अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग १)

Submitted by पुरंदरे शशांक on 1 April, 2014 - 00:26

अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग १)

तुकोबांच्या अभंगगाथेची अनेक वैशिष्ट्ये आहेत-

तुकोबांची गाथा चाळताना असे वाटले की काही अभंग चरण हे "वन लायनर" सारखे देखील मांडता येतील का ?

कारण हे जे एक एक चरण आहेत ते इतके प्रभावी आहेत, यात जी एक गोडी आहे ती हे चरण असे नुसते मांडत गेलो तरी लक्षात येईलच ......
उदा. मराठी भाषेत सुप्रसिद्ध असलेल्या अनेक म्हणी-वाक्प्रचार आपण या गाथेतूनच घेतलेल्या आहेत. आणि हे अभंगांचे चरण मराठी भाषेचा एक अविभाज्य भागच बनून गेले आहेत.

१] तुझे आहे तुजपाशी | परि तू जागा चुकलासी |

२] लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा |

३] बोलाचीच कढी बोलाचाच भात | जेऊनिया तृप्त कोण झाला

४] नाही निर्मळ जीवन | काय करील साबण |

हे व असेच अनेक वाक्प्रचार आपण नित्याच्या बोली भाषेत इतके सहज वापरत आहोत की कित्येकदा हे तुकोबांच्या अभंग गाथेतील आहे असे जर कोणी आपल्याला सांगितले तर आपण आश्चर्याने - अरेच्चा, हे तर माहितच नव्हतं की - असेच म्हणू !!

तसेच बुवांचे जे अभंग आहेत त्याचे वर्गीकरण असेही करता येईल - १] काही उपदेशपर, २] काही परमार्थ - साधना विशद करणारे, ३] काही अभंगातून बुवांनी स्वतःबद्दल सांगितलंय ,४] या अभंग रचनेबद्दलही काही अभंग आहेत, ५] व्यावहारिक ज्ञान विशद करणारे अभंग, ६] नेमकी भक्त लक्षण सांगिणारे अभंग इ.

या अभंग चरणांना स्वतःचा असा एक बाज आहे, सौंदर्य आहे, सहजता आहे...
कधी हे अभंग-चरण आपल्याला अंतर्मुख करतात तर कधी आपलेच दोष असे दाखवतात की नकळत आपल्याला हसूही फुटते. जीवनाचे तत्वज्ञान बुवा सहजतेने या "एका" चरणात मांडतात तर समाजातील दोष मोठ्या मार्मिकतेने दाखवतात .... समाजाचे सूक्ष्म अवलोकन केलेला हा महापुरुष किती वेगवेगळ्या प्रकारे सामान्यांकडे पहात होता तसेच स्वतःकडेदेखील किती अलिप्ततेने पहात होता हे अभ्यासले तर मोठेच आश्चर्य मनात दाटून येते ..

या अभंग चरणांचे वैशिष्ट्य असे की भक्ति - कर्म - उपासना या अध्यात्ममार्गातील अनेक साधना असोत वा व्यावहारिक सामान्यज्ञानाची गोष्ट असो -ती फक्त एका चरणात मांडणे ही किमया बुवाच करु जाणोत ....

पाप काय, पुण्य काय, भक्ति काय किंवा देव ही संकल्पना काय - बुवांनी ती इतक्या खुबीने साध्या सोप्या शब्दात मांडली आहे की आपल्या मनात काही शंकाच राह्यला नको. असे सोपे लिहिणे हे फारच अवघड काम असते हे आपल्या सहज लक्षात येईल. यात बुवांच्या आत्मानुभूतीचा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. कारण हे काही पढिक पंडिताचे काम नाहीये. त्यामुळेच इतकी वर्षे लोटली तरीही हे शब्द अनेकांना प्रेरणा देत आहेत व पुढेही देत रहातील यात शंकाच नाही.

या खाली देत असलेल्या एकेकाच चरणातून क्वचित असेही होण्याची शक्यता आहे की पुढील -मागील संबंध माहित नसल्याने वाचकाच्या मनात संभ्रमच निर्माण होईल - पण त्यानिमित्ताने कुतुहल जागृत होऊन आपण तो संपूर्ण अभंग जर पाहिला, अभ्यासला तर त्यातील अर्थ तर कळेलच पण अजूनही दोन -चार अभंग आपल्या दृष्टीखालून जातील आणि गाथा अजून अजून वाचावी, अभ्यासावी असा सद्भावही निर्माण होईल ....

बुवांचे महाराष्ट्रभूमीवर, मराठी भाषेवर अनंत उपकार आहेत. त्यांची गाथा हा मराठी भाषेतील एक वेदग्रंथच... अशा या सद्ग्रंथाचे वेगवेगळ्या पद्धतीने परिशीलन करताना बुवांचे वेगवेगळे पैलू आपल्या नजरेस पडतीलच पण मुख्यतः आपल्या विचारांना चालना मिळेल - क्वचित कोणा भाग्यवानाला आपला मार्गही मिळून जाईल ...

(गाथेमधे अजूनही अनेक उत्तमोत्तम अभंग आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे पण सध्यातरी मला जे अभंग चरण विशेष भावले, जाणवले, आवडले ते घेतले आहेत. यात अजूनही भर पडतच राहिल ... )

बुवांचे आशीर्वाद व प्रेम लाभावे यासाठी त्यांच्याच चरणी दंडवत.

जय जय राम कृष्ण हरि ||

------------------------------------------------------------------------------------------------
"परम अर्थाची एक वाक्यता" हे शीर्षक सुचवले आहे डॉ. रविन्द्र किंकर यांनी (आपल्या मा बो वरील आय डी - "किंकर"). संत-साहित्याचा प्रेमाने आणि डोळस अभ्यास करणार्‍यालाच असे काही सुचू शकते. हे सुचविल्याबद्दल त्यांचे केवळ औपचारिक आभार न मानता त्यांनीही या चरणांवर काही टिप्पणी करावी अशी प्रेमाची विनंती.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
तुकोबांच्या अशा अभंग वचनांवर अजून कोणाला काही लिहायचे असल्यास स्वागतच आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
१] शुद्धबीजापोटी फळे रसाळ गोमटी

२] कानडीने केला मर्‍हाठा भ्रतार

३] सुख पाहता जवापाडे | दु:ख पर्वताएवढे

४] तुमचे तुम्हापाशी | आम्ही आहो जैसी तैसी

५] काय दिनकरा | केला कोंबड्याने खरा

६] आली उर्मी साहे | तुका म्हणे थोडे आहे

७] तीर्थी धोंडा पाणी | देव रोकडा सज्जनी

८] काय काशी करिती गंगा | भीतरी चांगा नाही तो |

९] अन्न धन मान | हे तो प्रारब्धा आधीन

१०] मन करा रे प्रसन्न | सर्व सिद्धींचे कारण |

११] तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे | लपविता खरे येत नाही |

१२] दया तिचे नाव भूतांचे पाळण

१३] ते माझे सोयरे सज्जन सांगाती | पाय आठविती विठोबाचे

१४] असाध्य ते साध्य करिता सायास | कारण अभ्यास तुका म्हणे

१५] तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण | तया त्रिभुवन अवघे खोटे

१६] अंगी ज्वर तया नावडे साकर | जन तो इतर गोडी जाणे

१७] अवघे ब्रह्मरुप रिता नाही ठाव | प्रतिमा तो देव नाही कैसा

१८] नवसे कन्यापुत्र होती | तरी का करणे लागे पती

१९] अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक | तरी का हे पाक घरोघरी

२०] जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले

२१] शोके शोक वाढे | हिमतीचे धीर गाढे

२२] वैष्णव तो जया | अवघी देवावरी माया

२३] शांतीपरते नाही सुख | येर अवघेचि दु:ख

२४] गायनाचे रंगी | शक्ति अद्भुत हे अंगी

२५] फोडिले भांडार धन्याचा हा माल | मी तंव हमाल भारवाही

२६] बोल बोलता वाटे सोपे | करणी करता टीर कापे

२७] नसे तरी मनी नसो | परी वाचे तरी वसो

२८] हे चि प्रायश्चित्त | अनुतापी न्हाय चित्त

२९] भाव तैसे फळ | न चले देवापाशी बळ

३०] धावे जातीपाशी जाती | येरयेरा चित्ती

३१] बुडता हे जन न देखवे डोळा | येतो कळवळा म्हणवुनि

३२] चित्त ग्वाही तेथे लौकिकाचे काही | स्वहित ते ठायी आपणापे

३३] नव्हती माझे बोल | अवघे करीतो विठ्ठल

३४] मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे

३५] सासूसाठी रडे सून | भाव अंतरीचा भिन्न

३६] अणुरेणुया थोकडा | तुका आकाशाएवढा

३७] मोकळे गुण रसाळ वाणी | याची गुणी संपन्न

३८] करितो कवित्व म्हणाल हे कोणी | नव्हे माझी वाणी पदरीची

३९] पुण्य पर-उपकार पाप ते परपीडा | आणिक नाही जोडा दुजा यासी

४०] राम म्हणे ग्रासोग्रासी | तो चि जेविला उपवासी

४१] तुका म्हणे चाखोनि सांगे | मज अनुभव आहे अंगे

४२] नीचपण बरवे देवा | न चले कोणाचाही दावा

४३] याजसाठी केला होता अट्टाहास | शेवटचा दिस गोड व्हावा

४४] शाहणिया पुरे एकचि वचन

४५] ओले मूळ भेदी खडकाचे अंग | अभ्यासासी सांग कार्यसिद्धी

४६] आशा ते करविते बुद्धीचा लोप | संदेह ते पाप कैसे नव्हे

४७] भिक्षापात्र अवलंबिणे जळो जिणे लाजिरवाणे | ऐसियासी नारायणे | उपेक्षिजे सर्वथा ||

४८] दया क्षमा शांति | तेथे देवाची वसती

४९] चिंतने सरे तो धन्य काळ | सकळ मंगळ मंगळांचे

५०] चिंतनासी न लगे वेळ | सर्व काळ करावे
----------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांक, मस्त! लक्षातच आलं नव्हतं की त्या म्हणी म्हणजे अभंगांच्या सुरुवातीच्या ओळी आहेत ते Happy

खरच...
विशेष म्हणजे ते अभंग लक्षात ठेवण्यासाठी जर या तुलनेने प्रसिद्ध ओळींचा उपयोग केला तर ते अधिकच सोपे जावे Happy

छान कल्पना.व्यवहारात किती सह्जतेने वापरतो आपण.पु.ल.नी आपल्या नाट्कात इंद्रायणित बुडवलेली गाथा लोकगंगेनी तारली अस दाखवल.तुकोबाना खरच सामान्यजनानीच उचलुन धरल.ही ताकद त्यांच्या लेखणीची.

अभिनव कल्पना आहे Happy गाथेला फारच सुंदर एक्सप्लोअर करताय तुम्ही आणि ते स्वतःपुरतं न ठेऊन आम्हालाही त्यासाठी चालना देताय. खुप खुप धन्यवाद त्यासाठी. हे कलेक्शन उत्तरोत्तर खुप वाढत जाओ Happy

शशांक पुरंदरे,

अप्रतिम कल्पना आहे. या एकोळ्या म्हणजे जणू जीवनानुभवाचं सारंच आहे.

आ.न.,
-गा.पै.

प्रिय शशांक, खूपचं सुरेख आहे हा लेख. संतवाचन करणारे खूपच कमी भेटतात. मला तर कुठलाच ग्रंथ वाचून लगेच कळला नाही.

एक विचारु का?

रामदास स्वामी, शिवाजी महाराज आणि संत तुकाराम हे तिन्ही महापुरुष एकाच काळात जन्माला आलेले आहेत. पण रामदास स्वामी ह्यांची मराठी भाषा खूपच पद्य आहे. तुकाराम महाराजांची भाषा तरल आहे. ती आजच्या मराठीशी खूपच जवळीक साधते. तर शिवाजी महाराजांची मराठी भाषा आणखीच वेगळी आहे. एकाच काळात जन्माला आले असताना मराठी भाषेत इतकी भिन्नता कशी?

सर्व तुकोबाप्रेमींचे मनापासून आभार ......

रामदास स्वामी, शिवाजी महाराज आणि संत तुकाराम हे तिन्ही महापुरुष एकाच काळात जन्माला आलेले आहेत. पण रामदास स्वामी ह्यांची मराठी भाषा खूपच पद्य आहे. तुकाराम महाराजांची भाषा तरल आहे. ती आजच्या मराठीशी खूपच जवळीक साधते. तर शिवाजी महाराजांची मराठी भाषा आणखीच वेगळी आहे. एकाच काळात जन्माला आले असताना मराठी भाषेत इतकी भिन्नता कशी? >>>>>>
बी - फारच सूक्ष्म अवलोकन आहे तुमचे.... Happy

श्री समर्थांनी त्याकाळात संपूर्ण भारत भ्रमण केले होते - अनेक प्रदेश पाहिले होते, अनेक मंडळींना भेटले होते - सहाजिकच या सगळ्याचे प्रतिबिंब त्यांच्या वाङ्मयात उतरलेले दिसते.

छ. शिवाजी महाराज - त्याकाळातल्या अनेक राजा-महाराजांशी आलेला संबंध, मुगल- आदिलशहा- कुतुबशहांशी आलेला संबंध, इतकेच काय पण टोपीकर (इंग्रज) वगैरे परदेशवासीयांशी आलेला संबंध त्यांच्या भाषेत उतरला तर नवल काय ?

आणि राहता राहिले तुकोबा - माझ्यामाहितीप्रमाणे ते त्यांच्या उभ्या हयातीत देहूगाव, पंढरपूर, इ. जवळपासची ठिकाणे सोडता कुठे गेलेले दिसत नाहीत - सर्वसामान्यांच्या भाषेतच ते कीर्तने करीत होते. संस्कृतप्रचुर, विद्वत्ताप्रचुर भाषेबद्दल सर्वसामान्यांची नावड लक्षात घेता त्यांनी नेहेमीच्या बोली भाषेचा वापर करणे अगदी सहाजिकच वाटते....

(संतांच्या तत्कालीन सामाजिक जीवनाचा, संस्कृतीचा, भाषेचा अभ्यास करणारे यावर विशेष प्रकाश टाकू शकतील. मला संतांचे वाङ्मय कायमच प्रॅक्टिकल (आताच्या जीवनातही उतरवता येण्यासारखे) कसे आहे यामुळे जास्त आवडते - व मी त्या दृष्टीनेच जास्त अभ्यास करायचा प्रयत्न करतो झालं .... Happy त्यामुळे चुभूदेघे.. )

अप्रतिम शशांकजी आणि हे सर्व आमच्यापर्यंत पोचवता ह्यासाठी अनेक अनेक धन्यवाद.

बी, खरंच, तुझं निरीक्षण जबरदस्त आहे.

रामदास स्वामी, शिवाजी महाराज आणि संत तुकाराम हे तिन्ही महापुरुष एकाच काळात जन्माला आलेले आहेत. पण रामदास स्वामी ह्यांची मराठी भाषा खूपच पद्य आहे. तुकाराम महाराजांची भाषा तरल आहे. ती आजच्या मराठीशी खूपच जवळीक साधते. तर शिवाजी महाराजांची मराठी भाषा आणखीच वेगळी आहे. एकाच काळात जन्माला आले असताना मराठी भाषेत इतकी भिन्नता कशी? >>>> तिघांची पार्श्वभूमी आणि कार्यक्षेत्रं वेगवेगळी असल्यामुळे असावी.

मोले घातले रडाया | नाही आसु नाही माया ||

आमच्या सारख्या पाट्या टाकल्या सारख्या नोकरी करणार्‍यांसाठी अगदी चपखल

मस्तच ओळी आहेत या. अगदी अर्थाला चपखल.

मला वाटतं, महाराजांचा जो पत्रव्यवहार उपलब्ध आहेत ती त्यांची रोजच्या बोलण्यातली भाषा नसावी. त्या भाषेत बोलून त्यांना मावळे जोडता आले नसते. कदाचित ती पत्रे त्यांच्या चिटणीसांनी खास भाषेत लिहीली असावीत.