आय अ‍ॅम अ हाऊसहसबंड

Submitted by बेफ़िकीर on 22 August, 2014 - 09:21

जून १९८९ ते मार्च २०१४ अशी सुमारे २५ वर्षे नोकरी केली आणि दिली सोडून! काही आवडीची कामे मिळू लागल्याने आणि ती कामे आरामात घरी बसून करता येत असल्याने हा निर्णय घेतला. अर्थात त्या कामांमधून मिळणारी रक्कम आधीच्या तुलनेत निव्वळ नगण्यच आहे, पण काम मस्त आहे. लिहा, फिरा, संवाद साधा, समाजाची प्रतिबिंबे सातत्याने समाजाला दाखवत राहा!

तर ते एक असो!

पण ह्या नोकरी सोडण्याच्या प्रक्रियेदरम्यान अनेक महत्वाच्या गोष्टी घडल्या. मी स्वतःच एका गंभीर विकारातून कसाबसा बाहेर पडलो. बायकोची नोकरी जोरदारपणे चालू होतीच पण ती आता अधिक वेळखाऊही होऊ लागली. आपल्याबद्दल, आपल्या घरी बसण्याबद्दल, लोक काय म्हणत असतील असे तर आपल्याला वाटत राहणार नाही ना ह्या प्रश्नातून बाहेर पडलो. त्यातच वडिलांचे सहस्त्रचंद्रदर्शन आणि लघुरुद्र असा संलग्न व मोठा कार्यक्रम ठरला. शंभर एक पान होणार म्हंटल्यावर सर्व नियोजनाने व प्रत्यक्ष अंमलबजावणीनेच दिड महिना खाल्ला! प्रत्यक्ष कार्यक्रमाआधी पंधरवड्यापासूनच नातेवाईकांचे आगमन होऊ लागले. आणि त्याच दरम्यान बाबा जिन्यावरून पडले. उजव्या मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाले आणि शुगर डिटेक्ट झाली. ह्या सर्व महान स्ट्रेस्ड घटनाक्रमात बायकोला रजा मिळणे अशक्य असल्याने बहुतांशी भार माझ्यावर पडला. घरात दोन डायबेटीसचे पेशंट (बाबा व सासरे) आणि एक न्युरोचा पेशंट (सासूबाई) ह्या सर्वांचे दवाखाने, टेस्ट्स, डॉक्टर व्हिजिट्स, त्यांच्या पथ्यानुसार रोजच्या जेवणांसाठी लागणारी भाजी वगैरे, कार्यक्रमाची धावपळ, आमंत्रणे, खरेदी, माझ्याकडे स्वतःकडे असलेले काम आणि काय काय!

शेवटी एकदाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. बाबांच्याच सहस्त्रचंद्रदर्शनाला त्यांचाच हात फ्रॅक्चर्ड असल्याने अर्थातच त्यांची मनस्थिती काहीशी निराश होती. त्यांची मनस्थिती उंचावणे, त्यांचा हात हातात घेऊन त्यांना विविध ठिकाणी घेऊन जाणे, त्यांना आंघोळ घालणे, कपडे घालण्यास मदत करणे असे सगळे चाललेले होते.

ह्या सगळ्याचा एक वेगळाच परिणाम मला जाणवत होता. आजवर नोकरीच्या निमित्ताने देशभर भटकणारा, व्यसनी आणि चिडका ठरलेला मुलगा अचानक प्रेमळ व आधार देणारा असल्याचे बाबांच्या लक्षात आले होते. घरात बसून काहीबाही लिहून वेळ घालवणारा नवरा आपला डबाही भरू शकतो हे बायकोच्या लक्षात आले होते. आणि ते त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्या माझ्याप्रती असलेल्या वर्तनात जो फरक पडला होता तो माझ्या लक्षात आला होता. तो फरक मला आवडल्यामुळे मला त्याचीच नशा चढली. आणि ती नशा चढल्यापासून माझी आताची दिनचर्या जर बघितली तर मलाच हसू येते.

१. रोज सकाळी स्वयंपाकाला येणार्‍या बाईंना नाश्त्याला काय करायचे व जेवायला काय करायचे हे सांगणे
२. वडिलांसाठी आता जो मुलगा सकाळच्या तासभरासाठी ठेवलेला आहे तो त्यांची आंघोळपांघोळ बघतो. त्याचा आणि बाबांचा चहा करणे
३. केराचे डबे बाहेर ठेवणे
४. पिण्याचे पाणी पिंपात व बाटल्यांत भरून ठेवणे
५. टेरेसमधील तुळशीला पाणी घालून कबूतरांसाठी दाणे टाकून ठेवणे
६. नाश्ता झाल्यावर वडिलांना त्यांची औषधे, बायकोला व्हिटॅमिन सप्लीमेंट्स देणे व स्वतःची औषधे घेणे
७. वडिलांना देवळात नेऊन आणणे
८. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रीत करणे
९. केर फरशी व भांड्यांसाठी ज्या बाई येतात त्यांच्याकडून फर्निचर, कपाटे वगैरेही (ठरल्यानुसार) पुसून घेण्याकडे लक्ष पुरवणे
१०. धुणेवाल्या बाई येण्याआधी धुणे भिजवलेले आहे की नाही हे पाहणे
११. वडिलांना पोळी कुस्करून देणे व त्यांचे ताट वाढणे. त्यांना जेवण आवडावे म्हणून सॅलड, विविध चटण्या वगैरे करून देणे. (मला ठेचा चांगला करता येतो).
१२. नंतर पुन्हा स्वतःचे काम!
१३. मग माझेच जेवण, माझे जेवण झाल्यानंतर दोघांसाठी चहा!
१४. संध्याकाळी साडे पाचच्या आत त्या दिवशीच्या रात्रीच्या जेवणाची आणि उद्या सकाळसाठीची भाजी आणणे
१५. पुन्हा स्वयंपाकाला बाई आल्या की काही ना काही वेगळा प्रकार करण्याचा प्रयोग करणे! अनेकदा वेगवेगळ्या भाज्या मिक्स करण्यानेही बरेच काही नावीन्य मिळते. आहाराची न्युट्रिशन व्हॅल्यू, स्वाद आणि नावीन्य हे तिन्ही वाढतील हे कटाक्षाने बघणे
१६. देवाला दिवा लावणे (सकाळी पूजा बाबाच करतात, त्यांना तयारी तेवढी मी करून देतो पूजेची)
१७. दोन्ही वेळच्या जेवणाची पाने घेणे, ती वाढणे, जेवणे आटोपल्यावर पाने ओट्यावर ठेवणे, ती विसळून ठेवणे (कारण ती घासली जाणार असतात एकदम दुसर्‍या दिवशी), टेबल पुसून घेणे, उरलेले पदार्थ लहान भांड्यांत काढून ते फ्रीजमध्ये ठेवणे
१८. सकाळी स्वतः अर्धा तास चालणे, संध्याकाळी घरातच इतर काही व्यायाम करणे

ह्या सगळ्यात जमेल तेव्हा मायबोली, जमेल तेव्हा बाहेरच्या पार्ट्या वगैरे चालू असते. पण ह्या सगळ्यामुळे आता टीव्ही बघणे, निर्हेतूक भटकणे वगैरे होतच नाही.

हे सगळे लिहायचे काय कारण? तर हे सगळे करायला लागल्यापासून मी आधीपेक्षा अचानक बराच अधिक महत्वाचा माणूस ठरू लागलो आहे घरात! आणि त्याची मजाही येत आहे. कुठेतरी सोसायटीतल्या इतर लोकांना संध्याकाळी नोकरीवरून घरी परतताना पाहून मनात येते की अरे आपणही खणखणीत नोकरी करत होतो, पण कोण जाणे कसे, ही भावना विशेष दुखरी भासत नाही.

हे आजच का लिहिले?

मगाशीच भाजी घेऊन घरी परत आलो. पाऊस असल्याने भाजी घ्यायलाही कार नेली होती हे पाहून लिफ्टमध्ये भेटलेली बायकोची मैत्रीण म्हणाली:

"आजकल सब्जी लानेभी कारसे जाते हो क्या?"

ती मिश्कील स्वभावाची व खूप चांगली आहे. ती दुसर्‍या मजल्यावर लिफ्टमधून बाहेर पडताना मला अचानक वाक्य सुचले आणि मी तिला म्हणालो......

"आय अ‍ॅम अ हाऊसहसबंड नाऊ"

ह्यावर ती खळखळून हासेल हेच मला अपेक्षित होते कारण मीही ते किंचित विनोदी ढंगानेच बोललो होतो व हाऊसहसबंड ही टर्मही तिच्यासाठी नवीनच होती.

पण ... जेव्हा ती प्रत्यक्ष खूपच जोरात हासली तेव्हा मात्र मनात आले...

......अरे... लोक आपल्याला कदाचित हासत असतील......

असो!

घरच्यांच्या चेहर्‍यावर प्रेमाने हास्य येत असेल तर जगाच्या चेहर्‍यावर थट्टेचे हसू आले तरी बिघडते कोठे? अनेकदा मला 'तू नावासारखाच बेफिकीर आहेस' असे सर्वांसमोर हिणवणारे बाबा पंधरा दिवसापूर्वी अगदी अचानकच बोलून गेले की 'यू आर अ ग्रेट सन' तेव्हा मी अजिबात ग्रेट वगैरे नसूनही मनात जे वाटले होते ते पुरेसे आहे. एखाद्या हाऊसवाईफच्या, एखाद्या गृहिणीच्या किती सामान्य कौतुकाच्या अपेक्षा असतील ह्याची जाण होणे, हे शिक्षणही खूप महत्वाचेच की?

(आत्मस्तुती हा हेतू प्रामाणिकपणे नाही, माझ्या व्यक्तिमत्वात झालेले बदल व त्या अनुषंगाने इतरांच्या विचारांत झालेले बदल नोंदवणे इतकाच हेतू होता).

धन्यवाद!

===========

नवीन भागः

हा वरील; लेख लिहून सुमारे दोन वर्षे होत आली. ह्या दरम्यान होममेकर म्हणून मी नुसता स्थिरावलो नव्हे तर माझ्या जबाबदार्‍या काहीच्या काही वाढल्या. आता मला खरोखरच नोकरीपेक्षाही अधिक ताण जाणवतो. कदाचित वर लेखात न आलेल्या अश्या काही जबाबदार्‍या खालील यादीत देत आहे.

१. रोजची भाजी व इतर सामान आणणे व त्यात वैविध्य आणणे. गावाला जाणार असलो तर तितक्या दिवसांचे मटेरिअल घरात भरून ठेवणे

२. रोजची न्याहारी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण ह्याचे संपूर्ण नियोजन व त्यातील वैविध्याचे आणि पोषकतेचे संपूर्ण नियोजन! गावाला जाणार असलो तर कामवाल्या बाईसाठी हे सर्व लिहून ठेवणे. उपमा, पोहे, धिरडी, सँडवीच हे आळीपाळीने नाश्त्यासाठी बनवून घेणे! दुपारच्या जेवणात हिरव्या भाज्या व फळभाज्या तसेच मिक्स कोशिंबिरींचे सातत्य व वैविध्य ठेवणे! ठेचा, चटणी, काहीवेळा कोशिंबिरी स्वतः करणे! रात्रीच्या जेवणात कायम नावीन्य राहावे म्हणून इडली सांबार, वडा सांबार, फलाहार, पराठे, घरी बनवलेला पिझा, सँडविचेस, वरणफळे असे पदार्थ बनवून घेत राहणे! रात्रीचे जेवण आम्ही तिघे एकत्र घेत असलेले एकमेव जेवण असल्याने व बरेचदा एक किंवा दोनच पदार्थ पुरत असल्याने हे प्रकार करतो.

३. सध्या रोज प्यायचे पाणी खालून भरून आणावे लागते.

४. बायकोचा डबा भरून देणे! आमटी, भाजी, कोशिंबीर, पोळ्या व एखादे फळ!

५. रोज तिघांची औषधे किंवा सप्लीमेंट्स नाश्त्याच्या टेबलवर काढून ठेवणे!

६. ज्या दिवशी ज्या कामासाठीची बाई येणार नाही ते काम करून टाकणे! ह्यात भांडी घासणे किंवा केर काढणे हे प्रकार समाविष्ट आहेत.

७. कचरा विल्हेवाट नियोजन, रद्दी, औषधे आणणे, सर्व बिले भरणे, सर्व बँकांची कामे, अचानक उद्भवणारी कोणतीही कामे ही सर्व करणे व करत राहणे!

८. जेवणानंतर अन्न काढून ठेवणे, फ्रीजचा दर एक दिवसाआड आढावा घेणे, विविध प्रकारची थंड पेये आणून घरच्यांना सरप्राईज देणे असे प्रकार आवडीने करतो.

९. नातेवाईक, मित्रमंडळी ह्यांच्याशी रेग्युलर रॅपो ठेवण्याचेही एक काम असते जे आता माझ्याकडेच आहे.

एकुणात, बायकोला एकही काम पडू नये, घर व्यवस्थित चालत राहावे आणि सर्वांची मनस्थिती शक्य तितकी चांगली राहावी असा प्रयत्न असतो. हे करताना कोणी आपले कौतुक केले तर मुठभर मांस चढते हेही मान्य करतो. पण हे सगळे करताना नोकरीपेक्षा अधिक ताण येऊ शकतो असे काहीवेळा वाटते. प्रत्येक गोष्टीला रोजच्यारोज एक डेडलाईन असते. काहीवेळा खूप फिरावे लागते, सारखे घराबाहेर जाऊन काहीतरी आणावे लागते.

बाकी मग सगळी आवराआवर साधारण रात्री साडे नऊला संपली की शांतपणे किंगफिशर माईल्ड घेत टीव्ही बघत बसतो. जेवायला एकटा (मित्रांसोबत) किंवा बायकोबरोबर बाहेर जाणार असलो तर वडिलांचे अर्थातच सर्व काही सेटिंग करून मगच बाहेर पडतो.

हे सगळे करताना मी हाती घेतलेली कामे काहीवेळा मागेही पडतात पण रेटा द्यावाच लागतो.

एकंदर धमाल असते. रोज संध्याकाळी बायकोला फोन करून 'आज रात्री तुला काय खावेसे वाटत आहे' हे विचारण्यातही मजा येऊ शकते.

===========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज पहिल्यादा हा लेख वाचला. जे लिहले आहे ते मनापासुन लिहले आहे , आवडले. ईतरानी सांगितल्याप्रमाणे हाउसमेकर हा शब्द योग्य राहिल.

३०-३२ वर्षापुर्वी जयंत क्रुपलानीची दुरदर्शन्वर मि अ‍ॅड मिसेस नावाची सिरियल येउन गेली त्यात त्यानी हाउसमेकरचे काम केले होते. आजुबाजुच्या लोकाना हाउसमेकर असणे ऑकवर्ड वाटत होते आणि त्यावर ती मालिका होती. हा लेख वाचुन त्या मालिकेची आठवण झाली

Ki & ka

आज लेख वाचला.....

लेख चांगला आहे....

पण टिपिकल पुरुषी आहे. तुम्ही काहीतरी वेगळं करत आहात हे तुम्हाला पदोपदी जाणवतं आहे... जाणवुन दिलं जात आहे, म्हणुन तुम्ही हा लेख लिहिलात. तुम्ही पुरुष आहात म्हणुन ह्या लेखाला किंमत आहे.

मी पण ह्याच सिच्युएशन मधे आहे. मी हा लेख लिहिला "आणि आता हाउस वाइफ झाले", तर एकही माणुस हा लेख वाचणार नाही. कारण आपण जी गॄहितकं मनात ठेवतो त्यामुळे एका स्त्रीने , जी अतिषय बीझी होती, जीची करीयर प्रचंड वेळखाउ पण ब्राइट होती, जी घर सांभाळतानाही हे तुम्ही दिलेले सगळे प्रकार करत होती.( सासर माहेर दोन्ही कडुन आम्ही एकुलते एक आहोत) आता तिने १८ वर्षांची नोकरी सोडली, तीही कोणती जबाबदारी आली म्हणुन नव्हे तर तत्वांशी तडजोड नको म्हणुन !!!! घरी राहिल्यावर तिच्यावर आपसुक काही जबाबदार्‍या पडल्या. येवढी आई घरात आहे, म्हणुन मुलीने क्लास ला जाणार नाही म्हणुन सांगितले. तिच्या आभ्यासाची जबाबदारी पूर्णपणे अंगावर आली. ( हे फार सुखद आहे). ही तक्रार नाही. मी ही सगळी मजा अतिषय आनंदाने एंजॉय करते आहे.

पण तरी ही "न्युज" होत नाही.

हेच दु:ख आहे. पण हेच वास्तव आहे. लोकांच्या नजरेतलं आश्चर्य जाइल तेंव्हा खरं.......अजुनही आपण तेच टिपिकल पुरुषी मेंटॅलिटीचे आहोत......

<<हेच दु:ख आहे. पण हेच वास्तव आहे. लोकांच्या नजरेतलं आश्चर्य जाइल तेंव्हा खरं.......अजुनही आपण तेच टिपिकल पुरुषी मेंटॅलिटीचे आहोत......>>
----- आपण म्हणत आहात ते खरे आहे. बदल होत आहे... पण बदलाचा वेग मन्द आहे. काल पर्यन्त पुरुषान्नी घरातल्या कामान्ची जबाबदारी घेतली असे होत नव्हते, ते आता व्हायला सुरवात झालेली आहे. त्यामुळे या बदलाचे स्वागत होणे आवश्यकच आहे. अजुन काही दशकानन्तर असे कौतुक होणारही नाही.

लोकहो, लेख संपादीत करून काही वाढीव जबाबदार्‍या लिहिल्या आहेत. त्या आधीही लिहिलेल्या होत्या की नाही हे चेकही केलेले नाही. Sad कृपया सांभाळून घ्यावेत.

>>>पण टिपिकल पुरुषी आहे. तुम्ही काहीतरी वेगळं करत आहात हे तुम्हाला पदोपदी जाणवतं आहे... जाणवुन दिलं जात आहे, म्हणुन तुम्ही हा लेख लिहिलात. तुम्ही पुरुष आहात म्हणुन ह्या लेखाला किंमत आहे.<<<

मोहन की मीरा,

मला पदोपदी काय जाणवत असेल हे तुम्ही कसे ठरवता? तुम्ही म्हणता तसे नाही जाणवत मला. तसेही जगभरात आजकाल पुरुष भरपूर कामे प्लस नोकरी करत असतात. मी नोकरी करत नसलो तरी अर्थार्जनासाठी काहीतरी करतच आहे. रिकामा नव्हे. मी माझ्या आधीच्या आणि आत्ताच्या आयुष्यातील फरक लिहिला आहे केवळ! कोणीतरी माझे खूप कौतुक करावे म्हणून'च' हे सगळे लिहिले आहे असे नाही.

शिवाय, तुम्ही म्हणता त्यातून बाहेर पडलेल्याही चिक्कार बायका आजूबाजूला आहेत. अर्थार्जन न करणार्‍या, श्रीमंत असल्यामुळे घरात विशेष काहीही न करणार्‍या, नुसती मजा करणार्‍या अश्या खूप बायका मला आजूबाजूला दिसत असतात.

तेव्हा सरसकटीकरण टाळले तर बरे! Happy

बदल होत आहे... पण बदलाचा वेग मन्द आहे. काल पर्यन्त पुरुषान्नी घरातल्या कामान्ची जबाबदारी घेतली असे होत नव्हते, ते आता व्हायला सुरवात झालेली आहे. त्यामुळे या बदलाचे स्वागत होणे आवश्यकच आहे. अजुन काही दशकानन्तर असे कौतुक होणारही नाही +1

लेख आवडला.
तुमचे मनापासून कौतुक.!

सुरुवातिला सर्व नवीन असते पण दोन वर्शानीही सातत्य काय्म आहे हे पाहुन आनन्द झाला. Happy
रोज संध्याकाळी बायकोला फोन करून 'आज रात्री तुला काय खावेसे वाटत आहे' हे विचारण्यातही मजा येऊ शकते. >>>+1
आमच्याकदे मी ओफिसमधून निघताना फोन करते किन्वा फोन येतो की आज काय करायचे आहे. तसे नवरा भाज्या कापून, मुलाना दूध नाश्ता देऊन, अभ्यास घेऊन ठेवतो. मी आले की भाज्या फोडणी टाक्ते आणि पोळ्या करते. दोघानी मिळुन चालवलेला सन्सार म्हणजे खरी मजा. Happy

विद्या.

mast! Chaan vatla vachun...

Ghari swaipakachi bai asli tari kiti kama nighat astat na....asa koni responsibility gheun sagli kama keli tar kai sukh!!!

Ani he fakta navra bayko parenta limited nasoon kittek ghari aji-ajooba pan he sagli kaama Karun madat karat astat!

meera >>> आता तिने १८ वर्षांची नोकरी सोडली, तीही कोणती जबाबदारी आली म्हणुन नव्हे तर तत्वांशी तडजोड नको म्हणुन !!!! >>> Dusri nokari bagha ki evadha masataap hot asel tar....
Befi ani tumchya situation madhe motha farak asa ki tey khush ahet tyanchya decision var tumhi bitter distay.

सहज चाळता चाळता हा लेख दिसला. छान लिहिले आहे.

>>> पण टिपिकल पुरुषी आहे. तुम्ही काहीतरी वेगळं करत आहात हे तुम्हाला पदोपदी जाणवतं आहे... जाणवुन दिलं जात आहे, म्हणुन तुम्ही हा लेख लिहिलात. तुम्ही पुरुष आहात म्हणुन ह्या लेखाला किंमत आहे. <<<
>>> पण तरी ही "न्युज" होत नाही. हेच दु:ख आहे. पण हेच वास्तव आहे. लोकांच्या नजरेतलं आश्चर्य जाइल तेंव्हा खरं.......अजुनही आपण तेच टिपिकल पुरुषी मेंटॅलिटीचे आहोत...... <<<
मुळात मी कित्ती-कित्ती काम करतो/करते, हे सांगायची गरज का पडावी? (यात स्त्रिया पण आल्या आणि पुरुषपण). कामे कधीच संपत नाहीत, त्यामुळे जमेल आणि आवडेल तितकेच करावे आणि सोडून द्यावे.
मी रिटायर झालो तरी आनंदात आहे आणि स्वतःला बिझी ठेवतो इतपतच 'बेफिकीर' यांना म्हणायचे आहे. यात आत्मप्रौढी काही नाही. (म्हणजे मलातरी तसे वाटले.)

Pages