प्रिय ताई

Submitted by संतोष वाटपाडे on 31 March, 2014 - 22:46

गेली सासराला ताई दिस सुखात जाईना
तुझा घोगरा आवाज आता कानात येईना॥ धृ ।।

ताई मांडवाच्या दारी
तुजी वरात थांबली
व्हटावर हाक आली
आमी घशात कोंबली
आता रडायाचं न्हाई यकामेका सांगताना
डॊळ्यामंदी पाणी आलं तरी बाह्यर येईना ॥ १।।

वसरीतल्या झोक्याला
तुझ्यासंगं झुलायाचं
यड लागलं जात्याला
तुझ्यासंगं फ़िरायाचं
तुझ्या हातानं बांधल्या सार्‍या गवर्‍या शेणाच्या
चुलीमंदी जाळायाला आई तयार व्हईना ॥२।।

तुझ्याईना सुना सुना
आडावरचा रहाट
बगुण्याच्या बादलीचं
रोज रड्तं चर्‍हाट
ये ना ताई भेटायाला हाका मारायाच्या किती
गाय गोठयातली काळी आज चाराबी खाईना ॥३।।

शांता कुंभारीण ताई
तुला इचारीत व्हती
तव्हा आई डोळ्यावाटं
कळावळा व्हत व्हती
गुडीपाडवा पहिला ताई जवळ ठेकला
उंब-यात बसलो मी पाय घरात राहिना ॥४।।

गेली सासराला ताई दिस सुखात जाईना
तुझा घोगरा आवाज आता कानात येईना॥धृ।।

--- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सूंदर कविता ! एकदम चित्रदर्शी !

>>>>वसरीतल्या झोक्याला
तुझ्यासंगं झुलायाचं
यड लागलं जात्याला
तुझ्यासंगं फ़िरायाचं
तुझ्या हातानं बांधल्या सार्‍या गवर्‍या शेणाच्या
चुलीमंदी जाळायाला आई तयार व्हईना ॥२।।<<

या ओळी विशेष आवडल्या.
छान लय आहे रचनेला ! येवू द्या अजून !!!

छान आहे. वाचताना त्या उंबर्‍यात पायठणीवर बसलेल्या मुलाच्या जागी स्वतःला अनुभवलं.

आभार मान्यवरहो..... श्री/सौ/कु/चि. (चौथा कोनाडा ) विशेष धन्यवाद.... अजून काव्ये नक्कीच येतील

छान.

छान आहे. वाचताना त्या उंबर्‍यात पायठणीवर बसलेल्या मुलाच्या जागी स्वतःला अनुभवलं.+1