न खाण्याचा श्रावण येतोय ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 July, 2014 - 13:26

हल्ली श्रावण येतोय म्हटलं की ................... लोकांना पहिली गटारी सुचते.

किंवा असेही बोलू शकतो की गटारी आहे म्हणून काही जणांना श्रावण कधी येतोय आणि कधी जातोय याचा पत्ता तरी राहतो.

पण इथला विषय गटारी नाहीये आणि हेच सांगायला वरच्या दोन ओळी खर्चल्या आहेत.

विषय आहे श्रावण पाळण्याच्या आणि या कालावधीत सामिष भोजन वर्ज्य करण्याच्या नियमाबाबतचा.
विषयाचे ज्ञान इथे मी देणार नाहीये, तर मला पडलेले प्रश्न सोडवण्यासाठी हा धागा उघडला आहे.

तर, सर्वप्रथम कोणी मला सांगेल का, श्रावण या महिन्यात मांसमटणमच्छी का खात नाही? नेमके कारण?
चला ते गूगाळून मिळेलही,
पण हा प्रश्न पडण्यामागचे नेमके कारण म्हणजे आमच्या घरात ‘आपल्याच सोयीने’ पाळत असलेला श्रावण आणि त्यामागचे कारण देण्यास घरच्यांची असमर्थतता.

तर कसे, आमच्याकडे श्रावणात चिकनमटण खात नाहीत, मात्र मासे आणि इतर जलचर खाल्लेले चालतात, (खाल्यावर कसे चालतात? नो पीजे प्लीज, ग्रूप धार्मिक आहे)
नुसते खातच नाहीत तर दर बुधवार-रविवार आणि जमल्यास शुक्रवारीही न चुकता खातात.
कोंबडी वर्ज्य असली तरी धरमपाजीचे "संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे" हे सूत्र पाळले जाते. सॉरी चुकलो, मंडे नाही, तर "श्रावणी सोमवार" पाळला जातो. घरातले काही सभासद याउपर जाऊन "श्रावणी शनिवार" देखील पाळतात, मात्र त्याचे सोमवारच्या तुलनेतले महत्व काही त्यांना सांगता येत नाही. बस्स बाहेर कोणाकडे तरी बघून आले आणि आपणही शनिवार पाळायला सुरुवात केली.

आता यातही एक गंमत बघा. चिकनमटण जरी आमच्या घरात शिजवले जात नसले तरी बाहेर हॉटेलात जाऊन खाल्ले तर घरच्यांची काही हरकत नसते. बहुधा याचे कारण म्हणजे मी आणि माझे काका. आम्ही दोघेही रावण, आमचा कसला श्रावण .. या कॅटेगरीतले.
आणि यातही मजा म्हणजे, असा हा श्रावण महिना सुकासुका जराही जात नसला तरी आता महिनाभर चिकनमटण खायचे नाही बाबा, म्हणत गटारी तेवढी जोरात साजरी केली जाते. ती सुद्धा क्वार्टरफायनल, सेमीफायनल आणि अंतिम फायनल अश्या स्वरूपात आदल्या आठवड्यातील बुधवार-शुक्रवार-रविवार तिन्ही वार साधत.

तर जेव्हा जेव्हा मला कोणी, "तू श्रावण पाळतोस का?" हा प्रश्न विचारतात तेव्हा तेव्हा मला हा वरचा सारा उतारा त्यांना स्टेप बाय स्टेप समजवावा लागतो. तरीही त्यांच्या डोक्यात तो किती उतरतो हे त्यांनाच ठाऊक. "हे असे नेमके का?" या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मला कधीच देता येत नाही आणि म्हणूनच इथे एक ट्राय मारतोय. आणखी इथे कोणाकडे या प्रकारे श्रावण साजरा होतो का?
आणि का?

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता इथे परत धर्मावर महाचर्चा...परत तेच...
हे असंच हवं..तसच नको...
सो लेट्स हॅव पॉप्कॉर्न्स बट टूमोरो...

जसा रमजान तसा श्रावण...

तर जेव्हा जेव्हा मला कोणी, "तू श्रावण पाळतोस का?" हा प्रश्न विचारतात
<<
आमच्यात कुत्री मांजरी इ. पाळतात.
पाळलेल्या बकर्‍या कोंबड्यांची नांवे त्यांच्या लहानपणापासूनच 'ब्रेक्फास्ट' 'लंच' 'डिनर' अशी ठेवली जातात. म्हणजे मग खातना त्रास अजाब्बात होत नाही. Wink

आम्ही जात्याच मत्स्याहारी असल्याचे दाखवून मासे खातो, शिवाय श्रावणात माशांना चवच न्यारी असते आणि इतर समस्त जन खात नसल्याने भाव खात नाहीत मासे, तर काय करणार!!

पण अंडी, चिकन जड असते पावसाळ्यात पचायला असा आपला एक समज, बाहेर पार्टीतले हलके असते बहुधा, किंवा हलके होऊन लोक खातात म्हणून सुद्धा असेल.

पण गणपती दिवसांत १० दिवस आम्ही खरा श्रावण पाळतो.

चातुर्मास पाळायचे दिवस नाहीत.

अच्छे दिन आने वाले है
.
.
.
.
.

.
.
कोंबड्यांचे ....कारण श्रावण सुरु होतोय....

मांसाहार या ऋतूत पचायला जड असतो,हे एक कारण आणि मासे या सीजनमधे अंडी घालण्यासाठी,खाडीत,किनार्‍याकडे येतात.त्यांची पैदास नीट व्हावी म्हणून कदाचित या महिन्यात मासे खात नाहीत.पण श्रावणात बोंबिल मस्त मिळतात.

धिका,
मोदींनी अच्छे दिन बोलत जसे पहिलाच भाववाढीचा दणका दिला तसे, तुम्ही कोंबड्यांना श्रावणाचे अच्छे दिन बोलत गटारीलाच कापू नका.

विज्ञानदास,
धर्मावर काही चर्चा नाही करायचीय. मला माहीत आहे आपला हेतू शुद्धच आहे पण नेहमी अशी वाक्येच कांडी टाकायची कामे करतात. मी स्वता मांसमटण खात असलो तरी देव मानतो, आणि छानपैकी धार्मिक नसलो तरी अश्यांच्या भावना जपतो. त्यामुळे धर्माच्या नावावरून वाद उपस्थित करणे हा माझा हेतू कधीच नसेल, ना मी ते वळण लागू देणार.

डिविनिता,
श्रावणात माश्यांची चव सही लागायचे काही कारण आहे का, म्हणजे खरेच तसे आहे का?
चिकन मटण पचने जड हे असू शकेल.
तुमच्याकडेही अशीच मिक्स मेथड फॉलो करतात का? मांस त्यागा आणि मासे खा.

आता याचे आणि काय करायचे?
>>>>>
ग्लोबल वार्मिंग इथे आणून हा प्रश्न ग्लोबल बनवू नका हो, वृत्तपत्रातील रकाना भरायला टाकलेली बातमी असण्याची शक्यता. शहरजिल्हा वॉशिंग्टन दिले की कोणी मागोवा घ्यायला जात नाही आणि दोनचार संबंधित वायूंची नावे घेत उत्सर्जनसारखे जड शब्द वापरले की बस्स ..

ऋन्मेऽऽष हो कारण माशांशिवाय जगणे अवघड आहे. शिवाय श्रावणात माशाना उत्तम चव असते हे खरेच आहे, नवीन पैदास असते म्हणूनही असेल. ही चव पुढे भाद्रपदानंतर वाढतच जाते.

बांग़डुळं, छोटे ओले बोंबिल, मस्त येतात.

हा हा ..
हा डायलॉग आईचाही, पण आपले इन्विटेशन उधार राहिले, कारण नुसते बोंबील तर आपण बनवणार नाहीत Happy
तुर्तास धन्यवाद आणि शुभरात्री !

आम्हाला श्रावण पाळावाच लागतो.घरी काय, किंवा बाहेर काय!
लहानपणापासून जे काही संस्कार आहेत्,त्यातले जे प्रमुखपणे टिकलेत त्यातला हा एक.श्रावणाचा वापर असा करायचा याचं कारण्,त्यात अनेक सण-उत्सव असतात्,नॉन्व्हेज खाल्लं की,त्याचा तसा इफेक्ट येतो-तामस्,राजस काय जो असेल तो.म्हणून ते खात नाहीत असे सांगितलेले होते.बोकड,बकरी जिवंतच आवडते,म्हणजे त्या बाबतीत १२ महिने श्रावण. Happy

पण स्वतःचं मत म्हणाल तर,वर्षभर या-त्या कारणाने आपण 'हे' खातच असताना,एक महिन्याचा नॉनव्हेज उपास योग्यच असतो.तसेच सर्वत्र उत्साहाचं वातावरण असताना,प्राण्यांना आपल्या पोटासाठी मारणे,कसेतरीच वाटत असते.म्हणूनही श्रावण पाळत असतो.

मासे प्रकाराबाबत्,देवकीताईंना अनुमोदन.

कोंबड्यांना हल्ली लसी,इंजक्शन्स देऊन वाढवतात.देशी सोडली तर उरलेल्या सगळ्याच.त्यामुळे तेही कमी झाले आहे.उरलेत मासे...ते पावसाळयात बंदच कारण्,मासेमारीही बंद असते.जे काही असेल ते नारळी पौर्णीमेनंतर्, अर्थातच तेही श्रावण संपल्यानंतर.तेव्हा एक महिना श्रावण पाळणे म्हणजे संयम ठेवणे आणि महिनाभर का असेना त्या प्राण्यांना सुखाने जगू देणे-इतकेच आहे.

तर कसे, आमच्याकडे श्रावणात चिकनमटण खात नाहीत, मात्र मासे आणि इतर जलचर खाल्लेले चालतात, (खाल्यावर कसे चालतात? नो पीजे प्लीज, ग्रूप धार्मिक आहे)>>>>>>>>>>>>>>>>>>. हा प्रकार माझ्या माहेरी ही आहे......मला मुळात श्रावण पाळायला आवडत नाही... Happy

खूप सखोल अभ्यास नाही. पण घरच्या ज्येष्ठांनी जे सांगितलं आणि आम्हाला पटलं ते सांगते आहे. कारण शेवटी कोणत्याही परंपरा, नियम पाळणं ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं. पण या सगळ्याकडे आरोग्याच्या दृष्टीकोनातून पहायला हवं असं वाटतं. आणि आरोग्याचा मार्ग पोटातून जातो असं म्हणतात.
आपल्या सगळ्या सणवारांचा आणि नियमांचा संबंध सृष्टीतील बदलाशी आणि आरोग्याशी जोडला गेला आहे. त्याप्रमाणे आहारविहार बदलणे अपेक्षित असते. पूर्वीच्या लोकांचा तो बदलायचाही.
श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचा काळ आहे. पाण्यात दोष निर्माण होऊ शकतात. निसर्गतः शरीरात वातदोष वाढलेला असतो, भूक मंदावलेली असते. म्हणुनच ज्या पदार्थांमुळे वात निर्माण होतो ते खाऊ नयेत. नेमका याच काळात भाज्यांचा दर्जा खालावलेला असतो. म्हणुनही त्या न खाण्याची योजना उपवासात केलेली आहे. जर या काळात हलका आहार घेतला नाही तर पचन बिघडून वेगवेगळे शारीरिक त्रास सुरु होऊ शकतो. आरोग्य बिघडलं की मनही अस्वस्थ होतं. मनाचा आणि शारीरिक आरोग्याचा किती जवळचा संबंध आहे हे आपण सारे जाणतोच.
काळ कितीही बदलला आणि अत्याधुनिक झाला तरी आरोग्यम धनसंपदा हेच खरं की नाही?

श्रावणात तर छान छान मासे येतात आणी स्वस्त ही मिळतात , आवर्जुन पाळते श्रावण , पुर्ण श्रावणभर मासे खाते .. सोमवार, गुरुवार आणि शनिवारही..

आम्ही जात्याच मत्स्याहारी असल्याचे दाखवून मासे खातो, शिवाय श्रावणात माशांना चवच न्यारी असते आणि इतर समस्त जन खात नसल्याने भाव खात नाहीत मासे, तर काय करणार!! >> मेरे मुह की बात छीन ली! मासेखाऊंचे अच्छे दिन श्रावणात येतांत. Happy

काळ कितीही बदलला आणि अत्याधुनिक झाला तरी आरोग्यम धनसंपदा हेच खरं की नाही? >> खरं आहे. पण आरोग्यं... पेक्षा 'तथाकथित' धार्मिकतेचा बाऊ करुन श्रावण पाळणार्‍यांची संख्या हल्ली वाढते आहे.

आपल्या सगळ्या सणवारांचा आणि नियमांचा संबंध सृष्टीतील बदलाशी आणि आरोग्याशी जोडला गेला आहे. त्याप्रमाणे आहारविहार बदलणे अपेक्षित असते. पूर्वीच्या लोकांचा तो बदलायचाही.>>>> खरंच आहे.

आमच्या घरी पण असाच श्रावण पाळतात - चिकनमटण आणी अंडे खात नाहीत, मात्र मासे खाल्लेले चालतात.
कदाचित पूर्वापार मासे आणि भात हे मुख्य अन्न असल्यामुळे. पण गणपती दिवसांत मात्र आम्ही मासे नाही खात.

साधारण देवींना कोंबड्या बकर्‍याचा नैवेद्य दाखवण्याचा प्रघात आहे पण मी आमच्या इथे पाहीलं की कोळी/ वैती लोकं गणपतीला माश्यांचं कालवण पण नैवेद्य म्हणुन दाखवतात , आमच्या बिल्डींग मधे एक डॉक्टर आहेत जे कोळी/ वैती लोकांपैकी आहेत त्यांच्या बायकोने सार्वजनिक गणपतीत पापलेटच्या कालवणाचा नैवेद्य दाखवला होता.

बहुतेक कोळी लोकांमध्ये श्रावणात मासे खातात. माझे एक कोळी शेजारी होते ते श्रावणातही मासे खायचे, ही तर समुद्रातली भाजी हे त्यांनीच सांगितलेले. त्या बाईंच्या सासरी, माहेरी दोन्हीकडे मासळी घेऊन बाया मार्केटात जायच्या. उरलेले मासे टाकणार कसे म्हणुन बहुतेक कोळ्यांमध्ये श्रावणातही मासे खायची पद्धत पडली असावी. कोळी-आगरी इ. समुद्राशी संबंधित मंडळी सोडून इतर कोणाला श्रावणात मासे खाताना बघितले नाही. कोकणी आणि गोवन अट्टल मासेखाऊ पण तेही श्रावणात मांसाहार आणि मत्स्याहार टाळतात.

आपल्या सगळ्या सणवारांचा आणि नियमांचा संबंध सृष्टीतील बदलाशी आणि आरोग्याशी जोडला गेला आहे. त्याप्रमाणे आहारविहार बदलणे अपेक्षित असते. पूर्वीच्या लोकांचा तो बदलायचाही

हो.

पण त्याचबरोबर आपल्याकडे का हा प्रश्न विचारायची सोय नव्हती, त्यामुळे कुठल्याही गोष्टीमागची कारणे पुढच्या पिढीपर्यंत पोचु शकली नाही. आजची पिढी कारणे माहित नसताना डोळे झाकुन केवळ आधीच्या पिढीने सांगितले म्हणुन करतोय असे करत नाहीत आणि त्यांच्या का चे उत्तर आधीच्या पिढीकडे नसते. त्यामुळे आता योग्य आणि अयोग्य सगळेच गडबडलेय. ज्याला जे योग्य वाटते तो ते करतो.

श्रावण (खाण्यापिण्याबाबत) पाळण्यात एक शास्त्रीय कारण आहे लोक्स
आता पावसाळा सुरु होतो, म्हणजेच उन पाऊस, दमट/ रोगट हवा निरनिराळे रोग/ आजार चालु असतात शिवाय ऋतुबदलाचा त्रास मग अशा हवेला, नॉनव्हेज, कांदा, लसुण हे सगळ जड पडतं, शिवाय वांगही वातुळ असतं मग हे शरीराला आवश्यकही नसतं पण ज्यांना कांदा, लसुण आणि नॉनव्हेजशिवाय चालत नाही (पोटात चावत वै.) म्हणुन धार्मिक कारणे या नावाखाली श्रावण पाळा सांगितलेय. किमान एक महिना तरी अनावश्यक गोष्टी टाळा मग हिवाळ्याच्या सुरवातीला सगळ खा परत Happy पावसाळ्यात होणारे पोटबिघाड, जंतुसंसंर्ग, पचनाचे त्रास, गॅसेस ही याच कारणाने टाळता यावेत हाही एक उद्देश असावा.
असे बोलुन माझेही २ शब्द संपवते Happy

माझ्या आजोळी देखील लेखकाच्या घरी जसा आहे तसाच प्रघात आहे. श्रावणात मासे खातात फक्त मटण, चिकन नाही. लहानपणी आम्हीदेखील आजीला याबद्दल प्रश्न विचारुन भंडावून सोडत असू की मासे चालतात मग मटण का नाही वगैरे, पण तिला त्याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. मग आम्ही तिला म्हणायचो की तुला मासे आवडतात म्हणून तु ही पळवाट शोधुन काढली आहेस आणि माशांना "चालतात" केटेगरीत टाकलेस.

हा साधना बोलत आहेत त्याप्रमाणे बरोबर आहे <कोळी-आगरी इ. समुद्राशी संबंधित मंडळी सोडून इतर कोणाला श्रावणात मासे खाताना बघितले नाही.>.
आमच्याकडे पण पूर्वी गणपतीत माश्यांच नैवेद्य चालायचा , आता तो बन्द झाला आहे. एक गाणे सुद्धा आहे

आयलाय गो गौरीचा काका, आयलाय गो गौरीचा काका
आयलाय गो गौरीचा काका पोरीन्जो चिंबोरी ढाका...
आयलाय गो गौरीचा काका पोरीन्जो चिंबोरी ढाका...
गौरीचा उपास केलाय यो दादा चिम्बोर्याला गेलाय,
गौरीचा उपास केलाय यो दादा चिम्बोर्याला गेलाय
गौरीचा उपास केलाय यो दादा तेरड्याला गेलाय
गौरीचा उपास केलाय यो दादा तेरड्याला गेलाय ,...
गौरीचा मांडव घातलाय यो दादा कमळांना गेलाय
गौरीचा मांडव घातलाय यो दादा कमळांना गेलाय
आयलाय गो गौरीचा काका पोरीन्जो चिंबोरी ढाका... II

साधना बोलत आहेत त्याप्रमाणे बरोबर आहे <कोळी-आगरी इ. समुद्राशी संबंधित मंडळी सोडून इतर कोणाला श्रावणात मासे खाताना बघितले नाही.>>>> आम्ही खातो, बघायला नि खायला ही या..

शिवाय जे मासे खातात ते समुद्राशी संबंधित आहेतच की!! आणि न खाणारे देखील!! (खाणारे आहेत म्हणून न खाणारे भाज्या इ. सद्य भावात खाऊ शकतात)

कोळी-आगरी इ. समुद्राशी संबंधित मंडळी सोडून इतर कोणाला श्रावणात मासे खाताना बघितले नाही.
>>>>>>>>
कोळी आग्रीच का? कोकण किनारपट्टीतले सारेच यात मोजू शकतो खरे तर.
कारण छानछान आणि ताजेताजे मासे मिळतात, वर्षभर आवडीने खाल्ले जातात, तर कित्येकांच्या जीवावरच येत असेल नाही हा एक महिना पाळायचा.

Pages