मायबोली गणेशोत्सव २०१४ : आता कशाला शिजायची बात! (पाककृती स्पर्धा) - प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत

Submitted by संयोजक on 18 August, 2014 - 01:12

pakakruti poster_Ata kashala shijaychi bat_2.JPG

गणपती बाप्पा मोरया!
आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये "क्विक अँड फास्ट" खाद्यपदार्थांची चलती आहे. रांधायला लागणार्‍या वेळेची बचत व्हायला हवी, पदार्थ चविष्ट हवा आणि पोषणमूल्येही योग्य प्रमाणात हवी याकडे लक्ष दिले जाते. अशा पदार्थांत अनेक चटपटीत भारतीय पदार्थ किंवा सॅलेडसारख्या पाश्चात्य पदार्थांचेही पर्याय उपलब्ध असतात.
चला तर मग यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने चटकदार, पौष्टिक, करायला सुटसुटीत शिवाय पोटभरीच्या अश्या 'न शिजवलेल्या' पदार्थांच्या पाककृती लिहूया.

स्पर्धेचे नियमः
१. घटकपदार्थ कच्चे असावेत. घटकपदार्थांवर निवडणे, सोलणे, भिजवणे,धुणे, वाळवणे, गार करणे, फ्रिज करणे, खारवणे, मुरवणे ह्या प्रक्रिया केलेल्या चालतील. मात्र या घटकांपासून तयार झालेला पदार्थ तळणे, भाजणे, उकडणे, शिजवणे, ग्रिल/बेक/ब्रॉईल करणे ह्या प्रक्रियांशिवाय खाण्यायोग्य झाला पाहिजे.
२. त्यावर चवीला फोडणी घालू शकता, सोबत चटणी, केचप, सॅलाड ड्रेसिंग, कडेन्स्ड मिल्क, फळांचे पल्प वगैरेचा वापर चालू शकेल. पण हे पदार्थ 'मुख्य घटक' नसावेत. फक्त गार्निशिंग साठी किंवा तोंडी लावण्यापुरते वापरले जावेत.
३. तयार पदार्थाच्या चवीवर बंधन नाही. तिखट किंवा गोड कसाही चालू शकेल
४. कोणताही एक तयार कोरडा पदार्थ घटकपदार्थ म्हणून वापरता येईल. उदा. पाव, बिस्कीटं, पापड्या, शेव, चुरमुरे, फुटाणे, पोहे वगैरे. मात्र असा एकच पदार्थ घटकपदार्थ म्हणून वापरता येईल. बाकीचे घटकपदार्थ नियमक्रमांक १ नुसार असावेत.
५. सामिष पदार्थ वापरता येणार नाहीत. पाककृती संपूर्ण शाकाहारी असवी. (अंडेही नको.)
६. गॅस, ओव्हन, मायक्रोवेव्ह ओव्हन, बार्बेक्यूग्रिल, सौरचूल ह्यांचा वापर चालणार नाही - अपवाद: उन्हात वाळवणे. फ्रिजर, रेफ्रिजरेटर, मिक्सर, ग्राईंडर, चॉपर वगैरे वापरले तरी चालेल.
७. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१४' या ग्रुपाचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. (ह्यासाठी मायबोली सदस्यत्त्व आवश्यक आहे.) हा ग्रुप गणेशचतुर्थीच्या दिवशी (म्हणजेच २९ ऑगस्ट २०१४, भारतीय प्रमाणवेळ) खुला होईल.
८. मायबोलीकरांच्या आग्रहावरून या नियमात बदल करण्यात आला आहे. सुधारीत नियम पुढीलप्रमाणे: एक आयडी जास्तीत जास्त दोन प्रवेशिका देऊ शकतो, चवीवर बंधन नाही. विजेतेनिवड मतदान पद्धतीने होणार असल्याने एकाच स्पर्धकाच्या दोन्ही प्रवेशिका निवडून आल्यास कुणाचीही हरकत नसावी.
९. आपली प्रवेशिका 'मायबोली गणेशोत्सव २०१४' ह्या ग्रूपामध्ये गणेशचतुर्थीच्या दिवसापासून (म्हणजेच २९ ऑगस्ट २०१४, भारतीय प्रमाण वेळ) अनंतचतुर्दशीपर्यंत (म्हणजेच ९. सप्टेंबर २०१४, अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) कधीही प्रकाशित करावी.
१०. मायबोलीवर पूर्व प्रकाशित पाककृती येथे देता येणार नाही.
११. धाग्याचे शीर्षक- <आता कशाला शिजायची बात>-<सदस्यनाम>-<पदार्थाचे नांव>असे असावे.
१२. पाककृतीबरोबर तयार पदार्थाचे प्रकाशचित्र देणे अनिवार्य आहे. जर काही गोष्टी व्हिडीयोवर दाखवणे गरजेचे असेल तर संयोजकांशी संपर्क साधावा.
१३. विजेत्यांची निवड मतदान पद्धतीने केली जाईल. मतदान करण्याकरता मायबोली सदस्यत्व आवश्यक आहे.

बक्षीस काय मिळणार हे आधीच सांगून टाकताहेत संयोजक Wink

छान स्पर्धा!
सोलणे, चिरणे, कापणे, किसणे या प्रक्रिया केल्या तर चालतील ना?

बक्षीस काय मिळणार हे आधीच सांगून टाकताहेत संयोजक :डोळा मारा: <<<

सामन्यांदरम्यान विश्वचषक नजरेसमोर असावा. Lol

एका मुख्य घटकपदार्थाबरोबरच किती घटकपदार्थ चालतील? उदा. मुख्य घटकपदार्थ पाव घेतला तर त्याबरोबर किती घटक अजुन वापरता येतील....

<<<<मायबोली गणेशोत्सव २०१४' या ग्रुपाचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे>>>> ह्या साठी मला लिन्क दिसत नाहिये ...
वरील पदर्थात पनीर चालेल का ??

नमस्कार,

@मंजूडी
सोलणे, चिरणे, कापणे, किसणे या प्रक्रिया केल्या तर चालतील ना?
>>>>>>>>>>>>>>>>> हो चालतील.

@_हर्षा_
एका मुख्य घटकपदार्थाबरोबरच किती घटकपदार्थ चालतील? उदा. मुख्य घटकपदार्थ पाव घेतला तर त्याबरोबर किती घटक अजुन वापरता येतील....>>>>>>>>>>>>>>>>
घटकपदार्थ कितीही असू शकतात. अट एवढीच की कोणताही एक घटकपदार्थ कोरडा/तयार पदार्थ असू शकतो आणि बाकीचे कच्चे असले पाहिजेत. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने मुख्य तयार पदार्थ म्हणून पाव घेतला तर वर दिलेल्या पहिल्या नियमात बसणारे कितीही पदार्थ बाकीचे घटकपदार्थ म्हणून तुम्ही वापरू शकता.

@सुहास्य
<<<मायबोली गणेशोत्सव २०१४' या ग्रुपाचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे>>>> ह्या साठी मला लिन्क दिसत नाहिये ... <<< नियम क्रमांक सात मध्ये लिहिल्याप्रमाणे 'हा ग्रुप गणेशचतुर्थीच्या दिवशी (म्हणजेच २९ ऑगस्ट २०१४, भारतीय प्रमाणवेळ) खुला होईल.'

वरील पदर्थात पनीर चालेल ना ?? >>> पनीर हा तयार घटकपदार्थ म्हणून वापरता येईल. अशा वेळेला बाकीचे सगळे घटकपदार्थ नियम १ मध्ये बसणारे असावेत.

अट एवढीच की कोणताही एक घटकपदार्थ कोरडा/तयार पदार्थ असू शकतो आणि बाकीचे कच्चे असले पाहिजेत>>> दिनेशदा, एक तयार पदार्थ चालेल म्हटलयं बघा त्यांनी माझ्यासाठीच्या प्रतिक्रियेमध्ये... जसे की पाव, बिस्किट्स ही चालणारेत तेही प्रक्रिया करुनच तयार केलेले आहेत ना...म्हणजे पनिर हा एक मुख्य घटकपदार्थ म्हणुन चालेल आणि बाकीचे घटक कच्चे हवेत त्यांना. बरोबर ना संयोजक? Happy

@दिनेश.
पनीर बाबत अपवाद केल्यासारखा वाटतोय, कारण पनीर तयार करताना दूध तापवणे गरजेचे असते. <<<

नाही, पनीरबाबत कोणताही अपवाद केलेला नाही. नियम क्रमांक ४ नुसार कोणताही एक तयार कोरडा/तयार पदार्थ घटकपदार्थ म्हणून वापरता येईल. उदा. पाव, बिस्कीटं, पापड्या, शेव, चुरमुरे, फुटाणे, पोहे वगैरे. ह सगळे पदार्थ तयार करताना उष्णता लागतेच. हे पदार्थ 'प्रोसेस्ड' पदार्थ आहेत. त्यामुळे आधीच्या उत्तरात म्हटल्याप्रमाणे पनीर हा पनीर हा तयार (किंवा प्रोसेस्ड) घटकपदार्थ म्हणून वापरता येईल. अशा वेळेला बाकीचे सगळे घटकपदार्थ नियम १ मध्ये बसणारे असावेत.

@स्वस्ति
खवलेलं खोबर नियम क्र. १ मध्ये येते का? <<< होय.

@_हर्षा_
म्हणजे डेसिकेटेड कोकोनट ही चालेल ना नि क्रं १ मध्येच? <<< होय.

@दिनेश.
मला वाटतं, मुख्य घटक आणि पूरक घटक अशी विभागणी मूळ नियमातच करावी. त्यामूळे नियम स्पष्ट होतील. <<<
नियमांनुसार 'मुख्य' घटकपदार्थ आणि 'पूरक' घटकपदार्थ अशी कोणतीही विभागणी सुचवलेली नाही. घटकपदार्थांची अट फक्त एक तयार/कोरडा पदार्थ आणि बाकीचे कच्चे पदार्थ अशी आहे. शिवाय केवळ चवीपुरते किंवा तोंडीलावण्यापुरते म्हणून काय पदार्थ वापरता येतील हे वर दिलेलेच आहे.
नियमांबाबत कोणतीही शंका असल्यास इथे लिहा. आम्ही शक्य तेवढ्या त्वरेने शंकानिरसन करू. Happy

पदार्थ गरम करणे पण नाही चालणार का? म्हणजे शिजवणे नाही हं, फक्त गरम करणे जसे गार करणे चालते तसे.. अन्यथा गरमगरम खायला मजा येणार्‍या पदार्थांवर अन्याय झाल्यासारखे वाटतेय.. Sad

अन्यथा पदार्थ खाण्यापूर्वी उन्हात गरम करून घ्यावा अशी तळटीप लिहिली तर चालेल का Wink

मायबोलीवर पूर्व प्रकाशित पाककृती येथे देता येणार नाही.>>> म्हणजे स्पर्धकाची मायबोलीवरची पूर्वप्रकाशित पाककृती चालणार नाही असं आहे ना?
की एकूणातच मायबोलीवरची दुसर्‍या कोणीही लिहिलेली पाककृती हातचे बदल करून स्पर्धक लिहिणार असला तरीही चालणार नाहीये?

पाककृती स्पर्धांसाठी सर्वांना शुभेच्छा!!

आणि या स्पर्ध्येसाठी "आता कशाला शिजायची बात!" Wink हे नाव ज्या कुणाला सुचलेय त्यांना ___/\___

इंटरेस्टिंग Happy

सोबत चटणी, केचप, सॅलाड ड्रेसिंग, कडेन्स्ड मिल्क, फळांचे पल्प वगैरेचा वापर चालू शकेल. पण हे पदार्थ 'मुख्य घटक' नसावेत. फक्त गार्निशिंग साठी किंवा तोंडी लावण्यापुरते वापरले जावेत. >>> कुठल्याही प्रकारची भेळ बनवल्यास हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी मुख्य घटकपदार्थ होतात. ते गार्निशिंगसाठी / तोंडीलावणे म्हणून नसतात. तसेच कुठलीही चटणी / जॅम ब्रेडच्या स्लाईसला लावून विशिष्ट फ्लेवरचे सँडविच बनवतानाही तो मुख्य घटकपदार्थ होतो. मग अशा रेसिपीज चालणार नाहीत का ?

चवीला फोडणी घालू शकता, सोबत चटणी, केचप, सॅलाड ड्रेसिंग, कडेन्स्ड मिल्क, फळांचे पल्प वगैरेचा वापर चालू शकेल. पण हे पदार्थ 'मुख्य घटक' नसावेत. फक्त गार्निशिंग साठी किंवा तोंडी लावण्यापुरते वापरले जावेत.>>> यासंदर्भात एक प्रश्न - चीज इथे या लिस्टमध्ये म्हटल्याप्रमाजे गार्निशिंगसाठी चालेल की नि क्रं १ प्रमाणे मुख्य घटक वगळता इतर घटक म्हणुन चालेल? जसं की पनीर मुख्य पदार्थ म्हणुन चालेल तसचं चीजही प्रोसेस्ड आहे ना?

@ऋन्मेऽऽष
पदार्थ गरम करणे पण नाही चालणार का?
<<< नाही चालणार.

@मंजूडी
मायबोलीवर पूर्व प्रकाशित पाककृती येथे देता येणार नाही.>>> म्हणजे स्पर्धकाची मायबोलीवरची पूर्वप्रकाशित पाककृती चालणार नाही असं आहे ना?
की एकूणातच मायबोलीवरची दुसर्‍या कोणीही लिहिलेली पाककृती हातचे बदल करून स्पर्धक लिहिणार असला तरीही चालणार नाहीये?
<<< मायबोलीवरची पूर्वप्रकाशित स्वतःची किंवा दुसर्‍याने टाकलेली आणि त्यात स्वतः बदल केलेली पाककृती चालणार नाही.

@अगो
कुठल्याही प्रकारची भेळ बनवल्यास हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी मुख्य घटकपदार्थ होतात. ते गार्निशिंगसाठी / तोंडीलावणे म्हणून नसतात. तसेच कुठलीही चटणी / जॅम ब्रेडच्या स्लाईसला लावून विशिष्ट फ्लेवरचे सँडविच बनवतानाही तो मुख्य घटकपदार्थ होतो. मग अशा रेसिपीज चालणार नाहीत का ?
<<< हिरवी चटणी वगैरे न शिजवता, उष्णता न वापरता करता येतात. त्यामुळे ते चालेल. जॅम हा जर एक तयार पदार्थ घेतला तर ब्रेड घेता येणार नाही. भेळीत चुरमुरे तयार (प्रोसेस्ड) पदार्थ असल्याने फरसाण, खारे दाणे चालणार नाहीत.

@_हर्षा_
चीज इथे या लिस्टमध्ये म्हटल्याप्रमाजे गार्निशिंगसाठी चालेल की नि क्रं १ प्रमाणे मुख्य घटक वगळता इतर घटक म्हणुन चालेल? जसं की पनीर मुख्य पदार्थ म्हणुन चालेल तसचं चीजही प्रोसेस्ड आहे ना?
<<< गार्निशिंगसाठीच वापरलं तर चालेल पण पाककृतीतील घटक म्हणून वापरलं तर दुसरा तयार पदार्थ वापरता येणार नाही.

-----------------
एक लक्षात घ्या - एकच तयार पदार्थ वापरण्याची फक्त मुभा आहे, तशी अट नाही. कोणताही तयार (प्रोसेस्ड) पदार्थ न घेताही तुम्ही पाकृ देऊ शकता.

Pages