चला चंगळवादी होऊयात .... ? का कशासाठी ???

Submitted by अनघा आपटे on 1 April, 2014 - 04:30

३०/०९/२०१२
मा. गिरीश कुबेरजी,
नमस्कार,
आज लोकसत्ता मध्ये चतुरंग सोबतच लोकरंगही पाठवलात त्याबद्दल मनापासून आभार. काय होतं ना वर्तमानपत्र न येण्याचा दिवस जर शनिवार किंवा रविवार असेल ना तर मी फार अस्वस्थ होते, चतुरंग /लोकरंग वाचायला मिळणार नाही म्हणून. तसे वर्तमानपत्र डोळसपणे मी वाचायला सुरुवात केली ते माधव गडकरी संपादक असण्याचे शेवटचे दिवस असावेत. तेंव्हापासून लोकसत्ता फार आवडीने वाचते आहे. अगदी केतकरांचा प्रो कॉंग्रेस असणे याकडे डोळेझाक करून. आपण संपादकपदी आलात, तेंव्हा वाटले चला बरे झाले. अनेकदा आपले "अन्यथा" हे सदर मी नुसतेच वाचत नाही तर फेसबुकवर किंवा पूर्वी इन्फी बीबी वर शेअरही करत असे. तर जशी तुमची पटणारी मते/ यांना शेअर केले तसे न पटलेल्या गोष्टींचे ही व्हावयास हवे म्हणून हा प्रपंच. सुरुवातीलाच एक सांगू इच्छिते की मी कोणत्याही राजकीय पक्षाची नाही. कारण राजकारणी लोकांनाच मुळात राजकारण सोडून बाकी कशाशी बांधिलकी नसते. मला वाटतं नमनाला इतकेच तेल पुरे......कारण जगण्याच्या अपरिहार्यतेने असले तरी मनापासून मी "चंगळवादी" संस्कृतीचा भाग होवू इच्छित नाही.

तर आपण म्हणता त्या प्रमाणे चंगळवादाची व्याख्या करता येत नाही. आपण म्हणता त्या अर्थी खरेच असेल ते. पण काही उदाहरणे बघू आणि त्यातून मला काही बोध होतो का ते पाहू. समजा मला १ लिटर पेप्सी ची बाटली घरी आणायची आहे. समजा त्याची किंमत ५०/- आहे. घराजवळचा किराणा किंवा जनरल स्टोअर्स मध्ये मी चालत जाते, ५० रु. देते आणि पेप्सी घरी घेऊन येते. पण मी बिग बझार, मोअर, स्टार बझार मध्ये जाते, जाते तीच मुळात थोडा खर्च करून पेट्रोल जाळून, मग आणखी थोडे पेट्रोल जाळते पार्किंग साठी जागा शोधताना. तिथे आत जाते. कोणता तरी स्वस्त दिवस असतो तो. त्यामुळे तिथे पेप्सीच्या २ बाटल्या ९० रु. त मिळत असतात मला वाटते चला पैसे वाचत आहेत घेवून टाकू दोन लिटर. इथेच हे थांबत नाही, तिथे अजून अशाच चार सो कॉल्ड स्वस्त गोष्टी असतात. मी त्याही उचलून आणते घरी. शेवटी बऱ्यापैकी खिसा रिकामा करून पुन्हा पेट्रोल जाळून मी घरी पोहचते. आता बघा माझी गरज होती (?) १ लिटर पेप्सीची त्या स्वस्तच्या मोहापायी मी किमान ९० रु आणि पेट्रोल चे थोडे असे पैसे त्यावर खर्च केलेत कमाल किती राम जाणे. माझ्या दृष्टीने गरज नसतानाही गरज असल्याचा आभास निर्माण करणे, व त्यासाठी खर्च करणे हा चंगळवाद.
तुम्ही म्हणता त्या प्रमाणे १०० रु. लिटर चे तेल ९५ रु. लिटर प्रमाणे देणे त्यांना परवडते. साधारण सर्व शहरांमध्ये होलसेलची दुकाने असतात, जिथे हेच तेल जर १२ चा बॉक्स घेतला तर ८५ रु. लिटर प्रमाणे मिळते. ते देखील हवा असलेला ब्रान्ड. असं कधी अनुभवलंय का कोणी की या सुपर मार्केट्स मध्ये काही ठराविक ब्रान्ड च मिळतात. म्हणजे पुन्हा ५ रु स्वस्त साठी तडजोड आलीच.

तुमच्या म्हणण्यानुसार "अंथरूण पाहून पाय पसरावेत" या पूर्वापार चालत आलेल्या म्हणीत विकृती आहे. माझ्या मते आज झोपताना अंथरूण पाहून पाय पसरावेत, उद्या सकाळी उठून ते मोठे कसे होईल ते पाहावे आणि त्या दृष्टीने पावले उचलावीत. गैर मोठे होण्यात नाही हो. कसे होतां यावर सारे अवलंबून आहे. तुम्ही प्रयत्नांनी अंथरूण लांब करत राहा हो आणि खुशाल पाय पसरत राहा, पण प्रत्येक वेळी अंथरुणावर टेकल्यावर "अंथरूण पाहून पाय पसारा" हे लागू होतेच ना?

तुमच्या म्हणण्याप्रमाणे सधन लोकांनी सर्व वस्तू सुविधा विकत घ्यावात जेणेकरून रोजगार निर्माण होतो. या न्यायाने तुमच्या घरी लोणची, पापड, चिवडा चकली, लाडू इतकेच काय रोजचा चहा, नाश्ता जेवण हे पण बाहेरूनच येते का हो? मी ज्या इंडस्ट्रीचा भाग आहे, त्या आमच्या विरुद्ध अशी ओरड समाजात नेहमी आढळते ती म्हणजे सारी महागाई आमच्या मुळे आहे, आमच्यामुळे चंगळवाद बोकाळलाय. तुम्ही म्हणता तसं लोक जास्त हॉटेल मध्ये जातील तर, ती चांगली चालतील, तिथे काम करणाऱ्यांचे वेतन आणि राहणीमान उंचावेल.....खरच असं घडेल का हो. नाही, कारण माझ्या घराजवळ एक छान हॉटेल आहे त्याच्या मालकाचा बंगलाही माझ्या घराजवळच आहे, राहणीमान गेल्या १२ वर्षात मला फक्त तिथेच उंचावताना दिसले आहे. टेबल साफ करणाऱ्या मुलांचे किंवा वेटरचे नाही. दुसरा मुद्दा असा की जी गोष्ट घरी बनवताना मी "दिलसे" बनवते, तशी बाहेर कोणी बनवून देतं का हो? कितीही पैसे मोजायची तयारी ठेवली तरी माझ्या घरच्यांना सेम माझ्या हातची चव विकत आणता येईल का?

तुम्ही म्हणता तरुण मुलीना लोणची पापड घरी न करता, विकत घेण्या बद्दल अनेक तरुण मुलीना ओरडा खावा लागतो. मला वाटता यात दोन मुद्दे आहेत, करता येणं आणि करणं आणि या दोन अतिशय भिन्न बाबी आहेत. माझ्या मते न करता येण्या बद्दल तो ओरडा असतो. न करण्यासाठी नाही. जसा की गेली काही वर्षे दिवाळीत फराळाचा एकही पदार्थ मी घरी बनवू शकले नाही, उत्तमोत्तम पदार्थ पुरवणाऱ्या चितळे, वृंदावन या दुकानांवर मी अवलंबून आहे. कारण वेळ नसणे हे अपरिहार्य कारण त्यास जबाबदार आहे. मला त्याबद्दल कधी कोणी काही बोलले नाही, कारण चकली पासून चिरोट्यापर्यंत प्रत्येक पदार्थ मला उत्तम बनवता येतो हे मी या पूर्वी सिद्ध केले आहे. आणि आता ऐन दिवाळीचे सुट्टीचे मिळणारे दोनच दिवस, घरचे लोक, नातेवाईक यांच्या सोबत न घालवता चकली चिवडा बनवण्यात घालवावे अशी कोणाचीच अपेक्षा नाही. पण रोजगार निर्माण होतोय म्हणून काही या दुकानांमधून मी पदार्थ विकत आणत नाही हो.

सधन आहे, रोजगार निर्माण होतो म्हणून मी वस्तू विकत आणते का ? तर नाही. गणपतीत उकडीचे मोदक साधारण १०० लागतात दुपारच्या जेवणासाठी १७/१८ माणसांसाठी, पैसा आहे म्हणून मी १५/१६ रु. ला एक या दराने १०० मोदक विकत आणेन का? आणि जर आणलेच तर नवरा त्यावर ताव मारून ५/६ मोदक तरी खाईल का तो मोदकांचा भाव ऐकून? खर तर नाही.

सधन आहे, रोजगार निर्माण होतो म्हणून मी रोज घरी स्वयंपाक किंवा किमान पोळ्या विकत आणते का? ५ रु एक पोळी मिळते. त्यापेक्षा उत्तम प्रतीचे गहू तेल घरी विकत आणून, एका उत्तम पोळ्या बनवणाऱ्या गरजू स्त्रीस घरी कामास ठेवणे मला चालेल जर इतकाच माझ्या वेळेचा प्रॉब्लेम असेल तर. यातूनही रोजगार निर्माण होईलच ना?

सधन आहे आणि सो कॉल्ड बिग बझार, मोअर सारखी किंवा उद्या येवू घातलेली परदेशी वाण्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करतात म्हणून मी तिथे जावे का? किंबहुना मी सधन आहे म्हणूनच मला गुलटेकडी सारख्या किंवा वाशीतील ए. पी. एम सी. सारख्या मार्केट मध्ये जाणे शक्य आहे. वर्षाचे उत्तम क़्वालीतीचे समान आणणे शक्य आहे, ते साठवून ठेवण्यासाठी करावी लागणारी उस्तवार मी करू शकते आणि उत्तम प्रतीचे धान्य वर्षभर खाऊ शकते. असे करूनही जे काही थोडे समान दर महिन्याला आणायचे असते, ते जर मी घराजवळच्या किरकोळ वाण्याच्या दुकानातून आणले तर समजा माझे १००० रु. खर्च होत असतील तर मोअर, बिग बझार येथे जावून मी किमान दीडपट पैसे खर्च करून येते. कारण इतक्या तेवढी गरज नसलेल्या वस्तू तुमच्या बरोबर अशाच घरी येतात.....याला चंगळवाद म्हणू यात का?

तुम्ही म्हणता "आपल्याला घाऊक बाजारातील दर आणि या किरकोळ विक्रीच्या दुकानातील दर यांत प्रचंड फरक आढळतो." अगदी खरं ! पण मोअर, स्टार बझार ही दुकाने आपल्यास घावूक भावात खरंच या गोष्टी देतात का? याच वर्षीचे उदाहरण आहे. गुलटेकडी तून तुरडाळ उत्तम प्रतीची मला मिळाली ५० रु. किलो, आणि त्या नंतरच्या आठवड्यात स्टार बझार ने स्वस्त ची जाहिरात केली त्यात भाव होता ७० रु. जी स्वस्त ते विकत होते, ६५ रु किलो.....आता हे स्वस्त घाऊक भावात झाले का?

जुने ते सर्व वाईट, टाकावू किंवा आपल्याकडची सर्व मुल्ये टाकावू असे का आपले होते आहे. गरजेशिवाय केलेला अफाट खर्च म्हणजे चंगळवाद असे ठरवले तर हे नक्की ही सारी मोठी चकाचक दुकाने चंगळवाद वाढवण्यास नक्कीच मदत करतात. तरीही आपण त्यांचे समर्थन करायचे आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनघा छान लिहीलस. यालाच म्हणतात चार आण्याची कोम्बडी आणी बाराण्याचा मसाला. आमच्या इथे भाजी साधारण १५ ते २० रु पावशेर असते. पण केवळ मन्डई च्या बाहेर स्वस्त मिळते म्हणून ४० रु चे पेट्रोल जाळणारे आमचे शेजारी आहेत. बर, इतके करुन ते साधारण २ दिवसाची भाजी आणतात, आठवड्याची नाही.

हे पण खरे की एकदा मॉलच्या मालामाल मोहमयी दुनियेत तुम्ही एकदा घुसले की बाराच्या भावात गेलेच समजा. नको ती खरेदी केली जाते, पैशापायी पैशाचा चुराडा. त्यामुळे आम्ही स्टार आणी बिग बजार मध्ये जाणे बन्द केले. जवळचा वाणी जिन्दाबाद.:फिदी:

केतकरांचा मुद्दा सोडला तर काही च पटण्यासारखे नाही.

कोणीच तुम्हाला बिग बझार मधे जाउन खरेदी करा सांगत नाहीये. जवळच्या वाण्याकडुन आणायला काहीच हरकत नाही. पण हे ही लक्षात घ्या, बिग बझार ला जो फायदा होतो त्यावर ते इन्कम टॅक्स भरतात. तुमचा वाणी भरतो का इंकम टॅक्स?
बिग बझार मधे काउंटर वर बसणार्‍याला जेव्हडा पगार मिळतो, तेव्हडा वाणी देतो का त्याच्या कडच्या कामगारांना?

रोजच्या पोळ्या आणि भाजी विकत आणा असे कोणी सुचवत नाहीये, तुम्ही घरी कोणाला तरी बोलवून ते करुन घेता आहात ते बरोबर च आहे. इथे पण तुम्ही दुसर्‍या व्यक्ती चे कष्ट विकत घेताच आहात.

गुल्टेकडीला स्वस्त डाळ मिळाली हे शक्य आहे, पण त्याची कारणे वेगळी आहेत. बॅकेएंड अजुन नीट तयार झाली नाहीयेत, त्यावर अजुन बरेच काम आणि गुंतवणुक होणे बाकी आहे. सरकार च्या धोरणांमुळे ( जसे की कृषी उत्पन्न समितीचा एकाधिकार ) अनेक सहज शक्य गोष्टी होऊ शकत नाहीत. ह्या गोष्टी जेंव्हा मोकळ्या होतील तेंव्हा बिग बझार मधे पण त्याच किमतीत डाळ मिळू शकेल.

मुख्य मुद्दा आहे की, तुम्हा जवळ पैसा आहे तर घरातल्या बाई नी तिला आवडेल असे, किंवा विश्रांती मिळेल असे करायचे सोडुन पोळ्या च लाटत बसायच्या का?

तुमच्या नवर्‍याला जर मोदक आवडत असतील पण १५ रुपयाचा एक मोदक नको वाटत असेल तर त्याने करुन खावा आणि तुम्हाला ही द्यावा. पण १५ रुपयाचा मोदक विकत आणला म्हणुन तोंड वाकडे करु नये.

कारण माझ्या घराजवळ एक छान हॉटेल आहे त्याच्या मालकाचा बंगलाही माझ्या घराजवळच आहे, राहणीमान गेल्या १२ वर्षात मला फक्त तिथेच उंचावताना दिसले आहे. टेबल साफ करणाऱ्या मुलांचे किंवा वेटरचे नाही. >>>>

तुम्हाला जर ही पिळवणुक दिसते आहे, तर तुम्ही का जाता त्या हॉटेल मधे?
असे करुन तुम्ही पिळवणुकी ला प्रोत्साहन च देत आहात.

जर दुकाने , हॉटेल्स यांचे corporatisation झाले तर तिथे काम करणार्‍यांचे शोषण होणार नाही. तुम्हाला थोडा जास्त पैसा खर्च करायला लागेल, पण एकुण च समाज पुढे जाईल.

समजा मला १ लिटर पेप्सी ची बाटली घरी आणायची आहे. समजा त्याची किंमत ५०/- आहे. घराजवळचा किराणा किंवा जनरल स्टोअर्स मध्ये मी चालत जाते, ५० रु. देते आणि पेप्सी घरी घेऊन येते. असे म्हणून लगेच तुम्ही म्हणता की मी बिग बझार, मोअर, स्टार बझार मध्ये जाते, जाते तीच मुळात थोडा खर्च करून पेट्रोल जाळून, पण घराजवळ पेप्सी मिळत असताना तुम्ही बिग बझार मधे का जाता?
लेख अजिबातच पटला नाही. ५० रुपयांचे पेप्सी घेणे हा ही चंगळवाद असू शकतो. त्या ऐवजी लिंबू सरबत घरच्या घरी करता येईलच.
डी-मार्ट, हायपरसीटी ही चांगली उदाहरणे आहेत खरेदीसाठी.

प्रसादशी सहमत!

एकीकडे आय.टी.त १२-१६ तासांच्या नोकऱ्या करणाऱ्या स्त्रिया, पण काय तर म्हणे लोणची-चिरोटे-चकल्या आणि काय काय उत्तम करता आलं पाहिजे आणि ते सासरच्यांना सिध्द (?) करुन दाखवलं पाहिजे आणि तरच तुम्ही बाहेरुन पदार्थ मागवलेत तर ते मान्य असेल. आणि जर ते जमत नसेल आणि त्यावरुन सासरच्यांचा ओरडा(?) मिळाला तर ते योग्यच??? आणि तुम्हाला तुमचे सासरचे ’ओरडत’ नाहीत म्हणून तुम्ही महान?
आणि गणपतीत शंभर मोदक करावेत घरी(नाहीतर नवरा ’महाग आहेत’ म्हणून खाणार नाही.)

नाही म्हणजे एखादीला करायचे असले खटाटोपाचे पदार्थ हौसेने तर काहीच हरकत नाहीये, पण ’हे हे इतकं केलं(च) पाहिजे किंवा करता आलंच पाहिजे, नाहीतर सासरच्यांचं ’ओरडणं’ स्वाभाविक आहे’ हे असलं प्रेशर कशाला? आय मीन...हे पण एक प्रकारे स्त्रियांचं शोषणच नव्हे का?

जग खूप पुढे गेलंय हो.

आयटीत काम करुन बक्कळ पैसा मिळेल, पण त्याचा अर्थ असा होत नाही की कुठलीही गोष्ट अव्वाच्या सव्वा भाव देऊन विकत घ्यावी..

सध्या तरी चढे दर देऊन तीच गोष्ट पदरात पाडून घेण्यात काय हशील. म्हणून काही गोष्टी पटण्यासारख्या आहेत.

(बदलून.......
लेख आवडला.
नेहेमीप्रमाणे लोक मुद्दा सोडून उदाहरणांबद्दल लिहीतील. जणू हा काही तुमचा काही वैयक्तिक मुद्दा आहे म्हणून तुम्हाला मदत करण्याच्या उद्देशाने काही काही लिहीतील. उदात्त हेतू असतो त्यांचा.
त्याबद्दल राग मानू नका.
गैर मोठे होण्यात नाही हो. कसे होतां यावर सारे अवलंबून आहे.
फारच छान.

मोठे म्हणजे अधिक पैसा, शारिरीक सुखे, प्रसिद्धि, सत्ता हे सर्व. निदान यालाच बर्‍याच ठिकाणी बरेच लोक मोठे समजतात. नुसताच पैसा मिळवणे नव्हे तर तो लोकांच्या नजरेत भरायला पाहिजे, सगळ्यांनी म्हंटले पाहिजे की वा, काय श्रीमंत लोक!
आता कसे? काय नियम? धर्म? कायदा? कायद्यात असंख्य पळवाटा!
कायदा म्हणजे विनोदच असतो (कायद्याच्या तत्वाप्रमाणे हुषार् वकील तुम्हाला सोडवू शकतो!)
धर्म कुणालाच समजत नाही,कुणि पाळत नाहीत. नि धर्म म्हणाल तर आजकालची महाभारत सिरियल पहा. भीष्म, युधिष्ठिर यांच्याशी वाद करून शकुनि शेवटी स्वतःला हवे तसे करून घेतो.
काय बरोबर, काय चूक हे कोण, कसे ठरवणार?
चांगले काय नि वाईट काय?
या बाबतीत गोंधळ उडतो.

मग जे वर्तन होते त्याला तात्विक बैठक उरतच नाही! मन मानी!! आज पैसा असला की सगळे मिळते! मग चोरा पैसा!
चंगळवाद, भ्रष्टाचार, गुंडगिरी, अतिरेकीपणा सगळे कसे जोरात!

कुणाचे चुकले कोण बरोबर?

आयटीत काम करुन बक्कळ पैसा मिळेल, पण त्याचा अर्थ असा होत नाही की कुठलीही गोष्ट अव्वाच्या सव्वा भाव देऊन विकत घ्यावी..>>>>> Rofl
हे एक नवीन खुळ ऐकायला येतय भारतात. आयटित काम करता, बक्कळ पैसा येतो, करतात खर्च भसाभसा!
अरे ती लोकं ज्यांनी आयटीत नोकर्‍या मिळाल्या त्यांना काय कंपन्याबाहेर मादुक्री मागून वगैरे मिळाल्यात का त्या नोकर्‍या? तसं असेल तर तुम्हीही मागून बघा.
दुसरी गोष्ट, तुम्ही जर फुल टाईम काम करत असाल आणि कन्विनियन्स करता चार पैसे जास्त मोजायला तयार असाल तर त्यात गैर काय आहे? आता नाही आम्हाला गुळटेकडेवरच्या शेतात जाऊन डायरेक शेतकर्‍याकडून तुरीची डाळ विकत घेऊन घरच्याना इंप्रेस करायला वेळ!
अजब मेंटलपणा आहे राव हा!

अनघा बाई कशाला असले ललित पाडलेस? त्यापेक्षा एखादा फिल्लम वा सिरीयलवाला बाफ सुरु करायचास ना माझ्यासारखा.:फिदी::दिवा:

आता लिहीलेस नवीन विषय चघळायला तर त्यावर पण प्रतीसाद दे.

बाय द वे, तूर डाळ, वान्गी आम्हाला काही वर्षापूर्वी अगदी सान्गलीच्या शेतातुन चविष्ट दर्जाची मिळाली होती. काही म्हणा, निदान कोल्हापूर सान्गलीकडची माणसे रोखठोक असतात ते बरे.

तू गुलटेकडीबद्दल लिहीलेस ना म्हणून मी सान्गलीचा उल्लेख केला.

>>जर फुल टाईम काम करत असाल आणि कन्विनियन्स करता चार पैसे जास्त मोजायला तयार असाल तर त्यात गैर काय आहे? आता नाही आम्हाला गुळटेकडेवरच्या शेतात जाऊन डायरेक शेतकर्‍याकडून तुरीची डाळ विकत घेऊन घरच्याना इंप्रेस करायला वेळ

सहीच Lol अगदी पटेश ! जिसको जो परवडता है वो करता है.

<<दुसरी गोष्ट, तुम्ही जर फुल टाईम काम करत असाल आणि कन्विनियन्स करता चार पैसे जास्त मोजायला तयार असाल तर त्यात गैर काय आहे? आता नाही आम्हाला गुळटेकडेवरच्या शेतात जाऊन डायरेक शेतकर्‍याकडून तुरीची डाळ विकत घेऊन घरच्याना इंप्रेस करायला वेळ!
अजब मेंटलपणा आहे राव हा!>> +११११ Happy

अनघा , अस कुठे म्हणताहेत विकत आणु नका, घरचेच खा वगैरे. जिथे भाव जास्त आहे , पवडण्यासारख नाही ते विकत आणत नाही अस सांगताहेत. (अस मला वाटल.)
मी ओरिजिनल लोकसत्ता मधला लेख वाचला नाही. पण अंदाज केला कि बहुदा तो मार्केट सुधाराव, इकॉनॉमी चांगली व्हावी म्हणुन काही इकॉनॉमिस्ट मिडीयामध्ये खरेदी करा असा जोरदार प्रचार करायचे त्यावर असावा.
डिप रेसेशन असताना ग्राहकाने खरेदी करावी म्हणुन केलेला टिपिकल इमोशनल प्रचार. Happy
मला लेखावरून दोन मुद्द्यांची सरमिसळ झाल्यासारखे वाटले. चंगळवाद म्हणजे ज्या भौतीक गोष्टींची गरज नाही ते गरज असल्याचे भासविणे. पेप्सी वाण्याच्या दुकानातून आनली काय किंवा स्टार बाजारातून आणली काय (ज्याला पेप्सीची गरज वाटत नाही त्याला) तो चंगळवाद वाटण्याची गरज शक्यता आहे. मग स्टार बजार मधून खरेदी केल्याचे आवाहन केले म्हणुन तो चंगळवाद झाला असे म्हणता येणार नाही.
गुलटेकडी वरून स्वस्तात सामान आणले तर ते हुशार ग्राहकाचे लक्षण होईल. तो चंगळवादी नसेलच अस म्हणता येणार नाही.

अशा प्रकारच्या बहुतेक लेखात असतो तसा बेसिक मधेच लोचा आहे. फक्त मध्यमवर्गीय चष्मा लावून याच वर्गाला सारासार विचार न करता अल्पमतीने विनाकारण टार्गेट केले आहे.

अनघा , अस कुठे म्हणताहेत विकत आणु नका, घरचेच खा वगैरे. जिथे भाव जास्त आहे , पवडण्यासारख नाही ते विकत आणत नाही अस सांगताहेत. >>
हे कोण ठरवणार ?? झोपडपट्टीवाल्याला चाळीतला माणूस चंगळवादी वाटेल , चाळीतल्याला फ्लॅटवाला अशीच चढती भाजणी चालू रहाणारच.

-- सीमा ताईंचा प्रतिसाद बघता त्यांच्यासाठी नम्र सुचना , पुढील वाक्यांचा तुमच्या प्रतिसादाशी काहीही संबंध नाही.

एकंदरी लेख बघता , अनघा ताई तुम्हीच भयंकर चंगळवादी आहात असे दिसतेय.
हे बघा ना -
सधन आहे, रोजगार निर्माण होतो म्हणून मी वस्तू विकत आणते का ? तर नाही. गणपतीत उकडीचे मोदक साधारण १०० लागतात दुपारच्या जेवणासाठी १७/१८ माणसांसाठी, पैसा आहे म्हणून मी १५/१६ रु. ला एक या दराने १०० मोदक विकत आणेन का? आणि जर आणलेच तर नवरा त्यावर ताव मारून ५/६ मोदक तरी खाईल का तो मोदकांचा भाव ऐकून? खर तर नाही. >>
अरे बापरे !! वर्षाला शेकडो मुले कुपोषित असल्याने भूक बळी जात असलेल्या भारतात एका माणसाने ५-६ मोदक एका जेवणात खाणे ( भले ते घरी केलेले का असेना ) हाच चंगळवाद आहे.
कशाला हवेत हो ५-६ मोदक ? ते न खाता पैसे वाचवा आणि चार कुपोषितांची पोटे भरा, त्यातून बक्कळ पुण्य मिळेल की.

घराजवळचा किराणा किंवा जनरल स्टोअर्स मध्ये मी चालत जाते, ५० रु. देते आणि पेप्सी घरी घेऊन येते. >>
अहो पेप्सी पिणे हाच शूद्ध चंगळवाद आहे. साखर , सोडा ,रंग घातलेले परत आरोग्यास अपायकारक पाणी ते पण ५० -१०० रूपये खर्च करून पिणे हीच चंगळवादाची परीसीमा आहे. भारतात शेकडो लोकांना पिण्याचे पाणी देखिल मिळत नाही , मेधा पाटकर ताई कधीही विकतचे बाटलीबंद पाणी पित नाहीत , ते का याची कल्पना आहे का तुम्हाला ?

तुमच्या म्हणण्याप्रमाणे सधन लोकांनी सर्व वस्तू सुविधा विकत घ्यावात जेणेकरून रोजगार निर्माण होतो. या न्यायाने तुमच्या घरी लोणची, पापड, चिवडा चकली, लाडू इतकेच काय रोजचा चहा, नाश्ता जेवण हे पण बाहेरूनच येते का हो? >>>
का येऊ नये बा ? घरात बाई नसेल किन्वा घरची बाई मेली आणि फक्त पुरुषच ( जन्मात कधी ओट्यापाशी न गेलेले ) असले तर येतोच. माझ्या पहाण्यात आहे बर का असे उदा.
आणि स्वयपाकाला बाई ठेवलेली बाघितली नाही काय ओ कधी ?

ह्म्म बाकी अजूनही भारतात बर्‍याच भाग्यवानांना कमवणार्या बायका कम कूक कम मेड फुकटात मिळतायेत आणि काही कमावणार्‍या बायका हौशीने पिळवणूक करून घेतायेत , म्हणूनच हे असले चोचले चालतायेत.

अनघा , अस कुठे म्हणताहेत विकत आणु नका, घरचेच खा वगैरे. जिथे भाव जास्त आहे , पवडण्यासारख नाही ते विकत आणत नाही अस सांगताहेत. >>
हे कोण ठरवणार ?? झोपडपट्टीवाल्याला चाळीतला माणूस चंगळवादी वाटेल , चाळीतल्याला फ्लॅटवाला अशीच चढती भाजणी चालू रहाणारच.>>>>>>

डेलिया , तुमचा नक्की काय प्रॉब्लेम आहे??? कारण पुढे तर तुम्ही मी जे लिहिलय तेच "चंगळवाद " व्यक्ती सापेक्ष असतो असं . चक्क सेम विचार आहेत. मग उगाचच मी ठरविल्यासारखे मला जाब कशाला विचारताय.

मी कुथेच बायकांनी विकत आणि नये वगैरे लिहिले नाही. मी त्या व्ह्युने लेख वाचला पण नाही किंबहूना
आता विषय निघालाच आहे म्हणुन इथेच लिहून घेते...तुम्ही नेहमी ते बायकांवर अन्याय होतोय म्हणुन ओरड करनार्‍या पोस्ट्स का लिहित असता? संपुर्न लेख मी तरी मार्केट अ‍ॅनालायसिस, इकॉनॉमी या व्ह्युने पाहिला. कृपा करून , नीट न वाचता सरसकट पोस्ट्स लिहू नका. तुम्हाला जिथे तिथे टिप्पणी करायची असेल तर करा. सल्ले द्यायचेत तर द्या. पण माझ्या लिहिण्याला इग्नोअर करा सरळ. धन्यवाद.
तुम्ही यावर काहीही उत्तर लिहिलेत ते मी इग्नोअरच करेन.

सीमा , प्रतिसादात तुमचे वाक्य पहिले असले तरी तुमच्या प्रतिसादाला उल्लेखून बाकीचा प्रतिसाद नाहीये. हे तुमच्या लक्षात यायला हवे होते खरे तर , पण तुम्ही सगळेच स्वतःला का लावून घेतले कळले नाही.
ते वाक्य सोडता पुढे लेखातलीच वाक्ये आहेत आणि तिथे - ' ताई ' असे जे संबोधन आहे ते अनघा ताई असे आहे. तुम्ही ते तुम्हाला उद्देशून लीहिले आहे असे समजत असाल तर अता तिथे 'अनघा ताई' असा बदल करते.

तुम्ही नेहमी ते बायकांवर अन्याय होतोय म्हणुन ओरड करनार्‍या पोस्ट्स का लिहित असता? >>
लेखातल्या पुढील ओळी मलातरी अतिशय अन्याय्कारक वाटल्या म्हणून

करता येणं आणि करणं आणि या दोन अतिशय भिन्न बाबी आहेत. माझ्या मते न करता येण्या बद्दल तो ओरडा असतो. .... कारण वेळ नसणे हे अपरिहार्य कारण त्यास जबाबदार आहे. मला त्याबद्दल कधी कोणी काही बोलले नाही, कारण चकली पासून चिरोट्यापर्यंत प्रत्येक पदार्थ मला उत्तम बनवता येतो हे मी या पूर्वी सिद्ध केले आहे

या वाक्यावरून माझा असा समज झाला आहे की काही ठराविक पदार्थ एखाद्या बाईला करता येत नसतील तर त्यावरून तिला इतरांनी बोलणे , ओरडा खावा लागणे योग्य आहे. जे माझ्या मते अतिशय घातक भावना आहे.

आता विषय निघालाच आहे म्हणुन इथेच लिहून घेते... तुम्ही नेहमी ते बायकांवर अन्याय होतोय म्हणुन ओरड करनार्‍या पोस्ट्स का लिहित असता? >>
मला तसे सहज जाणवते, बरोबर वाटते म्हणून लिहीते. तसे बघता वेदिका नी पण वरती सीमीलर प्रतिसाद दिलेला आहे तेव्हा हे फक्त मलाच वाटतेय असे नाहीये Happy
तुम्ही बहूतेक , प्रतिसादातल्या त्या गोष्टी तुम्हाला उद्देशून नसूनही जुनी कोणतीतरी जखम दुखावली गेल्याने स्वतःला लावून घेत अहात, असे वाटते.

तुम्ही बहूतेक , प्रतिसादातल्या त्या गोष्टी तुम्हाला उद्देशून नसूनही जुनी कोणतीतरी जखम दुखावली गेल्याने स्वतःला लावून घेत अहात, असे वाटते.>>>>
डेलीया, मला तुमच्याशी वाद घालायची इच्छा नाही. वेदिकाने माझे वाक्य कोट केलेले का? मग मी त्यांना कशाला काय म्हणायला जाउ? तुम्ही माझे वाक्य कोट केलेत. दुसरे म्हणजे "हे कोण ठरविणार?" हे तुम्ही विचारलेत माझ्या वाक्याला कोट करून. तुम्ही पुढे काय लिहिलेत त्याच्याशी माझा काहीही संबध नाही . त्यामुळं तुमचं ते ताई वगैरे संबोधून लिहिलेल मी मला लिहिलत अस कशाला समजू? तुमच्या पहिल्या प्रतिसादाला म्हणूणच मी रिप्लाय केला नाही कारण मी तो इग्नोअर केला.

परंतु तुमची दुसरी प्रतिक्रिया वाचून मला काय बोलायचे ते कळत नाही.

तुम्ही मला कुठली जुनी जखम दिलेली? कधी दुखावलत? मला खरचं तुम्हाला काय म्हणायच आहे ते कळलं नाही. तुमचे माझे भांडण झालेले पण मला आठवत नाही. तुम्ही मात्र वरील स्टेटमेंट करून पर्सनल लेव्हल गाठून अतिशय हिन पातळी गाठलेली आहे. याबद्दल तुमची अ‍ॅडमिन कडे तक्रार करू का मी?

मला लेख कळला नाही. पुन्हा वाचेन.
फक्त खायची एक गोष्ट कळली, पुण्यात उकडीच्या मोदकाचा भाव २० रुपये होता २०१३ मध्ये प्रति एक; मी आणले कारण नवरा खात नाही , मला ज्यास्त मिळतात ; त्यामुळे माझी चंगळ होते.
ह्याला अथवा ह्यावरूनच चंगळ वाद सुरु झाला असेल का? (विचारात पडली आहे)

मलाही लेख व तो नक्की काय टोन मधे लिहीला आहे समजले नाही. कुबेरांच्या लेखाची लिन्क दिलीत तर संदर्भ कळेल आणि मग पुन्हा वाचून कदाचित समजेल.

"आता विषय निघालाच आहे म्हणुन इथेच लिहून घेते...तुम्ही नेहमी ते बायकांवर अन्याय होतोय म्हणुन ओरड करनार्‍या पोस्ट्स का लिहित असता? संपुर्न लेख मी तरी मार्केट अ‍ॅनालायसिस, इकॉनॉमी या व्ह्युने पाहिला.

या लेखात बायकांबद्दल उगाच टीका केली आहे असं फक्त डेलियालाच नाही, मलाही वाटतं आणि वर पोस्ट केलेल्या प्रसाद व इतरांनी तसंच लिहिलंय व अनुमोदन दिलंय.

लेखिकेचा रोख असा आहे की बायकांना स्पेसिफिक दिवाळीचे पदार्थ करता येत नसले तर त्यांना सासरच्यांनी खुशाल ’ओरडावं’. तसंच मोदक वगैरे पदार्थ बाहेर महाग मिळत असल्यामुळे बायकांनी घरात करावेत (५/६ नाही हं- शंभर!), तसं न केल्यास त्या ’चंगळवादी’ आहेत असा अर्थ होतो.
एकंदरित कुठलंही असं काम जे परंपरेनुसार बायकांचं समजलं जातं- व जे आऊटसोर्स करुन बायकांचे कष्ट वाचतील व त्यांना आराम मिळेल- तसं केलं तर तो ’चंगळवाद’.

ही जरा संकुचित नाही का वाटत व्याख्या?

Pages