वर्तमानपत्रांमध्ये किंवा टीव्हीवर आपण संशयापोटी, भांडणातून किंवा अन्य काही कारणांतून जोडीदाराचा खून, हल्ला, हिंसा, अॅसिड अॅटॅक यांबद्दलच्या बातम्या आजकाल रोजच वाचत व पाहात असतो. काही वेळा त्या क्षणी तोल ढळणे, मानसिक संतुलन बिघडलेले असणे ही कारणे जरी ग्राह्य धरली तरी कित्येकदा अशा घटनेची चाहूल ही हिंसाचार करणार्या व्यक्तीच्या इतर वर्तनातून अगोदरच लागलेली असते.
नवरा-बायको, सहचर, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किंवा प्रियकर - प्रेयसी ह्या नात्यांचे बंध जसे नाजूक तसेच ताकदीचे! प्रत्येक नात्याचा पोत वेगळा, तसाच ह्याही नात्याचा असतो. परस्पर विश्वास, मैत्र, प्रेम, जिव्हाळा, स्नेह यांच्या ताकदीवर हे नाते जगते आणि टिकून राहाते. त्याचबरोबर ह्या नात्यात आणखी एक घटक असतो. तो म्हणजे ''तडजोड''. ही तडजोड कुठे, किती, कधी आणि कशी करावी हा खरे तर ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न.
परंतु काहीवेळा कायद्याच्या परिभाषेत 'अॅब्यूजिव' किंवा एखाद्या व्यक्तीचे खच्चीकरण करणारे अपमानजनक वर्तन त्या व्यक्तीच्या जोडीदाराकडून होत असेल तर मग ती 'तडजोड' न राहता एका व्यक्तीने आपल्या जोडीदाराचे केलेले 'शोषण' ठरते. अशा वेळी जोडप्यामधील एक व्यक्ती असते शोषणकर्ता/कर्ती व दुसरी व्यक्ती शोषित! ह्यात संपूर्ण नात्यातले असंतुलन दिसून येते. शोषण जसे शारीरिक स्वरुपातील असते तसेच ते मानसिक, भावनिक, आर्थिक स्वरुपातीलही असू शकते. शारीरिक स्वरूपातील शोषण 'दिसून' येण्याची किंवा सिद्ध करू शकण्याची शक्यता अधिक असते. परंतु मानसिक स्वरूपातील शोषण सिद्ध होतेच असे नाही. तसेच अशा प्रकारचे शोषण इतरांना किंवा शोषित व्यक्तीला पटकन 'जाणवेलच' असेही नाही.
भारत किंवा अन्य विकसनशील देशांमध्ये आजही कित्येक घरांमध्ये नवर्याने बायकोला मारहाण करणे, तिच्यावर हात उगारणे, येन केन प्रकारेण तिच्यावर वर्चस्व गाजवणे हे अगदी गृहित धरले जाते. त्यात वावगे कोणास वाटत नाही. परंतु अशा तर्हेचे शारीरिक, मानसिक, भावनिक किंवा आर्थिक स्वरूपाचे एखाद्या स्त्रीचे खच्चीकरण हे उभयतांच्या निकोप नात्यासाठी तर घातक असतेच, शिवाय त्या स्त्रीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठीही हानीकारक असते. अशा घरात वाढलेल्या मुलांचे मानसिक आरोग्यही त्यामुळे धोक्यात येते. त्यांची वाढ नीट होऊ शकत नाही. अन्य कुटुंबियांसाठीही अशी अॅब्यूजिव रिलेशनशिप हितावह नक्कीच नसते.
पण ह्या अॅब्यूजला ''सुरुवात'' नक्की कशी व कोठून होते? त्या अॅब्यूजच्या खुणा ओळखायच्या कशा? एखादे नाते अस्वास्थ्यकारक बनत चालले आहे हे समजावे कसे? धोक्याची निशाणी ओळखायची कशी?
ह्यासाठी तज्ज्ञांनी एक यादीच बनवली आहे. यादीत समाविष्ट वर्तन जर कोणाच्या पार्टनरकडून (किंवा त्या पार्टनरच्या बाबतीत स्वतःकडूनही) घडत असेल तर तो रेड फ्लॅग किंवा लाल बावटाच समजावा.
अॅब्यूज रोखायचे उपाय व्यक्तिनिहाय व परिस्थितीनिहाय बदलू शकतात. परंतु त्यासाठी अगोदर असा अॅब्यूज आपल्या बाबतीत होतोय हे समजणे व ते वास्तव स्वीकारणे आवश्यक असते. अन्यथा असुरक्षिततेच्या किंवा परिस्थिती मान्य न करण्याच्या भावनेतून शोषित व्यक्ती असे काही आपल्या बाबतीत घडत आहे, आणि त्याबद्दल आपण काही पावले उचलली नाहीत तर त्यात फक्त आपलाच नव्हे तर सार्या कुटुंबाचा तोटा आहे हेच मान्य करायला, स्वीकारायला तयार होत नाहीत असे चित्र दिसते. जसे की दारुड्याच्या बायकोला (आणि त्याच्या कुटुंबियांना) नवर्याने दारूच्या नशेत बायकोला मारहाण करणे हे सर्वसामान्य वाटू शकते. किंवा एखाद्या स्त्रीला (व तिच्या कुटुंबियांना) तिच्या जोडीदाराने इतरांसमोर तिला सदोदित अवमानित करणे, तिच्याशी तुच्छतेने बोलणे, तिला कमी लेखणे हे सर्वसामान्य वाटू शकते. त्यात त्यांना 'अॅब्यूजिव' असे काहीच वाटत नाही. परंतु ते तसे नाही. असे वागणे आणि ते सहन करणे हे ना त्या नात्याच्या हिताचे, ना त्या व्यक्तीच्या हिताचे, हे स्वीकारल्याशिवाय पुढचे पाऊल उचलताच येणार नाही. अॅब्यूजच्या ह्या अशा अनेक पातळ्या आहेत. आणि त्यांचे काहीच समर्थन देणे योग्य होणार नाही. अशा अॅब्यूजचे समर्थन करणे म्हणजे शोषित व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक र्हासाचे समर्थन करणे असे होईल. शिवाय ह्या प्रकारच्या अॅब्यूजची परिणिती कशात होईल हे कोणीच वर्तवू शकत नाही.
तर तज्ज्ञांनी सांगितलेली ही एक चेकलिस्ट आहे. अर्थातच प्रत्येक प्रांत, संस्कृती, लोकांची मानसिकता, सामाजिक किंवा कौटुंबिक परिस्थिती, सवयी इत्यादींचे कारण पुढे करून अॅब्यूजचे समर्थन करता येऊ शकते. पण कृपया तसे करू नका.
लक्षात ठेवा, की अॅब्यूज हा अॅब्यूजच आहे.
आपल्या नात्याबद्दलची चेकलिस्ट : हे लाल-बावटे, धोक्याचे इशारे आहेत. हे स्त्री व पुरुष दोघांसाठीही लागू आहेत.
तुम्ही कधी अशा परिस्थितीला सामोरे गेला आहात का, जिथे तुमचा जोडीदार,
१. स्वतःच तुमच्या भविष्याबद्दलचे सर्व निर्णय घेत आहे? (तुम्ही ते निर्णय घेण्यास समर्थ असून सुद्धा)
२. तुम्हाला तुमचे त्याच्याशी असलेले नाते तोडायचे आहे, पण तो / ती तसे करू देत नाही. तो / ती तुमच्याशिवाय जगू शकत नाही असे म्हणून तुम्ही जर त्याच्याशी / तिच्याशी ब्रेक-अप केलात तर स्वतःच्या जीवाचे काही बरेवाईट करेन अशा धमक्या देतो / देते?
३. आयुष्यात काही वाईट झाले तर त्याचा दोष तो इतरांना (खास करून तुम्हाला) देतो का?
४. तुम्हाला दिलेली वचने तो वारंवार मोडतो का?
५. तुमचे जवळचे नातेवाईक, कुटुंबिय, मित्र-मैत्रिणींचा तो मत्सर करतो का? तुम्हाला सारखे त्याच्यात व इतर कुटुंबिय / मित्रमैत्रिणींच्यात कोणा एकाला निवडायला भाग पाडतो का? संधी मिळेल तेव्हा त्यांना तो तुमच्यापासून दूर लोटायचा प्रयत्न करतो का?
६. त्याला स्वतःला कायम (इतरांना) कंट्रोल करायला आवडते म्हणून तो तुमच्यावरही कंट्रोल गाजवतो का? कोणी त्याच्यावर टीका केलेली त्याला अजिबात आवडत नाही हे बरोबर का? आपल्या सर्व कृतींचे तो कायम समर्थन करत बसतो का? सगळीकडे त्याला(च) जिंकायला आवडते आणि त्यानेच जिंकले पाहिजे असा त्याचा आग्रह असतो का?
७. त्याचा स्वभाव अति-तापट आहे, आणि त्या रागाच्या भरात तो काहीही करतो, असे घडते का? आपल्या रागाचे खापर तो तुमच्या माथी फोडतो का? आपल्या रागावर काहीच इलाज नाही, कारण तो आपला स्वभावच आहे असे आपल्या रागाचे व त्या भरातल्या वागण्या-बोलण्याचे समर्थन तो देतो का?
८. त्याच्या वागण्याबद्दल तुम्हाला इतरांची माफी मागायला लागली आहे का? किंवा त्याच्या वाईट वर्तनाचे स्पष्टीकरण द्यायला लागले आहे का? खास करून त्याने तुमच्याशी वाईट वर्तन केल्यावर ?
९. तो तुमच्यावर कायम टीका करतो का, किंवा तुम्हाला अवमानित करतो का? तुम्हाला शिक्षा करायची म्हणून तो आपले प्रेम व पाठिंबा तो आखडता घेतो का?
१०. तुमच्या मताला तो कणाचीही किंमत देत नाही. तुमचे मत त्याच्या खिजगणतीत नाही ह्याची तो वारंवार जाणीव करून देतो का? तुम्हाला त्यातलं काहीही कळत नाही अशी जाणीव तो तुच्छतेने करून देतो का?
११. त्याने तुम्हाला ज्या गोष्टींमुळे अनकंफर्टेबल वाटेल अशा गोष्टी करण्यासाठी बळजबरी केली आहे का? बेकायदेशीर गोष्टी करण्यासाठी तुम्हाला भाग पाडले आहे का? तुम्हाला कोणतेही कारण नसताना सक्तीने ऑफिसातून सुट्टी घ्यायला लावली आहे का? तुमच्याशी बळजबरीने सेक्स केला आहे का? किंवा तुम्हाला अतिशय अनकम्फर्टेबल वाटेल अशा पद्धतीने सेक्स केला आहे का?
१२. तुम्हाला, तुमच्या मुलांना किंवा स्वतःला इजा करण्याच्या धमक्या दिल्या आहेत का? तुम्हाला त्याने (तुमच्या मर्जीविरुद्ध) ढकलले, तुमचा गळा धरला, किंवा तुमच्या रोखाने वस्तू फेकून मारल्या असे कधी झाले आहे का?
१३. त्याच्यामुळे तुमचे कुटुंबिय तुमच्या सुरक्षेविषयी काळजीत असतात का?
१४. कुटुंबाच्या मालमत्तेपासून, जसे की, वाहन, बँक खाते, पैसे इत्यादींपासून त्याने तुम्हाला वंचित ठेवले आहे का? तुमचा व तुम्ही मिळवलेला पैसा तो कंट्रोल करतो का? तुम्ही कसे, कोठे व किती खर्च करता ह्यावर तो कंट्रोल ठेवतो का? तुम्हाला पै अन् पैचा हिशेब व पैसे खर्च करण्याची कारणे द्यायला लावतो का?
१५. तुम्हाला व तुमच्या मुलांना तो धाकधपटशा दाखवतो का? तुमचा गैरफायदा घेतो का?
१६. तुम्ही केव्हा, कधी, कोठे, कोणाबरोबर, किती वाजता, कसे बाहेर जावे ह्यावर कंट्रोल ठेवतो का? त्याच्या मर्जीविरुद्ध बाहेर जाण्यापासून अडवतो का?
जर ह्या चेकलिस्टमधील एकापेक्षा अधिक कलमे एखाद्या नवरा-बायको/ गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड / सहचरांच्या नात्याला लागू होत असतील तर अशी रिलेशनशिप किंवा नाते हे निकोप, स्वास्थ्यकारक नक्कीच नाही हे जाणावे. अशा नातेसंबंधाचा दूरगामी परिणाम हा हानीकारक असू शकतो.
पूर्वीच्या काळची परिस्थिती वेगळी होती. परंतु आताच्या वेगवान आयुष्यात लोकांना स्वतःसाठीही पुरेसा वेळ जिथे मिळत नाही तिथे इतरांच्या आयुष्यात डोकावून काय बघणार? त्यामुळे आपले आपल्या पती/पत्नी किंवा जोडीदाराशी असलेले नातेसंबंध अनारोग्यकारक तर नाहीत ना, ह्याची खातरजमा ही त्या त्या व्यक्तीनेच करणे आवश्यक आहे. एकदा 'समस्या आहे' हे स्वीकारले तर त्यावर उपाय शोधणे शक्य आहे. परंतु परिस्थितीचा अस्वीकार हा फक्त त्या व्यक्तीसाठीच नव्हे तर त्या नात्यासाठी व सर्व कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी हानीकारक आहे.
-------------------------
संदर्भ :
१. चेकलिस्ट (पीडीएफ लिंक)
३. धोक्याची निशाणी व लाल बावटे
-----------
सदर लेख हा केवळ माहितीकरता आहे.
बायका पुरुशान्ना छळतात
बायका पुरुशान्ना छळतात त्यासाठी कोनता झेन्डा लावायचा?
बायका पुरुशान्ना छळतात
बायका पुरुशान्ना छळतात त्यासाठी कोनता झेन्डा लावायचा?>>
पांढरा लावा/ फडकवा
आता पांढराच का हे नका इचारु
लेख जोडीदारासंबंधी आहे.
लेख जोडीदारासंबंधी आहे. स्त्री की पुरूष याने फरक पडू नये.
निर्णयस्वातंत्र्य या एका शब्दात वरच्या यादीतले बरेच मुद्दे सामावतील.
लेखासाठी आभार, अरुंधती.
सगळीकडे 'तो' अथवा त्याने असे
सगळीकडे 'तो' अथवा त्याने असे उल्लेख आहेत. तिथे तो/ती, त्याने/तिने अशा प्रकारे बदल करण्यात येऊ शकतो.
उपयुक्त धागा अरूंधती!
उपयुक्त धागा अरूंधती!
कृपया हा धागा इतर
कृपया हा धागा इतर धाग्यांप्रमाणे स्वस्तात घेऊ नये. अत्यंत गंभीर विषय आहे. तेव्हा मुद्दा भरकटू न देणं हे सर्वांचं काम आहे.
धन्यवाद.
सगळीकडे 'तो' अथवा त्याने असे
सगळीकडे 'तो' अथवा त्याने असे उल्लेख आहेत. >> कोरा हे तो जोडिदार या अर्थाने आहे. मग जोडिदार हा स्त्री/पुरूष कोणीही असू शकतो. मला तरी कोणताही बदल करण्याची आवश्यकता दिसत नाही.
छान आणि उपयुक्त लेख आहे अकु.
छान आणि उपयुक्त लेख आहे अकु.
कृपया हा धागा इतर
कृपया हा धागा इतर धाग्यांप्रमाणे स्वस्तात घेऊ नये. अत्यंत गंभीर विषय आहे. तेव्हा मुद्दा भरकटू न देणं हे सर्वांचं काम आहे.
धन्यवाद>>
दक्षिणा हे विधान गंभीरपणे लिहिलय, पण जाम विनोदी आहे, अजुन ४-५ दिवसात वाट्टेल ते विषय घेउन मारामारी चाललेली असणारे इथे.
जरा समजाउन घेतो.
जरा समजाउन घेतो.
चर्चेसाठी चांगला विषय निवडला
चर्चेसाठी चांगला विषय निवडला आहे.
दक्षिणाला अनुमोदन!
अजुन ४-५ दिवसात वाट्टेल ते विषय घेउन मारामारी चाललेली असणारे इथे.>>> अग्निपंख, चिथावणार्या प्रतिसादांचा सहज अनुल्लेख करता येतो, प्रत्युत्तर देण्याचा मोह टाळणे हिताचे. तसंच, मुद्दाम पॉपकॉर्न घेऊन खुर्च्या टाकून बसलेले आयडीही सहज ओळखू येतात. त्यांचेही प्रतिसाद नजरेआड करता येऊ शकतात.
खरोखरंच गंभीरपणे चर्चा करायची असेल त्यांनी हे मुद्दे लक्षात घेतले तर बरं होईल.
कृपया हा धागा इतर
कृपया हा धागा इतर धाग्यांप्रमाणे स्वस्तात घेऊ नये. अत्यंत गंभीर विषय आहे. तेव्हा मुद्दा भरकटू न देणं हे सर्वांचं काम आहे.
<<
अगदी अगदी.
स्त्री पुरुष दोन्हीकडून सारखीच लागू होणारी संपूर्णतः समतोल चेकलिस्ट वर दिलेली आहे..
विशेषतः भारतीय समाजाच्या परिप्रेक्ष्यातून पाहिले असता, मुद्दा क्र. ११, १४, १५ व १६ या बाबी भारतात तरी खासकरून स्त्रीलिंगी जोडीदाराकडूनच मुख्यत्वे घडून येत असतात. तेव्हा कुणीही अमुक लिंगास झुकते माप दिल्याची तक्रार इथे तरी करू नये, असे म्हणावेसे वाटते.
मला वाटतं धागा फक्त
मला वाटतं धागा फक्त माहितीसाठी आहे, असं त्यात शेवटी म्हटलेलं आहे.
चर्चा अपेक्षित नसावी.
अकु, चांगला विषय. ह्या
अकु, चांगला विषय. ह्या धाग्यावर खरंच गंभीर चर्चा अपेक्षित आहे. लेखात दिलेल्या पॉइंट्सवर 'काउन्सेलिंग' हा सर्वसाधारण उपाय सुचवला जाऊ शकतो. पण तरीही ह्या समस्येत इन्वोल्व असलेल्या दोघांनी त्यानुसार कृती करुन स्वतः सकारात्मक पावले उचलली तरच नातं हळूहळू नॉर्मल होऊन पुन्हा गोडवा निर्माण होऊ शकतो. 'इगो' नावाचा मोठा अडथळा दोन्ही कडून बाजूला सारता आला पाहिजे.
अकु चेकलीस्ट चांगली आहे.
अकु चेकलीस्ट चांगली आहे. 'माझा जोडीदार माझ्याशी असा वागतोय का?' आणि 'मी माझ्या जोडीदाराशी अशी वागतेय का?' या दोन्ही अँगलने प्रश्नांची उत्तरे शोधली. आजुबाजुच्या काही जोडप्यांसाठीपण (ज्यांना मी अतीशय जवळून ओळखते) हि चेकलिस्ट तपासली.
एक नमुद करावेसे वाटते ते म्हणजे आपण आजुबाजुच्या जोडप्यांमध्ये असा एकजण दुसर्याला डॉमिनेट/ अब्युज करतो आहे हे लक्षात आले तरी जोपर्यंत डॉमिनेट होणार्या पार्टनरला त्याचे काही वाटत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही.
अकु चांगला धागा. अश्विनी + १
अकु चांगला धागा.
अश्विनी + १
चांगला धागा अकु धन्यवाद
चांगला धागा अकु
धन्यवाद
अकु, एक चांगला आणि गंभीर
अकु, एक चांगला आणि गंभीर विषयावर धागा. इथे बर्याच अनाआन्सर्ड प्रश्नांची उत्तरे मिळतील असे वाटत आहे.
अकु, विचारपूर्वक चेकलिस्ट
अकु, विचारपूर्वक चेकलिस्ट बनवली आहे. धागाही छान.
एक नमुद करावेसे वाटते ते म्हणजे आपण आजुबाजुच्या जोडप्यांमध्ये असा एकजण दुसर्याला डॉमिनेट/ अब्युज करतो आहे हे लक्षात आले तरी जोपर्यंत डॉमिनेट होणार्या पार्टनरला त्याचे काही वाटत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही.>>> अनुमोदन.
आपल्याला डॉमिनेट केले जात आहे असे जरी जाणवत आसले तरी ते बर्याचदा मान्य केले जात नाही, विशेषतः स्त्रियांकडून. त्यामुळे या गोष्टीचा स्वीकार सर्वांत महत्वाचा आणि मग त्यावरची उपाय योजना.
छान आहे माहिती. धन्यवाद अकु.
छान आहे माहिती. धन्यवाद अकु.
चांगला धागा अकु. जर ह्या
चांगला धागा अकु.
जर ह्या चेकलिस्टमधील एकापेक्षा अधिक कलमे एखाद्या नवरा-बायको/ गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड / सहचरांच्या नात्याला लागू होत असतील तर अशी रिलेशनशिप किंवा नाते हे निकोप, स्वास्थ्यकारक नक्कीच नाही हे जाणावे.>>> बर्याच नात्यांमधे ह्यातली २-३ कलमे नक्कीच असतील. पण त्यामुळे ती नाती निकोप, स्वास्थ्यकारक नाही हे फारसे पटत नाही. खरतर मी खूपच confuse झाले आहे
सर्व प्रतिसाद देणार्यांना
सर्व प्रतिसाद देणार्यांना धन्यवाद.
हा धागा माहिती देणारा असला तरी या विषयावर चर्चा करायला काहीच हरकत नाही.
पियूने मांडलेल्या मुद्द्याला अधोरेखित करणार्या काही केसेस ओळखीत, नात्यात पाहिल्या आहेत. तिथे त्या नात्यातील अॅब्यूज होणार्या व्यक्तीला आपल्याला होणारी मारहाण, सोसावा लागणारा छळ हे सर्व असूनही आपला जोडीदार मुळात खूप चांगला आहे आणि तो कालांतराने बदलेल अशी वेडी आशा होती. पण तसे झाले नाही. जीवावर बेतले तेव्हा वेगळे होण्यावाचून पर्याय उरला नाही. पण सुरुवातीलाच जेव्हा जोडीदार हिंसक वर्तन करू लागला, पझेसिव्हनेसच्या गोड लेबलखाली सदा सर्वकाळ पाळत ठेवू लागला, हालचाली - आर्थिक बाबी व इतर नातेवाईक-मित्रमैत्रिणींशी असलेले संबंध कंट्रोल करू लागला तेव्हा जागरूक होऊन सकारात्मक पावले उचलली असती तर फरक पडू शकला असता. शिवाय अनेक वर्षे सहन करायला लागलेला मार, शारीरिक पडझड, जीवाची भीती, आर्थिक परावलंबित्व, असहायतेची भावना व आत्मविश्वासाचा चक्काचूर हे वाट्याला आले नसते.
ह्या काळात कुटुंबातल्या इतर काही व्यक्तींनी, हितचिंतकांनी वेगळे होण्याचा सल्ला दिला होता. समुपदेशन सुचवले होते. परंतु ते जोवर शोषित व्यक्तींना 'पटले' नव्हते तोवर कोणी काहीच करू शकले नाही. आणि शोषणकर्त्यांना शेवटपर्यंत आपल्याला आपले वागणे चुकत आहे, ते बदलायची गरज आहे आणि आपण प्रोफेशनल कौन्सेलिंग घेणे आवश्यक आहे असे वाटलेच नाही. तिथे शेवटपर्यंत ते आपापल्या इगोवरच अडून बसले.
इतर कोणासाठी नाही तरी स्वतःसाठी व जोडीदाराबरोबरच्या आपल्या नात्यासाठी ही लिस्ट महत्त्वाची आहे असे मला वाटते.
बर्याच नात्यांमधे ह्यातली
बर्याच नात्यांमधे ह्यातली २-३ कलमे नक्कीच असतील>> ?? वरती दिलेली कलमे परत एकदा वाचून काढली. पण सगळीच कलमे ही बर्यापैकी ते अतिगंभीर कॅटेगरीतली आहेत. अशी २-३ कलमे जरी नात्यात असतील तरी कठीण आहे.. त्या नात्यांना निकोप किंवा नॉर्मल म्हणायला माझी तरी जीभ चाचरेलच.
अरुंधतीचा धागा चांगला आहे आणि
अरुंधतीचा धागा चांगला आहे आणि तितकीच तिची पोस्ट चांगली आहे.
लिस्ट टीनेजर साठी अगदी उपयोगी आहे. पुस्तकी शिक्षणात त्यांचा बराच वेळ जातो त्यादरम्यान त्यांना काय सहन करायचं नाही, जोडीदाराला कसे वागवायचे इ इ गोष्टींचे ज्ञान असतेच असे नाही. शाळांमधून "सेक्स एज्युकेशन" क्वचित असते पण "कम्पॅनियनशिप एज्युकेशन" नसते. शिवाय साधारणपणे ह्या काळात पहिला जोडीदार हल्ली असतो. सुरुवातीपासूनच योग्य वर्तनाची/ योग्य प्रकाराने वागवून घेण्याची सवय लागली तर पुढे जड जाणार नाही.
आजूबाजूचे कुणी आपल्या जोडीदाराविषयी तक्रार करू लागले तर "त्यात काय मोठ, हे तर चालतच. आपण कशाला मध्ये पडा, टाळी दोन्ही हाताने वाजते" हि प्रतिक्रिया घडते. भांडणात जोडीदारांनी कुठली पातळी सोडायची नाही हे महित नसल्याने हि प्रतिक्रिया घडते. ती ५०% लोकांना टाळता आली तर पिडीत व्यक्तीची लढाई फार सोपी होईल. म्हणून आपले आणि आपल्या जोडीदाराचे नाते कितीही "हेल्दी" असले तरी हि कलमे मनावर कोरलेली असू दे.
जोवर पिडीत व्यक्ती तक्रार करीत नाही तोवर आपण काय करणार? पिडणार्या व्यक्तीला हि लिस्ट वाचायला देणार!
सिमन्तिनी +१
सिमन्तिनी +१
सिमन्तिनी +१. वरदा, हे एक /
सिमन्तिनी +१.
वरदा, हे एक / दोन मुद्दे बघ. माझ्याकडून काय घडते ते लिहिते.
>>तुम्हाला दिलेली वचने तो वारंवार मोडतो का
साध्या साध्या गोष्टी - उदा. आज संध्याकाळी लौकर घरी येईन; या आठवड्यात हे अमके काम करेन अगदी नक्की; वगैरे.
नक्की जमणार नसेल तर "करेन" म्हणायला नको हे अजून मला लक्षात येत नाही!
>>तुम्हाला शिक्षा करायची म्हणून तो आपले प्रेम व पाठिंबा तो आखडता घेतो का?
भांडण झाले की अबोला.
बहुतांशी मुद्दे गंभीर स्वरूपाचे आहेत हे मान्य. आणि या साध्या मुद्द्यांचाही अतिरेक झाला तर परिस्थिती अवघड होणार हेही मान्य. आधी लिहिले तसे, मला वाटते एकुणात निर्णयस्वातंत्र्य या एका शब्दात सारांश सांगता येईल. मला काय करायचे आहे हे संपूर्णपणे मला ठरवता येते आहे का हा एकच प्रश्न विचारून काम भागेल.
ही चेकलिस्ट Objective आहे
ही चेकलिस्ट Objective आहे त्यामुळे ती अर्थातच आहे तशी Apply करता येणार नाही. मला वाटत कि चेकलिस्ट Apply करण्याआधी ह्यातील काही मुद्द्यान्ची Intensity १ ते ५ अशा स्केलवर लक्शात घेतली पाहीजे
मृदुला, मला असेच काहीसे
मृदुला, मला असेच काहीसे म्हणायचे होते. पण नीट मांडता आले नाही.
बाकी अमितचे "काही मुद्द्यान्ची Intensity १ ते ५ अशा स्केलवर " >>> अनुमोदन
अब्युज हा अब्युज असतो हे
अब्युज हा अब्युज असतो हे जाणूनपण बऱ्याच मुली, महिला त्या नात्यात जगत असतात. कारणे बरीच - मुले, आर्थिक परावलंबन, सामाजिक दबाव, प्रेम/ नातेसंबंध, गिल्ट - चुकीची किंवा बरोबर, पुढील आयुष्याबद्दल संभ्रम इ. इ. बायकाही अब्युज करतात हे खरे असले तरी आजच्या पुरुषसत्ताक समाजात त्या बहुदा विक्टिमच असतात - प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या.
UK मध्ये children witnessing डोमेस्टिक violence is a form of child abuse. मुलांवर याचे दूरगामी परिणाम होतात आणि त्यामुळे २००४ साली कायदा बदलून ही नवी तरतूद करण्यात आली. तेव्हापासून इथल्या child protection केसेसमध्ये DV केसेसमुळे प्रचंड वाढ व त्या अनुषंगाने अभ्यास व इतर सेवासुविधा वाढवणे याला महत्व मिळाले. आजघडीला फोन करायचा अवकाश तिसऱ्या मिनिटापासून पोलिस व इतर सेवा पुरवणाऱ्या - कौन्सेलिंग, शेल्टर, आर्थिक सहाय्य ई - कार्यरत होतात. इतके असूनही नवीन रिसर्चनुसार - सरासरी किमान ४० सिरिअस घटना घडल्याशिवाय DV रिपोर्ट होत नाही. एकदा झाल्यावर जेव्हा या महिला पुढे येतात - माझ्या कामात किमान ४-५ केसेस दिवसभरात येतातच -पहिला रिस्पोन्स नाही माझीच चूक होती, तो भडक डोक्याचा आहे, पण त्याचे माझ्यावर प्रेम आहे अशी अस्ते. किंवा याचवेळेस इतका सिरिअस प्रकार घडला, नाहीतर त्याचे माझ्यावर प्रेम आहे.
इथल्या साउथ आशियायी आणि भारतीय समाजात तर DVचे प्रमाण फार मोठे आहे. मुद्दा हा की हे सारे बावटे माहित असूनही आणि सगळ्याप्रकारचा सपोर्ट असूनही बायका पुढे येत नाहीत. भारतात तर फारच क्लिष्ट परिस्थिती आहे. बहुतांशी सेवा या NGO मार्फत आहेत, गरजेच्या मानाने अतिशय तोकड्या त्यामुळे मुलींना सक्षम करून जास्तीत जास्त स्वावलंबी बनवावे हा सर्वात उत्तम उपाय - दूरगामी असला तरी. या विषयवार चर्चा अनिवार्यच त्यामुळे या अकुचे आणि पोस्टचे अनुमोदन
शबाना +१
शबाना +१
Pages