कैच्याकै आहे सगळंच.

Submitted by मुग्धमानसी on 17 July, 2014 - 01:05

कैच्याकै आहे सगळंच.

फुलं, पानं, फांद्या, रस्ते, घरं.... सगळंच कसं दमट, ओलसर...
सादळलेला एक-एक अणू, अन् प्रत्येक काच थोडी धुसर!
हवा कोंदट, माती भिजकट, वारा हलकट!
मृद्गंध अगदिच बिचारा वगैरे... दबकून लपलेला मातीच्याच श्वासांत...
अन् त्यावर वरचढ झालेला आंबट कचर्यााचा वास कुजकट!

कणाकणात... क्षणाक्षणात... बाहेर आणि आतही...
उगाच भरून राहिलाय तो केंव्हाचा.
अधांतरी तरंगतो आहे. बरसत नाही. झिरपत नाही.
सगळ्याच नियमांना कंटाळल्यासारखा... स्वत:लाच वैतागल्यासारखा...
प्रवाहीपणाचं एकूणच गृहीतक चक्क चक्क फेटाळल्यासारखा...
उदास असल्यासारखा अन् तेही मान्य असल्यासारखा!
तो साचून राहिला आहे.
स्वत:लाच कुशीत घेउन निजून राहिला आहे.
पण मला माहीत आहे... तो आतल्या आत कोसळतो आहे.
तो स्थिर नाही.

माझ्याही भिंतींतून झिरपत जाताना दिसली मला आज एक ओली सांद्रता
माझ्या छपरातून ती उतरली
आणि माझ्या भिंतींना ओलसर छेद देत ती पुढे पुढे येते आहे...
कुबट, कुरूप होत जाणारी माझ्याच घराची माझी भिंत...
आज जरा जास्तच हताश वाटली....
आणि गंजलेल्या खिळ्यावर अहेतुक लटकणारी ती फ़्रेम जरा तिरकी झाल्यासारखी दिसली...

मी घाबरलेले नाही. मी उदास देखिल नाही.
मी अस्वस्थ आहे...
ढगफुटी होणारच आहे. भिंत सुद्धा विरघळून जाणारच आहे कधीतरी.

पण गंजलेल्या खिळ्यांवर अधांतरी उगाचच लटकणार्याू या निर्जीव चेहर्यां चे काय...?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

khup chhan Happy