भारताच्या पंतप्रधानांनी विधानसभेच्या प्रचारांत उतरणे योग्य कि अयोग्य ?

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 October, 2014 - 11:40

नुकतेच महाराष्ट्र विधानसभेच्या निमित्ताने शिवसेना-भाजपा युती तुटल्याने भाजपाला अचानक साक्षात्कार झाला की गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात आज तितक्याच ताकदीचा एकही नेता महाराष्ट्रात तरी त्यांच्याकडे नाही आणि म्हणूनच त्यांनी आपले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे प्रचारदौरे मोठ्या घाईगडबडीत आखले.

यावरून अगोदरच विरोधकांनी भाजपाला महाराष्ट्रात चेहराच नाही म्हणून त्यांना मोदींना बोलवावे लागले असा ओरडा सुरू केला आहे. अर्थात यामागे मोदींच्या करिष्म्याची भिती असली तरी यात तथ्य आहे हे देखील जाणवते. कारण भाजपाच्या एकूण एक पोस्टरवर श्री नरेंद्र मोदी यांचाच चेहरा झळकतोय, तिथे दुसरा कुठलाही महाराष्ट्रातील भाजपा नेता नाही.

तर, यावरूनच आज एके ठिकाणी चर्चेत मोदींचा उल्लेख ‘भाजपाचे पोस्टर बॉय’ असा झालेला पाहिला. खरे तर यात फारसे काही आक्षेपार्ह वाटले नाही, पण तरीही भारताच्या पंतप्रधानपदी असलेल्या नेत्यावर कुठल्याही प्रकारची व्यक्तीगत टिप्पणी नको म्हणत मी हस्तक्षेप केला. समोरून या आक्षेपाला दाद न देता उलट, "आज मोदी महाराष्ट्राचा दौरा करत आहेत ते भारताचे पंतप्रधान म्हणून नसून भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून करत आहेत तर यात चुकले काय?" असा खडा सवाल आला.

याउपर मोदींनी भाजपाला महाराष्ट्रात सत्ता द्याल तर केंद्रातून मी मदत करेल असाही एक इशारा दिल्याचे ऐकिवात आहे (चूक असेल तर कर्रेक्ट करा).

एकंदरीत स्वत:देखील विचार करता मला जाणवले की ज्यांना आपण देशाचे प्रधानमंत्री बनवून देश चालवायला दिला आहे, त्यांनी देशासमोर समस्यांचा आणि त्यांच्यासमोर कामाचा डोंगर उभा असताना, ती कर्तव्ये टाळून / वा त्या कामांना प्राधान्य न देता, आपल्या राजकीय पक्षातर्फे विधानसभा निवडणूकीच्या प्रचारांना वेळ देणे योग्य आहे का?

अर्थात हा धागा आता काढला, किंवा हे आता सुचले, तरीही हे निव्वळ मोदींना नाही तर आजवरच्या सर्वच आजी-माजी तसेच भावी पंतप्रधानांना देखील लागू. त्यामुळे आधीही असेच व्हायचे, हे सर्वांनीच केलेय, या पोस्ट टाकायला माझी हरकत नाही. पण तटस्थ बुद्धीने विचार करत मुद्द्यावर देखील प्रामाणिक मत मांडा. प्रश्न अगदीच बालिश असेल तर क्षमाही करा. श्री नरेंद्र मोदी यांचाच नाही तर भारताच्या पंतप्रधानपदाचा मान ठेवतच हा प्रश्न विचारला आहे.

जय हिंद !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages