प्रबंध

Submitted by अपूर्व on 25 July, 2014 - 08:12

चिरदाह वेदनेचा मजला अखंड व्हावा
मन त्यातही रुळावे, अन दाह थंड व्हावा

येऊनिया न यावा माझा प्रयास कामी
नशिबासही कसा हा माझाच छंद व्हावा

ते शब्द आठविता, जणु काळही थिजावा
एका क्षणाक्षणाचा बघता निबंध व्हावा

एकी अशी असावी, निश्चय असा असावा
हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा

झिरपावी या मनात एकेक गोष्ट ऐसी
प्रत्येक भावनेचा न्यारा सुगंध व्हावा

विश्वास या मनीचा, एकाकी मंद व्हावा
आतून हाक यावी, अन तो बुलंद व्हावा

माझेच मी पुसावे अश्रू असे हसूनी
कसलातरी मनाचा माझ्या प्रबंध व्हावा

- अपूर्व ओक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अपूर्व, खयाल छान आहेत

पण अकारांत स्वर काफियाला कितपत मान्यता आहे मराठी गझलांमध्ये ते तज्ञच सांगतील

शुभेच्छा!!

खयाल चांगले वाटले .तंत्रात अं ह्या अलामतीचा प्रयत्न दिसत आहे आणि द ध ड ह्या अक्षराना ज्यांचा उच्चार जवळ्जवळ मिळताजुळता वाटतो त्यात सूट घेतली आहे अनेक लोक अशी सूट मानतात पण ते चुकीचे आहे

जयदीप जोशी म्हणाले तेही बरोबर काफिये अ ह्या स्वरांत्यमकाचे म्हणता येतील पण अश्या प्रकारालाही सर्वमान्यता नाहीच

आणि मतल्यात जो योग जुळवला आहे अलामतीचा तोच योग इतरत्र मात्र जुळत नाहीये हा मुद्दाच बेसिक असा