आज कुछ तुफानी करते है….भाग १

Submitted by बोबो निलेश on 13 April, 2014 - 22:48

साठी झाली की बुद्धी नाठी होते असं म्हणतात ते कदाचित खरं असावं.
परवाचाच अनुभव घ्या ना. आबा - म्हणजे दूरच्या नात्यातले आजोबा आमच्याकडे राहायला होते. ते नुसते रहात होते तिथपर्यंत ठीक होतं. एरव्ही त्यांचं वागणं नॉर्मल होतं, पण नंतर एके दिवशी मला जाणवलं त्यांना काहीतरी बोलावंसं वाटतंय. त्यांच्या मनात काही तरी आहे असं मला वाटलं. म्हाताऱ्या माणसांशी बोलावं, जर गप्पा माराव्यात म्हणजे त्यांना जर बरं वाटतं, असं म्हणतात म्हणून मी सहज त्यांना विचारलं,"आबा, अलीकडे थोडे गप्प वाटता. काय झालं?"

"नाही, काही विशेष नाही. असंच आपलं काही तरी." असं म्हणून आबा गप्प बसले. खरं तर इथे मी त्यांचा नाद सोडून द्यायला हवा होता, पण नाही. त्या दिवशी का कोणास ठाऊक पण कधी नव्हे ती माझ्यातली परोपकार की काय म्हणतात ती भावना जागृत झाली होती. एवढी.. की त्या क्षणी आपल्या सन्माननीय पंतप्रधानांनी भारताची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी माझ्याकडे कर्ज मागितलं असतं, तर ते सुद्धा मी मागचा पुढचा विचार न करता, म्हणजे माझ्या पुढच्या पिढ्यांचं काय होणार, माझ्या या भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे त्यांची खायची प्यायची आबाळ तर नाही ना होणार असे स्वार्थी विचारदेखील न करता पटकन तिथल्या तिथे त्याच क्षणी मंजूर करून टाकलं असतं.

तर सांगायचा मुद्दा हा की मी काही आबांची पाठ सोडली नाही. शेवटी मी काही बधत नाही, हे पाहून आबाच म्हणाले,

"बरं सांगतो. पण मला वचन दे तू मला हसणार नाही."

"दिलं."

आबा थोडे आश्वस्त झाले. त्यांनी घसा खाकरला आणि म्हणाले,

"शिऱ्या, तुला तर माहीतच आहे. माझं आतापर्यंतच आयुष्य अतिशय रुटीन होतं. दर दिवशी सकाळची ठरलेली सात वाजताची डोंबिवली लोकल. आणि ऑफिसला गेल्यावर बँकेतलं रुटीन काम. आणि संध्याकाळी सहा वाजताची व्हीटी वरून लोकल. हे असं रुटीन आयुष्य गेली कित्येक वर्ष म्हणजे अगदी निवृत्त होईपर्यंत जगलो. आणि आता निवृत्त झाल्यावर तर आयुष्य आणखीनच रुटीन झालं. त्यामुळे आजकाल मला या रुटीन आयुष्याचा खूप कंटाळा यायला लागला आहे. टिपिकल सामान्य मध्यमवर्गीय माणसाप्रमाणे चाकोरीबद्ध आणि अळणी आयुष्य जगलो मी. कायम मन मारुन राहिलो. कधी कुठलं धाडस करायचं धाडस केलं नाही. सिनेमाच्या पडद्यावर अमिताभ एका वेळेला दहा दहा गुंडांना लोळवताना वेळोवेळी तोंडाचा आ वासुन पाहिलं. पण तेवढंच. ऑफिसात साहेबाचं चुकलं तर त्याला तसं ताठ मानेनं सांगायचा रामशास्त्री बाणा कधी अंगात बाणवू शकलो नाही. उलट स्वतःचं बरोबर असलं तरी निमुटपणे खाली मान घालुन साहेबाची बोलणी ऐकली कायम एका सामान्य मध्यमवर्गीय माणसाप्रमाणे. पण आता मात्र का कोण जाणे एक प्रकारची खंत वाटते या सगळ्या आयुष्याची. असं वाटतं, कसलं पिचकं, कुचकामी आणि रटाळ आयुष्य जगलो आपण. वाटतं आयुष्यात काही तरी वेगळं करायला हवं होतं आपण. काही तरी धाडस करायला हवं होतं स्वत:चा अभिमान वाटेल असं."

"हं, खरं आहे तुमचं म्हणणं, आबा." मी त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. "पण यावर उपाय काय?," मी विचारलं.

मी त्यांचं म्हणणं हसण्यावारी नेलं नाही हे पाहून आबांना थोडा धीर आला असावा. ते पुढे म्हणाले,

"तुला सांगतो, आजकाल माझ्या मनात फार विचित्र विचार येतात..."असं म्हणून त्यांनी एक पॉझ घेतला.अगदी वाजपेयी घेतात तसा आणि ते शुन्यात पाहू लागले. त्यांच्या पॉझमुळे माझी विचार शृंखला तुटली. मला तो पॉझ सहन झाला नाही.

"आबा, पुढे बोला. कसले विचित्र विचार?"

आबांनी एक आवंढा गिळला आणि म्हणाले,

"मला.. मला असं काहीतरी सनसनाटी, काहीतरी थ्रिलिंग करावसं वाटतंय. तुमचा तो डॅशिंग हिरो सलमान खान नाही का त्या शीतपेयाच्या जाहिरातीत म्हणत - आज कुछ तुफानी करते है…. "

आता आवंढा गिळायची पाळी माझी होती.

"आबा, सनसनाटी म्हणजे.. तेसुद्धा या वयात..."मी कसंबसं चाचरत विचारलं.

माझ्या डोळ्यांसमोर झर्रकन आबांच्या वयोमानानुसार सनसनाटी म्हणता येतील अशी काही दृश्यं उभी राहिली. म्हणजे आबा अमिताभसारखे फ्रेंच बिअर्ड राखून, चट्टेरी पट्टेरी शर्ट घालून आणि गळ्यात पिवळाधम्मक रुमाल बांधून नाक्यावर देव आनंदच्या पोझमध्ये वाकडे उभे आहेत आणि येणाऱ्या जाणाऱ्या टंच कॉलेज तरुणींना पाहून शिट्ट्या मारत आहेत असं दृश्य उभं राहिलं. त्यांची शिट्टी ऐकून एक मादक तरुणी त्यांच्याकडे पाहून गोड हसते. पुढे येते.

आबांच्या जवळ येउन ती त्यांच्या गळ्याभोवती हात घालून ती चेहरा आबांच्या चेह्र्याजवळ आणते. आबा लगेचच आपला डावा गाल पुढे करतात. ती त्यांच्या गालांवर आपले लालचुटुक ओठ टेकते. आणि मग त्यांच्या डोळ्यात रोखून म्हणते,"यू नॉट्टी बॉय. C'mon . Let’s go and have some fun" आणि मग आबा तिच्या खांद्यावर हात टाकून जवळच उभ्या केलेल्या त्यांच्या हार्ले-डेव्हिडसन कडे जातात. आणि तिच्यावर बसतात. तिच्यावर म्हणजे हार्ले डेव्हिडसनवर. ती कॉलेज तरुणी आबांच्या मागे त्यांना पालीसारखी चिकटून बसते. आबा आमच्याकडे मागे वळून न पाहता टेचात मोटर सायकल चालू करतात आणि आमच्या तोंडावर धूर ओकत ते धूड(बाईकच धूड.. आबांचं नव्हे.) दूर निघून जातं . त्या धुरातून आम्हाला फक्त आबांचा बाय बाय करणारा हात दिसतो.

हे पाहून मला सुद्धा धीर येतो. मीसुद्धा समोरून जाणाऱ्या एका मदनिकेला पाहून शिट्टी मारतो. तीसुद्धा माझ्याकडे पाहून गोड हसते. पुढे येते. आणि माझ्याजवळ येऊन ती माझ्या गळ्याभोवती हात घालून ती चेहरा माझ्या चेहर्‍याजवळ आणते. मी लगेचच माझा डावा गाल पुढे करतो. आणि.. खाडदिशी कसलातरी आवाज होतो. मी डोळे उघडतो तेव्हा माझा डावा गाल सुन्न झालेला असतो. त्या मदनिकेचं रुपांतर दुर्गे मध्ये झालेलं असतं. तिचे डोळे प्रेमाऐवजी आग ओकत असतात आणि तोंडातून शब्द बाहेर पडतात,"हलकट मेल्या, पोरींना बघून शिट्ट्या मारतोस. लाज नाही वाटत तरुण पोरींना छेडायला? घरी आई-बहिणी नाहीत वाटतं?"

"हे रणरागिणी, तरुणींना नाही तर काय आजी बाईंना छेडणार?" किंवा "घरी आई-बहिणी आहेत, पण गर्ल-फ्रेंड नाही."अशी उत्तरं तोंडावर येतात.पण ही रणरागिणी ते ऐकून आपल्याला डोळ्यांतल्या आगीनेच भस्म करून टाकेल अशी भीती वाटून मी ती वाक्यं पुन्हा आत गिळतो.

आणि तेवढ्यात हे स्वप्न भंग पावतं. मी आपला डावा गाल चोळत असतो. समोर पाहतो तर आबा मला हलवून भानावर आणत असतात आणि म्हणतात,

"बाबारे, मला सनसनाटी,थ्रिलिंग काही तरी करायचंय म्हणजे मला पोरींची छेड बीड काढायची नाहीय."

"ऑ आबा, तुम्हाला कसं कळलं, माझ्या मनात हा विचार आला ते."मी दचकून विचारलं.

आबा हसले आणि म्हणाले,

"अरे, सनसनाटी आणि थ्रिलिंग म्हटलं की तुम्हा आजकालच्या तरुण मुलांना दुसरं आणखी काय सुचणार?"

हे ऐकून मी काहीसा ओशाळलो.

आबांच्या बोलण्यावर मी विचार करु लागलो. एकंदरीत ते आज फारच उदास आणि केविलवाणे वाटत होते. त्यांचा मुड कसा खुलवता येईल, याचा विचार मी करु लागलो.

अचानक मला गिरीशची आठवण झाली. तो नाटकात काम करत असे. म्हणजे काही प्रमुख भूमिका वगैरे नाही, पण अशीच आपली काही तरी काम चलाऊ कामं त्याच्या वाट्याला येत असत. गेली बरेच दिवस तो त्याचं नाटक पाहायला मला बोलावत होता आणि मी दर वेळी काही तरी थातूर मातुर कारण देऊन जायचं टाळत असे. मी आबांना विचारलं,

"आबा, नाटक बघायला येणार का? माझा एक चांगला मित्र काम करतो त्यात. त्याने त्या नाटकाचे पासेस दिले आहेत. आज शिवाजी मंदिरला प्रयोग आहे त्याचा. बऱ्यापैकी विनोदी नाटक आहे. सासू,बिबी और गुलाम नावाचं"

नाटक म्हटल्यावर आबांचा चेहरा काहीसा खुलला.

"चल जाऊ. नाही तरी घरी नुसतं रिकामं बसून कंटाळा आला आहेत. तेवढाच थोडा वेळ बरा जाईल."

"चला तर. पटकन तयारी करा."

आम्ही दोघांनी पटकन कपडे बदलले.

तिकिटाला प्रचंड गर्दी होती. आमचा नंबर येईपर्यंत नाटकाची सुरुवात चुकली असती. मी खिशात हात घातला. रेल्वेची काही शेवटची कुपन्स सापडली. सुदैवाने दादरला जाण्याइतपत कुपन्स होती. मी लाइनमधुन बाहेर पडलो आणि व्हेंडिंग मशिनमध्ये कुपन्स पंच केली. काहीसं घाईघाईतच फलाटावर आलेली ट्रेन पकडली. दादरला उतरून चालतचालत शिवाजी नाटय मंदिरजवळ आलो. नाटक सुरु व्हायला थोडा वेळ होता. म्हणून मी आबांना बाहेर थांबायला सांगितलं आणि गिरीशला शोधण्यासाठी रंगपटाच्या (Makeup Room) दिशेने निघालो. तेवढ्यात समोर फाटके तुटके आणि मळलेले कपडे घातलेला एक भिकारी दिसला. त्याच्या दाढी-मिश्यांच्या वाढून नुसत्या जटा झाल्या होत्या. कपडे आणि डोक्यावरचे केस कितीतरी वर्षं धुतले नसावेत. हा भिकारी इथे कसा काय घुसला असा मी विचार करत होतो, तेवढ्यात तो माझ्या जवळ आला आणि भीक मागू लागला.त्याच्या अंगाला घाण वास येत होता आणि त्याच्या अंगाभोवती अक्षरशः माश्या घोंघावत होत्या. मी एका हाताने नाक दाबून त्याला निघून जायला सांगितलं,पण तो ऐकेचना. माझा पिच्छा सोडेना. शेवटी मी त्याला भीती दाखवण्यासाठी रागाने हात उगारला. त्या बरोबर तो म्हणाला,

"अरे शिऱ्या,असं काय करतोस. अरे, मला ओळखलं नाहीस? मी गिरीश, तुझा मित्र."

आवाज आता ओळखीचा वाटला म्हणून मी त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिलं. तेव्हा कुठे मला गिरीशची ओळख पटली.

पण लगेचच माझ्या चेहऱ्यावर दुःखाचे भाव पसरले.

"गिरीश, तू तर नाटकात काम करायचास. तुझ्यावर ही भीक मागायची पाळी कशी आली. तुझी ही अशी अवस्था कशामुळे झाली?"

गिरीशने कपाळावर हात मारला आणि म्हणाला,

"शुभ बोल शिऱ्या, माझा प्रोड्युसर वेळेवर पैसे देत नाही ही गोष्ट खरी आहे. पण माझ्यावर भीक मागायची पाळी अजून तरी आलेली नाही."

"मग हा अवतार?"

"बाबारे, ही माझी नाटकातली भूमिका आहे."

"म्हणजे?"

"शिऱ्या, मी या नाटकात भिकाऱ्याची भूमिका करतो."

"अच्छा, असं आहे तर? मग ठीक आहे.पण मग तुझ्या अंगाला हा घाण वास का येतोय?"

"ते असंच आपलं. भूमिका थोडी रिअलिस्टीक व्हावी, म्हणून काही दिवस आंघोळीला दांडी मारली."

"अरे देवा" मी कपाळावर हात मारला.

तेवढ्यात नाटकाची पहिली घंटा झाली.

"नाटक सुरु होतंय. चल, मी जागेवर जाऊन बसतो." असं म्हणून मी वळलो.

"जरा थांब."गिरीश म्हणाला,"तुझ्याकडे शंभर एक रुपये असतील?"

मी पाकिटातून शंभराची नोट काढली.

"धन्यवाद. सध्या जरा तंगी आहे. पण मी तुला उद्या आठवणीने परत करेन."गिरीश हसून म्हणाला.

"नो प्रॉब्लेम" म्हणून मी मागे वळलो.

गिरीशचा "उद्या" कधीच उजाडणार नाही याची मला या आधीच्या अनुभवांवरून पक्की खात्री होती.

"अनुभवातून शिकतो तोच माणूस, आणि जो शिकत नाही तो 'शिऱ्या'", असे आबा म्हणत ते काही खोटं नाही.

मी आबांना घेऊन नाटय मंदिरात शिरलो. नाटक सुरु झालं. नाटक बऱ्यापैकी विनोदी होतं. आबा पोट धरून हसत होते. त्यांना हसताना पाहून मला जरा बरं वाटलं.

गिरीशची नाटकात छोटीच भूमिका होती. पण त्याचं कामसुद्धा बरं झालं.

नाटक संपलं. गिरीशला निघायला थोडा वेळ होता. म्हणून मी आणि आबा निघालो. चालत चालत आम्ही रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघालो.

"काय आबा, कसं वाटलं नाटक?" मी विचारलं.

"छान होतं. बऱ्याच दिवसांनी एवढा हसलो."

आबांचं उत्तर ऐकून मला जरा बरं वाटलं.

थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही.

अचानक आबा म्हणाले,

"शिऱ्या,माझ्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली आहे."

"कसली?"

"छोटंसं थ्रिल."

"कसलं थ्रिल?"

"तू हसणार नाहीस?"

"नाही.तुम्ही सांगा तर खरं?"

"ऐक तर. आता आपण परतीचा प्रवास विनातिकीट करायचा"

"काय? आबा, अहो काहीतरीच काय?"

"बघ. अरे मी आयुष्यात कधीच विनातिकीट प्रवास केला नाही. मला तो विचारच भीतीदायक वाटायचा. शेवटी मध्यमवर्गीय वृत्ती पडली ना. पण आज मला ते धाडस करून पाहावंसं वाटतंय. तेवढंच छोटंसं थ्रिल. धाडस म्हण हवं तर."

"अहो पण आबा, दादर स्टेशनला बऱ्याचदा टीसी उभा असतो. आपण दोघेही अडकू. बारा रुपयाच्या प्रवासापोटी बाराशे रुपयांचा चुना लागेल."

"ते काही मला सांगू नकोस. आता आपण विनातिकीट प्रवास करायचा म्हणजे करायचाच."

आबांच्या या अजब हट्टापुढे काय बोलावं ते मला कळेना.पण ते आता ऐकायलाच तयार नव्हते. शेवटी मी त्यांच्यापुढे हात टेकले.

"ठरलं तर मग. आता आधी स्टेशनजवळ मामा काण्यांच्या हॉटेलात पियुष प्यायचं आणि मग स्टेशनमध्ये घुसून विनातिकीट प्रवास करायचा."

एव्हाना आम्ही मामा काण्यांच्या हॉटेलजवळ येउन पोचलो होतो. आबा आत शिरले. मीसुद्धा आत शिरणार एवढ्यात माझा फोन वाजला. गिरीशचा फोन होता. मी उचलला.

"काय रे, कुठे पोचलास?"

"स्टेशनजवळ"

"शाब्बास.मी तुमच्याच एरियात येतोय.एक काम आहे. तेव्हा अजून तिकीट काढलं नसशील तर माझंसुद्धा काढ. "

"अरे, तिकीट कसलं काढतोय.सगळा गोंधळच आहे."

"का रे, काय झालं?"

मी त्याला आबांच्या विनातिकीट प्रवास करण्याच्या अजब हट्टाबद्दल सांगितलं.

ते ऐकून गिरीश खो खो हसू लागला.

"अरे हसतोस काय? इथे डोक्याला फालतू टेन्शन झालंय."

"शिऱ्या. काहीतरीच काय? तुला कसलं टेन्शन? तू तर असं बोलतोस जसं काही विनातिकीट प्रवास तू कधी केलाच नाहीस. आठव आपले ते कॉलेजचे दिवस."

"ती गोष्ट वेगळी होती रे. ते सगळं तेव्हा ठीक होतं रे. ग्रुपमध्ये असताना कॉलेजच्या वयात त्याचं काही वाटत नाही. पण आता कॉलेज सुटून नोकरीला लागल्यावर सगळंच बदलतं रे. कॉलेजच्या वयात टी.सी.ने पकडलं तरी काही वाटत नाही. पण आता समाजातलं स्टेटस आडवं येतं रे. लाज वाटते अशा गोष्टींची."

"ते सगळं मला सांगू नकोस. माझा आबांना पूर्ण पाठींबा आहे. त्यामुळे माझंसुद्धा तिकीट काढू नकोस. मीसुद्धा आज आबांसोबत विनातिकीट प्रवास करणार. माझी वाट पहा. चार नंबर फलाटावर घड्याळाच्या खाली उभे राहा. मी पंधरा-वीस मिनिटांत तुम्हाला येउन भेटेन."

"ठीक आहे."मी फोन कट केला.

कपाळावर हात मारला. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. आबांच्या जोडीने आता गिरीशसुद्धा यात उतरला होता.

हे असंच चालू राहिलं तर भारतीय रेल्वे कधीच तोट्यातून बाहेर येणार नाही असा एक विचार माझ्या डोक्यात येउन गेला.

मी आत शिरलो. आबांनी पियुष मागवलं होतं. ते बऱ्याच वेळानंतर आलं. ते आल्याबरोबर आम्ही त्याचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. पियुष पिउन झाल्यावर आम्ही बाहेर पडलो. थोडा वेळ फुटपाथवर फेरीवाल्यांशी घासाघीस केली. आणि शेवटी चार नंबर फलाटाकडे निघालो. मी मनाशी देवाची प्रार्थना करत होतो,

"देवा, आजचा दिवस लाज राख. टी.सी.पासून वाचव."

ब्रिजवर माझी नजर सारखी भिरभिरत होती. टी.सी.चा शोध घेत होती. आबांनी सुद्धा मघाशी भले किती बिनधास्त पणाचा आव आणला असला तरी तेसुद्धा काहीसे घाबरलेच होते. त्यांची नजरसुद्धा टी.सी.चा शोध घेत होती. दूरपर्यंत टी.सी. दिसला नाही तसा मी काहीसा निर्धास्त झालो. तेवढ्यात अचानक कुठूनतरी काळा कोट घातलेला टी.सी. नावाचा तो दैत्य आमच्यासमोर दत्त म्हणून उभा ठाकला.

"तिकीट प्लीज."त्याने करड्या आवाजात विचारलं.

#############
क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users