कशाला वाण पेरू अन कशाला पीक मागू मी

Submitted by वैवकु on 17 July, 2014 - 09:49

कशाला वाण पेरू अन कशाला पीक मागू मी
तुझ्या काही सरींसाठी पुन्हा का भीक मागू मी

धुवाया डाग कर्मांचे कुण्या कुंडामधे न्हाऊ
मनाला साफ करणारे कुठे आन्हीक मागू मी

नको मागायला दोन्ही मने एकाच जातीची
तुला सोशीक मागू की मला सोशीक मागू मी

तसे नुकतेच आकारास आले आपले नाते
तुझा सल्ला कसा इतक्यात वैयक्तीक मागू मी

तुझ्या ठरल्या नकाराची पुन्हा आमंत्रणे आली
कुठे होवू परागंदा कुठे लपणीक मागू मी

मला माहीत आहे सत्यनारायण शिरा देतो
तरीही वाटते ...पूजेतली खारीक मागू मी?

"तसे" छापून आल्याने असा मौखीक झालो मी
मिळाला तो पुरे झाला किती लौकीक मागू मी

फुकटचे दु:ख प्याले की गझल चाखायला मिळते
तुझ्या गुत्त्यातली का मग सुखे खर्चीक मागू मी

मला कंपल्सरी आहेस केले विठ्ठला तू जे
कशाला प्रश्न त्या जगण्याकडे ऐच्छीक मागू मी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान...

नको मागायला दोन्ही मने एकाच जातीची
तुला सोशीक मागू की मला सोशीक मागू मी ___मस्त

मला माहीत आहे सत्यनारायण शिरा देतो
तरीही वाटते ...पूजेतली खारीक मागू मी?__ देवपूरकर टाईप झाला

मस्त.. ! शेवटचाही खासच!

नको मागायला दोन्ही मने एकाच जातीची
तुला सोशीक मागू की मला सोशीक मागू मी

तसे नुकतेच आकारास आले आपले नाते
तुझा सल्ला कसा इतक्यात वैयक्तीक मागू मी

वा वा हे शेर आवडले ! खास !!

फुकटचे दु:ख प्याले की गझल चाखायला मिळते
तुझ्या गुत्त्यातली का मग सुखे खर्चीक मागू मी<<<

व्वा व्वा!

खारीक सोडून संपूर्ण गझल आवडली.

तसे नुकतेच आकारास आले आपले नाते
तुझा सल्ला कसा इतक्यात वैयक्तीक मागू मी

चांगला शेर. मतलाही आवडला, फक्त पुन्हा शब्दाचा संदर्भ लागला नाही.पुन्हा का ऐवजी 'कशाला' असे एक सहज सुचले. गैरसमज नसावा.

नको मागायला दोन्ही मने एकाच जातीची
तुला सोशीक मागू की मला सोशीक मागू मी

तसे नुकतेच आकारास आले आपले नाते
तुझा सल्ला कसा इतक्यात वैयक्तीक मागू मी

फुकटचे दु:ख प्याले की गझल चाखायला मिळते
तुझ्या गुत्त्यातली का मग सुखे खर्चीक मागू मी

व्वा व्वा!

काही शेर आवडले.
मत्ला अधिक चांगला होऊ शकला असता.
विठ्ठलाचा शेर सोडला तर आपल्या स्वतःच्या शैलीसाठी प्रयत्न व्हायला हवा, असे वाटते.

विठ्ठलाचा शेर सोडला तर आपल्या स्वतःच्या शैलीसाठी प्रयत्न व्हायला हवा, असे वाटते.>>>

आता काही वेळापूर्वीच आपण ह्या विषयावर बोललो वैभव, विचार ज़रूर करावास असे माझे मत Happy

सुंदर गझल !

नको मागायला दोन्ही मने एकाच जातीची
तुला सोशीक मागू की मला सोशीक मागू मी

हा शेर समजला नाही..!! Sad

कशाला वाण पेरू अन कशाला पीक मागू मी
तुझ्या काही सरींसाठी पुन्हा का भीक मागू मी

तसे नुकतेच आकारास आले आपले नाते
तुझा सल्ला कसा इतक्यात वैयक्तीक मागू मी

तुझ्या ठरल्या नकाराची पुन्हा आमंत्रणे आली
कुठे होवू परागंदा कुठे लपणीक मागू मी

"तसे" छापून आल्याने असा मौखीक झालो मी
मिळाला तो पुरे झाला किती लौकीक मागू मी

हे फार आवडले.

'खारीक'ही नीट कळला नाही !

खोल दु:खातून आलेल्या विद्रोहाचा शांत आविष्कार करता येतो ? येतो. तुमच्या या गझलेत तो जाणवला.

Sad
तुम्ही इतक्या मायेनं, इतक्या भरजरी शब्दांनी तिची वाखाणणी करावी आणि तिने ती नेसावी इतक्या योग्यतेची माझी कविता खरंच आहे का ..माहीत नाही .......
धन्स भरतीताई