म घेतला होता.
पाहण्यासारखी ठिकाणे :
कामदगिरी पर्वत : या पर्वताच्या पायथ्याशी अनेक सुंदर मंदिरे आहेत.
रामघाट
जानकी कुंड: जानकी इथे अंघोळ करायची म्हणून जानकी कुंड.
स्फटिक शिळा :
हनुमान धारा :
भरत कूप :
शेवटी आम्ही मनाचा हिय्या करून सतनाच्या दिशेने प्रस्थान केले. रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी रस्त्याची अवस्था होती. रात्र आणि खड्डे हे डेडली कॉम्बिनेशन आहे. दिपकला बाईक चालवायला देऊन बघितली, पण हा जिथे चांगला रस्ता असेल तिथे पण शोधून शोधून खड्ड्यात गाडी घालु लागल्यावर, हा नक्की आपल्याला आज रात्री खड्ड्यात घालणार हे मला जाणवलं, आणि परत एकदा मी गाडीचा ताबा घेतला. कसेबसे साधारण सव्वा नऊच्या सुमारास सतना गाठलं, आता कधी एकदा नानक दरबार गुरुद्वारामध्ये अंग टाकतोय असं झालं होतं, तेवढ्यात संग्रामचा फोन आला, मोहीमेचा आजचा मुक्काम मैहर मध्ये असल्याची गोड बातमी त्याने दिली. त्यांनी देखील सतना नुकतंच सोडलं होत, आता पुढचे ४० किमी काहीही करून पार करायचे होते.
शिवाजी महाराजांचं स्मरण करून गाडीला स्टार्टर मारला. पूर्णपणे रस्ता खाचखळग्यांनी भरलेला, बरं कोणीच सोबत नाही, रस्ता पूर्णपणे सुनसान.
आणि अचानक मला काळे काकांची आठवण झाली. काळजात धस्स झालं.
काळे काका ?
काकांची एकतर CT १००, त्यात काकू बरोबर आणि आम्ही ज्या वेगाने आलो त्या वेगाने काकांना खचितच जमणार नव्हतं. मनातल्या मनातं देवाला काकांना सुखरूप ठेव एवढीच विनवणी केली. आमच्या हातात दुसरं काहीही नव्हतं,
कसाबसा ४० किमी चा टप्पा पार पडला. वाटेत एका ठिकाणी रेल्वे फाटक लागलं, तिथे आमचे काही वीर भेटले आणि एकदाचा जीव भांड्यात पडला.
आजचा मुक्काम बरोबर शारदा मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या एका शाळेमध्ये होता.
तिथे पोहचल्या पोहचल्या काळे काकांचा शोध घेतला, काकांचा मोबाईल पण बंद होता. मोहिमेमधील १५-२० जण सतनामध्ये पोहचले होते, त्या लोकांनी तिथेच थांबायचा निर्णय घेतला होता, स्वागत लोकं सतनाच्या पण २० किमी मागे होते. ते पण तिथेच रात्र काढणार होते. आणि वाईट गोष्ट म्हणजे यांच्या पैकी कुणाबरोबरच काळेकाका काकू नव्हते.
आज रात्रीच्या सभेमध्ये मोहिमेची सभासद संख्या मोजली गेली, काळेकाका काकू सोडले तर बाकी सगळ्यांचा ठावठिकाणा होता. रात्री झोपताना संग्रामाला मी सगळा प्रकार सांगितला. मी उगाचच काकांना माझ्याबरोबर घेऊन गेलो, फालतुगिरी केली मी, असं बरंच काही काही सांगत राहिलो. काकांना सर्वात शेवटी बघितलेला मीच होतो.
रस्ता आणि परिसर लक्षात घेता, आता सगळं काही परमेश्वराच्याच हातात होतं. संग्राम मात्र काही काळजी करू नकोस, काका येतील नीट, राहतील कुठेतरी असं सांगत होता.
काळे काकांना सुखरूप ठेव अशी प्रार्थना करतच निद्रादेवीच्या अधीन झालो.

आजचा प्रवास : ४०३ किमी
उद्याचा प्रवास : मैहर – कटनी – भेडाघाट - जबलपूर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान