सुंदल

Submitted by नंदिनी on 25 September, 2014 - 05:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. काबुली चणे १ कप
२. ओले खोबरे (किसून) खवणलेले नकोय
३. मोहरी, हिंग, कड्।ईपत्ता, लाल मिरची
४. उडीद डाळ : २ चमचे
५. चणाडाळ २ चमचे.

क्रमवार पाककृती: 

तमिळ लोकांमध्ये नवरात्रीमधून घरामध्ये वेगवेगळ्या बाहुल्या मांडून त्यांची सजावट करतात. त्याला गोलू किंवा कोलू म्हणतात. तमिळी लोकामध्ये क आणि ग एकच असतो. आपला विनायक त्यांचा विनायगार होतो (शिवाय इथे पोचेपर्यंत तो कार्तीकेयाचा मोठा भाऊ पण होतो!! असो.)

तर या बाहुल्या बघायला आलेल्या लोकांना प्रसाद म्हणून हा सुंडल केला जातो. (तो सुंदल की ते सुंदल मला माहित नाही. कुनाला माहित असल्यास माहितीत वाढ करा.) करायला अत्यंत सोपा आणि झटपट पदार्थ आहे. कांदा लसूणसमसाला वगैरे नसल्यानं नैवेद्यासाठी देखील चालतो.

सुंडल इथं बर्याचदा स्ट्रीट फूड म्हणूनदेखील मिळतो. मरीना बीचवर निवांत बसून समुद्राच्या खार्‍य वार्‍याचा आनंद घेत पत्रावळीच्या द्रोणामधले सुंडल खाणे एकदम मस्त वाटतं. (तरी आम्ही करंटे लोक तिथं पावभाजी आणी पाणीपुरीच्या नावानं अश्रू सांडतोच) असो. आता मुख्य रेसिपी.

१. काबुली चणेअथवा छोले रात्रभर पाण्यात भिजवा.
२. दुसार्‍या दिवशी मीठ आणि पाच सहा कप पाणी घालून कूकरमध्ये शिजवा.
३. दोन चमचे उडीद डाळ, चणाडा़ळ आणि तीन चार मिरच्या तव्यावर नुसतं कोरडं परतून घ्या. हे मिक्सरमध्ये वाटून पावडर करून घ्या.
४. तेलाची चरचरीत मोहरी, उडीद, हिंग कढीपत्ता घालून फोडणी करा. नो हळद प्लीज. त्यामध्ये पाण्यातून काढलेले छोले घाला. छोले कोरडे होइपर्यंत झटपट परता. त्यात मिक्सरमध्ये केलेली पावडर घाला, खोबरं घाला. नीट मिक्स करा.

सुंड्ल तयार आहे!!!! वाटल्यास वर कोथिंबीर वगैरे घालायचे नखरे करा. पण तसं कराय्ची काहीही गरज नाही.

गरम असताना छान लागतंच, पण गार झाल्यावर पण सुंदर लागतं.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे.
अधिक टिपा: 

सुंडल कुठल्याही कडधान्याचे बनवता येतात. जस्त करून छोले, चणा आणि वाटाण्याचे सुंडल केले जातात. इच्छा असल्यास राजमा, शेंगदाने, चवळी वगैरेंचेही सुंदल करून पाहता येतील.

मुगाचे सुंदल करताना लाल मिरची पूर्णपणे वगळा. गूळ पाण्यात विरघळवून घ्या. त्याचा कच्चा पाक करून गाळून घ्या. फोडणी करून शिजवलेले मूग त्यात घाला, गुळाचा पाक घालून निट मिक्स करा. गोड सुंदल तयार आहे (हा आताच शेजाबाईनं आणून दिलाय. ऑस्सम लागतोय)

माहितीचा स्रोत: 
तमिळ मैत्रीणी.
आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! नन्दिनी, धन्यवाद. काल रात्री छोले केले तेव्हा त्यातले पाव वाटी नुसते उकडलेले बाजूला ठेवण्याची सुबुद्धी झाली ते बरे. आता सन्ध्याकाळी असे करुन बघते.:स्मित:

लाडकी रेस्पी! ओला नारळ मस्त लागतो यात. मी फोडणीत डाळी घालत नाही. किंचित हिंग घालते. मिरच्या चिरून. कडीपत्ता कोथिंबीर सढळ हाताने. आमच्याकडे बहुतेक करून प्रसाद म्हणून, खिरापतीला करते.
ते बोम्मलं कोलवू माझ्या एका दुरच्या मावशींकडे दिवाळीत असतं. सुंदर आरास असते. बोम्मलु म्हणजे बाहुल्या. ती पाहून मला गुलाबाई/भुलाबाईंची हटकून आठवण येतेच Happy

हो हो. मी खूपदा खाल्लंय सुंदल. माहेरी सोसायटीत सौदिंडियन पब्लिक मुबलक होतं. सोसायटीच्या गणपतीला नेहमीच हा प्रसाद केला जायचा.

आमच्या शेजार्‍यांकडून नेहमीच नवरात्रीत येते हे. अगदी मधल्या वेळचे खाणे म्हणून खातो आम्ही. याला थोडा कापराचा वास येतो का ? आमच्याकडे येते त्याला येत असतो. कणभर कापूर घालत असावेत.

फटू?

याला थोडा कापराचा वास येतो का ? आमच्याकडे येते त्याला येत असतो. कणभर कापूर घालत असावेत. >>> हो करेक्ट. येतो खरा कापराचा वास.

माझ्याकडे उडीद डाळ, हरबरा डाळ, धने, जीरे, लाल सुक्या मिरच्या भाजून केलेली पूड होती, तीच वापरली. आमच्या इथे बालाजीच्या देवळात प्रसाद म्हणून देतात.

अंजली, मस्त फोटो. मी सध्या अजिबात बनवणार नाही. सर्वत्र नैवेद्यम म्हणत चारपाच प्रकारचे सुंदल रोज येत राहतात.

खायला पण अगदी 'सुंदल' लागतं. लहानपणी शेजारच्या तमिळीयंस कडे नवरात्रीचे नऊही दिवस असं काही प्रसाद म्हणुन मिळायचं आणि आम्ही सगळी मुलं झाडुन रोज हजेरी लावयचो.

अन्जली मस्त दिसतय सुन्दल. नन्दिनी काल केल ग सुन्दल. फोटो काढायला वेळ झाला नाही, खूप उशीर झाल्याने आणी पाहुणे आल्याने जमलेच नाही. पण छान झाले होते. एकदम हटके चव. धन्यवाद.:स्मित:

एकदम टेस्टी लागत. आमच्याकडेसुद्धा प्रसादाला बनवतात.
अंजली. फोटो तों.पा.सु. आहे.

आमच्या समोर राहतात एक तमिळीयन... त्यांच्याकडुन येतो हा प्रसाद. सही लागतो.

मस्तच.

सोसायटीमधे नवरात्रात परवा एका तमिळ फॅमिलीकडून वाटाण्याची ह्याच प्रकारची उसळ होती. त्याला सुंदल म्हणतात. हे प्राजक्ता आणि नंदीनी ह्यांची रेसिपी वाचल्यावर आज कळलं. Happy

काल कलर्स मराठीवरच्या कुकरी शोत तांदळाच्या पिठाची उकड काढून त्याचे सुबक गोळे करून त्यांचे सुंदल केले गेले.
मध्यप्रदेशात लहानपण, विदर्भात सासुरवास भोगणार्‍या बाईंनी ती कर्नाटकची खासियत असल्याचं सांगितलं.
नेटवर शोधाशोध केली तर ती तामिळनाडूची खासियत असून विनायक चतुर्थीला केली जाते असं एका ठिकाणी कळलं.

उकड आवडणार्‍यांना हे व्हेरिएशन आवडेल. आणि उकडीच्या मोदकांना एक चटपटीत सोबतही होईल.

तुमची लिंक ओपन होत नाही, मयेकर. पण गणपतीला करत असतील तर ते कोळ्ळकट्टे असतील. आपल्याकडे निवग्रया करतात तसंच उरलेल्या मोदगमच्या पीठाचे गोळे वाफवून फोडणीत परततात. कर्नाटकात उकडीचे मोदक करत नाहीत.

Pages