जोडप्यांसाठी : परस्पर-नातेसंबंधातील लाल बावटे (सार्वजनिक धागा)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 5 June, 2014 - 07:35

वर्तमानपत्रांमध्ये किंवा टीव्हीवर आपण संशयापोटी, भांडणातून किंवा अन्य काही कारणांतून जोडीदाराचा खून, हल्ला, हिंसा, अ‍ॅसिड अ‍ॅटॅक यांबद्दलच्या बातम्या आजकाल रोजच वाचत व पाहात असतो. काही वेळा त्या क्षणी तोल ढळणे, मानसिक संतुलन बिघडलेले असणे ही कारणे जरी ग्राह्य धरली तरी कित्येकदा अशा घटनेची चाहूल ही हिंसाचार करणार्‍या व्यक्तीच्या इतर वर्तनातून अगोदरच लागलेली असते.

नवरा-बायको, सहचर, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किंवा प्रियकर - प्रेयसी ह्या नात्यांचे बंध जसे नाजूक तसेच ताकदीचे! प्रत्येक नात्याचा पोत वेगळा, तसाच ह्याही नात्याचा असतो. परस्पर विश्वास, मैत्र, प्रेम, जिव्हाळा, स्नेह यांच्या ताकदीवर हे नाते जगते आणि टिकून राहाते. त्याचबरोबर ह्या नात्यात आणखी एक घटक असतो. तो म्हणजे ''तडजोड''. ही तडजोड कुठे, किती, कधी आणि कशी करावी हा खरे तर ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न.

परंतु काहीवेळा कायद्याच्या परिभाषेत 'अ‍ॅब्यूजिव' किंवा एखाद्या व्यक्तीचे खच्चीकरण करणारे अपमानजनक वर्तन त्या व्यक्तीच्या जोडीदाराकडून होत असेल तर मग ती 'तडजोड' न राहता एका व्यक्तीने आपल्या जोडीदाराचे केलेले 'शोषण' ठरते. अशा वेळी जोडप्यामधील एक व्यक्ती असते शोषणकर्ता/कर्ती व दुसरी व्यक्ती शोषित! ह्यात संपूर्ण नात्यातले असंतुलन दिसून येते. शोषण जसे शारीरिक स्वरुपातील असते तसेच ते मानसिक, भावनिक, आर्थिक स्वरुपातीलही असू शकते. शारीरिक स्वरूपातील शोषण 'दिसून' येण्याची किंवा सिद्ध करू शकण्याची शक्यता अधिक असते. परंतु मानसिक स्वरूपातील शोषण सिद्ध होतेच असे नाही. तसेच अशा प्रकारचे शोषण इतरांना किंवा शोषित व्यक्तीला पटकन 'जाणवेलच' असेही नाही.

भारत किंवा अन्य विकसनशील देशांमध्ये आजही कित्येक घरांमध्ये नवर्‍याने बायकोला मारहाण करणे, तिच्यावर हात उगारणे, येन केन प्रकारेण तिच्यावर वर्चस्व गाजवणे हे अगदी गृहित धरले जाते. त्यात वावगे कोणास वाटत नाही. परंतु अशा तर्‍हेचे शारीरिक, मानसिक, भावनिक किंवा आर्थिक स्वरूपाचे एखाद्या स्त्रीचे खच्चीकरण हे उभयतांच्या निकोप नात्यासाठी तर घातक असतेच, शिवाय त्या स्त्रीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठीही हानीकारक असते. अशा घरात वाढलेल्या मुलांचे मानसिक आरोग्यही त्यामुळे धोक्यात येते. त्यांची वाढ नीट होऊ शकत नाही. अन्य कुटुंबियांसाठीही अशी अ‍ॅब्यूजिव रिलेशनशिप हितावह नक्कीच नसते.

पण ह्या अ‍ॅब्यूजला ''सुरुवात'' नक्की कशी व कोठून होते? त्या अ‍ॅब्यूजच्या खुणा ओळखायच्या कशा? एखादे नाते अस्वास्थ्यकारक बनत चालले आहे हे समजावे कसे? धोक्याची निशाणी ओळखायची कशी?

ह्यासाठी तज्ज्ञांनी एक यादीच बनवली आहे. यादीत समाविष्ट वर्तन जर कोणाच्या पार्टनरकडून (किंवा त्या पार्टनरच्या बाबतीत स्वतःकडूनही) घडत असेल तर तो रेड फ्लॅग किंवा लाल बावटाच समजावा.

अ‍ॅब्यूज रोखायचे उपाय व्यक्तिनिहाय व परिस्थितीनिहाय बदलू शकतात. परंतु त्यासाठी अगोदर असा अ‍ॅब्यूज आपल्या बाबतीत होतोय हे समजणे व ते वास्तव स्वीकारणे आवश्यक असते. अन्यथा असुरक्षिततेच्या किंवा परिस्थिती मान्य न करण्याच्या भावनेतून शोषित व्यक्ती असे काही आपल्या बाबतीत घडत आहे, आणि त्याबद्दल आपण काही पावले उचलली नाहीत तर त्यात फक्त आपलाच नव्हे तर सार्‍या कुटुंबाचा तोटा आहे हेच मान्य करायला, स्वीकारायला तयार होत नाहीत असे चित्र दिसते. जसे की दारुड्याच्या बायकोला (आणि त्याच्या कुटुंबियांना) नवर्‍याने दारूच्या नशेत बायकोला मारहाण करणे हे सर्वसामान्य वाटू शकते. किंवा एखाद्या स्त्रीला (व तिच्या कुटुंबियांना) तिच्या जोडीदाराने इतरांसमोर तिला सदोदित अवमानित करणे, तिच्याशी तुच्छतेने बोलणे, तिला कमी लेखणे हे सर्वसामान्य वाटू शकते. त्यात त्यांना 'अ‍ॅब्यूजिव' असे काहीच वाटत नाही. परंतु ते तसे नाही. असे वागणे आणि ते सहन करणे हे ना त्या नात्याच्या हिताचे, ना त्या व्यक्तीच्या हिताचे, हे स्वीकारल्याशिवाय पुढचे पाऊल उचलताच येणार नाही. अ‍ॅब्यूजच्या ह्या अशा अनेक पातळ्या आहेत. आणि त्यांचे काहीच समर्थन देणे योग्य होणार नाही. अशा अ‍ॅब्यूजचे समर्थन करणे म्हणजे शोषित व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक र्‍हासाचे समर्थन करणे असे होईल. शिवाय ह्या प्रकारच्या अ‍ॅब्यूजची परिणिती कशात होईल हे कोणीच वर्तवू शकत नाही.

तर तज्ज्ञांनी सांगितलेली ही एक चेकलिस्ट आहे. अर्थातच प्रत्येक प्रांत, संस्कृती, लोकांची मानसिकता, सामाजिक किंवा कौटुंबिक परिस्थिती, सवयी इत्यादींचे कारण पुढे करून अ‍ॅब्यूजचे समर्थन करता येऊ शकते. पण कृपया तसे करू नका.

लक्षात ठेवा, की अ‍ॅब्यूज हा अ‍ॅब्यूजच आहे.

आपल्या नात्याबद्दलची चेकलिस्ट : हे लाल-बावटे, धोक्याचे इशारे आहेत. हे स्त्री व पुरुष दोघांसाठीही लागू आहेत.

तुम्ही कधी अशा परिस्थितीला सामोरे गेला आहात का, जिथे तुमचा जोडीदार,

१. स्वतःच तुमच्या भविष्याबद्दलचे सर्व निर्णय घेत आहे? (तुम्ही ते निर्णय घेण्यास समर्थ असून सुद्धा)

२. तुम्हाला तुमचे त्याच्याशी असलेले नाते तोडायचे आहे, पण तो / ती तसे करू देत नाही. तो / ती तुमच्याशिवाय जगू शकत नाही असे म्हणून तुम्ही जर त्याच्याशी / तिच्याशी ब्रेक-अप केलात तर स्वतःच्या जीवाचे काही बरेवाईट करेन अशा धमक्या देतो / देते?

३. आयुष्यात काही वाईट झाले तर त्याचा दोष तो इतरांना (खास करून तुम्हाला) देतो का?

४. तुम्हाला दिलेली वचने तो वारंवार मोडतो का?

५. तुमचे जवळचे नातेवाईक, कुटुंबिय, मित्र-मैत्रिणींचा तो मत्सर करतो का? तुम्हाला सारखे त्याच्यात व इतर कुटुंबिय / मित्रमैत्रिणींच्यात कोणा एकाला निवडायला भाग पाडतो का? संधी मिळेल तेव्हा त्यांना तो तुमच्यापासून दूर लोटायचा प्रयत्न करतो का?

६. त्याला स्वतःला कायम (इतरांना) कंट्रोल करायला आवडते म्हणून तो तुमच्यावरही कंट्रोल गाजवतो का? कोणी त्याच्यावर टीका केलेली त्याला अजिबात आवडत नाही हे बरोबर का? आपल्या सर्व कृतींचे तो कायम समर्थन करत बसतो का? सगळीकडे त्याला(च) जिंकायला आवडते आणि त्यानेच जिंकले पाहिजे असा त्याचा आग्रह असतो का?

७. त्याचा स्वभाव अति-तापट आहे, आणि त्या रागाच्या भरात तो काहीही करतो, असे घडते का? आपल्या रागाचे खापर तो तुमच्या माथी फोडतो का? आपल्या रागावर काहीच इलाज नाही, कारण तो आपला स्वभावच आहे असे आपल्या रागाचे व त्या भरातल्या वागण्या-बोलण्याचे समर्थन तो देतो का?

८. त्याच्या वागण्याबद्दल तुम्हाला इतरांची माफी मागायला लागली आहे का? किंवा त्याच्या वाईट वर्तनाचे स्पष्टीकरण द्यायला लागले आहे का? खास करून त्याने तुमच्याशी वाईट वर्तन केल्यावर ?

९. तो तुमच्यावर कायम टीका करतो का, किंवा तुम्हाला अवमानित करतो का? तुम्हाला शिक्षा करायची म्हणून तो आपले प्रेम व पाठिंबा तो आखडता घेतो का?

१०. तुमच्या मताला तो कणाचीही किंमत देत नाही. तुमचे मत त्याच्या खिजगणतीत नाही ह्याची तो वारंवार जाणीव करून देतो का? तुम्हाला त्यातलं काहीही कळत नाही अशी जाणीव तो तुच्छतेने करून देतो का?

११. त्याने तुम्हाला ज्या गोष्टींमुळे अनकंफर्टेबल वाटेल अशा गोष्टी करण्यासाठी बळजबरी केली आहे का? बेकायदेशीर गोष्टी करण्यासाठी तुम्हाला भाग पाडले आहे का? तुम्हाला कोणतेही कारण नसताना सक्तीने ऑफिसातून सुट्टी घ्यायला लावली आहे का? तुमच्याशी बळजबरीने सेक्स केला आहे का? किंवा तुम्हाला अतिशय अनकम्फर्टेबल वाटेल अशा पद्धतीने सेक्स केला आहे का?

१२. तुम्हाला, तुमच्या मुलांना किंवा स्वतःला इजा करण्याच्या धमक्या दिल्या आहेत का? तुम्हाला त्याने (तुमच्या मर्जीविरुद्ध) ढकलले, तुमचा गळा धरला, किंवा तुमच्या रोखाने वस्तू फेकून मारल्या असे कधी झाले आहे का?

१३. त्याच्यामुळे तुमचे कुटुंबिय तुमच्या सुरक्षेविषयी काळजीत असतात का?

१४. कुटुंबाच्या मालमत्तेपासून, जसे की, वाहन, बँक खाते, पैसे इत्यादींपासून त्याने तुम्हाला वंचित ठेवले आहे का? तुमचा व तुम्ही मिळवलेला पैसा तो कंट्रोल करतो का? तुम्ही कसे, कोठे व किती खर्च करता ह्यावर तो कंट्रोल ठेवतो का? तुम्हाला पै अन् पैचा हिशेब व पैसे खर्च करण्याची कारणे द्यायला लावतो का?

१५. तुम्हाला व तुमच्या मुलांना तो धाकधपटशा दाखवतो का? तुमचा गैरफायदा घेतो का?

१६. तुम्ही केव्हा, कधी, कोठे, कोणाबरोबर, किती वाजता, कसे बाहेर जावे ह्यावर कंट्रोल ठेवतो का? त्याच्या मर्जीविरुद्ध बाहेर जाण्यापासून अडवतो का?

जर ह्या चेकलिस्टमधील एकापेक्षा अधिक कलमे एखाद्या नवरा-बायको/ गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड / सहचरांच्या नात्याला लागू होत असतील तर अशी रिलेशनशिप किंवा नाते हे निकोप, स्वास्थ्यकारक नक्कीच नाही हे जाणावे. अशा नातेसंबंधाचा दूरगामी परिणाम हा हानीकारक असू शकतो.

पूर्वीच्या काळची परिस्थिती वेगळी होती. परंतु आताच्या वेगवान आयुष्यात लोकांना स्वतःसाठीही पुरेसा वेळ जिथे मिळत नाही तिथे इतरांच्या आयुष्यात डोकावून काय बघणार? त्यामुळे आपले आपल्या पती/पत्नी किंवा जोडीदाराशी असलेले नातेसंबंध अनारोग्यकारक तर नाहीत ना, ह्याची खातरजमा ही त्या त्या व्यक्तीनेच करणे आवश्यक आहे. एकदा 'समस्या आहे' हे स्वीकारले तर त्यावर उपाय शोधणे शक्य आहे. परंतु परिस्थितीचा अस्वीकार हा फक्त त्या व्यक्तीसाठीच नव्हे तर त्या नात्यासाठी व सर्व कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी हानीकारक आहे.

-------------------------

संदर्भ :

१. चेकलिस्ट (पीडीएफ लिंक)

२. अ‍ॅब्यूज ओळखा

३. धोक्याची निशाणी व लाल बावटे

-----------

सदर लेख हा केवळ माहितीकरता आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

on lighter side.......तुमचा व तुम्ही मिळवलेला पैसा तो कंट्रोल करतो का? तुम्ही कसे, कोठे व किती खर्च करता ह्यावर तो कंट्रोल ठेवतो आहे>>>>>>>आयला आहे>>>>>>>....""तुमचा आणि तुम्ही मिळवलेला पैसा" असेल तर ठीक्.....माझी बायको जेंव्हा माझं कार्ड घेऊन उधळते...तेंव्हा मी काय करावं???? अर्थात ती माझा छळ नाही करते..... Happy दिवे घ्या हां..नाहीतर..नानान्ना धून काढतील ईथले लोक्स.... Happy

नाना, तुमचा प्रतिसाद कटाक्षाने इग्नोर मारण्यात येईल, हे ध्यानी घ्या. ताजाभांल धागा आहे हा.

१- ५ स्केल....हम्म .... "क़्विन" सिनेमा कुणी पाहिला आहे काय? "विजय" (वाग्दत्त नवरा) ह्या प्रश्नावलीमधील अनेक प्रश्नांवर फक्त "१" ठरेल. पण किती जणांना वाटल कि तिने लग्न मोडून चूक केली?

अरुंधती म्हणते तस - अ‍ॅब्यूज हा अ‍ॅब्यूजच आहे. आणि अ‍ॅब्यूज बायनरी असतो - असतो किंवा नसतो.

शबाना यांचा प्रतिसाद दुर्दैवी वाटला. त्यांच्या प्रतिसादावरून त्या बहुधा काउन्सेलिंगच्या क्षेत्रात काम करत असाव्यात असं वाटतं. अशा व्यक्तिने तर 'बहुसंख्य वेळा पुरुष हेच शोषणकर्ते असून बायका ह्या विक्टिम असतात' अशासारखं घोंगडीविधान करावं हे आणखीच वाईट. याचा अर्थ अशी व्यक्ति तिच्यासमोर येणार्‍या प्रत्येक केसकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीने बघत असणार, अशी शंका येण्यास वाव आहे.
उदाहरणादाखल हे आणखी एक विशिष्ट लोकांकडून नेहमी केलं जाणारं विधान वाचा, 'बहुतेक मुसलमान दहशतवादी नसतात, पण बहुतेक दहशतवादी मुसलमान असतात'. आता या विधानाची सत्यासत्यता बाजूला ठेवू, पण पोलिस किंवा न्यायदानाच्या क्षेत्रात काम करणारी व्यक्ति हा पूर्वग्रह मनात ठेवत असेल तर तिच्याकडून कुठल्याही मुसलमान संशयिताला डावं माप मिळेल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.
स्त्रियांकडून नात्यात अ‍ॅब्युस होण्याचे प्रमाण अजिबात नगण्य नाही, फक्त त्याचं स्वरूप वेगळं आणि बहुतेक वेळा इतरांसाठी 'अदृश्य' असतं, एवढंच. पुरुष कायमच शोषणकर्ते असतात अशासारखे पूर्वग्रह सोडावेत. हेही एक प्रकारचं प्रोफायलिंग आहे. आणि अ‍ॅब्युस बायनरी असतो हे आणखी एक मजेशीर विधान. अ‍ॅब्युस 'म्युचुअल'ही असू शकतो.

आणि अ‍ॅब्युस बायनरी असतो हे आणखी एक मजेशीर विधान.>> ह्म्म. Happy आहे खर मजेशीर कारण अब्युज पण असा "गमतीशीर" प्रकार आहे कि जोवर स्वतःला घडत नाही तोवर त्याच्या छटा लक्षात येणे कठीण.

अब्युस म्हणल कि डोळ्यापुढे "स्लीपिंग विथ दि एनिमी" किंवा "मिसेस राउत" सारख्या सिनेमात हे घडत ते सर्वसामान्यपणे डोळ्यासमोर येत. (स्त्री अब्युजरचे उदाहरण ह्व्वेच असेल तर "बेटा" मधली अरुणा इराणी गृहीत धरून वाचा. माझ्या दृष्टीने अब्युजरचे लिंग हा मह्त्त्वाचा मुद्दा नाही. अब्युज ओळखणे आणि रोखणे महत्त्वाचे). तिथे पिडीत व्यक्तीने बाहेर पडले पाहिजे हे सगळेच मान्य करतील. पण कंट्रोलफ्रिक किंवा मॅनिपुलेटीव्ह असणे हे वरकरणी "माईल्ड" असले (स्केल वर १) तरी अब्युजच आहे हे मी मांडण्याचा प्रयत्न करीत होते. अशा सो-कोल्ड "माईल्ड" अब्युजला पटकन सरकारी किंवा समाजाकडून मदत मिळत नाही. तिथे कंगनासारख छान "थांक्यू" म्हणून बाहेर पडावे लागते.

किती जणांना वाटल कि तिने लग्न मोडून चूक केली?

>> मला तरी नाही वाटले. ती जर आधिपासुनच मानसिक रित्या खंबीर असती तर तिच्या नाचण्यावर आक्षेप घेणार्‍या, तिच्या नोकरी करण्यावर आक्षेप घेणार्‍या, तिचा प्रत्येक निर्णय डॉमिनेट करणार्‍या विजयला तिने पॅरीस किंवा अ‍ॅमस्टरडॅमला न जाताही सोडलेच असते.

तिचे बाहेर पडून जग पाहाणे हे फक्त एक निमित्त झाले तिला मानसिकरित्या खंबीर होण्यासाठी.

नि:संशय हा विषय चर्चिला जाणं महत्वाचं आहे कारण बर्‍याच अशा प्रकरणांत तो/ती याना आपलं काय चूकतंय याची जाणीवच नसावी. मला वाटतं,पति- पत्नीनीं सुरवातीपासूनच आपल्याला अशा खटकणार्‍या वागण्या-बोलण्यातल्या गोष्टी मोकळेपणाने पण खुबीने एकमेकांच्या नजरेस आणून दिल्या तर बर्‍याच जोडप्यांच्या बाबतीत त्याचा सकारात्मक परिणाम होऊं शकतो . अशा चर्चेतूनही स्वतःकडून नकळत होत असलेल्या चूका लक्षांत यायला अर्थात मदत होतेच.

untitled_7.JPG

भाऊ Happy

स्केलच्या बाबतीत थोडी सहमत आहे, पण काही बाबतीत स्केल उपयोगाचे नाही. एखादेवेळी पार्टनर इतरांसमोर घालून पाडून बोलला/ली किंवा भांडणानंतर अबोला धरला म्हणजे लगेच रिलेशनशिप अनहेल्दी ठरवायची घाई नको. पण काही बाबतीत हे धोक्याचे बावटे लक्षात घ्यायलाच हवेत. उदा. प्राणघातक हल्ला, मारहाण, स्वतःचे बरेवाईट करून घेण्याच्या / मुलांचे बरेवाईट करण्याच्या धमक्या किंवा प्रत्यक्ष कृती, पार्टनरला मर्जीविरुद्ध घरात कोंडून ठेवणे, बाहेरच्या जगाशी संपर्क तोडायला लावणे किंवा तशा संपर्कावर नियंत्रण ठेवणे इत्यादी गोष्टींना माझ्या मते स्केल लागू होत नाही. वैद्यकीय उपचारांवाचून ठेवणे किंवा तसे उपचार करण्यापासून रोखणे हेही त्यात येऊ शकते.

मार्क ट्वेन,

अब्युज म्युच्वलही असतो आणि स्त्रियाही अब्युज करतात. परंतु आपल्या व्यवस्था पुरुषप्रधान असल्यामुळे बहुतांशी विक्टीम स्त्रिया असतात . त्याचबरोबर स्त्रियांच्या प्रश्नांवर झालेल्या कामामुळे बऱ्याच सेवा सुविधा तशा विकसित झालेल्या आहेत. खरे तर पुरुष अब्युज करणारे असोत किंवा विकटीम असोत त्यांना मदत करणाऱ्या सेवा सुविधा खूप कमी आहेत. हिंसा, मग ती शारीरिक असो किंवा मानसिक असो, हिंसा करणाऱ्यालाही मदतीची गरज असते स्वतःच्या अपूर्ण मानसिक गरजा भागवण्याची. मुलांचे/ पुरुषांचे भावनिक दमन या व्यवस्थेत खूप आहे, हिंसात्मक रीतीने वागणे या दमनाची प्रतिक्रिया म्हणून पण येते. काम करताना व्यक्तिगत पातळीवर केले जात असले तरी we are aware of the context of the structural violence and there are different strategies and programs to address that.

Pages