पौष्टीक दडपे पोहे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 August, 2014 - 07:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या जाडे पोहे
२ वाट्या गाजराचा किस
१ वाटी खवलेले ओले खोबरे
१ वाटी डाळींबाचे दाणे
पाव वाटी भाजलेले शेंगदाणे
१ मोठा कांदा चिरून
अर्धा वाटी चिरलेली कोथिंबीर
३-४ हिरव्या मिरच्या कापुन
१ चमचा साखर
चवीनुसार मिठ
अर्धा लिंबू (लिंबाचा रस)
फोडणी - तेल, राई, जिर, हिंग

क्रमवार पाककृती: 

पोहे थोडे भाजून घ्या. भाजलेल्या पोह्यांसकट वरील फोडणी सोडून सर्व साहित्य एकत्र करुन एकजीव करा. त्यावर फोडणी तयार करून ओता व पुन्हा एकजीव करून अर्धा तास मुरण्यासाठी ठेउन द्या. अगदीच राहवत नसेल तर खाउ शकता असेही छानच लागतात. Happy

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

पोहे भाजल्यामुळे खमंग वास येतो.
पापडही भाजून ह्यावर कुस्करून घालतात तसेच नारळ पाणीही घालतात. त्या पद्धतीनेही मी करते. तेही चविष्ट लागतात.

तुमच्या आवडीनुसार कोबी, बिट, टोमॅटो तसेच कच्च्या खाऊ शकणार्‍या भाज्या घालू शकता.

वरील पाककृती मी एका पुस्तकात पाहून चेंज म्हणून केली होती. मुळ रेसिपी बर्‍याच माबोकर मैत्रीणींनी प्रतिसादात दिली आहे. त्यात अजुन फेरफार करुनही छान रेसिपी प्रतिसादात दिल्या आहेत. त्या एकत्र वाचता याव्यात म्हणून इथे एकत्र देत आहे.

मुग्धानंद

पातळ पोहे(चिवड्याचे) पाखडुन स्वच्छ करुन घेणे. एक मुठ भर पोह्यांचा एका मोठ्या पातेल्यात थर देणे. त्यावर एक थर ओल्या खोबर्‍याचा. मग पुन्हा पोह्यांचा, मग किसलेला कांदा, काकडी, गाजर हवे असल्यास, बारीक चिरलेला टोमॅटो यांचा थर, परत पोह्यांचा थर, त्यावर, थोडे मेतकुट, मीठ, साखर इ. घालणे. हे थोडा वेळ दडपुन ठेवणे, म्हणजे खोबरे, कांदा आदिचा ओलावा पोह्याला लागतो.
फोडणी-- तेल, जिरे, मोहोरी, कढिलिंब, हळद, हिंग, हवे असल्यास शेंगादाणे.
फोडणि करुन घालणे.
मग सगळे व्यवस्थित हलविणे. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालणे

रॉबिनहुड यांनी दडपे पोह्यांच्या विविध प्रकारांसाठी दिलेली लिंक https://www.youtube.com/results?search_query=dadpe+pohe+recipe

शुम्पी

पातळ पोहे , तळलेली सांडगी मिरची आणि दाणे मात्र मस्ट.
टोमॅटो, लिंबू, ओलं खोबरं, कोथिंबीर यांचा ओलेपणा पुरतो पोह्याला, अगदीच वाटलं तर मी ताकाचा हबका मारते क्वचित.
नीधप

कांदा, कोथिंबीर, टोमॅटो चिराचिरीच्या गोष्टी व्हायच्या आधीच पोह्यांमधे नारळाचा चव, मीठ (इथे शिजवायचं किंवा उकळायचं नसल्याने मी सैंधव घालते) आणि किंचित साखर मिक्स करायची. नारळाच्या चवाने पोहे ओले होणे सुरू होते. डाळिंबाचे दाणे, किसलेलं गाजर, कोचलेली काकडी वगैरे जे काय तयार असेल ते आधी ढकलायचे. किंवा मग जसे जसे होत जाते तसे ढकलायचे.
मग कां, को आणि टो चिरलेले घालून वरून लिंबू पिळून घ्यायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे.
दाणे चांगले भाजलेले असतील तर इथेच घालायचे. भाजले नसतील तर आधी भाजून घ्यायचे. जरा जास्तच भाजायचे. आणि दाणे सढळ हाताने घालायचे.
मग फोडणीच्या वस्तू जमवायच्या. मिरची धुवून चिरून घेणे, कढीपत्ता धुवून चिरून, आले किसून घेणे वगैरे. फोडणी करायच्या आधी सांडग्याच्या मिरच्या कढल्याला तेलाचा हात पुसून भाजून घ्यायच्या (तळणापेक्षा तेल कमी, अर्थात खमंगपणा पण कमी होतोच) त्या पोह्यांवर आधी घालायच्या नाहीत. त्यातला फक्त चुरा भुरभुरायचा पोह्यांवर.
मग फोडणी करून ती जिवंत फोडणी ओतायची पोह्यांवर. सगळं व्यवस्थित मिक्स करून एकत्र करून झाकणी घालून वरून दाबून ठेवायचं. १५ मिनिटांनी घ्यायचे. तळलेली मिरची चुरून किंवा नुसतीच प्लेटीवर सजवायची.

झंपी
आम्ही ह्यात हिरवी मिरची तळून कुस्करून घालतो जर दह्यातील मिरची नसेल तर... पोह्याचा पापड, घरचा उडदाचा पापड, मिरगुंड, बटाटा पापड(हे मी माझ्यासाठी) वरून भरपूर कों, लिंबू, बारीक शेव. जरासं लाल तिखट भुरभुरवायचं आणी एक गरम चहा.
एक घास ह्याचा, एक घोट चहाचा.
हिरवी मिरची तिखट हवी.

माहितीचा स्रोत: 
पुस्तकी ज्ञान
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला हवे ना... आत्ताच्या आत्ता...

जागू साध्या साध्या गोष्टी सुद्धा किती निगुतीने करतेस ग. मला एवढं करायलाही आळस येतो आजकाल.

नी ने सुद्धा काय मस्त लिहिलय. पाहो शनिवारी करून बघून.

दडपे पोहे ही झटपट करण्याची पाकृ आहे. आणि ती झटपट केली तरच चांगली लागते. अंगची निगुती पुरते त्यांना. फार लाड करायचे नाहीत Biggrin

अरे असे ज्यात त्यात गाजर बिजर घालून सारखं सारखं पौष्टिक नका हो खायला घालू
Lol
मंजूडी अग मुलांना घरी असे गाजर, पालेभाज्या वगैरे कशातून ना कशातून द्याव्या लागतात. त्यामुळे ते करताना मनात पौष्टीक हा शब्द पक्का बसलाय. पण घरी मुलांना देताना तोंडावर पौष्टीक न आणता चायनिज किंवा काहीतरी वेगळी नावे बदलून खायला द्यावे लागते म्हणजे मुली चाटून पुसुन खातात Lol

माझ्याकडे चक्क सांडगी मिरची आहे असा शोध काल लागलेला आहे. पोह्याचा नसला तरी उडदाचा पापड आहे. मेतकूटपण आहे. ओला नारळ नाहीये फक्त. बघू संध्याकाळपर्यंत आणणं झालं तर आज नाहीतर उद्यापरवात साग्रसंगीत दडपे पोहे करणं मस्ट आहे.

हे असले धागे वाचून जीभ फार खवळते..

दडपे पोह्याला पातळ पोहे लागतात ना. जाड्पोह्याचे तेलपोहे होतात.

गाजर, डाळींब पण पहील्यांदा बघीतले.

आमच्याकडे शुम्पीसारखे दिसतात पोहे. Happy पण भरलेल्या मिरचीऐवजी खाराची मिरची तुफान लागते यात. Happy

नारळाचा चव, पिळलेले लिंबू, टोमॅटोच्या फोडीतून पाझरणारा रस, बारीक चिरलेल्या कोथिंबीरीतून पाझरणारा रस >>>> नी तोंपासू. Happy

मस्तच आहे. मी जाडे पोहेच वापरते आणि मावेमध्ये पटकन भाजून होतात. सांडगी मिरची आणि पापड घालते. कैरीच्या दिवसांत कैरीपण घालते आणि अजून काही भाज्या add करते.

डाळिंबाचे दाणे मात्र कधीच घातले नाहीत, आता घालीन.

मस्त फोटो, कृत्या. डाळिंबाचे दाणे घातले नाहीत कधी. आता नक्की घालणार. गाजर ऐवजी नेहमीच काकडी घालतो. मस्त लागत असेल आंबटगोड. आम्ही पण पातळपोहेच घेतो. फोडणीत उडीद डाळ घालतो. वेगळीच चव येते. आणि दाबत नाही. हातानेच छान मिसळायचे, नीट होतात.

आलं घालणारे लोक, ते फोडणीत घालता की कच्चे किसुन? सांडगी मिरची चुरायची का पोह्यात की नुसतीच लाऊन खायची?

सुनिधी, तळलेली सांडगी मिरची चुरायची पोह्यात. आले किसून घालायचं आवडत असेल तर, किंवा अगदी बारीक तुकडे चावायला आवडत असतील तर.

धन्यवाद अन्जु.
नेहमी करते.
आता आलं एकदा, डाळिंब एकदा , जाडपोहे एकदा असे करुन पाहणार आहे.

Pages