लक्ष्मीबाई धुरंधर आणि उकडलेली अंडी - भाग २

Submitted by दिनेश. on 2 July, 2014 - 08:07

तर मी चक्क उकडलेली अंडी का इथे मांडलीत ? मी अंडी खात नाही.. ( त्याच्यामागे मोठा इतिहास आहे.
मी ५ वर्षांचा असताना माझे एका कोंबडीवर प्रेम बसले होते. पण तिची योजना ज्या कारणासाठी झाली
होती, त्याच कारणासाठी घरातच तिची कत्तल झाली.. मेल्यावरही तिच्या पोटात अंडे सापडले. त्या तिच्या
त्यागाने मी फारच इमोशनल झालो आणि त्यानंतर अंडेच काय, नॉन व्हेज खाणेही सोडले... मला माहीत
आहे माझ्या या प्रेमकहाणीला सर्व हसणार आहात.... दुनिया ऐसीही होती है... आवरा ! )

या पुस्तकाच्या काळात, जेवणामधे काहीतरी वेगळे करावे असे खानसाम्यांना वाटत असे. एका राज्याच्या
दरबारी खानसाम्याने ताटातील सर्व पदार्थ साखरेपासून केले होते. तर एकाने पिस्त्यांना डाळीसारखे कापून
त्याची डाळ व बदामांना तांदळासारखे कापून त्याचा पुलाव केला होता.
आणखी एकाने शिजवलेल्या भाताचा प्रत्येक दाणा अर्धा केशराच्या पाण्याने रंगवून मोत्या पोवळ्याचा पुलाव
केला होता.

ही परंपरा ओगलेआज्जींनी देखील पाळली. त्यांनी फसवे डिंकाचे लाडू ( कणीक व पोहे वापरून ) फसवे अळीवाचे
लाडू ( गाजराचा किस वापरून ) लिहिले आहेत.

या पुस्तकातही असे काही पदार्थ होते. कृत्रिम ऑमलेट आहे, ते उडदापासून बनवलेले होते. कृत्रिम कणंग
नावाचा एक पदार्थ होता. शिजलेल्या भातात साखर घालून ती जिरवायची. मग लाल चवळी, शिजवून
वाटायची. त्याची पारी करून आत साखरभात भरायचा. त्याला लांबट आकार द्यायचा. आणि ते वाफवायचे.

तशी हि अंडी देखील फसवी आहेत. ( माझे तिच्यावरचे प्रेम फारच सच्चे होते बरं ! )

याची कृती त्या पुस्तकातच आहे. कृत्रिम कवठें या नावाने.

अंडी फोडून त्यातला बलक काढून ती रिकामी करायची. मग पिठाच्या आधाराने उभी ठेवायची.
चायना ग्रास कापून दूधात शिजवायचे. त्यात साखर घालायची. मग ती अंडी त्या मिश्रणाने अर्धी भरायची.
मग माव्यात केशर घालून त्याचा गोळा करायचा. तो गोळाही त्या अंड्यात टाकायचा. मग परत चायना ग्रास
शिजवून त्यात टाकायचे. ते सेट झाले कि कवच फोडून आतले अंडे मोकळे करायचे, आणि उभे कापायचे.

हा पदार्थ करून बघायची मला फार ईच्छा होती पण माझे काही प्रॅक्टीकल प्रॉब्लेम्स होते. अंडी फोडल्यावर
माव्याचा गोळा घालण्यासाठी मोठे छिद्र करावे लागणार मग तेवढ्या भागाचा गोलाकार परत कसा आणायचा.
आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्या बलकाचे मी काय करू ?

परवा बाजारात किंडर जॉय चॉकलेट्स बघितली आणि माझे काम फारच सोपे झाले. फक्त द्रव ओतताना
तो थोडा थंड करून ओतावा लागला. ( एका चॉकलेट शेलची वाट लावली. )

तर अशा तर्‍हेने मी माझ्या पहिल्या प्रेमाशी एकनिष्ठ राहिलो.

जेवणावर राहून गेलेली स्वीट डीश... स्वीकार करावी.

माझ्या पाककलेतील दुसर्‍या गुरू लक्ष्मीबाई धुरंधरांना साष्टांग नमस्कार !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा तुमच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या पाककृतीमधील सगळ्यात कल्पक आणि वेगळा पदार्थ. मला ही कल्पना फार सुरेख वाटली. मला बनवता नाही येणार म्हणून फोटो बघूनच आनंद घेत आहे.

आभार अनन्या... १९१० सालचे प्रकाशन !
पण ही आवृत्ती जरा सुधारीत वाटतेय. काही भाग संपादीत केल्यासारखा वाटतोय. पण हे मी नक्की परत परत वाचणार. मोजकीच पाने आहेत तिथे आणि वजनेही ग्रॅम्स मधे आहेत. अर्थात हे आवश्यकच होते म्हणा.

_/\_

काय इंटरेस्टिंग आहे सगळ. अंडी छानच दिसतायत. कामाल आहे तुमच्या कौशल्याची आणि कल्पना शक्तीची ही.

एवढ्या नजाकतीने बनवुन वाढलेली ही डिश खाविशी वाटली तरी आधी पहात रहावी अशीच झालीय. कुणी विचार पण केला नसेल की या पद्धतीने एखादा तोन्पासु पदार्थ बनु शकतो.:स्मित:

आमचे करणे राहीले दूर, पण कौतुकालाही शब्द अपुरे आहेत.:स्मित:

सह्ही दिसतायत Happy

इस्टर च्या वेळेस चॉकलेट एग्ज बनवण्यासाठी प्लॅस्टिक / सिलीकॉन चे मोल्ड्स मिळतात ते वापरता येतिल यासाठी Happy

अरे देवा. हे तर पकडने चुहा खोदा पहाड असे झाले.

पण खर सांगु, प्र चं ड अफलातुन झाली आहेत ती अंडी. पुढच्या गटगला स्विट डीश तुमच्याकडुन. शाकाहारी अंड्यांची Wink

___________/\_____________

दिनेशदा... तुम्हाला साष्टांग!! Happy
अंडी अगदी हुबेहुब जमलीत. केवढी ती कल्पकता! स्वयंपाकघरातल्या कित्ती रंजक गोष्टीही सांगितल्या!

Pages