बाउन्सर्स आणि यॉर्कर्स

Submitted by फारएण्ड on 21 July, 2014 - 10:02

क्रिकेट मधे दुर्मिळ होत चाललेला प्राणी. फास्ट बोलर. म्हणजे तो बोलिंग ला आला की "मिडीयम-फास्ट" दाखवतात, व बिचारा आपल्या लिमीट्स मधे राहून "ष्टम्पात" बोलिंग करतो, आणि मग कॉमेण्टेटर त्याला मिलीटरी मिडीयम वगैरे म्हणतात तसा नाही. फास्ट. रिअल फास्ट. डेनिस लिली, होल्डिंग, शोएब, ब्रेट ली, इम्रान, अक्रम, वकार, डोनाल्ड. कोणत्याही पिचेस वर इतर कसलाही सपोर्ट नसला तरी केवळ वेगामुळे सुद्धा बॅट्समनला त्रास देणारा. आणि जेथे स्विंग, बाउन्स आणि कॅरी मिळेल तेथे तर भल्याभल्यांना जमिनीवर आणणारा.

पहिल्या दिवसाचा सुरूवातीचा खेळ. दिग्गज, महान वगैरे फलंदाज खेळायला येतात. अजून बाउन्स किती आहे, स्विंग किती आहे, बोलर किती जोरात आहे याचा अंदाज यायचाय. खेळायला आख्खा दिवस पडलाय. पहिला तास बोलरचा. बॅट्समन स्ट्राईक घेतो, बोलर स्वेटर काढून अंपायर कडे देतो, स्टेप्स मोजत रन-अप आखतो, आणि खरी गेम सुरू होते.

खेळपट्टी 'जिवंत' असेल तर पहिला डावपेच ठरलेला. पहिले ३-४ बॉल्स बाउन्सर्स. त्यात बॉल टाकल्यानंतर फॉलो थ्रू मधे पुढे अर्ध्या पिचपर्यंत जाउन बॅट्समनकडे खुन्नस वाली नजर. "आपल्याशी पंगा घेऊ नको" हा पहिला संदेश. दुसरा म्हणजे फ्रंट फूट वर यायची डेअरिंग आहे का, हा. बॅट्समनला ही लगेच याला धुवायचा आहे म्हणून वाट्टेल तशी बॅट फिरवण्याची गरज नसते. गावसकर म्हणायचा तसा 'पहिला तास बोलरला दिला की उरलेला दिवस तुमचा'. मात्र या पहिल्या तासातच बोलर बरोबर जी गेम चालते त्यातून वाचलात तर. एकतर स्विंग, बाउन्स, किंवा कट होणार्‍या नवीन चेंडूला खेळणे सोपे नसते, त्यात ५-१० ओव्हर्स चा स्पेल असलेला बोलर तुमचे कच्चे दुवे हेरून तुम्हाला उडवू शकतो.

बरेचसे शांत बॅट्समन अशा वेळेस बॅक फूट वर ठाण मांडून बसतात. आणि अशात मग एक प्रचंड वेगात फुल पिच स्विंग होउन येतो किंवा यॉर्कर येतो, आणि बॅट खाली जायच्या आत स्टंप घेऊन जातो. क्लासिक फास्ट बोलर्स विकेट! टेस्ट मॅच मधल्या अनेक जिवंत, सुंदर सीन्स पैकी माझा अत्यंत आवडता. भारतीय बॅट्समन नसेल तर जास्तच. विकेट्स मधे काहीही सपोर्ट नसताना सुद्धा काही फास्ट बोलर्सनी नवीन चेंडू, स्वतःचा वेग व दबदबा यांच्या जोरावर अशा विकेट्स काढलेल्या आपण अनेकदा पाहिलेल्या आहेत. जेथे विकेट्स मधे सपोर्ट असतो तेव्हा तर हे आणखी जोरदारपणे होते.

या अशा काही क्लिप्स. यातील बहुतेक क्लिप्स मधे दोन्ही बाजू दिग्गज आहेत, आपापल्या टीममधले त्यावेळचे मुख्य खेळाडू आहेत आणि त्यांचे एकमेकांबरोबरचे द्वंद्व हे कधीकधी मॅचच्या पेक्षाही मोठे समजले गेलेले आहे.

पहिला होल्डिंग विरूद्ध बॉयकॉट
बॉयकॉट हा इतर तत्कालीन (व अनेक कालीन) इंग्लिश लोकांप्रमाणे स्विंग चांगले खेळणार पण जेन्युइन पेस पुढे बकरा, असा नव्हता. स्लो खेळणारा असला तरी तांत्रिकदृष्ट्या कायमच नावाजलेला होता व विंडीज विरूद्ध चे त्याचे रेकॉर्डही चांगले आहे. त्याविरूद्ध ऐन भरात असलेला "व्हिस्परिंग डेथ" होल्डिंग. त्याच्या तेव्हाचा रन-अप सुद्धा पाहण्यासारखा असे. गवतावरून तरंगत गेल्यासारखा तो जात असे. बहुधा तो जवळून बोलिंग करताना ज्या सहजपणे आवाज न करता पळत यायचा त्यावरून डिकी बर्ड ने ते नाव ठेवलेले होते त्याचे.

खच्चून भरलेले व मिळेल तेथून अजूनही लोक येत असलेले बार्बाडोस चे स्टेडियम. इंग्लंड विरूद्धचा सामना म्हणजे कायमच खुन्नस बाहेर काढायची संधी. होल्डिंग ने टाकलेली ही ओव्हर्स क्रिकेटमधली सर्वात भारी समजली जाते. यात इंग्लिश समीक्षकांची आतिशयोक्ती सोडली तरी ही क्लिप बघता ती सर्वात डेडली ओव्हर्स पैकी नक्कीच असेल. बॉयकॉट चा स्टंप ज्या पद्धतीने उडतो ते सध्याच्या हाय डेफिनिशन क्लिअर पिक्चर मधे, १५ कोनांतून बघायला व स्टंप मायक्रोफोन मधून ऐकायला काय मजा आली असती!

ही दुसरी क्लिप व्हिव रिचर्ड्स विरूध्द डेनिस लिली. या सिरीज चे महत्त्व इतके प्रचंड आहे की पुढच्या १०-१५ वर्षांत विंडीज ने जागतिक क्रिकेट मधे वर्चस्व गाजवले त्याची मुळे येथे होती. लिली, थॉमसन वगैरे प्रचंड वेगवान व आक्रमक बोलर्स नी वेस्ट इंडिज ला एवढे जेरीस आणले की रिचर्ड्सलाही म्हणे या सिरीजच्या मध्यावर मानसोपचार तज्ञ गाठावा लागला होता फॉर्म परत मिळवण्यासाठी (त्याबद्दल त्याचे मत येथे आहे). त्यावेळेस एकूणच लिली भयंकर जोरात होता. त्याचा रन अप बघताना नेहमी शिकार करण्याच्या शेवटच्या टप्प्यात एखादा चित्ता जसा एकदम वेग व इंटेन्सिटी वाढवत जातो तसे वाटायचे. येथे डावपेच तोच. पहिले ३-४ बॉल्स बाउन्सर्स आणि मग एक एकदम आत येणारा. रिचर्ड्स येथे बॉडी लॅन्ग्वेज मधे कितीही बेदरकारी दाखवत असला तरी लिली नक्कीच जिंकला.

ते 'जागतिक वर्चस्वाची मुळे" वगैरे लिहीताना शाळेच्या इतिहासातील "दुसर्‍या महायुद्धाची मुळे व्हर्सायच्या तहात..." वगैरे आठवत होते. त्याचे कारण म्हणजे फास्ट बोलर्स चे महत्त्व क्लाइव्ह लॉईड ने येथे ओळखले व यानंतर लगेच स्वतःच्या टीम मधे त्याला प्राधान्य दिले. मग आधी क्रॉफ्ट, होल्डिंग, रॉबर्ट्स व गार्नर, नंतर क्रॉफ्ट च्या जागी माल्कम मार्शल आला. त्यापुढे वॉल्श व अँब्रोज निवृत्त होईपर्यंत विंडीज कडे कायमच किमान दोन जबरी फास्ट बोलर्स असत.

इम्रान वि ग्रेग चॅपेलः ८१ मधला इम्रान म्हणजे ऐन भरातला. तर चॅपेल थोडा उतरणीला लागलेला असला तरी अजूनही भारी. पुन्हा ठरलेला डावपेच. चॅपेल ला फ्रंट फूट वर येउ द्यायचे नाही. कारण कॉमेंटेटर ने अचूक टिप्पणी केल्याप्रमाणे "A Greg Chappell playing forward is a confident Greg Chappell".. हे पाह्ताना एक जाणवेल की २-३ बॉल्स चॅपेल जसे खेळला ते बघितल्यावर लगेच रिची बेनॉ ने इम्राने ने चॅपेलला 'वर्क आउट' केला आहे हे ओळखले होते. जाणकार कॉमेंटेटर्स जसे बराच काळ बघितलेल्या खेळाडूंचा आज किती फॉर्म आहे ते ओळखतात तसाच प्रकार. रिची बेनॉ ते म्हणतो आणि पुढच्या बॉल वर चॅपेल ची दांडी! चॅपेल म्हणजे वास्तविक प्रचंड "अ‍ॅनेलिटीकल" खेळाडू होता. त्याने स्वतःच त्याच्या प्रत्येक बॉल मधल्या "रिच्युअल" चे खूप वर्णन केलेले आहे. प्रत्येक बॉल नंतर क्रीजवरून बाजूला जाऊन आधीचा बॉल कसा होता, नंतरचा कसा असू शकतो याचे विश्लेषण डोक्यात करून, पुन्हा पुढच्या बॉल वर फोकस करून मग क्रीज मधे तो येत असे. त्यालाही या पेटंट डावपेचाने इम्रानने काढला यावरून प्रत्यक्ष पीच वर वेगळीच गेम चालू असते हे जाणवते.

'खडॅक!" त्याकाळात फक्त ऑस्ट्रेलियातील मॅचेस मधे ऐकू येणारा हा "बोल्ड" चा आवाज. भारतीय बोलर ने काढला तर अजूनच धमाल. १९९२ मधला कपिल म्हणजे खरे तर चांगलाच उतरणीला लागलेला. पण द आफ्रिकेतील व ऑस्ट्रेलियातील पिचेस मधल्या "ज्यूस" मुळे त्या एक दीड वर्षात तो जबरी फॉर्म मधे आला होता. या दोन्ही सिरीज मधे त्याने खूप विकेट्स काढल्या. त्यातही या ऑस्ट्रेलिया सिरीज मधे त्याने सातत्याने अ‍ॅलन बॉर्डर ला उडवला होता. बॉर्डर तेव्हाचा सर्वोत्कृष्ठ फलंदाज समजला जायचा. त्यात कॅप्टन व घरी खेळताना त्याला कपिल ने टारगेट करणे म्हणजे संघाच्या मुख्य बोलर ची जबाबदारी तो बरोबर घेत होता. या मॅच मधे नवा चेंडू घेतल्यावर कपिल कडे बॉल आला आणि तेव्हाचे हे तीन सलग बॉल्स किती डेडली होते ते पाहा. आधी बोर्डर ला लेट स्विंग होणार्‍या बॉल ने उडवला - प्रतिस्पर्धी कॅप्टनचा त्रिफळा काढणे हे बोलर्ससाठी नेहमीच मोठे यश असते- आणि मग फॉर्म मधे असलेल्या डीन जोन्स ला दोन 'ब्रूटल' आउटस्विंगर्स. पहिला जेमतेम हुकला पण दुसरा बरोबर ऑफस्टंपवर!

आणि ही इशांत शर्मा विरूद्ध रिकी पाँटिंग. इशांत शर्मा अजूनतरी वरच्या लिस्ट मधल्या बोलर्स एवढा भारी नसला तरी २००८-२०११ तो व झहीर ही पेअर खूप जबरी जमली होती व भारताच्या एकूण कसोटी क्रिकेट मधल्या तेव्हाच्या वर्चस्वात त्यांचा खूप वाटा होता. इशांत शर्मा ने २००८ च्या पर्थ टेस्ट मधे दोन्ही डावात पाँटिंगला जसा काढला त्यावरून त्याच्यात प्रचंड पोटेन्शियल आहे हे सिद्ध झाले.

"एक और करेगा?"
"हाँ, करूंगा"
२००८ च्या पर्थ कसोटीनंतर ही वाक्ये खूप फेमस झाली होती. त्याआधी पाच वर्षे जगातील सर्वात चांगला फलंदाज असलेल्या पाँटिंगला जवळजवळ तासभर आपल्या स्विंग व बाउन्स ने सतावल्यावर अनिल कुंबळे शर्माचा स्पेल बदलणार होता. पण असे म्हणतात की सेहवाग ने त्याला दिल्ली मधे सलग बर्‍याच ओव्हर्स बोलिंग करताना पाहिलेले होते व त्याने अनिल ला त्याला अजून एक देऊन पाहा म्हणून सुचवले. इशांतला ते अनिल ने विचारल्यावर तो लगेच तयार झाला, व त्याच ओव्हरमधे फायनली पाँटिंगने 'निक' दिली. द्रविड कडे बॉल गेल्यावर तो सुटणे शक्यच नव्हते. या कसोटीत दोन्ही डावात 'पंटर' ला इशांत अजिबात झेपला नाही. क्रिकइन्फोच्या या लेखातही त्याची आणखी माहिती मिळेल.

याही मॅच च्या आधी बरेच काही झाले होते या सिरीज मधे. मेलबर्न ला रीतसर हरल्यावर, दुसर्‍या टेस्ट मधे सिडनीला आपली बॅटिंग फॉर्मात आली, पण थोडे दुसर्‍या डावातील अपयश व बरेचसे ऑस्ट्रेलियन चीटिंग व अंपायर्सच्या चुका यामुळे सिडनीलाही भारत हरला. एकूणच आपली टीम भयंकर डिवचली गेली होती. अनिल कुंबळे सारख्या शांत खेळाडूनेही "या मॅच मधे एकच टीम खिलाडू वृत्तीने खेळली" असे म्हंटले होते. भारताचे (व पाकचेही) एक आहे - तुम्ही कितीही हरवा पण व्यक्तीशः कोणाला डिवचलेत तर काय होईल सांगता येत नाही. संदीप पाटील एरव्ही ब्याटी फिरवून आउट होईल. पण त्याला जखमी केलेत तर परत येउन त्याच बोलर्सना तुडवून १७४ मारेल. 'दादा' एरव्ही कंबरेवर बाउन्स होणार्‍या बॉल ला सुरक्षितरीत्या स्लिप मधे पाठवण्याचे काम आपल्या बॅटचे आहे अशा समजूतीत खेळेल, पण राग आला तर शोएब, अक्रम पासून फ्लिंटॉफ पर्यंत कोणालाही पुढे येउन भिरकावून देइल. जेन्युइन वेग विशेष खेळता न येणारा अझर जखमी व अपमानित झाल्यावर ओव्हरमधले पाच बॉल कोठेही पडले तरी एकाच बाजूला बाउंड्रीबाहेर काढेल, गावसकर एरव्ही ९४ बॉल्स मधे १० रन जेमतेम काढेल पण डिवचलात तर पुढच्या कसोटीत जगातील सर्वात भयंकर बोलिंग विरूध ९४ बॉल्स मधे शतक मारेल, असला प्रकार. येथे तर सगळा संघच डिवचला होता. त्यामुळे एरव्ही बघितले तर पहिल्या दोन टेस्ट हरल्यावर तिसरी 'पर्थ' ला म्हणजे शब्दशः दुष्काळात तेरावा महिना. पण येथे आपण ऑस्ट्रेलियाला धुवून काढले. जवळजवळ सर्व प्रमुख बॅट्समेननी थोडीफार कामगिरी केलीच पण मॅच काढण्यात इशांतचा ही खूप मोठा भाग होता.

आपापल्या जमान्यातील खतरनाक बोलर्स व नावाजलेले बॅट्समेन यांच्यातील हे द्वंद्व हे कसोटी क्रिकेट मधेच बघायला मिळते. बोलर्सना ५-१० ओव्हर च्या स्पेल मधे बॅट्समन कोणत्या बॉल ला कसा खेळतोय हे बघून त्याप्रमाणे त्याला आउट कसे करायचे हे ठरवता येते. नियमांनी जखडून टाकलेल्या व पाटा पिच वर दम नसलेल्या बोलिंग वर पट्टे फिरवून ३० बॉल्स मधे ६० धावा करणे हे बघण्यातही एक मजा आहे पण ती एकतर्फी आहे व बॅट्समन चे एकच कौशल्य त्यात कामी येते - कोणत्याही बॉल वर शॉट्स मारू शकण्याचे. खरा कस लागतो तो कसोटीत. हे आजकाल जरा कमी बघायला मिळत आहे. तरीही डेल स्टेन, मिचेल जॉन्सन सारखे लोक अजूनही थोडीफार कामगिरी करत आहेत. तुम्हालाही अशा काही क्लिप्स माहीत असतील तर द्या येथे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेय, तुझे बरोबर आहे. ती रिचर्ड्स वि लिलीची क्लिप त्या सिरीज मधली नाही. विषयाला धरूनच असल्याने त्यात बदल केलेला नाही आता.
टण्या - माझ्या माहितीवरून तरी त्याच सिरीज नंतर लॉइडने फास्ट बोलर्स वर भर दिला. तरी चेक करतो एकदा.

मस्त लेख !

जुने क्रिकेट आठवले , डेनिस लिली, रिचर्ड हॅडली, मार्शल, गॉर्नर, सारखे तुफानी बॉलर समोर संदीप पाटील, गुड्डाप्पा विश्वनाथ, गावस्कर, कपिल श्रीकांत ची बॅटीग पहाण्यात मजा यायची.

Nice Article Farend as usual. Immy in 1981 was a treat. We used to collect the photographs of all these players mentioned in your article out of Sports Star. Way before the internet. There was a wonderful article in Maharashtra Times by name " Wicket keeper maut ki bahon me." a fictional take on all the leading players of that time.

http://www.youtube.com/watch?v=a1Il32Vy84U

बेस्ट बोल्ड ........

यातला शेन टॅट ने काढलेला बोल्ड बघा... स्टंम्प किमान ६-८ वेळा कोलांटी उडी मारत ८-९ फुट मागे उडाला

फारएन्डजी, तुमच्या छान आठवणी जाग्या करणार्‍या सुंदर लेखाला दृष्ट लागूं नये म्हणून तीट लावतो-

गुलाम अहमद या तथाकथित फास्ट गोलंदाजाने सोबर्सला मुंबईच्या कसोटीत बाऊन्सर टाकण्याचा आगाऊपणा केला; आश्चर्य म्हणजे तो हूक करताना सोबर्सची बॅटच हातातून उडाली व सारा स्टेडियम अवाक झाला ! खूप वर्षानी अहमदाबादला, जिथें गुलाम अहमद पोलीस अधिक्षक होते , त्याना भेटण्याचा योग आला.
सहज हा विषय काढला तेंव्हां प्रथमच एका पोलीस अधिकार्‍याला इतकं लाजताना पाहिलं !!

अति वेगवान नसूनही खतरनाक बाऊन्सर टाकण्यात वाकबगार होता रमाकांत देसाई. गूडलेन्ग्थवरून चेंडू उसळवण्याची त्याची लकब मला वाटतं अद्वितीयच होती. भल्या भल्या फलंदाजाना त्याने अशा बाऊन्सर्सनीं हैराण केलं होतं. पण त्यालाही भेटला पाकीस्तानचा सईद अहमद. मुंबईच्या कसोटीत रमाकांतचा असाच एक बाऊन्सर तडक कपाळावर आदळून सईद खाली कोसळलाच. तो बेशुद्ध पडला असंच वाटून स्टेडियममधे हळहळ सुरूं होती. इतक्यांत वैद्यकीय सल्ला न जुमानतां तो खेळायलाच उभा राहीला. रमाकांतही इर्षेने पेटला असावा व त्याने पुढचाच चेंडू तसाच खतरनाक बाऊन्सर टाकला. सईदने पटकन छानपैकी पोझिशनमधे येवून एक अप्रतिम हूक करून चेंडू सीमापार केला. मुंबईच्या लाडक्या रमाकांतला हूक केलं असतानाही सबंध स्टेडियमने उभं राहून सईदला सलामी दिली !! [ हाच सईद आतां संत होवून धार्मिक/ सामाजिक कामाला त्याने स्वतःला वाहून घेतलंय. मध्यंतरी दुबईच्या एका सामन्यात त्याला कुणीतरी कॉमेंट्री बॉक्समधे आणलं. रमाकांत देसाईबरोबरचा हा किस्सा त्यानेही त्यावेळीं अगत्याने सांगितला होता ]

अर्रे मस्तच! क्लिप्स निवांत बघणार... तेव्हा लेख परत वाचणार!!

तिसर्‍या ओळीतल्या यादीत डेल स्टेन कसा काय नाही?

यॉर्कर्स जरा कमी पडलेत लेखात.. ते पण यायलाच पाहिजेत..

अर्थात त्यामध्ये यॉर्कर वर विकेट न पडता धुलाई पण होऊ कशी होऊ शकते ते वकार यूनुस छान सांगू शकेल.. अजय जडेजा जे काही दोन तीन यॉर्कर तुडवले होते त्याला तोड नाही.. हे वनडेतले झाले.. टेस्ट मधले शोधावे लागतील मला पण.

फारेण्डा, मस्त लेख.

यॉर्कर किंग मलिंगा ला विसरून कस चालेल. वकार पण सॉलिड यॉर्कर टाकायचा. टो क्रशर.

पण बाउन्सर्स आणि हुकर्स हे क्रिकेटमधल एकदम जबरी युद्ध असत. ईस पार या उस पार. काल पण तशीच परिस्थिती होती. सुदैवाने आपण पार झालो.

७२ चा सिरीज चा आणि लॉईडने ४ फास्ट बॉलर वापरण्याचा काहीही संबंध नव्हता.

वरच्या क्लिप्स पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवतं-
महान तेज गोलंदाज नंतर टाकायचा अप्रतिम, अचूक यॉर्कर/ लेट स्विन्गर खात्रीने परिणामकारक होण्यासाठीच
बाऊन्सरचा उपयोग करतात. बाऊन्सरपेक्षांही ती हुकमी अचूकता त्यांच्या तपश्चर्येचं फळ व यशाचं गमक असावं.

छान, लयबद्ध 'रन-अप' हा सर्वच महान गोलंदाजांचा स्थायीभावच असावा. क्लिप्समधे नसलेले वकार युनूस, वेस्ली हॉलसारखे अनेक गोलंदाज यामुळेही आठवत रहातात. लींडवॉल या महान ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा रन्-अप व मागच्या पायाचा अंगठा किंचितसा जमिनीवर घसटत मारलेली शेवटची उडी हें सर्वच पहातच रहावं इतकं 'ग्रेसफुल व मॅजेस्टिक' असायचं !

हेल्मेट न वापरतां अशी गोलंदाजी खेळणार्‍या गावसकरसारख्या सगळ्यानाच पुन्हा पुन्हा सलाम !

हेल्मेट न वापरतां अशी गोलंदाजी खेळणार्‍या गावसकरसारख्या सगळ्यानाच पुन्हा पुन्हा सलाम >> +१

यॉर्कर्स जरा कमी पडलेत लेखात.. ते पण यायलाच पाहिजेत.. >> +१ फक्त यॉर्कर्सच नाही तर ब्लॉक होलमधे टाकलेले (आक्रम खूपच मस्त वापरायचा) चेंडूपण यायला पाहिजेत (पण लेखाचे शीर्षकही बदलावे लागेल मग बहुतेक Wink )

भाऊसाहेब,

थोडा अवांतर प्रश्न आहे. वेस्ली हॉल चेंडू टाकायला खरोखरच सीमारेषेपासून धावत यायचा का? मला वाटतं त्याप्रमाणे सर्वात लांब रनप त्याचाच आहे.

आ.न.,
-गा.पै.

वेस्ली हॉल खूपच द्रूतगती होता, पण मी ऐकलेल्या माहितीनुसार म्हणे थाँप्सनचाच रन अप बराच होता असे काहीतरी!

टण्या हे इथे बघ. इथे लॉईड चा कल फास्ट बॉलिंग कडे कसा वळत गेला ह्याची माहिती दिली आहे.
http://www.cricketcountry.com/articles/clive-lloyd-the-mastermind-behind...

It was Australia that shaped Lloyd’s captaincy methods.

Greg Chappell’s ruthless men, led by the terrible twins Dennis Lillee and Jeff Thomson, routed the young, vibrant West Indians 5-1. Clive Lloyd had said before the tour, “There is not much between the two teams where talents and skills are involved and you don’t need a crystal ball to predict that the outcome could hang on a slender thread.” In the end his own prediction was way off the mark.

Later Gordon Greenidge blamed him for not giving the team the inspiration that they needed. However, Lloyd scored 469 runs at 47 with hundreds at Perth and Melbourne. But, West Indian batsmen had not encountered a pace attack of that quality. The middle order was quickly exposed to the fresh new ball bowlers, and many were hit as the Australian speedsters bowled faster and faster.

Lloyd himself was hit on the jaw by Lillee at Perth, Brenard Julien broke his thumb, Alvin Kallicharran was struck on the nose. Lots of batsmen were out to poorly judged hook shots. A fair number of decisions went against the visitors as well. At one stage young Michael Holding broke down on the pitch, tearsstreaming down his face, after a snick from Ian Chappell had been given not out.

For the rest of his career, Lloyd remembered how effective relentless fast bowling was.

उंटावरची काडी भारताविरुद्धची ७६ मधली पहिली टेस्ट ठरली
The final shape to his methods was given by his own ill-conceived declaration in 1976 when India toured in 1976. As usual, Lloyd feasted on the Indian attack scoring a measured 102 as West Indies won the first Test match at Bridgetown. However, when he declared the innings at 271 for six at Port of Spain, leaving India to get 403 in the final innings, Albert Padmore, Raphick Jumadeen and Imtiaz Ali could give him just two wickets in 105 overs of spin. India cruised home by six wickets.

At the end of the match in the dressing room, Lloyd asked his spinners, “Gentlemen, I gave you 400 runs to bowl at and you failed to bowl out the opposition. How many runs must I give you in future to make sure that you get the wickets?”

Never again would Lloyd be let down by spin. It was the start of a new paradigm. Relentless pace.

गा.पै.जी, मीं प्रत्यक्ष पाहिलेल्या गोलंदाजांत तरी हॉलचा रन-अप सगळ्यांत खूपच जास्त होता. ब्रेबोर्नवर तो रन-अपच्या सुरवातीला अगदीं स्टँडच्या जवळ, बाऊंडरीच्या फिल्डरसारखा दिसायचा !

<< .Never again would Lloyd be let down by spin It was the start of a new paradigm. Relentless pace. >> मला वाटतं त्यावेळीं वे. इंडीजमधे फास्ट गोलंदाजांचं भरमसाट पीकच आलं होतं व त्याचा उपयोग करून घेण्याचा शहाणपणा लॉईडने दाखवला. भारताविरुद्धच्या 'त्या' कसोटीत जर लान्स गिब्स, रामाधीन [ किंवां आतांचा सुनील नारायन] उपलब्ध असते तर लॉईडवर << Never again would Lloyd be let down by spin>> ही पाळी आलीच नसती. अर्थात, ऑसीजविरुद्ध त्यांच्या खेळपट्ट्यांवर जशास तसे न्यायाने कुणीही वे.इंडीजचा कॅप्टन असता तरीही फास्ट गोलंदाजांचा तोफखाना घेवूनच गेला असता. लॉईडची खरी महानता ही आहे कीं अत्यंत लहरी व कांहींशा बेशिस्त पण प्रतिभावान अशा खेळाडूंमधे त्याने खुबीने सांघिक भावना रुजवली व त्यांच्याकडून असामान्य कामगिरी करुन घेतली. शिवाय, << Relentless pace >> ही कायस्वरूपी एकांगी स्थिती क्रिकेटच्या लोकप्रियतेसाठी व भवितव्यासाठी घातकच ठरली असती, हें आहेच.

लॉईडची खरी महानता ही आहे कीं अत्यंत लहरी व कांहींशा बेशिस्त पण प्रतिभावान अशा खेळाडूंमधे त्याने खुबीने सांघिक भावना रुजवली व त्यांच्याकडून असामान्य कामगिरी करुन घेतली. >> +१. नंतर रिचर्ड्स, रिचर्ड्सन, हेन्स, वगैरे खाली झालेली स्थिती बघता अजूनच जाणवते.

ही कायस्वरूपी एकांगी स्थिती क्रिकेटच्या लोकप्रियतेसाठी व भवितव्यासाठी घातकच ठरली असती, हें आहेच. >> हो नंतर शेन वॉर्न ने स्पिनला जे ग्लॅमर मिळवून दिले ते नसते तर काय झाले असते ह्याची कल्पना करून बघा.

टॉपक्लास लेख फारेण्ड !

वेगवान गोलंदाज हिरव्यागार गालिच्यावर फलंदाजांना नाचवताहेत हे द्रुष्य बघायला ट्वेंटी-२० च्या धोबीपछाड फटकेबाजीपेक्षा कित्येक पटींनी जास्त मजा येते. त्यातही स्विंग पेक्षा बाऊन्सवर नाचवताहेत हे बघायला जास्त मजा येते. अर्थातच फलंदाज भारतीय नसावेत हि अट लागू.

विडिओ सारेच चुन चुन के, कपिलपाजींनी पण मजा आणली.

माझा एक आवडता गोलंदाज म्हणजे ब्रेट ली. त्याची कारणे म्हणाल तर मला तो दिसायला आवडायचा, त्याचा बॉलिंग टाकतानाचा रनअप लयबद्ध वाटायचा, त्याची स्टाईल आवडायची (आठवा ते विकेट काढल्यावर पंपाने सायकलमध्ये हवा भरणे), त्याचा अ‍ॅटीट्यूडही नेहमी आक्रमक असून कधीही आक्रस्ताळपणा दिसला नाही, वेगवान गोलंदाज म्हणून त्याचा पहिला विश्वास नेहमी आपल्या पेसवरच असायचा... वगैरे वगैरे पण आवडता होता हे नक्की Happy

Pages