कांदापातीचे सूप

Submitted by शैलजा on 13 August, 2014 - 07:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

छोटे कांदे असलेली पातीची १ गड्डी (कोवळी पात असल्यास उत्तम)
१ मध्यम आकाराचा बटाटा
१ इंच आले
३-४ लवंगा
४-५ काळ्या मिर्‍या
१-२ दालचिनीचे छोटे तुकडे
१ टी स्पून चमचा कॉर्न फ्लोअर
अर्धा कप दूध
२ छोटे चमचे लोणी (ऐच्छिक)
चवीसाठी मीठ

क्रमवार पाककृती: 

१. कांदापात, पातीचे कांदे व बटाटा सालासकट बारीक चिरावेत.
२. दोन कप पाण्यात लवंगा, दालचिनी व मिरी घालून व वरील चिरलेले जिन्नस घालून कुकरमध्ये शिजण्यास ठेवावे.
३. ३ ते ४ शिट्ट्या झाल्यावर हे शिजेल.
४. थंड झाले की मिक्सरमधून फिरवून घ्यावे व थोडे पाणी घालून गाळून घ्यावे.
५. दूध व कॉर्न फ्लोअर एकत्र करुन सॉस बनवून घ्यावे व ह्या मिश्रणात मिसळून सूपाला एक चांगली उकळी काढावी.
६. सर्व्ह करताना लोणी घालून गरम सूप द्यावे.

वाढणी/प्रमाण: 
१-२ जणांसाठी
अधिक टिपा: 

गार्निशिंगसाठी चीज +पुदिना+ कोथिंबीर वापरता येईल.
चीज किसून व पुदिना व कोथिंबीर बारीक चिरुन वरुन घालता येईल.

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रेसिपी.
मी बटाट्याच्या जागी मुगाची डाळ वापरते दाट होण्यासाठी.
कांदा, मुडा कुकरला शिजवुन घेते. घोटुन (भरपूर)पाणी घालुन जोरदार उकळी आली की बारिक कच्ची पात टाकते. त्या वरणाला सूप म्हणते Wink आता मसाल्याचे जिन्नस टाकुन बघेन.

केलं,मस्तं झालं.
सध्या डाएट मोडात असल्याने बटाटा , कॉर्नफ्लोअर न घालता केलं आणि नंतर लो फॅट दूध घातलं.

छान आहे प्रकार. गरमागरम सिप करायला छान वाटेल. करून बघेन.

संध्याकाळची वेळ असावी, बाहेर संततधार चालू असावी, कित्येक दिवस आपली वाट बघत असलेली हवीहवीशी सवड असावी, डोकं अंतर्बाह्य मोकळं असावं, हातात तसेच कित्येक दिवस आपली वाट बघत असलेले पुस्तक असावे, डीम लाईट सुरू असावा, मंद स्वरात वीणाताईंचा खर्ज किंवा कुमार सोबतीला असावेत, घराचा एक उबदार कोपरा असावा, कढत पाण्यानं आंघोळ केलेली असावी आणि हातात अशा सुपचा वाफाळता बोल असावा.. नुसतं शीर्षक वाचल्यावर हे सगळं चित्र पुढची कृती वाचून होईतोवर उभं राहिलं नजरेसमोर..

Lol कधी होईल तेव्हा होईल, वाटलं मात्र मस्त. बघ शैलजा, तुझ्या न प्यायलेल्या सुपचाही असा इफेक्ट Happy

(सई तुमच्या स्वप्नात डोकावताना)....बाहेरचा परिसर हिरवागार नि व-हांड्यात लाकडी एथनिक खुर्ची असेल बसायला तर!!!!

विनीता, तसं असेल तर उत्तमच. पण संततधारेमुळे संध्याकाळी मला गारठलेलं वातावरण अपेक्षित आहे. मी पाऊस ऐकू यावा म्हणुन एखादी मोठी खिडकी उघडी ठेवेन आणि आवडत्या कोप-यातल्या उबदार भारतीय बैठकीवर शाल पांघरून बसेन. आईच्या मांडीवर किंवा कुशीत असतो तो कोझीनेस मिळायला पाहिजे.

माझ्या घरी असा कोपरा होता. मी फेबुवर त्याचा फोटोही टाकला होता. आमच्या घरी एक जुनी लाकडी पेटी आहे, त्यावर तो बोल आणि पुस्तक ठेवून फक्त पान उलटायला आणि सिपसाठी चमचा उचलायला उजवा हात हलवणं सहज शक्य व्हायचं Happy

देवा, शैलजा, आज करावंच लागेल सुप. हे नाहीतर कुठलं तरी. गेला बाजार गरमागरम आमटी तरी तुप घालून!! Lol

सॉरी, मी खुपच विषयांतर केलं इथे Sad

बटाटा आणि लोणी टाळून रेसिपी केली. सूप गाळून सुद्धा घेतले नाही. डाएट सूप छान वाटलं. आणि विसरून आल्याऐवजी लसूण घातली होती पण चव आवडली. पुढच्या वेळेस आलं घालून बघेन. आणि हो चवीला छोटा मिरचीचा तुकडा शिजताना घातला होता..

सोहा, शिजवतानाच. मी लिहायला विसरले होते, दुरुस्ती केली आह,, धन्यवाद. Happy
सोनचाफा, मिरचीमुळे तिखट चव आली का?
बस्के, करुन पहा आणि सांग जरुर.

सगळ्यांचे आभार. Happy

हो शैलजा, थोडी तिखट चव आली.. इतर मिरी, लवंग होतच ना म्हणून खूप नाही पण तुकडा घातला.. आणि काल परत करून पाहिलं.. होतं म्हणून थोडं पनीर किसून घातलं उकळी आल्यावर.. पनीरच ते काय वाईट लागणार ?? Happy

मी आज केलं हे सूप. छान झालं होतं. गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कांदापातचं वापरली. त्याने मस्त प्लेवर आला आणि दिसतं पण छान होतं.

सूप केले, मस्त झाले आणि भरपूर प्यायले Happy थँक्यु शैलजा!
फोटो अपलोड होत नाहीये Sad
मी आणलेली पात भयंकर तिखट होती, चिरतानाच डोळ्यातून घळघळ पाणी.. मग मी मिश्रण मिक्सरमधून काढलं नाही. तिखट पात आणि गरम मसाल्यामुळे कदाचित जळजळीत झालं असतं म्हणुन.

भारतीताई, चिन्नु Happy