आय मेड अ मिसटेक

Submitted by बेफ़िकीर on 10 September, 2014 - 12:22

मध्यंतरी कामानिमित्त पॉला नावाच्या कॅनेडियन युवतीशी संवाद साधण्याचा योग आला. ती चक्क पुण्यात येऊन एक मराठी फीचर फिल्म बनवत आहे जिचा विषय शिवरायांच्या काळाशी निगडीत असून ती फिल्म ऑगस्ट २०१५ मध्ये प्रदर्शीत होणार आहे. विषय अत्यंत दिलचस्प आहे पण व्यावसायिक कारणांमुळे तो येथे नोंदवणे अयोग्य आहे. तिचे आडनांवही येथे न देण्याचे कारण तेच आहे.

पॉलाने फिल्म मेकिंग हे क्षेत्र का निवडले, भारत का निवडला, मराठी भाषा का निवडली, पुणे का निवडले, शिवशाहीशी निगडीत विषय का निवडला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला यथावकाश देता येतील.

ह्या मुलाखतीदरम्यान चित्रपटनिर्मीती व्यतिरिक्तची चर्चा कॅनेडियन व भारतीय महिला ह्यांची तुलना वर्तणूक, संस्कार, स्वातंत्र्य, कौटुंबिक'ता', सौंदर्याच्या परिभाषा, पोषाख अश्या निकषांवर झाली.

चर्चेच्या शेवटी शेवटी मी विचारलेला प्रश्न फारच नि:संदिग्ध होता.

"एक संदेश, जो तू भारतीय मुली व स्त्रियांना देऊ पाहात असशील, तो कोणता?"

हा प्रश्न तिला विचारणे हा निव्वळ मुलाखतीचा एक भाग होता. ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यास ती पात्र आहे किंवा नाही हा विचार मी केलेला नव्हता.

त्यावर पॉलाचे उत्तर तत्परतेने आले. ती म्हणाली,

"डिमांड अ‍ॅन्ड एक्स्पेक्ट मोअर रिस्पेक्ट फ्रॉम अदर्स"

अनेक दिवस ह्या उत्तराने विचारात पाडले होते.

'असे कसे होऊ शकेल' ह्या शंकेने नव्हे, 'नेमके काय बदलायला लागेल' ह्या शंकेने!

'पॉला', एक 'गोरी' युवती असे म्हणाली म्हणून आपण विचारात पडलो आहोत का हाही विचार करून पाहिला. तेव्हा पटले की 'हो', ती गोरी आहे म्हणून आणि गोरी वा काळी काहीही असो पण, ती ह्या संस्कृतीतील अजिबात नाही म्हणून आपण विचारात पडलो आहोत. त्यात पुन्हा ती 'गोरी'ही आहेच, ह्या गोष्टीचा आपल्यावर प्रकर्षाने प्रभाव पडतच आहे.

आता द्विधा मनस्थिती झाली. एका भलत्याच संस्कृतीमधील जेमतेम चोवीस वर्षांचे आयुष्य जगलेली युवती येऊन काहीबाही बोलते ह्याने आपण विचारात पडावे की आपल्याकडील बहुतांशी स्त्रिया ज्या विचारांच्या पुरस्कर्त्या आहेत त्यांचे 'त्या येथल्याच असणे' हे क्वॉलिफिकेशन ध्यानात घेऊन पॉलाचे म्हणणे झटकून टाकावे!

मग 'आपण -येथल्या- बायकांशी कसे वागतो' ह्यावर विचार करून पाहिला. मला जाणवले की मी त्यांना 'बायका' म्हणून वागवतो. बायका 'बायका' आहेत हे मनात प्रथम येते आणि 'म्हणून मग कसे वागायला हवे' ह्याचा साचा पुढचे वर्तन सुचवत जातो. मी पॉलाचे म्हणणे 'एका बाईचे म्हणणे' म्हणून का नाही विचारात घेतले ह्यावर विचार केल्यावर जाणवले की 'पॉलाच्या म्हणण्याला मी एखाद्या भारतीय स्त्रीच्या म्हणण्यापेक्षा अधिक महत्व अ‍ॅटॅच केलेले होते'. ह्यामागे स्कीन कलर, अतीप्रगत देशातील स्त्री वगैरे दिखाऊ कारणे तर असतीलच, पण त्याहीपेक्षा एक अशी अपेक्षा होती की 'प्रगत' संस्कृतीमधील ही युवती 'बाई' ह्या विषयाचे एक अतिशय वेगळेच स्वरूप सादर करून आपल्या जुनाट 'स्त्रीकेंद्रीत' विचारांमध्ये एक नावीन्याचा अंश आणू शकेल. कदाचित, तिने काहीतरी धीट विधान करून आपल्या पुरुषी मनाचा एक दुर्गम कोपरा सुखावावा अशी सुप्त इच्छा असावी!

बहुधा, मी पॉलालाही एक बाई म्हणूनच बघत होतो. अर्थात माझे सध्याचे कामच ते आहे की बायकांना भेटणे, त्यांच्या मुलाखती घेणे वगैरे! आणि त्या बायका जेव्हा माझ्याशी मनमोकळेपणाने बोलतात तेव्हा 'आपण एका पुरुषाशी बोलत आहोत' ह्याची जाणीव ठेवून किंचित अधिकच बोल्ड होऊन बोलतात हे चक्क खरे आहे. पण हे सगळे करत असताना आपण एका बाईला भेटत आहोत ही भावना मनात राहतेच राहते.

भारतामध्ये, एक पुरुष म्हणून, मला अजूनही बाईला आधी बाई म्हणून वागवण्याची सवय आहे.

एखाद्या बाईला निव्वळ एक माणूस मानून मी हवे ते बोलू शकत नाही.

तिला तिचे बाईपण बहाल केल्याशिवाय मला माझे मीपण मिळतच नाही इथे.

मी जेव्हा एखाद्या बाईला तिचे 'बाई'त्व मान्य करून तू खूप सुंदर आहेस आणि तुला पाहून तुझ्यावर तात्काळ भाळावेसे वाटत आहे हे - अतिशय मोकळेपणाने - म्हणतो, तेव्हा त्या बाईला एक 'बाई' म्हणून ते ऐकायला आवडेल ह्याची मला खात्री असते. एक 'माणूस' म्हणून ऐकायला आवडेल असे नव्हे!

आता आता तर असे वाटायला लागले आहे की येथील बायका, बायका म्हणून आपले अस्तित्व जपतात ह्यामुळेच इतर प्रदेशांतील 'माणूस' होऊन जगणार्‍या बायकांना 'माणूस' होणे शक्य होते.

ते अलाहिदाच!

पण गोची अशी आहे, की पॉलाचे म्हणणे असे होते, की बाईला बाई म्हणण्याआधी माणूस म्हणा आणि वागा! तिला जितका देता त्यापेक्षा अधिक आदर द्या.

म्हणजे काय करायचे? नेमके करायचे काय? जिथल्या बायकांच्या मते त्यांची पहिली ओळख 'एक बाई' अशी आहे तिथे नेमके काय करायचे?

बाईला माणूस म्हणून वागवल्यावर अश्लीलच बोलता यायला हवे असे मुळीच नाही. पण सहज खांद्यावर हात टेकवता येतो का? 'गप साले' म्हणून खांद्यावर बुक्की मारता येते का? "चल आज बसायचे का" असे म्हणता येते का? ". "ए, येते का कोपर्‍यावर बिडी मारायला" अशी हाक मारता येते का? "काय ट्रॅफीक होते भेंच्योद" असे म्हणता येते का?

पण तरीही बायकांना जाळले जाते, त्यांचे शोषण होते. आणि हे तर तिथेही होते आणि प्रचंड प्रमाणावर होते असे तिचे म्हणणे आहे.

मग पॉला, यू आर राँग!

इथे स्त्री अधिक सुरक्षित आहे असे मला वाटते. कुटुंबव्यवस्था मोठ्या प्रमाणावर असल्याचाही काही ना काही परिणाम आहेच सकारात्मक! आणि मुळातच लोकसंख्या तुमच्या कित्येक पटीने असल्यामुळे गुन्ह्यांची संख्याही कित्येक पट असू शकेल. पण ओव्हरऑल, वुई ट्रीट वूमन अ‍ॅज अ वूमन!

फक्त दुर्दैवाने ह्या विधानाचे दोन्ही अर्थ होतात, चांगले आणि वाईट! चांगला अर्थ, वूमन इज अ सुपरह्यूमन आणि वाईट अर्थ 'वूमन इज अ वूमन फर्स्ट अ‍ॅन्ड देन अ ह्यूमन'!

आम्ही एक समाज म्हणून आज कसे आहोत हा वेगळा भाग आहे, पण आम्ही कसे असायला हवे आहे ह्याच्या परिभाषा येथे अतिशय व्यवस्थित नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि त्या पाळायला हव्यात ह्याचे भान तळागाळापर्यंत पोचलेले आहे केव्हाचेच!

सो, आय मेड अ मिसटेक! दॅट आय आस्क्ड 'यू' धिस क्वेश्चन!

मला वाटते, भारतीय स्त्री इतर देशांतील स्त्रियांच्या तुलनेत अधिक सुरक्षित वातावरणात आहे.

===============

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता यावर येणारी तमाम पोस्ट्स ही अपेक्षितच असणार हे तुम्हालाही माहित असावे , तरी असा लेख लिहावासा वाटावा याचे कारण काय असावे?
ऊप्स ! आय मेड अ मिसटेक! दॅट आय आस्क्ड 'यू' धिस क्वेश्चन! Happy

maitreyee + १<<<मला वाटते, भारतीय स्त्री इतर देशांतील स्त्रियांच्या तुलनेत अधिक सुरक्षित वातावरणात आहे.>>> हे फारच वरवरचं विधान झालं.

पण सहज खांद्यावर हात टेकवता येतो का? 'गप साले' म्हणून खांद्यावर बुक्की मारता येते का? "चल आज बसायचे का" असे म्हणता येते का? ". "ए, येते का कोपर्‍यावर बिडी मारायला" अशी हाक मारता येते का? "काय ट्रॅफीक होते भेंच्योद" असे म्हणता येते का? >>>>> हे केलं म्हणजे माणसासारखं वागवलं का? उत्तम!

तेव्हा त्या बाईला एक 'बाई' म्हणून ते ऐकायला आवडेल ह्याची मला खात्री असते. >>>> ही खात्री तुम्ही कशी काय करुन घेतली? बाईला आवडेल पेक्षा 'मी' म्हणतोय म्हणून बाईला आवडेल असं तर नाही?

मला कामानिमित्ताने एक गोरा माणुस भेटला. तो गोरा असल्याने अर्थात्च माझ्यापेक्षा जास्त हुशार होता. म्हणून
त्याला देशोदेशीचे पुरुष, त्यांच्या आवडीनिवडी, संस्कृती वगैरे वर प्रश्न विचारले. मुलखतीशेवटी तो म्हणाला "भारतीय पुरुष फार थोडक्यात समाधान मानतात".
यावर विचार केला असता जाणव्लं की मला पुरुषाला माणुस म्हणून बघता येतं का? की मी नेहमी त्याला पुरुष म्हणूनच बघते? त्या पुरुषाशी मला " बिबा चा सेल सुरु आहे", "एल व्ही चं क्लचेस चं नवं कलेक्शन कसलं से* आहे", "आज मेली कामवाली बाईच आली नाही" अशा गप्पा मारता येतात का? नाही. त्याअर्थी भारतीय पुरुषांनी त्यांचं पुरुषपण मान्य केलंय. म्हणूनच ते जास्त सुरक्षित आहेत. नाहीतर त्यांची काही खैर नव्हती.

प्रामाणिकपणे सांगायचे तर हे वाचून निराशा झाली. आपले नाव बघून वाचायला घेतल्याने अपेक्षा जास्त असल्याचाही परीणाम असावा, पण घाईगडबडीत आलेले विचार घाईगडबडीतच निष्कर्श काढून मांडल्यासारखे वाटले, भले लेखात आपण हे बरेच दिवस आपल्या मनात घोळत होते असा उल्लेख का केला असेना.

आणि शेवटचे वाक्य - " भारतीय स्त्री इतर देशांतील स्त्रियांच्या तुलनेत अधिक सुरक्षित वातावरणात आहे."
वर जे मुद्दे काही मांडून, विचारमंथन करून आपण सहजपणे या निष्कर्षापर्यंत आलात, ते पाहता जर आपण राजकारणी असता तर आपलाच मुक्ताफळांचा धागा आहे ना, तिथे हे डकवण्यायोग्य असते Happy

काहीच नाही पटले. क्षमस्व !

एक सहजच आठवले ते सांगतो.
एक मैत्रीण आहे माझी. सुशिक्षित, स्वताच्या पायावर उभी, इंजिनीअर आहे. दोन मुली आहेत तिला. ती सांगत होती, पहिल्या मुलीच्या वेळी ती फार रडली होती. कारण काय तर आजच्या जमान्यात जे गैरप्रकार घडत आहेत ते पाहता मुलींना सांभाळणे जिकीरीचे काम, आणि म्हणून तिला मुलगी नको होती.
आता मलाही मुलगी झालीय. माझ्या मनात असला काही विचार आला नाही. उलट कोणी पाहिलेच माझ्या मुलीकडे तर दोन ठेऊन देईन त्याला असा विचार केला की संपले. हा विचार प्रत्येक मुलीचा बाप करत असेल आणि त्याच्यापुरता विषय संपत असेल.

हे सांगायचा हेतू एवढाच की स्त्रियांना या देशात वा जगात कुठेही सुरक्षित वाटतेय की नाही हे त्यांचे त्यांनाच ठरवू देणे उत्तम. तुम्हाला किंवा मला, थोडक्यात आपण पुरुषांना काय वाटते हे काही मॅटर करत नाही.

पण सहज खांद्यावर हात टेकवता येतो का? 'गप साले' म्हणून खांद्यावर बुक्की मारता येते का? "चल आज बसायचे का" असे म्हणता येते का? ". "ए, येते का कोपर्‍यावर बिडी मारायला" अशी हाक मारता येते का? "काय ट्रॅफीक होते भेंच्योद" असे म्हणता येते का? >>>>> हे केलं म्हणजे माणसासारखं वागवलं का? उत्तम

अगदी १००% सहमत.

तुम्ही तुमच्या नवीन पुरुष शेजार्याशी, पुरुष बॉस शी, बसमधल्या अनोळखी पुरुषाशी तरी असे बोलू शकाल काय? केवळ काही लोक त्यांच्या घनिष्ट मित्रांशी याप्रकारे वागतात; म्हणून असं नाही करता आल तर माणसासारख वागवल नाही असा त्याचा अर्थ??? खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी???

मी माझ्या घनिष्ट पुरुष मित्रांना सुद्धा वरच्या मजकुरातील काही शब्द वापरू शकत नाही. मग त्यांना मी माणसासारखे वागवत नाही काय?

माझ्यामते, स्त्रीला माणसासारखे वागवणे म्हणजे - तिच्याकडे एक व्यक्ती म्हणून पाहणे. व एखाद्या आदरणीय व्यक्तीला जी चांगली वागणूक देवू ती देणे.

कन्क्लुजन आधीच काढले होतेत किंवा ज्यावर विष्वास आहे तेच कन्क्लुजन कसे योग्य आहे हेच सिद्ध करायचा प्रय्त्न केलात .... ह्याला कारण लिंगाधिष्टित पोरुषत्वाची व्याख्या... आणि हा प्रचंड गैरसमज ... >>> आणि तुला पाहून तुझ्यावर तात्काळ भाळावेसे वाटत आहे हे - अतिशय मोकळेपणाने - म्हणतो, तेव्हा त्या बाईला एक 'बाई' म्हणून ते ऐकायला आवडेल ह्याची मला खात्री असते. <<<< Happy

Treating woman as woman हे इतल्या बायकांना सुरक्षित कसे बनवते हे काही कळले नाही.

यावर विचार केला असता जाणव्लं की मला पुरुषाला माणुस म्हणून बघता येतं का? की मी नेहमी त्याला पुरुष म्हणूनच बघते? त्या पुरुषाशी मला " बिबा चा सेल सुरु आहे", "एल व्ही चं क्लचेस चं नवं कलेक्शन कसलं से* आहे", "आज मेली कामवाली बाईच आली नाही" अशा गप्पा मारता येतात का? नाही. त्याअर्थी भारतीय पुरुषांनी त्यांचं पुरुषपण मान्य केलंय. म्हणूनच ते जास्त सुरक्षित आहेत. नाहीतर त्यांची काही खैर नव्हती.

Rofl

मला वाटते, भारतीय स्त्री इतर देशांतील स्त्रियांच्या तुलनेत अधिक सुरक्षित वातावरणात आहे.
हे वाक्य सोडुन बाकी मते आवडली. हे वाक्य एखाद्या सत्ताधारी पक्षाला शोभेल .

खास करुन हे आवडले....

बाईला माणूस म्हणून वागवल्यावर अश्लीलच बोलता यायला हवे असे मुळीच नाही. पण सहज खांद्यावर हात टेकवता येतो का? 'गप साले' म्हणून खांद्यावर बुक्की मारता येते का? "चल आज बसायचे का" असे म्हणता येते का? ". "ए, येते का कोपर्‍यावर बिडी मारायला" अशी हाक मारता येते का?.......

अम्हाला अमेरिकेत येउन १ वर्ष झाले आणी दोन तीन गोष्टी अश्या घडल्या की पॉलानी सांगितले ते पटायला लागले.

१> पहिल्या तीन महिन्यात आम्ही कम्युनिटी थियटर मध्ये नाटक पहायला गेलो. Seating first come first serve असल्यामुळे आम्ही लवकर गेलो. आम्ही यायच्या आधी चार माणस रांगेत होती. १५ मिनिटानी खिडकी उघडली पण आजुन तिकिटे द्यायला सुरवात केली न्हवती. माझ्या पुढचा साठीतिल माणुस जरा पुढे जाउन काय चालाले आहे ते बघायचा प्रयत्न करत होता. तेव्हा त्याचा पुढिल समवयस्क बाई त्याला म्हणाली की queue cut करु नका. तेव्हा त्या माणासाने त्या बाईच्या खांद्यावर हात टाकुन म्हणाला की मी फक्त आत काय चालले आहे ते बघत आहे. नंतर ती दोघे तिकिटे घेईपर्यन्त एवढा वेळ का लागतोय त्याबद्दल चर्चा केली. मी आणी बायको हा प्रसंग जर भारतात घडला असता तर त्या म्हातार्या माणसाला प्रथम त्या बाईनी आणि नंतर public नी कश्या शिव्या दिल्या असत्या त्यावर चर्चा केली.

२> माझ्या मुलीचे वर्गशिक्षक आणी आमची चांगली मैत्री झाली. शाळेत एका समारंभानंतर आम्ही तासभर वेळ गप्प मारत उभे होतो. अचानक त्याना काळले की त्याना घरी जायला हवे तेव्हा त्यानी माझ्या व बायकोच्या खांद्यावर हात टाकुन आम्हाला बाय करुन निघुन गेले. आम्ही नंतर हा प्रसंग भारतात किवा आशिया खंडात झाला असता तर त्यानी कश्या शिव्या ऐकल्या असता त्यावर विचार करत घरी आलो.

कुठली संस्र्कुती चांगली आणी कुठली वाईट ह्याबद्दल आजुन आमचे ही ऐकमत होउ शकली नाही . भारताप्रमाणे ईथे शुध्दा बायकाना पाहिजे तशी सुरक्षा नाही. ह्या सहजपणाचा गैरफायदा घेणारे काही महाभाग आहेत.

मला वाटते, भारतीय स्त्री इतर देशांतील स्त्रियांच्या तुलनेत अधिक सुरक्षित वातावरणात आहे. -->> नाही पटलं - बाकी लेख चांगलाच आहे, आणि तुम्ही केलेलं "बाईला बाई म्हणून वागवल्यावरच पुरुषांना "मी"पण मिळतं, हे अगदी खरं आहे - बाई कितीही शिकली, आपल्यापेक्षा जस्ती हुशार निघाली, बधत्या घेऊन वरीष्ठ झाली, तरी पुरुषांचं हे असंच - त्यांना "बाई" म्हणून वागवणं...

anwyay पुलेशु

नताशा, "तो गोरा असल्याने अर्थात्च माझ्यापेक्षा जास्त हुशार होता." --- काय हे..? आपण please असा विचार नका करू - हे खूप निराशा आणणारं वाक्य आहे -

माझ्या office मधे - सर्वोच्च boss पुणेकर होत आणि पुण्यातच काम करतो - गोरे आम्हाला report करत..

पटला नाही लेख...एकाच बाजुने विचार केल्यासारखा वाटला.....

तो गोरा असल्याने अर्थात्च माझ्यापेक्षा जास्त हुशार होता.>>> नताशा गोरा असल्याने त्याच्या पार्श्वभागावर निळे पंख होते का काळ्या किंवा बाकी कुठल्याही लोकांना नसलेले????? तो माणुस हुशार असेलही...पण फक्त गोरा म्हणुन तो हुशारच असला पाहीजे असं नाही....

लेखाचे नक्की प्रयोजन काय होत? कारण यातील कोणतीच गोष्ट पटण्यासारखी, विचार करायला लावणारी अथवा अमलात आणावी अशी नव्हती.

नावाप्रमाणेच विचारांच्या बाबतीतही तुम्ही बेफिकीर आहात वाटत.
Any way all the best for your new thinking process.

आणि हो,

पण सहज खांद्यावर हात टेकवता येतो का? 'गप साले' म्हणून खांद्यावर बुक्की मारता येते का? "चल आज बसायचे का" असे म्हणता येते का? ". "ए, येते का कोपर्‍यावर बिडी मारायला" अशी हाक मारता येते का? "काय ट्रॅफीक होते भेंच्योद" असे म्हणता येते का? >>>>> हे केलं म्हणजे माणसासारखं वागवलं का? उत्तम

अगदी १००% सहमत.

पण आम्ही कसे असायला हवे आहे ह्याच्या परिभाषा येथे अतिशय व्यवस्थित नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि त्या पाळायला हव्यात ह्याचे भान तळागाळापर्यंत पोचलेले आहे केव्हाचेच! >>>>>> तुम्हाला असे खरेच वाटते बेफी?

भारतीय स्त्री इतर देशांतील स्त्रियांच्या तुलनेत अधिक सुरक्षित वातावरणात आहे.>>>> असहमत^१०००

भारतीय स्त्री इतर देशांतील स्त्रियांच्या तुलनेत अधिक सुरक्षित वातावरणात आहे >>>>>>
पुढे "26 मे नंतर" असे लिहायचे राहीले वाटते..

अने तू ज्या अर्थी बोलतेयेस त्याच अर्थी नताशा बोलतेय.
उपहासाने.
भारी पोस्ट नताशा. मी जाम हसले Lol
कारण इतका पर्फेक्ट टोला मला मारता आला नसता Happy

बाकी चालू द्या Happy लेख आवडला नाही पटण्यासारखा मुळीच नाही Happy
(भारतात स्त्री सुरक्षित असती तर शोषित योद्धा मालिका लिहावी लागली नसती Happy )

भारतात स्त्री पाकिस्तानच्या तुलनेत जास्त सुरक्षित आहे, बाकी देशांशी थोडी ना आपली कधी स्पर्धा असते ..

बाकी त्या पॉलाच्या विधानाने हबकून जाणे किंवा त्याला अवास्तव महत्व देणे ही सहज प्रतिक्रिया झाली.
मी नाही का माझ्या ना.ब.औ.ल.खो. लेखात म्हटले होते की गोरे लोक्स म्हटले की आपण भारतीय दबकतोच Happy

<<<आता आता तर असे वाटायला लागले आहे की येथील बायका, बायका म्हणून आपले अस्तित्व जपतात ह्यामुळेच इतर प्रदेशांतील 'माणूस' होऊन जगणार्‍या बायकांना 'माणूस' होणे शक्य होते.>>

यातल्या 'ह्यामुळेच' शब्दाचा अर्थं कुणाला कळल्यास मला पण सांगा.

(भारतात स्त्री सुरक्षित असती तर शोषित योद्धा मालिका लिहावी लागली नसती Happy >>>> thanks रिया हेच सांगायला इथे आले होते. बेफि लेख अजिबात पटला नाही.

यातल्या 'म्हणून' शब्दाचा अर्थं कुणाला कळल्यास मला पण सांगा.>>म्हण्जे बाई बाई सारखीच राह्ते.पुरूष्या सारखे पिऊन गटारात पडणे किवां हम रस्त्यावर गुंडगीरी करणे इतपत सुधारली नाही.

लेखाशी असहमत !

लेखाची सुरवात खुप सुंदर झाली. पॉलाच्या प्रश्नापर्यंत सगळे व्यवस्थित होते.

त्यानंतरचा भाग म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडे. काहीच हाती लागत नाही.

<<<<< भारतीय स्त्री इतर देशांतील स्त्रियांच्या तुलनेत अधिक सुरक्षित वातावरणात आहे.>>>> रियली ??? मग ते निर्भया प्रकरण का घडल असाव बर ? तसेच हुंडाबळी वगैरे प्रकार का घडत असावेत .
लेख अजिबात पटलेला नाहीच. नताशा भारी पोस्ट .

नताशा | >> मस्त .
कैच्या काही लेख आहे . बाईला माणूस म्हणून समजून घेणं ह्याचा अर्थच लेखकाला कळला नाही असं वाटतंय .

Pages