आय अ‍ॅम अ हाऊसहसबंड

Submitted by बेफ़िकीर on 22 August, 2014 - 09:21

जून १९८९ ते मार्च २०१४ अशी सुमारे २५ वर्षे नोकरी केली आणि दिली सोडून! काही आवडीची कामे मिळू लागल्याने आणि ती कामे आरामात घरी बसून करता येत असल्याने हा निर्णय घेतला. अर्थात त्या कामांमधून मिळणारी रक्कम आधीच्या तुलनेत निव्वळ नगण्यच आहे, पण काम मस्त आहे. लिहा, फिरा, संवाद साधा, समाजाची प्रतिबिंबे सातत्याने समाजाला दाखवत राहा!

तर ते एक असो!

पण ह्या नोकरी सोडण्याच्या प्रक्रियेदरम्यान अनेक महत्वाच्या गोष्टी घडल्या. मी स्वतःच एका गंभीर विकारातून कसाबसा बाहेर पडलो. बायकोची नोकरी जोरदारपणे चालू होतीच पण ती आता अधिक वेळखाऊही होऊ लागली. आपल्याबद्दल, आपल्या घरी बसण्याबद्दल, लोक काय म्हणत असतील असे तर आपल्याला वाटत राहणार नाही ना ह्या प्रश्नातून बाहेर पडलो. त्यातच वडिलांचे सहस्त्रचंद्रदर्शन आणि लघुरुद्र असा संलग्न व मोठा कार्यक्रम ठरला. शंभर एक पान होणार म्हंटल्यावर सर्व नियोजनाने व प्रत्यक्ष अंमलबजावणीनेच दिड महिना खाल्ला! प्रत्यक्ष कार्यक्रमाआधी पंधरवड्यापासूनच नातेवाईकांचे आगमन होऊ लागले. आणि त्याच दरम्यान बाबा जिन्यावरून पडले. उजव्या मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाले आणि शुगर डिटेक्ट झाली. ह्या सर्व महान स्ट्रेस्ड घटनाक्रमात बायकोला रजा मिळणे अशक्य असल्याने बहुतांशी भार माझ्यावर पडला. घरात दोन डायबेटीसचे पेशंट (बाबा व सासरे) आणि एक न्युरोचा पेशंट (सासूबाई) ह्या सर्वांचे दवाखाने, टेस्ट्स, डॉक्टर व्हिजिट्स, त्यांच्या पथ्यानुसार रोजच्या जेवणांसाठी लागणारी भाजी वगैरे, कार्यक्रमाची धावपळ, आमंत्रणे, खरेदी, माझ्याकडे स्वतःकडे असलेले काम आणि काय काय!

शेवटी एकदाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. बाबांच्याच सहस्त्रचंद्रदर्शनाला त्यांचाच हात फ्रॅक्चर्ड असल्याने अर्थातच त्यांची मनस्थिती काहीशी निराश होती. त्यांची मनस्थिती उंचावणे, त्यांचा हात हातात घेऊन त्यांना विविध ठिकाणी घेऊन जाणे, त्यांना आंघोळ घालणे, कपडे घालण्यास मदत करणे असे सगळे चाललेले होते.

ह्या सगळ्याचा एक वेगळाच परिणाम मला जाणवत होता. आजवर नोकरीच्या निमित्ताने देशभर भटकणारा, व्यसनी आणि चिडका ठरलेला मुलगा अचानक प्रेमळ व आधार देणारा असल्याचे बाबांच्या लक्षात आले होते. घरात बसून काहीबाही लिहून वेळ घालवणारा नवरा आपला डबाही भरू शकतो हे बायकोच्या लक्षात आले होते. आणि ते त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्या माझ्याप्रती असलेल्या वर्तनात जो फरक पडला होता तो माझ्या लक्षात आला होता. तो फरक मला आवडल्यामुळे मला त्याचीच नशा चढली. आणि ती नशा चढल्यापासून माझी आताची दिनचर्या जर बघितली तर मलाच हसू येते.

१. रोज सकाळी स्वयंपाकाला येणार्‍या बाईंना नाश्त्याला काय करायचे व जेवायला काय करायचे हे सांगणे
२. वडिलांसाठी आता जो मुलगा सकाळच्या तासभरासाठी ठेवलेला आहे तो त्यांची आंघोळपांघोळ बघतो. त्याचा आणि बाबांचा चहा करणे
३. केराचे डबे बाहेर ठेवणे
४. पिण्याचे पाणी पिंपात व बाटल्यांत भरून ठेवणे
५. टेरेसमधील तुळशीला पाणी घालून कबूतरांसाठी दाणे टाकून ठेवणे
६. नाश्ता झाल्यावर वडिलांना त्यांची औषधे, बायकोला व्हिटॅमिन सप्लीमेंट्स देणे व स्वतःची औषधे घेणे
७. वडिलांना देवळात नेऊन आणणे
८. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रीत करणे
९. केर फरशी व भांड्यांसाठी ज्या बाई येतात त्यांच्याकडून फर्निचर, कपाटे वगैरेही (ठरल्यानुसार) पुसून घेण्याकडे लक्ष पुरवणे
१०. धुणेवाल्या बाई येण्याआधी धुणे भिजवलेले आहे की नाही हे पाहणे
११. वडिलांना पोळी कुस्करून देणे व त्यांचे ताट वाढणे. त्यांना जेवण आवडावे म्हणून सॅलड, विविध चटण्या वगैरे करून देणे. (मला ठेचा चांगला करता येतो).
१२. नंतर पुन्हा स्वतःचे काम!
१३. मग माझेच जेवण, माझे जेवण झाल्यानंतर दोघांसाठी चहा!
१४. संध्याकाळी साडे पाचच्या आत त्या दिवशीच्या रात्रीच्या जेवणाची आणि उद्या सकाळसाठीची भाजी आणणे
१५. पुन्हा स्वयंपाकाला बाई आल्या की काही ना काही वेगळा प्रकार करण्याचा प्रयोग करणे! अनेकदा वेगवेगळ्या भाज्या मिक्स करण्यानेही बरेच काही नावीन्य मिळते. आहाराची न्युट्रिशन व्हॅल्यू, स्वाद आणि नावीन्य हे तिन्ही वाढतील हे कटाक्षाने बघणे
१६. देवाला दिवा लावणे (सकाळी पूजा बाबाच करतात, त्यांना तयारी तेवढी मी करून देतो पूजेची)
१७. दोन्ही वेळच्या जेवणाची पाने घेणे, ती वाढणे, जेवणे आटोपल्यावर पाने ओट्यावर ठेवणे, ती विसळून ठेवणे (कारण ती घासली जाणार असतात एकदम दुसर्‍या दिवशी), टेबल पुसून घेणे, उरलेले पदार्थ लहान भांड्यांत काढून ते फ्रीजमध्ये ठेवणे
१८. सकाळी स्वतः अर्धा तास चालणे, संध्याकाळी घरातच इतर काही व्यायाम करणे

ह्या सगळ्यात जमेल तेव्हा मायबोली, जमेल तेव्हा बाहेरच्या पार्ट्या वगैरे चालू असते. पण ह्या सगळ्यामुळे आता टीव्ही बघणे, निर्हेतूक भटकणे वगैरे होतच नाही.

हे सगळे लिहायचे काय कारण? तर हे सगळे करायला लागल्यापासून मी आधीपेक्षा अचानक बराच अधिक महत्वाचा माणूस ठरू लागलो आहे घरात! आणि त्याची मजाही येत आहे. कुठेतरी सोसायटीतल्या इतर लोकांना संध्याकाळी नोकरीवरून घरी परतताना पाहून मनात येते की अरे आपणही खणखणीत नोकरी करत होतो, पण कोण जाणे कसे, ही भावना विशेष दुखरी भासत नाही.

हे आजच का लिहिले?

मगाशीच भाजी घेऊन घरी परत आलो. पाऊस असल्याने भाजी घ्यायलाही कार नेली होती हे पाहून लिफ्टमध्ये भेटलेली बायकोची मैत्रीण म्हणाली:

"आजकल सब्जी लानेभी कारसे जाते हो क्या?"

ती मिश्कील स्वभावाची व खूप चांगली आहे. ती दुसर्‍या मजल्यावर लिफ्टमधून बाहेर पडताना मला अचानक वाक्य सुचले आणि मी तिला म्हणालो......

"आय अ‍ॅम अ हाऊसहसबंड नाऊ"

ह्यावर ती खळखळून हासेल हेच मला अपेक्षित होते कारण मीही ते किंचित विनोदी ढंगानेच बोललो होतो व हाऊसहसबंड ही टर्मही तिच्यासाठी नवीनच होती.

पण ... जेव्हा ती प्रत्यक्ष खूपच जोरात हासली तेव्हा मात्र मनात आले...

......अरे... लोक आपल्याला कदाचित हासत असतील......

असो!

घरच्यांच्या चेहर्‍यावर प्रेमाने हास्य येत असेल तर जगाच्या चेहर्‍यावर थट्टेचे हसू आले तरी बिघडते कोठे? अनेकदा मला 'तू नावासारखाच बेफिकीर आहेस' असे सर्वांसमोर हिणवणारे बाबा पंधरा दिवसापूर्वी अगदी अचानकच बोलून गेले की 'यू आर अ ग्रेट सन' तेव्हा मी अजिबात ग्रेट वगैरे नसूनही मनात जे वाटले होते ते पुरेसे आहे. एखाद्या हाऊसवाईफच्या, एखाद्या गृहिणीच्या किती सामान्य कौतुकाच्या अपेक्षा असतील ह्याची जाण होणे, हे शिक्षणही खूप महत्वाचेच की?

(आत्मस्तुती हा हेतू प्रामाणिकपणे नाही, माझ्या व्यक्तिमत्वात झालेले बदल व त्या अनुषंगाने इतरांच्या विचारांत झालेले बदल नोंदवणे इतकाच हेतू होता).

धन्यवाद!

===========

नवीन भागः

हा वरील; लेख लिहून सुमारे दोन वर्षे होत आली. ह्या दरम्यान होममेकर म्हणून मी नुसता स्थिरावलो नव्हे तर माझ्या जबाबदार्‍या काहीच्या काही वाढल्या. आता मला खरोखरच नोकरीपेक्षाही अधिक ताण जाणवतो. कदाचित वर लेखात न आलेल्या अश्या काही जबाबदार्‍या खालील यादीत देत आहे.

१. रोजची भाजी व इतर सामान आणणे व त्यात वैविध्य आणणे. गावाला जाणार असलो तर तितक्या दिवसांचे मटेरिअल घरात भरून ठेवणे

२. रोजची न्याहारी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण ह्याचे संपूर्ण नियोजन व त्यातील वैविध्याचे आणि पोषकतेचे संपूर्ण नियोजन! गावाला जाणार असलो तर कामवाल्या बाईसाठी हे सर्व लिहून ठेवणे. उपमा, पोहे, धिरडी, सँडवीच हे आळीपाळीने नाश्त्यासाठी बनवून घेणे! दुपारच्या जेवणात हिरव्या भाज्या व फळभाज्या तसेच मिक्स कोशिंबिरींचे सातत्य व वैविध्य ठेवणे! ठेचा, चटणी, काहीवेळा कोशिंबिरी स्वतः करणे! रात्रीच्या जेवणात कायम नावीन्य राहावे म्हणून इडली सांबार, वडा सांबार, फलाहार, पराठे, घरी बनवलेला पिझा, सँडविचेस, वरणफळे असे पदार्थ बनवून घेत राहणे! रात्रीचे जेवण आम्ही तिघे एकत्र घेत असलेले एकमेव जेवण असल्याने व बरेचदा एक किंवा दोनच पदार्थ पुरत असल्याने हे प्रकार करतो.

३. सध्या रोज प्यायचे पाणी खालून भरून आणावे लागते.

४. बायकोचा डबा भरून देणे! आमटी, भाजी, कोशिंबीर, पोळ्या व एखादे फळ!

५. रोज तिघांची औषधे किंवा सप्लीमेंट्स नाश्त्याच्या टेबलवर काढून ठेवणे!

६. ज्या दिवशी ज्या कामासाठीची बाई येणार नाही ते काम करून टाकणे! ह्यात भांडी घासणे किंवा केर काढणे हे प्रकार समाविष्ट आहेत.

७. कचरा विल्हेवाट नियोजन, रद्दी, औषधे आणणे, सर्व बिले भरणे, सर्व बँकांची कामे, अचानक उद्भवणारी कोणतीही कामे ही सर्व करणे व करत राहणे!

८. जेवणानंतर अन्न काढून ठेवणे, फ्रीजचा दर एक दिवसाआड आढावा घेणे, विविध प्रकारची थंड पेये आणून घरच्यांना सरप्राईज देणे असे प्रकार आवडीने करतो.

९. नातेवाईक, मित्रमंडळी ह्यांच्याशी रेग्युलर रॅपो ठेवण्याचेही एक काम असते जे आता माझ्याकडेच आहे.

एकुणात, बायकोला एकही काम पडू नये, घर व्यवस्थित चालत राहावे आणि सर्वांची मनस्थिती शक्य तितकी चांगली राहावी असा प्रयत्न असतो. हे करताना कोणी आपले कौतुक केले तर मुठभर मांस चढते हेही मान्य करतो. पण हे सगळे करताना नोकरीपेक्षा अधिक ताण येऊ शकतो असे काहीवेळा वाटते. प्रत्येक गोष्टीला रोजच्यारोज एक डेडलाईन असते. काहीवेळा खूप फिरावे लागते, सारखे घराबाहेर जाऊन काहीतरी आणावे लागते.

बाकी मग सगळी आवराआवर साधारण रात्री साडे नऊला संपली की शांतपणे किंगफिशर माईल्ड घेत टीव्ही बघत बसतो. जेवायला एकटा (मित्रांसोबत) किंवा बायकोबरोबर बाहेर जाणार असलो तर वडिलांचे अर्थातच सर्व काही सेटिंग करून मगच बाहेर पडतो.

हे सगळे करताना मी हाती घेतलेली कामे काहीवेळा मागेही पडतात पण रेटा द्यावाच लागतो.

एकंदर धमाल असते. रोज संध्याकाळी बायकोला फोन करून 'आज रात्री तुला काय खावेसे वाटत आहे' हे विचारण्यातही मजा येऊ शकते.

===========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर, अभिनंदन.
एखाद्या हाऊसवाईफच्या, एखाद्या गृहिणीच्या किती सामान्य कौतुकाच्या अपेक्षा असतील ह्याची जाण होणे, हे शिक्षणही खूप महत्वाचेच की? << खुपच आवडले.

शिर्षकावरुन पॉप कॉर्न धागा वाटला होता Happy

सशल, लादायच काहीच नाही. आवडला शब्द तर त्यांनी जरूर वापरावा. नाहीतर त्यांच्या पसंतीचे शब्दात त्यांनी स्वतःची ओळख करावी. तो हक्कच त्यांच्या. त्यांच्या नवीन जीवनशैलीबद्दल मला आनंद आहेच. तो ह्या धाग्याचा मुख्य मुद्दा. मला वाटल होममेकर त्याला अनुरूप शब्द आह, फार चांगला शब्द आहे. क्रियेटीव्हटीचा आनंद व्यक्त करणारा.

छान लिहिलंय. अत्यंत पॉझिटिव्ह टर्निंग पॉइंट आहे हा तुमच्या आयुष्यातला. असेच वडिल आणि पत्नीला आनंदात ठेवा व स्वतःही रहा Happy

बेफिकीर,
प्रथम या निर्णयासाठी अभिनंदन! एखाद्या समाजवेड्या माणसासाठी थोडासा धाडसी निर्णय असुन तुम्ही घरच्यांसाठी घेतलात ह्याचे कौतुक.
यशश्रीने पण स्वतःला मायबोलीपासुन लांब ठेवले आहे (एकदम सचिन अंजलीसारखे) पण तिची प्रतिक्रिया पण वाचायला मनापासुन आवडली असती.

उत्तम निर्णय! तुम्हाला आणि कुटुंबीयांना आवडतंय यातच सगळं आलं. तुम्हाला पूर्ण समजू शकते (त्याहून जास्त तुमच्या पत्नीला), कारण लग्न झाल्यापासून मी आणि नवरा आलटून-पालटून होममेकर असतो. सध्या माझी दुसरी टर्न चालू आहे. त्याचं एकदा होममेकर बनून झालंय आणि त्याला ते खूप्प्प्प आवडलं होतं, त्यामुळे सध्या मला पिडणं चालू असतं. Happy

उत्तम लिहिले आहे!

आयुष्यातले असे बदल खूप वेगळी दिशा दाखवतात हे अनुभवलेय अलीकडेच.

हो पण आपण हॉउसहसबन्ड आहोत हा मोठेपणा इतरांना सांगु द्या. Happy

तुम्हालाशुभेछा!

एकदम प्रामाणिक लेखन. आत्मस्तुती वगैरे अजिबात वाटली नाही. शुभेच्छा!

दुपारी किंवा संध्याकाळी आरामात घरी/सोसायटीत दिसल्याने लोकांची रिअ‍ॅक्शन काय होती? Happy

एकदम प्रामाणिक लेखन. आत्मस्तुती वगैरे अजिबात वाटली नाही. शुभेच्छा! >> +१०

खुपच छान मनोगत बेफीकीर , असा प्रामाणिक पणा दाखवायला सुद्धा धैर्य लागतं आणी पुरुषी अहंकार सोडुन हाउस हजबंड बनलात आणि त्याचा तुम्हाला अभिमान आहे त्याबद्द्ल तुमचे कौतुक, कीतीतरी पुरुष काम न घरी राह्तात उलट काहीही मदत न करता कारण पुरुषीप्रणाचा अहंकार आडवा येतो असं मी पाहीलंय.

तुमच्या कादंबर्‍या वाचुन तुमच्याबद्दल मनात असलेला आदर आज या लेखामुळे अजुनच वाढला बेफी... __/\__ Happy

बदल आवडला.लेख आवडला.माझ्यातही असे बदल व्हावेत अशी इच्छा आहे
आपण काय करता? या प्रश्नाचे उत्तर नोकरीत असताना द्यायची सोय होती. आता काहीच नाही असे उत्तर दिले की लोक चमत्कारीक नजरेने पहातात.
विचार करतो असे उत्तरही देउन झालो

बेफि.. मुद्दाम थोड्या उशीराने प्रतिक्रिया देतोय.
तूम्हाला नव्याने या आनंदाचा शोध लागला हे खरेय, पण यापैकी बहुतेक कामे नोकरीत असताना देखील करता आली असती की.. अगदी नेमक्या वेळेलाच करावी लागतात ती सोडून.

क्वचितच काही नोकर्‍या २४ तास चालतात, त्यामूळे घरातल्या कामांसाठी वेळ काढणे ( देणे हा शब्द मला उपकार केल्यासारखा वाटतो ) सहज शक्य असते. त्यासाठी कधी कधी वैयक्तीक आवडीनिवडींना थोडी मुरड घालावी लागते. म्हणजे सोशियल सर्कल कमी करावे लागते.

घरातील पुरुषांनी घरकाम करणे हा भारतातील एक गंड आहे. ( भारतातलाच आहे असे नाही.) परंपरेची देणगी आहे म्हणू या. आमच्या यांना चहा सुद्धा करता येत नाही, हे एकेकाळी बायका कौतूकाने सांगत असत.

ज्या युरोपात, युद्धकाळात स्त्रियांनी सर्वच आघाड्यावर काम करत होत्या, त्या युरोपात आजही पुरुषांनी घरकाम करणे, ही विशेष गोष्ट नाही. तिथे तर घरकामासाठी मदतीला माणसे बोलवायची तर ती खुप महाग सेवा आहे.

या गटाचा एक प्रतिनिधी म्हणून अवश्य सांगावेसे वाटतेय, कि नोकरीनिमित्त परदेशी राहणार्‍या अनेक भारतीय पुरुषांना ही सर्व कामे करणे अनिवार्यच असते. घरकामाला मुली असतातच असे नाही. असल्या तरी त्यांच्याकडून काम करून घ्यावेच लागते.

याशिवाय आणखी एक महत्वाचे काम असते ते म्हणजे घरच्या वाणसामानाचे नियोजन. घरात कुठली बारीक
सारीक गोष्ट लागते. कुठली संपली आहे.. याचे काटेकोर नियोजन करावे लागते. भारतातल्या स्त्रिया हे
उत्तमरितीने करत असतातच. पण भारतात एखादी वस्तू संपली तर पटकन बाजारात जाऊन आणता येते,
तशी परिस्थिती भारताबाहेर असतेच असे नाही.

हाऊस हजबंड / हाऊस वाईफ या दोन्ही शब्दांपेक्षा हाऊस मेकर शब्द जास्त योग्य आहे. सर्वसमावेशक आहे आणि
लिंगनिरपेक्षही आहे.

बेफिकीरजी, तुमच खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!!
मला अस वाटत की याचा फायदा सर्वात जास्त तुम्हालाच होणार आहे. घरकाम काय तुम्ही केल नाही तर अडून रहणार नाही. ते या ना त्या तर्‍हेने होतच रहाणार. पण आता शारिरीक आणि मानसिक दॄष्ट्या तुम्ही अधिक तंदुरुस्त रहाल. स्वतःला स्वखुशीने अस गुंतवून घेतल्या मुळे .
साती यांच्या पोस्ट ला संपूर्ण अनुमोदन.

छान.

चांगलं लिहिलं आहे.. शुभेच्छा.. Happy
इथे लिंगनिरपेक्ष शब्दाचा इतका आग्रह का आहे ते कळलं नाही.. उलट बाजूचा लिंगसापेक्ष शब्द रूढ होत असेल तर होऊ देत की.. !

सति+ १.उत्तम निर्णय अणि त्याची मोकळी ढाकळी अभिव्यक्ती आवडली.आत्मस्तुती नाही हे न लिहिताही समजत होत.

Pages