लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्याच्या मदतीसाठी 'मराठी बाणा'

Submitted by माध्यम_प्रायोजक on 10 April, 2014 - 14:24

श्री बाबा आमटे प्रस्थापित आणि डॉ प्रकाश आमटे संचालित हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प दवाखान्याच्या पुनर्निर्माणासाठी लोकबिरादरी मित्रमंडळ, पुणे यांच्यातर्फे आयोजित, श्री. अशोक हांडे प्रस्तुत 'मराठी बाणा'.

शनिवार, दिनांक २६ एप्रिल २०१४
वेळ - सायं. ७ ते १०
स्थळ - गणेश कला क्रीडा, पुणे

***

श्री. बाबा आमटे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. हेमलकसा इथे त्यांनी स्थापन केलेल्या आणि डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे व त्यांच्या अनेक सहकार्‍यांनी प्राणपणानं जोपासलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यालाही आता चाळीस वर्षं पूर्ण झाली आहे. भामरागड तालुक्यातल्या दुर्गम जंगलात वसलेल्या या दवाखान्यात आदिवासी बांधवांवर मोफत वैद्यकीय उपचार केले जातात. आदिवाशांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी, भगत-मांत्रिक इत्यादींकडून त्यांचं शोषण होऊ नये, यासाठी डॉ. प्रकाश, डॉ. मंदाकिनी, डॉ. दिगंत व डॉ. अनघा आमटे अहोरात्र झटत असतात.

लोकबिरादरी प्रकल्प दवाखाना -

१९७४ साली एका झोपडीत सुरू झालेल्या लोकबिरादरी दवाखान्याचं स्वरूप आता बदललं आहे. दोनशे किलोमीटरांच्या परिसरातून महाराष्ट्र, छत्तीसगड व आंध्रप्रदेश या राज्यांतल्या सुमारे एक हजार गावांतून येणाऱ्या रुग्णांवर इथे उपचार केले जातात. दवाखान्यात सोनोग्राफी, एक्स-रे, डिलीवरी रूम, ऑपरेशन थिएटर अशा आधुनिक सोयी आदिवाशांकरिता उपलब्ध आहेत. दरवर्षी जवळपास ४५,००० रुग्ण लोकबिरादरी दवाखान्याचा विनामूल्य लाभ घेत आहेत. या दवाखान्याला सरकारी अनुदान नाही. वर्षभराचा प्रत्यक्ष खर्च सुमारे दहा लाखांच्या वर आहे. हा सर्व खर्च जनसामान्यांच्या देणगीतून भागवला जातो. जंगलातल्या आदिवाशांचा आत्ता कुठे औषधावर विश्वास बसू लागला आहे, आणि त्यामुळेच शक्य तितक्या नेटानं हा दवाखाना चालवण्याचा आमटे कुटुंबीयांचा निर्धार आहे .

मात्र या दवाखान्याची जुनी इमारत आता मोडकळीस आली आहे. त्याच ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात येत आहे. २०१४ हे स्व. बाबा आमट्यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यानं बाबांच्या शंभराव्या जन्मदिनी, २६ डिसेंबर २०१४ रोजी, नवीन दवाखान्याच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा व्हावा असा संकल्प आहे.

या दवाखान्याच्या उभारणीस मदत म्हणून पुण्यातल्या लोकबिरादरी मित्रमंडळानं २६ एप्रिल, २०१४ रोजी श्री. अशोक हांडे प्रस्तुत 'मराठी बाणा' या बहुरंगी-बहुढंगी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.

मराठी रंगभूमीवर ‘सेव्हन्टी एमेम प्रोग्रॅम' म्हणून प्रसिद्ध असलेला, सुमारे हजारापेक्षा जास्त प्रयोग सादर झालेला ‘चौरंग’ निर्मित ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम सांस्कृतिक महाराष्ट्राचा एक अत्यंत मनोहारी असा प्रवास आहे.

या कार्यक्रमाचा सगळा खर्च वजा जाता उरणारा निधी हेमलकशातील लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्याच्या उभारणीसाठी पाठवण्यात येणार आहे. तरी या कार्यास मदत म्हणून आपण मोठ्या संख्येनं या कार्यक्रमास उपस्थित राहावं, अशी मनःपूर्वक विनंती!

***

शनिवार, दिनांक २६ एप्रिल २०१४
वेळ - सायं. ७ ते १०

देणगी प्रवेशिका -
तीन आसनी सोफा: रु. ५०००/-
खुर्च्या: रु. ८००/-, ५००/-, ३००/- व १५०/-

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

***

दि. १७ एप्रिलपासून देणगी प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध:
• गणेश कला क्रीडा मंदिर, स्वारगेट
• बाल गंधर्व रंगमंदिर , जंगली महाराज रोड यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
• शिरीष ट्रेडर्स, कमला नेहरू पार्क समोर, एरंडवणे

***

कार्यक्रमस्थळी डोनेशन चेकही स्वीकारले जातील, देणगीवर ८० जीनुसार कर-सवलत आहे.

***

मायबोली.कॉम या कार्यक्रमाचे ऑनलाइन माध्यम प्रायोजक आहेत.

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार,
यंदाचे वर्ष स्व. बाबा आमटे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने, सध्या हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पात बांधकाम सुरु असलेल्या हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा २६ डिसेंबर २०१४ रोजी करण्याचा मानस आहे. या कार्याच्या निधी संकलनासाठी वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

आज दिनांक २८ एप्रिल २०१४ पासून आनंद बालभवन, रामनगर, डोंबिवली (पूर्व) येथे लोक बिरादरी प्रकल्प छायाचित्र प्रदर्शन आणि तेथे तयार होणाऱ्या वस्तूंची विक्री सुरु झाली आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात बाल साहित्यिक श्री. राजीव तांबे ह्यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी त्यांनी लोक बिरादरी च्या कार्यास शुभेच्छा दिल्या. हे प्रदर्शन २ मे पर्यंत सकाळी १०.३० ते सायंकाळी ८.३० सर्वांसाठी खुले राहणार आहे.

या प्रकल्पास साहाय्य करण्याची इच्छा असल्यास, कृपया श्री. अनिकेत आमटे यांच्याशी ७५८८७७२८६० या क्रमांकावर संपर्क साधावा.