उणीव

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

आत्तापर्यंत अनेकवेळा आपण 'I miss you', 'We will miss you' असे म्हटले असेल.. ग्रूपमधला एक जण कुठे बाहेर जाताना, एखादा जवळचा मित्र/ नातेवाईक लांब कुठे गेला असेल तर.. वगैरे.. पण कधी विचार केलाय, आपण नसू तर किती जण म्हणतील, 'I miss you...'???

आपलं एक सुरक्षित छानसं जग असतं. आपले कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर सुखेनैव आयुष्य चालू असतं. यामधे आपणच नसू, तर या वर्तुळाला काही फरक पडेल का खरंच? आपल्या जीवलगांना पडेल, नक्कीच पडेल, पण हळूहळू तेही पूर्ववत जगायला लागतीलच की. आपली 'आठवण' त्यांना निश्चित येत राहील, पण आपली 'उणीव' त्यांना भासेल का?

फक्त 'मायबोली' आणि माझ्याबद्दल जेव्हा मी असा विचार करते, तेव्हा वाटतं, किती यःकश्चित आयडी आहे माझा! कारण मी व्यक्ति म्हणूनही सामान्यच आहे! सतत 'हुशार' कोट्या करणं, चटपटीत बोलणं, उत्तरं देणं, उत्तम, सर्वांना आवडेल असं साहित्य लिहिणं, किंवा राजकीय, सामाजिक विषयावर बोलणं- असा कोणता विभाग आहे जिथे मी माझा ठसा उमटवू शकलेय? कोणताच नाही! सामाजिक विषयावर लिहिण्याइतका माझा अभ्यास नाही, साहित्यावर बोलावं इतकं वाचन नाही, सतत गप्पा माराव्यात इतकं मोठं वर्तुळ नाही! मग का आहे मी इथे? काय होईल जर मी इथे आलेच नाही उद्यापासून कधीच तर? काहीच नाही होणार! दोन-चार लोक विचारतील, 'हल्ली दिसत नाही' आणि 'कामात असेल' असं समजून स्वतःची समजूतही काढतील. पुढे सरकतील. माझी आठवण येईल कदाचित, पण 'उणीव' भासेल? अंहं, नाही.

या विचाराने मी घाबरते, घुसमटतेच! मला एक तरी वर्तुळ हवंय, एक तरी जागा हवीय जिथे मी 'मी' आहे म्हणून माझं अस्तित्व आहे. मग मी काय करायला हवं ज्याने मायबोलीकर मला नित्य स्मरतील? प्रत्येक धाग्यावर जाऊन लोकांशी बोलायला हवं? सगळ्यांची 'विचारपूस' करायला हवी? काहीतरी जबरी, अफाट लिहायला हवं? गेलाबाजार काहीच नाही, तरी सनसनाटी बोलायला तरी हवं?

त्या मानानी मग डुप्लिकेट आयडी बरे वाटतात मला. बुरख्याआडून का होईना, बेछूट बडबड करून, वादळ निर्माण करून ते स्वतःची छाप तरी निर्माण करतात! आजही जुने मायबोलीकरही 'हा डुप आयडी काय लिहायचा, काय नव्हेच ते' करत काही लोकांच्या आठवणी काढतात की! पण उलट मी काय करते? माझी प्रतिमा जपली जावी म्हणून, शक्यतो कोणी दुखवायला नको म्हणून मोजूनमापून बोलते, टीका करत नाही, केली तरी चार वेळा ती संपादित करून, त्यातले जहाल शब्द कमी करते, एखादी गोष्ट अगदीच पटली नाही, तर किमान ५० मायबोलीकर जिथे असतील तिथे गर्दीत जाऊन 'बघा ना' असं हळूच म्हणते, प्रत्येक ठिकाणी 'दिवे देते' आणि एक सामान्य आयडी बनते. इतका सामान्य, की तो असला-नसला तरी काही फरकच पडत नाही!

पण मी इतकी सामान्य आहे हे मला स्वतःला मोकळेपणाने स्वीकारताही येत नाही! मी धडपडते, प्रयत्न करते की लोक मला विचारतील, माझं मत तिथे महत्त्वाचं ठरेल, किमान विचारात तरी घेतलं जाईल. पण आडातच नाही, तर पोहोर्‍यात कुठून येणार? जे आयडीज येत नाहीत, म्हणून त्यांची उणीव भासते त्यांच्यात एक उपजत स्पार्क असतोच, जो माझ्यात नाही. पण हे कळूनही वळत नाही मला आणि मी उदास बनते. एखादा दिवस मायबोलीवर येतच नाही, आणि बघते, किती लोक काढतात बरं माझी आठवण? एखादा चुकार काढतोही, आणि तेवढाच आधार मला पुरेसा होतो- पुन्हा इथे येऊन माझं अस्तित्व जपायला. मी असले, नसले तरी फरक न पडणार्‍यांना हे दाखवायला, की 'मी आहे'. खोल कुठेतरी मलाही हे माहीत असतं की Maayboli does'nt miss me, I miss Maayboli.

या आभासी जगातच मी इतकी सामान्य, तर प्रत्यक्षातल्या जगण्यात तर मी किती क्षुल्लक? हे 'माझे' लोक असं म्हणेपर्यंतच अनेक लोक मला दुरावतात, मलाही जे जवळचे वाटत असतात, ते अचानक नकोसे वाटायला लागतात. एखादी व्यक्ति कायमचा गैरसमज करून घ्यायचा तो घेतेच आणि एखादी लांब जायला नको असते ती जातेच. माझ्या हातात काय असतं? Nobody is indispensable हे तर मला माहीतच असतं. यावर कोणता टोकाचा उपाय करावा इतकीही हिम्मत नसते माझ्यात. मी फक्त करू शकते विचार. माझं जगणं मात्र सामान्यच रहातं, इथल्याच माझ्या सामान्य आयडीसारखं!

Will you miss me? हा प्रश्न मला विचारावासा वाटतो, पण नाही विचारत, कारण त्याचं उत्तर- Umm, yes, we might remember you, but MISS you? Not really! - हे आहे आणि हे मी ऐकू शकेन इतकं धैर्य माझ्यात नाही! म्हणूनच मी इथे येत रहाते, येत रहाते, चिवटपणे चिकटून रहाते.. या आशेवर येत रहाते, की हो, कोणालातरी माझी उणीव भासेल!

विषय: 
प्रकार: 

पूनम, हे पाहिलच नव्हतं ग. सुरेख लिहीलं आहेस.

आणि तुझ्या प्रत्येक लिखाणावर हजेरी लावणार्‍या मास्तुरेंची अनुपस्थिती जाणवते आहे. Happy

>>>>>>>
आणि तुझ्या प्रत्येक लिखाणावर हजेरी लावणार्‍या मास्तुरेंची अनुपस्थिती जाणवते आहे.
>>>>>>>

अनुपस्थितीच जाणवू दे. उणीव नको.

पूनम खूप आवडलं. अगदी मनातलं लिहलयस Happy
लालू तुझे पण पटलं एकदम. आठवण काढणारं कुणी असणं हेही नसे थोडके.
>>>जगात कोणाचे कोणावाचून अडत नाही. लोक मार्ग शोधतात>>>>> हे खर अंतिम सत्य आहे.

खूपच मनातलं लिहिलंयस पूनम! आणि प्रत्येक शब्द अगदी जसा हवा तसा.. ती ती भावना समर्थपणे जाणवून देणारा.
मलाही आता १५ दिवस रजेवर असताना खूप आठवण आली होती तुम्हा सगळ्यांची.. आज कशावर चर्चा चालू असेल...का कविता पाडल्या जात असतील.. आजूबाजूला एखादी घटना घडली चांगली वाईट की लगेच वाटायचे..इथे येऊन तुम्हाला सांगावी..त्यावर उहापोह व्हावा.. पण यानंतर मनात यायचं की मी मायबोलीवर येत नाहीये याची कुणाला जाणीव झाली असेल का? अन मग एक उसासा सोडून दुसर्‍या कामात लक्ष घालायचे. पण परवा परत आल्यावर सगळ्यांनी ज्या आपुलकीने स्वागत, कौतुक, अभिनंदन केले त्यातच इथल्या माझ्या अस्तित्वाची जाणीव इथल्या हजारोंपैकी ५-१० जणांना तरी आहे हे कळून खूप बरे वाटले. काही काही गोष्टी बोलल्या जात नाहीत्..त्या समजून घ्यायच्या असतात.. म्हणजे त्या असल्या तरी आनंद अन नसल्या तरी आनंदच!! Happy
---------------------------------------------------------------------------
ऊन सावलीच्या परी कधी नकोसं हवंसं..

पूनम, जरी स्वकेंद्रीत तरी छान लिहिलसं. तुझे इथे बर्‍यापैकी चाहते आहेत.

पूनम, छान लिहिलय, अगदी मनापासून. पण उणीव/गरज्/आठवण वगैरेसाठी अगदी असामान्यच असले पाहिजे असे काही नाही Happy असो, येथील प्रतिसाद वाचायला पण छान वाटले.

सुंदर लिहिलं आहेस पूनम!

पूनम... किती नितळ, समोर आरसा धरल्यासारखं? बहोत अच्छे. तू हे जे लिहिलस ते मला नाही वाटत "तुझा ठसा ठेवण्यासाठी" लिहिलस... ते इतकं आतलं, सहज, ओघवतं आहे की प्रत्येकाला ते स्वतःचं वाटलं. खूप काळानंतर कधीतरी एखाद्या निवांत क्षणी आमच्यातल्या अनेकांना ह्या लेखातलं आठवेल... परत एकदा हाच "आरसा समोर धरल्याचा" क्षण जगू... हे तुझ्याच करणीचं करतूत असेल...

दर श्वासाला आपण आपल्या जिवलगांनाही मिस करत नाही... त्यांची उणीवही भासत नाही. (तसं झालं तर आयुष्य आपलं न रहाता, त्यांचं होईल)
भेटलेला (मायबोलीवरही, हं) प्रत्येकजण काहीनाकाही उमटवतोच, मनाच्या मातीवर....
कालांतराने काही कारणाने मात्रं त्यांनी आपल्यावर उमटवलेले ठसे - काही नावासहीत काही नावं पुसलेले... परत एकदा फुंकर घालून धूळ उडवतो आपण...

नाव महत्वाचं नाही.... ठसा मात्रं आहे... तेव्हा असच आतलं आतलं लिहीत रहा... Happy

(इथे लिहाव का? जाऊदे लिहीतोच! उगाच उणिव भासायला नको! :P)
योग, उणिव आणि गरजेमधील फरक चान्गला सान्गितलास! पटली पोस्ट! Happy
उणिव काय की गरज काय, दोन्ही पुर्‍या झाल्या नाहीत तरी काम भागुन जाते, वेळ कण्ठता येतो!
पण.........
गरजेची पुर्तता दुसर्‍या पर्यायाने करण्याचा शोध सुरु होतो, वा दुसर्‍या पर्यायाने केलि जाते
तसे उणिवेचे होत नाही, उणिव ही निखळ अनुपलब्धता असते, तिची जागा दुसरे कोणतेही पर्याय सहसा घेवु शकत नाहित
उणिव भासणे ही एक खोल हृदयातून उमटणारी भावना हे! (वेळप्रसन्गी मनावरील ओरखडा हे)
(आता एक खरे की एखाद्याला भासणारी उणिव, दुसर्‍याच्या समजुतीनुसार खिजगणतीतही नसेल! जसे की १९९० मधे माझे वडील गेल्यावर त्यावेळेस जाणवले नव्हते, येवढे हल्ली त्यान्च्या उपस्थितीच्या उणिवेचे जाणवते, तर कित्येकान्ना नसेनात का वडील काय फरक पडतो असेही वाटेल! असे असले आणि उणिवेचा तपशील जरी बदलला तरी तीव्रता तीतकीच रहाते)
खर तर मला अस वाटत की "उणिव" हा शब्दच वापरुन वापरुन गुळगुळीत झाल्याने त्याच्यामागचा गम्भिर अर्थ लोप पावला हे, उणिव म्हणजे ती बाब, जी पुन्हा (अथवा काही प्रथमतः देखील) कधीही प्राप्त होणे शक्य नाही! याची व्यावहारीक तसेच भावनिक उदाहरणे अनेक देता येतिल, अशा या उणिवेची गरजेशी तुलना करणे वा त्यात साम्य शोधणे ही गल्लत होऊ नये. वुई वील मीस यू, याचा अर्थ इतकाच की तुझी "अनुपस्थिती" जाणवेल, याचा असा अर्थ घेऊ नये की "तुझि उणिव भासेल" पण बोलिभाषेत असाच अर्थ घेतला जातो!
उणिवेची मला भावलेली काही उदाहरणे.......
वडिल गेले, वडीलान्ची जागा, त्यान्चे असणे आता नाही ही उणिव
मी करोडपतीच्या घरात जन्माला आलो नाही, (जे प्रथमतः होणे देखिल शक्य नाही), ती उणिव
मला टक्कल पडले, केस गळून गेले, Proud कोणत्याही उपायाने केस परत येणार नाहीत, ती केसान्ची उणिव
एनिवे.... हा विषय गहन आणि गम्भिर हे! (उगा आपण त्यावर जास्त नको लिहायला)
...;
आपला, लिम्बुटिम्बु

पुनम आणि सगळ्यांच्या पोस्ट वाचून आता (मायबोलीवर) कसलिच उणिव भासत नाहीयं... Happy

पूनम,
मी हे वाचलच नव्हतं. सुंदर..!!
खरतर चार चौघांच्या मनांतलच लिहिलयस. सुरेख.
--------------------
जगा.. जगवा..
हसा.. हसवा..
जीवन एक जल्लोष आहे. Happy

पुनम,
हे माझ्यासारख्या साध्या (सामान्य) आयडीला वाट्त, पण तुलाही असं वाटत हे वाचुन खुप आश्चर्य वाटतय. किती सुरेख आणि सहज लिहीतेस तु . हे जे तुला वाटतय, तसे विचार माझ्या मनात कायमच येत असतात. कारण मी इथे फक्त वाचायला येते. लिहीता मला येत नाही.(मी प्रतीसाद देतानाही ३-३ दा विचार करते , काय लिहु, नेमक्या शब्दात कसं लिहू , पाल्हाळ तर वाटणार नाही ना? ... अशा हजार शंका ) तुझ्या गोष्टी मला अजुनही आठ्वतएत. पैठणीची गोष्ट माझ्या आवडत्या गोष्टींपैकी एक आहे.
तुझा हा लेखही खुप भावला.

Pages