लय सॉरी ! (Movie Review - Lai Bhari लय भारी)

Submitted by रसप on 15 July, 2014 - 03:34

माणसाच्या अनेक जातींपैकी एक जात आहे. 'आरंभशूर'.
ह्या जातीत अनेक खेळाडू येतात. उदा. शिखर धवन. सुरुवातीला दोन-चार फटके असे मारेल की डोळ्यांचं पारणं फिटावं आणि जरा नजर बसली की गोलंदाजाला वाढदिवसाचं प्रेझेंट द्यावं इतक्या प्रेमाने स्वत:ची विकेट बहाल करून मोकळा होईल. चित्रपट आणि माणसाची नाळ तेव्हाच जुळते जेव्हा चित्रपट माणसाशी थेट संबंध जोडतात. जसं, ह्या 'आरंभशूर' जातीत अनेक चित्रपटही मोडतात. Or lets say, बहुतांश चित्रपट ह्याच जातीत येत असावेत.

हे सांगायचं कारण इतकंच की, 'लय भारी' अपेक्षेने 'निशिकांत कामत' ह्यांचा 'लय भारी' बघायला गेलो आणि 'लय सॉरी' झालो !
चित्रपटाच्या सुरुवातीला एक सुंदर गाणं, त्याचं तितकंच छान चित्रीकरण, एकंदरीतच अपेक्षा उंचावणारी निर्मितीमुल्याची झलक ह्या सगळ्यांतून जरा माहोल बनल्यासारखं वाटतं. पण नजर बसल्यावर जसा शिखर धवन विकेट फेकून देतो, तसं मध्यंतरापर्यंत 'लय भारी'ची लेव्हल 'भारी'पासून 'बरी' पर्यंत येते आणि मध्यंतरानंतर तर हाराकिरी होते. मग जाग आलेला प्रेक्षक सगळाच ठोकताळा मांडतो. अगदी सुरुवातीपासून.

lai_bhari_main.jpg

गावातलं एक मोठं प्रस्थ. प्रतापसिंह निंबाळकर (उदय टिकेकर). सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेल्या निंबाळकर व त्यांच्या घराण्याला सगळेच जण खूप मानत असतात. पण त्यांना मूल होत नसतं आणि ह्याचं शल्य पत्नी सुमित्रा देवींना (तन्वी आझमी) कायम बोचत असतं. मग एकदा वारीला जाऊन त्या विठ्ठलाला साकडं घालतात आणि विठ्ठल पावतो ! (निंबाळकर-दाभोळकर हे कमजोर यमक असल्याने वृथा संबंध जोडू नये.)
इतक्या वर्षांनी होणारं मूल आणि त्या पहिल्या मुलाला विठ्ठलाला अर्पण करायचं ? पत्नीचं हे म्हणणं न पटल्याने, गावातल्या गोरगरिबांच्या दु:खाने व्यथित होणारे प्रतापसिंह निंबाळकर स्वत:च्या पत्नीच्या आयुष्यातील महत्कठीण टप्प्यात तिला एकटं सोडून, चिडून थेट लंडनला निघून जातात आणि पुत्रजन्मानंतरच परततात ! आता देवाला वचन दिलं आहे आणि नवऱ्यालाही नाराज करायचं नाहीये. मग ह्यावर उपाय काय ? तो देव देणारच असतो. काय दिला असेल, हे समजण्याइतके चित्रपट आपले पाहून झाले असल्याने आपल्याला पहिल्या अर्ध्या तासात पुढचा अख्खा चित्रपट कळतो आणि तो प्रत्यक्षात घडत असताना बघण्यासारखं बहुतेक वेळेस काही नसल्याने आपण आपल्या मनात पुढचा चित्रपट बघत राहतो.
अपेक्षेनुसार सगळा घटनाक्रम तसाच असणे जर 'लय भारी' असेल तर आपण 'लय सॉरी' आहोत राव ! अहो, अश्या ष्टोऱ्या तर पोटातल्या पोरालाही माहित असतात आजकाल !

trailer-8.jpg

खरं तर रितेश देशमुख मला एक बरा अभिनेता वाटतो. पण इथे अनेक ठिकाणी तो थेट 'बिग बी'ची कॉपी मारायला बघतो. अरे लेकीन उसके पास जो ष्टाईल है, जो आवाज है वो तुम्हारे पास किधर है ? हांय ?
अभ्यासक्रमातून व्याकरणेत्यादी जसं बाद झालंय तसं मराठीचे उच्चार ही बाब आता माध्यमांतूनही बाद झाली आहे, त्यामुळे त्याबद्दल 'लय सॉरी' होण्यात काही अर्थ नाही.

'गुड्डी'मध्ये 'प्राण' साहेबांनी मरतुकड्या लोकांकडून केवळ ते 'हीरो' होते म्हणून मार खावा लागल्याची व्यथा बोलून दाखवली होती. साला... एखाद्याने आयुष्यभर 'जिम' लावून, खुराक घेऊन बॉडी बनवावी आणि ज्याच्या मांड्यांएव्हढे त्याचे दंड असतील अश्या एका चॉकलेटी चेहऱ्याने त्याला बुकलून काढावं; असं अशक्यप्राय हीरोपण आणखी कितीदा दैवी कृपेच्या नावावर आमच्या माथी फोडलं जाणार आहे, हे त्या विठ्ठलाला विचारलं तर तोही बहुतेक 'लय सॉरी'च म्हणेल ! त्यामुळे हे सगळं शरद केळकरने स्वीकार केलं असेलच. आपणही करू. पण तरी तो आपली छाप सोडून जातोच.

संगीतकार अजय-अतुल आणि महाराष्ट्रातली धरणं, दोघांची सद्यस्थिती एकसारखीच वाटते मला. मोजकाच साठा उरला आहे. आता कपात मावेल इतकंच उरलं असेल, तर कपात होणं तर क्रमप्राप्तच आहे ! त्यामुळे आठवड्यातून मोजून एक तास नळाने धो-धो बरसावं तसं अजय-अतुल सुरुवातीच्या 'माउली माउली' मध्ये मनसोक्त बरसतात आणि नंतर लय म्हंजे लयच सॉरी होतात !

कुणी सई ताम्हणकरचीही कॉपी मारू शकतं, असा एक झटका मला 'आदिती पोहनकर'ला पाहून मिळाला.
एका सुमार गाण्याच्या टुकार कडव्याच्या भिकार नाचापुरती जेव्हा जेनेलिया पडद्यावर झळकते, तो क्षण तिच्या आजवरच्या कारकीर्दीतला एकमेव असा क्षण असावा जेव्हा तिला पब्लिककडून शिट्ट्या मिळाल्या असाव्यात.

तन्वी आझमी ही एक माझी आवडती अभिनेत्री आहे. तिने आजच्या काळातली निरुपा रॉय व्यवस्थित रंगवली आहे.

संवादलेखनाने काही उल्लेखनीय मजा आणली, असं वाटलं नाही.

सर्वात मोठा अपेक्षाभंग दिग्दर्शक निशिकांत कामतकडून होतो. एका दृश्यापुरता सलमान खान झळकतो. त्या दृश्यात तो अभिनयशून्यतेच्या सर्व मर्यादा पार करतो. तरी ते ठीक आहे कारण त्याच्याकडून कुणालाच अभिनय करवून घेता आलाच नाहीये आजपर्यंत. पण बाकीचे ? त्याच दृश्यातल्या रितेशला पाहून असं वाटलं की दिग्दर्शक म्हणून रिकामी खुर्ची ठेवली असावी की काय ?

आवर्जून 'लय भारी' म्हणावं, अशी एकच गोष्ट जाणवली ती म्हणजे 'माउली माउली' हे गाणं. सुंदर शब्द, तितकीच सुंदर चाल व वारीचं त्याच तोडीचं चित्रीकरण. अगदी सुरुवातीला असलं तरी, चित्रपटगृहातून बाहेर आल्यावरही हेच गीत आपल्या ओठांवर असतं. पण ते तेव्हढंच !

एकुणात काय ?
तर आपली कहाणी सॉरी, गाणी सॉरी, हीरो-हीरवणी सॉरी.. च्या मायला सगळंच लय सॉरी !

रेटिंग - * १/२

http://www.ranjeetparadkar.com/2014/07/movie-review-lai-bhari.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy जमलेला नाही दिसत. मला वाटले होते सिंघम वगैरे सारखा थिएटर मधे तरी धमाल उडवेल असा असेल. ट्रेलर्स मधे रितेश बरा वाटला होता.

यात ट्रॅजिडी अशी आहे की सलमान खानचे मराठी रितेश देशमुखपेक्षा चांगले आहे. >> अरे त्याची आई मराठीच आहे ना - त्यामुळे मातृभाषा टेक्निकली मराठीच, आणि इतकी वर्षे मुंबईत राहतोय. त्यामुळे फार आश्चर्य नाही.

मराठी चित्रपटाची परिक्षणं लिहायची नसतात, बायडिफॉल्ट 'टुकार' ही एकच श्रेणी या चित्रपटांना असते, साला एक कोटीत यांच्या बापानी पिक्चर बनवलेला काय! --हॉलिवुडप्रेमी काटकर

धिरज काटकर | 17 July, 2014 - 06:16 नवीन
मराठी चित्रपटाची परिक्षणं लिहायची नसतात, बायडिफॉल्ट 'टुकार' ही एकच श्रेणी या चित्रपटांना असते, साला एक कोटीत यांच्या बापानी पिक्चर बनवलेला काय! --हॉलिवुडप्रेमी काटकर

>>
तुमची मी केवळ कीवच करू शकतो.

मराठी चित्रपटाची परिक्षणं लिहायची नसतात, बायडिफॉल्ट 'टुकार' ही एकच श्रेणी या चित्रपटांना असते, साला एक कोटीत यांच्या बापानी पिक्चर बनवलेला काय! --हॉलिवुडप्रेमी काटकर>>>>>>>>>>.. काही पण..उगाचच प्रति़क्रिया द्यायची म्हणुन टुकार बिकार......रसप प्रमाणे मी ही कीवच करते तुमची....

यात ट्रॅजिडी अशी आहे की सलमान खानचे मराठी रितेश देशमुखपेक्षा चांगले आहे. >> अरे त्याची आई मराठीच आहे ना - त्यामुळे मातृभाषा टेक्निकली मराठीच, आणि इतकी वर्षे मुंबईत राहतोय. त्यामुळे फार आश्चर्य नाही.

हो, पण मग रितेशचे काय? त्याचे मराठी का इतके वाईट?? प्रत्यक्ष आयुष्यात जाऊ द्यात, निदान चित्रपटात तरी चांगले बोलावे.

चित्रपट टुकार आहे हे वाचुन थोडे वाईट वाटले कारण रितेशने निर्माता म्हणुन एकदोन चांगले चित्रपट दिलेत.

सलमानला अभिनय वगैरे करायची गरज नाही.. तो नुसता पडद्यावर आला तरी बास आहे.. मी त्याची मैने प्यार किया पासुनची फॅन आहे.. Happy

सलमानला अभिनय वगैरे करायची गरज नाही.. तो नुसता पडद्यावर आला तरी बास आहे.. मी त्याची मैने प्यार किया पासुनची फॅन आहे.. Happy >>>> लाखो अनुमोदन साधनाताई Happy

तसही पहाणार नव्हतेच...

पण राधिका आपटे आहे ना सिनेमात? मग तिचा उल्लेख सुद्धा नाही तुमच्या परिक्षणात... का इतकी वाईट भुमिका आहे तिची.... खरं तर चांगले काम करते... दिसतेही चांगली ...

मराठी चित्रपटाची परिक्षणं लिहायची नसतात, बायडिफॉल्ट 'टुकार' ही एकच श्रेणी या चित्रपटांना असते, साला एक कोटीत यांच्या बापानी पिक्चर बनवलेला काय! --हॉलिवुडप्रेमी काटकर
>>>>>

एक कोटीत बनणार्‍या मराठी चित्रपटासाठी जाहीरातींचे बजेट फारसे नसल्याने त्याच्या परीक्षणावर अश्या वादग्रस्त टीआरपी पोस्टची गरज असतेच.
याबद्दल आपले आभार Happy

मो की मी....

राधिका आपटेला फारसं काम नाहीच. मला ती मरतुकडी वाटली. जितकं काम आहे तितकं छान केलं आहे, अगदी शरद केळकरसोबतचं एक 'गरम' गाणंही ! Happy
विशेष उल्लेखनीय असं काही वाटलं नाही मात्र.

अगदी सह्रद केळकरसोबतचं एक 'गरम' गाणंही ! Happy >>> हो हो काय मस्त गाणे होते ते आणि तिने घातलेल्या साड्याही Happy . गाणे ऐकु, राधिका आपटे ला बघू की साड्या बघू असे झाले होते मला Happy

रितेश देशमुखचं मराठी अत्यंत वाईट आहे पण. मेहनत घ्यायची गरज आहे त्याला खूप. जुयेरेगात पण आलेला तेव्हा न चं ण आणि ण चं न Sad

न चं ण आणि ण चं न >>> अरे, हे कॉमन आहे त्या भागात... विलासराव देखमुखही तसंच बोलायचे. त्या भागातले आमचे एक फॅमिली-फ्रेण्ड आहेत, ते देखील असंच बोलतात.

अरे, हे कॉमन आहे त्या भागात... विलासराव देखमुखही तसंच बोलायचे. त्या भागातले आमचे एक फॅमिली-फ्रेण्ड आहेत, ते देखील असंच बोलतात.

ओके. लातुरी मराठी असे असते होय.... चला अजुन एका खुबी कळली मराठी भाषेची.

>>चित्रपट कसा का असेना.. घरच्यांसोबत चित्रपट बघण्याची मजा वेगळीच असते. त्यामुळे तिकिटे काढली असतील तर जा
मोठा ग्रुप असेल तर चित्रपट जितका जास्त टुक्कार तितकी जास्त मजा येते

रितेश आणि सलमानचा तो "भाऊ"वाला शॉट ट्रेलर मध्ये बघितला तेंव्हाच हा चित्रपट न बघण्याचे ठरले होते.... रिव्ह्यू वाचून त्यावर शिक्कामोर्तब झाले इतकेच!

हो हो काय मस्त गाणे होते ते आणि तिने घातलेल्या साड्याही स्मित . गाणे ऐकु, राधिका आपटे ला बघू की साड्या बघू असे झाले होते मला >>>>>>>>>>> अनुमोदन. सई,अम्रुता खा. , मानसी नाईक अश्यांना चीप नाचताना बघण्यापेक्षा राधिकाला बघणं सुखद होतं Happy
मला लई भारी आवडला लय भारी. फक्त रीतेश साठी. धमाल केलीय त्याने माऊली बनून. तसहि रीतेशला मराठीत पाहून फार बरं वाटत होतं.
वारीचं गाणं बघून कसलं भरून येतं Happy

लय भारीचं झी टीव्ही जमके ब्रॅण्डिंग करतंय. अमिताभ काय, मराठी कलाकार काय सगळे शुभेच्छा देण्यासाठी आतुर झालेत. काल फू बाई फूच्या ऐवजी ‌लय भारीच्या टीमची मुलाखत होती. नाइन एक्स झकासवरही याच गाण्यांचा रतिब आहे.

खखोदेजा, पण लोकसत्तात आलय की महाराष्ट्राबाहेर पण लय भारी बिझीनेस झाला. हैद्राबाद, बन्गळुरु इथे पण उत्तम बिझीनेस करतोय म्हणे.

लय भारीचं झी टीव्ही जमके ब्रॅण्डिंग करतंय>> ते करतातच , दुनियादारि च्या वेळेला असच डोक पिकवलेले..

प्राजक्ता,
दुनियादारि च्या वेळेला असच डोक पिकवलेले>>
आता तर दुनियादारी रतिब घातल्यासारखा दर शनिवारी, रविवारी आणि कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळेला सुरू असतो. आता डोक्यात जायला लागलाय हा सिनेमा..

चित्रपट परिक्षण ठिकच आहे.
पण मला एक कळले नाही, 'तंटा नाय तर घंटा नाय' म्हणजे काय?
मला ते तर अश्लिल वाटले.

मी चित्रपट पाहीलेला नाही तरीही असे वाटते की,

तंटा म्हणजे भांडण, वादावादी. घंटा म्हणजे देवळातली घंटा. अश्लिल अर्थ सांगायलाच पाहीजे असे नाही.

तंटा नाय तर घंटा नाय म्हणजे नायक तंटा करतो अन म्हणतो की तंटा केला नाही तर घंटा (उद्दात विचाराने ) नमस्कार चमत्कार नाही. आदर नाही आदी. असे नायकाला अभिप्रेत आहे काय?

असे असेल तर नायक तंटा करण्यास प्रवृत्त होतो आहे. सामोपचार, समजूत, कायद्याची भाषा आदी नायकाला मान्य नाही काय?

किंवा केवळ यमक जुळते अन थोडेसे पुरोगामी वाक्य आहे म्हणून टॅग केले आहे?

मला तर ते चुकीचे वाटते.

तर या उद्गाराचे चार आवृत्या होतातः
१) तंटा नाय तर घंटा नाय (वर्जीनल, रितेश बोलतो ते)
२) तंटा नाय तर घंटा हाय
३) तंटा हाय तर घंटा हाय
४) तंटा हाय तर घंटा नाय
५) तंटा हाय तर घंटा हाय

आपली मते काय आहेत?

दुसरे असे की, झी टिव्ही वर रितेश व राधिका आपटे यांची मुलाखत निलेश साबळे यांनी घेतलेली बघीतली. त्यात राधिका मराठीसुद्धा धड बोलत नव्हती. सारखी अ अ करायची. मुलाखतीत असे बोलणे शोभत नाही.

घंटा नाय याचा एक अर्थ "काहीही नाही " होतो हल्ली , ते लॉजिकल वाटत थोड , म्हणजे भांडल्याशिवाय काहीही मिळत नाही .

नॉन सेन्स डायलॉग आहे तो. यमकायमकी केली आहे नुसती..

रावडी राठोड मध्ये 'चिंताता चिता चिता' का काय आहे... त्याचा तो काही तरी अर्थ सांगतो.. तेही असंच बाष्कळ आहे.

" तंटा नाय तर घंटा नाय " हे सांगली कोल्हापुरातल्या पब्लिकला तरी नक्की समजलय . अगदी हिट डायलॉग झालाय तो . भावार्थ Crying baby gets the milk च्या जवळ जाणारा Wink

Pages