गवतकाप्याची गोष्ट

Submitted by मोहना on 24 July, 2014 - 17:54

रॉजर गेल्या गेल्या मला एकदम उत्साहच चढला. इस्टोरी भन्नाट होती त्याची. घाईघाईत मुलाला फोन लावला,
"अरे एका कैद्याची ओळख झाली."
"तू काय तुरुंगात आहेस?" लेकानेही अधूनमधून मी सुट्टीसाठी तुरुंगात जात असेनच या खात्रीने विचारलं.
"तो आला होता घरी."
"आता तुझी कैद्यांशी मैत्री? आई, तू लिहितेस हे मान्य पण विषय मिळावेत म्हणून हे असं...."
"पुरे रे. आधी ऐक तर." मी त्याला माळीबुवांची गोष्ट सांगायला सुरुवात केली. त्या आधी थोडी पार्श्वभूमी सांगते. काय आहे, सध्या आम्ही वर्षाच्या कराराने कुणी आमचं अंगण हिरवंगार राखेल का याच्या शोधात आहोत. त्यामुळे येऊन जाऊन घरी भावी माळी टपकत असतात.

"वर्षाचा करार केलात तर १२०० डॉलर्समध्ये गवत कापेन."
"नाहीतर?" कुणी ’तर’ म्हटलं की लगेच ’नाहीतर’ आठवतोच. त्यामुळे पटकन आलंच ते तोंडून.
"१७०० डॉलर्स " आमचे कदाचित होऊ पाहणारे भावी माळीबुवा म्हणाले. १२०० डॉलर्स म्हटल्यावरच माझ्या डोळ्यासमोर चित्र विचित्र गवत फिरायला लागलं होतं. १७०० म्हटल्यावर विचारक्रियाच गोठली. गवत कापायचं, वाढवायचं, पुन्हा कापायचं आणि यासाठी १२०० डॉलर्स? पुन्हा कापण्याआधी ते वाढवायला कितीतरी पिंप पाण्याचे फवारे मारायचे ते वेगळेच. डोळे गरागरा फिरवू की नुसतंच ’या राईट’ म्हणून खोडसाळ हसू चेहर्‍यावर आणू या विचारात मी तशीच उभी राहिले. तेवढ्यात नवरोजींनी पायावर कुर्‍हाड मारली.
"खत पाणी, जंतूनाशक फवारे, बी बियाणं, फुल झांड..." डोक्याला फेटा गुंडाळून, बैलगाडीत बसायला तयार असलेला एखादा शेतकरीच उभा आहे बाजूला की काय असं वाटलं. पुन्हा पुन्हा बघून खात्री करुन घेतली. मग खेकसले,
"अरे थांब ना. तूच कशाला त्याला सगळी कल्पना देतोस?" मराठीतून ओरडले पण इंग्लिश माळ्याला हावभाव आणि स्वराची भाषा समजलीच. चेहर्‍यावर निरागस हसू आणत तो म्हणाला,
"ये समदं करावं लागतं ताई...आनी बी हाये."
"आता काय?" त्या आनी बी बरोबर पैसे पण आलेच. ते आकडे १२०० डॉलर्स मध्ये की १७०० डॉलर्स मध्ये वाढवू? आमच्याकडे नवर्‍याला खर्चात पडायची घाई असते. उकरुन उकरुन व्यावसायिकाला याचा दर, त्याचा दर विचारायचा, त्याचा वेळ घ्यायचा, आपला खर्च करायचा. ते झालं की मौनव्रत धारण करायचं. किती चाट खिशाला असा चेहरा करुन बसायचं. तो एकदा बसला की उठत नाही आणि ऐकलेलं सारं विसरुन गेल्यावर पुढे कृती होत नाही हे सवयीने कळल्यामुळे मीच घोडं पुढे दामटवते.
"इतके पैसे जाणार असतील तर आपणच का नाही करत ही कामं?" एकदम त्याचा चेहरा खुलतो.
"तसं काही ते कठीण नसतं. करु मग आपणच."
यातला ’आपण’ म्हणजे ’फक्त तू’ असतो. बायकोसाठी क्वचित प्रसंगी दाखविला जाणारा हा आदर कशासाठी असतो हे कळायला मला खूप वर्ष लागली. मी आपली मग काय तर सगळे नुसते लुबाडायला बसले आहेत. करु आपणच असं म्हणत मान डोलावते, आणि मग ती सगळी कामं करता करता, मान काय अख्खं शरीर डुगडुगायला लागतं.

आणि आपणच करायचं हे तर, वेगवेगळे माळीबुवा सगळ्या कामाचा खर्च सांगा मग ठरवतो कुणाला काम द्यायचं ते असं करुन कशाला बोलावून ठेवलेले? त्यात कोण, कशाला, कधी यात गोंधळ. आता एकच काम वेगवेगळे माळी किती डॉलर्समध्ये करतील हे विचारायचं असताना, याची कामाची यादी चढत्या फोडणीसारखी प्रत्येकासाठी वेगळीच. ती काय बायको आहे हे पण करुन टाक म्हणून सांगायला? पैसे वाढणारच ना? मग तुलना कशी करायची? त्यात दरवेळेला आधीच जाहीर करायचं आम्हाला स्वस्तातल्या स्वस्तात करायचं आहे काम. हे एकदा का त्या माळीबुवांना समजलं की ते दुप्पट दर सांगणार आणि मग स्वस्त करणार इतकं साधं समीकरण, पण लक्षात कोण घेतो?

तर एकेक किल्ला ढासळत असतानाच रॅंडी माळीबुवावर मात्र आम्ही खुश झालो.
"काय ते ज्ञान." नवरा म्हणाला,
"काय तो उत्साह." मी टाकलं आपलं असंच; पटकन माळी ठरावा म्हणून.
"खरं आहे पण आपल्या चेहर्‍यावरचे भाव बघून हे लोक आकडे टाकतात, मागे घेतात, फिरवतात." जुगार खेळत असल्यासारखा नवरा बोलला. पण आता मला रॅंडी हातातून जाऊ द्यायचा नव्हता.
"हो पण हा नाही तसा वाटला. एकूणच खूप कमी पैशात करायला तयार झाला आहे. चांगला दिसतोय." मला अगदी काम झालंच सारखा उमाळा आला. तेवढ्यात दार वाजलं. दारात आंडदांड माणूस उभा. अजून एक माळी? मी तसं विचारणार तेवढ्यात तोच म्हणाला,
"आत्ता तुमच्या घरासमोर लाल रंगाची गाडी उभी होती."
"हो, पण..." (बरं मग? तुला काय करायचं आहे?)
"कोण होता तो?"
"पण तुम्ही कोण?"
"त्या माणसाचं नाव काय?"
"कुठल्या?"
"लाल गाडीतल्या." रॅंडी रॅंडी जप चालला होता आमचा. पण या माणसाचा आविर्भाव पाहून ते नाव काही केल्या आठवेना.
"रॉय"
"नक्की?"
"नाही म्हणजे..."
" रॅंडीच गं." र, रा ने सुरु होणारी सगळी नावं नवर्‍याला एकदम प्रिय. रॅंडी, रॉडनी....मराठीतल्या शिव्या दिल्यासारखं वाटतं त्याला ही नावं घेताना.
"रँडीऽऽऽ" पुन्हा आपला उगाचच नारा ठोकला त्याने आतून.
"तुम्ही फसले जावू नये म्हणून सावध करायला आलो आहे." आता मात्र नवरोजी उठले. आयुष्यात बायको आल्यानंतर एक फसवणुक झाली होतीच, आता आणखी नको रे बाबा या आवेगात बाहेअर आले. रॅंडी महाशय सुरुवातीला थोडं काम करतात, मग सामानासाठी पैसे घेऊन जातात ते पुन्हा येतच नाहीत, अधूनमधून तुरुंगांच्या फेर्‍या करुन आले आहेत. अशी रॅंडीची कर्मगाथा रॉजरने सांगितली. पण तुम्ही कोण? तुम्हाला कसं कळलं रॅंडी आमच्याकडे आला आहे हे प्रश्न मनात येण्याआधी लक्षात आलं,
च्यक, च्यक. कसली संधी फुकट घालवली. तुरुंगातून सुटून आलेल्या माणसाबरोबर आपण बोललो, बागेत फिरलो आणि एक, एक फोटो नाही घेतला फेसबुकवर टाकायला? रे कर्मा माझ्या. हे बोलले असते नवर्‍याजवळ तर माझ्या ’फेस’ चं काय झालं असतं कुणास ठाऊक.

रॉजर गेल्या गेल्या मला एकदम उत्साहच चढला. घाईघाईत मुलाला फोन लावला,
"अरे एका कैद्याची ओळख झाली."
"तू काय तुरुंगात आहेस?" लेकानेही अधूनमधून मी सुट्टीसाठी तुरुंगात जात असेनच या खात्रीने विचारलं.
"हो घरी कंटाळा आला की जाते तिकडे."
"हा हा हा. काय विनोद मारलास. पण सांग पुढे. " मग मी त्याला माळीबुवांची पूर्ण गोष्ट सांगितली.
"यात खूप लुप होल्स आहेत."
"मराठी, मराठी." एक जरी इंग्लिश शब्द वापरला की आमच्या घरातलं हे घोषवाक्य आहे. ते मी घाईघाईने पूर्ण केलं.
"अगं, तो जो हितकर्ता आला होता तो तरी खरा कशावरुन?"
रहस्यकथेची सुरुवात... मी मनात म्हटलं आणि चिरंजीव काय म्हणतात ते ऐकत राहिले. बोलणं थांबलं तेव्हा न रहावून शंका विचारली,
"तू अर्थतज्ञ होणार आहेस की वकील?" माझ्या या कुजकट प्रश्नाचा वास त्याला आलाच.
"विषय काय आहे आई? माझं उज्वल भवितव्य की कैदी?" चिरंजीवांनी तावातावाने वाद घालायला सुरुवात केली.
तो थोपवता थोपवता नाकीनऊ येतायत तेवढ्यात त्याला अचानक त्या कैद्याचा पुळका आला.
"त्याची नीट माहिती काढा, तुरुंगातून सुटून त्याला खूप वर्ष झाली असतील, नंतर काही गुन्हा केला नसेल तर त्याची चुक त्याला कळली आहे. त्याला संधी मिळालीच पाहिजे. आपणच असं वागून पुन्हा त्यांना गुन्हेगारीकडे वळवतो. समाज सुधारणार कसा मग?"
तू आहेस ना, तू सुधार. सारखी सारखी सगळी कामं तुम्ही बापलेक माझ्यावर काय सोपवता हे मनातल्या मनात पुटपुटत मी म्हटलं,
"अरे पण मला फक्त माळी हवा आहे रे. फक्त एक माळीऽऽऽऽऽऽऽ " माझ्या आवाजात घायकुती, रडकुंडी सारं काही होतं.
"मिळेल, मिळेल गं आई. तू नीट चौकशी कर आणि कैद्याचा माळी बनव."
कैद्याचा माळी? तो कसा बनवायचा? पण त्याचं तोंड बंद करायला मी म्हटलं.
"बनवते."
फोन ठेवला तर नवरा बसला होताच.
"काय झालं?"
"कैद्याचा माळी बनवायचा आहे."
मुलाशी बोलून झाल्यावर ही नेहमी असं का बोलते असा चेहरा केला त्याने.
"आपल्याला नक्की कोण हवं आहे? माळी? कैदी? कैद्याचा माळी बनवायचा की माळ्याला कैदी करायचं? का हे दोन स्वतंत्रच ठेवायचे? पण मग कशासाठी? नाहीतर आपली आपणच करायची का ही कामं?" माझ्या प्रश्नांच्या सरबत्तीवर नवर्‍याने नेहमीचं शस्त्र उगारलं. मौन व्रत धारण केलं.

आणि तितक्यात दार वाजलं तसं अजून एका नव्याने आलेल्या माळ्याचं स्वागत करायला मी धावले...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

काल हे पोस्ट झाल्या-झाल्या वाचलं, पण प्रतिक्रीया द्यायची राहून गेली. क्या बात है! लाजवाब! खुसखुशीत!! crisp!!

"मराठी, मराठी." एक जरी इंग्लिश शब्द वापरला की आमच्या घरातलं हे घोषवाक्य आहे. ते मी घाईघाईने पूर्ण केलं.
>>>>>>>>
हे खरं असेल तर - ग्रेट

लेख खुसखुशीत Happy

खुप दिवसानी माबोवर उत्तम विनोदी वाचायला मिळाले. तसे इथे प्रसंगाने विनोद होतात, होतकरू लेखक प्रतिसादातून विनोद करायचा आटापीटा करतात व जाणकार तिरकस प्रतिसाद देऊन विनोद घडवायचाही प्रयत्न करतातच पण त्याला थीम नसते (मराठी शब्द मेला आठवेचना ऐनवेळेस).

खुसखुशीत हा शब्द जमतो आहेच लिखाणाला पण शंकरपाळे की चकली कसा खुसखुशीत याचा विचार चालू आहे, निर्णय झाला की टाकतेच...

सर्वांना धन्यवाद.

ऋन्मे॓ऽष - खरं आहे अगदी. टपलेले असतात घरात सर्व कोण इंग्लिश शब्द वापरतो आहे का ते बघून व्याख्यान द्यायला. मुलं आमच्यावर, आम्ही त्यांच्यावर Happy

डीविनिता- विशेष धन्यवाद :-).

यातला ’आपण’ म्हणजे ’फक्त तू’ असतो. बायकोसाठी क्वचित प्रसंगी दाखविला जाणारा हा आदर कशासाठी असतो हे कळायला मला खूप वर्ष लागली>>>>>>>>>> मस्त Happy