विषय क्रमांक २ - "ती" दोघं

Submitted by तुमचा अभिषेक on 29 June, 2014 - 02:47

महाबळेश्वर प्राईड हॉटेलच्या काऊंटरपाशी घुटमळताना ती मला पहिल्यांदा दिसली. तेव्हा तिचा "तो" तिच्या बरोबर नव्हता. जर हि आमची पहिलीच भेट नसती तर मला नक्कीच आश्चर्य वाटले असते की तिला एकटीला सोडून तो गेलाच कसा. पण त्या क्षणी तरी ती एकटीच तिथे चुळबुळ करत उभी होती.

हो, शब्दश: चुळबूळ. खाद्यांवरून आलेल्या ओढणीशी चुळबूळ. पाठीमागून कंबरेपर्यंत आलेल्या केसांशी चुळबूळ. कधी कानाला लटकलेल्या झुंबराशी चाळा, तर कधी हातामधल्या पर्सची उघडझाप. तिथे काहीच न करता उभे राहताना येणारा बावरलेपणा सावरण्याच्या नादात तिची ही धांदल उडत होती. पर्स हाताळण्याची पद्धतही अशी की जणू पहिल्यांदाच पर्स वापरत असावी. किमान ती नवीन खरेदी वा तिच्या नेहमीच्या वापरापेक्षा महागडी तरी असावी. कोणाच्या नजरेत आपले असे एकटे उभे राहणे भरू नये कदाचित यासाठी हा सारा खटाटोप होता. जेणेकरून कोणाची क्षणभर नजर पडल्यास, काहीतरी करतेय बापुडी म्हणत पुढे निघून जाईल. खरे तर एखाद्या नजरेला आकर्षक भासावे असे फारसे काही तिच्यात नसताना तिला हे करण्याची गरज नव्हती. पण मी मात्र एकटक तिथेच बघत असल्याने तिचे हे प्रयत्न पकडले गेले होते. पण मी का एवढे तिचे निरीक्षण करत होतो असा प्रश्न कोणी मला विचारला असता तर मात्र मी देखील पकडलो गेलो असतो. सुदैवाने हा प्रश्न विचारायचा हक्क राखणारी त्यावेळी माझ्या खांद्यावर डोके ठेऊन शांत झोप घेत होती.

बावळट.., तिच्यावर मी पहिल्याच नजरेत मारलेला पहिला शिक्का !

सुट्ट्यांचा आनंद लुटायला म्हणून महाबळेश्वरला आलेल्या उच्चभ्रू लोकांच्या गर्दीत तिचे वेगळेपण जाणवत होते. आणि कदाचित हेच एकमात्र कारण असावे जे माझी नजर तिच्यावर खिळली होती. काही लफडे तर नसावे ना, एक क्षण मनात विचार आला आणि एकवार तिच्या गळ्यातील काळ्या मण्यांची माळ पाहात खात्री करून घेतली. नाजूक आणि साधीशी. तिच्या अंगकाठीला शोभेल अशीच. नक्कीच मधुचंद्राच्या सफरीला आमच्या जोडीने आणखी एक सवारी या हॉटेलमध्ये दाखल झाली होती. अजूनही तिचा तो कुठे मला दिसत नव्हता. पण इतक्यात आमच्या नावाचा पुकारा झाला आणि मी दोन चुटक्या वाजवत हातातल्या सिगारेटची राख आणि डोक्यातले तिचे विचार झटकून सामान घ्यायला उठलो.

पण तेवढ्यापुरतेच..

लिफ्टचा पारदर्शी पिंजरा वर सरकतानाही माझ्या डोळ्य़ासमोर तीच होती. राहून राहून आठवत होती ती शाळेतली नम्रता साळसकर. त्या काळी मला कोण्या एका मुलीकडून राखी बांधून घ्यायची शिक्षा झाली असती तर जिच्यासमोर मी खुशाल हात धरला असता, ती नम्रता साळसकर ... दिसायला अगदीच सुमार नव्हती. नाकीडोळी नीटस म्हणावी अशी. पण वयात येतानाच्या त्या वयातही, तिच्यात आकर्षक वाटावे असे माझ्या नजरेला कधीच काही आढळले नव्हते. इतरांसारखाच शाळेचा गणवेष, पण तो पेहराव म्हणून परिधान करण्यातील उदासीनता तिच्या देहबोलीत उठून दिसायची. स्वताच्या उचापतींना स्मार्टनेस समजायचे ते वय, साधेपणाला बावळटपणा समजायचे ते वय. अश्या मुलीबरोबर पुढे जाऊन कोण लग्न करेल, असाही प्रश्न तेव्हा पडायचा.

..... पण "ती", हि नक्कीच नव्हती. पण अशीच होती. शाळेतील नम्रताच्या दोन वेण्या होत्या तर हिची एकच कंबरेपर्यंत पोहोचणारी शेपटी. अगदी आजही माझे विचार फारसे काही बदलले नव्हते. याचमुळे कदाचित तिचा "तो" कसा आहे हे बघण्याची उत्सुकता तिचा विचार पुन्हा पुन्हा डोक्यात खेळवत होती.

जेमतेम दिड-दोन तासांची झोप आणि प्रवासाचा थकवा जातो न जातो तोच दरवाज्याची बेल खणखणली. टूरमध्ये ठरल्याप्रमाणे आमचा मार्गदर्शक कम ड्रायव्हर आम्हाला नेण्यास हजर होता. त्याने दिलेल्या पंधरा मिनिटाच्या वेळेत सारे आवरून आम्ही हॉटेलच्या गेटपाशी हजर झालो. तिथे आम्हाला फिरवण्यासाठी एक कार अगोदरच उभी होती, मात्र ठरल्याप्रमाणे ती आम्हाला आणखी एका जोडप्याबरोबर शेअर करायची होती. याची आधीच कल्पना असली तरी यामुळे आता बायकोचा रोमॅंटीक मूड खराब होऊ नये म्हणत तो सावरण्यासाठी मी हॉटेलच्या आवारातच तिचे फोटोसेशन सुरू केले. या हनीमून ट्रॅव्हलचा एकेक क्षण अविस्मरणीय करायची धडपड कॅमेरा सरसावत सुरू झाली. तसेही आमच्या बरोबरचे जोडपे यायचे अजून बाकी होते. काही फोटो झाले, अन इतक्यात पुन्हा माझा फोकस शिफ्ट होत तिच्यावर स्थिरावला. फार काही मोठा योगायोग नव्हता, पण असेही घडू शकते याची कल्पना केली नसल्याने तसे वाटले खरे. आमच्याबरोबर जोडीदार म्हणून समोरून येणारे जोडपे तिचेच होते. कपड्यांचा निव्वळ रंग बदलला होता. मात्र स्टाईल तीच तशीच, सलवार कुर्ता वगैरे. सोबत तिचा "तो" देखील होता ... एकत्र चालतानाही दोघांमधील एका हाताचे अपेक्षित अंतर त्यांच्यातील नाते आणि त्या नात्याचा स्वभाव उलगडण्यास पुरेसे होते.

तिच्यासारखाच सडपातळ बांधा, मात्र उंचीला तिच्या दिडपट. राखाडी रंगाची विजार आणि त्यावर बाहेरच सोडलेले पांढरे शर्ट. जे लांबून पाहता एखादा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता सदरा चढवून आल्यासारखे वाटावे. मात्र त्याला साजेसा रुबाब कुठेही दिसत नव्हता. दोन अनाकर्षक व्यक्तीमत्वे मिळून कधीही एक आकर्षक जोडी बनवू शकत नाही, मग त्यांची बेरीज करा वा गुणाकार .. त्यांची जोडी पाहता मनात आलेला हा पहिलाच विचार ..

दोघांत एकच गाडी शेअर करायची असल्याने आम्हा चौघातील एकाला पुढे बसावे लागणार होते. कोणी काही बोला ठरवायच्या आधीच तो त्या दोघांमधील एका हाताचे अंतर कायम ठेवत स्वताहून पुढच्या सीटवर जाऊन बसला. त्यानेच पुढाकार घेत एकमेकांची जुजबी ओळख करून घेतली आणि मग ड्रायव्हरकडे मोर्चा वळवला. त्याचा बोलका स्वभाव पाहता, ड्रायव्हरशी काय कसा संवाद साधायचा हा मला नेहमी पडणारा प्रश्न माझ्यापुरता तरी सुटला होता.

गाडी महाबळेश्वरच्या रस्त्यांवरून धावायला लागली तसे खिडकीतून थंड वारे आत झेपावू लागले. आणि अचानक तिने गायला सुरुवात केली..
मैने कहा फूलों से, हसो तो वो खिलखिलाके हंस दिये ... आवाज छानच होता, पण गोडव्यापेक्षा त्यातील प्रामाणिकपणा जास्त भावला. तरीही सवयीप्रमाणे बायकोला कोपरखळी मारत म्हणालो, आता काय बाबा आपल्याला गाडीत म्युजिक सिस्टीम नसला तरी चालेल. पुटपुटल्यासारखेच ते शब्द, कसे तिच्या कानावर पडले देव जाणे. पण तिला मात्र हि मस्करी भावली नसावी. गाणे थांबवत ती वरवर हसली. ते ओशाळल्याचे हसू होते की संकोचातून आलेले, काही समजले नाही. पण पुढचा प्रवासभर तिचे न गाणे मनाला थोडीशी चुटपुट लाऊन गेले.

प्रतापगडावर स्वारी करायची म्हणजे सोबतीला तिथल्याच मातीतील माहितगार हवा, म्हणून आम्ही उभयतांनी दोघांत मिळून एकच गाईड पकडला. ते दोघे त्या गाईडने दिलेली माहिती इमानईतबारे ऐकत होते, तर मी मात्र तो माहितीपर कार्यक्रम संपताच त्या गाईडच्याच हातात कॅमेरा थोपवत आम्हा दोघांचे फोटो टिपायला लावत होतो. असे काही वेळा घडल्यावर लक्षात आले की त्या दोघांनी अजून एकही फोटो काढला नव्हता. ना स्वताचा, ना महाबळेश्वरचा. मगाशी गाडीत मी त्याला फोनवर बोलताना पाहिले होते. मोबाईलच्या त्या साध्याश्या मॉडेलमध्ये चांगला कॅमेरा असण्याची शक्यता कमीच होती. म्हणून मग मीच त्यांना एखादा फोटो माझ्या कॅमेर्‍याने काढतो म्हणून आग्रह केला. आधी त्यांनी नम्रपणे आढेवेढे घेतले. पण त्यांचे ईतिहासप्रेम पाहता, महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने फोटो काढून घेण्याच्या प्रस्तावाला ते नकार देऊ शकणार नाही, हा माझा अंदाज बरोबर निघाला.

परतताना मी त्यांच्याकडे फोटो पाठवायसाठी म्हणून मेल आयडीची विचारणा केली. तर तो त्या दोघांकडेही नव्हता. २०१० साल होते ते. मेल आयडी नाही म्हणजे अर्थातच फेसबूक-ऑर्कुट सारख्या कोणत्या सोशल साईटसवरही नसावेत. तरीच त्यांना छायाचित्रणाचा फारसा उत्साह नसावा, असाही एक विचार मनात आला. फोटो काढून ते शेअर तरी कोणाशी आणि कसे करणार होते.

गडाच्या पायथ्याशी गाईडला निरोप देण्याआधी मला बाजूला घेत तो म्हणाला, आपल्याला त्यांनी एवढी छान माहिती दिली, एवढे चांगले वागले, शंभर-शंभर रुपये जास्तीचे देऊया का ..
साधासाच, पण योग्य विचार. आमचेही कैक फोटो त्यांनी मोठ्या आवडीने काढले होते. पण हॉटेलात कशीही सर्विस मिळाली तरी वेटरसाठी न चुकता पाच-दहा रुपये टिप ठेवणार्‍या मला हे असे स्वताहून तरी कधीच सुचले नसते.

रात्री जेवण झाल्यावर हॉटेलच्याच जिमवर आम्ही एकत्र कॅरम खेळायचा बेत आखला. त्यांची जोडी विरुद्ध आमची जोडी. त्या दोघांचा एकंदरीत खेळ पाहता मी डाव्या हाताने खेळलो तरी आम्हीच जिंकू हे मी पहिल्याच डावाला समजून चुकलो. आणि तसेच होत होते. सलग तीन डाव हरल्यावरही तो शांत होता मात्र तिची चलबिचल सुरू झाली. तिला स्वताला या खेळातील हारजीतीने फरक पडत नसावा, पण कदाचित त्याला हरताना बघणे तिला मंजूर नव्हते. आणि ईथेही माझा अंदाज खरा ठरला. जेव्हा मी पुढचा डाव कोणालाही संशय येऊ नये अश्या बेमालूमपणे हरलो, तेव्हा तिच्या चेहर्‍यावरचा आनंद अवर्णनीय होता. थोडा दुसर्‍याच्या मनाचा विचार करायला आता मी देखील शिकलो होतो.

महाबळेश्वरमधील आमचा दुसरा दिवस उजाडला.
आदली रात्र, त्यांच्या मीलनाची पहिली रात्र. काय कशी गेली हे त्यांनाच ठाऊक. मात्र जे काही घडले, त्यात त्याने तिला नक्कीच सावरून घेतले असावे, हे दोघांमध्ये उरलेल्या वीतभर अंतरावरून जाणवत होते. आज माझी पाळी म्हणत मी स्वताहून पुढे होत ड्रायव्हरबरोबर बसलो. ते पाहताच आज आपण सोबत प्रवास करणार या कल्पनेनेच तिचा चेहरा खुलून आला. काल अडकलेली गाण्यांची रेकॉर्ड पुन्हा सुरू झाली. साध्या मुलींची स्वप्नेही किती साधी असतात, आणि ती पुर्ण झाल्यावर त्यांना किती कमालीचा आनंद होतो याचा प्रत्यय मला येत होता.

उनसे मिली नजर के मेरे, होश उड गये .. ती नुसते आवाज गोड होता म्हणून गात नव्हती, तर व्यक्त व्हायला गात होती.

त्यादिवशी महाबळेश्वरचे सौंदर्य आम्ही त्यांच्या पद्धतीने पाहिले. कॅमेरा शक्यतो दूरच ठेवला. जे काही विलोभनीय दिसत होते ते केवळ नजरेनेच टिपत होतो. जवळ येणे हे केवळ फोटोनिमित्त पोज देण्यासाठी नसल्याने स्पर्शातील गोडी जाणवत होती.

मध्ये एका ठिकाणी आम्ही चहापाण्याचा, अंह स्ट्रॉबेरी क्रीम आईसक्रीमचा ब्रेक घेतला. एकमेकांची प्रायव्हसी जपत वेगवेगळ्या टेबलवर बसलो. मात्र निघताना जेव्हा पैसे चुकते करायला म्हणून उठलो तेव्हा त्यांनी आमचे बिल स्वत:बरोबरच चुकवल्याचे समजले. हि त्याची दानशूरता, औपचारीकता कि आम्ही काढलेल्या दोनचार फोटोंची परतफेड, याचा आता मी फक्त अंदाजच लावू शकत होतो.

एखादी गोष्ट योग्य की अयोग्य असा विचार करायची बहुधा त्याला सवय नसावी. आपण लोकांशी चांगलेपणाने वागलो की लोकंही चांगले वागतात हा एवढा साधा हिशोब असावा. तिचे म्हणाल तर, आपल्या नजीकच्या लोकांचे नेहमीच चांगले व्हावे हेच मागणे असायचे. दोघांनाही फक्त भावनांचे व्यवहार करता येत होते.

हॉटेलच्या परतीच्या प्रवासात गाडीमध्ये आम्ही सारेच दमूनभागून निपचित पडलो होतो. अन अचानक कानावर पुन्हा तेच मंजूळ सूर येऊ लागले. ये राते, ये मौसम, नदी का किनारा.. ये चंचल हवा.. वळून पाहिले तर ती गुणगुणत होती आणि त्याची पार समाधी लागली होती. दोघांच्या त्या स्थितीला भंग न करता मी मान पुढे वळवून घेतली. आता ड्रायव्हरसमोरील आरश्यातून मला फक्त त्याचा चेहरा दिसत होता आणि कानांना तिचा आवाज ऐकू येत होता. गाण्याचा कान माझ्याकडे फारसा नाहीये पण दिवसभराच्या थकावटीनंतर थकल्या भागल्या मिटलेल्या त्याच्या चेहर्‍यावरची तृप्ती तिच्या आवाजातील गोडवा पोहोचवत होती. पण लगेचच मी सावध झालो. तिचे ते गाणे खास त्याच्यासाठीच होते. ते ऐकण्याचा प्रयत्नही करणे एक व्यभिचार झाला असता याची जाणीव होताच मी लागलीच माझे कान मिटून घेतले. पुढे हॉटेल कधी आले समजलेच नाही.

त्या रात्री मी पहिल्यापासूनच हरायचे असा विचार करत त्यांना पुन्हा कॅरमचे आव्हान दिले. मात्र यावेळी त्यांनी हसूनच नकार दिला. दुसर्‍या दिवशी आम्हाला निघायचे आहे असे सांगत धक्काच दिला. त्यांचे पॅकेज फक्त दोन दिवस दोन रात्रींचे होते. याउलट आम्ही तीन दिवसांच्या पॅकेजवर आणखी एक दिवस वाढवून घेतला होता. आम्हाला आमच्या उर्वरीत हनीमूनसाठी शुभेच्छा देताना त्यांच्या चेहर्‍यावर ना इर्ष्या दिसत होती ना खंत. त्यांना जे अनुभवायचे होते ते या दोन दिवसात ते भरभरून जगले होते.

मला अखेरचे शुभरात्री बोलताना त्याने हलकेच एक रंगीत पुडके माझ्या हातात सरकावले. मी काही बोलायचा प्रयत्न करणार, ईतक्यात तोच म्हणाला, "राहू द्या, काल कॅरममध्ये जिंकल्याचे बक्षीस समजा."
पण शेवटचा डाव तर तुम्ही जिंकलात, असे मी म्हणताच त्याने माझा हात हलकेच दाबत असा काही खळखळून हसला की मी समजून गेलो, ते बक्षीस जिंकलेल्या नाही तर त्या शेवटच्या हरलेल्या डावाचे होते. एक शेवटचे मी तिच्याकडे पाहिले. ते पुडके आम्हा दोघांतर्फे आहे असेच भाव त्या चेहर्‍यावर होते.

रूमवर गेल्यावर आठवले, मी ना त्यांचा पत्ता घेतला होता ना फोन नंबर. मेल आयडी तर त्यांच्याकडे नव्हताच. आमच्या कॅमेर्‍यात टिपलेला त्यांचा फोटो घेउन मुंबईभर फिरूनही ते सापडणार नव्हते. त्यांचे नाव जे आज लक्षात होते ते चार दिवसांनी कदाचित विसरले जाणार होते. अगदी आताही त्यांचा पत्ता घ्यायचे ठरवल्यास ते हॉटेलमध्ये नेमक्या कुठल्या रूमवर उतरले आहेत, याचाही आम्हाला पत्ता नव्हता. उद्या आम्ही गाढ झोपेत असताना ते मुंबईच्या दिशेने निघणार होते, आणि त्यानंतर कदाचित आयुष्यात पुन्हा कधी भेट होणार नव्हती. एक क्षण वाटले आताच रिसेप्शन काऊंटरवरून त्यांचा रूम नंबर घेऊन त्यांना गाठावे. पण याची खरेच गरज आहे का हे आधी स्वताच्या मनाला पटवून द्यायचे ठरवले आणि ते नाही जमले. काही ओळखी, काही आठवणी, तेवढ्यापुरताच ठेवल्यास त्यांचा गोडवा कायम राहतो असा विचार केला आणि मनाला हा युक्तीवाद चक्क पटलाही.

बरेचदा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल खूप सारी माहीती राखून असतो. त्या जीवावर आपण तिला चांगलेच ओळखत असल्याचा दावा करतो. तर कधी काही काळाच्या सहवासानंतर आपल्याला एखाद्याचा स्वभाव आणि सवयी समजून जातात. अश्यावेळी ते कुठल्या प्रसंगात कसे वागणार याचाही आपण बरोबर अंदाज लावतो. पण जोपर्यंत ती व्यक्ती ‘तशी का वागते’ यामागचे कारण आपल्याला नाही ओळखता येत, तो पर्यंत ती व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचलेलीच नसते. प्रत्येक व्यक्तीला आपण आपलेच निकष लाऊन जोखत असतो. पण गरज असते तिच्या विचारांशी एकरूप होण्याची. आणि एकदा का असे झाले तर त्यानंतर ती आपसूकच उलगडायला सुरुवात होते. मग यासाठी दोन दिवसही पुरतात.

आजही मी आमच्या मधुचंद्राचा अल्बम उघडून बसतो तेव्हा त्या चार-दोनशे फोटोंमध्ये त्यांच्या एखाददुसर्‍या फोटोवर माझी नजर अडकते. नजरेत एकच प्रश्न येतो. कुठे असतील ते आज. पण त्या आधीच मनाने उत्तर दिलेले असते. जिथेही असतील नक्कीच सुखाने संसार करत असतील. जर ईथे आपला संसार सुखाचा चालू आहे तर त्यांच्यामध्ये काही बेबनाव येणे शक्यच नाही. एखादे नाते टिकवण्यासाठी प्रेमापेक्षाही वरचढ असतो तो चांगुलपणा, साधेपणा, आणि जमल्यास समजूतदारपणा. जो एकामध्ये असेल तरी नाते सहज टिकते. ईथे तर त्या दोघांमध्ये तो ठासून भरला होता.

त्या जोडीत आकर्षक असे काहीही नव्हते या माझ्या मतावर मी आजही ठाम आहे. फरक इतकाच, हल्ली मी साधेपणाला बावळटपणा समजत नाही. तर बरेचदा बावळटपणालाही साधेपणा म्हणत जपायचा प्रयत्न करतो.

अरे हो, आणि एक सांगायचे राहिलेच, आमच्या शाळेतल्या नम्रताचे पुढे काय झाले असेल असा प्रश्नही हल्ली मला पडत नाही ..

- तुमचा अभिषेक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिला लेख शब्दमर्यादेचा गोंधळ घालत २ के च्या जागी ३ के शब्दांत लिहिला.
अर्थातच तो नियमानुसार स्पर्धेतून बाद होत असल्याने मग हे लिहिणे झाले.

याबाबत आशिका यांचे धन्यवाद, Happy
त्यांनी वेळीच मला विपु करत शब्दमर्यादेतील गफलतीबद्दल कळवले. त्यामुळे अंतिम मुदतीच्या आधी नवे काही लिहिता आले.

तुम्ही प रिक्षेस नेहमी पूर्ण अभ्यास करुन जात असाल ना ? काहीच ऑप्शनला न टाकता म्हणूनच लगोलग़ दुसरा लेख सादर केलात तोही असा जबरी!
माणसातला साधेपणणा दाख़वणारा सहजसुंदर लेख़

सुपर ...
प्रामाणिक तर आहेच .
बर्याचदा अशा माणसांशी गाठ पडताना माझं मन तर सुन्न होऊन जातं . (या विचित्र दुनियेशी ते कसं निभावून नेतील ...असं काही वाटायला लागतं.) आणि बर्याचदा आपल्याला स्वतःच्या चांगुलपणाविषयी असलेला ( तथाकथित ) अभिमानही गळून पडतो . Happy

हा लेख अधिक आवडला.

(पहिला लेख वाचल्यावर २००० मध्ये एवढे कसे काय लिहिले असा प्र्श्न पडला होता!!!! :फिदी:)

धन्यवाद सर्व प्रतिसाद Happy

निशदे निखिल__ कुठेही फापटपसारा न वाढू देता बरोब्बर हवा तो इफेक्ट वाचकाच्या मनात केलास. >>>>>>>> थँक्स टू दोन हजार शब्दमर्यादा Wink

फरक इतकाच, हल्ली मी साधेपणाला बावळटपणा समजत नाही. तर बरेचदा बावळटपणालाही साधेपणा म्हणत जपायचा प्रयत्न करतो.>>>>> प्रचंड अनुमोदन! Happy

मस्तच...आवडलं.

एक कोकाकोका त्या पुडक्यात काय होतं मग Wink (अरे देवा कुणालाच कसा हा प्रश्न पडला नाही :P)

<एखादे नाते टिकवण्यासाठी प्रेमापेक्षाही वरचढ असतो तो चांगुलपणा, साधेपणा, आणि जमल्यास समजूतदारपणा. जो एकामध्ये असेल तरी नाते सहज टिकते.> क्या बात है! सहज, सुंदर आणि नि़खळ लिखाण म्हणजे अजुन काय असते...खुप आवडले.

Pages