ट्रेकर आजोबा

Submitted by कविन on 7 May, 2014 - 04:16

ट्रेकर आजोबा

वर्तमानपत्रात आलेली एक छोटीशी बातमी जी आपल्यापैकी बर्‍याच जणांनी वाचलेली असेलच पण त्या बातमीच्या धाग्याभोवती जाळं विणत विणत त्याचा सिनेमा बनवावा हा विचार ज्याच्या मनात सर्वात प्रथम आला त्या व्यक्तीचं खरच कौतुक वाटतं. मराठी सिनेमांमधे गेल्या दोन तीन वर्षात खूप चांगले चांगले विषय हाताळले जात आहेत हे नक्कीच सुखावह चित्र आहे आणि हा सिनेमाही तशीच सुखावह जाणिव करुन देणारा आहे. अनावश्यक गाणी नाहीत, पब्लीक को अच्छा लगता है म्हणून मधेच चिकटवलेलं आयटम सॉन्ग नाही ह्या ही बाबी सुखावह गटात जमा होणार्‍या.

दिग्दर्शकाला बघीतल्यावर "छोटा बच्चा जानके हमको ना समझाना रे.." वाजलं मनात. किती लहान आहेत/वाटतात ते वयाने. पण काम एकदम वाघोबा/ आजोबा केलय. ह्यांच्याकडून अशाच चांगल्या सिनेमांची अपेक्षा राहील ह्यापुढेही. सिनेमा पाहून बाहेर पडल्यावर खरतर हा विषय घेऊन सिनेमा करावासा वाटला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायची इच्छा होती पण एकतर त्यांच्या भोवती खूप गराडा होता लोकांचा आणि सेलेब्रिटी वर्तुळामधे घुसून असं तिथे जाऊन सांगणं हे माझ्या प्रकृतीला झेपणारं नव्हतं म्हणून तो विचार बाद केला.

अभिनयाच्या बाबतीत ऋषिकेश जोशीचा ज्ञानोबा एक नंबर. त्याची देहबोली जबरदस्त. मला त्याचं काम एरव्हीही आवडतं. त्याचा वावर फारच सहज होता. कथानकात चिकटवलेलं आयटम सॉन्ग नव्हतं खरं पण चिकटवलेलं जोड कथानक मात्र होतं "शिवा आणि त्याच्या प्रेमपात्राचं". त्या जोड कथानकाचं प्रयोजन पहिल्यापासून शेवटपर्यंत अजिबातच कळलं नाही. त्यांचा पडद्यावरचा पहिलाच सीन होता थोडासा इंटिमेट असा लव्ह सीन, तो सीन चालू झाल्याबरोबर बाजुला बसलेल्या लेकीची प्रतिक्रीया "आई, पिक्चर आत्ता सुरु झाला आणि लगेचच का दुसर्‍या मुव्हीचं ट्रेलर दाखवतायत?" थोडक्यात काय तर वय वर्ष १० ला सुद्धा तो सीन तिथे परका वाटला, ठिगळ लावून जोडल्यासारखा. आणि पुढेही सिनेमा संपेपर्यंत मी विचार करत होते की ह्या जोडीला दाखवून आणि तो सीन दाखवून नेमकं काय साधलं. "शिवा" चं काम ज्याने केलय त्याने छानच केलय पण त्याचा अभिनय दिसण्यासाठी ह्या ठिगळाची आवश्यकता नव्हती असं माझं मत. त्या ऐवजी ज्ञानोबा आणि इंदी म्हणजे ऋशीकेश जोशी आणि त्याची जी बायको दाखवलेय त्यांचे संवाद/ सीन्स वाढवले असते तरी चाललं असतं.

"जनावरांना समजायला थोडं जनावर व्हावं लागतं.अक्षरशः आपल्या अंगाला, जगण्याला त्या निसर्गाचा, त्या पानांचा, फुलांचा वास यायला लागतो ना तेंव्हा कुठे जाऊन निसर्ग थोडासा समजायला लागतो." असं म्हणणार्‍या पुर्वा ह्या व्यक्तिरेखेचा ध्यास, अभ्यास, झोकून देणं हे सगळच अभ्यासकरून अगदी पद्धतशीर पणे बांधलय हे सिनेमा बघताना जाणवतं. मुळात कागदावर ही व्यक्तिरेखा खूप सशक्त उतरलेय. उर्मिलाने ती छान कॅरी केलेय. उर्मिलाचं वय आता जाणवू लागलय हे सिनेमा बघताना जाणवतं पण खटकत नाही कारण त्याच वयाचं ते कॅरेक्टर आहे. तिचा वावर बर्‍यापैकी सहज आहे. मराठी उच्चारही सदोष नाहीत.

प्रभावळकरांचा आशावादी सर अगदीच थोडावेळासाठी डोकावून जातो पण तरिही आवडतो.

बिबट्याच्या हल्ल्याच्या वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या, विश्वेशच्या (माबो आयडी विवन) ऑफीस मधे सिक्युरीटी गार्ड वर झालेला हल्ला, तिथल्या सिसिटिव्ही मधे आम्हाला बघायला मिळालेलं बिबट्याचं दर्शन, आपल्या जवळच्या व्यक्तींच्या जीवाच्या काळजीने उडालेली झोप ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असल्याने जितका "पुर्वाचा" (उर्मिलाने साकारलेल्या व्यक्तीरेखेचा) ध्यास खरा वाटतो, जितकं अन्न निवारा ह्या मुलभूत गोष्टींसाठी बिबट्याला प्रवास करावा लागतो हे पटतं तितकाच खरा यशपाल शर्माचा विरोधही वाटतो. दोघेही आपापल्या जागी योग्य वाटतात. त्यांची भुमिका तशी एकदम छोटी असली तरी त्यामुळेच ह्या सर्व विषयाला एकाच रंगात रंगण्यापासून रोखलय. तराजूचं पारडं सगळंच्या सगळं एका बाजूला झुकण्यापासून वाचवलय.

पण ठिक आहे असे काही प्लस मायनसेस तर असतातच प्रत्येक कलाकृतीत. तरीही ह्या "आजोबाच्या" प्रेमात पडावं इतका तो लोभस आहे. त्याचे डोळे, त्याच्या अंगावरचे ठिपके, त्याचं ट्रेकींग सारच त्याच्यात गुंतवतं आपल्याला. माळशेज घाट परिसर, डोंगर रांगा बघताना तर ट्रेकींगची सुरसूरी येते.

घारुने तारे द्यायची सुरुवात केलेय तर माझ्याकडून ह्या आजोबाला पाच तारे.

--------

आता प्रिमीअर विषयी

आजकाल बातम्यांमधेही कधी पाऊस पाण्याची वर्णन यायची झाली कुठे पावसाचं पाणी साचून वहातुक कोंडी झालेय इ.इ. बातम्या द्यायच्या झाल्या तर वेस्टर्न सबर्बच्या बाहेर कोणी रहातं ह्याचा ह्या मेडीया वाल्यांना पत्ताच नसल्यासारखं वाटत रहातं. तसच बॉलीवूडी क्राऊडला आमंत्रण द्यायचं असेल तर जुहू, अंधेरी फ़ारच झालं तर गेला बाजार (सॉरी बझार यु नो) लोअर परेल इतकाच विचार करावा लागतो. त्यापलिकडे कोणी रहातच नाही बहुतेक. डोंबिवलीत नाही चांगला मॉल किंवा थिएटर पण ठाणे/मुलूंड/कांजुर/वाशी इ. ठिकाणांचा विचार अधून मधून करायला काहीच हरकत नाही असं आपलं आम्ही मनात म्हणून घेतलं आणि ८ च्या शोचे पासेस ७ ला मिळणार म्हणून ४ वाजता आमचं घर सोडलं.

तिथे पोहोचल्यावर पासेस ताब्यात घेऊन कधी ह्या पायावर जोर दे कधी त्या असं करत उभे राहिलो. सेलेब्रिटींपैकी ह्या सिनेमात शिंदेंचं काम करणारा कलाकार, ह्या सिनेमाचा संगीत दिग्दर्शक आणि एका लग्नाची ३ री गोष्ट फेम स्पृहा जोशी हेच एकदम वेळेत होते आणि ते कुठलही स्टारपणाचं कवच घालून वावरत नव्हते. बाकीचे लोकं येईपर्यंत "आजोबा- बिबट्याचा" पोशाख घातलेल्या व्यक्ती बरोबर मुलांनी खूप धम्माल केली. धम्माल म्हणजे त्याच्या सोबत फोटो काय काढले, सानिकाने त्याच्या कपड्यांचा, चषम्याचा पोत बघून काय मटेरिअल वापरलं असेल ह्याचा अभ्यासही केला. त्याला किती उकडत असेल असं वाटून त्यांचं चुकचुकूनही झालं.

मराठी मालिकांमधील कलाकारांनी मात्र हजेरी लावली होती. आणि बर्‍याचश्या कलाकारांचे पाय एकदम जमिनीवर आहेत हे ही जाणवत होतं. स्पेशली मध्यंतरामधे जेव्हा आम्हाला दिलेल्या कुपन्सवर आम्ही पॉपकॉर्न इ. घेण्यासाठी रांगेत उभे होतो तेव्हा आमच्या मागे वैभव तत्ववादी उभा होता. त्याने त्याचा नंबर येईपर्यंत पेशंटली वाट बघीतली.

सिनेमा संपला तशी नेमकी मीच काही कारणाने पहिले बाहेर पडले आणि समोरच बाईट घ्यायला लोकं उभे होते त्यांनी गाठले. लक्ष लेकीकडे आणि समोर आलेला अनपेक्षीत प्रश्न ह्यामुळे थोडी गांगरुनच गेले. मग एका वाक्यात उत्तरे द्या टाईप "सिनेमा मस्त होता" असं उत्तर देऊन तिथून निघाले. तिथून पुढे गेल्यावर मात्र वाटलं अरे असं काय एका वाक्यात बोललो आपण. काय आवडलं हे तर सांगायचं होतं. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

सरते शेवटी हे सगळं अनुभवणं ज्यामुळे शक्य झालं त्या मायबोलीचा उल्लेख न करणं अजिबातच योग्य होणार नाही. मायबोलीने नुसतीच हा प्रिमिअर बघायची संधी दिली असं नाही तर हा प्रिमीअर शो खूप उशीराने संपतो, शो एका टोकाला आणि मी रहाते दुसर्‍या टोकाला पण जर उशीर झाला तर मला हक्काचं मुक्काम करायला ठिकाणं देण्याची देन पण मायबोलीचीच. धन्यवाद मायबोली

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख!! अगदी मनापासून आणि मोकळेपणे लिहिलं आहेस!

आई, पिक्चर आत्ता सुरु झाला आणि लगेचच का दुसर्‍या मुव्हीचं ट्रेलर दाखवतायत?
>>>> क्युट्ट सानु! Lol

Happy

mast

छानच लिहिलयंस, कविता Happy

"आई, पिक्चर आत्ता सुरु झाला आणि लगेचच का दुसर्‍या मुव्हीचं ट्रेलर दाखवतायत?">>>>आज फोटो अपलोड करताना हेच आठवलेलं. Happy

मस्त लिहीलं आहेस. यावेळेसही प्रिमियर आणि आपली भेट हुकली. Sad
प्रिमियरला लेकीला न नेण्याचे परिमार्जन ९ तारखेचा शो दाखवुनच करायचे आहे असे सांगुन झालेय.

पुढच्या वेळेस ठाणे / मुलुंड इ. ला ++ Wink