सामाजिक कार्यकर्त्या आसावरी देशपांडे : मुलाखत

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 24 April, 2014 - 05:48

अर्थसंकल्पाच्या विश्लेषणापासून आपल्या करीयरची सुरुवात करून कालांतराने नाशिक परिसरातील सेक्स वर्कर्स, समलिंगी व तृतीयपंथींच्यात एचआयव्हीसंबंधी जागृती निर्माण करताना सेक्स वर्कर्सच्या पुनर्वसनासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटणार्‍या आसावरी देशपांडेंचा प्रवास हा नेहमीच्या चौकटीपेक्षा वेगळा आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने बघायला लावणारा आहे. त्यांचे काम जरी सेक्स वर्कर्स किंवा वारांगना, तृतीयपंथी लोकांच्यात एचआयव्ही जागृती संदर्भात असले तरी ह्या कामाचा संबंध संपूर्ण समाजाशी आहे. महाराष्ट्रात पुणे-मुंबईखेरीज इतर लहान-मोठ्या शहरांमध्ये, तालुका-जिल्ह्याच्या पातळीवर या क्षेत्रात खोलात जाऊन काम करणार्‍यांची संख्या तशी कमीच आहे. स्थानिक पातळीवर प्रस्थापित समाजाचा मोठा विरोध सहन करत आपले काम चिकाटीने, न घाबरता चालू ठेवणे ही गोष्ट सोपी नाही. आसावरी देशपांडेंसारख्या ह्या कार्यास वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांमुळेच ह्या क्षेत्रात हळूहळू जागृती वाढीस लागत आहे. त्यांच्याकडून त्यांच्या ह्या प्रवासाविषयी जाणून घ्यायचा केलेला हा अल्प प्रयत्न!

1 asawari profile1.jpg

श्रीमती आसावरी देशपांडे

तुमच्या करीयरची सुरुवात तुम्ही अर्थसंकल्पाच्या विश्लेषणापासून केलीत. त्याबद्दल सांगाल का?

कला शाखेतून पदवी घेऊन मी एम एस डब्ल्यू करत असताना विधायक संसद नावाच्या विवेक पंडितांच्या संस्थेत मला प्रकल्प समन्वयकाचे काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचा सामाजिक संस्थांच्या दृष्टिकोनातून अभ्यास करून त्याचे विश्लेषणात्मक सादरीकरण विधानसभा प्रतिनिधी व प्रसारमाध्यमांसाठी करायचे हे ते मुख्य काम होते. आपल्या अर्थसंकल्पाचा ह्या दृष्टीतून अभ्यास करण्याचा अनुभव, प्रशासकीय अधिकारी व विधानसभा प्रतिनिधींशी संवाद तसेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचा अनुभव मला ह्या निमित्ताने मिळाला. अर्थसंकल्पात समाजकल्याण खात्यासाठी केली जाणारी आर्थिक तरतूद ही कशा प्रकारे केली जात आहे, त्यात कोणत्या त्रुटी आहेत, कशा प्रकारच्या तरतुदीची आवश्यकता आहे इत्यादी गोष्टींचा बारीक अभ्यास करून विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींना त्याबद्दल माहिती देणे - जेणेकरून ते अर्थसंकल्पातील त्या त्या मुद्द्यांबाबत भांडू शकतील - योग्य वाटपाबाबत जोर लावू शकतील इत्यादी. समाजकल्याण, महिला व बालकल्याण विभागांत कित्येकदा निधीअभावी काही गोष्टी घडत नाहीत किंवा पूर्ण होऊ शकत नाहीत. अशा वेळी त्या गोष्टी प्रसारमाध्यमांपुढे आणणे, विरोधी पक्षाच्या आमदारांपुढे आणणे, दक्षतापूर्वक देखरेख हे सारे आवश्यक असते.

तसेच अर्थसंकल्पाची सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत उकल करून प्रसारमाध्यमांसाठी सांगणे हेही काम असायचे. या संदर्भात मी निर्मला निकेतन व टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथील एम एस डब्ल्यू शिकणार्‍या विद्यार्थ्यांना लेक्चर्सही दिली.

विधायक संसदेच्या कामाअंतर्गत म्हाडा व झोपडपट्टीवासीयांसोबत १८ महिने काम करण्याचाही अनुभव मिळाला. सामाजिक संस्था व प्रसारमाध्यमांसाठी मी पुणे-मुंबईत पॉलिसी अ‍ॅडवोकसीसाठी बजेट अ‍ॅनॅलिसिसच्या कार्यशाळाही घेतल्या.

आमचे हे काम फोर्ड फाऊंडेशनच्या सहकार्याने चालू होते. त्यांच्या माध्यमातून मला अर्थसंकल्पाच्या विश्लेषण संदर्भात अमेरिकेत झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेतही सहभागी होण्याची संधी मिळाली.

मुंबईच्या तुमच्या या कामातून तुम्ही नाशिकच्या वारांगना व तृतीयपंथीयांमध्ये एच आय व्ही जागृती संबंधित कामाकडे कशा वळलात?

लग्न करून मी नाशिकला आले आणि त्यानंतरची सुरुवातीची काही वर्षे मी घर, संसार करण्यात घालवली. पण मग धाकटी मुलगी पाच वर्षांची झाल्यावर मी पुन्हा काम करायचा निर्णय घेतला. नोकरीसाठी अनेक अर्ज केले, त्यातून पाच-सहा ठिकाणांहून मुलाखतीसाठी बोलावणेही आले. परंतु मला प्रवरा मेडिकल ट्रस्ट येथील नोकरीची संधी सर्वाधिक खुणावत होती. त्यांच्या मुक्ता प्रकल्पासाठी प्रकल्प समन्वयक या पदावर २००५ साली माझी नियुक्ती झाली. तेव्हापासून आतापर्यंत मी ह्या कामात आहे. नाशिक व परिसरातील वारांगना, तृतीयपंथी व समलिंगींमध्ये एच आय व्ही, गुप्तरोग व एड्स प्रतिबंधासंबंधी जागृती अभियानाच्या ह्या प्रकल्पाची समन्वयक हे माझ्यासाठी आव्हानात्मक काम होते व आजही आहे. ह्याचं कारण आतापर्यंत नाशिकमध्ये त्या प्रकारचं काम झालंच नव्हतं. पुण्या-मुंबईसारख्या शहरांमध्ये ज्या प्रमाणावर काम झालं आहे त्याच्या तुलनेत इथे अजिबात काम झालेलं नव्हतं. नाशिक, सिन्नर, मनमाड व आजूबाजूचे तालुके, परिसरांतील समाजात यासंदर्भातील जागृती खूपच कमी होती. येथील सेक्स वर्कर्स, तृतीयपंथी व समलिंगी लोकांशी संवाद साधून मला त्यांच्यापर्यंत एच आय व्ही, एड्स संदर्भातील माहिती, प्रशिक्षण, जागृती हे सारं पोचवायचं होतं. पाथफाईन्डर इंटरनॅशनल संस्थेचा निधी आम्हाला कामासाठी उपलब्ध झाला होता. (नंतर २०१० पासून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचा निधी उपलब्ध झाला.) पण ज्या लोकांपर्यंत पोहोचायचं त्यांच्याशी संवाद कसा साधायचा इथपासून आमची तयारी होती.

कसे होते ह्या कामाचे सुरुवातीचे दिवस?

नाशिक शहरात तेव्हा आम्हाला आमच्या कार्यालयासाठी जागा द्यायलाही कोणी तयार नव्हते. कशीबशी एक जागा मिळाली तिथे ऑफिस थाटले. सुरुवातीच्या काळात आम्ही सेक्स वर्कर्स व तृतीयपंथींच्यात एच आय व्ही साठी वैद्यकीय तपासणी, कंडोम वापरणे यांबाबत जागृती मोहीम सुरू केली तेव्हा हे लोक आमच्याशी बोलायचे नाहीत. प्रतिसाद मिळायचा नाही. पण आम्ही हार मानणार्‍यातील नव्हतो. हळूहळू आमचे काम बघून या लोकांचा आमच्यावर विश्वास बसायला लागला. या व्यवसायात काम करणार्‍या बायकांचा विश्वास मिळवणं ही अजिबात सोपी गोष्ट नव्हती. बर्‍याच बायका फसवल्या जाऊन, बळजबरीने या क्षेत्रात आलेल्या होत्या. काहीजणी नाईलाजाने, चरितार्थासाठी हा धंदा करत होत्या. त्यांना जगायची इच्छा नव्हती. 'झाला आजार तर होऊ देत, असं कुठे आमचं जिणं सुधारणार आहे!' अशी भावना होती. मग त्यांना 'तुम्हाला तुमच्या मुलांसाठी जगले पाहिजे. आरोग्याची काळजी घेतली पाहिजे,' असे म्हणून त्यांची समजूत घालायचो. त्यांच्याशी बोलताना त्या त्यांची गार्‍हाणी मांडायच्या, समस्या सांगायच्या. तसेच फक्त त्यांच्याशीच संवाद साधून उपयोग नव्हता. मग त्यांच्या कोठ्याच्या मालकिणींशी देखील आम्ही बोलायला लागलो. कंडोमचा वापर, ह्या स्त्रियांची नियमित आरोग्य तपासणी, एच आय व्ही पॉझिटिव आल्यास त्यानुसार वैद्यकीय उपचार करणे ह्यासाठी मालकिणींचे मन वळविणेही आवश्यक होते. त्याचे महत्त्व त्यांना पटवून देणे आवश्यक होते.

2 asawari Regular Meeting at office.jpg

आसावरी ताई आपल्या कार्यालयात सेक्स वर्कर्सशी संवाद साधताना

ह्या स्त्रियांच्या इतरही अनेक अडचणी होत्या. मग त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडविणे, मुलांच्या जन्म दाखल्यांसाठी त्यांना मदत करणे, त्यांना रेशन कार्ड व इलेक्शन कार्ड मिळवून देणे अशा अनेक कामांमध्ये आम्ही पुढाकार घेतला. परिणामी या स्त्रियांचा विश्वास आम्ही संपादन करू शकलो. स्थानिक प्रशासनाशी संवाद साधून त्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार कार्यवाही करायला लावू लागलो.

ह्या स्त्रियांना समाजाने एका कोपर्‍यात, जवळपास आपल्या परिघाच्या बाहेरच ठेवले आहे. त्यांच्यात जर बदल घडवून आणायचा असेल तर पहिल्यांदा त्यांना मुख्य प्रवाहात आणणे जरुरी आहे. त्यासाठी त्यांच्याजवळ भारताच्या नागरिकाकडे असणारी किमान कागदपत्रे, ओळख असणे गरजेचे आहे. त्याशिवाय या स्त्रियांची समाजात ओळख पटणार कशी? त्यांची कामे होणार कशी? त्यामुळे हे फार महत्त्वाचे होते.

इथे पुन्हा काही ठिकाणी नैतिक प्रश्न उभे राहिले. काही वेळा मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या आईपासून कित्येकदा दूर करावे लागायचे. इतक्या लहान वयात मुलाला शिक्षणासाठी आईपासून दूर करणे योग्य आहे का, हा प्रश्न मनाला सतावायचा. पण अन्यथा त्या मुलांच्या शिक्षणाचे काम होऊ शकले नसते. मग मुलांच्या आयांचे समुपदेशन करून त्यांना मुलाच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, ते मूल आईपासून दूर राहण्याला पर्याय नाही हे समजावून सांगणे हेही केले. 'तुम्हाला तुमच्या मुलांसाठी चांगलं जगावं लागेल' हे समजावून सांगून मुलांच्या आयांच्या वर्तनात बदल घडवून आणण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो.
गेली पाच वर्षे आमच्या कार्यालयात येथील मुलांसाठी आम्ही इंटरव्हिडा जागृती संस्थेच्या माध्यमातून अभ्यास, गाणी, गोष्टी व इतर अभ्यासेतर गोष्टींचे वर्ग घेतो.

3 asawari Regular Meeting at office (2).jpg

सेक्स वर्कर्सबरोबर मीटिंग

त्यासोबत आम्ही सेक्स वर्कर्सचे बचत गटही सुरू केले. त्यांना बँकेत आपली खाती उघडायला लावली. जिथे जिथे त्यांना अडचणी आल्या तिथे त्यांचे निवारण करायला मदत केली.

ह्या शिवाय कोठ्यांवर रात्री बेरात्री पोलिस रेड्स पडायच्या, पोलिस ह्या बायकांना अटक करून पोलिस स्टेशनात न्यायचे. त्यांना अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळायची. मग त्या वेळी पोलिस स्टेशनात जाऊन ह्या बायकांसाठी भांडायचे कामही केले. आपले म्हणणे प्रभावीपणे मांडता यावे यासाठी माझे स्वतःचे वाचन मी वाढवले. प्रिवेन्शन ऑफ इममॉरल ट्रॅफिकिंग अ‍ॅक्ट (PITA - पिटा) कायदा काय सांगतो? आतापर्यंतचे कोर्टाचे निर्णय काय आहेत? ह्याचा अभ्यास केला. पिटा कायद्यानुसार देहविक्रयाच्या व्यवसायातील दलाल व मालकीण हे गुन्हेगार आहेत. वेश्या ही गुन्हेगार नाही. उलट ती ह्या कायद्यानुसार शोषित किंवा पीडित आहे. अर्थात सॉलिसिटींग करणे, सार्वजनिक ठिकाणी देहविक्रय करणे इत्यादी गोष्टींसाठी वेश्या गुन्हेगार ठरू शकते. परंतु कोणाही व्यक्तीने हे केले तरी तो गुन्हाच आहे. त्यासाठी ती व्यक्ती वेश्या असण्याची गरज नाही.
परंतु ज्या काही रेड्स पडायच्या त्यात पोलिसांचे वेश्यांशी असणारे वर्तन फारच आक्षेपार्ह असायचे. पोलिस स्टेशनमध्ये त्यांना दिली जाणारी वागणूक अवमानजनक असायची. ह्यात प्रोटोकॉल हा पाळला जाताना दिसायचा नाही. आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा केल्यावर असे लक्षात आले की पोलिसांनाच खुद्द प्रोटोकॉल माहीत नव्हता! ते नैतिकता आणि कायदा यांच्यात प्रचंड गल्लत करत होते. त्यामुळे त्यांचे वर्तन ह्या स्त्रियांशी अजिबात ठीक नव्हते. खरे तर आम्हाला अशी अपेक्षा नव्हती. परंतु एकदा ही गोष्ट लक्षात आल्यावर त्या दृष्टीने पोलिसांशी संवाद सुरू केला. रेडच्या वेळी पोलिसांनी ते जशी वागणूक दलाल व कोठा मालकिणींना देतात तशी वागणूक त्यांनी वेश्यांना देऊ नये यासाठी हालचाल सुरू केली. मग रेड पडली की आमच्यापर्यंत खबर यायची. आम्ही पोलिस स्टेशनला फोन करायचो. सेक्स वर्कर ही पिटा कायद्यानुसार शोषित किंवा पीडित असते. तिला स्पेशल मॅजिस्ट्रेट समोर उभे करून महिला सुधारगृहात पाठवता येते.

एका वेळी पोलिस रेडमध्ये अशा ४२ सेक्स वर्कर्सना अटक केली पण त्यांना कोर्टासमोर उभे करण्यातच आले नाही. असा एखाद्या व्यक्तीच्या भवितव्याचा निर्णय परस्पर कसा काय घेतला जाऊ शकतो? शिवाय जेव्हा त्या स्त्रीला सुधारगृहात पाठवतात तेव्हा तिच्या माघारी तिच्यावर अवलंबून असलेली मुलं, इतर कुटुंब असतं. तिच्या अटकेने हे कुटुंब रस्त्यावर येतं. अशा वेळी सुधारगृहात जाण्यासाठीही त्या स्त्रीची मानसिक तयारी करणे आवश्यक असते. तुम्हाला जर त्या स्त्रीमध्ये बदल घडवून आणायचा असेल, तिच्या परिस्थितीत बदल घडवायचा असेल तर त्यासाठी तिची मानसिक तयारी हवी. नाहीतर ती प्रतिसाद कसा काय बरे देईल?

आम्ही या सर्व गोष्टी मग कलेक्टरशी बोललो. पोलिसांसमोर हे मुद्दे मांडले. कायदा काय सांगतो? पोलिसांची भूमिका काय हवी? त्यांनी काय केलं पाहिजे? कोणत्या प्रोसिजर्स फॉलो केल्या पाहिजेत? ह्यासाठी आम्ही खूप पाठपुरावा केला. पोलिसांचा याबाबत अवेअरनेस वाढावा म्हणून प्रयत्न घेतले.

तुम्ही प्रसारमाध्यमांसोबतही ह्या बाबतीत काम केलेत, त्याबद्दल सांगता का?

हो, आम्हाला असे जाणवले की प्रसारमाध्यमे, खास करून प्रिंट मीडिया हा सनसनाटी बातम्या देणे, भडक मथळे रंगवणे ह्या नादात सेक्स वर्कर्स संबंधी समाजाच्या मनातली प्रतिकूल भावना दृढ करण्यास मदत करत होता. मग आम्ही त्यांच्याही कार्यशाळा घेतल्या. पिटा कायदा काय सांगतो हे त्यांना समजावून सांगितले. कोणाचा काय रोल आहे, बातम्या देताना त्या कशा दिल्या पाहिजेत, कोणते भान ठेवले पाहिजे याबद्दल त्या कार्यशाळांमध्ये सांगितले. त्याचा परिणाम कालांतराने हळूहळू का होईना, दिसू लागला. मुख्य म्हणजे प्रिंट मीडियाचा अप्रोच बदलण्यात आम्हाला थोडेफार यश आले.

5 asawari collage workshops.jpg

प्रसारमाध्यमांबरोबर व पोलिसांबरोबर कार्यशाळा

काय आहे ना, इथेच नैतिकता व कायद्याची गल्लत होण्याची शक्यता खूप आहे. बंगाल मधील एका दाव्याचा संदर्भ द्यावासा वाटतो. एका माणसाने एका वारांगनेचा खून केला आणि कोर्टात त्याने आपली बाजू मांडताना सांगितले की ती तर वेश्याच होती, मग तिला मारून मी चांगलेच केले. मला वाटत नाही मी काही गुन्हा केला आहे! सुप्रीम कोर्टाने तेव्हा सुओ मोटो ती केस पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन मध्ये बदलून घेतली. त्या व्यक्तीला शासन झाले. पण सांगायचा मुद्दा हा आहे की ह्या नैतिकतेच्या कल्पनांमुळे जनतेला कायद्याचेही भय वाटत नाही किंवा गुन्हा केला तरी आपण केलेले कृत्य हे गुन्हा नाहीच अशीही काहींची भावना असू शकते. आणि म्हणूनच वारांगनांसाठी कायदा काय सांगतो हे समजून घेणे आवश्यक आहे. लोकशाहीत आपण कायद्याचे पालन करतो.

म्हणूनच आम्हाला पोलिस, सरकारी प्रशासकीय व्यवस्था, प्रसारमाध्यमे आणि या क्षेत्रात काम करणार्‍या सेवाभावी संस्था यांचे समायोजन होणे महत्त्वाचे वाटते. तसा समन्वय साधण्याचा आम्ही प्रयत्न केला.

नाशिक व परिसरातील सेक्स वर्कर्सना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी तुम्ही जे कार्य केले आहे त्याबद्दल सांगाल का?

जसजसा सेक्स वर्कर्सचा आमच्यावर व आमच्या कामावर विश्वास बसू लागला तसतशा त्या एच आय व्ही बद्दल अधिक सजग झाल्या, नियमितपणे वैद्यकीय तपासणीसाठी जाऊ लागल्या, उपचार घेऊ लागल्या. आम्ही त्यांची संघटना बनवण्यास त्यांना प्रवृत्त केले. लोकशाही पद्धतीने मतदान करून ह्या स्त्रियांनी आपल्या प्रतिनिधी निवडल्या. २५० महिलांनी मतदान केले. ११ बायकांची कमिटी स्थापन झाली. आम्ही ही संघटना नोंदणीकृत होण्यासाठी साहाय्य केले. दिशा महिला बहुउद्देशीय संघटना असे तिचे नामकरण झाले. गेली ३ वर्षे ही संघटना कार्यरत आहे. स्वतंत्रपणे त्यांचे काम चालू आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांचाही दृष्टिकोन बदलण्यास मदत झाली.
बी पी एल कार्डासाठी, किंवा संजय गांधी निराधार योजना, सुवर्ण जयंती योजना इत्यादींसाठी ह्या स्त्रियांना विचारात घेतलंच जात नाही. त्यांचे सर्व्हे ह्या महिलांपर्यंत कधी पोहोचतच नाहीत. मग आम्ही ही बाब नगरपालिकेच्या लक्षात आणून दिली. त्यावर कार्यवाही अद्याप चालू आहे.

दरम्यान समाजाच्या खतरनाक दृष्टिकोनाची झळ आम्हालाही बसली. आमच्या ऑफिसमध्ये मोडतोड झाली. लोकांचे म्हणणे होते की तुम्ही ह्या सेक्स वर्कर्सना उत्तेजन देता! ह्या स्त्रियांना तुम्ही व्यवसाय बंद करा म्हणणे सोपे आहे. पण मग त्या जाणार कोठे, कमावणार काय आणि खाणार काय? आज अनेकींची कुटुंबे त्यांच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत. त्यांनी काय करायचं? त्यांच्या मुलांनी कुठे जायचं?

ह्यासाठी सर्वप्रथम आवश्यक आहे ते ह्या स्त्रियांचे पुनर्वसन! आम्ही तक्रार करणार्‍या समाजातल्या नेत्यांना आवाहन केलं की तुम्ही ह्या स्त्रियांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करा! एका रात्रीत सर्व वेश्यागृहे बंद करून काम भागणार नाही!

असेच काम आम्ही ह्या भागातील समलिंगी लोकांसाठी केले. सुरुवातीला मला वाटायचे की समलिंगी लोक हे फक्त पुणे-मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्येच आहेत. पण हा समज खोटा आहे. तालुका, जिल्हा, ग्रामीण पातळीवरही अनेक समलिंगी आहेत. त्यांच्यापर्यंत तुम्ही जर खोट्या समजापायी पोचू शकला नाहीत तर पुन्हा एच आय व्ही व इतर संसर्गजन्य गुप्तरोगांचा प्रादुर्भाव अटळ आहे. तेव्हा ह्या लोकांची एक संघटना तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न घेतले. त्यांच्या मनोमीलन संघटनेत आज नोंदणी केलेले १२०० समलिंगी आहेत. तर नाशिक परिसरात २००० वारांगनांनी संघटनेत आपले नाव नोंदविले आहे. संघटनात्मक पातळीवरून त्यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांच्या समस्या समजावून घेणे, त्यांच्यात एच आय व्ही संदर्भात जागृती आणणे, उपचारांची तजवीज करणे आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांना योग्य मदत करणे हे तुलनेने सुकर झाले आहे.

तुम्ही रिक्षा, टॅक्सी-चालक व हॉटेल बॉईजच्याही कार्यशाळा घेतल्या ना?

हो, बहुतेक सर्व छोटी-मोठी शहरे, उपनगरे, तालुक्यांच्या ठिकाणी गिर्‍हाईकाला वारांगनांपर्यंत नेणारे लोक म्हणजे रिक्षा किंवा टॅक्सीचालक असतात, किंवा हॉटेल बॉईज! सेक्स वर्कर्स व या लोकांची एक साखळीच असते असेही म्हणता येईल. त्यांच्यात एच आय व्ही बद्दल जागरुकता निर्माण होणे महत्त्वाचे वाटले. त्यामुळे आम्ही त्यांच्याही कार्यशाळा घेतल्या. एड्सचे गंभीर परिणाम, एड्स होऊ नये म्हणून घ्यायची काळजी, उपचार हे त्यांनाही कळणे आवश्यक होते.

तसेच तरुण पिढीतही एच आय व्ही बद्दल जागृती निर्माण व्हावी यासाठी आम्ही शाळा व कॉलेजेस मध्ये यासंदर्भात कार्यशाळा घेतल्या आहेत.

4 asawari Exposure Visit of MSW students.jpg

एम एस डब्ल्यू च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना

ह्या सर्व कार्यात तुम्हाला जाणवलेल्या समाजाच्या दृष्टिकोनाविषयी सांगाल का?

मला अतिशय प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे बहुतांशी समाज हा नैतिकता आणि कायदा यांच्यात खूप गल्लत करतो. आज कायद्यानुसार अठरा वर्षांवरील कोणीही व्यक्ती स्वतःच्या मर्जीने देहविक्रय करू शकते. तो गुन्हा नाही. परंतु समाज त्याकडे 'नैतिकते'च्या दृष्टिकोनातून बघतो. वेश्याव्यवसाय हा वाईट आहे, वेश्या ह्या वाईटच असतात हे समाजात, आपल्या मनांवर लहानपणापासून बिंबवण्यात येते. पण त्या वेश्या ह्या एक माणूस आहेत ही शिकवण द्यायला समाज विसरतो. कोणा व्यक्तीला जसे हक्क, स्वातंत्र्य व अधिकार संविधानाने दिले आहेत तेच हक्क, स्वातंत्र्य व अधिकार वारांगनांनाही दिले आहेत. त्या जोवर कायद्याचे उल्लंघन करत नाहीत तोवर त्या गुन्हेगार नाहीत. परंतु समाज त्यांना अगोदरपासूनच 'गुन्हेगार' ठरवून मोकळा होतो.

मला ह्या स्त्रियांमध्ये काम करताना जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे या बायका जे बोलतात ते करतात. बोलेन एक आणि वागेन भलतेच असे त्यांच्या बाबतीत सहसा होत नाही. त्या लपवाछपवी करत नाहीत. आपण बाकीच्या समाजाबद्दल तसे म्हणू शकतो का? आज तुम्हाला एखादा माणूस खड्ड्यात पडताना दिसला तर वरच्या दिशेने जाणार्‍या माणसाने त्याला मदतीचा हात देऊन बाहेर येण्यासाठी मदत करायला हवी की तो खड्ड्यात पडला हे किती चुकीचे आहे, तो खड्डा किती वाईट आहे यावर चर्चा करायला हवी? वर जाणार्‍या व्यक्तीने खड्ड्यातल्या व्यक्तीला मदतीचा हात देणेच आवश्यक आहे. त्याच्यावर टीका करून आणि त्याला समाजबाह्य वर्तणूक देऊन काय साध्य होणार?

समाजाने कायदा काय सांगतो ते सजग होऊन स्वीकारले पाहिजे. जो कायद्याने गुन्हाच नाही त्यासाठी तुम्ही या सेक्स वर्कर्सना शिक्षा का देता? बरं, काही लोक आम्हाला म्हणाले, या बायका बघा किती घाण बोलतात, बघा त्या कशा वागतात!! बरं, तुम्ही त्यांच्याशी कसे बोलता? जर तुम्ही त्यांच्याशी किंवा त्यांच्याबद्दल बोलताना त्यांना शिव्या देत असाल, त्यांची छी:थू करत असाल तर त्याही त्याच भाषेत प्रतिसाद देणार ना!! कोणी व्यक्ती जन्मजात शिव्या शिकून येत नाही. समाजात तिला जशी वागणूक मिळते, जे ऐकायला मिळते त्याचे पडसाद त्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यातून दिसतात.

मग समाजाने काय करायला हवे?

सेक्स वर्कर्सच्या पुनर्वसन कार्यात सर्वसामान्य लोकही सहभागी होऊ शकतात. दिशा सारख्या संघटना यासाठी काम करत आहेत. सेक्स वर्कर्सना इतर व्यवसायांचे शिक्षण देणे, त्यांच्याकडून त्या वस्तू बनवून घेणे, त्या वस्तूंना बाजार उपलब्ध करून देणे, त्यांची विक्री घडवून आणणे व ह्या स्त्रियांना देहविक्रयाखेरीज उत्पन्नाचा एक वेगळा स्रोत उपलब्ध करून देणे ह्यासारख्या कामात कोणीही सर्वसामान्य माणूस सहभागी होऊ शकतो. मदत करू शकतो.

तसेच समाजाने 'वेश्याव्यवसाय हा वाईट आहे' हा अप्रोच बदलला पाहिजे. 'कायद्यानुसार १८ वर्षांवरील कोणीही व्यक्ती, स्त्री वा पुरुष, आपल्या गरजेनुसार जर देहविक्रय करत असेल तर तो गुन्हा नाही' हे लोकांनी आपल्या मनावर ठसवणे आवश्यक आहे. जर कोणाला बळजबरीने या व्यवसायात आणले गेले असेल तर तो गुन्हा आहे. कोणाला त्या व्यक्तीच्या मर्जीशिवाय देहविक्रय करायला भाग पाडणे हा गुन्हा आहे. सॉलिसिटिंग करणे हा गुन्हा आहे.

प्रसारमाध्यमांनीही योग्य भाषेत आणि योग्य प्रकारे याबद्दलच्या बातम्या दिल्या पाहिजेत. जनजागृती करण्यास हातभार लावला पाहिजे. मी तर म्हणेन, सेक्स वर्कर कडे एक स्त्री म्हणून तुम्ही बघायला शिकलात तर तुम्हाला तिच्यावर झालेला अन्याय कळेल. ती जन्मतः सेक्स वर्कर नव्हती. तीही एक माणूस आहे. पण तुम्ही तिच्याशी माणसासारखे वागता का, हा कळीचा प्रश्न आहे.

तुम्ही व्यसनमुक्तीसाठीही समुपदेशन केले आहे, त्याबद्दल सांगाल का?

एच आय व्ही संदर्भात काम करताना आमच्या हे लक्षात आले की व्यसनामुळे तसेच दारूच्या नशेत असल्यामुळे सेक्स वर्कर्स एच आय व्ही टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेत नाहीत. तसेच व्यसनांमुळे त्यांची अगोदरच बिघडलेली तब्येत आणखी खालावते, प्रतिकारशक्ती कमी होते, औषधोपचारांचा उपयोग होत नाही. नशा त्यांना ह्या व्यवसायाशी बांधून ठेवते. व्यसन पूर्ण करण्यासाठी त्या वेश्याव्यवसाय करत राहतात. हे एक दुष्टचक्र आहे. ते भेदायचे तर त्यासाठी त्यांचे व्यसन दूर करण्याची आवश्यकता आहे. तसेच व्यसनाच्या नशेत असतानाही त्यांनी आपल्या तब्येतीसाठी आवश्यक ती खबरदारी घेतलीच पाहिजे. आम्ही ह्यासाठी या स्त्रियांचे समुपदेशन घेतले.

तशीही आजूबाजूच्या समाजाची या स्त्रियांशी वागायची पद्धत हिंसक आहे. आमच्या कामामुळे किमान प्रसारमाध्यमे व पोलिसांचा दृष्टिकोन काही प्रमाणात बदलण्यात आम्हाला यश आले. मला स्वत:ला ह्या सेक्स वर्कर्स नैतिक दृष्ट्या खूप ताकदीच्या वाटतात. त्या जसे जगतात, जसे वागतात तसे बोलतात. त्यात दांभिकपणा नाही, दुटप्पीपणा नाही.

6 asawari collage disha.jpg

दिशा महिला बहु-उद्देशीय संघटना व मनोमीलन संघटनांच्या कार्यक्रम प्रसंगी

तुमचे रोजचे काम कोणत्या पातळीवर चालते? जरा थोडी रूपरेषा, कल्पना देऊ शकाल का?

आम्ही सेक्स वर्कर्स मध्ये 'पीअर एज्युकेटर्स' (peer educators) तयार केले आहेत. म्हणजे ६० सेक्स वर्कर्सना एक अनुभवी व एच आय व्ही बद्दल प्रशिक्षित सेक्स वर्कर एच आय व्ही बद्दल तसेच आरोग्याच्या इतर बाबींबद्दल प्रशिक्षण देते. त्यांच्यावर देखरेख ठेवते. त्यांच्या नोंदी ठेवते. तसेच कोणी नवी सेक्स वर्कर दाखल झाली की तिला आमच्या कार्यालयात घेऊन येणे, तिची वैद्यकीय तपासणी, तिची नावनोंदणी हे सर्व करण्याची जबाबदारी घेते. त्या बाईला बळजबरीने किंवा फसवून ह्या व्यवसायात आणले गेले आहे की ती राजीखुशीने ह्या व्यवसायात आली आहे याची छानबीन करते. त्याबद्दल आम्हाला रिपोर्ट करते. त्या स्त्रीची हा व्यवसाय करण्याची जर इच्छा नसेल तर मग आम्ही तिला पोलिसांकडे सोपवितो. ते तिची रवानगी स्त्री वसतिगृह किंवा महिला सुधार गृहात करतात. प्रोबेशन ऑफिसर तिला तिच्या कुटुंबियांकडे सोपवितात.

पीअर एज्युकेटर्स आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकी ६० सेक्स वर्कर्सची जबाबदारी घेतात. त्यांचे रूटीन हेल्थ चेक अप्स, औषधोपचार इत्यादी वेळेवर होत आहे ना, हे बघतात. आम्ही या सर्व सेक्स वर्कर्सचे ट्रॅकिंग ठेवतो. त्यानुसार त्यांच्या आरोग्य तपासण्या, समुपदेशन, औषधोपचार इत्यादींचे नियोजन करतो. २४० स्त्रियांसाठी एक आऊटरीच वर्कर काम करतो. समुपदेशक असतात. प्रकल्प व्यवस्थापक असतात. प्रत्येक सेक्स वर्करचा ट्रॅक ठेवायचा, गोळा केलेला डेटा मॅनेज करायचा हेही काम असते. नर्स असते, सरकारी प्रशासनाबरोबर टाय-अप असतो. या सार्‍याचा अहवाल सादर करावा लागतो. कोणत्या उपक्रमाचा काय फायदा झाला, काय फरक पडला, किती प्रगती झाली, कोणत्या अडचणी आल्या, त्यातून मार्ग कसा शोधला, पुढचे धोरण काय, कशा प्रकारे पावले उचलायची हे सर्व ठरवण्यात या कामाचा मोठा उपयोग होतो.

तुमच्या कार्याची विविध पातळ्यांवर दखल घेतली गेली आहे व तुम्हाला पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांबद्दल सांगाल का?

हो, मला पाथफाइन्डर इंटरनॅशनल पुणे यांच्यातर्फे प्रकल्प समन्वयासाठी पुरस्कार मिळाला आहे. तसेच मायको कंपनीच्या एम्प्लॉयी फोरम कडून मला २६ जानेवारी २००८ ला 'मानव सेवा पुरस्कार' मिळाला. 'अटल सेवा पुरस्कार' आणि दिव्य मराठी वृत्तपत्राने देऊ केलेला 'नवदुर्गा' पुरस्कार हेही माझ्या खात्यात जमा झाले आहेत. या शिवाय मी लिहिलेले विविध लेख, अभ्यास हे वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून प्रकाशित झाले आहेत.

7 asawari Manav Seva Collage.jpg

मानव सेवा पुरस्कार स्वीकारताना आसावरी ताई

सेक्स वर्कर्सचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना इतर पर्यायी व्यवसायांचे प्रशिक्षण देणे तुम्ही सुरू केलेत त्याबद्दल सांगाल का?

आम्ही सेक्स वर्कर्सचे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे १५ दिवसांचे प्रशिक्षण शिबीर घेतले. त्यानुसार प्रशिक्षित झालेल्या स्त्रिया ह्या छोट्या मोठ्या प्रदर्शनांमध्ये परफ्यूम्स, फिनाईल इ., तसेच स्क्रीन प्रिटींग करून बनवलेली शुभेच्छा-पत्रे इ. चे स्टॉल्स लावतात. अगदी छोट्या प्रमाणावर. आणि त्यातून त्यांना तसे उत्पन्नही फारसे मिळत नाही. त्यामुळे तो व्यवसाय त्या पूर्णवेळ करू शकत नाहीत. ही फक्त एक छोटीशी सुरुवात आहे. त्यातून आपल्याला काहीतरी वेगळे करता येऊ शकते अशी जाणीव या स्त्रियांच्या मनात उत्पन्न झाली हे महत्त्वाचे आहे.

सुप्रीम कोर्टाचा आदेश असा आहे की सेक्स वर्कर्सच्या पुनर्वसनाची जबाबदारी ही महिला व बालकल्याण खात्याची आहे. काही काळापूर्वी आम्ही नाशिक भागाचा सर्व्हे केला व तेथील किती सेक्स वर्कर्सना पुनर्वसन करवून घेण्यात इंटरेस्ट आहे हे तपासून, येथील परिस्थितीचा अभ्यास करून तसा अहवाल महिला व बालकल्याण खात्याला दिला. त्यांनी तो नाशिक नगरपालिकेकडे दिला. गेले दीड वर्ष हे प्रपोजल पेंडिंग आहे.

काय आहे ना, सरकारी कामांना प्रचंड विलंब लागतो. त्यामुळे हे कामही कधी होतंय याची आम्ही वाट बघत आहोत. आम्ही सुचविले आहे की जे मोठमोठे उद्योग, इंडस्ट्रीज आहेत अशांची मदत घेऊन या स्त्रियांच्या पुनर्वसनासाठी काही करावे. कारण आपले ठराविक साच्यातील पुनर्वसनाचे उपाय ह्या स्त्रियांसाठी लागू होणार नाहीत असे आम्हाला वाटते. या स्त्रियांची आतापर्यंतची जीवनशैली, शिक्षणाचा अभाव व मानसिकता, तसेच वेश्याव्यवसायातून त्यांना मिळणारे उत्पन्न हे पाहायला गेले तर त्यांच्यासाठी नेहमीचे पुनर्वसनाचे उपाय करून चालणार नाहीत. कदाचित मॉल्स मध्ये मदतनीस, किंवा प्रशिक्षित सुरक्षारक्षक म्हणून, अशा प्रकारच्या व्यवसायांत त्यांना पुरेसे उत्पन्नही मिळेल व त्यांना परत वेश्याव्यवसायाकडे फिरकावेसे वाटणार नाही.

आमच्या प्रपोजलमध्ये आम्ही ही टप्प्या- टप्प्याची योजना सादर केली आहे. आम्ही ह्या स्त्रियांना फक्त व्यवसाय प्रशिक्षण देऊन भागणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे. त्यांच्यापाशी आज कोणता उद्योग सुरू करायचा तर त्यासाठी पुरेसे भांडवल नाही, शिक्षण नाही किंवा मार्केटिंग स्किल्स नाहीत. तेव्हा ती सर्व तजवीज सरकारतर्फे होणार असेल तरच त्या पुनर्वसनास काही अर्थ राहील. आता ते प्रपोजल अजून सरकारकडेच आहे. त्यावर कधी कृती होते ते बघायचे.

तसेच सरसकट सर्वच सेक्स वर्कर्सना बळजबरीने पुनर्वसन कार्यक्रमात आणायचे असेही करून चालणार नाही. त्या अगोदर त्यांना त्या कार्यक्रमात काय काय होणार आहे याची पूर्वकल्पना द्यावी लागेल. त्यांची तयारी असेल तरच त्या पुनर्वसनाला काही अर्थ राहील. तसेच सर्वप्रथम एच आय व्ही पॉझिटिव स्त्रियांना, त्यानंतर वयाची पस्तिशी उलटून गेलेल्या स्त्रियांना आणि त्यानंतर या व्यवसायातील इतर (तरुण) इच्छुक स्त्रियांना पुनर्वसन कार्यक्रमात टप्प्या-टप्प्याने घेता येऊ शकेल. वयाच्या पस्तिशीनंतर या व्यवसायातील अनेक स्त्रियांची कमाई मंदावते, शरीरही थोडे थकते. त्यामुळे त्यांना जर अन्य व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळणार असेल तर त्या या व्यवसायाकडे पाठ फिरवण्यास तयार असतात. त्यांचे पाहून तरुण वयातील सेक्स वर्कर्सही पुनर्वसनासाठी तयार होऊ शकतात.

महिला सुधारगृह किंवा सरकारी महिला वसतिगृहांबद्दल फारसे चांगले ऐकायला येत नाही. तसेच अनेक सेक्स वर्कर्सना त्यांचे नातेवाईक किंवा नवरा-भाऊ-मामा-काका यांपैकी कोणी फसवून त्यांच्या इच्छेविरुद्ध ह्या धंद्याला लावलेले असते. अशा वेळी कोर्टाने त्या स्त्रीला परत तिच्या कुटुंबियांकडे सोपविणे हे तिच्यासाठी हानिकारक नाही का?

ह्यात दोन गोष्टी आहेत. जेव्हा वेश्यागृहांवर पोलिसांची रेड पडते तेव्हा ते सेक्स वर्कर्सनाही उचलतात. PITA कायद्या अंतर्गत स्पेशल मॅजिस्ट्रेट या स्त्रियांना कमीत कमी ७ दिवस महिला सुधारगृहात पाठवतात. येथे प्रोबेशन ऑफिसरकडून त्या स्त्रिया आपल्या मर्जीने हा व्यवसाय करत आहेत की बळजबरीने, त्यांना हा व्यवसाय सोडायची, आपल्या गावी परत जायची इच्छा आहे का इत्यादी छानबीन करतात. नंतर प्रोबेशन ऑफिसर या प्रत्येक महिलेचे म्हणणे कोर्टासमोर मांडतात. पण ह्या कालावधीत त्यांना दिली जाणारी वागणूक कशी असते बघा. त्यांना पोलिस बंदोबस्तात ठेवले जाते. त्यांच्या हालचालींवर प्रतिबंध येतो. वस्तुतः त्यांनी कोणता गुन्हा केलेला नसतो. परंतु त्यांना वागणूक ही एखाद्या गुन्हेगारासारखी मिळते. तसेच या स्त्रियांची जीवनशैली, त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी हे सर्व इतरांपेक्षा वेगळे असते. सुधारगृहात राहणे, तेथील दिनक्रम पाळणे हे त्यामुळे त्यांना एखाद्या शिक्षेसारखे वाटते. त्यांना या सर्व प्रक्रियेत कोठेही त्यांच्या बाबतीत आता काय पावले उचलण्यात येणार आहेत, काय कृती होणार आहे, त्यांचे भवितव्य काय आहे ह्याची पूर्वकल्पना दिली जात नाही. त्यांना विश्वासात घेण्यात येत नाही किंवा तसे त्यांचे समुपदेशन, मानसिक तयारीही करवून घेतली जात नाही. पर्यायाने सुधारगृहांबद्दल ह्या स्त्रियांचे मत प्रतिकूल बनते. अनेकजणी तिथून पळून जातात.

तसेच रेड पडली की या स्त्रियांना सरसकटपणे एच आय व्ही टेस्टिंग साठी पाठवले जाते. आता हा तर शुद्ध कळस आहे! PITA कायद्यानुसार त्यांची गुप्तरोगासाठी तपासणी करावी लागते. पण हे एच आय व्ही टेस्टिंग तर बळजबरी केलं जातं. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की एच आय व्ही हा फक्त सेक्शुअली ट्रान्समिट होणारा आजार नाही. बरं, हे टेस्टिंग झाल्यावर त्याचे जे तपासणी रिपोर्ट्स असतात त्यांबद्दलही गोपनीयता कुठे पाळली जाते? कोणीही पोलिस हवालदार असे रिपोर्ट्स बघू शकतो, घेऊन जाऊ शकतो. हे अगदी चुकीचे आहे. प्रोटोकॉल माहीत नसल्याचे लक्षण आहे हे!

मध्यंतरी ठाण्याच्या सुधारगृहात जागा नसल्यामुळे तेथील काही सेक्स वर्कर्सना नाशिकच्या सुधारगृहात ठेवण्यात आले होते. तब्बल तीन महिने त्या तिथे खितपत होत्या व आपल्या भवितव्याची वाट बघत होत्या. त्यांच्यासाठी लढणारे, त्यांच्या बाजूने बोलणारे कोणीच नसते ना! आमची जेव्हा भेट झाली आणि त्यांना नाशिकमध्ये आम्ही करत असलेल्या कामाबद्दल कळले तेव्हा त्या म्हणाल्या, 'तुम्ही ठाण्यात पण तुमचे काम सुरू करा! कारण आमच्यासाठी बोलणारे, आमच्या हक्कांबद्दल आम्हाला सांगणारे कोणीच तिथे भेटले नाही!'

नातेवाईकांकडे सोपवायच्या गोष्टीबद्दल म्हणाल तर अगदी संतापाची गोष्ट आहे ती! आज १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला भारतात सज्ञ म्हणून धरले जाते. स्वतःच्या आयुष्याचे निर्णय ती व्यक्ती स्वतः घेऊ शकते. तिला कायद्याने मतदानाचा, विवाहाचा अधिकार प्राप्त होतो. आणि अशा १८ वर्षे वय उलटून गेलेल्या सेक्स वर्कर्सना न्याय व्यवस्था परत त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली करते म्हणजे हे आहे तरी काय? इथे तर अशा केसेस घडल्या आहेत की रेड पडल्यावर चाळीस वर्षांच्या सेक्स वर्करने जर प्रोबेशन ऑफिसरला तिला सुधारगृहात थांबायचे नाही असे सांगितले तर कोर्टाने तिला तिच्या कुटुंबियांच्याकडे सोपवण्याचा निर्णय दिला! आता तुम्हीच सांगा, ही चाळीस वर्षांची स्त्री स्वतःच्या भवितव्याचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाही का? त्यासाठी तिला तिच्या कुटुंबियांची गरज आहे का? आणि होतं काय, ह्या स्त्रियांचे नातेवाईक धुंडाळण्यात पुन्हा एक-दीड वर्ष जातं, त्यानंतर तिला तिच्या कुटुंबातल्या व्यक्तीच्या हवाली करण्यात येतं. त्यात त्याच लोकांनी तिला जर विकलं असेल तर आणखी कहर! आता न्याय यंत्रणाच जर असे निर्णय देत असतील तर ते बदलण्याची गरज आहे. वयाने इतक्या मोठ्या स्त्रीला स्वतःचे भवितव्य स्वतः ठरवायचा अधिकार आहे. हां, जर ती अल्पवयीन असती तर गोष्ट वेगळी होती. पण सज्ञ स्त्रीला ही निवड स्वतःची स्वतः करण्याचा हक्क आहे आणि इथे तर कोर्टाकडूनच त्याची पायमल्ली होताना दिसते!

ह्या सर्वाला कारणीभूत आहे ती नैतिकता व कायद्यात होणारी गल्लत, प्रोटोकॉल नक्की काय आहे याबद्दल तपास यंत्रणा, न्याय यंत्रणा व स्थानिक प्रशासन यांनाच नीट माहिती नसणे आणि सर्वात मुख्य म्हणजे समाजाचा अ‍ॅटिट्यूड, अनास्था व नैतिकतेची झापडं!

तुम्ही करत असलेलं काम तशाच प्रकारे चालू राहील असे गृहीत धरून किमान नाशिक सारख्या परिसरात पुढील काळात सेक्स वर्कर्स संदर्भात समाजातील चित्र बदलेल असे तुम्हाला वाटते का? कशा प्रकारे ते बदलेल असे वाटते?

मला वाटतं, नक्की बदलेल. आम्ही करत असलेल्या कामामुळे येथील सेक्स वर्कर्समध्ये तर निश्चितच बदल घडून येतोय. नाशिक परिसरातील ह्या स्त्रिया आता आपले आरोग्य, मुलांचे शिक्षण याबाबतीत अधिकाधिक सजग बनत आहेत. आपल्या हक्कांची त्यांना जाणीव होत आहे. त्या इन्डिपेन्डन्ट झाल्या आहेत. आम्हाला जाणीव आहे की सर्व बदल एका रात्रीत घडून येणार नाहीत. हे बदल कालांतरानेच घडून येतील. परंतु जे काही बदल झाले आहेत ते दीर्घकालीन आहेत हे सांगू शकते. अगोदर या स्त्रियांना पोलिसांनी पकडून नेले की त्यांना तिथे पोलिस स्टेशनात तोंड उघडायचीही भीती वाटायची. आता त्यांना तिथे काय बोलायचे, कायदा काय सांगतो हे माहीत झाले आहे.

आता बदल घडवून आणायची समाजाची पाळी आहे. समाजाने आपले विचार, दृष्टिकोन व वागणूक बदलायची गरज आहे. मानसिकतेत बदल आवश्यक आहे. नवीन पिढीने आपला हा अ‍ॅटिट्यूड बदलला तर सामाजिक पातळीवरही सध्याचे चित्र पालटू शकेल. समाजमन बदलावे लागेल. त्याशिवाय या स्त्रियांचा वेगळ्या - पर्यायी आयुष्याबद्दलचा आत्मविश्वास वाढणार नाही.

तुम्ही केलेल्या व करत असलेल्या कामामुळे वेश्याव्यवसायातील ह्यूमन ट्रॅफिकिंग किंवा बेकायदेशीरपणे, बळजबरीने, फसवून अल्पवयीन मुलींना या व्यवसायाला लावण्याच्या, विकण्याच्या प्रमाणावर काही परिणाम झाला?

हो, नक्कीच! एक म्हणजे आम्ही इथे काम सुरू केले तेव्हापासूनच येथील सेक्स वर्कर्सना व कोठा मालकिणींना सांगत आलोय की जर तुमच्या कोठ्यात अल्पवयीन मुलींना डांबलेले किंवा वेश्याव्यवसायास लावलेले आढळले तर आम्ही तुमच्यासाठी काम करणार नाही, तुम्हाला मदत करणार नाही. तसेच ग्राहकांचे पैसे चोरणे, त्यांच्या वस्तू लांबविणे हे प्रकारही पूर्णपणे थांबायला हवेत. त्यामुळे जर आपल्याला मदत हवी असेल तर हे प्रकार थांबवायला लागतील या भावनेतून या गोष्टींना काही प्रमाणात खीळ बसली. तुम्ही कायदा मोडलात तर आम्ही तुमच्यासाठी काम करणार नाही या धोरणावर आम्ही कायम राहिलो. त्यामुळे येथील सेक्स वर्कर्स देखील सजग झाल्या. जर कोणा मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध कोठा मालकिणीने डांबून ठेवलेले आढळले तर तेथील इतर अनुभवी सेक्स वर्कर्स आम्हाला कळवतात. मध्यंतरी अगदी नावाजलेल्या वृत्तपत्रांच्या मुख्यपृष्ठावर ठळक मथळ्यांत एका अल्पवयीन शाळकरी मुलीची कोठा मालकिणीने केलेल्या सुटकेची बातमी छापून आली होती. त्या मुलीला शाळेच्या गणवेशातच तिचा नातेवाईक माणूस कोठ्यावर घेऊन आला व एका खोलीची मागणी करू लागला. त्याला नकार दिला तर तो दुसरीकडे जाईल व तिथे खोली मागेल म्हणून मग कोठा मालकिणीने त्याला तिथेच थांबवून घेतले व आम्हाला फोन लावला. त्या मुलीची सुटका होण्यात कोठा मालकिणीचा महत्त्वाचा हात होता. अशा २-३ घटना घडलेल्या आहेत, जिथे येथे आणल्या गेलेल्या एखाद्या मुलीने किंवा स्त्रीने तिला बळजबरी या व्यवसायात आणले आहे व तिची तसे करायची अजिबात इच्छा नाही हे सांगितल्यावर या मालकिणींनी व इतर सेक्स वर्कर्सनी तिला आपसात पैसे गोळा करून परत पाठवायचा खर्च केला आहे. ही फक्त सुरुवात आहे. अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे.

ह्या कामात तुम्हाला कुटुंबाने कशा प्रकारे साथ दिली?

मला घरून या कामासाठी उत्तम पाठिंबा होता. घरच्यांचे म्हणणे फक्त एवढेच होते की जे काही करशील ते स्वतःला सांभाळून कर. कारण या क्षेत्रातल्या वातावरणाची, हिंसाचाराची व विरोधाची त्यांना कल्पना होती. मी हे काम सुरू केल्यापासून अगदी रात्री बेरात्री माझा फोन वाजतो. पोलिसांची वेश्यागृहांवर रेड पडली की मला फोन येतो. अशा वेळी पूर्वी रात्री अपरात्री पोलिस स्टेशनला जायला लागायचे. तिथे थांबायला लागायचे. आता इतक्या वर्षांच्या कामानंतर बर्‍याच ओळखी झाल्यावर एखाद्या फोन कॉलने काम होते. पण तरी अनेक बिकट प्रसंग येत असतात. अडचणी येत असतात. त्यावेळी घरचा आधार असणे ही फार चांगली गोष्ट आहे.

तुमच्या व्यक्तिमत्त्वातील किंवा स्वभावातील कोणत्या गोष्टींचा व कोणत्या कौशल्यांचा तुम्हाला या कामात विशेष उपयोग झाला असे वाटते?

अन्याय सहन न होणे हा माझ्या स्वभावाचा भागच आहे. त्यामुळेच मी हे काम करू शकले. जर आजूबाजूला काही नकारात्मक दिसतंय, अन्याय दिसतोय, तर मग मी स्वस्थ कशी बसू? प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगता यावे, त्याच्यावर अन्याय होऊ नये या मानसिकतेतून मी ह्या कामासाठी तयार होऊ शकले. तसेच संभाषण कौशल्य, संवाद कौशल्य, आपले मुद्दे समोरच्याला पटतील - समजतील अशा भाषेत सांगण्याचं कौशल्य यांचाही उपयोगच झाला. अ‍ॅडवोकसी स्किल्समुळे पोलिस, मीडिया, प्रशासनाशी चांगल्या प्रकारे संवाद साधू शकले. चिवटपणा, चिकाटी सोडली नाही. कोठे माघार घ्यायला लागली, सेटबॅक आला म्हणून खचून जायचे नाही. काम चालू ठेवायचे. अन्याय सहन करायचा नाही. प्रस्थापित विचारांमध्ये बदल घडवून आणायला सातत्याचे प्रयत्न हे लागतातच! स्वतःचा स्वतःशी संवादही कायम चालूच असतो.

या कामात तुमचे स्फूर्तिस्थान कोणते?

माझी आई! ती एक सर्वसाधारण गृहिणी असून तिने समाजकार्य सुरू केले. मला माझ्या कामाचा पगार तरी मिळायचा. तिला तोही मिळत नव्हता. आपण समाजाचं काही देणं लागतो आणि आपण ते द्यायलाच पाहिजे, समाजासाठी आपण कार्य करायलाच पाहिजे, हे बाळकडू मला तिच्याकडून मिळाले.

तुम्ही कामातून स्वतःसाठी वेळ कसा काढता? तो कसा घालविणे पसंत करता?

हे काम ही माझी आवड आहे, माझी पॅशन आहे. मी हे काम मानसिक समाधानासाठी करते. त्यामुळे फावल्या वेळात मी तसे वाचन वगैरे करत असते. पण हे काम माझी पॅशन असल्यामुळे त्याचा थकवा वाटत नाही.
आणि अगोदर मी हे काम फुल टाईम करायचे. पगार घेऊन करायचे. आता मी हे काम स्वयंसेवा तत्त्वावर किंवा वॉलंटरी बेसिसवर करते. मी ज्या संस्थेत हे काम करत होते तिथे त्या प्रकल्पासंबंधित निर्णय घेणे हे काम माझ्याकडेच आहे. माझ्यावर या प्रकल्पाच्या नाशिक जिल्ह्याची 'जिल्हा समन्वयक' म्हणून जबाबदारी आहे.

तुम्हाला स्वतःला एक व्यक्ती म्हणून ह्या कार्यातून काय मिळाले?

मला आयुष्याकडे बघायचा नवा दृष्टिकोन मिळाला. अगोदरचा दृष्टिकोन खूप बदलला. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर मानसिक व नैतिक पातळीवर माझे निर्णय मला पडताळायला लागायचे. आजही पडताळायला लागतात. द्विधा मन:स्थितीतून जावे लागते. त्यातून मार्ग शोधावा लागतो. आपण जे करतोय ते बरोबर करतोय ना, हे तपासून पाहावे लागते. पण यामुळे माझा स्वतःशी एक संवादच सुरू झाला. ह्या कामात चांगले अनुभवही बरेच मिळाले. सेक्स वर्कर स्त्रियांचा विश्वास संपादन करता आला. त्यांच्या मानसिकतेत, वागण्यात काही प्रमाणात बदल घडवून आणता आला. त्यांचे हक्क त्यांना मिळवून देता आले. बरीच माणसे या कामाच्या निमित्ताने जोडता आली. प्रसारमाध्यमे, पोलिस, प्रशासन, इतर सेवाभावी संस्थांबरोबर काम करायला मिळाले.

ह्या काळात वाईट अनुभवही आले. अल्पवयीन मुलींना या कामासाठी फसवून, फूस लावून आणणे, त्यांना विकणे हे आजही जेव्हा चालू असलेले पाहते, जेव्हा सेक्स वर्कर्सना माहिती असूनही - त्या स्वतः त्यातून गेल्या असूनही इतर अल्पवयीन मुलींच्या बाबतीत त्या असे काही वेळा वागतात तेव्हा ते फार त्रास देणारे असते. अशा वेळी वाटते की आपण फक्त २०% काम करू शकतोय. अजून ८०% गोष्टींवर आपले काहीही नियंत्रण नाही. आणि तरीही जेव्हा आपल्याला या व्यवसायातल्या धोक्यांची, अन्यायाची माहिती आहे तेव्हा त्याबद्दल काहीच न करता आपण गप्पही बसू शकत नाही!!

नैतिक दुविधेचे प्रसंगही अनेकदा येतात. ह्या व्यवसायातील तरुण मुलींची जेव्हा लग्ने जमतात तेव्हा त्या मला विचारतात, 'तुम्ही ही मुलगी अमक्या ठिकाणी नोकरी करायची म्हणून सांगाल का? त्या लोकांना खरे काय ते कळले तर माझे लग्न मोडेल.' अशा वेळी खूपच अडचण होते. त्या मुलीचे आयुष्य निर्धोक जावे म्हणून खोटे बोलावे की खरे सांगून तिला पुन्हा या व्यवसायात बांधले जाण्यास कारण व्हावे....!!

काही वेळा कोठ्याच्या मालकिणी अगदी अनपेक्षितपणे चांगल्या वर्तणुकीचा धक्का देतात. त्यांच्या येथील मुलामुलींना शिक्षण देतात. अशाच एका कोठा मालकिणीने एका मुलीला पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळले व तिचे शिक्षणही पूर्ण केले. असेही धक्के बसत असतात.

आपल्या न्याय व प्रशासन यंत्रणेबद्दलही अनेकदा प्रश्न निर्माण होतात. पोलिस रेड, कोर्टाच्या सुनावणीच्या वेळी आम्हाला, एका एनजीओला मध्यस्थी करायला लागणे, प्रोटोकॉल पाळला जात आहे ना हे तपासायला लागणे ही खरेच दुर्दैवाची गोष्ट आहे. मी अगोदर म्हटल्याप्रमाणे नैतिकता व कायदा यांची गल्लत केल्यामुळे असे प्रसंग येत राहतात. तसे सेटबॅक येत राहतात. कधी कधी या सर्वातली नकारात्मकता अनुभवून निराश व्हायला होतं. रोज उठून कोणाच्या तरी डोक्याला लागायचा कंटाळा येतो. पण त्याला इलाज नाही. यंत्रणेत बदल घडवून आणणे व लोकांची मानसिकता बदलणे यासाठी प्रयत्न करत राहायलाच लागतात.

clipart-swash-ornament-718f.png

मुलाखतकार : अरुंधती कुलकर्णी.

प्रकाशचित्रे : श्रीमती आसावरी देशपांडे यांच्या संग्रहातून.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम मुलाखत अकु!

कायदा आणि नैतिकता यात गल्लत केली जाणे, पोलीसांनाच प्रोटोकॉल माहित नसणे वगैरे गोष्टी अस्वस्थ करणार्‍या. त्या दृष्टीने आसावरी देशपांडेंचे काम खूप महत्वाचे आहे.

अवांतर प्रश्न : एकंदरीत कायदे, प्रोटोकॉल्स याबाबत सामान्य नागरीकाला माहिती हवी असेल तर ती कुठे उपलब्ध होईल? साध्या सोप्या भाषेत अशी माहिती उपलब्ध आहे का?

अतिशय सुरेख मुलाखत.
कायदा आणि नैतिकता यात गल्लत केली जाणे, पोलीसांनाच प्रोटोकॉल माहित नसणे वगैरे गोष्टी अस्वस्थ करणार्‍या. त्या दृष्टीने आसावरी देशपांडेंचे काम खूप महत्वाचे आहे. >> +१

उत्तम मुलाखत. टप्प्याटप्प्याने वाचली.

स्त्रीला कुटुंबियांच्या ताब्यात देणे हा कायद्याचा भाग असल्याचे वाचून सखेद आश्चर्य वाटले.

छान मुलाखत! हे किती महत्वाचे काम आसावरी ताई करत आहेत! त्या त्यांचे काम एकांगी न ठेवता त्या nexus मध्ये येणाऱ्या प्रत्येक घटकाबरोबर काम करत आहेत हे विशेष भावले!
अकु, तुमचे प्रश्न नेहमी फार छान असतात! माहेर मधली समीर आणि प्राची दुबळे यांच्या मुलाखतीत विचारलेले प्रश्न खूप आवडले होते मला. अर्थात त्यावेळी आपली ओळख नव्हती झाली!

छान झाली आहे मुलाखत ..

ह्या विषयाबद्दल मी खुपच अज्ञानी आहे पण एक प्र्श्न .. सजाण असताना देहविक्रय करणे कायदेशीर आहे हे मला माहित नव्हतं .. मग तसं असेल तर कोठ्यांवर पोलीस रेड्स का होतात?

खुपच चांगली मुलाखत. कितीतरी माहिती मिळाली. केवढे अवघड काम करत आहेत त्या. पण हळुहळु का होईना सकारात्मक बदल जाणवतोय मुलाखतीतुन, ते वाचुन बरे वाटले.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे मन:पूर्वक आभार.
आसावरीताईंना तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची नक्की विनंती करेन.

उत्तम मुलाखत. आंतरजालावर नोंद या स्वरुपात ठेवल्याबद्दल अकु य़ांचे आभार
वेश्याव्यवसायाची नैतिकता हा धनंजय यांचा मिसळपाव वरील लेख ही यासंबंधीत आहे.

उत्तम मुलाखत.
कायदा आणि नैतिकता यातला फरक ओळखा यावर दिलेला जोर आवडला. पटला.

सशलसारखाच प्रश्न मलाही पडला.

खुपच चांगली मुलाखत. कितीतरी माहिती मिळाली. केवढे अवघड काम करत आहेत त्या. पण हळुहळु का होईना सकारात्मक बदल जाणवतोय मुलाखतीतुन, ते वाचुन बरे वाटले. >>>> +१० ....

श्रीमती आसावरी देशपांडे यांना अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ..... अकु - मनापासून धन्स ... Happy

आसावरी देशपांडे यांच्या कामाची आणि विपरीत परिस्थितीत जगणा-या समाजातल्या स्त्रियांची अतिशय उत्तम ओळख मुलाखतीतून होते. प्रश्न नुसते समजून चालत नाहीत, त्यावर काय करायचे ते कळलेली निष्ठावान माणसं त्या त्या क्षेत्रात कार्यरत असावी लागतात - तर परिस्थिती बदलू शकते असा दिलासाही मिळाला. आभार.

धन्यवाद शशांक व आतिवास!

आसावरीताईंनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कळवली आहेत. लिहिते लवकरच.

स्वाती२, तुझ्या कायद्याच्या व प्रोटोकॉल विषयक पुस्तकांच्या प्रश्नाबद्दल : हो, मराठी व इंग्रजी, दोन्ही भाषांत ह्या कायद्याची व इतर कायद्यांची बेअर अ‍ॅक्ट पुस्तके आहेत. ज्या दुकानात कायद्याची पुस्तके मिळतात तिथे ती उपलब्ध होऊ शकतील.

प्रोटोकॉल विषयाची पुस्तके : महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने ही पुस्तके प्रकाशित केली असून ती ऑनलाईनही उपलब्ध आहेत. तिथे न मिळाल्यास तुम्हाला ती राज्य महिला व बालकल्याण विभागात मिळू शकतात.

तसेच सुप्रीम कोर्टाची जजमेन्ट्स त्या त्या विषयानुसार ऑनलाईन पाहता येतात.

सशल व ललिताच्या प्रश्नाबद्दल :

वेश्या व्यवसाय हा बेकायदेशीर नाही. परंतु कोठ्यांमधून/ कुंटणखान्यात चालणारे ऑर्गनाईझ्ड सेक्स वर्क हे बेकायदेशीर आहे. कोणी आपल्या बायकोला बळजबरीने वेश्या व्यवसाय करायला लावणे हा गुन्हा आहे. वेश्यागृहे व त्यांच्या मालकिणी, व्यवस्थापक, दलाल आणि वेश्यांच्या उत्पन्नावर उपजीविका करणारे त्यांचे १८ वर्षांवरचे नातेवाईक (नवरा, मुलगा इ.) हे गुन्हेगार आहेत. त्यामुळे जेव्हा पोलिस रेड घालतात तेव्हा त्यांचे वर्तन ज्यांच्यावर गुन्ह्याचा आरोप ठोकता येईल व ज्या सेक्स वर्कर्स आहेत त्या दोन्हींशी भिन्न असणे आवश्यक आहे. पोलिस हे त्यांची 'सुटका करणारे' किंवा रेस्क्युअर्स आहेत कायद्यानुसार.

मुलाखत उत्तम आहे. प्रश्न हा आहे की वेश्या व्यवसाय फक्त एका शहरात नाही, एका जिल्ह्यात नाही, एका राज्यात नाही तर भारतभर आहे. इथे फक्त गरीब महिलाच हा व्यवसाय करतात असे नाही. मसाज पालर्स आणि फ्रेंडस सर्कलच्या नावाखाली तसेच सुशिक्षीत समाजात इंटरनेट द्वारा याची जाळी विणली गेली आहेत.

खुपच थोड्या महिला स्वतःहुन हा व्यवसाय निवडत असतील पण अधिकतर महिला यात ढललल्या जातात. आसावरी देशपांडे यांच्या सारख्या महिला बोटावर मोजण्या इतक्या. कुठे पुर्‍या पडणार ?