चला चंगळवादी होऊयात .... ? का कशासाठी ???

Submitted by अनघा आपटे on 1 April, 2014 - 04:30

३०/०९/२०१२
मा. गिरीश कुबेरजी,
नमस्कार,
आज लोकसत्ता मध्ये चतुरंग सोबतच लोकरंगही पाठवलात त्याबद्दल मनापासून आभार. काय होतं ना वर्तमानपत्र न येण्याचा दिवस जर शनिवार किंवा रविवार असेल ना तर मी फार अस्वस्थ होते, चतुरंग /लोकरंग वाचायला मिळणार नाही म्हणून. तसे वर्तमानपत्र डोळसपणे मी वाचायला सुरुवात केली ते माधव गडकरी संपादक असण्याचे शेवटचे दिवस असावेत. तेंव्हापासून लोकसत्ता फार आवडीने वाचते आहे. अगदी केतकरांचा प्रो कॉंग्रेस असणे याकडे डोळेझाक करून. आपण संपादकपदी आलात, तेंव्हा वाटले चला बरे झाले. अनेकदा आपले "अन्यथा" हे सदर मी नुसतेच वाचत नाही तर फेसबुकवर किंवा पूर्वी इन्फी बीबी वर शेअरही करत असे. तर जशी तुमची पटणारी मते/ यांना शेअर केले तसे न पटलेल्या गोष्टींचे ही व्हावयास हवे म्हणून हा प्रपंच. सुरुवातीलाच एक सांगू इच्छिते की मी कोणत्याही राजकीय पक्षाची नाही. कारण राजकारणी लोकांनाच मुळात राजकारण सोडून बाकी कशाशी बांधिलकी नसते. मला वाटतं नमनाला इतकेच तेल पुरे......कारण जगण्याच्या अपरिहार्यतेने असले तरी मनापासून मी "चंगळवादी" संस्कृतीचा भाग होवू इच्छित नाही.

तर आपण म्हणता त्या प्रमाणे चंगळवादाची व्याख्या करता येत नाही. आपण म्हणता त्या अर्थी खरेच असेल ते. पण काही उदाहरणे बघू आणि त्यातून मला काही बोध होतो का ते पाहू. समजा मला १ लिटर पेप्सी ची बाटली घरी आणायची आहे. समजा त्याची किंमत ५०/- आहे. घराजवळचा किराणा किंवा जनरल स्टोअर्स मध्ये मी चालत जाते, ५० रु. देते आणि पेप्सी घरी घेऊन येते. पण मी बिग बझार, मोअर, स्टार बझार मध्ये जाते, जाते तीच मुळात थोडा खर्च करून पेट्रोल जाळून, मग आणखी थोडे पेट्रोल जाळते पार्किंग साठी जागा शोधताना. तिथे आत जाते. कोणता तरी स्वस्त दिवस असतो तो. त्यामुळे तिथे पेप्सीच्या २ बाटल्या ९० रु. त मिळत असतात मला वाटते चला पैसे वाचत आहेत घेवून टाकू दोन लिटर. इथेच हे थांबत नाही, तिथे अजून अशाच चार सो कॉल्ड स्वस्त गोष्टी असतात. मी त्याही उचलून आणते घरी. शेवटी बऱ्यापैकी खिसा रिकामा करून पुन्हा पेट्रोल जाळून मी घरी पोहचते. आता बघा माझी गरज होती (?) १ लिटर पेप्सीची त्या स्वस्तच्या मोहापायी मी किमान ९० रु आणि पेट्रोल चे थोडे असे पैसे त्यावर खर्च केलेत कमाल किती राम जाणे. माझ्या दृष्टीने गरज नसतानाही गरज असल्याचा आभास निर्माण करणे, व त्यासाठी खर्च करणे हा चंगळवाद.
तुम्ही म्हणता त्या प्रमाणे १०० रु. लिटर चे तेल ९५ रु. लिटर प्रमाणे देणे त्यांना परवडते. साधारण सर्व शहरांमध्ये होलसेलची दुकाने असतात, जिथे हेच तेल जर १२ चा बॉक्स घेतला तर ८५ रु. लिटर प्रमाणे मिळते. ते देखील हवा असलेला ब्रान्ड. असं कधी अनुभवलंय का कोणी की या सुपर मार्केट्स मध्ये काही ठराविक ब्रान्ड च मिळतात. म्हणजे पुन्हा ५ रु स्वस्त साठी तडजोड आलीच.

तुमच्या म्हणण्यानुसार "अंथरूण पाहून पाय पसरावेत" या पूर्वापार चालत आलेल्या म्हणीत विकृती आहे. माझ्या मते आज झोपताना अंथरूण पाहून पाय पसरावेत, उद्या सकाळी उठून ते मोठे कसे होईल ते पाहावे आणि त्या दृष्टीने पावले उचलावीत. गैर मोठे होण्यात नाही हो. कसे होतां यावर सारे अवलंबून आहे. तुम्ही प्रयत्नांनी अंथरूण लांब करत राहा हो आणि खुशाल पाय पसरत राहा, पण प्रत्येक वेळी अंथरुणावर टेकल्यावर "अंथरूण पाहून पाय पसारा" हे लागू होतेच ना?

तुमच्या म्हणण्याप्रमाणे सधन लोकांनी सर्व वस्तू सुविधा विकत घ्यावात जेणेकरून रोजगार निर्माण होतो. या न्यायाने तुमच्या घरी लोणची, पापड, चिवडा चकली, लाडू इतकेच काय रोजचा चहा, नाश्ता जेवण हे पण बाहेरूनच येते का हो? मी ज्या इंडस्ट्रीचा भाग आहे, त्या आमच्या विरुद्ध अशी ओरड समाजात नेहमी आढळते ती म्हणजे सारी महागाई आमच्या मुळे आहे, आमच्यामुळे चंगळवाद बोकाळलाय. तुम्ही म्हणता तसं लोक जास्त हॉटेल मध्ये जातील तर, ती चांगली चालतील, तिथे काम करणाऱ्यांचे वेतन आणि राहणीमान उंचावेल.....खरच असं घडेल का हो. नाही, कारण माझ्या घराजवळ एक छान हॉटेल आहे त्याच्या मालकाचा बंगलाही माझ्या घराजवळच आहे, राहणीमान गेल्या १२ वर्षात मला फक्त तिथेच उंचावताना दिसले आहे. टेबल साफ करणाऱ्या मुलांचे किंवा वेटरचे नाही. दुसरा मुद्दा असा की जी गोष्ट घरी बनवताना मी "दिलसे" बनवते, तशी बाहेर कोणी बनवून देतं का हो? कितीही पैसे मोजायची तयारी ठेवली तरी माझ्या घरच्यांना सेम माझ्या हातची चव विकत आणता येईल का?

तुम्ही म्हणता तरुण मुलीना लोणची पापड घरी न करता, विकत घेण्या बद्दल अनेक तरुण मुलीना ओरडा खावा लागतो. मला वाटता यात दोन मुद्दे आहेत, करता येणं आणि करणं आणि या दोन अतिशय भिन्न बाबी आहेत. माझ्या मते न करता येण्या बद्दल तो ओरडा असतो. न करण्यासाठी नाही. जसा की गेली काही वर्षे दिवाळीत फराळाचा एकही पदार्थ मी घरी बनवू शकले नाही, उत्तमोत्तम पदार्थ पुरवणाऱ्या चितळे, वृंदावन या दुकानांवर मी अवलंबून आहे. कारण वेळ नसणे हे अपरिहार्य कारण त्यास जबाबदार आहे. मला त्याबद्दल कधी कोणी काही बोलले नाही, कारण चकली पासून चिरोट्यापर्यंत प्रत्येक पदार्थ मला उत्तम बनवता येतो हे मी या पूर्वी सिद्ध केले आहे. आणि आता ऐन दिवाळीचे सुट्टीचे मिळणारे दोनच दिवस, घरचे लोक, नातेवाईक यांच्या सोबत न घालवता चकली चिवडा बनवण्यात घालवावे अशी कोणाचीच अपेक्षा नाही. पण रोजगार निर्माण होतोय म्हणून काही या दुकानांमधून मी पदार्थ विकत आणत नाही हो.

सधन आहे, रोजगार निर्माण होतो म्हणून मी वस्तू विकत आणते का ? तर नाही. गणपतीत उकडीचे मोदक साधारण १०० लागतात दुपारच्या जेवणासाठी १७/१८ माणसांसाठी, पैसा आहे म्हणून मी १५/१६ रु. ला एक या दराने १०० मोदक विकत आणेन का? आणि जर आणलेच तर नवरा त्यावर ताव मारून ५/६ मोदक तरी खाईल का तो मोदकांचा भाव ऐकून? खर तर नाही.

सधन आहे, रोजगार निर्माण होतो म्हणून मी रोज घरी स्वयंपाक किंवा किमान पोळ्या विकत आणते का? ५ रु एक पोळी मिळते. त्यापेक्षा उत्तम प्रतीचे गहू तेल घरी विकत आणून, एका उत्तम पोळ्या बनवणाऱ्या गरजू स्त्रीस घरी कामास ठेवणे मला चालेल जर इतकाच माझ्या वेळेचा प्रॉब्लेम असेल तर. यातूनही रोजगार निर्माण होईलच ना?

सधन आहे आणि सो कॉल्ड बिग बझार, मोअर सारखी किंवा उद्या येवू घातलेली परदेशी वाण्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करतात म्हणून मी तिथे जावे का? किंबहुना मी सधन आहे म्हणूनच मला गुलटेकडी सारख्या किंवा वाशीतील ए. पी. एम सी. सारख्या मार्केट मध्ये जाणे शक्य आहे. वर्षाचे उत्तम क़्वालीतीचे समान आणणे शक्य आहे, ते साठवून ठेवण्यासाठी करावी लागणारी उस्तवार मी करू शकते आणि उत्तम प्रतीचे धान्य वर्षभर खाऊ शकते. असे करूनही जे काही थोडे समान दर महिन्याला आणायचे असते, ते जर मी घराजवळच्या किरकोळ वाण्याच्या दुकानातून आणले तर समजा माझे १००० रु. खर्च होत असतील तर मोअर, बिग बझार येथे जावून मी किमान दीडपट पैसे खर्च करून येते. कारण इतक्या तेवढी गरज नसलेल्या वस्तू तुमच्या बरोबर अशाच घरी येतात.....याला चंगळवाद म्हणू यात का?

तुम्ही म्हणता "आपल्याला घाऊक बाजारातील दर आणि या किरकोळ विक्रीच्या दुकानातील दर यांत प्रचंड फरक आढळतो." अगदी खरं ! पण मोअर, स्टार बझार ही दुकाने आपल्यास घावूक भावात खरंच या गोष्टी देतात का? याच वर्षीचे उदाहरण आहे. गुलटेकडी तून तुरडाळ उत्तम प्रतीची मला मिळाली ५० रु. किलो, आणि त्या नंतरच्या आठवड्यात स्टार बझार ने स्वस्त ची जाहिरात केली त्यात भाव होता ७० रु. जी स्वस्त ते विकत होते, ६५ रु किलो.....आता हे स्वस्त घाऊक भावात झाले का?

जुने ते सर्व वाईट, टाकावू किंवा आपल्याकडची सर्व मुल्ये टाकावू असे का आपले होते आहे. गरजेशिवाय केलेला अफाट खर्च म्हणजे चंगळवाद असे ठरवले तर हे नक्की ही सारी मोठी चकाचक दुकाने चंगळवाद वाढवण्यास नक्कीच मदत करतात. तरीही आपण त्यांचे समर्थन करायचे आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख नीट समजला नाही. झंपी व दूरान्त ह्यांच्याशी अलमोस्ट सहमत!

एखाद्या लेखातील एखाद्या विधानावरून मूळ लेखकाची काही विषयांबाबत काही ठाम, चुकीची व एकांगी मते आहेत असे जनरलायझेशन होऊ नये असे प्रामाणिकपणे वाटते.

<कुबेरांच्या लेखाची लिन्क दिलीत तर संदर्भ कळेल आणि मग पुन्हा वाचून कदाचित समजेल.>+१

कुबेरांचा लेख प्रसिद्ध झाला होता. तेव्हा वाचला होता. त्यातले काहीही आठवत नाही.
याच विषयावरचा अन्य कुणा नामांकित व्यक्तीचा लेख एखाद्या दिवाळी अंकातही वाचल्याचे स्मरते.

वैद्यबुवा, प्रतिसाद आवडलाच...

कारण वेळ नसणे हे अपरिहार्य कारण त्यास जबाबदार आहे. मला त्याबद्दल कधी कोणी काही बोलले नाही, कारण चकली पासून चिरोट्यापर्यंत प्रत्येक पदार्थ मला उत्तम बनवता येतो हे मी या पूर्वी सिद्ध केले आहे. आणि आता ऐन दिवाळीचे सुट्टीचे मिळणारे दोनच दिवस, घरचे लोक, नातेवाईक यांच्या सोबत न घालवता चकली चिवडा बनवण्यात घालवावे अशी कोणाचीच अपेक्षा नाही. पण रोजगार निर्माण होतोय म्हणून काही या दुकानांमधून मी पदार्थ विकत आणत नाही हो.>> दिवाळीचा फराळ उत्तम करता येणे म्हणजे आदर्श बायको,सून असणे असा अजूनही खूप लोकांचा समज आहे याचे खरोखर आच्छर्य वाटते.

वैद्यबुवा, प्रतिसाद आवडलाच...
आयटीत काम करुन बक्कळ पैसा मिळेल, पण त्याचा अर्थ असा होत नाही की कुठलीही गोष्ट अव्वाच्या सव्वा भाव देऊन विकत घ्यावी.> Lol

कारण वेळ नसणे हे अपरिहार्य कारण त्यास जबाबदार आहे. मला त्याबद्दल कधी कोणी काही बोलले नाही, कारण चकली पासून चिरोट्यापर्यंत प्रत्येक पदार्थ मला उत्तम बनवता येतो हे मी या पूर्वी सिद्ध केले आहे. आणि आता ऐन दिवाळीचे सुट्टीचे मिळणारे दोनच दिवस, घरचे लोक, नातेवाईक यांच्या सोबत न घालवता चकली चिवडा बनवण्यात घालवावे अशी कोणाचीच अपेक्षा नाही. पण रोजगार निर्माण होतोय म्हणून काही या दुकानांमधून मी पदार्थ विकत आणत नाही हो.>> दिवाळीचा फराळ उत्तम करता येणे म्हणजे आदर्श बायको,सून असणे असा अजूनही खूप लोकांचा समज आहे याचे खरोखर आच्छर्य वाटते.

गरज नसताना वस्तू घेऊन येणे, याचे खापर मोअर, स्टार बझारवर फोडणे हे वाचून मजाच वाटली. ही दुकानं तुमच्यासमोर वस्तू मांडून ठेवतात, तुमच्या बास्केटमध्ये जबरदस्तीने भरत तर नाहीत ना? की या दुकानांत नियमित गेलं नाही तर तुमच्यावर कुणी खटला भरतं? म्हणजे स्वतःच्या खरेदीवर ताबा राहिला नाही तर दोष मात्र या बड्या दुकानांचा? (तो एक जोक आठवला. एक माणूस एकदा केळीच्या सालावरून पाय घसरून पडतो. पुढच्या आठवड्यात त्याला पुन्हा रस्त्यात केळीचं साल दिसतं. तो म्हणतो, अरे यार आज फिर फिसलना पडेगा.)

माझ्या मते न करता येण्या बद्दल तो ओरडा असतो. न करण्यासाठी नाही. >>>>> का बुवा पण मुलींनाच असा ओरडा तरी? मला त्यात मुळातच रस नसेल आणि मला माझा सुगरणपणा वगैरे काहीही सिद्ध करायचं नसेल तर? बाकी चंगळवाद आणि मॉलांबद्दल बोलता बोलता हळूच त्यात घरच्या बाईने 'दिलसे' पदार्थ बनवणे आणि बाहेरच्या पदार्थांत तिच्या हातची चव न सापडणे या गोष्टी घुसल्या आहेतच.

एखादी बाई सुबक कळ्या पाडलेले गरमागरम उकडीचे हवे तितके मोदक मला निगुतीने पॅक करून विकत असेल गणपतीच्या दिवशी तर मी देईन तिला दर मोदकापाठी १५/१६ रुपये. तिने माझं काम हलकं केल्याचा आणि तिच्या मोदक बनवण्याच्या कौशल्याचा मोबदला आहे तो. बाकी १५/१६ रुपयांचे 'महाग' मोदक आणले म्हणून पाचसहा खाऊ न शकणारे लोक स्वतः मोदक वळायला/उकडायला उभे राहतात का, हा एक प्रश्न पडला. पण देऊ तो आपण सोडून!

बाकी लेखाच्या शेवटच्या प्रश्नाबद्दल म्हणायचं तर हो, आहे बाबा माझे या दुकानांना समर्थन! सध्या उन्हाळा प्रचंड आहे, एसी दुकाने खरेदीला बरी! मुद्दा नं २: नको असलेल्या गोष्टी आपोआप बास्केटमध्ये येऊन बसत नाहीत याची मी पक्की खात्री करून घेतली आहे आणि तिसरे पण महत्त्वाचे म्हणजे गुलटेकडी आमच्या घरापासून खूपच लांब आहे.

पैसे असेल तर खर्च करा

पैसे असेल आणि गरज असेल तर खर्च करा

पैसे असेल आणि गरज असेल त्याचबरोबर हौस असेल तर खर्च करा

पैसे असेल आणि खर्च करायचे जिवावर येत असेल तर.............................दुसर्यांना शांतपणे खर्च करु द्या Biggrin

बाकी घरी करता येतील असे पदार्थही बाहेरून विकत आणणे हेदेखील एकप्रकारे आऊटसोर्सिंगच आहे बर्का! त्याने काही लोकांना रोजगार मिळतो, हे पण खरंय. हे आऊटसोर्सिंग चंगळवादी असेल तर आयटीतल्या आऊटसोर्सिंगचे काय? ते तसे नसेल तर का नाही? की आपल्याला फायद्याचे आऊटसोर्सिंग तेवढे चांगले?

'माझ्या हातच्या कोडिंगची सर भारतातल्या सॉफ्टवेअर इंजिनीयरच्या हातच्या कोडला येणार तरी आहे का?' असे जर अमेरिकन, युरोपीय कंपन्यांतल्या लोकांनी म्हटले असते तर भारतात 'चंगळवादाला उत्तेजन देणारी' आयटी इंडस्ट्री कशी फोफावली असती बरे? Proud

चंगळवाद नेमका कशाला म्हणायचा हे आधी ठरवलं पाहिजे. रोजच्या वापरातले दोन कपडे आणि एक ठेवणीतला कपडा आणि सात-आठ वर्षं बिनातक्रार 'चालणारी' वहाण वापरणार्‍या पिढीनंतर सगळा चंगळवादच बोकाळला आहे. त्यामुळे शेजारी महिन्याला १० बाटल्या पेप्सी पितात पण आम्ही मात्र ८ च बाटल्या पेप्सी पितो म्हणून आम्ही चंगळवादी नाही अशा टाईपचा निष्कर्ष चुकीचा आहे.

लेखिकेने जरा नेमके मुद्दे मांडायला हवेत. वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे काही अनाहूत मुद्दे आले आहेत आणि ते खरंच 'सनातनी' आहेत.

जरा त्या गिरीष कुबेरांच्या लेखाची लिंक द्या कोणीतरी.

उदयन, श्रद्धा, मामी...... +१११११११११

>>>पैसे असेल आणि खर्च करायचे जिवावर येत असेल तर.............................दुसर्यांना शांतपणे खर्च करु द्या खो खो... या वाक्यासाठी अनेकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत!!

Proud Proud Proud

बाय द वे ..... मीपण "आय टी" वालीच आहे !>>> Lol ते लेखात लिहिलच आहे तुम्ही. प्रश्न तो नाहीये, प्रश्न असा आहे की चंगळवाद डिफाईन करत असताना तुम्ही मधल्या मध्ये सधन आयटिवाली ते पराया धन सुग्रण आयटिवाली असे जे ओसिलेट (oscillate) केलत ते कशापायी ? हा आहे.

चंगळवादी म्हणजे नक्की काय?
स्वतःचे आयुष्य सुखी करायचे, जास्त आनंदी करायचे हा मनुष्यस्वभाव नैसर्गिक आहे. सुदैवाने देवाने इतर प्राण्यांपेक्षा मनुष्याला अनेक जास्त प्रमाणावर बुद्धि व गुण दिले आहेत.
म्हणून माकडांसारखा जंगलात, थंडीवार्‍यात उन्हात, पावसात रहाण्यापेक्षा मजबूत घरे बांधण्यास शिकला. निरनिराळे पदार्थ खाऊन जिभेचे चोचले पुरवले. नाहीतर गाई म्हशींसारखे आजहि फक्त वैरण, ती सुद्धा मिळाली तर, गवत सहज मिळाले तर अश्या तर्‍हेचे जीवन जगलो असतो.
त्यासाठी लागतील ते परिश्रम केले. हेच आज च्या काळात बघायचे तर पैसा मिळवून निरनिराळ्या तर्‍हेचे उपभोग घ्यायचे.
आय्टी वाल्यांना फुकट एव्हढे जास्त पैसे मिळत नाहीत, त्यांचे ज्ञान, जे हवे आहे ते करून दा़खवण्याचे कौशल्य जे इतरांत नाही, त्याबद्दल मिळतात. बेमालूम बनवाबनवी करणे एव्हढेच कौशल्य दाखवून सुद्धा काही लोक खूप श्रीमंत होतात, तर पैसा कुणाजवळ जास्त कसा झाला याची चर्चा करण्यात अर्थ नाही. पैसा हे एक साधन आहे, ते मिळवण्याचे कौशल्य असेल तर पैसे मिळतील.

मला वाटते या चंगळवादामधे माणुसकी, सामाजिक, राजकीय जबाबदारी ची अवहेलना हे जास्त दिसून येते म्हणून चंगळवादाला विरोध.

नाहीतर चंगळवाद अमेरिकेत काय कमी होता काय महाराजा, ५० वर्षांपूर्वी? पण त्यातूनच वेल्फेअर, फूड स्टँप्स असे गरीबांसाठी बरेच प्रोग्रॅम्स तयार करण्यात आले. म्हणून आज इथे बहुसंख्य (९० टक्क्याहून जास्त) लोकांना रोजच्या जेवणाची चिंता नाही. शालेय शिक्षण फुकट. त्यामुळे चंगळवादातूनहि एक सुजाण, राजकारणात, समाजकारणात हिरीरीने भाग घेणारी जनता तयार झाली. जर या चंग़ळवाद्यांनी राजकीय, सामाजिक विषयांबद्दल उदासीनता दाखवली असती तर इतके दिवस हे राष्ट्र टिकून राहिलेच नसते, नि अजूनहि जगात मोठ्या प्रमाणावर दादागिरी करू शकले नसते.

जनता चंगळवादी की गांधीवादी आहे हा प्रश्न नाही. जनता समाजकारणात, राजकारणात सक्रिय मदत करू शकेल की नाही हा आहे.

>>>आय्टी वाल्यांना फुकट एव्हढे जास्त पैसे मिळत नाहीत, त्यांचे ज्ञान, जे हवे आहे ते करून दा़खवण्याचे कौशल्य जे इतरांत नाही, त्याबद्दल मिळतात<<<

Rofl

झक्की विनोदी लिहितात हे माहीत होते, पण एवढे विनोदी लिहीत असतील ह्याची कल्पना नव्हती.

>>> आय्टी वाल्यांना फुकट एव्हढे जास्त पैसे मिळत नाहीत, त्यांचे ज्ञान, जे हवे आहे ते करून दा़खवण्याचे कौशल्य जे इतरांत नाही, त्याबद्दल मिळतात

'आवरा' लेव्हल चा विनोद आहे हा

>>>आय्टी वाल्यांना फुकट एव्हढे जास्त पैसे मिळत नाहीत, त्यांचे ज्ञान, जे हवे आहे ते करून दा़खवण्याचे कौशल्य जे इतरांत नाही, त्याबद्दल मिळतात<<<

अरे बापरे, मी इतकी वर्ष आय्टी काढुन मला असे आय्टी वाले कसे दिसले नाहीत?

झक्कींनी "जे इतरांत नाही.." हे लिहिल्यामुळे गैरसमज होऊ शकतो पण आयटि मध्ये डिमांड वाढल्यामुळे इतर ट्रेड्स/फिल्ड मधल्या लोकांपेक्षा आयटि फिल्ड मध्ये एंट्री लेवला बर्‍यापैकी जास्त पगार मिळतो ही वस्तुस्थिती आहे.

मी स्वतः आयटी मध्ये नसलो तरी घरातली बरीच मंडळी आहे. भारतात गेलो की "आयटीत नोकरी करतात, भरपूर पैसा मिळतो, माज चढलाय, करतात खर्च वाट्टेल तसा" "आयटीत नोकरी करता आणि भरपूर पगार मिळतो म्हणून काय तुम्हाला फर अक्कल आली का?" अशी विधानं ऐकायला मिळाली बर्‍याच "नॉन-आयटी" लोकांकडून आणि जरा बुचकाळ्यात पडायला झालं.
कुठलीही नोकरी माणसाला मिळते तेव्हा काहीतरी स्किल आहे आणि त्या स्किलचा उपयोग आहे म्हणूनच मिळते. फक्त आयटि/कंप्युटर सायन्सच्या नावानी डिग्री घेतली की मिळाली नोकरी असं थोडीच आहे. आणि कंप्युटर सायन्स मध्ये डिग्री घेणे म्हणजे अचानक सोपं झालय का बाकी डिग्र्यांपेक्षा जेणेकरुन इतर मंडळी त्यांची अक्कल काढायला मोकळे होतात? मला आठवतं तसं कंप्युटर सायन्स मध्ये फर्स्ट क्लास किंवा डिस्टिंक्शन मिळवणे हे बर्‍यापैकी अवघड होतं आणि काही काही उदाहरणांमध्ये तर इतर ट्रेड्स पेक्षा जास्त अवघड होतं विषय थियरीवर जोर देणारे नसून लॉजिक वर जोर देणारे असल्यामुळे.
तुमच्या बौद्धिक झेपेनुसार, १२वीत मिळालेल्या गुणांनुसार, आर्थिक परिस्थितीनुसार तुम्ही जो काही ट्रेड्/फिल्ड निवडता ती एक गोष्ट आणि त्या ट्रेड ला मार्केट मध्ये डिमांड किती आहे ती एक वेगळी गोष्ट आहे.
आता आयटि मधल्या स्किल्सना डिमांड जास्त आला आणि त्यांना मार्जिनली पगार जास्त मिळत असतील तर त्यात त्यांची चूक तर नाहीये ना?

या करताच आम्ही आमच्या सोसायटीमध्ये 11 जणांनी मिळून मुंबई ग्राहक पंचायतीचा संघ स्थापन केला आहे. मुंबईतुन गरजेच्या सामानाची यादी येते पुढच्या महिन्याची त्यातील आपल्याला आवश्यक साहित्य मागवायचे, अगदी उत्कृष्ट दर्जाचे वाणसामान तसेच गरजेच्या वस्तु वर्षभर विभागलेल्या वितरणाव्दारे आपल्या सोसायटीत येतात. दरही एकदम माफक असतात कारण हा सर्व व्याप ना नफा ना तोटा तत्वावर मुंबई व पुण्यातील 33000 कुटुंबांकरीता चालतो. पुण्यातील 500 कुटुंबे (जवळपास 36 संघ) याचा गेले वर्षभर फायदा घेत आहेत. सामानात येणारी पोती, साखर, गहू, तांदूऴ यांच्या पिशव्या धुवुन परत पाठवायच्या, प्लास्टीकचा वापर कमीतकमी होईल याची काळजी घेतली जाते. शिवाय यादी प्रत्येक सण, उत्सव याचा व आपल्या ऋतुंचा विचार करुन दिलेली असल्याने खरेदी आवश्यक तेवढी व उत्तम दर्जाची होते.

वैद्यबुवा,
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट
असे कुठल्या तरी भजनात का देवाच्या गाण्यात म्हंटले आहे, तसे तुम्ही माझे वेडे वाकडे लिखाण सुधारून लिहीलेत. धन्यवाद.
अर्थात कशाला विनोद, वेडेपणा म्हणायचे हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. मला तर कित्येक लोकांच्या गझला वगैरे पाहून तसेच वाटते.

Pages