औषधं,उतारे आणि आशीर्वाद

Submitted by प्रकाश घाटपांडे on 1 April, 2014 - 03:35

ग्रंथपरिचय- औषधं उतारे आणि आशीर्वाद

मंत्रतंत्र बाबा बुवांच्या गप्पा चाललेल्या असताना एका मित्राने एक पुस्तक वाचायला दिलं. काहीशा नाखुशीनेच मी ते पाहिल. औषधं, उतारे आणि आशीर्वाद. मनोविकारांचा मागोवा हे उत्तम पुस्तक लिहिणारे मानसोपचार तज्ञ डॉ श्रीकांत जोशी यांनी ते अनुवादित केल होत. मूळ पुस्तक Mystics, Shamans and Doctors डॊ सुधीर कक्कर यांच. डॉ. श्रीकांत जोशी यांना हे पुस्तक का अनुवादित करावस वाटल हे वाचताना त्यांची भुमिका समजली. ते म्हणतात," अनेक शहाणी-सुरती दिसणारी- म्हणजे असलेली म्हणायला हरकत नाही, अगदी सुशिक्षित, सुसंकृत उच्चभ्रु समाजातील मंडळी स्वामी, महाराज गुरु यांच्या कच्छपी कशी लागतात? मला अध्यात्मातले काही कळत नाही. परंतु यातले काही गुरु मला उघडपणे भोंदु दिसत होते. पण माझीच काही मित्रमंडळी मोठ्या भक्ती भावाने त्यांच्या पायावर डोके ठेवत होती. त्यातुन त्यांना काहीतरी मिळत होते हे निश्चितच." हे पुस्तक वाचताना आपल्या अंतर्मनातील खोल दडलेल्या विचारांना भावनांना समजुतींना हाका मारणारे विचार वाचत,ऐकत आहोत असे वाचकांना वाटेल. लेखकाचा पुस्तक लिहिण्याचा उद्देश हा मानसिक आरोग्य आणि मनोविकार यांच्याशी संबंधित अशा पारंपारिक भारतीय प्रथा आणी उपचार पद्धती यांचा अभ्यास करणे हा आहे. लेखक कुठल्याही वादात पडु इच्छित नाही. तीन वर्षे भारतात हिंडत या गोष्टीचा अभ्यास करीत असताना भेटलेले गुढ संप्रदायाचे गुरु, शामान, मांत्रिक,भगत,वैद्य आणि इतर पारंपारिक औषधोपचार करणारे हकीम, बाबा वगैरे लोकांच्या भेटी गाठी व चर्चेतुन तयार झालेला हा दस्त ऐवज आहे. पुस्तक वाचताना अनिल अवचटांच्या धार्मिक पुस्तकाची हमखास आठवण येते.
बाहेरची बाधा म्हणजे काय? भुते कशी झपाटतात! ती कशी उतरवली जातात! मंत्र तंत्र यात तथ्य आहे का हे सर्व झूट? महाराज, माता, स्वामी यांच्य शिकवणीतुन आपणास मनाची शांतता खरच लाभु शकते का? हजारो वर्ष चालत आलेल्या आयुर्वेदाच्या परंपरेचा निश्चित अर्थ काय? मांत्रिक,स्वामी,महाराज, माता यांच्याकडे हजारो भारतीय का धाव घेतात? या व अशा अनेक प्रश्नांच्या अंगाने घेतलेला एक धांडोळा म्हणजे हे पुस्तक.
पहिल्या भागात पत्तेशाह दर्ग्यातील पीरबाबा व त्यांची उपचार पद्धती. यात भुताखेताशी सामना करण्याची बाबाची पद्धत. बाबांचे रुग्ण याबाबत किश्श्यांसह माहिती व त्याचे मनोवेश्लेषण दिले आहे. जिन, सैतान, बला, फरिश्ता या भोवती बाबांचे तत्त्वज्ञान फिरते. बाबांच्या रुग्ण संवादात स्वप्नांना फार महत्व आहे.
भुतप्रेतांचे स्वामी ( बालाजीचे मंदिर) या प्रकरणात मंदिरात भरणारा पिडितांचा दरबाराचे वर्णन आहे.राजस्थान मधील भरतपुर जवळ हनुमानाचे बालाजी हे रुप आहे. इथे भुतांचा बंदोबस्त एखाद्या कोर्ट कचेरी सारखा असतो, प्रथम अर्ज करायचा म्हणजे डाळ तांदुळ लाडु याचा नैवेद्य पुजार्‍यामार्फत देवाला दाखवायचा पुजारी एक लाडु मूर्तीला स्पर्श करुन रुग्णाला खायला देतो. त्या लाडवातुन बालाजीची शक्ती रुग्णात प्रवेश करते व भुताला दरबारात प्रकट व्हायला भाग पाडते. याला पेशी म्हणतात. ही पेशी यशस्वी झाली नाही तर जरा वरच्या लेव्हलचा अर्ज. अर्थात याचा खर्च जास्त. यात अजुन काही देवतांना आवाहन केले जाते. मंत्र म्हणले जातात. मंतरलेले पाणी त्याला प्यायला दिले जाते. रुग्णाच्या अंगात आले कि पेशी यशस्वी झाली. मग पुढे देवदेवतांचा व भुतांचा सामना चालू होतो. यात शिव्या आक्रोश व फटके यांचा सामावेश असतो. एरवी शालीन वाटणार्‍या स्त्रिया घाणेरड्या शिव्या देवदेवतांना व नातेवाईकांना देतात. शेवटी अंगातले भुत वठणीवर येते व कबुली जबाब या शेवटच्या नाट्यांक चालू होतो. मग ते भुत स्वत:ची ओळख सांगत माफी मागत रुग्णाला म्हणजे झाडाला सोडत. रुग्ण मग वारंवार देवाच्या पाय पडतो. अगदी आपल्याकडच्या दत्तसंप्रदायाच्या गाणगापुरची आठवण येते.
लेखकाने बालाजी मंदिरात अठ्ठावीस जणांच्या दीर्घ मुलाखती घेतल्या होत्या. त्यातील पंधरा हिस्टेरिक केसेस होत्या. पुर्वभारतातील आदिवासी भगत व तिबेटी परंपरा यावर देखील लेखकाने लिहिले आहे.
दुसर्‍या भागात राधास्वामी सत्संग निर्मला माता व तांत्रिक पंथा बाबत लिहिल आहे. गुरु-शिष्य या परंपरेतील द्वैत नात्याचे पैलू यात उलगडले आहेत.सत्संगा सारखी सामूहिक प्रार्थना, प्रवचने, तत्वज्ञानाचा प्रसार, पारायणे गुरुभक्ती या सर्वातुन काय साध्य करायचे? गुरुची प्रार्थना करुन त्याच्याशी एकरुप होउन शिष्य संसाराच्या चिंतेतुन मुक्त होउ पहात असतात. माताजींच्या कुंडलीनि जागृती बाबत लेखकाने स्वत: घेतलेला अनुभव फार मजेशीर आहे.'ओम सक्षत मोक्षदायिनी सक्षत निर्मलादेवी' या मंत्राचा उतारा अंगातील फ्रॊईड उतरवण्यासाठी उपयोगी होता. निर्मला मातेच्या मते फ्रॉईडियन लोकांची डावी बाजु कमकुवत असते.
तंत्रशास्त्रात अघोरी वा अनाचारी वाटणा‍र्‍या लैंगिक वर्तनाच्या/ मानसतिकतेचा विचार इथे केला आहे. स्वत:च्या शरीरातले पौरुषत्व व स्त्रीत्व अशा दोन्हींना जागृत करुन त्याचा आनंद लुटणे, लिंग भेदापलिकडे पोहोचणे असे काहीसे ध्येय यात असते. तांत्रिक ग्रंथात इश्वर आणि लिंग, संभोग आणि मुक्ती असे शब्द ऐकमेका ऐवजी सहज वापरले जातात. आपल्या तांत्रिक अनुभवामध्ये त्वचेवरील प्रत्येक घर्मछिद्र हे योनि प्रमाणे वाटते व संपुर्णे शरिर भर संभोगाचा आभास होतो असे रामकृष्णांनी लिहिले आहे असा उल्लेख यात आढळतो.
तिसर्‍या भागात आयुर्वेद व वैद्यांच्या उपचार पद्धतीबाबत उहापोह आहे. लेखक म्हणतो," पाश्चात्य सोडून इतर सर्व उपचार पद्धती ह्या जुनाट छा छु करणार्‍या युगातील आहेत असे मला वाटे. एखाद्या विषयाच्या शास्त्र शुद्ध अभ्यासासाठी त्या विषया बद्दल एकीकडे आदर आणि दुसरी कडे शंकेखोर चिकित्सा असा दुहेरी दृष्टीकोण आवश्यक असतो. हे मला आतापर्यंत जमले नसावे." धर्म संस्कृती, आयुर्वेद, , पाश्चात्य वैद्यक,मानसशास्त्र, आधुनिक उपचार पद्धती, त्यांच्या मर्यादा अशी निरिक्षणे मांडत झारसेटली या हरियाणातील वैद्य गुरुजींचे रुग्णांच्या केसेस दिल्या आहेत.
पुस्तक वाचताना एक गोष्ट जाणवते ती म्हणजे लेखकाला केवळ सैध्दांतिक चर्चा करायची नसुन अनुभवात्मक पातळीवर त्याचे विश्लेषण करायचे आहे. हे सर्व करताना भारतीय परंपरा औषध उतारे आणि आशिर्वाद या बद्दल मनात एक मउ कोपरा आहे. तो जपायचा आहे. समंजस सायकियाट्रिस्ट व समंजस भगत मांत्रिक यांच्यातील अलिखित कराराची निरिक्षण लेखकाला यात दिसते. वाचकांना हे पुस्तक काही ठिकाणी जड व दुर्बोध वाटले तरी ती लेखकाची अपरिहार्यता आहे. ड्र्ग व मॆजिक रेमिडि ऎक्ट चा विचार करताना पुस्तक एका अनोख्या पैलूचे दर्शन घडवते. एका मनोविश्लेषण तज्ञाचे मनोगत म्हणुन पुस्तकाची दखल नक्कीच घ्यावीशी वाटते.
पुस्तकाचे नांव- औषध उतारे आणि आशीर्वाद
लेखक- डॉ सुधीर कक्कर
अनुवाद- डॉ श्रीकांत जोशी
प्रकाशक - मॆजेस्टिक प्रकाशन
प्रथमावृत्ती मार्च १९९३
पृष्ठे-२०३
मुल्य- १००/-रु
( अन्यत्र पुर्वप्रकाशित)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

परिचयाबद्दल धन्यवाद. तशीही मला सुधीर कक्कर यांची पुस्तकं, लेखनशैली आवडते. हे पुस्तक ऐकलं होतं, वाचायचा योग आला नाही. आता आवर्जून वाचेन. Happy

मला पुस्तकाच्या नावाचा अनुवाद फार आवडला. अगदी चपखल.

>>ड्र्ग व मॆजिक रेमिडि ऎक्ट चा विचार करताना पुस्तक एका अनोख्या पैलूचे दर्शन घडवते.<<
आता मात्र असेही म्हणता येईल कि नुकताच झालेला जादुटोणा विरोधी कायदा या पुस्तकातील विश्लेषणाशी ताडून पाहिला तर कदाचित वस्तुस्थितीचा वेगळाच पैलू निदर्शनास येईल.

पुन्हा पुन्हा तेच ते या कॅटॅगरीतले असल्याने वाचून वेळ फुकट घालवणार नाही. आधी असली बरीच वाचली आहेत.