काकडी पोहे ( फोटो सहीत )

Submitted by मनीमोहोर on 17 August, 2014 - 09:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

उद्या गोपालकाला . दही, दूध आणि पोहे हे गोपालकृष्णाचे विशेष आवडते. ह्या दिवशी श्रीकृष्णाला प्रिय असणार्‍या पोह्यांचा प्रसाद दाखविण्याची पद्धत आहे. ह्या दिवशी आमच्याकडे काकडी पोह्यांचा प्रसाद दाखविण्याची पद्धत आहे त्याची ही कृती.

साहित्यः
जाड पोहे २ वाट्या ( नेहमी प्रमाणे धुवून, भिजवून घावेत)
काकड्या (लहान आकाराच्या ) २ ( ह्या दिवसात येणार्‍या गावठी काकड्या घ्याव्यात )
गोड दही दोन वाट्या, आवडत असल्यास थोडं आलं बारीक चिरुन किंवा किसून
हिरवी मिरची, कोथिंबीर, नारळ, दाण्याचं कूट अंदाजाने. मीठ, साखर चवीप्रमाणे
जरुरीप्रमाणे दूध.

क्रमवार पाककृती: 

प्रथम काकड्या कोचवून अथवा अगदी बारीक चिरुन घ्याव्यात. पाणी काढून टाकू नये.
त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, नारळ, दाण्याच कूट. मीठ साखर, आणि दही घालून मिश्रण सारखं करुन घ्यावे.
नंतर त्यात भिजवलेले पोहे घालून एकत्र कालवावे. हे पोहे अगदी घट्ट न करता जरासे सरबरीतच चांगले लागतात. म्हणून लागेल तसे दूध घालावे. दह्या दूधाच प्रमाण आपल्या आवडी प्रमाणे अ‍ॅड्जेस्ट करता येईल.

हा फोटो

From mayboli

वाढणी/प्रमाण: 
जेवणावर दही भाता ऐवजी घेतले तर चार जणांना पुरेल.
अधिक टिपा: 

हे पोहे तयार करून ठेऊ नयेत. कारण पोहे फुगत जातात आणि जसजसा वेळ जाईल तसतसे आळत जातात.
चवीला खूप छान लागतात. एखाद दिवस दही भाताला छान पर्याय.
काकड्या गावठीच घ्याव्यात. खीरा काकड्या घेऊ नयेत.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages