श्रीज्ञानेश्वरी गौरव

Submitted by पुरंदरे शशांक on 25 March, 2014 - 13:31

श्रीज्ञानेश्वरी गौरव

प्रसन्न निर्मल | समई देव्हारी | तैसी ज्ञानेश्वरी | तेवतसे || १ ||

स्निग्ध प्रकाशात | उजळल्या ज्योती | अनुपम दिप्ती | शांतरुप || २ ||

दावी अंतरंग | गीता माऊलीचे | शब्द अमृताचे | करुनिया || ३ ||

भाव श्रीहरिचे | तैसेच पार्थाचे | प्रगटले साचे | मूर्तिमंत || ४ ||

शब्द रुप घेती | देव-भक्त गुज | ह्रदयींचे निज | वर्णियेले || ५ ||

ब्रह्म शब्दातीत | झळके यथार्थ | अफाट सामर्थ्य | ओवी ओवी || ६ ||

उपमा दृष्टांत | शोभे मनोहर | पुष्प परिवार | परिमळे || ७ ||

शांतरस थोर | वर्षतो अपार | निववी अंतर | भाविकांचे || ८ ||

भाषा मराठीसी | चैतन्याचे देणे | सात्विकाचे लेणे | लेवविले || ९ ||

चित्त अनायासे | लाभे विश्रामता | ऐकिता वाचिता | एक ओवी || १० ||

वसू दे वाणीत | नित्य ज्ञानदेवी | हेचि कृपा व्हावी | माऊलीची || ११ ||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा शशांकजी, केवढे रसाळ, ओघवते आणि समर्पक वर्णन. नवऱ्याला पण आवडली आणि विशेष म्हणजे मुलगा जवळच होता म्हणून त्यालापण ऐकवली.

छान, आत्ता मध्यरात्री अगदी प्रसन्न वाटलं.

वसू दे वाणीत | नित्य ज्ञानदेवी | हेचि कृपा व्हावी | माऊलीची || ११ ||

हेच मागणे पुनःपुन्हा ,,

वसू दे वाणीत | नित्य ज्ञानदेवी | हेचि कृपा व्हावी | माऊलीची || ११ ||

अप्रतिम

सर्वांचे मनापासून आभार ....

कार्तिक वद्य एकादशी - श्रीक्षेत्र आळंदी - संजीवन समाधी सोहळा ....
माऊलींचरणी प्रेमपूर्वक, आदरपूर्वक दंडवत ....

पसायदान लिहीणारया माऊलींचे ऋण कुठल्या जन्मी तरी फिटेल काय?शशांकजी तुमच्या शब्दांतही सात्विक गंध भरलाय.
मोगरा फुलला...मोगरा फुलला.