प्रबंध

प्रबंध

Submitted by अपूर्व on 25 July, 2014 - 08:12

चिरदाह वेदनेचा मजला अखंड व्हावा
मन त्यातही रुळावे, अन दाह थंड व्हावा

येऊनिया न यावा माझा प्रयास कामी
नशिबासही कसा हा माझाच छंद व्हावा

ते शब्द आठविता, जणु काळही थिजावा
एका क्षणाक्षणाचा बघता निबंध व्हावा

एकी अशी असावी, निश्चय असा असावा
हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा

झिरपावी या मनात एकेक गोष्ट ऐसी
प्रत्येक भावनेचा न्यारा सुगंध व्हावा

विश्वास या मनीचा, एकाकी मंद व्हावा
आतून हाक यावी, अन तो बुलंद व्हावा

माझेच मी पुसावे अश्रू असे हसूनी
कसलातरी मनाचा माझ्या प्रबंध व्हावा

- अपूर्व ओक

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - प्रबंध