दोई बेगुन

Submitted by चिनूक्स on 28 March, 2014 - 02:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

१. मोठी वांगी (जांभळी) - २
२. घट्ट दही - दीड कप
३. हळद
४. हिरव्या मिरच्या - दोन लहान
५. मोहरी - अर्धा चमचा
६. आलं - अर्धा चमचा
७. लसूण - चार पाकळ्या
८. दालचिनीची पूड - पाव लहान चमचा
९. पाच-सहा वेलदोड्यांची पूड
१०. पुदिन्याची पानं - दहाबारा
११. मीठ
१२. साखर
१३. तेल

क्रमवार पाककृती: 

१. वांग्याचे हवे तसे काप करावेत. म्हणजे चौकोनी, लांब, चकत्या इत्यादी.
२. हे काप मिठाच्या पाण्यात साधारण पंधरा मिनिटं बुडवून ठेवावेत.
३. नंतर पाण्याबाहेर काढून पाणी चांगलं निथळलं की त्यांवर हळद, साखर चांगली चोळावी.
४. अर्ध्या तासानंतर सुटलेलं पाणी फेकून हे काप तेलात खरपूस तळावेत.
५. वांग्याचे तळलेले काप थंड होईपर्यंत दही पाणी घालून चांगलं फेटून घ्यावं. घट्ट कढीइतपत ते दाट असावं.
६. दह्यात मीठ, वेलदोड्याची पूड, दालचिनीची पूड घालावेत. दही आंबट असल्यास आपापल्या इच्छेनुसार साखर घालावी.
७. एका कढईत तेलाची मोहरी, हळद घालून फोडणी करावी.
८. फोडणीत आलंलसूण घालून चांगलं परतावं.
९. तांबूस रंग आला की हिंग घालावं. हिंगाला इंग्रजीत 'असफटिडा' असं म्हणतात.
१०. शेवटी हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत. मिरच्या तडतडल्या की कढई खाली उतरवावी.
११. एका भांड्यात वांग्याचे काप ठेवावेत. त्यावर दही ओतावं आणि शेवटी तयार केलेली फोडणी घालून हे मिश्रण एकजीव करावं. फोडणी अगदी गरम असतानाच दह्यावर घालावी.
१२. वरून पुदिन्याची बारीक चिरलेली पानं घालावीत.

वाढणी/प्रमाण: 
चार व्यक्तींसाठी
अधिक टिपा: 

हा पदार्थ अनेक पद्धतींनी करता येतो.
दह्याची चव कशी असावी, हे आपलं आपण ठरवावं. हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखट वापरता येईल, आलंलसूण वगळता येईल, किंवा फोडणीत कांदा घालता येईल. दालचिनी-वेलदोडा न घालता धणेजिर्‍याची पूड घालता येईल. पुदिन्याऐवजी कोथिंबीर वापरता येईल. क्वचित कढीपत्ताही वापरला जातो. 'पण हे असलं काहीतरी हल्लीहल्लीच इकडे आलेले साउदिंडियनच करतात, आमच्यात कढीपत्ता घालत नाहीत', असं मला ही पाककृती सांगणार्‍या आजोबांनी सांगितलं.

दह्याऐवजी फेसलेली मोहरी वापरली तर 'शोर्शे बेगुन' हा पदार्थ तयार होतो.

हा पदार्थ पोळी, भात, पुलाव यांबरोबर खाता येतो.

माहितीचा स्रोत: 
जगन्नाथपुरीच्या एका मठातील बल्लवाचार्य
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इण्ट्रेस्टिंग रेसिपी... नक्की करून बघणार.

हिंगाबद्दलची अतिरिक्त माहिती वाचल्या-वाचल्या लगेच 'क्वीन' आठवलाच Lol

वांगी एअर फ्राईड करुन हा पदार्थ करुन बघितला. दालचिनी, वेलची पावडर वगळली.
वांग्याचे काप थोडं तेल, हळद, मीठ, लसूण पावडर लावून एअर फ्रायर मधून कुरकुरीत केले.
बाहेर कुठे हा पदार्थ अजून खाऊन बघितला नाही, त्यामुळे मूळ चवीची कल्पना नाही.
पण वांगी न तळता वापरुन देखील हा प्रकार आवडला.
आमच्या घरी याचे वांग्याचा रायता असं नामकरण झालं आहे Proud

Vangi Raita.jpg

Pages