ब्लाऊस पिस

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

आमच्याकडे विदर्भात खास करुन अकोल्यात आणि आजूबाजूच्या गावात कुणाच्या भेटीला एखादी स्त्रि गेली असेल आणि ती जर जवळची असेल तर तिला ब्लाऊज पीस देतात. आमच्याघरी जेंव्हा कपाट नव्हते तेंव्हा आई वेगवेगळ्या रंगाचे ब्लाऊज पीस एखाद्या कापडी पिशवीत नाहीतर पेटीत बोचकून ठेवून द्यायची. बर्‍याचदा तेच ब्लाऊज पीस आई इतर कुणाला द्यायची. दुकानदाराकडे जर तुम्ही डझनानी ब्लाऊज पीस विकत घ्यावयास गेलात तर ते आधी विचारत कुणाला द्यायला वगैरे असेल तर दुसरे पीस दाखवतो. ही दुसरी पीसे म्हणजे कमी किमतीची, सुती, आणि ६०-६५ सेंटीमीटरची असत. आमच्याघरातील सगळ्याच स्त्रिया म्हणजे आई, मावशी, आत्या, माझ्या पाच बहिणी कधी एकट्या जात नसत बाहेर बाजारात. माझी बहिण मला न्यायची. तीन चाकी रिक्षात बसायला मिळायचे म्हणून मी अगदी हरखून जायचो तिच्यासोबत बाहेर फिरायला. पुढे मग असे होऊन गेले की तिची आणि माझी एक जोडगोडी जमून गेली. पण रिक्षा ठरवताना ती इतकी घिसपिट करायची की सगळा मुड ऑफ व्हायचा. हीच गत चपला घ्यायला जाताना, साड्या घ्यायला जाताना, आणि ब्लाऊज पीस घ्यायला जाताना देखील व्हायची. तिची रंगसंगती पुर्वी खूप छान होती. पण नंतर नंतर असे झाले की एकाएकी तिच्या रंगसंगतीत फरक पडला. तिची रंगसंगतीची सगळी हुशारी माझ्यामधे तिने पास केली. हल्ली मी तिला भुतकाळात शिरुन इतके नाव ठेवते पण तिचे लक्षच नसते. आमच्याकडे मी भारतात गेल्यानंतर वर्षभर पुरतील इतके कपडे मला घरच्यांसाठी घेऊन ठेवावे लागतात. शेजारी राहणारे जोशी काका काकू पुर्वी अरे यशवंत आला का .. मग जा आमच्यासाठी दोन टॉवेल, दोन नऊवार, दोन उपरणे, एक डझन ब्लाऊज पीस, अर्धा डझन खण, दोन बंड्या, दोन धोतराच्या जोड्या हे सर्व आण. आणि पैसे घ्यावे लागतील. असे बजावून सांगत. जोशी काका वयाचा ९३ वर्षी निघून गेलेत. जाताना त्यांच्या अंगावर मी विकत आणलेले नवेकोर कपडे होते. मला तेंव्हा इतके भरुन आले होते की अगदी हे वाक्य लिहिताना देखील डोळ्यातून अश्रू ओघळतात. फोनवरुन त्यांची बातमी घ्यायला गेलो आण त्यांची भाची म्हणाली बघ तुला आता बाजारात जायची गरज भासणार नाही. पण, तू आणलेले कापड ते सोबत घेऊन गेले. मला ऐकवलेच नाही हे वाक्य.

माझी आत्या आणि आई ह्यांच्यामधे एक तेढ होती. पण ती तेढ कधीच खूप लांबली नाही. दोघीजणी एकमेकींच थोडफार करायच्यात. आईला एक पीस ती द्यायची तर आई तिला कधी चोळी बांगडी केल्याबिगर पाठवायची नाही. आमच्याकडे किती वेगवेगळी पाहूणे येत असत आणि अनोळखी मावश्यांची तर कधी कमतरता भासत नसे. मी सर्वात लहान म्हणून मला सतत ह्या मावशांचे प्रेम मिळत असे. अर्थात जाताना पैसे, येताना शेवचिवडा. त्यावेळी ते खूप मौल्यवान वाटे. आता जंक फुड म्हणून चार हात लांबच बरे!!!!

हा लेख मला मुद्दाम खूप लांबवायचा नाही. पण काल रात्री जुने मित्र पण आता मैत्री नसलेले मित्र भेटलेत. मला का कुणास ठाऊक ब्लाऊज पीसची ही वर्‍हाडी परंपरा आठवली. एखादे नाते टिकवून ठेवायला ह्या परंपरा खरच मदत करत असाव्यात. आमच्याकडे ब्लाऊस पीस उघडून पाहिले की जर त्यावर कुंकवाचे हातबोट असेल तर बहिणी म्हणायच्या हे काय जुनेच तर दिले. आणि हे काय फक्त ६५ सेमीचे पीस. पण त्यावर आईचे एकच उत्तर असे. दिले ना. ते महत्त्वाचे. आमच्या ऑफीसमधे बर्‍याच तमिळ तेलुगु मुली होत्या. भारतातून परत येताना वा ईंडोनेशियाला फिरायला गेलो तर मी तेथून त्यांच्यासाठी कापडच विकत आणायचो. वेगवेगळ्या देशातून गावातून शहरातून त्या त्या भागातली कापडाची दुनिया बघायला मला फार आवडते. त्यामुळे कुठेही फिरायला गेलो की मला जास्त दिवस लागतात कारण माझ्यासाठी खास पर्यटक स्थळे कधीच पर्यटन स्थळे नसतात. मला हवी असते, तिथली भाषा, तिथली घरे, तिथली झाडेझुडपे, तिथले गरीब, तिथल्या झिजलेल्या गल्ल्या आणि खूप काही. माझ्या कलीग्सना माझी ही भेट वेगळीच वाटायची. आणि त्यामुळे मी जरा इतरांपेक्षा वेगळाच व्हायचो. आज खूप दिवसानंतर मला अनुचा फोन आला तर ती म्हणाले अरे देखो कलही मैने एक कुर्ता सिलवाया तुनमे दिये हुये बाटिक का!!! त्यावर मी उत्तरलो... चलो इस बहाने आपको हमारी याद तो आयी!!!!!!!!

- बी

विषय: 
प्रकार: 

खूप छान लिहिलं आहे.

आता त्या ब्लाऊज पीसची जागा अनेक वस्तूंनी घेतली आहे. असे काही देताना प्रेम असले अरी पण ओटी भरण्यात असलेला गोडवा त्या वस्तू देण्यात नसतो.

मी स्वतः कधीच कोणाची ओटी भरली नाही. मला ती प्रथा फारशी आवडत नाही अनेक कारणांमुळे. पण तरीही कारणे बाजूला काढली तर ओटी भरणे ब्लाईज पीस देणे टॉवेल टोपी देणे ह्यात खूप गोडवा वाटतो.

ही प्रथा महाराष्ट्र आणि मला वाततं कर्नाटकात सुद्धा आहे. कर्नाटकात काही ठिकाणी नारळा ऐवजी सुपारी वापरतात. आता तर कापलेल्या सुपारीचं पाकिट वापरतात. प्रथांच विडंबीकरण वाटतं मला हे.

बी खूप निरागस साधी मांडणी.
शेवटचा पॅरा तर खूप आवडला. मला हवी असते, तिथली भाषा, तिथली घरे, तिथली झाडेझुडपे, तिथले गरीब, तिथल्या झिजलेल्या गल्ल्या आणि खूप काही.>> खूप छान.
मवा प्रतिसाद खूप आवडला. अजून देखील या साध्याच विषयावर लिहीण्यासारखं बरंच आहे, पण आता थांबते.>> लिही ना वाचायला नक्की आवडेल.

मस्तच लिहिलंयस रे बी Happy सगळ्यांना हळवं करून सोडलंस..
इतर सगळीकडे आहे तशी कोल्हापुरातही अजून सुरू आहे ही प्रथा.. अजूनही प्रत्येक भेटीत मी २-४ पीसेस घेऊन येते... आता दर्जा मात्र चांगला असतो पीसेसचा Happy

मस्त लेख, बी,

प्रतिसाद वाचल्यावर जाणवले की सगळ्यांनाच भूतकाळात घेऊन गेलाय तुझा लेख.

बी मला ही आवडलं लिखाण. मनाच्या कोपर्‍यात साठवून ठेवलेल्या आठवणींना तू उजाळा दिलास आणि आम्हालाही त्यात सहभागी केलंस स्मित >> +१. छान लिहिलयंस बी! प्रतिसादही आवडले.

मस्त लिहिले आहेस. आई अजूनही चांगल्यातले ब्लाऊजपिस घरी आणून ठेवते (दुसर्या गिफ्ट आयटममध्ये अत्तर आणि चांदीच्या पॉलिशच्या वस्तू असतात) काहीही दिलं तरी ब्लाऊजपिस दिला नाहीतर उपयोग नाही असा तिचं मत. त्यातही चांगल्या सुखवस्तू घरातल्या बायका आल्या तर आई कित्येकदा देत नाही, पण गरीबाघरची बाई आली तर् मात्र हमखास पैसे अथवा वस्तू देऊन ओटी भरतेच. कोकणात नारळाचं काही अप्रूप नाही त्यामुळे ओटीमध्ये कित्येकदा नारळ न देता ड्रायफ्रूटचं छोटं पाकिट घालते.

बी,

I am not very active on Maayboli these days and not comfortable in typing in marathi. So instead of writing in English Marathi, writing in English Happy

Your article took me back to Akola. Thanks so much. Even today my mother buys such pieces but then says Punyat hi paddhat nahi & importantly no one wears saree. But even i keep some spare with me.

Thanks..your articles and recipes are very nostalgic for me Happy

Keep writing about Akola and Vidarbha Happy

Pages