ब्रिटीश सायन्स फेस्टिव्हल

Submitted by सुमुक्ता on 15 August, 2014 - 10:09

दर वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये यु. के. मधील कोणत्या तरी एका शहरात साजरा होणारा ब्रिटीश सायन्स फेस्टिव्हल विज्ञानप्रेमींसाठी खूप मोठी पर्वणी असतो. हा उपक्रम ब्रिटीश सायन्स असोसिएशन तर्फे राबविला जातो. आठवडाभर चालणाऱ्या ह्या विज्ञानोत्सवाचा कार्यक्रम अतिशय भरगच्च, माहितीपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि रंजक असतो. विज्ञानविषयक विविध भाषणे, प्रदर्शने, कार्यशाळा ह्यांचे आयोजन ह्या विज्ञानोत्सवात केले जाते. स्थानिक विद्यापीठे आणि शाळा ह्या आयोजनात उत्साहाने भाग घेतात. स्थानिक सरकार, तसेच अनेक उत्साही स्वयंसेवक ह्या विज्ञानोत्सवास भरभक्कम पाठींबा देतात. भरगच्च अशा ह्या उत्सवात सर्व वयोगटांच्या लोकांसाठी काही ना काहीतरी कार्यक्रम असतो. माहिती, मनोरंजन, वादविवाद आणि नवीन संशोधन असे विषय घेऊन विज्ञानप्रेमींना आकर्षित केले जाते. ह्यातील बहुतांशी कार्यक्रमात प्रवेश विनामूल्य असतो. हा उपक्रम राबविण्यामागे सामान्य जनतेशी विज्ञानविषयक सुसंवाद साधणे (Public Engagement in Science) हे ब्रिटीश सायन्स असोसिएशन चे प्रमुख धोरण आहे.

हा विज्ञानोत्सव याआधी यॉर्क, लिव्हरपूल, ब्रॅडफर्ड, अॅबर्डीन, न्यूकासल येथे साजरा झाला होता. ह्या वर्षी हा विज्ञानोत्सव ६ ते ११ सप्टेंबर दरम्यान बर्मिंगहम येथे साजरा होणार आहे. त्यांचा कार्यक्रम आधीच ब्रिटीश सायन्स फेस्टिव्हलच्या वेबसाईट वरून प्रकाशित केला आहे. आत्तापर्यंत अशा दोन विज्ञानोत्सवांना हजेरी लावण्याची संधी मला मिळाली आहे. ह्या दोन्ही विज्ञानोत्सवात मी विविध विषयावरील भाषणांना, प्रदर्शनांना आणि कार्यशाळांना उपस्थिती लावली आणि शिकण्यासारखे आणि जाणून घेण्यासारखे कितीतरी ज्ञान ह्या जगात आहे ह्याची मला जाणीव झाली. त्याचप्रमाणे आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा वापर आपण लोककल्याणासाठी कसा करू शकतो ह्याची एक छोटीशी झलक मला मिळाली.

उदाहरणादाखल सांगायचे झाले तर ब्रॅडफर्ड ला झालेल्या विज्ञानोत्सवात वनस्पती आणि औषधे, जीवनशैलीचा माणसाच्या डी.एन.ए वर होणारा परिणाम, सौरउर्जेचा वापर, संगीत आणि विज्ञान ह्यांचा संबंध अशा विविध विषयावर प्रदर्शने भरविण्यात आली होती. त्याचप्रमाणे आर्टीफिशल इंटेलिजन्स व रोबोटिक्स सारख्या विषयात काम करणाऱ्या संशोधकांनी आपल्या संशोधनाची माहिती देणारी केंद्रे चालविली होती. ब्रॅडफर्ड विद्यापीठामध्ये शिकलेल्या शास्त्रज्ञांची माहिती आणि मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या स्त्रियांची विशेष माहिती देणारी प्रदर्शनेहि भरविली होती. जनुकीय अभियांत्रिकी वर आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये जनुकीय अभियांत्रिकीचे वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी क्षेत्रात असलेले महत्व स्पष्ट करण्यात आले. इंटरनेट वर आपली वैयक्तिक माहिती कशी जपावी ह्यावर सुद्धा एक कार्यशाळा आयोजित केली गेली होती. प्राणी आणि माणसामधील भेदाभेद, अभियांत्रिकी चा वापर करून गरिबी कशी हटविता येईल, अंतराळातील पुढची पन्नास वर्षे अशा अनेक विषयांवर विविध भाषणे आयोजित केली गेली होती. ह्याशिवाय लहान मुलांसाठी मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी, संगणक, तंत्रज्ञान कार्यशाळा देखील आयोजित केल्या गेल्या होत्या.

अॅबर्डीन येथे झालेल्या विज्ञानोत्सवात मला स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. उत्सवासाठी येणाऱ्या लोकांना मदत करणे, विविध कार्यक्रमांचे संयोजन करण्यास मदत करणे अशा पद्धतीची कामे स्वयंसेवक म्हणून मला करता आली. आमच्या संशोधन गटानेही अनेक कार्यक्रमांचे संयोजन केले होते. त्यात आपले संशोधन ९० सेकंदामध्ये सामान्य लोकांना अथवा शाळकरी मुलांना समजावून सांगण्याची स्पर्धा आयोजित केली होती. श्रोत्यांनी केलेल्या मतदानाप्रमाणे विजेत्यांची घोषणा करण्यात आली. अशा स्पर्धांमुळे संशोधक आणि सामान्य जनता ह्यांच्यामध्ये असलेली दरी कमी होण्यास मदत होते. अशा प्रकारे लोकांशी संवाद साधण्याच्या सुवर्णसंधीचा वापर अनेक संशोधक करतात. सरकारी पैसा वापरून संशोधक नक्की कसले संशोधन करतात आणि त्याचा जनतेला काय उपयोग होतो हे सांगण्यासाठी असे उपक्रम खूप उपयोगी ठरतात.

यु. के. मध्ये साजरा केला जाणारा असाच आणखी एक उत्सव म्हणजे नॅशनल सायन्स अँड इंजिनीयरिंग वीक. हा विज्ञानोत्सव सर्व शहरांमध्ये मार्च महिन्यात साजरा केला जातो. ह्या उत्सवादरम्यान विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित हे विषय घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. असेच अनेक स्थानिक विज्ञानोत्सव यु. के. मध्ये विविध वेळेला साजरे होत असतात. सामान्य जनतेमध्ये विज्ञानाविषयी आवड आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी असे उपक्रम खूप उपयुक्त ठरतात. त्याचबरोबर विविध शहरातील विद्यापीठे आणि वैज्ञानिक संस्थांना ह्या उपक्रमांत भाग घेण्याची संधी मिळते. यु. के. मधील जनता उत्साहाने हे विज्ञानोत्सव साजरे करते. मला तर कित्येक असे उत्साही लोकं भेटलेले आहेत कि जे दर वर्षी वेळात वेळ काढून ह्या उत्सवात सहभागी होतातच.

असे विज्ञानोत्सव इतर कोणत्या देशात होतात का ह्याची माहिती मला नाही. पण भारतात जर असे उत्सव साजरे होत नसतील तर ते नक्की साजरे करायला हवेत, जेणे करून सामान्य लोकांमध्ये विज्ञानाविषयी आवड आणि जागरूकता निर्माण होईल. आपण आजवर जे काही सार्वजनिक उत्सव साजरे करत आलो आहोत त्या व्यासपीठांचा वापर असे विज्ञानोत्सव घडविण्यासाठी झाला तर खूप चांगला पायंडा पडायला मदत होईल.

ह्या विज्ञानोत्सवांची अधिक माहिती हवी असल्यास http://www.britishscienceassociation.org/ ह्या लिंक ला भेट द्यावी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान उपक्रम आहे. भारतात अशा स्वरुपात ( बहुतेक) नाही पण मराठी विद्यान परिषदेतर्फे छोट्या प्रमाणात असे उपक्रम राबवले जातात.

चांगली माहिती. अधिक माहितीकरिता लिंक बघतो. काही शंका असल्यास विचारीनच. Happy